आणि बुद्ध हसला !

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
18 May 2019 - 3:35 pm

१८ मे १९७४ ची सकाळ आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सुरू असलेल्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम अचानक थांबवण्यात आला आणि एक उद्घोषणा केली गेली.
कृपया एक महत्त्वपूर्ण प्रसारण की प्रतीक्षा करें।. "आज सुबह 8.05 पर पश्चिमी भारत के एक अज्ञात स्थान पर शांतिपूर्ण कार्यों के लिये भारत ने एक भूमिगत परमाणु परीक्षण किया है।"

७ सप्टेंबर १९७२ ला पंतप्रधान इंदिरा गांधींनी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली, त्या भेटींत गांधींनी पिसफूल न्यूक्लियर डिव्हाईस म्हणजेच PNE तयार करण्यासाठी परवानगी दिली आणि हसऱ्या बुद्धाचा प्रवास सुरु झाला. पण हे अगदी अलीकडचं नक्कीच नव्हतं. १९६७ पासून शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांची एक टिम प्लुटोनियम बनवायच्या प्रयत्नात होती. सुरक्षेच्या कारणास्तव ऑन पेपर असं काहीच नव्हतं, जे काही व्हायचं ते अगदी तोंडी आदेशाने. आजही आपल्याला प्लुटोनियम बनवायचं कठीण काम असतं, ते तेव्हाही होतंच, कारण हे एकदा हातात पडलं कि अणुबॉंब बनवणं अगदी सोप्प आणि अणुबॉम्ब ची दाहकता दुसऱ्या महायुद्धात साऱ्या देशाने पहिली होती. विशेषतः अमेरिकेची CIA अश्या प्रकारचे प्रयत्न कुठे सुरु आहेत का याचा कायम शोध घेत असायची. तर या अणुबॉंब साठी समृद्ध प्लुटोनियम मिळवायच्या प्रयत्नांना सुरवात झाली. १९७० मध्ये Phoenix plutonium plant गळतीमुळे बंद केला गेला.तो पूर्णपणे पुन्हा कार्यरत होऊन समृद्ध प्लुटोनियम मिळ्वण्यासाठी अजून २ वर्ष लागणार होते, म्हणून BARC चे डायरेक्टर आणि आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख राज रामण्णा यांनी पूर्णिमा नावाचा रिऍक्टर बंद करण्याचा आदेश देऊन तिथलं १८ किलो प्लुटोनियम वापरायचं ठरवलं गेलं ( फॅटमॅन मध्ये ६.२ किलोग्रॅम वापरलं होतं) म्हणजे भारताकडे तेव्हा फक्त ०३ अणुबॉंब बनवू शकू इतकं मटेरियल होतं.

आता वेळ होती या स्फोटासाठी जागा (यापुढे शाफ्ट ) तयार करण्याची. १९६३ मध्ये भारताने PTBT करारावर स्वाक्षरी केली होती ज्यामध्ये स्वाक्षरी करणारा देश अणुबॉंब किंवा दुसऱ्या कुठल्याही स्वरूपात वातावरणात स्फोट करू शकत नाही. हे वातावरण म्हणजे आकाश, स्वतःच्या आणि आंतरराष्ट्रीय हद्दीतील समुद्र यांचा समावेश होता त्यामुळे भारताने जमिनीखाली स्फोट करण्याचा निर्णय घेतला आणि जागा ठरवली गेली राजस्थानमधली तेव्हा निर्मनुष्य अशी पोखरण. पोखरण मध्ये शाफ्ट तयार करण्यासाठी लष्कराची मदत घेण्याचं ठरलं, त्याप्रमाणे या राजा रामण्णा यांनी मे १९७३ लष्कराच्या जोधपूरला असणाऱ्या ६१ इंजिनियरिंग रेजिमेंटच्या लेफ्टनंट जनरल सभरवाल यांच्याशी शाफ्ट तयार करण्यासाठी संपर्क साधला. सुरवातीला लष्कराकडून काहीच प्रतिसाद नव्हता पण जून महिन्यात जेव्हा खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधींकडून जनरल बेवूर यांना आदेश आले तेव्हा लष्कर अत्यंत गतीने कामाला लागलं. पण यापूर्वी रेजिमेंट ला असं काम करण्याचा काहीच अनुभव नव्हता सगळेच नवखे होते, त्यामुळे सुरवातीला अडचणी आल्या. लष्कराने या कामाला Operation Dry Enterprise असं नाव दिलं आणि तिथे काम करणारे सैनिक आणि अभियंते यांना सांगण्यात आले कि पोखरण टेस्ट रेंज साठी एक विहीर खोदायची आहे. जानेवारी १९७४ मध्ये या कामाला जोरदार धक्का बसला ज्या ठिकाणी खोदणे सुरु होते तिथे पाणी लागलं आणि ती जागा सोडून द्यावी लागली. मग फेब्रुवारी १९७४ ला मालका नावाच्या खेड्याजवळ पुन्हा काम सुरु झालं आणि स्फोटाच्या अगदी काही दिवस आधी पूर्ण झालं.

हे सुरु असतांना दिल्लीत वेगळंच नाट्य रंगत होतं. राजा रामण्णा आपलं आत्म चरित्र इयर्स ऑफ पिलग्रिमिज मध्ये म्हणतात प्रकाल्पाविषयी अत्यंत कमी जणांना माहिती होती आणि याच्याशी संबंधित बैठकांमध्ये फक्त निवडक लोकांनाच सामील केलं जात होतं ज्यात स्वतः राजा रामण्णा,ऍटोमिक एनर्जी कमीशन चे अध्यक्ष सेठना, संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लगार नाग चौधरी, इंदिरा गांधींचे चाणक्य समजले जाणारे सर्वात जवळचे विश्वासु असे सचिव पीएन हक्सर आणि पीएन धर यांचा समावेश असे. परीक्षणाच्या काही दिवस आधी शेवटची बैठक ठरली होती ज्यात परीक्षणासाठी हिरवा कंदील दिला जाणार होता पण, बैठकीत धर आणि हक्सर दोघांनीही या परीक्षणाला कडाडून विरोध केला. धर विरोध करतांना म्हणले यामुळे आपल्यावर निर्बंध येतील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहचू शकतो. दुसरीकडे हक्सर यांनी पण विविध कारणं आणि तर्क देत विरोध कायम ठेवला. राजा रामण्णा म्हणाले आता सर्व तयारी झाली आहे आता मागे हटू शकत नाही. या सर्व गदारोळात एक व्यक्ती शांत पणे बसली होती ती म्हणजे इंदिरा गांधी. सगळ्यांचं बोलून झाल्यावर त्या जेव्हा बोलायला लागल्या तेव्हा म्हणाल्या "इस साफ-सीधी बात के लिए इस परीक्षण को निर्धारित तारीख पर हो जाना चाहिए कि भारत को (दुनिया के सामने) एक ऐसे प्रदर्शन की जरूरत है."

इकडे पोखरण मध्ये आता स्फोटासाठी लागणारा डिव्हाईस आणि स्फोटाची तिव्रता नोंद करण्यासाठी चे ह्या स्पीड कॅमेरे ट्रॉम्बे वरून ९०० किमी आणि ३ दिवस प्रवास करून एका विशेष रेल्वे ने आणण्यात आलं, त्यासाठी वेगळी रेल्वे लाईन टाकली गेली होती. १३ मे ला अनिल काकोडकर आणि इतर ५ जणांच्या टिम ने शाफ्ट पासून जवळच एका झोपडीत ते डिव्हाईस असेम्ब्ल करायला सुरवात केली.१५ तारखेला सकाळी १४०० आलो वजनाचं अवजड धूड L आकाराच्या शाफ्ट मध्ये एकदाचं स्थानापन्न झालं आणि वाळू -सिमेंटच्या साह्याने बंद केलं गेला. आता सारेजण वाट पाहत होते प्रत्यक्ष स्फोट कधी होणार याची. शेवटी तो दिवस आला तारीख होती १८ मे सकाळी ८ वाजता परीक्षण करण्याचं ठरलं, त्याप्रमाणे या दिवशी प्रकाल्पावर सारे महत्वाचे लोक इथे उपस्थित होते, पण प्रत्यक्ष जागेपासून दूर एका बंकर मध्ये बनवलेल्या निरीक्षण कक्षात. सकाळी ८ वाजता ठरवली गेलेलं हे परीक्षण ५ मिनिटं उशिरा झालं कारण हायस्पीड कॅमेरा टेस्ट करणारी टिम जिप सुरु होत नसल्याने तिथेच अडकली होती. ते बाहेर आले आणि ०८:०५ मिनिटांनी 'बुद्ध हसला'.
टेस्ट सेंटर

इंदिरा गांधी टेस्ट सेंटर ला भेट देतांना

काही रंजक गोष्टी :

  • या ऑपरेशनच आधी नाव निश्चित केलं गेलं नव्हतं, ज्या १८ मे १९७४ ला जेव्हा हे परीक्षण झालं त्या दिवशी 'बुद्ध पौर्णिमा' होती, म्हणून या ऑपरेशनच नाव पी एन धर यांनी 'Smiling Buddha' असं ठेवलं गेलं
  • काही दाव्यांनुसार हे ऑपरेशन इतकं सिक्रेट होतं कि खुद्द संरक्षण मंत्री जगजीवनराम राम यांना सुद्धा याची माहिती नव्हती.

तर बरं का मंडळी हि होती कथा भारताच्या अभिमानाची, शत्रूवर केलेल्या कुरघोडीची आणि हसलेल्या बुद्धाची !

टिप :

  1. सदर लेखात काही तांत्रिक चूक असल्यास नम्रपणे दाखवून द्याव्या सुधारण्यात येतील.
  2. सुद्धलेखनास हासू नये

-मंदार

इतिहासलेखमाहिती

प्रतिक्रिया

नरेंद्र गोळे's picture

18 May 2019 - 5:35 pm | नरेंद्र गोळे

फेसबूकवर शेअर करत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2019 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारताच्या इतिहासातील एका सुवर्णक्षणाची समयोचीत आठवण !

प्रमोद देर्देकर's picture

19 May 2019 - 10:22 pm | प्रमोद देर्देकर

आता त्या स्फोतटातून निर्माण झालेल्या ऊर्जेचे पुढे काय आणि कसे विघटन झाले ते पण सांगा की राव .

टर्मीनेटर's picture

20 May 2019 - 12:17 pm | टर्मीनेटर

छान लिहिलंय.

सुबोध खरे's picture

21 May 2019 - 7:16 pm | सुबोध खरे

या घटनेचा एक शिल्पकार डॉ राजा रामण्णा हे संरक्षण राज्यमंत्री असताना विक्रांत जहाजावर आले होते तेंव्हा त्यांना भेटण्याचा योग्य आला. त्यांना "चरणस्पर्श" करावा अशी फार उर्मी होती परंतु अंगावर असलेल्या गणवेशामुळे तसे करता आले नाही. त्यांच्याशी ओळख करून देताना एक कडक सलाम मात्र ठोकला. आजही त्यांच्या या भेटीची आठवण आली कि अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू उभे राहतात. अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्वाचा पण अतिशय साधा माणूस होता.