पुस्तक परिचय : सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
9 Jul 2019 - 2:46 pm

सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )
काही दिवसांपूर्वी मैत्रीण अस्मिता चितळे हिच्या कपाटात पुस्तक दिसलं. पुस्तक हातात घेतल कि मी पाठच पान बघते. साधारण पुस्तकाचा आशय लक्षात येतो. या पुस्तकावरही पाठच्या पानावर थोडक्यात ओळख दिलेली आहे."आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वतः सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली हि स्मरणयात्रा", असंच पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. पु लं हे आधीच जिव्हाळयाचा विषय आणि त्यांची बायको म्हणून कदाचित सुनीताबाई सुद्धा. लगेचच अस्मिता कडून पुस्तक उधारीवर घेतलं. तरीही घरी येऊन महिनाभर पुस्तक नुसतं पडून होत. आधी सुरु केलेली पुस्तक संपवायच्या नादात याच्याकडे जरा दुर्लक्षच झालं. एकदा परत कपाट आवरत असताना हे पुस्तक दिसलं आणि मग मात्र ते समोर टेबलवर दिसेल असं काढून ठेवलं. जरा शाळा सुरु झाल्यावर रुटीन सुरु झालं आणि मी पुस्तक वाचायला घेतलं.

सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी ... ' आधीच वाचलेलं असल्याने शिवाय इतर ठिकाणीही सुनीताबाईंचे उल्लेख वाचल्याने साधारण त्यांचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज आला होता. पण या पुस्तकात मात्र सुनीताबाईंची वेगळीच बाजू समोर येते. 'आहे मनोहर तरी ... ' मध्ये त्यांनी पु लं बद्दल अगदी परखडपणे अनेक गोष्टी लिहिल्यात तशाच स्वतःच्या स्वभावाबद्दलदेखील त्या लिहिल्या आहेत. त्यांची शिस्त, त्याचा आग्रही किंवा क्वचित हेकट स्वभाव हे बऱ्याच जणांना आवडत नसतील याची त्यानंदेखील कल्पना होती. पण सर्वानी आपल्याला चांगलं म्हणावं असा त्यांचा आग्रहदेखील नव्हता. कुणी वाईट म्हणेल म्हणून त्यांनी आपली जीवनशैली बदलली नाही. कधी कुणाच्या आयुष्यात हस्तक्षेत केला नाही कि स्वतःच्या आयुष्यात तो खपवून घेतला नाही. याच सुनीताबाईंची एक वेगळीच बाजू या पुस्तकातून आपल्या समोर येते. साधारण वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी १९४२ च्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं. चळवळीचं काम म्हणजे अंगी कणखरपणा हवा, शिस्त हवी, नियोजन हवं. हे सगळे गुण त्यांच्या अंगी होतेच. पण चळवळीमुळे त्यांना आणखी आखिवरेखीवपणा मिळाला. एक उद्दिष्ट्य मिळलं. जीवाला जीव देणारी मित्रमंडळी मिळाली. दागिन्यांची जवळपास नावड असणाऱ्या त्यांना खादीमुळे आणखी मोकळीक मिळाली. त्याकाळी घरदार सोडून चळवळीसाठी म्हणून बाहेर पडणं हे सोपं नव्हतं. आधीपासून आवडीचा असलेला एकटेपणा चळवळीत मिळालेल्या अनेक बऱ्या वाईट अनुभवांमुळे आणखी जवळचा झाला. कर्तव्याला त्या कधीच चुकल्या नाहीत. मूल्यांशी तडजोड नसते हे त्यांचं आधीपासूनच तत्व या काळात आणखी घट्ट झालं. इतकं कि कर्तव्यापोटी लढ्यात गेलेले असल्याने स्वतंत्रसैनिकांना लागू झालेलं पेन्शन त्यांनी घेतलं नाही.

