बिरादरीची माणसं - पल्लो मामा

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in जनातलं, मनातलं
18 Jun 2019 - 2:33 pm

"पल्लो मामा"....हो, बिरादरीत सारे याच नावाने हाक मारतात त्यांना. "दोगे पिरंगी पल्लो" हे पल्लो मामांचं पूर्ण नाव. गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावामध्ये एका माडिया कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारे हे माडिया आदिवासी. ही गोष्ट साधारणतः ६०-६५ वर्षापूर्वीची असेल. आजच हा भाग एवढा घनदाट आहे तर ६० वर्षांपूर्वी कसा असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. जन्मतारीख त्यांना माहित नाही. कारण शिक्षण-शाळा हा प्रकार या भागात अस्तित्वात सुद्धा नव्हता. ते सोडाच, गडचिरोली जिल्ह्याच्या एका टोकावर एटापल्ली तालुक्यात उड़ेरा गाव आहे हे त्या काळात कुणाला माहितसुद्धा नसेल.

पल्लो मामांच बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. पण पुढे किशोर वयाच्या उत्तरार्धात मामांना कुष्ठरोग झाला. बाहेरच्या जगात समाज कलंक मानल्या जाणाऱ्या कुष्ठरोगाला मात्र माडिया आदिवासींने कधीच अस्पृश्य मानलं नाही. आणि आता आपल्यावर ओढवलेल्या कुष्ठरोगाचा उपचार कुठे करायचा हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. लोक बिरादरी प्रकल्प सुरु होऊन आता ९-१० वर्षे झाली होती. आणि प्रकल्पाची महती आता लगतच्या आदिवासी भागामध्ये सर्वदूर पसरली होती. कुणीतरी सांगितलं कि लोक बिरादरी दवाखान्यातच या बिमारीचा इलाज होऊ शकतो म्हणून १९८३ मध्ये पल्लो मामा येथे आले आणि कायमचे इथेच राहिले. हाता-पायांची बोटं गळलेल्या महारोग्याला त्याकाळी कुणीच स्वीकारलंही नसतं. प्रकाश भाऊंनी फक्त त्यांच्या जखमेवरच इलाज केला नाही तर त्यांना कामे दिली, राहण्याची-खाण्याची व्यवस्था सुद्धा केली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिकरित्या पूर्णतः खचलेल्या पल्लो मामांमधे आत्मविश्वास जागवला. म्हणूनच प्रकाश भाऊ प्रमाणेच ही लोकं सुद्धा अविरतपणे अबोलतेने कामे करू लागली.

मामांना लोक बिरादरीला चिन्नीची साथ मिळाली. चिन्नी ही हेमलकसा हुन साधारणतः २५-३० किलोमीटर अंतरावरवर गोपनार गाव आहे तिथली. आज तरी पर्लकोटा, पामुलगौतमी यांसारख्या मोठ्या नद्यांवर पूल आहे पण त्या काळी तुडुंब भरलेल्या या नद्या आणि अनेक छोटे नाले पार करून पायी लोक बिरादरी दवाखान्यात यावं लागायचं. चिन्नीला सुद्धा त्या काळी असाध्य समजल्या जाणाऱ्या कुष्ट रोगाने ग्रासित होती. आणि म्हणूनच उपचाराच्या शोधात ती बिरादरीला पोहोचली. बिरादरी दवाखान्यात चिन्नीचा उपचार व्यवस्थित सुरु होता पण यकृताच्या आजाराने ग्रासल्यामुळे तिला प्राणाला मुकावे लागले. चिन्नीची अचानक सुटलेली भावनिक साथ आणि एकामागून एक आलेल्या असह्य दुःखांमुळे पल्लो मामा पूर्णतः खचून गेले.

प्रकाश भाऊंना, पल्लो मामांबद्दल विचारले असता ते म्हणतात कि "सतत हसरा चेहरा" आणि "सतत कामामध्ये रममाण" असे दोन मुख्य गुण त्यांना मामांमध्ये नेहमीच दिसतात. पल्लो ने आजपर्यंत कधीही कामाचा कंटाळा केला नाही असे प्रकाश भाऊ मात्र आवर्जून सांगतात.

