मिशीनीची चोरी

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in जनातलं, मनातलं
10 Jun 2019 - 5:31 pm

रामा खरात जवा बाळू सुताराच्या घरी पोचला, तवा बाळ्या तोंडात तंबाखूची गुळणी धरून उकिडवं बसून पायात दाबल्याल्या दगडावर घासून रंध्याच्या पात्याला धार काढत बसलं हुतं. आजूबाजूला कोंबड्यांचा कलकलाट अन मदीच गुळणीमुळं त्वांडाचा चंबू करून बसल्यालं बाळ्या मजेदार दिसत हुतं. दुनी पाय प्वाटाशी घिऊन बसनं त्येला काय साधत नव्हतं, कारण मुदलातलं डेऱ्यावानी असनारं त्याचं गरगरीत प्वाट मजबूत दिसत हुतं. एकंदरीतच घायकुतीला आलेलं बाळ्या जवा पुढं वाकून रंध्याच्या पात्यावर जोर मारी त्यावेळी त्याचं मागं खोवलेलं धुतर मजेदार फुगा होऊन वरखाली होई. बाळ्या सवताच एखाद गरगरीत पांढऱ्या कोंबड्यावानी आसमंतात मिसळून गेलंवतं.

"हायती का बाळासाह्यबssss" करत रामा जवा आत शिरला तवा बाळ्याला एकदम बरं वाटलं, अन त्यो गडबडीत गुळणी थुकून,

"ऑ, कोन त्ये, रामभाऊ व्हय, या या या या" करत गप्पकन ढुगान टेकत खाली बसला.

"काय जनू लैच काम सुरुये बाळ्याव?"

"अन लगा, कामं यीतील तवा हत्यारं कामाची नकु व्हय"

"त्ये बी हायच म्हना" असं म्हणत रामानं बाळूप्रमाणेच बुड टेकलं तसं पडत्या बुडाची आज्ञा शिरसावंद्य मानून बाळ्यानं घराकडं त्वांड वेंगाडून दून च्या सांगितले.

"फकस्त हत्यारे धारदार करूनश्यान काय हुतंय बाळू" डोईवरची तिरकी टोपी अजूनच तिरकी करत एक डोळा कावळ्यागत बारीक केलेला रामा बोलला "जरा कायतरी गावगाड्याकडं बी लक्ष असू दे".

"बोंबलभिकं गाव आपलं, हितं आणि काय चिचुके हायती" बाळ्या करवादलं

"अन लगा, तुला काय ठावकीच नाय व्हय रं मर्दा?" असं रामा म्हणस्तूवर च्या आला तशी सबंध कोप एकदमच शिपुरीत उपडा करत फूरफुर करीत रामानं सांगितल्याली गुष्ट लैच सरस हुती. शब्दाला अदमासे दूनयेळा झालेली फूरफुर वजा करता बाळ्याला कळलं की गावात नवीनच उघडलेल्या ब्यांक शाखंच्या आवारात आज एक मजेदार मिशीन लावणार हायती. ही मिशीन म्हणं बाईच्या आवाजात बोलून वाटल तितकं पैकं वकती, एकंदरीत लैच जोरदार कार्यक्रम सुरू हुता म्हणायचे गावात. च्या पिणे संपेस्तोवरच बाळूला ही मिशीन पाहायची अनावर इच्छा झालती. त्यानं कपबश्या आत नेऊन सोडल्या खसाखसा तंबाकू मळून रामाला एक चिमूट देऊन एक स्वतःच्या त्वांडात सुडली, अन पायताण अडकवून बिगीबिगी गावच्या तिठ्याकडं रामाबर सुटला.

तिठ्यावर अर्थातच भाऊगर्दी उसळल्याली हुती. गावभरातली पोरेटोरे, टगी, खट म्हातारी, पुढारीपणाची हौस असलेले सोदे समदी तिथं उलथली हुती. पाक धुरळा झालता, अन त्या धुरळ्याच्या मद्यभागी एक म्हैशीची पेंड ठिवायच्या बारक्या खुली इतकी इमारत हुती अन तिच्या काचेच्या दारातुन डोकावून पाहायची समद्यासनी आस लागली होती, धक्काबुक्की करत दारास्तवर पोचल्याल्या रामा अन बाळूला आत उभं असलेलं एक शर्ट पॅन्ट मधलं पात्र अन कुर्रेबाज फेटा बांधलेलं सरपंच तितकं दिसलं. आता सरपंच आत असताना आत शिरायचा भोचकपणा काय रामा अन बाळूला मानवंना. तशी ते आपले तिथंच घुटमळत उभारले.

आतमदी सरपंचाला बी कशाचं काय कळायचा संबंध नव्हता, पर उगा सरपंच म्हणून वट माराय त्यो बी शर्ट पॅन्टला कायबाय ईचारून जेरीस आणत हुता.

"तसं नव्हं पर हेच्यात पैकं येतंय कुठून?"

"कॅपसिटीनुसार प्रिलोडेड असते स्पेसिफाईड डीनोमिनेशन करन्सी"

"हां हां हां हां, असं असतंय व्हय, मग साधतंय बेसच" सरपंच उगा अकलेचा कांदा सोलत बोललं, परत त्वांड उघडून विचारतं झालं

"उगा आपली चौकशी म्हणून ईचारतुय, त्या पैसा वाटप करणाऱ्या बाई कुठं बसनार मग मिशीनीत?"

तशी टेक्निशियननं डोसक्यावर हातच मारून घेतला, सतत तासभर पिडल्या गेल्यामुळे त्यो तसंही जेरीला आलता, सरपंचाच्या प्रश्नानं त्यो पाकच गाबडला अन क्षणभर आपला उद्योग थांबवत मिशीनीवर हात ठेवून उभारला, अन बोलू लागला तशी दाराला चिकटून उभं असलेली बाळ्या रामा पण लक्ष देऊन ऐकू लागली.

"असं बगा सरपंच, बाई बसत्याती झिल्ह्याला, तिथनं हितवर एक वायर ओढल्या, तुम्ही इकडं पैकं किती हवं ते बोललं का बाई पलीकडून नूटा सुरळी करून घालत्याती वायरीत, का हिकडं परत इस्त्री केल्याली कडक नुट भायर यतीये"

क्षणभर आक्रीत ऐकल्यागत सरपंच अन बाळ्या, रामा त्वांडाची झापडं पाकच उघडून बसली, पुढं कायतरी आटवल्यागत सरपंच गंभीर होऊनश्यानी बोललं

"तेवढी वायर गावात आणताना कुठून आणली हाय, कीती खोलात पुरलीये, मुख्य म्हंजी बेलवडी फाट्यासनं आणली हाय का येडेगुंजी-शिरपुरी आणली हाय तितकं सांगून ठिवा. नाय म्हंजी पैश्याचा मामला शेफ असल्याला बरा. तुम्हांसनी येळ असला नसला कदी अन कुट्ट तर वायर मोडली कापली म्हंजी आमचे गावातलेच शिरपतराव हायती इलेक्ट्रिक मिस्त्री, करतील दुरुस्त".

"ह्याट लेको छे छे छे ते गुपित असतंय ब्यांकेचं, ते काय असं कोणालाबी सांगता यायचं न्हाई".

आपल्याला "कोणालाबी" मदी गुंडाळल्याचं जरा सरपंचांना वाईटच वाटलं. पर त्यांनी अजून आणिक पाणउतारा नको म्हणून गप बसण्याचे ठरीवले. काचेच्या दारातून त्यांचा उद्धार ऐकलेली बाळ्या रामा आनंदी झाली असली, तरी त्यांना सरपंचाची एकंदरीत किवच आली. सरपंच त्वांड, फेटा, तुरा वगैरे पाडून भायर आलं तशी दोघं त्याला चिकटली.

"नका लक्ष देऊ सरपंच, चार दोन बुकं वाचून सवताला महान म्हणवून घेत्याती ही जिंद मानसं" बाळ्या

"व्हय व्हय, आपन आपलं रात्री गनामास्तरच्या वसरीवर समदं ऊमजून घिऊया बयाजवार".

दिवसभराची उसाभरी आटपून जवा मंडळी गणाच्या घराम्होरं असल्याल्या आपल्या रोजच्या गप्पा छटायच्या पारावर जमली, तवा जरा जास्तच ज्यावल्यालं सरपंच डुकरागत डुरकत ढेकरेवर ढेकर देत हुतं. रामानं परत फिरून बाळूची तंबाकूची चिमूट दाढंला दाबून उकिडवं बसत समाधी लावली हुती. बाळू नागावर पहुडल्याल्या ईष्णू देवागत कोपराच्या आधारानं पसरला हुता. सलग पंधरा मिनिटं सगळी गप पडली हुती, बाळ्या, रामाचं गुळणी धरल्यामुळं बरं हुतं. गणामास्तर पार नाकाच्या श्यान्ड्यावर घसारल्याल्या चाळशीतुन कुठल्यातर मासिकात त्वांड खुपसून बसला होता. बोलायला गप्पा अन करायला काय नसल्यानं सरपंच तितकं चुळबुळत बसलं हुतं.

"आवंदा शाळूचं काय खरं नाय, परवा आणि पाऊस झाला, पाक काळी हुनार ज्वारी" असं काहीतर गुळमुळीत बोलत सरपंचानं कोंडी फोडली खरी पर त्यावर इतर तिघांनी काय खास त्वांडं वेंगडली नाहीत. श्यावटी सरपंचांनी हिय्या करून सुरवात केलीच

"मास्तर, मला कळंना झालंय आपल्या गावात बँकेत ती मिशीन का लावल्या रं?"

चाळशी थोडी बी न ढळू देता मास्तर बोललं,

"अहो, पलीकडे कुसेगावला कारखाना आलाय. तिथं मोठी मानसं येनार तिथली इंजिनेर वगैरे वरकड मंडळी येनार. तशी आपल्या बी गावाची भरभराट हुनार, मोठी मानसं काय आपला पैका सतत गाटीला बांधूनशानं हिंडत नसत्यात, त्यासनी सोय म्हणून आपलं गाव बरंय म्हणायला दोन तीन मैल पर गाडीत झटक्यात पोचतंय मानुस. हिथं म्हणे कारखान्याचे गेष्ट हाऊस बी बांधणार हैती, त्यांना कामी यावं म्हणून ही सोय बँक शाखेसोबतच".

बरंच काय कळल्यागत तिघांनी माना डोलवल्या.

"हम्म" करत गंभीर होत पाटील बोललं "पर इकत्या बिट्ट्या मिशीनीत आणि पैकं देणारी बाई कुठं बशिवणार? परत माणूस म्हणलं का टायमाला च्या पानी विडीकाडी सोय हवीच की, ती आणि कुठं करणार?", पाटलांना बाईंची फारच चिंता लागलीवती. त्येंच्या त्या चिंतेवर रामा न बाळू बी नंदीबैलागत बुगुबुगु करु लागली तशी गणामास्तर गडगडाटी हसला अन बोलला

"थुत लेको, बाई कुठं मिशीनीत बसणार व्हय रं, काय लका तुमची अक्कल" म्हणत त्यानं हात ओवळला.

गणामास्तरनं आपल्या अकलेची मापं काढलीत, ह्याचं वाईट वाटण्यापरीस जोरदार वाईट सरपंचांना आपल्याला त्या मशीन मिस्त्रीनं बाई जिल्ह्याला बसतील सांगून खुळ्यात काढल्याचं वाटू लागलं. त्यामुळं ह्या मशिनीचे पूर्ण ज्ञान आपण घेयाचंच, असा चंग बांधून त्यांनी गणालाच साकडं घातलं.

"अन मग मास्तर आता आत कोण नाय म्हणलं का पैकं कोण वाटतंय?"

"ऑटोमॅटिक असतंय ते...".

"तरी जरा बयाजवार होऊन जाऊ दे की....".

बाळ्या रामाने पण बुगुबुगु केलं तशी गणा नरडं खाकरून बोलू लागलं.

"आरं जडबुडाच्यानु मिशीनीत माणूस नसतंय काय, टेलिफोनच्या लायनीनं मिशीन मुख्यालयाला जोडलेली असती, तुम्ही जाऊन तिथं आकडा दाबलात का बरुबर तितकी रक्कम भायर येती मिशीनच्या" गणानं थोडक्यात गोडवा आटपलं, तशी सरपंचाला अनेक शंका उफाळून याय लागल्या. त्याच तारंत त्ये गणामास्तरला बोललं,

"येडा समजला का काय गणामास्तर मला तुमी, काय राव, वायरीत नुट घुसनार नाय तर अलीकडं येतीये कसली?"

आता मात्र गणा हसू दाबत बोलता झाला

"आरं, असलं काय करायची काय बी गरज नसती गड्यानु. ती मिशीन म्हंजी एक इलेक्ट्रिक तिजोरी असती. तिच्यात पैकं भरूनच ठिवल्यालं असतं. तुम्ही कसं चावी लावुन तिजोरीतून पैकं काढताय तसलंच ह्ये. फकस्त हिथं चावी म्हंजी एक पातळ कार्ड असतं, बारकं आकाराला, ते बँक पेशल तयार करवून घेती. आपन मिशीनीवर ते कार्ड लावलं का आपल्याला ती परवलीचा आकडा मागती, त्यो बरुबर घातला का पैकं येतं, त्यो आकडा तितकं ताडायला टेलिफोन लाईन असती".

ही असली आधुनिक गुलबकावलीची गुष्ट ऐकून तिघं चाटच पडली, पन तरी रामाला जास्तच सोस, म्हणतो कसा

"अन मास्तर, इतक्याश्या मिशीनीत काय बसत्याती चिचुके? त्यातलं पैकं संपलं का काय डोंबल कामाची ती मिशीन?"

आपण काय भारी प्रश्न ईचारलाय ह्या आनंदात त्येला क्षणभर बी न राहू देता गणानं फुग्यातली हवा काढीत बोलला,

"आरं बामळ्या, मिशीनीत सवताच समजून घेयाची पावर असती, पैकं संपलं का त्या टेलिफोन वायरीतून उलट संदेश जातोय, पैकं भरा असा, मग गाडीतून पैकं येतं फुल शेकुरिटीत अन परत मिशीन भरत्याती, जाळीनं बंदिस्त केल्याली गाडी बगीतली व्हती मागल्या वखती जिल्ह्याला गेलतो तवा, आटवती का सरपंच?", म्हणत मास्तरनं त्येला बी मदी घोळात घितलं. मिशीनीत बाई बसणार नाहीत ह्ये स्पष्ट झाल्यानं उत्साह मावळलेलं सरपंच नुसतं हुं करून मुकाट बसलं, पर आता रंगात आल्याला रामा काय आवरांना.

"मग मास्तर इकत्या बिट्या मिशीन मदी काय धा पाच हजार म्हंजी डोक्यावरून पानी नव्ह का?"

"ती का लका तुझ्या पडवीतली गंजकी तिजोरी हाय व्हय, एका टायमाला तेरा पंधरा लाख बसत्याती तिच्यात"

त्यो आकडा ऐकताच बाळ्यानं गुळणी सकट तंबाकू गिळूनच टाकली. रामाच्या नरडीला कोरड पडली अन सरपंच बाईचं दुःख विसरून परत ऐकडाव हरखले. अश्या एकूण तीन मिशीन म्हंजी ४५ लाख रुपये हे गणित त्या तिघांना लैच जोरदार वाटलं.

थोड्यायेळानं सरपंच आपलं रामकृष्ण हरी करत उठलं अन सभा विसर्जित झाली, तशी सगळी पांगली.

दुसरा दिस असाच मावळला, सरपंच म्हणं येत्या ग्रामसभेची तयारी करीत दिवसभर चावडीतच बसलं हुतं. बाळ्याला एकदम तीन ओंडकं तासायला आलतं त्यामुळं त्यो बी दिसभर खसाखसा रंधा चालवत बसला हुता. अन 'दिस भर काम नको करायला अन पोळागत हिंडतुय गावात रांडेचा' म्हणत बापानं उद्धार केल्यामुळं रामा गपचिप घरात कायतरी करीत बसला हुता. गणामास्तर कामानिमित्त बाहेरगावी दौऱ्यावर गेल्यामुळं रातीची सभा बी आज तहकूब हुती.

गावगड्यात रात्री लवकरच सगळं चिडीचीप होतं. तसंच गाव बी मेल्यागत पडलं हुतं. बँकेच्या आवारातला शिपाई बी वरच्या पट्टीत घुरत हुता. अश्यातच ऐन मध्यरातीच्या टायमाला तीन आकृत्या बहिरोबाच्या माळाकडून उगवल्या. माळ तुडवून त्या आकृत्या कुसेगावहूनच येणाऱ्या वाटंला लागल्या, तवा दूर कोणाच्यातर वस्तीला असल्याली कुत्री तितकी भुकून योट घालीत हुती. बाकी काय घडामोड नव्हती, पाक वारं बी पडलं हुतं. दबक्या पावलांनी त्या तीन आकृत्या तिठ्याजवळ पोचल्या, त्यांनी पंचानं त्वांडं झाकून घितली हुती. अंगभर काळी भरड घोंगडी लपेटून हाती काट्या घेतल्याली ती तीन माणसं, दबक्या पावलानं बँकेच्या आवारात शिरली तवा रखवालदार शिपाई वरच्या पट्टीत घुरत हुता. शिपायला काय कळायच्या अदुगर तिघांपैकी भक्कम असणाऱ्या एकानं गब्बकन त्येला मागून धरला अन दुसऱ्यानं त्यो बोंबलायच्या अदुगरच त्याच्या त्वांडात कापडाचा ब्वाळा खुपसला. तंवर तिसऱ्यानं त्याला कासरा वापरून खुर्चीत पक्कं जेर करून टाकलं. त्यो बिचारा घाबरून घशातच ऊं ऊं उंहू उंहू करत किवंडायला लागला तशी भक्कम गड्यानं त्याच्याकडं मोहरा वळवून त्येला खाडकन मुस्काड हाणली अन म्हणाला.

"एकदम चिडीचिप बसय माकडेच्या, ज्यादा इव्हळलास तर हितच फटका घालीन डोसक्यात काटीचा" तशी जिवाच्या भयानं घाबरून रखवालदार गप पडला.

"चला रं" म्हणत भक्कम माणसानं बारक्या खुलीकडं पावलं वळीवली तशी उरल्याली दोघं बी त्याच्या मागं निघाली, त्यो बहुतेक त्यांच्या म्होरक्याच असावा.

खुलीत एका कडंला ठिवल्याल्या दुन मिशीनी हुत्या, पहिला तिकडं मोर्चा वाळवून त्या तिकलीनं एक एक करून दुनी मिशीनी नीट तपासल्या. जवळच्या हत्यारांनी त्या खोलायचा सायास केला पर लवकरच त्येनला ह्या दुन मिशीनीं काय दाद देत नसल्याचं उमगलं. तशी ती तिघंही उरल्याल्या एका मिशीनीकडं वळली अन ती मिशीन उघडायला खाटखुट करू लागली, पर त्यो बी ख्येळ काय साधंना. मायला मिशीनीचा पत्रा बहुतेक लैच जब्बर हुता. पंधरा मिनिटं असेच घामाघूम झाल्याव उरल्याली दुघं हिरमोड झाल्यागत मागं सरली तशी भक्कम म्होरक्या, घोगऱ्या आवाजात करवादलं.

"चलाय, काम फत्ते केलं नाय तर काय घावायचं नाय इकतं समदं करून, ही मिशीन हिथं उगडत नसल तर सोबतच न्याया हवी".

आता तर जीवाचा धोका टळल्याला शिपाई बी बाहेर ऊं ऊं करीत चुळबुळ करीत हुताच. वेळ अजून मोडाय नको म्हणत तिघांनी मिशीनीला हात घातला अन उचलून त्येच्या वायरी तोडून टाकल्या. बऱ्यापैकी जड मिशीन असली तरी तिघांनी ती अलगद खुलीबाहेर काढली, तशी म्होरक्यानं परत शिपायाकडं रोख केला. त्याला परत उगाच एक सज्जड गुच्ची देऊन म्हणाला,

"सकाळपत्तर हितंच गप बस भोसडीच्या, चुळबुळ कराय नाय आज्याबात, माजं काम झालं म्हणूनश्यानी तुला जिता सुडतोय, कळलं का?"

"ऊं ऊं" होकार आला, शिपाई तसं बी काय करणार हुता, त्यानं बिचाऱ्यानं पांढरे पंचे अन काळी घोंगडी सोडून फक्त काटीच तितकी बघितली हुती.

तिघं भुरटी सावकाश पावलं टाकत मिशीन उचलून गुल झाली, तवा पहाटंचं पावणेचार झालं हुतं.

सहा वाजायच्या सुमाराला रामा आणि इतर दोनचार मंडळी लोटे घिऊन बाहेर पडली पोटाला उतार पडेना म्हणून जरा लांबवर फेरी मारून तिकडंच मोकळं व्हावं अश्या बेतानं रामा अन दुसरं एक आपलं झपाट्याने पावलं उचलत बँकेकडून मागं लिंबाच्या बनाकडं जाऊ लागली तशी दबकी ऊं ऊं ऐकून मिशीनीच्या खुलीजवळ पोचली, तवा त्यांना घडामोड कळली. हागण्याचा बेत रहित करून रामानं पहिला शिपाई मोकळा केला अन आपल्या सवंगड्याला सरपंच अन पोलीस पाटलाला बोलवून आणायला पिटाळून दिलं. सरपंच घराम्होरं मशेरी घासत बसलं हुतं, तोवर रामानं धाडलेला गडी धावतच पुढ्यात आला. अर्थातच त्यो गावात आला तवा दवंडी पिटल्यागत बोंबलतच आलावता. त्याच्यामागं असल्याली गर्दी पाहून सरपंच ताडकन उटूनच उभारलं अन आत जाऊन कपडे घालून आलं तंवर पोलीस पाटील बी हजर झालता. पूर्ण घोळका बँकेकडं सुटला अन पाचच मिनिटात शिपाई मोकळा झालता, आता मात्र त्येला त्वांड फुटलं अन त्यो बोलू लागला.

"काय लकानू तुमचा गाव, चोरटी पोसताय व्हय मंडळी गावात ?, काल राती आलती वरात इकडं. मी घोळसलं धरून एकेकाला पर थकाय हुतंच की. त्यात चोरटी तीन, शेवटी तिघांनी मिळून मला आवळला खुर्चीला अन त्वांडात घातला ब्वाळा, एक मिशीन घिऊन गेले भडवे"

प्रसंग लक्षात आला तेव्हा मंडळींना तोंड फुटलं. चोरटी कुठून आली असतील ह्यावर चर्चा झाली, पैजा लागल्या. एकादोघांनी तर मिशीन ठेवल्याली जागा कुत्र्यागत हुंगूही बघितली. एकंदरीत चोरट्यांनी ब्यांकंला पाच पंधरा लाखानं लुंगावल्याबद्दल मातूर सामूहिक हळहळ उठली. ह्या सगळ्या गडबडीत सरपंचांनी अक्कल लावून थोडे सुटे पैसे देऊन एक पोरगं पिटाळलं. बस थांब्याजवळ जगन गवळ्याच्या चहाभजीच्या हाटीलातून तालुक्याला पोलिसांना फोन करायचं काम त्याला सोपवून आता सरपंच बी पैजा मारायला उतरले होते!.

ब्यांकेच्या मॅनेजरला, पोलीस इन्स्पेक्टरला वगैरे फोनाफोनी करून झाली तेव्हा तिठ्यावरच्या वडाच्या पारावर मंडळी चर्चा करत बसली होती. शिवा जमदाड्याच्या मते चोरट्यांना एक खास विद्या अवगत असती. ती शिकवणारी देवी हिमालयात राहती अन एकापाठी एक पंधरा अमुशा जर काळं बोकड कापलं तरच ती परसन्न हुती. त्याचं म्हणणं संपेस्तोवर गुरवाचे अप्पा नकारघंटा वाजवून हेच्यात बॉम्बेच्या नामी बदमाश टोळीचा हात असावा ही संभावना सांगत बसलं हुतं. अप्पा बोलताना संथपणे असे लांबण लावत बोलत, त्यात आत्ता त्यांच्याकडं तंबाखूचा ईडा मळायची डुटी लागलीवती. तंबाखूच्या चिमटीला आसुसलेली माणसे निस्ती आपली बुगुबुगु करीत हुती. पोलीस बंदोबस्त येईस्तोवर कायतरी चाळा म्हणून सरपंचांनी सगळ्यांना चा आणाय परत पोरगं पिटाळलं. शेवटी हातात भला थोरला ईडा घिऊन मळताना चा कसा पेयाचा ह्या ईचारात अप्पा एकदाचं गप बसलं.

एकदाची तालुक्यासनं पोलीस पार्टी आली. त्यांच्याच जीप मदी घालून त्यांनी ब्यांकं मॅनेजर बी आणला. त्यो बिचारा पाकच गळाटल्याला वाटत हुता. इन्स्पेक्टर बाबर खाली उतरला तशी माणसांनी त्येला कडंच घातलं. अप्पा गुरवांना आपल्या थोरल्या भावानं आपल्याला कसं "रगात ओकाय लावीन" म्हणून दम भरला हे गाऱ्हाणं घालायचं हुतं. सरपंचांना दुपारच्या जेवणात मटण का मुर्गी कराय सांगू विचारायचं हुतं. लखु होमकराला काहीच सांगायचं नव्हतं, पर लोकांच्या कुलंगड्या अन इतर मौज ऐकाय घावंल म्हणून त्यो पर्वणी असल्यागत लोकांना कोपरानं ढोसत मदीच सूर मारत हुता. अशी एकंदरीत पंचवीस माणसे पाहून बाबर पारच भडकला. त्यानं हवालदार मंडळीला ही समदी भाऊगर्दी पांगवायचं फर्मान सोडलं.

सुरवातीला शिट्ट्या फुंकूनही गावकरी दाद देईनात तसे दोघा तिघा हवालदारांनी काठ्या हवंत उंच परजल्या तशी मात्र एकदम सरपंचांना बँकेच्या खुलीत चुरी झाल्याचा साक्षात्कार झाला. अप्पांना आपला भाऊ म्हणावं तितकं वाईट नाय हे जाणीवलं. लखुला घरी म्हस धार काढाय खोळंबली असंल हे एकदम आटीवलं. असंच कोणाकोणाला कामे आटवली, कोणाला आपण घरातून हागाय भायर पडलोवतो ह्याची आत्ता सय आली अन एकदाचा तिठा मोकळा झाला.

आता मातूर बाबर शिस्तीत कामावर लागला, रखवालदार शिपायाची जबानी झाली, माणसे आली कुठून, गेली कुठं, कशी दिसत हुती, काय काय नेलं, ह्याला "आपण टिरी वर करून झोपलोवतो" हे छपवत शिपायानं यथासांग उत्तर दिली. त्ये आटोपल्याव बाबर मॅनेजरकडं वळला,

"चला म्यानेजर सायेब पंचनामा करायला "

असं हवालदारानं आपल्या गेंगण्या आवाजात आवतन घातल्याबरुबर म्यानेजर आपलं खांदं पाडीत मागं मुकाट चालत गेलं. खुली पाक हुती तशीच हुती, दुन मिशीनी शिस्तात हुत्या, तिसरी हुती तिथं मातूर भुंड्या वायरींचा एक गडबडगुंता पसरल्याला हुता. आता नेमकं तपास सुरू करावा कसा ह्याबद्दल इचार करत बाबर हनुवटी खंजळीत उभारला हुता. मागून म्यानेजर आपलं सुतक पांघरून आलं तसं एरवी चिडल्याबर बी शिव्या न देणारं जोशी म्यानेजर एकदम खुश झाल्यागत हसलं अन आपली बत्तीशी बाबरकडं वळवून म्हणलं

"काय खुळ्या भोकाची चोरटी म्हणायची लेकाची, माझं तर अर्ध टेंशन उतरलंन"

जोशाचा कायापालट पाहताच बाबर मात्र खुळा झालं अन तसंच गुरकावत बोललं

"नीट बोलता का आता म्यानेजर!? कश्यपाय खूळ लागल्यागत हसाय लागला त्ये".

"अहो इन्स्पेक्टर साहेब, नुकसान एक मशिनीचे झाले आहे, पैश्याचे नाही, तुम्हाला फक्त एक ते ही मशीन चोरीचे तपासकार्य करावे लागणार, हा हा हे हे फी फी फी फी फी"

"म्हंजी???!!!, दातकड़ न काढता सांगा"

"खिक फुर्रर्रर्रर्र हे हे, काय सांगू आता, अडाणी भोसडीच्यांनी पासबुक प्रिंटिंग मशीनच उचलून नेले! ह्यात कसला डोंबलाचा पैसा?"

बाबर जबडा वासून पाहतच बसलं,

"ह्या मशीन मदी फक्त खाते पुस्तकं लेटेस्ट एन्टऱ्या छापून देतं, पगाराच्या दिवशी कुसेगावकर फॅक्टरी कामगार अन इंजिनीयर शाखेत गर्दी करून कालवा करतील म्हणून बँकेनं हितं हे मिशीन खास पाठवलं होतं हो!"

जोश्याच्या स्पष्टीकरणाने डोक्यात प्रकाश पडल्याला बाबर आता त्याच्याचवानी खदाखदा हसाय लागलं. आपलं काम वाचलं अन फुकट मुर्गी मिळण्याच्या शक्यतेमुळं बाकी हवालदारं बी मजेत हसू लागली. मोठ्यानं सुस्कारा सोडत त्यांच्या मागं मागं पोलीस पंचनाम्यावर सह्या कराय आल्यालं सरपंच, पोलीस पाटील अन इतर पंच मंडळीही हास्यात सामील झाली.

तडक बाबरनं "आता आल्यासरशी एखादं गावठी कोंबडं पाडायचा" आदेश सरपंचासनी सोडला, तशी कसनुसं हसत सरपंच सोय करायला सुटलं अन बाकी मंडळीही पांगली. पैकं तर चोरीला गेलंच नसल्यामुळं ही चुरी एकदमच पाणचट झाली हुती. सनसनाटी असं काहीच न घावल्यामुळं सगळी माणसं चोरट्यांना यथाशक्य शेलकी शिवीगाळ करत पांगली.

मुर्गी तयार होईस्तोवर "गावचा राऊंड लावून या ए भाड्यानु" म्हणत बाबरनं हवालदारं बाहेर पिटाळली अन स्वतः चावडीत गारव्याला आरामात पसरलं, गावभोवती फिरतानाच हवालदारांना बहीरोबाच्या माळाच्या मागल्या अंगाला आटलेल्या एका आडात, तोडून मोडून फेकल्याली बिन पैश्याची बापूडवणी मिशीन बी घावली. आल्यासरशी मुद्देमाल तरी जप्त झाला, तपासाचं पुढं पाहता येईल, ह्या आनंदात बाबर अन सहकाऱ्यांनी चांगल्या तीन कोंबड्या बसवल्या.

संध्याकाळी, बाहेर गावासनं माघारी आल्याल्या गणामास्तरच्या घरा म्होरं पारावर चांडाळ चौकडीची परत सभा भरली. तिथं सरपंचांनी समदी कथा सांगितली तशी उरलेली तिघं बी मनमुराद हसली अन चोरट्यांना लाखोली वाहिली, गणामास्तर म्हणालं,

"म्हणून म्हणतु मंडळी शिक्षण महत्वाचे आहे, नायतर असलं कायतरी होऊन उलट कौल लागतो अन चोरटी उपाशी मरत्यात".

ह्यावर रामा खरात बाळूची तंबाकू उचलत खी खी करून हसला, बाळूनं हसण्याच्या नादात पूर्ण ढेरीच हेंदकळून घेतली. सरपंच कसनुसं हसलं, अन एकदा फिरून गणामास्तर बोललं

"आयला कसली रं ही अडाणी बुडाची चोरटी, पाकच बल्या झाला म्हणायचं ह्यांचा".

तशी दूर कुटंतर नदरेची तंद्री लागलेले सरपंच संथपणे बोलले

"तुम्हाला सांगतु मंडळी ह्या पांडू पैलवानाला अन त्याच्या त्या 2 पोसल्याल्या वळुंना एक काम म्हणून सांगाय सोय नाय! गाबडी काय सुदीक करू शकत न्हाईती"........

कथाभाषालेख

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

10 Jun 2019 - 6:07 pm | महासंग्राम

क्या बात क्या बात जबरदस्त

एकदम शंकर पाटील स्टाईल कथा आवडली

वडाप's picture

10 Jun 2019 - 6:15 pm | वडाप

हांन तिच्या.

ट्रम्प's picture

10 Jun 2019 - 6:49 pm | ट्रम्प

शेवटी सरपंचा ने मस्त बॉम्ब फोडला !

आनन्दा's picture

10 Jun 2019 - 7:02 pm | आनन्दा

मस्त.
पण खूप मोठी एकदम टाकलीत. त्यात बोलीभाषेतली.
2 भागात टाकली असतात तर बरे झाले असते.

जेम्स वांड's picture

10 Jun 2019 - 7:11 pm | जेम्स वांड

१. बाळू, रामा, सरपंच , मास्तर अन गाव ओळख

नंतर प्रोजेक्टला आग लागली

२. एटीएमची माहिती

नंतर जळल्या मेल्या क्लायंटला आमचा बल्या करायची हुक्की आली

३. चोरीचा गोंधळ

एकदाचा बोडक्यावरून फालतू पण वेळकाढू प्रोजेक्ट अन खडूस मॅनेजर उतरल्याच्या आनंदात येड्यागत लिहिला

जरा अंदाज हुकलाच लांबीचा, फुडं ध्यान ठेवतो :)

आनन्दा's picture

11 Jun 2019 - 3:19 am | आनन्दा

हम्म..
मी वाचायला घेतली, पण संपेचना.
मग आधी शेवट वाचून काढला, आणि मग बाकीची कथा :)

जालिम लोशन's picture

10 Jun 2019 - 10:08 pm | जालिम लोशन

झकास

पिंट्याराव's picture

11 Jun 2019 - 7:52 am | पिंट्याराव

मस्त जमलीय वांडराव कथा. अगदी पहिल्या वाक्यापासूनच शंकर पाटलांची आठवण ताजी झाली. अतिसुंदर.

फक्त दोन वेळा जरा फिस्कटल्यागत झालं...
नका लक्ष देऊ सरपंच, चार दोन बुकं वाचून सवताला महान म्हणवून घेत्याती ही जिंद मानसं... इथं महान शब्दाऐवजी इतर पर्यायी शब्द योजायला हवा होता असं वाटलं.. या लोकांच्या बोलण्यात अगदी सहजगत्या हा शब्द सामावून जात नाहीय.

अन दुसरं म्हणजे गणामास्तर सरपंच वगैरेंना मिशीनीविषयी समजून सांगताना *परवलीचा शब्द* असा शब्दप्रयोग करतात, तेही जरा बदलायला हवं असं वाटलं. (अगदी वाचताक्षणीच ह्या दोन्हीही ठिकाणी, भात खाताना तोंडात खडा आल्यागत जाणवलं.. अर्थात हे केवळ माझं मत... )

जेम्स वांड's picture

11 Jun 2019 - 8:16 am | जेम्स वांड

महान हा शब्द आत्ता तुम्ही बोलले तसं मला बी खटकायला लागला बगा पावणं! , बाकी पासवर्डला गावठी भाषेत भाषांतरित करताना खुणेचा शब्द आणि परवलीचा शब्द वगैरे सुचले होते, तेच वापरलं.

प्रसाद_१९८२'s picture

11 Jun 2019 - 9:42 am | प्रसाद_१९८२

नका लक्ष देऊ सरपंच, चार दोन बुकं वाचून सवताला लय शानी समजतात ही जिंद मानसं...
--
हे कसे वाटते ?
बाकि लेख झक्कास जमलाय !

जेम्स वांड's picture

11 Jun 2019 - 9:44 am | जेम्स वांड

हे झकास आहे!!

पिंट्याराव's picture

11 Jun 2019 - 9:34 pm | पिंट्याराव

अगदी योग्य शब्दप्रयोग.

पिंट्याराव's picture

11 Jun 2019 - 9:40 pm | पिंट्याराव

*आताच्या काळात* जेव्हा लोक मोबाईल फोन वगैरे गोष्टी वापरताहेत, तिथं हे लोक सर्रास पासवर्ड (उच्चारतात फार मजेशीर हा शब्द) वगैरे शब्द वापरतात. अजूनही गावाकडच्या दोस्तांशी गप्पा हा हाणताना हे सहजगत्या जाणवतं.

टर्मीनेटर's picture

11 Jun 2019 - 9:02 am | टर्मीनेटर

कथा आवडली.
ग्रामीण बोलीभाषेत (चांगले) लिहिणे फार थोड्या जणांना जमते. भाषेचा तोल बिघडला तर असे लेखन वाचणे कंटाळवाणे होते. दमामि, शंकर पाटील हि त्या क्षेत्रातली मातब्बर मंडळी. मिपावर अशाप्रकारचे लेखन करण्यात जव्हेरगंज आणि तुम्ही चांगलेच वाकबगार आहात.
पुढील लेखनास जंक्शन शुभेच्छा.

जेम्स वांड's picture

14 Jun 2019 - 10:54 am | जेम्स वांड

इजिप्तायनकार टर्मीनेटर जी :)

mrcoolguynice's picture

11 Jun 2019 - 11:38 am | mrcoolguynice

एंटरटेनिंग
एंटरटेनिंग
एंटरटेनिंग

खिलजि's picture

11 Jun 2019 - 11:50 am | खिलजि

वाँडभौ , खत्रूड लिवलंय , त्ये बी बोलीभाष्येत

नादायचंच काम न्हाय .... घ्या टिम्ब घ्या ..माझ्याकडून टिम्ब घ्या फ्री फ्री ...........

अभ्या..'s picture

11 Jun 2019 - 1:23 pm | अभ्या..

खतरनाक लिव्हलंय.
पार जंक्शन.
वांडोबा, लिव्हत राव्हा. तुमाला सरसोतीमाय प्रसन्न हाय.

जेम्स वांड's picture

11 Jun 2019 - 1:44 pm | जेम्स वांड

पोटापाण्याचं सांभाळून जमेल तसं लिहितच राहणार

Huge Thumbs Up

चिगो's picture

11 Jun 2019 - 2:51 pm | चिगो

एकदम खुसखुशीत, मजेदार कथा.. भाषेची घाटणी जबरदस्त जमली आहे. शंकर पाटलांच्या कथांची आठवण झाली..

"असं बगा सरपंच, बाई बसत्याती झिल्ह्याला, तिथनं हितवर एक वायर ओढल्या, तुम्ही इकडं पैकं किती हवं ते बोललं का बाई पलीकडून नूटा सुरळी करून घालत्याती वायरीत, का हिकडं परत इस्त्री केल्याली कडक नुट भायर यतीये"

ह्या डायलॉक साठी तर खास टाळ्या..

जेम्स वांड's picture

11 Jun 2019 - 2:55 pm | जेम्स वांड

सुचेल तसं अजून सेवेशी हजर करूच :)

समीरसूर's picture

11 Jun 2019 - 4:23 pm | समीरसूर

एकदम झ्याक जमलीये कथा!! मज्जा आली. सगळा कथापट डोळ्यासमोर उलगडत होता. असं वाटत होतं की मी ही कथा 'बघतोय' किंबहुना मी त्या गावकर्‍यांपैकीच एक आहे असा भास होत होता....अप्रतिम!

जेम्स वांड's picture

11 Jun 2019 - 9:37 pm | जेम्स वांड

लिहिताना गाव डोळ्यासमोर ठेऊन प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न असतो, असे प्रतिसाद आले की प्रयत्न फळल्याचा प्रत्यय येतो

नाखु's picture

12 Jun 2019 - 3:43 pm | नाखु

भन्नाट कथा

भोकरवाडी रहिवासी वाचकांची पत्रेवाला नाखु

जेम्स वांड's picture

12 Jun 2019 - 3:57 pm | जेम्स वांड

आपले खूप खूप आभार. एकदा तुम्ही पण वाचकांची पत्रे फॉरमॅट मध्ये काहीतरी लिहा राव एकदम भन्नाट विनोदी, तुमच्या प्रतिक्रिया वाचूनच हसायला येतं. लिहिलंत तर मजा येईल, विषय तुमच्या मर्जीचा निवडा, अन होऊन जाऊ दे एकदा मस्त लेख एक.

मंदार कात्रे's picture

12 Jun 2019 - 4:58 pm | मंदार कात्रे

मस्त !

लई भारी's picture

14 Jun 2019 - 10:06 am | लई भारी

काय लगा लिवलंयस! सगळं डोळ्यासमोर उभारलं!
एकदम आवडलं!

(कालची विस्तृत प्रतिक्रिया आली नव्हती, म्हणून परत प्रयत्न करतोय)

जेम्स वांड's picture

14 Jun 2019 - 10:23 am | जेम्स वांड

वडून कुट्टं लिवाय साधतंय व्हय राजं, लेखन ह्येच की आपलं वडनं

लई भारी's picture

14 Jun 2019 - 10:49 am | लई भारी

आता काय बोलू, आगळीक झाली मालक :)
फ्लो च्या नादात जरा जास्तच बोललो!

"बोंबलभिकं गाव आपलं, हितं आणि काय चिचुके हायती"

एकदम जमलाय शबूद!

शिवा जमदाड्याच्या मते चोरट्यांना एक खास विद्या अवगत असती. ती शिकवणारी देवी हिमालयात राहती अन एकापाठी एक पंधरा अमुशा जर काळं बोकड कापलं तरच ती परसन्न हुती.

असल्या लै स्कीमा ऐकायला येतात गावाकडं!

अजून एकदा दंडवत घ्या आणि इकडे आला की सांगा, म्हणजे प्रत्यक्ष भेटून दंडवत घालता येईल :)
पण यमाई भेट, शिकरची वारी काय नाही झाली अजून राव खर.. रोजच्या रामरगाड्यातच अडकलोय! :(

जेम्स वांड's picture

14 Jun 2019 - 10:58 am | जेम्स वांड

हात जोडून लाजवू तितकं नकासा बगा पावणं. तुमी काय आगळं तर आज्याबात बोलले नाय बरंका. गावकरी शान्याबोड्याची असत्यात, काय बी ऐकत्याती अन त्यावर सवताच अक्कल पाजळत्याती.

लवकर मुहूर्त काडा अन जाऊन या शिकरला पावसाळ्यात जावा लै मजा असती बगा.

यशोधरा's picture

14 Jun 2019 - 11:03 am | यशोधरा

कथा, भाषा सगळंच जमलं आहे. मस्त.

जेम्स वांड's picture

14 Jun 2019 - 2:49 pm | जेम्स वांड

यशोधरा ताई

mayu4u's picture

15 Aug 2019 - 1:30 pm | mayu4u

द मा न्ची आठवण झाली!