युगांतर आरंभ अंताचा भाग २५

Primary tabs

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
9 Aug 2019 - 4:55 pm

देवकीने कंसाच्या पायाला जड बेड्यांनी सुजलेल्या हातांचा विळखा घातला.
"भ्राताश्री.....हा सातवा पुत्र आहे, भ्राताश्री. सातवा आहे. आठवा नाही."
कंसने चिडून पाय झटकला. रडणाऱ्या नवजात बालकाला घेऊन निघून गेला.
'गेलास? घेऊन गेलास शेवटचा उरलेला आशेचा किरण सुद्धा?
"आमची सर्व आपत्ये तुझ्या हवाली करेन" असं म्हणत पतीचा जीव वाचवला...... तेव्हा कुठे माहित होतं? आपण निवडलेला पर्यायी मार्ग विषारी काट्यांचा असेल.... कुठे माहित होतं? त्या काट्यांचं विष जीव न घेता असं सतत रक्तात भिनत मृत्यूपेक्षाही भयंकर यातनादायी जीवन बनेल.... कुठे माहित होतं? कंस क्रूरतेच्या सर्व सीमा लांघून देईल.... कुठे माहित होतं?
कुठे माहित होत देवा.... ज्या अग्निदेवतेभोवती प्रदक्षिणा घेऊन सौभाग्य प्राप्त होतं म्हणतात, ती च अग्नि आमचं उभं आयुष्य असं बेचिराख करेल?
माहित तर कंसालाही इतकेच होते की आमचा आठवा पुत्र त्याच्या काळ ठरेल..... तरीही? का? का कंसा? बाकीचे का? इतका भितोस ? त्या आकाशवाणीवरही पूर्ण विश्वास नाही तुझा? नुकतेच जन्मलेले जीव....तान्हे, निष्पाप जीव.....आमच्याच रक्ताचे! त्यांचं पाप इतकंच, की ते या देवकीच्या पोटी सचेतन झाले?
बघ देवा.... करागृहाचा कण न् कण पुन्हा कसा तमाने ग्रासला जातोय ते...... जखडलेल्या हातांनी नशिबाला बोल लावत माथेफोड करण्यावाचून आम्ही काही करू शकत नाही. आक्रोश ऐकायलाही या कारागृहाच्या तीन भित्तिका आणि या गजांखेरीज कोणी नाही. स्वतःच्या जीवाची इतकी मोठी किंमत द्यावी लागते ? देवा, अजून किती नरकयातना बाकी आहेत?'

तळ कक्षातून कर्कश्श रडण्याचा आवाज आला..... पुढच्याच क्षणी....."ठाप्पSSS" !! शांतता ! भयाण, वेदनादायक! देवकीने आक्रोश केला. पण अस्फुटसा आवाजही बाहेर येईना. घसा केव्हाच सुकून गेला होता. मनातल्या मनात उठलेल्या लाखो वेदनांच्या लाटा आणि रडून सुजलेले डोळे.... कडांवरचं पाणी पापण्यांनी गालांवर लोटून दिलं आणि तिची शुद्ध हरपली. वासुदेव अबोल अश्रू गाळत कोपऱ्यात गुडघ्यांत डोके खुपसून बसला होता. दु:खावेगात तो ही निद्राधिन झाला.

दोघांना जाग आली. वेळेचे भान त्यांनी हरपले होते. कारागृहात ना सुर्याची किरणे पोचत होती, ना चंद्राची शितल छाया. गजांपलीकडे जळणाऱ्या दोन मशाली अंधूक प्रकाश देत तैनात केल्या होत्या तितक्याच. पण त्या क्षणी सभोवताली एक प्रकाश पसरला होता. काहीतरी अलौकिक भासत होते. एककेंद्रित होऊन तो प्रकाश देवकीच्या उदरात सामावला. देवकी आणि वासुदेव चकित झाले.
"म्हणजे ती आकाशवाणी खरी होती नाथ?" तिने उदरावरून हात फिरवला. "आठवा पुत्र.... आपला आठवा पुत्र! आपले कष्ट आणि हाल संपणार."
तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. त्याच्या डोळ्यात मात्र भविष्याची चिंता होती.
"नाथ? काय झालं?"
"देवकी... हे मृगजळ तर सिद्ध होणार नाही ना?"
"नाथ! आकाशवाणीवर विश्वास ठेवा. आपला हा पुत्र कंसाचा वध करेल."
"देवकी.... मला विश्वास आहे त्यावर. पण ही वार्ता कंसाला कळेल तेव्हा काय होईल? कंसाने स्वतःच्या भोजवंशी पिता उग्रसेनांना कारागृहात धाडलं. स्वतःचे भगिनीपुत्र निर्दयतेने...." त्याला वाक्य पूर्ण करता येईना...."कसं वाचवणार आहोत आपण आपल्या या पुत्राला कंसापासून?
"नाथ, आकाशवाणी करणाऱ्या शक्तीकडे या समस्येचा तोडगा नक्की असेल. जी आपल्या यातनांचे कारण आहे तिच निवारणही करेल." देवकीचा आत्मविश्वास पाहून वासुदेवाला आधार वाटला.

©मधुरा

धर्मलेख