तडजोड हि त्यांना जणू काही अमान्यच होती. पण कधी ना कधी ती करावीच लागते. कधी निरुपाय म्हणून तर कधी आपल्यालादेखील कळत नाही का म्हणून. पु लं शी लग्न हा देखील त्यातलाच एक प्रकार. त्या स्वतः हे कबूल करतात कि लग्न हे कृत्रिम बंधन त्यांना अनावश्यक वाटत होत.पण केवळ भाई म्हणाले म्हणून त्यांनी रजिस्टर लग्न अक्षरशः उरकून टाकलं. ज्यात साधा लग्नाचा फॉर्म आणण्याचा खर्च देखील वडिलांवर टाकला नाही.

एखादं माणूस त्यांच्या मर्जीत बसलं म्हणजे मग त्या त्याच्याशी अगदी हक्काने मोकळेपणानं बोलत. पण अशी माणसं अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी . पुस्तकात या सर्व माणसांचा उल्लेख आहे .यात उरळीचे बापू कांचन , नाना जोग, माधव आचवल, मधू गानू , शांताबाई शेळके,आमटे कुटुंबीय इत्यादी नाव येतात. हि माणसं कितीही जवळची असली तरीही कुणीही केव्हाही घरी यावं नि गप्पा माराव्या अशी परवानगी कुणालाच नव्हती. नियम जो एकाला तोच दुसऱ्याला. त्यात कमी जास्त त्यांनी कधी केलं नाही. याचे कितीतरी उल्लेख पुस्तकात येतात.

सुनीताबाई शेवटपर्यंत कशा स्वतःला जमेल ते सर्व काम स्वतः करत. अगदी कामाला ठेवलेल्या बाईवर देखील भर पडू देत नसत. परावलंबन हा जणू त्यांच्यासाठी शापच. उलट भाईंना ते जास्त प्रिय. म्हणूनच भाईंची जास्तीत जास्त काम त्या स्वतःवर ओढवून घेत. कारण जेव्हढ्या प्रेमाने,आपुलकीने त्या भाईंच काम करतील तेव्हढ्याच प्रेमाने ते कुणी करील यावर त्यांचा विश्वास नसायचा. एकदा एखाद काम करायचं ठरवलं कि मग पूर्णपणे झोकून देऊन त्या ते काम करायच्या. मग अगदी शेणाने अंगण सारवण असो किंवा पुस्तकांची प्रूफ तपासणं असो किंवा घर टापटीप ठेवणं असो. त्या अगदी मन लावून हि काम करीत.

पु लं ची सगळी काम त्यांनी अंगावर ओढवून घेतल्यावर त्यांनी ती देखील अशीच परिपूर्ण करण्याकडे त्यांचा कल असायचा. मग पु लं देशपांडे प्रतिष्ठानच असो किंवा पु लं च्या प्रयोगांचं असो. स्वतःच्या गरज कमीत कमी ठेवून आलेल्या पैशाचा समाजच्याकामी पूर्ण विनियोग करणे याकडे त्यांचा कल जास्त असायचा. मग त्यातूनच त्यांनी कितीतरी देणग्या देऊ केल्या. पण त्या द्यायच्या आधी देखील त्या त्या संस्थेला जाऊन भेट देणं, त्यांचं काम नीट समजावून घेणं, आणखी ४ जणांकडून त्याची माहिती घेणं आणि मग पूर्ण खात्री पटल्यावर मात्र भरघोस देणगी देणं हे त्या जातीने करायच्या.

पु लं च्या प्रयोगाच्या आधी पूर्ण रंगमंचाची तपासणी, माईकचा आवाज, आसनव्यवस्था, तिकीटविक्री, इतर कलाकार, त्यांची व्यवस्था, स्वच्छतागृह या सगळ्याकडे त्याच जातीने लक्ष असायचं. पुस्तकात उल्लेखल्या प्रमाणे कुठल्याही दौऱ्यावर जर कुणी घरी बोलावलं तर इतर सहकलाकारांसकट शक्य असेल तरच त्या भेटीला जात अन्यथा त्यांना साध्याश्या व्यवस्थेत ठेवून आपण ऐश आराम कारण त्यांच्या स्वभावात नव्हतं.

त्यांनी जी ए ना लिहिलेली पत्र हा तर एक खजिनाच होता. त्या बऱ्याचदा स्वतःशी संवाद साधत, मग हळूहळू तो संवाद कागदावर उतरू लागला. त्यात जी ए न सारखा समविचारी माणूस संवादाला मिळाला आणि हे मनातले संवाद पत्ररूपाने बाहेर आले. त्या खऱ्या प्रतिभावान होत्या. रसिक होत्या. चांगलं वाईट यात भेद करू शकायच्या.आणि चांगल्याला चांगलं नि वाईटाला वाईट म्हणायची वृत्ती अंगी होती. परखडपणा तर मुळातच होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो कदाचित त्यांच्या पिंडाचा भाग होता. त्यांची चार चार,पाच पाच पानी पत्र वाचून जी ए नि त्यांना लिहिण्याचा आग्रह केला ज्यातून 'आहे मनोहर तरी .... ' निर्माण झालं. आणि त्यांना लेखिका म्हणून लोकांना मान्य करावं लागलं. ज्याप्रमाणे पु लं च्या त्रुटी दाखवल्याबद्दल पु लं प्रेमींनी टीका केली त्याचप्रमाणे बऱ्याच जणांनी त्यांना उचलून धरलं. त्यांचं लेखन हे कुणाला रिझवण्यासाठी, खुश करण्यासाठी नव्हतं तर आतून आलेलं होत. जे रोजच्या जगण्यात त्या अनुभवत होत्या तेच कागदावर उतरत होत. त्यामुळे त्याचा खरेपणा जाणवत होता. मग आलेलं 'मनातील अवकाश', 'मण्यांची माळ','सोयरे सकळ','समांतर जीवन' हि पुस्तकदेखील वाचनीय आहेत.

सुनीताबाईंनी प्रतिष्ठानच्या नावे बऱ्याच देणग्या दिल्या. या सर्व पु लं नि कमावलेल्या पैश्यातूनच दिल्या आणि म्हणूनच कुठेही त्यांनी स्वतःच नाव येऊ दिल नाही. पुस्तकात उल्लेख आल्याप्रमाणे अगदी एकाच ठिकाणी त्यांनी त्यांच्या नावे देणगी दिली ती म्हणजे एका शाळेला आणि त्यातही मुलींच्या स्वच्छतागृहासाठी. तिथे मात्र त्यांनी अगदी स्वतःच्या नावाचा बोर्ड लावण्याची अनुमती दिली. त्यामागे सुद्धा त्यांनी कारण दिल कि साधारणपणे स्वच्छतागृहाला कोणी देणगी देत नाही, निदान आमचं नाव बघून तरी कुणी देणगी दिली तरी मुलींची खूप सोय होईल. त्यांच्या बहुतेक सर्व निर्णयामागचे त्यांचे विचार हे असे व्यापक असायचे. पुस्तकात बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख येतो. त्यांच्या बद्दल कोण काय कुठे बोलल याबद्दलचे संदर्भासहित उल्लेख यात आहेत. या सर्वातून 'आहे मनोहर तरी ...' मध्ये न उलगडलेल्या सुनीताबाई आपल्या समोर येतात.

अर्थात पुस्तकात काय फक्त सुनीताबाईनंच गुणगान आहे असं नाही. सुनीताबाईंचे दोषही आहेत. आणि वेळप्रसंगी त्यांना ते जाणवल्याने दाखलेही दिलेले आहेत. जसे कि सुनीताबाईंनी पु लं च्या प्रयोगाची ध्वनीचित्रफीत बनवण्यास दिलेला ठाम नकार. ज्याचं कारण कितीतरी जणांना समजू शकलेलं नाही. कॅमेरे मधेच येणार मग रसिकांचा रसभंग होईल, भाईंना अवघडतं अशी अनेक कारण सांगितली. शिवाय मग त्या रेकॉर्डिंग चा दुरुपयोग होईल वगैरे. याबाबतीत त्यांनी त्यांच्या सख्ख्या भावाचीदेखील गय केली नाही. त्यालाही रेकॉर्डिंगची परवानगी नाकारली. त्यामुळे आताची नवीन पिढी पु लं चे प्रयोग पाहू शकत नाही. जे आहेत त्याची तांत्रिक सफाई अत्यंत कमी. नंतरच्या काळात सुनीताबाईंना याची बोच लागलेली जाणवते. असेच काही आणखी प्रसंग. मग त्यात पु लं ना चित्रपटापासू दूर नेऊन लिखाणाकडे त्यांचे मन वळवणे असेल किंवा त्यांची त्यांच्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर कुठे लेख लिहू नये याबद्दल असलेला आग्रह. यामुळे रसिकांना पु लं च्या आणखी अनेक लेखांना मुकावं लागलं हे नक्कीच. हे चूक कि बरोबर ठरवणं कठीण आहे. पण त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्या त्या वेळी परिस्थिती होती तसे त्या निर्णय घेत गेल्या. नंतर उत्तर आयुष्यात यातल्या काही निर्णयांचं दुःख झालेलं त्या काही जणांशी बोललेल्या आहेत. तसे उल्लेख पुस्तकात आहेत.

पण जेव्हा स्वतः चा शेवट जवळ आल्याची जाणीव झाली तेव्हा मात्र त्यांनी आवराआवर सुरु केली. भाईंच स्वतःजवळ असलेलं सर्व काही त्यांनी द्यायला सुरवात केली. पार्ल्याला 'पु लं गौरव दर्शन 'संग्रहालय हे यांनी पु लं असताना काढायला पुढाकार घेतला होता. ज्यात पु लं ची हस्तलिखितं, मिळालेले पुरस्कार, त्यांच्या काही किमती वस्तू या ठेवल्या गेल्यात. यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेऊन मेहनत घेतली. इतर अशाच वस्तू कुणाकुणाला देऊन टाकल्या. कोणत्याही गोष्टींचा मोह हा आधीपासूनच त्यांना नव्हता. त्यामुळे या गोष्टींपासून दूर होणं त्यांना जड गेलं नाही. शक्यतो शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचा भर कुणावर पडू दिला नाही. कविता हि त्यांची जिवाभावाची सखी होती. शेवटपर्यत तिनेच त्यांना साथ दिली.

पुस्तकात कवियत्री, लेखिका अरुणा ढेरे याचा एक स्वतंत्र लेख आहे. त्या सुनीताबाईंना बऱ्याच जवळून ओळखत होत्या. जी ए ची पत्र सुनीताबाईंनी त्यांनाच आधी वाचायला दिली. आणि मग बरेच लेख प्रकाशनापूर्वीच अरुणाताईंना वाचायला मिळाले. 'प्रिय जी ए ' हे पुस्तक प्रकाशित होण्यात अरुणाताईंचा खूप हातभार लागला. स्वतः सुनीताबाईंनी अरुणाताईंना पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचा आग्रह केला. अरुणाताईंचा हा लेख देखील खूप वाचनीय आहे. त्यांनी त्यांच्या खूप आठवणी सांगितल्या आहेत. काही गोष्टी तर वाचून स्तिमित व्हायला होत. जस कि लंडन मध्ये असताना पु लं शिष्यवृत्तीवर अभ्यासासाठी गेले होते. त्यामुळे सुनीताबाईंना मोकळा वेळ मिळत असे. तेव्हा त्या इतरत्र फिरून अनेक जागा हेरून ठेवत आणि सुट्टीच्या दिवशी मग दोघे मिळून तिथे फिरायला जात. त्या त्या वेळी सुनीताबाईंनी अनेक टिपणं काढून ठेवली होती. त्या ती पु लं समोर ठेवीत आणि मग तो संदर्भ घेऊन लेख लिहायचं काम मात्र भाईंचं. अर्थात सुनीताबाई याच पूर्ण श्रेय भाईंनाच देतात. "त्याची लेखनाची शैली मला कुठली यायला ", असे त्यांचे कायम म्हणणे असे.