"डॉ. प्रकाश बाबा आमटे" या भाऊंच्या जीवन चारित्र्यावर आधारित सिनेमामध्ये पल्लो मामाने कुष्ठरोग्याचीच भूमिका केली आहे. संस्थेमध्ये आपण कधीही आलात आणि प्रवेश करताच कुणी हातात झाडू घेऊन कॅम्पस स्वच्छ करतांना दिसले तर ते नक्कीच "पल्लो मामा" असतील. आजही कॉलनी मध्ये नळाला पाणी नसलं की सर्वजणांना पल्लो मामा आठवतात. बाहेरच्या जगात असेल निवृत्तीची वयोमर्यादा, आमच्या बिरदरीमधे असलं मुळीच नाही. “संस्थेचे समाजकार्य हेच ईश्वर कार्य” असे मानणाऱ्या पल्लो मामांची कामे सुरूच आहेत. आणि तेवढ्याच जिद्दीनं. स्वतःचे अनंत दुःख विसरून अविरतपणे काम करणाऱ्या "दोगे पिरंगी पल्लो" ... म्हणजेच आमच्या लाडक्या पल्लो मामाला लोक बिरादरीचा सलाम!

शब्दांकन:
डॉ. लोकेश व डॉ. सोनू,
सामुदायिक आरोग्य विभाग,
लोक बिरादरी प्रकल्प,
हेमलकसा.

समाजलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

18 Jun 2019 - 4:30 pm | जॉनविक्क

शब्दच सापडत नाहीत. की काय प्रतिक्रिया द्यावी. अशा परिस्थितीत या लोकांचे मनोविश्व काय असते यावर जास्त विस्ताराने लिहा, म्हणजे व्यक्तिचित्रण परिपूर्ण होईल.

एक संपूर्ण वेगळं जग बघायला/अनुभवायला मिळणार याची खात्री आहे. पुढील लिखाणाची आतुरतेने वाट बघत आहे.

लोकेश तमगीरे's picture

18 Jun 2019 - 5:24 pm | लोकेश तमगीरे

@ जॉनविक्क:
खूप धन्यवाद ..!!! आपण दिलेले सजेशन्स अत्यंत महत्वाचे आहेत.
प्रोत्साहनपर शब्दांबद्दल आभार..!

मिपावर काही हेमलकसामधून लिहलेले प्रसिध्द होत आहे हा या मिसळपाव.कॉम चा गौरव आहे.

जेव्हां "जनातलं, मनातलं" सदराखाली आपण लिखाण करता त्यावेळी लोकांची अपेक्षा निव्वळ वार्तांकन या पलीकडे पोहचून व्यक्तीचित्रण व काही महत्वाची माहिती अशा दुहेरी जबाबदारीपर्यंत पोचते. आणि आपण हा गाभा समजून बिरादरी इथे घेऊन आलात तर, वाचकांना त्यामुळे नक्कीच एक वेगळे जग माहीत होईल असा विश्वास वाटतो.

आपल्यास पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा.

लोकेश तमगीरे's picture

19 Jun 2019 - 11:02 pm | लोकेश तमगीरे

@जॉनविक्क:
आपण माझ्यासाठी खूप मोठे शब्द वापरली ... माझी तेव्हडी लायकी नाही.
मला पण खूप छान वाटेल लिहायला. खूप धन्यवाद.

जालिम लोशन's picture

19 Jun 2019 - 10:12 pm | जालिम लोशन

अजुन विस्ताराने लिहा.

लोकेश तमगीरे's picture

19 Jun 2019 - 11:04 pm | लोकेश तमगीरे

@ जालीम लोशन : मनस्वी धन्यवाद...!!! नक्कीच प्रयत्न राहील.

उत्तम. असं लेखन आणखी यावं.

नेगल हे पुस्तक लहानपणी वाचलं होतं तेव्हा हेमलकसा या ठिकाणाबद्दल प्रचंड गूढ रम्य आकर्षण वाटलं होतं.

