माथेरानवर सायकल स्वारी

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in भटकंती
15 Apr 2019 - 3:20 pm

14.04.2019

गेल्या महिन्यात 6 दिवस सायकलसफर झाल्यावर आता परत पाय फुरफुरायला लागले होते. 10-12 दिवसांपूर्वी नमिता दामलेचा लेख वाचनात आला ज्यात तिच्या माथेरान राईडबद्दल लिहिले होते.. वाचून सुरसुरी आलीच. या महिन्यात तो घाट सर करायचं ठरवून टाकलं. आणि त्यासाठी आजचा मुहूर्त पक्का झाला.

'सकाळी लौकर उठून' या शब्दांनी मला व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे बाबत भारी छळलं आहे. एकदा गादीतून बाहेर पडलो की ओके पण तोवर फारच अवघड लढाई असते. काल शाळूमित्रमैत्रिणी सोबत gt करून घरी यायलाच 12 होऊन गेले होते. त्यामुळे 5:40 चा गजर बंद करण्यासाठीच होता. पण दुसरा गजर 6:40 ला झाल्यावर उठलोच. 7 वाजता प्रवास सुरु केला.

सूर्य फोटो काढण्याच्या लायकीचा उरला नव्हता पण तापदायक नव्हता अजूनही. इतक्यातच रस्ता उत्तम झालाय त्यामुळे खड्डे विरहित गुळगुळीत रस्त्यावर सायकल हाणायला मजा येत होती. नेरळपर्यंतचं 20 km अंतर 50 मिनिटात पार झालं आणि कॉफीब्रेक साठी हॉटेलात थांबलो. निवांत कॉफी घेतली आणि निघालो.

जुम्मापट्टीपर्यंत मागे एकदा येऊन गेलो होतो. घाटाची सावली रस्त्यात होती. त्यामुळे ऊन जाणवत नव्हतं. त्यामुळे अजिबात फासफूस न होता 15 मिनिटात जुम्मापट्टीला पोचलो.
1
दमणूक अशी जाणवत नव्हती म्हणून न थांबता तसाच पुढे निघालो. घाट सुरू झाल्यावरच 1-5ने सुरवात करून 1-3वर सेटल झालो होतो. आता ऊन नीट जाणवायला लागलं होतं पण ते पाठीवर होतं म्हणून फार त्रास नव्हता. आतापर्यंत 15 अंशात चढ होते.
2
इथून पुढे तो कोन वाढत जाणार होता. काही ठिकाणी पार 40 अंशापर्यंत. आणि त्यात ती हेअरपीन वळणे! हा घाटाचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि आता विश्रांतीसाठी थांबायलाच हवं असं झालेलं. सततची वळणं, लो गियर/चढणीमुळे वेग नाही, भसाभस वेगाने सिंगल लेन मधून जाणाऱ्या प्रवासी गाड्या यामुळे चालत्या सायकलवर पाणी एकहाती पिणं ही कसरत होऊन बसली होती. एक कट्ट्याची सावली बघून निवांत टेकून बसलो. घोट घोट पाणी घेत दम नीट केला आणि परत निघालो.
3
असे निवांत थांबणं आणखी दोनदा झालं घाटात. बाकीचे हॉल्ट फक्त पाणी पिण्यासाठी असायचे. उभ्यानेच 2 घोट पाणी प्यायलं की लगेच धर हँडल मार पायडल.

घाटात तसा प्रवासी लोकांच्या दृष्टीने मी लौकर होतो. 2 गाड्यामध्ये तब्बल 4एक मिनिटांचे ब्रेक असायचे. या काळात रस्त्यावर चाकाचा होणारा आवाज, मधेच एखाद्या पक्षाचा कोकिळेचा आवाज, माझ्याच श्वासांचा कानात वाजणारा आणि छाती पोटात घुमणारा आवाज यापलीकडे शून्य आवाज! प्रत्येक पेडलने घाटमाथा 3-4 फूट जवळ येत होता. फार भारी! यात एक विचित्र त्रास होता. पाणी पिऊन परत निघालो की सायकलला वेग नाही आणि लो गियरमुळे पाय भसकन खाली यायचा.. जमिनीवरचा पाय पेडलवर येण्या आधीच. की तो टेकवत परत थांबायचं... परत प्रयत्न.. तिसर्याचौथ्या प्रयत्नात जमलं की परत सुरू पेडलिंग. एकदोनदा चढ जास्त असल्याने अस करताना पुढलं चाक रस्त्यावरून उचललं गेलं! यावर शेवटी उपाय असा केला की नेक्स्ट टाइम असं थांबतानाच मी पुढला गियर 2 करून थांबायचो. म्हणजे परत सुरू करताना वेळ मिळायचा पाय पेडलवर घ्यायला. की लगेच 1-3 सुरू..

आता घाट सुरू करून 40 मिनिटं होऊन गेली होती. बाटलीतलं पाणी तापून प्यावंस वाटेना. 'सकाळी लौकर उठून' हे का गरजेचं ते नीट समजायला लागलं होतं. टीशर्ट घामाने भिजला होता. अशावेळी माथेरानने मला मदतीचा हात दिला. एका डोंगरकड्यावर डोंगरातून झिरपून पाणी येत होतं. कुण्या डोकेबाज माणसाने तिथे खाचेत बाटली कापून अडकवली होती. आणि पाण्याची धार खडकापासून 8एक इंच दूर पडेल अशी सोय केली होती. इथे चेहरऱ्या डोक्यावरच्या घामाची चव निघून जाईपर्यंत डोकं त्या धारेखाली धरून बसून राहिलो. बाटलीत गार पाणी भरून घेतलं आणि ताजा झालो.

आता शेवटचे 3 km बाकी होते. मी पाण्यासाठी थांबायचो म्हणून नाईलाजाने सखी थांबायची. नाहीतर तिची अजिबात कुरकुर नव्हती घाटाबद्दल. ऊन चांगलं तापलं होतं. आता शेवटचे 3 हेअरपिन नजरेच्या टप्प्यात आले होते. पण चढ फारच जास्त होते. म्हणून नाईलाजाने थांबलो सावली बघून. खरतर आता 600-700 मीटरची चढाई बाकी होती फक्त. निवांत 5 मिनिट आराम थोडं स्ट्रेचिंग करून परत सुरू झालो. चढ आणि हेअरपीन अंगावर येत होते पण अंतर अगदीच कमी उरलं होतं. 10एक मिनिटात पोचलोच मुक्कामी.

रस्त्यात जाणारे येणारे लोक कार्समधले लोक, 'काय वेड**पणाय' इथपासून ते प्रचंड आश्चर्य कौतुक इथपर्यंत सर्वप्रकारे बघायचे. इथेच नव्हे हा सार्वत्रिक अनुभव आहे पण 'मस्त मजा करतोय बेटा.. एन्जॉय!' असा माझ्या आनंदाशी सुसंवादी भाव फक्त लहान मुलं आणि 60 नंतरचे म्हातारे यांच्याच चेहऱ्यावर बघितलेत. असाच एक कारने वर आलेला मुलगा मला बघून गप्पा मारायला आला. त्याचं सायकल कुतूहल शमवलं. त्यानेच माझे फोटोही काढले. निवांत लस्सी पिऊन परतीचा प्रवास सुरु केला.
4
घाट चढवायला 1तास 10 मिनिटं लागली पण उतरलो 14 मिनिटात! बाटली रिकामी होती तरी भरून घेतली नाही मुद्दाम. मध्ये थांबून ते थंडगार पाझरपाणी भरून घेतलं बाटलीत. इथे अर्ध्या अंतरावर एक स्थानिक जोडपं डोक्यावर बोजे लादून चढण चालत होतं. मी त्यांच्या समोरून वेगात उरतरत आलो. त्यांना बघून नकळत मान झुकवून हसत हॅलो केलं. बोललो काहीच नाही. तो स्वच्छ मोकळं हसला आणि तीने बोज्याखाली असलेली मान किंचित झुकवत मला नजरेनेच हॅलो केलं. ते चेहरे विसरणं अवघडच. आता परतीचा प्रवास तासभरच उरला. शांतपणे कॉफी घेऊन घराकडे निघालो.
6
7
येताना इथे 50 मिनिटात आलो होतो. पण घरी पोचायला सव्वातासपेक्षा जास्त वेळ लागला. नुकत्याच केलेल्या रस्त्याचं डाम्बर वितळवून चाक धरून ठेवत होतं, डोक्यावर तळपता सूर्य आणि समोर बेक्कार हेडविन्ड्स. सखीला वेगच घेता येईना. त्या 20 km मध्ये 2 लिंबूसरबत आणि एक उसाचा रस असे मुक्काम टाकत शेवटी घरी पोचलो. परतीला वाटेत अनेक डेरेदार वृक्ष मेनकेप्रमाणे सावली दाखवत मोहात पाडत होते. मस्त तास दोन तास पडी मारावी अस वाटत होतं पण सरोजच्या धाकाने तिकडे दुर्लक्ष करत मी माझा विश्वामित्र होऊ दिला नाही. :)
8

