छत्रपती शिवाजी महाराज कि जय!

Primary tabs

kool.amol's picture
kool.amol in भटकंती
4 May 2019 - 1:32 am

नमस्कार. नुकताच आपण महाराष्ट्र दिन साजरा केला. एक महाराष्ट्रीयन म्हणून आपले नक्कीच काही मानबिंदू आहेत. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी माणसाची व्याख्या करताना पु ल म्हणतात कि शिवाजी महाराज कि म्हणलं कि ज्याच्या तोंडातून आपोआप जय येत तो मराठी. इतकी समर्पक व्याख्या दुसरी कुठली असू शकते? अशा आपल्या हा मानबिंदूपुढे फक्त मराठीच नाही तर सगळा भारत नतमस्तक होतो. हे सांगण्यामागं कारण म्हणजे असं एक ठिकाण जिथे आपण एकाच वेळी नतमस्तक, आश्चर्यचकित आणि भारावल्यासारखे होतो. हे ठिकाण म्हणजे श्रीशैलम! तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल कि श्रीशैलम आणि शिवाजी महाराज हे काय नातं आहे ? मलाही असच वाटलं होत कारण श्रीशैलम म्हणजे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक इतकं आपल्याला माहिती असत पण इथे गेल्यावर मला कळलं कि इथे शिवाजी महाराजांचं अप्रतिम असं मंदिर आहे हो तुम्ही बरोबर वाचलंत शिवाजी महाराजांचं मंदिर. आणि महत्वाची बाब म्हणजे इसवी सन १९८६ मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. ह्या ठिकाणाचा आणि महाराजांचा काय संबंध असू शकेल असा प्रश्न मला पडला पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर मला मंदिरातच मिळाली. हि घटना आहे १६७७ मधली. महाराज स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिणेत आले होते. त्याची सुरुवात त्यांनी तेव्हाच भागानगर आणि आत्ताच हैद्राबाद इथून केली. तिथल्या गोवळकोंड्याच्या राजाने महाराजांना अगदी आदराने बोलावून त्यांचा आदर सत्कार केला. तिथे काही दिवस राहून महाराज श्रीशैलम इथे आले. तेव्हा हि जागा बघून महाराज अगदी भारावून गेले. इथल्या कृष्णा नदीवर त्यांनी घाट देखील बांधला. त्यानंतर त्यांनी त्यांचा मुक्काम वाढवला. असं सांगण्यात येत कि इथे काही दिवस राहिल्यानंतर महाराजांना आध्यत्मिक अनुभूती आली आणि त्याना इथून निघण्याची इच्छाच होत नव्हती. तोरणा घेतल्यापासून त्यांचा चाललेला अखंड प्रवास, मोहिमा, धावपळ स्वराज्य स्थापना यातून त्याना इथेच थोडा निवांतपणा मिळाला होता. काही दिवसानंतर महाराजांना वाटले कि पृथ्वीवर यापेक्षा पवित्र जागा असूच शकत नाही त्यामुळे त्यांनी आपले जीवन इथेच संपवण्याचा निर्णय घेतला. पण विधिलिखत काही वेगळेच होते. त्याचवेळेस प्रत्यक्ष तुळजाभवानी प्रगट झाली आणि तिने महाराजांना सांगितले कि आत्मार्पण हे महत्पाप आहे आणि अजून तुला देश आणि धर्मासाठी खूप काही करायचे आहे. इतके सांगून देवीने महाराजांना तलवार दिली आणि तिथून निघून जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर इथून महाराजांनी आपले स्वराज्य तंजावर पर्यंत विस्तार केला.

