व्हॉटसॅपवरची माणसं!!!

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 3:03 pm

१. *देवघेवकर* - हे समुहाच्या विषयाला धरुन असणारी माहिती देतातही आणि विचारतातही.हे समुहासाठी खरेखुरे उपयुक्त सदस्य असतात.

२. *घेणेकर* - हे फक्त आयते प्रश्न विचारायला,स्वत:ची समस्या सोडवायला येतात. *यांच्याकडे समुहाला देण्यासारखं उपयुक्त असं काहीही नसतं.* समुहाचं कस्टमर केअर करण्यात यांचा हात कोणी धरत नाही.समुहात कोणी उत्तर नाही दिलं तर हे समुहातल्याच एखाद्या जाणकाराला 'यांना हवं तेव्हा' फोन कॉल करुन पिडत बसतात.असे हे 'वेताळ' समुहातल्या सदस्यांना विक्रमराजा समजतात.

३. *भानहरपी* - हे आनंदाचं,उत्साहाचं भरतं आलेले असतात.समुहाचं नाव काय,विषय काय?आपण पाठवतो काय? याच्याशी यांना काडीचंही देणंघेणं नसतं.फटाक्यांची माळ आणि यांच्या फोनमधले व्हॉटसअॅप ग्रुप याच्यातला फरक यांना समजत नाही.ग्रुपशी दुरुनही संबंध नसलेल्या यांच्या सासर्‍यांचा,बायकोचा,मेव्हण्याचा फोटो पाठवून कसल्या ना कसल्या शुभेच्छा देणं किंवा यांच्या बोळात राहणार्‍या कोणातरी छपरी भाईचा गॉगल आणि बेंटेक्सची चेन घातलेला फोटो शेअर करुन अज्ञानी जनतेला त्या 'नरपुंगवाची' माहिती करुन देणं या सोबतंच जमेल तितकी अवांतर माहिती फॉरवर्ड करत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्यासारखं यांचं चालू असतं.अॅडमिन हाकलेपर्यंत हा 'फॉरवर्डयज्ञ' धगधगत राहतो.हाकलंल तरी सुधारणा होईल ही अपेक्षा फोल ठरते.कारण एकच! यांचं भानच हरपलेलं असतं.साध्यासुध्या हाकलण्याने ती समंधबाधा उतरत नाही.दुसर्‍या ग्रुपात शिरुन मागील पानावरुन पुढे जाण्याचं 'झपाटलेपण' सुरुच राहतं.

४. *वाचाल तर वाचाल* - हे ग्रुपमधे कायम वाचक मोडमधे असतात.हे ग्रुपात काहीही पाठवत नाहीत,लिहीत नाहीत,काहीही विचारत नाहीत.फक्त आलेली माहिती वाचत असतात.मग अॅडमिन कधीतरी अशा गपचुप सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित करतो.त्या ढिगार्‍यातून हे बाहेर टाकले जातात.
मग हे अॅडमिनला पर्सनलवर गाठून यांचा USP बाहेर काढतात."नुसती माहिती वाचली तर चालणार नाही का? आमचा काही कुणाला त्रास नाही.इथे काही शेअर करत नसलो तरी या ग्रुपवरची माहिती नेहमी वाचत असतो मी.खूप चांगली माहिती मिळते.कधीकधी इथली माहिती दुसर्‍या ग्रुपवर शेअरही करत असतो मी."
एखाद्या गरीब बकरीनं दयनीय चेहरा करुन "माझा बळी देऊ नका" असं सांगितल्याचा फिल येतो अशावेळी.एखादा अॅडमिन भाबडा असेल तर पाघळून परत अॅड करतोही.पण एखादा 'स्ट्रॅटेजिक वाघ' असेल तर बधत नाही.

४. *बेपत्ता* - हे ग्रुपात असतात पण बरेच महिने यांचं ग्रुपकडे लक्ष नसतं.ग्रुपात काय चाललंय याचा यांना पत्ता तर नसतोच.पण सक्रिय राहण्याबद्दल सांगूनही न ऐकल्याने यांना रिमुव्ह केलं तरी पुढचे अनेक आठवडे किंवा महिने आपल्याला रिमुव्ह केलंय हे यांना कळतंच नाही.

५. *ज्ञानदूत काका* - हे ग्रुपातले जेष्ठ किंवा अतिजेष्ठ नागरिक असतात.(सगळेच जेष्ठ असे नसतात बरं का!)रिटायर झाल्यानंतर असणाऱ्या मोकळ्या वेळात करायचं काय या चिंतेवरचा उपाय म्हणून ते ग्रुपात शिरलेले असतात.यांना सतत असा भ्रम होत असतो की "आजचा सगळा तरुणवर्ग हा बिघडलेला आहे,त्यांना जेष्ठांचा आदर नाहीये,समाजात सगळीकडे फसवणूक होते आहे.आपण सतत सावध राहिले पाहिजे,तरुणांना भारतीय संस्कृतीचे विस्मरण झाले असून ते होऊ न देणे हे आपले परमकर्तव्य आहे." ग्रुपात जबरदस्तीने 'संस्कारवर्ग' चालवण्यात हे खंड पडू देत नाहीत.