मातबर माथेरानघाट सर केल्याचा आनंद काही औरच!

 माथेरान

-अनुप

प्रतिक्रिया

mayu4u's picture

15 Apr 2019 - 4:45 pm | mayu4u

छान सफर आणि लेखन!

देशपांडेमामा's picture

15 Apr 2019 - 6:06 pm | देशपांडेमामा

भारी प्रकार केला आहे तुम्ही ! _/\_

लेख पण झकास झालाय !

देश

लेख आवडला. फोटो दिसत नाहीत.

महामाया's picture

15 Apr 2019 - 7:28 pm | महामाया

छान सफर केली...लेख आवडला...

अन्या बुद्धे's picture

15 Apr 2019 - 8:57 pm | अन्या बुद्धे

फोटो लोड होताना काय गडबड झाली कळेना..:(

shashu's picture

15 Apr 2019 - 9:31 pm | shashu

कसं काय जमत बुवा....
इच्छा आहे पण मार्ग दिसत नाही....

अन्या बुद्धे's picture

15 Apr 2019 - 9:52 pm | अन्या बुद्धे

गेल्यावर्षी 1 मे पासून सायकलिंग सुरू केलं. 20एक वर्षांनी.. तोवर देखील गावातच चालवायचो. आता हळूहळू जमतंय..

कंजूस's picture

15 Apr 2019 - 9:46 pm | कंजूस

पायी चढतो , पण दम लागतो. सायकलमुळे सहज शक्य होतं असं काहीतरी या दोन लेखांतून समज झालाय. सायकलमध्ये गुप्त इलेक्ट्रिक मोटरबिटर लावली असणार या लोकांनी.

अन्या बुद्धे's picture

15 Apr 2019 - 9:53 pm | अन्या बुद्धे

तुमच्याबद्दल थोडं ऐकून आहे. तुम्ही मस्करी करताय माझी अस स्पष्ट मत आहे :)

कंजूस's picture

16 Apr 2019 - 6:09 am | कंजूस

हो जरा गम्मत केली आहे. पण एकूण सायकलने घाट चढणे आणि उतरणेही खूपच अवघड आहे.

बाजीगर's picture

4 May 2019 - 3:23 am | बाजीगर

डिटेलवार वर्णन वाचून बेहद खूष झालो.
खरतर मीच जाऊन आलो असा फील आला.
मस्त.

जगप्रवासी's picture

11 May 2019 - 3:55 pm | जगप्रवासी

लवकरच माथेरानला जायचा विचार आहे

ज्योति अळवणी's picture

24 May 2019 - 8:53 pm | ज्योति अळवणी

वा मस्तच

कौतुक वाटतं बुवा तुमचं. गेल्या वर्षी हिरीरीने सायकल चालवायला सुरवात केली होती. दिड तासापर्यंत मजल देखील मारली होती. पण मग दिवसभराचं काम आणि सायकलच गणित बसवता नाही आलं आणि सुटली सायकल

अन्या बुद्धे's picture

24 May 2019 - 9:31 pm | अन्या बुद्धे

सोडू नका.. जमेल तेंव्हा जमेल तितकं जमेल तसं चालवत रहा..

Nitin Palkar's picture

23 Aug 2019 - 8:01 pm | Nitin Palkar

सुरेख वर्णन.