ह्या घटना इथेच संपत नाहीत. त्यापुढील माहिती वाचल्यानंतर महाराजांविषयी आपला आदर आणखी वाढतो. महाराजांचे नेतृत्वगुण इतके महान आहेत हे बघून आपला अभिमान आणखीनच दुणावतो. महाराजांनी महाराष्ट्रात अगदी सामान्य घरातल्या मावळ्यांना एका उदात्त ध्येयाने प्रेरित केले आणि जे कार्य केले त्याला तोड नाही पण त्यांचे नेतृत्व फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. श्रीशैलमच्या भागातील तरुणांना देखील ह्या महान राजाने भुरळ घातली. असे उदाहरण दुर्मिळच! त्याबद्दल जी माहिती मिळाली ती वाचून असं वाटलं की महाराजांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, मुरारबाजी हे काही फक्त महाराष्ट्रातच नाही घडवले. पार आंध्रात देखील निर्माण केले. ह्या भागात चेंचू ह्या जातीचे आदिवासी राहतात. अत्यंत शूर असलेले हे आदिवासी महादेवाचे भक्त आहेत. श्रीशैलम ह्या देवस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे असे ते मानतात. आणि हे काम ते अत्यंत प्रामाणिकपणाने करत होते. महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे महत्व त्यांना देखील कळले आणि या जमातीतिल ३ भाऊ चीनमल्लू, पेदमल्लू आणि नदिपमल्लू हे महाराजांचे मावळे बनले. त्यावेळी त्यांच्या घरी विवाह कार्य चालू होते पण त्यासाठी न थांबता हे तीनही भाऊ महाराजांसोबत दक्षिण मोहिमेत सहभागी झाले आणि ह्या क्षेत्राची माहिती त्याना दिली. अगदी तानाजी मालुसरे सारखीच हि भावंडं आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणून स्वराज्य कार्यात सहभागी झाली. महाराजांनी हे कसे केले असेल? भाषेची अडचण आली नसेल का ? खरा नेता ह्या सगळ्या अडचणींवर सहज मात करतो हेच ह्या घटनेमुळे सिद्ध होते.
अशा ह्या ऐतिहसिक घटनांची उजळणी ह्या मंदिरात होते. ह्या सर्व घटनांचं महत्व ओळखून त्यावेळचे आंध्रचे मुख्यमंत्री ऐन टी रामराव ह्यांनी ह्या मंदिराची कल्पना उचलून धरली. अगदी मोठं मंदिर आहे हे. मध्यभागी उंच चौथऱ्यावर महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती असून तिच्या चार बाजूला समोरचे दोन पाय उंचावलेले ४ उमदे अश्व आहेत. ह्या चौथऱ्याच्या सभोवताली इथे घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची तेलगू आणि हिंदी भाषेत माहिती दिली आहे तसेच चित्रे पण आहेत. ह्या सर्व माहितीसाठी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी मार्गदर्शन केले आहे. ह्या मंदिरासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त १० रुपये इतकं तिकीट इथे आहे. तिकीट वाटपासाठी इथे आम्हाला लातूरचा एक माणूस भेटला. आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत हे कळल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने हे मंदिर आम्हाला दाखवलं. श्रीशैलमच्या मुख्य मंदिरापासून अगदी जवळच हे मंदिर आहे. मंदिरात अगदीच कमी गर्दी होती त्यामुळे खूप निवांत हे मंदिर बघता आलं. मंदिर बघून उर अभिमानाने भरून आला. एक विचार मात्र स्पर्शून गेला कि असं मंदिर महाराष्ट्रात का नाही? असो, आपल्या सर्वांच्या मनात देवस्थानी असलेला हा मानबिंदू इथे ह्या भव्य स्वरूपात बघून आपण नक्कीच सुखावतो. २ शिवतत्व एकाच ठिकाणी असणारी हि जागा चुकवू नये हे निश्चित!

बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
maharaj
mandir

प्रतिक्रिया

kool.amol's picture

4 May 2019 - 1:33 am | kool.amol

mandir

kool.amol's picture

4 May 2019 - 1:35 am | kool.amol

mandir

kool.amol's picture

4 May 2019 - 1:35 am | kool.amol

mandir

बाजीगर's picture

4 May 2019 - 2:50 am | बाजीगर

वाचून संतोष पावलो.
खरतर हे महाराष्ट्रात असायला पाहिजे होते. असो.
महाराष्ट्रातले नेते शिवाजीवर धंदा करतात.
एका पार्टीला वाटते हा त्यांचा काॅपीराईट आहे.
दुसरा त्यावर समुद्रात स्मारक बांधून,statue of liberty सारखी टाकसाळ उघडायला बघतो.
काही जातीपातीचं राजकारण करतात.
पण लाभाविण/unconditional प्रेम तर आंध्रवाल्यांनी केलं अस म्हणायला पाहिजे.

दुर्गविहारी's picture

4 May 2019 - 8:00 am | दुर्गविहारी

सहमत. बाकी या मंदिराविषयी व्हॉटस अँपवर अनेकदा माहिती आली आहे. तुम्ही सविस्तर ओळख करून दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. पु. ले. शु.

kool.amol's picture

4 May 2019 - 8:29 am | kool.amol

ही माहिती whatsapp वर फिरते हे नव्हतं माहीत मला. तुमच्याकडे असेल तर plz पाठवा. मी तिथल्या लोकांशी बोलून, मंदिरातील भित्तिचित्रांवर पाहून आणि इतर ठिकाणांहून मिळवली आहे.

नेमकं बोट ठेवलेत आपण. मलाही चीड येते या सर्व प्रकारांची. तुम्ही म्हणता तस आंध्रातल्या लोकांनी unconditional केलं आहे हे सगळं. भव्य जागा, मूर्ती आणि माफक तिकीट. ना राजकीय फायदा ना आर्थिक! आणि ते देखील 30 वर्षांपूर्वी. आपल्याकडे असं काही होण्याची सुतराम शक्यता वाटत नाही मला.