लोकेश तमगीरे's picture

20 Jun 2019 - 10:23 am | लोकेश तमगीरे

@गवि: खूप आभार ..!!
श्री. विलास मनोहर म्हणजेच बिरादरीचे आत्तोबा यांचं नेगल पुस्तक फार छान आहे.

लई भारी's picture

20 Jun 2019 - 8:28 am | लई भारी

जॉनविक्क यांनी सगळ्या वाचकांच्या भावना मांडल्या आहेत असे वाटते.
आपल्या लिखाणाने प्रेरित होऊन आमच्यासारखे वाचनमात्र लोक काही करू लागतील अशी आशा.

बिरादरीच्या कामाविषयी प्रचंड आदर आहेच. खूप समृद्ध अनुभव विश्व असणार आहे, अजून लिहा.
धन्यवाद.

लोकेश तमगीरे's picture

20 Jun 2019 - 10:30 am | लोकेश तमगीरे

मी लिखाण करण्यात खूप नवा आहे. पण प्रयत्न नक्कीच करणार.
मलाच मिसळपाव वर बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला/ वाचायला मिळतील.
आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. !

श्वेता२४'s picture

20 Jun 2019 - 12:24 pm | श्वेता२४

लोकबिरादरी या प्रकल्पाबद्दल केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात कौतुक आहे. एखादा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात हजारो कार्यकर्ते अव्याहत राबत असतात. त्यांच्यापैकीच पल्लो मामा यांची गोष्ट प्रातिनिधीक वाटते. आदरणीय बाबा व सर्व आमटे कुटुंबिय यांच्या कार्यावद्दल प्रचंड आदर आहेच. पण तुमच्या लेखनाच्या निमित्ताने तेथील प्रत्यक्ष जग समजुन घेता आले. धन्यवाद

लोकेश तमगीरे's picture

20 Jun 2019 - 1:37 pm | लोकेश तमगीरे

आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार..!
आमच्यासाठी पण लोक बिरादरीचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.

Namokar's picture

20 Jun 2019 - 1:49 pm | Namokar

छान लेख ...

लोकेश तमगीरे's picture

20 Jun 2019 - 5:57 pm | लोकेश तमगीरे

धन्यवाद ...!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2019 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका अत्यंत स्पृहणिय आणि लोकविलक्षण प्रकल्पातील एका साखळीचे काम करणार्‍या अप्रकाशित माणसाची तोंडओळख आवडली.

तुमची लिखाणशैलीही आवडली. असेच लिहित रहा. अजून काही वाचायला जरूर आवडेल.

लोकेश तमगीरे's picture

21 Jun 2019 - 4:05 pm | लोकेश तमगीरे

मनस्वी धन्यवाद ...!!

मस्त वर्णनात्मक लिखाण सुंदर लिहिले आहे ... बिरादरीची तर आता ओढ लागली आहे .. माझा एक मित्र आहे , डॉ आशिष हिंगोले , तो तर इथे तीनचार दिवस सुट्टी आली कि जातोच जातो .. तो म्हणतोही , तू एकदा तिथे गेलास कि मानाने तिथलाच होऊन जाशील म्हणून .. बघू तिथे गेल्यावर नक्की काय होतंय ते कळेलच ...

लोकेश तमगीरे's picture

13 Jul 2019 - 9:49 am | लोकेश तमगीरे

@खिलजी:
मनःपूर्वक आभार...!
नक्कीच ....लोक बिरादरी प्रकल्प हा खूपच संसर्गजन्य आहे.
कधी आपण गेलात तर प्रकल्पातील जुन्या कार्यकर्त्यांना नक्की भेटा.

लोकेश तमगीरे's picture

26 Jul 2019 - 11:41 am | लोकेश तमगीरे

पल्लो मामा

लोकेश तमगीरे's picture

26 Jul 2019 - 11:42 am | लोकेश तमगीरे

पल्लो मामा

लोकेश तमगीरे's picture

26 Jul 2019 - 11:44 am | लोकेश तमगीरे

पल्लो मामा