युगांतर - आरंभ अंताचा भाग १९

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
3 Aug 2019 - 1:59 pm

भाग १९

हस्तिनापुरात पंडु स्वयंवर जिंकून कुंती सोबत आला. गुलाबपाकळ्यांच्या वर्षावात महालात त्यांनी प्रवेश केला.
"तातश्री!"
"महाराज पंडु! स्वागत आहे महाराणी कुंती" पंडु आणि कुंतीने भीष्मांना नमस्कार केला.
"अनुज..." हास्य मुखाने धृतराष्ट्र आवाजाच्या दिशेने येत होता. पंडूने जाऊन त्याला मिठी मारली.
"मला खात्री होती. तु स्वयंवर जिंकणार!" कुंतीने पुढे जाऊन नमस्कार केला.
"आयुष्यमान भवं!"
मागून गांधारी पुढे आली.
"महाराज, तुमची भ्रातृजाया.... गांधारनरेश यांच्या कन्या, गांधारी."
भीष्मांनी परिचय करून दिला.
पंडुला आनंद झाला. पण गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी पाहून त्याला आश्चर्य वाटलं. भीष्मांकडे पाहत तो काही विचारणार इतक्यात भीष्मांनी त्याला नजरेनेच शांत राहण्याची खूण केली. पंडू आणि कुंती ने वाकून नमस्कार केला आणि गांधारीने कुंतीला मिठी मारली.
पंडु आणि कुंतीचा विवाहसोहळा हस्तिनापुरात तितक्याच थाटामाटात पार पडला जितका धृतराष्ट्र आणि गांधारीचा झाला होता. हस्तिनापुरात आनंदाचे वातावरण पसरले होते. शकुनी मात्र आतून जळत होता. कुंतीच सुख त्याला रोज डिवचत होत.... एखाद्या नागाच्या फण्यासारखं! 'इतके त्याग केले आणि बदल्यात काय मिळालं तिला? कृत्रिम अंधत्व. आयुष्यभरासाठी अंधारी रात्र.... जिथे पहाट होण्याची शक्यता तसूभरही नाही." शकुनीने मनोमन गांधारीला न्याय देण्याकरता जीवनभर प्रयत्न करायचा निश्चय केला.
"प्रणाम तातश्री."
"या महाराज."
"आपण बोलावलेत. काही महत्त्वाचे सांगायचे आहे, असे कळवलेत."
"हो महाराज पंडु. हस्तिनापूराच्या सुरक्षिततेची चिंता वाटते आहे."
"काय झाले आहे तातश्री? कोणी शत्रू आहे? की कोणती समस्या उद्भवली आहे?"
"सध्या तरी तसे दिसत नाही. परंतु भविष्यात हस्तिनापुरवर कुणीही आक्रमण करू नये याची खबरदारी घ्यायला हवी, महाराज."
"चिंता नसावी, तातश्री. मी हस्तिनापुराच्या सीमारेषा त्या प्रत्येक नगरी, प्रदेश आणि राज्यातून पुढे नेईन जे हस्तिनापुरावर आक्रमण करण्याचे स्वप्न बघु शकतात. आज्ञा असावी."
"विजयी भव!"
हस्तिनापुरच्या सीमारेषा वाढतवत न्यायचे काम हाती घेऊन पंडूने सेनेसोबत कूच केली. अंगदेश, काशी, बंगदेश, कलिंग, मगध सारखी राज्ये भीष्मशिष्य पंडुने हस्तिनापुरच्या छत्रछायेखाली आणली. काहींनी मैत्रत्व स्विकारले, काहींनी वीरगती! हस्तिनापूराची नवीन सीमारेषा पंडु आपल्या बाणांनी आखात चालला होता. पंडुने परशुरामशिष्य भीष्मांकडून युद्धकला अवगत केली होती. हस्तिनापुराशी युद्ध म्हणजे आपल्या अस्तित्वाचा विनाश , हे सर्वांना एव्हाना कळाले होते. हस्तिनापुर आता एक विशाल राष्ट्र बनत चालले होते. चौफेर पसरलेले साम्राज्य, शक्तिशाली सैन्य आणि मजबूत राजनितीची नीव! महाराज पंडु संतुष्ट होऊन हस्तिनापुरास परण्याच्या वाटेवर असताना एक सैन्याची तुकडी येताना दिसली. समोरचा रथी रथावरून खाली आला.
"प्रणाम मद्रनरेश"
"प्रणाम महाराज पंडु."
"सैन्य घेऊन इथे?"
"नाही राजन्!"
"मग?"
"आपण मित्रत्वाची भेट दिलीत. म्हणून आम्ही तुम्हाला मैत्रीची भेट द्यायला आलो आहे."
"स्विकारली आम्ही!"
"न बघताच महाराज?"
"तुमच्यावर आणि आपल्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे मला राजन्. सोमरस सांगून विष पाजणारे तुम्ही नाही."
"ये माद्री." एक सुंदर तरुणी चालत पुढे आली. तिचे सौंदर्य अप्रतिम होते.... अगदी चंद्राने त्याच्या चांदण्यांचा चुरा तिच्यावर उधळला कि काय असा भास व्हावा इतपत! "महाराज आपण मैत्रीप्रस्ताव देऊन गेल्यावर माद्रीला तुम्ही पसंत असल्याचे तिने सांगितले."
मद्रनरेशने आपली कन्या माद्रीच भेट म्हणून द्यायला आणली आहे म्हणल्यावर पंडुला धक्का बसला.
"पण मद्रनरेश.... माझा विवाह झालेला आहे."
"मला काही हरकत नाही, पंडु महाराज." माद्री लाजत लाजत म्हणाली.
"पण राजकुमारी, कुंतीने तुम्हाला स्विकारले नाही तर....?"
"त्या स्विकारतील. मी त्यांची मनधरणी करेन." माद्री म्हणाली, "आपली परवानगी असेल तर."
"ठिक आहे. मद्र नरेश, आज्ञा असावी." माद्री आणि पंडुने हस्तिनापुरास प्रस्थान केले.
माद्रीच्या रुपाने सर्वजण भारावून गेले होते. तिला नाकरणे कुंतीलाही जमेना. जितकी रुपाने तितकीच मनानेही माद्री लोभस होती. कमी वेळातच तिने सर्वांना जिव्हाळ्याच्या नात्यात बांधले. गांधारीच्या त्यागाने तिच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले होते. सगळे सुखात होते. विस्तारलेले हस्तिनापुर अतुट महासत्ता बनले होते. एकही शत्रू बाहेरून हस्तिनापुरसमोर हत्यार उचलण्याचे धाडस दाखवत नव्हता.
©मधुरा

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Aug 2019 - 3:36 pm | मुक्त विहारि

आवडलं

मृणालिनी's picture

4 Aug 2019 - 8:46 pm | मृणालिनी

धन्यवाद मुक्त विहारी जी! :)

पद्मावति's picture

4 Aug 2019 - 9:29 pm | पद्मावति

मस्तंच.

मृणालिनी's picture

5 Aug 2019 - 11:15 am | मृणालिनी

धन्यवाद पद्मावती जी! :)