उगा काहितरीच's picture

4 May 2019 - 7:50 am | उगा काहितरीच

छान परिचय करून दिलात. त्या भागात गेलो की नक्की बघण्यात येईल.

टर्मीनेटर's picture

4 May 2019 - 10:54 am | टर्मीनेटर

छान आोळख करून दिलीत मंदीराची...
अवांतर: गड कील्ले वगळता महाराष्ट्रातले एकमेव शिवाजी महाराजांचे मंदीर पुर्वी (सुमारे ५०-६० वर्षे) शिवाजी चौक, बदलापुर येथे होते... पंधरा एक वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण करताना ते पाडून त्याजागी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारला आहे.

अन्या बुद्धे's picture

4 May 2019 - 2:24 pm | अन्या बुद्धे

तिथे मंदिर होतं ही माहीती मला नवी! 1984 पासून तिकडे पुतळाच पाहतोय.. कुणाकडून मंदिराबाबत ऐकण्यात देखील आलं नव्हतं..

प्रसाद_१९८२'s picture

4 May 2019 - 1:18 pm | प्रसाद_१९८२

महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे एकमेव मंदीर सध्या मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे.
हे मंदीर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले होते.

अभ्या..'s picture

4 May 2019 - 1:22 pm | अभ्या..

वा, मस्त ओळख.
कर्नाटक महाराष्ट्र सीमाभाग आणि खुद्द कर्नाटकातही शिवाजी महाराजांना देवाचा दर्जा दिलेला आहे. आपल्याला माहीतही नसलेल्या बर्‍याच कहाणा वर्णिल्या जातात. शिवजयंती अगदी उत्साहाने कित्येक वर्षे (तिथीने) साजरी केली जाते. अगदी आधुनिक चित्रपटात देखील महाराजांच्या पुतळ्याचा पार्श्वभूमीवर वापर करुन अन्यायाविरुध्द लढ्याची दृष्ये कन्नड चित्रपटात असतात. लिंगायत समाजाचे प्राबल्य असल्याने शिवाजी म्हणजे शिवाचा अवतार असेही समजून श्रध्दास्थान मानले जाते.

विजापुरात शिवाजी महाराजान्चा (जिथल्या मुस्लिमबहुल समाजाचे ते एकेकाळी "शत्रू" असतील) सुन्दर पुतळा मध्यवर्ती ठिकाणी आहे.

प्रसाद_१९८२'s picture

5 May 2019 - 11:03 am | प्रसाद_१९८२

शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यवर्ती ठिकाणी नसुन सोलापूर-विजापूर महामार्ग, विजापूर किल्ल्याची तटबंदी फोडून शहरात प्रवेश करतो त्या ठिकाणी शिवरायांचा अश्वारुढ पुतळा आहे.

आता विजापूर नाही, विजयपूर म्हणायचे.

प्रसाद_१९८२'s picture

5 May 2019 - 12:56 pm | प्रसाद_१९८२

या कानडी राज्यकर्त्यांचे मला नेहमीच आश्चर्य वाटते,
विजापूर व गुलबर्गा या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शहरांची नावे त्यांनी कोणताही वाद न होता अगदी आरामात बदलली.

खरंच सुंदर. स्वत: पाहून फोटो टाकून लेख दिल्याबद्दल धन्यवाद.
उत्तरेकडून आलेली शत्रुची लाट थोपवली शिवाजीनेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 May 2019 - 10:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर रोचक माहिती ! फोटोमुळे मंदीराची छान कल्पना येते. धन्यवाद !

शेखरमोघे's picture

4 May 2019 - 11:06 pm | शेखरमोघे

छान लिखाण!

कानडाऊ योगेशु's picture

5 May 2019 - 12:42 pm | कानडाऊ योगेशु

सदर ठिकाण हे मंदीरापेक्षा स्मारक असावे असे वाटते. काही असले तरी ते बांधण्यामागची भावना महत्वाची आहे.

kool.amol's picture

5 May 2019 - 8:04 pm | kool.amol

तुमची शंका बरोबर आहे त्याला ते स्फूर्ती मंदिर म्हणतात. हा उल्लेख करायचा राहून गेला.

फुटूवाला's picture

5 May 2019 - 2:23 pm | फुटूवाला

खुप छान माहिती फोटोसहित दिलात...

टवाळ कार्टा's picture

9 May 2019 - 8:17 pm | टवाळ कार्टा

राजांचे मंदिर? नाहीये ते बरंय
एकदा देव बनवले की कार्यकर्ते आणखी धुडगूस घालतील