६. *गल्लीचुके* - हे बहुतेकवेळा मध्यमवयीन किंवा जेष्ठ नागरीक असतात.एखादा विशिष्ट विषयाला वाहिलेला ग्रुप असेल तर तिथे न चालणारी पोस्ट यांच्याकडून 'चुकून' पाठवली जात असते.ती पाठवल्यानंतर पटकन डिलीट करायची सोय व्हॉटसअॅप मधे आहे हे यांना माहित नसतं.अॅडमिनने तक्रार केल्यावर हे त्यालाच 'Admin please delete it' असे सांगून मोकळे होतात.
चुकून सगळे ग्रुप सिलेक्ट झाले,डिपी बदलल्याने लक्षात आले नाही; वगैरे बरीच तांत्रिक कारणे यांनी तयार ठेवलेली असतात.'व्हॉटसअॅप वापरताना आपला गोंधळ होतो हे यांना मान्यच नसते.' ठिकै आत्ता या 'बच्चमजी' व्हॉटसअॅपनं आपल्यावर विजय मिळवलाय.पुढल्यावेळी सावध राहून आपण व्हॉटसअॅपवर विजय मिळवू या निश्चयाने ते कामाला लागतात.पण गंमत म्हणजे परत व्हॉटसअॅपच जिंकतं.

७. *सूड घे रे* - हे पूर्वी ग्रुपात बर्‍यापैकी बोलके असतात.मग अचानक यांचं ग्रुपातल्या कोणाशीतरी पटत नाहीसं होतं किंवा अॅडमिननं यांना पूर्वी कधीतरी अवांतराबद्दल ऐकवलेलं असतं.मग हे सूडानं पेटतात.त्या प्रसंगानंतर हे ग्रुपात बोलणं बंद करतात.यांचं ग्रुपात बारीक लक्ष असतं.ज्याच्याशी वाद झालाय तो सदस्य किंवा अॅडमिन चूक,अवांतर करताना दिसला रे दिसला की पुढच्याच सेकंदाला हे गर्दीतून वाट काढत "हे चालतं का? मागच्यावेळी मला ऐकवलं होतंत.आता यांना सूट का दिली?" किंवा "तुम्ही अॅडमिन असून तुम्हीच असे वागता?" हे ऐकवतात.रिप्लाय प्रायव्हेटली वगैरे न वापरता हे ग्रुपातच बंदुकधारी इंग्रजाच्या पुढ्यात 'चले जाव'ची घोषणा द्यावी तसे अोरडत राहतात.मग हे 'मेषपात्र' ऐकत नाहीसे पाहून अॅडमिनच यांना चले जाव म्हणून निरोप देतो.

८ *गेलात उडत* - हा प्रकार नव्हे तर हा बाणा अाहे.यांना न पटणारं काही ग्रुपात घडलं किंवा यांच्या विचारांशी इतरांनी सहमती दाखवली नाही तर 'गेलात उडत' असा बाणा दाखवून हे पुढच्या सेकंदाला ग्रुप सोडून जातात.राग फारच आला असेल तर "मला परत या ग्रुपात अॅड करु नका." असं स्वत:चं 'अनन्यसाधारण' महत्त्व इतरांना सांगून जातात.

९. *लॅटीनप्रेमी* - यांचं लॅटीन लिपीवर फार प्रेम असतं त्यामुळे यांना देवनागरीचा तिटकारा असतो.पण तो इतरांपुढे जाहिर केला तर 'मराठीचा शत्रू' असा शिक्का बसेल या भितीने 'माझ्या फोनमधे देवनागरी चालत नाही,देवनागरी टाईप करायला अवघड जातं' अशी बरीचशी फुसकी कारणं देतात.काहीजण तर लॅटीन लिपी वापरुन मराठी मजकूर लिहितात.त्या मजकूरात काय लिहिलंय ते समजून घेणं,त्याचा अर्थ लावणं ही वाचकांची जबाबदारी आहे.ते कसब वाचकांकडे 'असलंच' पाहिजे.नसेल तर शिकावं.ही यांची अपेक्षा असते.लिखाणाचं फारसं टेन्शन घेत नाहीत हे लोक.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

4 Jun 2019 - 3:37 pm | महासंग्राम

ढकलपत्र ए का ?

उपयोजक's picture

4 Jun 2019 - 3:49 pm | उपयोजक

मीच मूळ लेखक आहे.

स्नेहांकिता's picture

4 Jun 2019 - 3:38 pm | स्नेहांकिता

भारीये अ‍ॅनालिसिस !!

उपयोजक's picture

4 Jun 2019 - 3:50 pm | उपयोजक

_/\_

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2019 - 3:55 pm | टवाळ कार्टा

खिखिखी....यात "मिपाकर" असाही एक उपप्रकार होऊ शकतो....बर्याच पुरोगामी वगैरे मिपाकरांचे मातीचे पाय व्हाट्सअप्पच्या ग्रुपमध्ये दिसतात

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 3:56 pm | जालिम लोशन

time pass

लई भारी's picture

4 Jun 2019 - 5:09 pm | लई भारी

जमलय!

mrcoolguynice's picture

4 Jun 2019 - 5:36 pm | mrcoolguynice

मस्त १+

फुटूवाला's picture

4 Jun 2019 - 5:42 pm | फुटूवाला

मस्तच!

ज्योति अळवणी's picture

4 Jun 2019 - 7:13 pm | ज्योति अळवणी

वा! मस्तच

वामन देशमुख's picture

5 Jun 2019 - 12:19 am | वामन देशमुख

छान लिहिले आहे.

नाखु's picture

5 Jun 2019 - 9:39 am | नाखु

जालीय अनुभवचा जालीम धांडोळा घेऊन जे जे म्हणून कायप्पा समूह प्रसवले आणि पुढे त्याचं संगोपन केले,त्या अनुभवसिद्ध शहाणपणातून आलेले हे नवनीत आहे.

एकूणच स्रीवर्गास प्रसूतीनंतर जश्या वेदना असतात तश्याच कळा प्रसूतीपुर्वीही असतात.
कायप्पा समूहात हे दोन्ही समूहस्थापनेनंतर आडमिन नावाच्या प्राण्याला भोगावे लागते.

कुठल्याही अॅडमिनने शिव्या वा ओव्या न दिलेला आडबाजूला असलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

ईश्वरदास's picture

9 Jun 2019 - 7:28 am | ईश्वरदास

अजून एक प्रकार, काही सदस्य आपण जेम्स बांडे अथवा अजित डोंबाल असल्यासारखे नावगावपत्ताफोटु यासकट वैयक्तिक ओळख लपवून वेगळ्याच काल्पनिक नावाने वावरत असतात.

कंजूस's picture

9 Jun 2019 - 8:12 am | कंजूस

ग्रुप ही डोकेदुखी असते.

मी उलट म्हणतो... ग्रुप म्हणजे मज्जा असते,हक्काच ठिकाण जिथे जे मनात असतं ते अगदी तसच लिहण्याची मुभा असते !
बादवे आमचा ग्रुप अधुन मधुन " ऑक्सिजन" देखील शोधत असतो ! :=) सध्या फक्त १९ जण आहोत आम्ही ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 11:43 am | टर्मीनेटर

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची लक्षणे आवडली! आणखीन दोन प्रकारचे लोकं आढळतात

*सुप्रभातकर्ते: हे लोक केवळ सकाळी एक "गुड मॉर्निंग" वा "सुप्रभात" चा मेसेज पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप वापरतात, बाकी दिवसभर कुठे गायब असतात कोणास ठाऊक! ही मंडळी तशी निरुपद्रवी असतात पण "गुड मॉर्निंग" वा "सुप्रभात" असे फक्त शब्द टाईप करून न पाठवता त्याच्या जोडीला फोटो असलाच पाहिजे अशी काहीतरी यांची ठाम समजूत असावी.

*नव-वापरकर्ते: नव्याने व्हॉट्सॲपवर दाखल झालेले (यात ज्या मुला/मुलींनी/सुना/जावयांनी त्यांच्या आई/वडिलांना/सासू/सासऱ्यांना कौतुकाने स्मार्टफोन घेऊन दिले आहेत अशा मंडळींचे प्रमाण लक्षणीय असलेले) लोक. सारावेपर्यंत अगदी तीन-चार किंवा त्याहूनही अधिक वर्षांपूर्वीचे विनोद, बातम्या, किंवा कुठलीही खरी-खोटी माहिती असलेले मेसेज (त्यांच्यासाठी नवीन असल्याने) मोठ्या हुरुपाने, घाऊकपणे इतरांना फॉरवर्ड करतात. अशा लोकांचा राग येत नाही. उलट "अरे वाह काका/काकू, आलात वाटतं व्हॉट्सॲपवर!" अशा अर्थाचे रिप्लाय त्यांनी पाठवलेल्या मेसेजवर आल्यावर त्यांना विशेष समाधान मिळते.

बाकी विना संमती परस्पर ॲड करण्यात आलेल्या ग्रुप्सचा अनुभव बहुतांशी तापदायक असतो.

उपयोजक's picture

16 Jun 2019 - 7:59 pm | उपयोजक

टर्मीनेटर :-))

अभ्या..'s picture

9 Jun 2019 - 12:10 pm | अभ्या..

असल्या पब्लिकमुळेच आपन कुठल्याही ग्रुपमध्ये टिकलो नाही, तीन चार दिवसात डिलीट मारलो, गेले वर्षभर एकाही ग्रुपमध्ये नाही, भविष्यातही नसेन हे याटिकानि नमूद करण्यास मला अत्यंत आणंद होत आहे.
धन्यवाद

शेमशेम, आपलं तुजंमाजं शेमशेम.