मनात आले म्हणून

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 8:25 pm

आज काही प्रवासाशी संबंधित वाचण्यात आले आणि वाटले कि आपणही काही आठवणी लिहाव्यात. प्रवास म्हटलं कि बऱ्याच वेळेला मुंबईतील लोकांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. जवळपास दररोजच नोकरीनिमित्त आणि सुटी असली तरी खरेदी, नातेवाईकांना भेटणे या निमित्ताने प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नसतो. तसे धुळे, जळगाव येथील लोकांनाही बराच प्रवास करावा लागत असावा. पण त्यांच्या प्रवासाचा इतरांनाही त्रास होतो हे कधीकाळी रेल्वेने ज्यांनी त्या मार्गावर प्रवास केला असेल त्यांना चांगलेच ठाऊक असेल.

मी पहिल्यांदा मुंबई आलो ती आठवण सुरुवातीला तरी सुखावह नव्हती. १९८७ सालचे पुणे नुकतेच थोडेसे कोथरूडच्या दिशेने वाढायला लागले होते. बाकी सर्व शहर अगदी जुन्या गोष्टीत वाचावे तसेच होते. प्रभात रोडवरून डेक्कन क्वीन पकडायची म्हटले तरी डेक्कन कॉर्नर पर्यंत चालत येण्याचे नियोजन करूनच घरातून निघावे लागे. सर्व पुणे शहरच अतिशय सुंदर वाटावे असे होते. अशा शहरातून मुंबईत येणे म्हणजे शिक्षाच वाटायची. सुरुवातीला तुमच्या शरीराला सवय होऊ पर्यंत सतत जाणवणारी तेलकट, घामट त्वचा, सर्व वातावरणात भरून राहिलेला उग्र दर्प, गर्दी, आणि या सर्वांवर वरताण करणारा वाशी ते व्हिक्टोरिया टर्मिनस हा प्रवास. अगदी वसई, विरारला राहणारी माणसं देखील वाशीच्या लोकांपेक्षा आरामात प्रवास करीत असावे अशी त्या वेळची स्थिती होती.

काही दिवसांनी वैतागून मी परत पुण्याला बदली मागून घेतली. त्यानंतर थेट नऊ वर्षांनी मी परत मुंबईला आलो. या वेळेस राहण्याचे ठिकाण होते जेव्हीपीडीची म्हाडा कॉलोनी. पश्चिम रेल्वेचा त्यातल्यात्यात 'वरच्या' वर्गाचा, सांगताना कॉलर ताठ व्हाव्ही असा प्रवास आणि कुलाब्यासारख्या शांत ठिकाणी कामाची जागा. कधी मनात आले तर संध्याकाळी रमत गमत चर्चगेट पर्यंत चालत जावे, कधी वाटले तर दादरला आस्वादमध्ये जेवण करून ७९ नंबरच्या बसने उलट्या दिशेने शांत प्रवास करीत घरी जावे. तसे कुलाबा देखील टाईमपास करायला बरे ठिकाण होते. संध्याकाळी इलेक्ट्रिक हाऊस समोरच्या कामत मध्ये जेवण करून काश्मीर हाऊस, केम्ब्रिज, आणि कुसरो बागेच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या दुकानांच्या बाजूने विंडो शॉपिंग करीत घरी जावे असा दिनक्रम असायचा.

शनिवारी रात्री पुण्याला येणे मात्र कष्टप्रद होते. काही दिवस रात्रीचा एशियाडने प्रवास केला. पण नंतर महालक्ष्मी एक्सप्रेसचा स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय सापडला. त्यातही कधी लवकर पुण्याला यायला मिळाले तर कोयना एक्सप्रेसनेदेखील छान प्रवास व्हायचा.

हळूहळू मित्रांचा ग्रुप जमला आणि मुंबईत राहण्याचा आनंद कळायला लागला. एकदा मित्राने ग्रांट रोडवरील गीता भुवन या सिंधी हॉटेलमध्ये जेवायला नेले. तेथील दाल म्हणजे घट्ट वरण आणि देशी घीचा भला थोरला थर. जोडीला तवा पराठा आणि बटाट्याच्या काचऱ्या. कधी माहीमचे पार्टी हॉटेल तर कधी जेव्हीपीडी सर्कलला असलेल्या शिवसागरमध्ये तवा पुलाव आणि रायतं.

टाईमपास करायला ग्रेट वेस्टर्न स्टोर, खादी ग्रामोद्योग स्टोर, अकबरअलीज, ऱ्हिदम हाऊस आणि जहांगीर आर्ट गॅलरी अशा ठिकाणी भटकंती. तिथून मुलासाठी काहीतरी खरेदी करायची असे चालायचे. एकदा त्याच्यासाठी फनस्कुलचा मोठ्ठा प्लास्टिकचा ट्रक घेतला आणि त्याच्या उशापाशी सकाळी ठेऊन दिला. त्याची झोप झाल्यावर त्याने सावकाश डोळे उघडले. समोर ट्रक बघून त्याला खरेच वाटले नाही. त्याने सावकाश त्याच्या छोट्याश्या बोटांनी ट्रकला हलवून पाहिले. मग एका हाताने ट्रक पकडला. आता त्याची खात्री पटली कि ट्रक खराच आहे. मग स्वारी उठून बसली आणि ट्रक मांडीवर घेऊन इकडे तिकडे बघितले. मग मला आणि बायकोला बघून खुशीत हसला. मुंबईतील प्रवासाचे दिवस आठवले कि हि आठवण आल्या शिवाय आठवणींचा हिंदोळा थांबत नाही.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अन्या बुद्धे's picture

7 Jun 2019 - 4:35 pm | अन्या बुद्धे

शेवट सुंदर..

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 5:40 pm | श्वेता२४

खूप छान लिहीलंय. शेवटची आयडीया आवडली.

अभ्या..'s picture

7 Jun 2019 - 5:46 pm | अभ्या..

आह,
अप्रतिम लिहिलंय सरजी.
असे टाईमलाईन लेखन मस्त वाटते वाचायला.

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

7 Jun 2019 - 6:39 pm | प्रलयनाथ गेंडास...

हलका फुलका , साधा सरळ, सुंदर लेख ..

हे असं काहीतरी वाचायला मिळावं मिपावर ..

जालिम लोशन's picture

7 Jun 2019 - 7:31 pm | जालिम लोशन

ऊत्तम

मदनबाण's picture

9 Jun 2019 - 10:02 am | मदनबाण

छान लिहलयं...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi