आंबा नावाचे झाड

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
19 May 2019 - 5:47 pm

पातेल्यातले आंबे आईने माझ्याकडे सरकवले आणि " घे काढून .." असा आदेश दिला. हातातले काम सोडले आणि एक एक आंबा पिळून काढू लागलो. दुध, वेलदोडे टाकून झाले आणि शेवटी साखर टाकायची म्हणून ती शोधायला लागलो. आईला विचारावे तर तिचे उत्तर असणार "तिथे आहे. " "तिथे कुठे? " असा प्रतिप्रश्न केला तर "तिथे स्टिलच्या गोल डब्यात " असे उत्तर मिळणार. शेवटी समोरच्या अगणित डब्यातून मलाच पाहिजे ते शोधावे लागते.

तो अनुभव पाठीशी असल्याने मी एकटाच साखर शोधू लागलो. त्यावेळी मात्र आईच्या कामात लुडबूड होऊ लागली. माझ्याकडे एक तिरपी नजर टाकली आणि बोलली ," साखर हवीए? अरे एवढा गोड आंबा आणि त्यात अजून साखर? जाड होशील की अजून ! लहानपणी तर तसाच खात होतास की आंबे. आत्ता बरी साखर लागती ? "

झालं. वाक्य पुरे होईपर्यंत आम्ही भूतकाळातील आमच्या गावी पोहचलो. पंधरा वीस वर्षापुर्वीच्या त्या सगळ्या गोष्टी. या कॉलनीत यायच्या आधी कोकणातील बुरोंडीपाशी राहायला होतो. वडिलांची नुकतीच तिथे बदली झालेली. तिथे जवळपास वर्षभर राहणे कर्मप्राप्त होते. एप्रिलच्या आसपास आम्ही तिथे आमचे चंबुगबाळ घेऊन पोहचलो.

गाव तसं लहानच होतं. थोड्याच दिवसात आजूबाजूच्या अोळखी झाल्या. त्यातही लहान मुलांची मैत्री व्हायला फारसा वेळ लागत नाही
आमचा ३-४ जणांचा कंपू जमला होता. त्यातले बाळू रमेश आणि तात्या हे एवढेच आज आठवतात. त्यांची खरे नावे कधी कळालीही नाही आणि ती कळवून घ्यावी असेही वाटले नाही.

उन्हाळा मी मी म्हणत होता. एकदा फिरताना मला एक लहान नारळासारखी वस्तु दिसली. ती घेऊन मी बाळूकडे गेलो आणि हे काय असे विचारले. " अरे त्याला सुपारी म्हणतेत. माहिती नाय? " असे म्हणून त्याने आतली सुपारी काढली. मी डोळे विस्फारून बघतच राहिलो. यानंतर जे दिसेल त्याची माहिती हा कंपू मला देत राहायचा.

एकेदिवशी आमचा कंपू जवळच्याच एका आमराईत घेऊन गेला.माझ्यासाठी बराच काळ शहरात घालवलेल्या मुलासाठी ती एक मोठीच गंमत ठरणार होती.आमराईच्या बाहेर एक रखवलदार बसला होता. "आज परत का ?" असा सवाल त्याने गेला " आव हे नवीन पाव्हण हाय आपलं. त्याला आपली ज्यागिरी दावायला नगं? " आमच्यातला बाळू नाक पुसत म्हणाला. 'आपली' या शब्दावर तो रखवलादार अडखडळा पण त्याने आम्हाला जावू दिले सोबतच लगेच या रे अशी पुस्तीही जोडली.

समोरच एक मळलेली पायवाट दिसत होती. आजूबाजूला असलेले गवत सुकून गेले होते. पण बाहेर जेवढा उकाडा जाणवत होता तेव्हढा इथे नव्हता. त्या पायवाटेवरून चालत आम्ही एका विहीरपाशी आले. बाजूला एक मोडकळीस आलेले रहाट बसवलेले होते. थोड्यावेळेस त्याच्याशी खेळून झाले आणि त्यात्याने मला फर्मान दिले , " काढ कापडं चल .. उतरू पाण्यात येत ना पोहायला ? " मीही त्याला होकार भरला आणि सगळं वरून खाली उडी टाकली. भूक लागेपर्यंत आमचे पाण्यातले खेळ चालूच होते. बाहेर आलो आणि बाळू उद्गारला "ते बघ आंबा नावाचे झाड."

तसेच अोलित्याने आम्ही आंब्याच्या झाडाकडे कूच केली. तिघेही याच भागातले असल्याने सरसर चढून गेले. खाली उतरून आंबे खाण्याचा धीर त्यांच्यात नव्हता. वरच बसून ते आंबे खाऊ लागले. पण मला काही केल्या झाडावर चढताच येईना. आपल्याला आता एकही आंबा शिल्लक राहणार नाही या भितीने मला पोखरले आणि आम्ही तिथे भोकाड पसरले. झाडावरचे आमचे मित्र तो प्रकार बघून हसायला लागले. पण जेव्हा आमची पट्टी सप्तसुरांच्या पुढे सरकू लागली तेव्हा ते आंबे घेऊन खाली उतरले आणि वाटाघाटी होऊन काही आंबे मला मिळाले

आंबा खाताना थोडासा चड्डीला , शर्टाला लागला आणि मग उरलेला पोटात गेला.हळदीच्या कार्यक्रमातून आल्यासारखा आमचा अवतार घेऊन आम्ही घरी पोहचलो.

त्यानंतर आम्ही तिथे ब-याचवेळेस जावू लागले. सरावाने मलाही झाडावर चढून हवे ते आंबे घेता येऊ लागले. आम्ही डबेही सोबत आणायला चालू केले.
कोणी काय अाणलय यावर सगळ्यांची नजर फिरायची. आपले आवडते पदार्थ मित्रांकडून हक्काने हिसकावले जायचे. त्या नंतर विहिरीवरचा त्यांब्या तोंडाला लावायचा. तो अर्धवट गटगट प्यायचा आणि राहिलेले पाणी त्याच झाडाला टाकयचे. आणि ऊन उतरेपर्यंत निवांत त्या झाडाखाली ताणून द्यायचे.

आमचा तो शिरस्ताच बनून गेला.आत जाताना रखवलादार फक्त एक तिरकी नजर टाकायचा. त्याला होकार समजून आम्ही आत पळायचो जणू आमच्या जहागिरीचीच ती बाग होती.

संध्याकाळी "पोरांनो वेळ झाली ऊठा" करत तिथला रखवलदार यायचा. आम्ही त्याच्या अोळखीचे झाले होतो. आम्ही खाऊन खाऊन किती आंबे खाणार याची त्याला कल्पना होती. निसर्गाने इथे अमाप दान दिल्याने त्या आंब्याचा हिशोब कधी लावला जायचा नाही. तो आंबाही दिलदार होताच. असा मोहरून यायचा की ज्याचे नाव ते !

"चल ताट घे. रस काढ वाटीमद्धे. " आईच्या या उद्गारांनी मी भानावर आलो. रस वाटीत घेऊन लागताना बाबा आत आले आणि म्हणाले " अग ऐकलं का ? आपल्या आधीच्या गावातले परांजपे वारले म्हणे काल. हार्ट अॅटॅक निमित्त झाले म्हणे.

"परांजपे ? कोण हो हे परांजपे ? मला नाही आठवत" मी उद्गारलोे. " अरे तुम्ही पोरंसोरं जात नव्हता का त्या वनराईत ? त्यांचे हे मालक. तुम्हाला कधी आत जायला अडवले नाही. तुझे पप्पा तुमच्या आंब्याचे पैसे द्यायला गेले होते. तेव्हाही त्यांनी स्वच्छ नकार दिला होता. "अहो कोवळी पोर ती ! कितीशी खाणार. एवढ्या आमराईतले थोडे गेले तरी काय फरक पडतो हो ? सोडा ते." असे म्हणाले होते.

"खरोखर दिलदार माणूस. मोठ्या ह्रदयाच्या माणसांना आपल्या ह्रदयाचा भार सांभाळता न यावा हा केवढा दुर्दैवविलास ! " पप्पा उद्गारले.

त्या लहान वयात वैयक्तिक असे काय नव्हतेच. जे समोर दिसेल ते आपले एवढा साधा सरळ हिशोब होता. झाडे लावणारे परांजपे , त्याची निगा राखणारे परांजपे हे आमच्या खिजगणीतही नव्हते. आम्ही मनसोक्त फळे खाण्यात मग्न होतो. झाडाला तरी आम्ही काय दिले ? तर त्याब्यातील जास्तीचे पाणी !

या वयात आता व्यवहाराचे भान आले होते. किंबहुना ते करून देण्यात आले होते. मात्र आता मला त्यांना धन्यवाद देता येणार नव्हते. कदाचित यांची त्यांना अपेक्षाही नसावी.

अशा किती असंख्य व्यक्ती असतील की ज्यांनी आपल्यासाठी असंख्य कामे करून ठेवली. तेही आपली वा त्यांची प्रत्यक्ष अोळख नसताना ! बाकी
कोणत्या गोष्टीमुळे कोणाची अोळख होईल हे विधात्यालाही सांगता यायचे नाही.

इथे तर परांजपे यांच्याशी अोळख त्यांच्या मरणानंतर झालेली. तरीही एक रुखरुख मनाला लागून राहिली. कदाचित प्रत्यक्ष अोळख नसतानाही असे वाटावे हीच परांजपे यांची आयुष्यभराची पुण्याई होती.

त्याचदिवशी एक आंब्याचे रोपटे आणून अंगणात लावले.मला आशा आहे की याला नक्कीच आंबे लागतील आणि म्हणू शकेन की हे आंबा नावाचे झाड आहे !
-----

पूर्णपणे काल्पनिक. पण यासाठीची प्रेरणा खरी आहे. आता त्याचा दुवा काही देता येणार नाही. सगळ्याचा दुवा द्यावाच असे थोडीच आहे ? सुज्ञ मिपाकरांना तो मिळेलच !

कथालेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

20 May 2019 - 12:52 pm | उगा काहितरीच

छान लिहीलंय. ते शेवटचं वाक्य खटकलं, उगाच टाकलं राव !

टर्मीनेटर's picture

20 May 2019 - 1:33 pm | टर्मीनेटर

छान लिहीलंय. ते शेवटचं वाक्य खटकलं, उगाच टाकलं राव !

+१
अगदी हेच मनात आलं होतं!

यशोधरा's picture

20 May 2019 - 2:04 pm | यशोधरा

लिहिलं चांगलं आहे, पण संवादातली भाषा ( मित्र मंडळी, रखवालदार वगैरे) कोकणातील वाटत नाही. देशावरील वाटते आहे.

अभ्या..'s picture

20 May 2019 - 3:47 pm | अभ्या..

चांगले लिहिलंत गाववाले,
येऊद्या अजुन लेखन.

जालिम लोशन's picture

20 May 2019 - 5:04 pm | जालिम लोशन

छान.

दुर्गविहारी's picture

20 May 2019 - 9:53 pm | दुर्गविहारी

कोणाकडे निर्देश आहे, ते लक्षात आले. झाड बहरुन यायचे असेल तर मि.पा.वर भरपूर आणि दर्जेदार लिखाण व्हायला हवे.

जालिम लोशन's picture

20 May 2019 - 11:34 pm | जालिम लोशन

+१

कुमार१'s picture

21 May 2019 - 12:52 pm | कुमार१

छान !