मंदिर

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
23 May 2019 - 6:03 pm

मी काही भाविक म्हणावा असा माणूस नव्हे. पण तरी ठार नास्तिक म्हणावं असाही नव्हे. नेमाने वार वगैरे पाळून दर्शन घेणं हे कधीच केलेलं नाही. पण कधी देवळात जाणारच नाही असंही नाही. सौ विक्री प्रदर्शनात रमली तेंव्हा पावलं आपसूक मारुती मंदिराकडे वळली. बदलापुरातलं प्राचीन देवस्थान. गावातलं मध्यवर्ती ठिकाण. गेल्या 25-30 वर्षात नजरेसमोर बदलत गेलेलं.

हे रामाचं मंदिरदेखील आहे पण मूळचं हे मारुती मंदिर असं माझ्या आधीचे लोक सांगतात. हा झालेला पहिला बदल असणार. मारुती रामाचा दास मग त्याचं मंदिर अधिक भारदस्त कसं चालेल. म्हणून समोर तसंच रामाचं मंदिर उभं राहिलं. आणि दोनही एकाच मंदिराचा भाग असावेत अशी एकूण रचना झाली. तरी बारकाईने पाहिलं तर सभागाराच्या एखाद फूट उंच असणे, नगारा वगैरे ठेवायचा माळा, सळ्यांनी केलेलं पार्टिशन वगैरे गोष्टीतून मूळ मंदिर मारुतीचं हे समजायचं.

देव या गोष्टीत काही अज्ञाताचा, आदिम मूळ प्रेरणेचा भाग आहे. मनाच्या अस्पर्श, शुद्ध, रॉ भावाला स्पर्श करणारं काहीतरी आहे आणि त्याच्याशी सुसंगत मंदिर असेल तर तशी वातावरण निर्मिती होते ज्यामुळे मनाची एक विशिष्ट स्थिती यायला मदत होते. मूळची खडबडीत पण वर्षानुवर्षं वापरून गुळगुळीत झालेली शहाबादी फारशी, अंधारी नव्हे पण सगळ्या गोष्टी स्पष्ट करून गूढपणा नष्ट न करणारी देवासमोरच्या प्रकाशाच्या प्राथमिक रुपाला, समई, दगडी दिवा यांना महत्व देत आपल्यातल्या दैवी प्रकाशाला आवाहन देणारी रचना आणि बाहेरचं व्यवहारी जग दूर ठेवणारी, आपला आतला आवाज आपल्याला ऐकवणारी रचना या जागी सगळीकडे झगमगाट करणारे भरपूर दिवे, पायाखाली स्पार्टेक्स च्या फरशा, मोठ्या फ्रेंच विंडो सारख्या खिडक्या मंदिराचं मंदिरपण घालवून टाकतात असं माझं मत आहे. बाहेर अंगणात एका कोपऱ्यात देवचाफा आणि एकच भव्य पिंपळ वगळता काही झाडं देखील उरली नाहीत.

माझ्या लिखाणाला पूर्वग्रह आणि नोस्ताल्जीयाची झालर आहे हे मला मान्यच आहे. आज आलो हे देखील अनेक वर्षानंतर. या नंतर परत जाईन असं वाटत तरी नाही. मंदिराच्या पायऱ्या चढताना येणारा टिपिकल मंदिराचा वास, बाहेरचा पाणी प्यायचा रांजण, मारुती शेजारी दगडी दिवली आणि आधुनिक बांधकामात परक्यासारखे अंग चोरून उभे असलेले मारुती आणि श्रीराम यांच्या मूर्ती यापलीकडे तिथे ओळखीचं काही नाही.

-अनुप

हे ठिकाण