तर असे हे पुस्तक खूपच वाचनीय आहे. पुस्तकाच्या कव्हरवर सुनीताबाईंचं रेखाचित्र आहे. नेहमीच्याच सध्या सरळ चष्मा लावलेल्या सुनीताबाई एकदम ओळखीच्या वाटतात. पुस्तक वाचल्यावर त्यांनाही आपल्यासारखाच वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष करावा लागला हे जाणवत. पु लं ना दिलेली खंबीर साथ मनाला भावते. तरीही कठोरपणा कुठेतरी टोचतो. क्वचित हळवे प्रसंगही पुस्तकात येतात तेव्हा आपणही हेलावून जातो. पु लं आणि सुनीताबाईंच्या रंजक आठवणींसह हे पुस्तक वाचायला मनापासून आवडलं.

वाङ्मयशिफारस

प्रतिक्रिया

छान पुस्तक परिचय. धन्यवाद.

मराठी_माणूस's picture

9 Jul 2019 - 3:06 pm | मराठी_माणूस

पुस्तकाची छान ओळख.

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 3:31 pm | जालिम लोशन

सुरेख, माहीती मिळाली.

जालिम लोशन's picture

9 Jul 2019 - 3:31 pm | जालिम लोशन

सुरेख, माहीती मिळाली.

यशोधरा's picture

9 Jul 2019 - 3:35 pm | यशोधरा

सुनीताबाई अतिशय लाडक्या. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची लेखनशैली, सारंच. त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी आभार.

रायनची आई's picture

10 Jul 2019 - 10:36 am | रायनची आई

छान परिचय ...

रायनची आई's picture

10 Jul 2019 - 10:36 am | रायनची आई

छान परिचय ...

चौथा कोनाडा's picture

11 Jul 2019 - 6:04 pm | चौथा कोनाडा

वाह, क्या हैं ! अतिशय सुंदर पुस्तक परिचय !
खुप दिवसांनी असा उत्तम लेख वाचायला मिळाला.
कठोर शिस्तीच्या सुनीताबाई, त्यांचे विचार, पुलंचं घेतलेलं पालकत्व, त्यासाठी अंगी बाणवलेला "स्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटोर" हे सगळं अचंबित करणारं आहे.

"आहे मनोहर" अर्धच वाचले गेलेय, ते पूर्ण वाचायला हवं आता. आणि हे देखील !

लिहीत रहा, पुढील लेखाच्या प्रतीक्षेत !

मालविका's picture

13 Jul 2019 - 9:19 am | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

अजया's picture

14 Jul 2019 - 12:59 am | अजया

छान पुस्तक परिचय.
सुनीताबाईंबद्दल अतिशय आदर आहे. त्यामुळे हे पुस्तक लायब्ररीत दिसताच वाचले होते. अतिशय आवडलेलं. तुमच्या लेखामुळे परत वाचावंसं वाटतंय!

दादा कोंडके's picture

16 Jul 2019 - 12:27 am | दादा कोंडके

पुलंची बहुतेक पुस्तकं वाचली नाहीत पण 'आहे मनोहर तरी...' वाचलंय. हे पुस्तक आता वाचलच पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

16 Jul 2019 - 12:59 pm | चौथा कोनाडा

पुस्तकाचं मुखपृष्ठ सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं अतिशय समर्पक आहे !
(कोणी केलाय ?)

SBAD

मुखपृष्ठ आणि मांडणी : रविमुकुल

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2019 - 2:07 pm | चौथा कोनाडा

+१

मुक्त विहारि's picture

16 Jul 2019 - 9:32 pm | मुक्त विहारि

छान ओळख करून दिलीत. ...

प्रसाद_१९८२'s picture

17 Jul 2019 - 2:47 pm | प्रसाद_१९८२

छान पुस्तक परिचय !

मालविका's picture

20 Aug 2019 - 11:04 am | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !