देशमुख काका ,

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
7 Jul 2019 - 9:00 pm

रोज सकाळी पहाटे फिरायला जाणे,हा माझ्या जीवनातील एक आनंददाई भाग आहे .या वेळी आपण नेहमीच्या आयुष्य पेक्षा , कांहीतरी वेगळ्या वातावरणात ,वेगळ्या जगात गेल्याचा भास, आपल्याला नेहमीच होत असतो . मस्त पैकी स्पोर्ट्स शूस घालून ,स्पोर्ट्स ड्रेस घालून त्या अंधुक प्रकाशात चालत जाणे व परत येताना घरा शेजारी असणाऱ्या बागेतील बाकड्यावर कांही काळ विसावणे,हा माझा नित्यनियमचा अनेक वर्षाचा कार्यक्रम आहे ,इतर वेळी मुंग्या प्रमाणे पळणारी हि माणसे ,कर्कश आवाज करीत ,धूळ उडवीत जाणारी अनियंत्रित वाहने, या पासून जीवाला थोडी सुटका मिळते . ह्या रम्य वातावरणात कोपऱ्यात हळुवार हातवारे करीत व्ययाम करणाऱ्या आज्जी तर आपल्या छोट्याश्या नातवंडांच्या बरोबर लहान होऊन खेळणारे आजोबा ,घरगुती गप्पात रंगलेल्या व एकमेकींचे बोलणे कान देऊन ऐकणाऱ्या संसारी महिला, तर सर्व क्षेत्रातील चर्चा करणारी व वेगवेगळा ग्रुप करून बसलेली अनेक पुरुष मंडळी. अशी अनेक प्रकारची माणसे आपल्याला या बागेत बघायला मिळतात. या अंधुक प्रकाशातील असणारी हि माणसे ,जर का तुम्हाला दुपारी भेटली, तर कदाचित तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही .थोडक्यात काय,हे पहाटे चे वातावरण आल्हाददायी व शांत असते .पक्षांची किलबिलाटी संपली कि ,हा सूर्य नारायण हि अंधाराची चादर,हळूहळू काढून घेतो आणि वाहानांच्या कर्कश अवाजाने नेहमीच्या दिवसाची सुरवात चालू होते.
असेच कांही दिवसा पूर्वी एक गृहस्थ माझ्या शेजारी बाकावर येऊन बसले .साधारण पणे सत्तर ते पंचाहत्तर वयातील हे गृहस्थ , चांगले सहा फूट उंचीचे ,गोरेपान ,मोठ्या आकडी मिशा असणारे व एखाद्या विशीतल्या तरुणाला देखील लाजवेल, अशी त्यांनी आपल्या पांढऱ्या केसांची केशभूषा केली होती . कदाचीत सैन्यातून निवृत्त झालेले कोणीतरी हे अधिकारी असावेत असे मला क्षणभर वाटले . अनेक वेळेस मी त्यांना या बागेत पाहिलेही होते, पण एक अपरिचीत व्यक्ती म्हणून . एक गोड स्मित हास्य करून त्यांनी माझ्या कडे पहिले व नेहमी प्रमाणेच एखाद्या अनोळखी व्यक्ती प्रमाणे अनौपचारिक बोलणे चालू केले मात्र रोजच्या भेटी मुळे, हळूहळू त्यांची व माझी चांगलीच ओळख झाली आणि विषेश बाब म्हणाल तर, बागेत ज्या ज्या वेळी हे काका मला भेटत असत ,त्या त्या वेळी त्यांच्या हातातील कापडी पिशवीतून, दोन चार सुवासिक फुले काढून, ते माझ्या हातावर ठेवीत असत . ती सुवासिक फुले कधी मोगऱ्याची ,तर कधी चाफ्याची,तर कधी बकुळीची असायची .भेटणाऱ्या ओळ्खीच्या माणसा बद्दल स्नेह व्यक्त करण्याची, त्यांची हि एक आगळीच पद्धत असावी
त्यांचे आडनाव देशमुख असल्या मुळे व ते वयाने माझ्या पेक्षा मोठे असल्या मुळे मी त्यांना "काय देशमुख काका " म्हणूनच हाक मारीत असे . एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून ,काका सरकारी नोकरीतून व त्यांची पत्नी कुठल्याशा शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या .एकुलता एक मुलगा व त्यांच्या सुनबाई कुठल्यातरी कंपनीत जॉब करीत असाव्यात व त्यांचा लहान नातू शाळेत शिकत असावा .
सकाळी आमच्या भेटीत अनेक गप्पा गोष्टि होत असत . कधी चालू राजकारणावर ,तर कधी घरातील ,तर कधी जुन्या आठवणीवर .काकांचे बोलणे मोठे ठसक्यात असायचे .राजकारणी लोकांच्यावर तर त्यांचा भलताच राग . लांब सडक हात पुढे करून,तर्जनी दाखवत बोलण्याची, त्यांची एक विशेष लकब होती. बोलताना बऱ्याच वेळी ते वाक्य पूर्ण केल्यावर समोरच्यालाच प्रति प्रश्न विचारायचे . उदहारण द्यायचे झाल्यास " मी टेलिफोनच्या ऑफिस मध्ये गेलो होतो ,कुठे गेलो होतो ?" मग त्यांचे वाक्य आपण पूर्ण करायचे ,"टेलिफोनच्या ऑफिसमध्ये ". घरातील विषय निघत तसे ते आपल्या पत्नी बद्दल फार कौतुकाने बोलायचे . नातवंडाने केलेल्या खोड्या सांगताना ते इतके भावुक होत असत कि त्यांना बोलणे अशक्यप्राय होत असे . या पाच मिनीटांच्या गप्पा संपल्या की " एकदा घरी या गप्पा मारायला संजय " म्हणत ते लगबगीने घरी निघून जात असत . खरे म्हणाल तर त्यांच्या घराचा पत्ता,त्यांनी मला कधी ही सांगितलं नव्हता आणि मी पण त्यांना तो कधी विचारला नाही . त्यांचे बागेतील इतर मित्र देखील या गप्पात कधी कधी सामील होत असत. एकंदरीत काकांच्या या समाधानी आयुष्याचा मला कधी कधी हेवा वाटत असे . खरोखरच किती भाग्यवान माणूस आहे हा .
अलीकडे काकांचे बागेत येणे अनियमीत होते .मी पण ओळखले ,कदाचीत वृद्धत्वा मुळे त्यांना लवकर उठणे जमत नसावे . मी या बद्दल काकांना विचारले देखील तेंव्हा ते म्हणाले . "अरे ,माझ्या म्हाताऱ्याचे काय घेऊन बसलात संजय , आपले हातपाय चालतात व घरातील माणसे प्रेमाने काळजी घेतात तो पर्यंत हा खेळ चालू ठेवायचा ,वरून बोलवणे आले कि मग ,हसत हसत सगळ्यांना बाय बाय करायचे . " काय ,करायचे ? मी मात्र त्यांचे हे वाक्य पूर्ण करण्यास नकार दिला .
या नंतर काका बरेच दिवस बागेत दिसले नाहीत .मी सहज कुतूहल म्हणून त्यांना ओळखणाऱ्या माणसाला काकांच्या बद्दल विचारले .तेव्हां ते म्हणाले " म्हणजे तुम्हाला अजून कळले नाही वाटते .काका आता आपल्यात नाहीत .म्हणजे पाच दिवसा पूर्वी त्यांना देवाज्ञा झाली". हे ऐकल्यावर मला फारच वाईट वाटले ." तुमच्या कडे त्यांचा पत्ता आहे का हो ? " मी विचारले , त्या सदगृहस्थाने मला काकांच्या घराचा पत्ता तोंडीच सांगितला . माझ्या डोळ्या समोर मात्र आक्रोश करणारी त्यांची वृद्ध पत्नी ,वडिलांच्या निधनाने पित्याचे छ्त्र हरवलेल त्यांचा दु:खी मुलगा व सून, तर आजोबांच्या आठवणीने हिरमुसलेला छोटासा नातू ,हि सर्व माझ्या मनानेच तयार केलेली काल्पनिक माणसे,मला दिसू लागली .
संध्याकाळी मी एक फुलांचा हार घेऊन त्यांच्या घरी पोहचलो .घराची बेल वाजवली तशी आतून एका वृध्द बाईंनी दार उघडले . समोरच टेबलावर काकांचा फोटो ठेवला होता .कांही काळ न बोलताच मी क्षणभर काकांच्या फोटोकडे पहात विनमस्तकपणे सोफ्यावर बसून राहिलो . दार उघडणाऱ्या त्या बाई , कदाचीत काकांच्या पत्नी असाव्यात असे मला वाटले .
"माझी तशी कांही तुमच्याशी ओळख नाही पण मी काकांना बागेत भेटणाऱ्या, त्यांच्या मित्रा पैकी एक मित्र . काका गेल्याचे कळले म्हणून सगळ्यांना भेटायला आलो आहे .आपला मुलगा ,नातू कुठे दिसत नाहीत ?" माझा प्रश्न ऐकल्यावर खांदे उडवीत, त्या बाईंनी चेहरा फारच गंभीर केला व त्या म्हणाल्या "मला वाटलेच तुम्ही मला हे विचारणार, मी काकांची एक दूरची नातेवाईक आहे .आहो ! काकांच्या पत्नीचे निधन होऊन आज अनेक वर्षे झाली . त्या एक चांगल्या शिक्षीका होत्या . आपल्या एकुलत्या एक मुलाने मोठे व्हावे ,चांगले करियर करावे म्हणून या दोघांनी अतोनात प्रयत्न केले आणि त्या प्रमाणे तसेच घडले पण . मुलगा मोठा झाला आणि एक दिवस नोकरीच्या निमित्याने परदेशी निघून गेला . तिथल्याच एका भारतीय मुलीशी त्याने लग्न केले व तो तिथेच स्थायिक झाला . काका व काकू त्याला भेटायला अनेक वेळी गेले मात्र त्यांना अपेक्षीत प्रेम मिळाले नसावे . दुराव्या मुळे हे दोघे भारतात परत आले . कालांतराने काकूंचाही मृत्यु झाला . या सर्व घटणे मुळे काका खुप निराश झाले .या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून कि काय ,काकांनी घरीच आपला एक आभासी संसार मांडला .त्यात त्यांची पत्नी असायची ,मुलगा ,सून ,नातु सर्वजण असायचे .त्यांच्या बरोबर काकांचे संवादही चालू असायचे.बाहेर भेटणाऱ्या सर्व लोकांना आपल्या घरातील ह्या लोकांच्या बद्दल काका, कौतुकाने भरभरून बोलत असत . या आभासी मानसिकते मधून काका कधीच बाहेर आले नाहीत.
हे सर्व ऐकल्यावर मी मात्र अवाक्‌ झालो .कुठले कोण बागेत भेटलेले हे काका ,खरोखरच मनांतून इतके दुःखी असतील याची मला पुसट देखील कल्पना कधी आली नाही .नेहमी हसत सुगंध देणारी फुले हातावर ठेवणाऱ्या काकांच्या फोटोला, फुले वाहताना ,मला मात्र गहिवरून आले.

कथालेख

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

8 Jul 2019 - 2:21 pm | जालिम लोशन

चांगले लिहले आहे.

Nitin Palkar's picture

8 Jul 2019 - 6:39 pm | Nitin Palkar

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो,
क्या गम है जिसको छुपा रहे हो... या पंक्तींची आठवण आली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2019 - 7:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका एकांड्या माणसाचे भावजीवन ! छान लिहीले आहे. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

उगा काहितरीच's picture

8 Jul 2019 - 8:06 pm | उगा काहितरीच

छोटासाच पण छानसा लेख ! तुम्ही अजून छान लिहू शकता.