लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ५

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
13 Apr 2019 - 8:29 am

(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे)

भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
भाग ३: http://www.misalpav.com/node/44375
भाग ४: http://www.misalpav.com/node/44381

बहादुरशहा इंग्रजांच्या हाती लागल्यावर इंग्रज सैनिकांनी लाल किल्ला ताब्यात घेतला, आपली छावणी किल्ल्याच्या आंतल्या वेगवेगळ्या रिकाम्या जागेत हलवली आणि आपल्या सोयीसाठी कांही "Heritage" इमारतीदेखील उध्वस्त केल्या. इंग्रज आणि त्यांच्या बरोबरच्या शीख आणि पठाण सैनिकांनी लाल किल्ल्यातल्या अनेक उत्तम कलाकुसरीने आणि किंमती खड्यांनी भूषविलेल्या संगमरवरी भिंती असलेल्या अनेक इमारती, अनेक पिढयांची राजशाही वस्त्रप्रावरणे, दागिने आणि सोन्याचांदीची भांडी आणि अशाच पूर्ण शहरांतल्या ओरबाडता येईल त्या मौल्यवान वस्तू लुटल्या. या कामांत ज्यांचा अडसर वाटला त्यांना गोळ्या घालून उडवले गेले. ज्या इंग्रजांच्या ताब्यात कांही सैन्य होते किंवा ज्यांना कांही अधिकार होते त्यांनी दिसेल त्याला "pandey" ठरवून, किंवा त्यांना मदत केल्याच्या "आरोपा"वरून कुठलीच कायदेशीर कारवाई न करता, जागीच फासावर लटकावले. थिओ मेटकाफ या एका दिल्लीतून पळावे लागलेल्या इंग्रज अधिकाऱ्याला आपले कुटुंबीय "pandey" मुळे मारले गेले याचा एव्हढा राग होता की त्याने कित्येक दिवस जो कोणी येता जाताना दिसेल त्याला दरडावून, थांबवून, शेवटी फाशी दिले. अशा सगळ्याच प्रकारानें फक्त मोठ्या हवेल्यांतून रहाणारे लोकच नव्हे (ज्यांना लुटण्याकरता त्यांची आधी "विल्हेवाट" लावणे जरूर होते) पण इतरही जे दिल्लीकर इंग्रज किंवा त्यांच्या वतीने लढलेल्या शीख आणि पठाणांच्या हातांत सापडले ते विनाअपराध मारले गेले. अशा शिरकाणातून इंग्रजधार्जिणेदेखील सुटले नाहीत. मिर्झा गालिब रहात असलेल्या मोहल्ल्यातील -जरा पैसेवाल्या - लोकांनी आपलेच बंदूकधारी रक्षक नेमून आपला मोहल्ला आणि त्यातील लोकांना वाचवले. एकदा अशाच झाडाझडतीत मिर्झा गालिबला जेव्हा धरले गेले तेव्हा पूर्वी केलेल्या राणीच्या स्तुतीपर कासिद्याचा हवाला देऊन त्यांना "मी नाही हो त्यांतला" हे सिद्ध करून आपला जीव वाचवता आला.

कांही शहाजादे आणि इतर राजघराण्याशी संबंधित लोक भिकारी, बैरागी, फकीर अशा सोंगांत दिल्लीतून पळून जाऊन राजस्थान, कराची, हैदराबाद (दख्खन) किंवा कलकत्ता अशा ठिकाणी पोचले. त्यांच्या कांही पिढ्यानी त्यानंतर लपून छपून घालवलेले जीवन आणि त्यांची झालेली दयनीय दशा यांची वर्णने कांही काळानंतर प्रकाशात येत राहिली.

कंपनीने शेवटी एक लष्करी न्यायालय नेमून २७ जानेवारी १८५८ ला बहादूरशहावरचा खटला सुरू केला. "आरोपी" बऱ्याच वेळा आपल्याच तंद्रीत किंवा जपमाळेचे मणी ओढत किंवा खोकत कधी कधी एखाद दुसरा प्रश्न विचारत असला तरी एकूणच खटला चालू असतांना आपल्याच राजेशाही विचारांतून फार थोडा बाहेर पडत असे. न्यायाधीश आणि त्यांचे मदतनीस यांतल्या फार थोडयांना खटल्याशी संबंधित लेखी किंवा तोंडी कामाकरता जरूर असेलेले फारसी आणि उर्दूचे पुरेसे ज्ञान होते.

बहादूरशहांनंतरच्या कांही काळांत दिल्लीकरांना कोणीच त्राता नव्हता. इंग्रज लुटालुटीत आणि धरपकड, फाशी आणि आपल्या सैन्याची व्यवस्था या पलीकडे कशाचाच विचार करत नव्हते. अन्नपाण्याची टंचाई, रोगराई सगळीकडेच पसरलेली असतांना दिल्लीचा कारभार करणे सोपे जावे म्हणून इंग्रजांनी जामा मशीद, काबुली दरवाजा, दर्यागंज, पहाडगंज अशा अनेक भागातल्या लोकांना शहराबाहेर हाकलून देऊन अनेक भाग भुई सपाट करून टाकला. "Prize Agents" नी (लुटालुटीचे अधिकृत "व्यवस्थापक") जमिनी, लुटलेली पण वाहून नेण्यास अवजड चीज वस्तू (जसे furniture, मोठी भांडी), मदरसे आणि मशिदी ज्यांच्या रक्षणाकरता कोणी जागेवर नव्हते असे जे कांही पळवले गेले नव्हते आणि विकता आले ते सर्व लिलावाने विकले. ज्या कुणाकडे अजूनही कांही पैसे लुटले न जाता शिल्लक होते त्यांनी (योग्य त्या लोकांची "काळजी" घेऊन) आपापल्या मालमत्ता तर वाचवल्याच पण कवडीमोलात आणखीही खरेदी करून आपला फायदाही करून घेतला. "झौक" यांच्या काही रचना त्यांच्या एका शागिर्दांने दिल्ली सोडतांना "आपल्या गुरूंची अनमोल दौलत" म्हणून काळजीपूर्वक बरोबर घेतल्याने, त्या जगातून नाहीशा न होता पुढच्या पिढीकरता जतन करता आल्या. पण एकेकाळचे "मुघल सल्तनतीचे" वैभव दाखवणाऱ्या इमारती तोफांच्या भडीमारांत नाहीशा झाल्याने किंवा हिंदुस्थानी सैनिकांना हुसकावण्याकरता जमीनदोस्त केल्याने दिल्लीच नव्हे पण सगळ्याच पुढच्या पिढ्या ऐतिहासिक ठेवा कायमच्या घालवून बसल्या.

इंग्रजांच्यातील कांही वरिष्ठ विचारवंतांचा वेळेंत हस्तक्षेप झाल्यामुळे दिल्लीवर आणि हिंदुस्थानी सैन्यावर रागावलेल्या थिओ मेटकाफसारख्या माथेफिरू इंग्रज अधिकाऱ्यानी लाल किल्ल्यासकट सगळीच दिल्ली जमीनदोस्त करून टाकण्याची तयारी चालवलेली असतांनाही लाल किल्ल्याचा काही भाग, जामा मशीद वगैरे कांही भाग वाचवता आले.

मिर्झा गालिबने आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत काव्यरचना आणि लेखन चालूच ठेवले. त्यांची पत्रें (१८५७ च्या आधीची तसेच नंतरचीही) त्यांच्या शायरीइतकीच साहित्यिक दृष्ट्या मौल्यवान समजली जातात. त्यांच्या कवनांचे साहित्यिक महत्व ठरवायचे असेल तर एक साधा मापदंड वापरता येईल - १०० वर्षांनंतरदेखील त्यांच्या सुमारे ५०-६० रचना हिंदी चित्रपटांत किंवा मेहदी हसन, गुलाम अली, जगजीत, बेगम अख्तर आणि अर्थात लता मंगेशकर व आशा भोंसले अशा नामवंत गायकांच्या कार्यक्रमांत वापरल्या गेल्या आहेत. (वानगीदाखल येथे जा - https://www.youtube.com/watch?v=rQfQlSaUMt4 तसेच https://www.youtube.com/watch?v=8SlvlfbHBW4&list=RD8SlvlfbHBW4&start_rad... आणि https://www.youtube.com/watch?v=YQ8UVMveO9M; https://www.youtube.com/watch?v=FJ1o2_jW_DU )

बहादूरशहांवरचा खटला दोन महिने चालला. काही वेळा "आरोपी"ची (वय वर्षे ८३) तब्येत ठीक नसल्याने खटल्याचे कामकाज तहकूब होत असे. ९ मार्च १८५८ ला खटल्याचा निकाल लागून आरोपीला हद्दपारीची शिक्षा दिली गेली. न्यायालयाने हॉडसनने बादशहाला ताब्यात घेण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची (की ज्याला वरिष्ठांची संमती होती किंवा नाहीं यावरही वाद झाले) जाण ठेवून फाशीची शिक्षा दिली नाही, एव्हढाच जमेचा भाग. या शिक्षेच्या अंमलबजावणीकरता बहादूरशहा आणि त्याचा जवळचा परिवार यांना नक्की कुठे पाठवून द्यावे आणि त्याची जबाबदारी कुणावर सोपवावी याचा निर्णय होईपर्यंत त्यांना दिल्लीतून हलवणे इंग्रजाना धोक्याचे वाटले. बऱ्याच विचारमंथनानंतर त्यांना सात महिन्यानंतर कडेकोट बंदोबस्तात प्रथम नदीमार्गे कलकत्याला आणि मग समुद्रमार्गे रंगूनला हलवले गेले, रंगूनला ही सगळी मंडळी पोचल्यावर त्यांच्याकरता "योग्य" (जिथे त्यांचा कोणाशीही संबंध येणार नाही आणि जेथून त्यांना थोडीदेखील बाहेर पडता येणार नाही) अशी जागा निश्चित होईपर्यंतदेखील कांही काळ गेला.

ज्या बादशहाला हिंदुस्थानी सैनिकांनी इंग्रजांना सोडल्यावर पहिली सलामी दिली आणि ज्याची इंग्रजांनी इतकी धास्ती घेतली होती त्याचा अखेर ७ नोव्हेंबर १८६२ला देहांत झाला. इंग्रजांनी तांतडीने कुठलीही नामोनिशाणी राहू नये अशा तऱ्हेने या शेवटच्या मुघल बादशहाचे दफन उरकले. १६ फेब्रुवारी १९९१ ला काही रस्तादुरुस्तीचे काम चालले असताना या कबरीचे आणि त्यातले या शेवटच्या बादशहाचे जे अवशेष सापडले ते आता एका स्मारकांत रंगूनमध्ये जतन केले गेले आहेत.

इंग्रजांनी दिल्लीचा कारभार आपल्याकरता सोपा करण्याकरता ज्या लोकांना शहराबाहेर हाकलून दिले त्यांना कांही काळ अतिशय हालात दिल्लीबाहेर कुठे तरी झाडाखाली रहात, भीक मागत, कसे तरी आयुष्य काढावे लागले. नंतर परिस्थिती जशी निवळत गेली तसे इंग्रजांनी जरी हिंदूना परत येऊ दिले तरी आणखी बरीच वर्षे इंग्रजांच्या धोरणांनुसार मुस्लिम दिल्लीकरांना दिल्लीत परतता येत नव्हते. जे दिल्लीत परतले त्यांचे सगळेच उध्वस्त, लुटले किंवा लिलावात विकले गेले असल्याने आणि दिल्लीचा बराच भाग भुईसपाट झाल्याने मुघल राज्याच्या या राजधानीची नाहीशी झालेली शान पुन्हा अनेक दशके दिसली नाही. उर्दू आणि फारसी शिक्षणाचे माहेरघर हा दिल्लीचा लौकिक आणि शेरोशायरीचा सुवर्णकाळ अस्ताला गेला.

इंग्रजांनी दिल्लीतून "मुघल बादशाही" (आणि अनेक मशिदी आणि मदरसे) उखडून काढल्यावर बराच काळ मुस्लिम दिल्लीकरांना दिल्लीत परतता येत नव्हते त्यावेळी उत्तर प्रदेशातल्या देवबंद या जागी अनेक विचारवंत मुस्लिम दिल्लीकरांनी आपला मुक्काम हलवला आणि "देवबंदी" मुस्लिम विचारांची एक नवी दिशा सुरु झाली. आजही दक्षिण आशियांतील (भारत, पाकिस्तान व बांगलादेश ) ३९% मुस्लिम "देवबंदी" विचाराचे आहेत.

दिल्लीप्रमाणेच लखनौ, कानपूर, झांशी आणि काल्पी या ठिकाणी जरी प्रथम इंग्रज हरले तरी नंतर आपल्या सगळ्या शक्तीची पुन्हा जुळवाजुळव करून त्यांनी हिंदुस्थानी सैनिकांना नेस्तनाबूत करून आपली काही काळ डळमळलेली सत्ता नुस्तीच पुन्हा स्थापित न करता आणखीनच बळकट केली. इंग्रजांची ताकद जोखतांना हिंदुस्थानी सैनिकांनी साधी सोपी समजूत करून घेतली होती - इंग्रजांना ठार करून त्यांच्या तोफा, बंदुका, दारूगोळा आणि खजिना आपल्या ताब्यांत घेतला की इंग्रज संपले. हिंदुस्थान सैनिक एकाच वेळी पूर्ण हिंदुस्थानभर सगळ्या इंग्रजांच्यावर हल्ला करू शकले नाहीत. किंबहुना कांही मोठी लष्करी ठाणी सोडली तर बरीच मोठी ठाणी आणि बरेच हिंदुस्थानी सैनिक इंग्रजांच्या अंमलाखाली राहिले. हिंदुस्थानी सैनिकांना इंग्रजांवर हल्ला करतांना इंग्रजांची तारायंत्रें किती दूरगामी परिणाम करतील आणि त्यांच्या वापराने किती पटकन इंग्रज फुटीर सैन्याविरुद्ध संघटित होऊ शकतील याची कल्पनाच आली नाही. इंग्रजांनी तारायंत्रें वापरून हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ला करण्याकरता जेथून कोठून इंग्रज फौजा मिळवून, एकत्र करून, हल्ल्याकरता तयार करता येतील तशा जमवल्या आणि परिणामकारकरित्या वापरल्या.

झांशी आणि काल्पीमधल्या संघर्षांत राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांना वीरमरण आले तर लखनौ आणि कानपूरमध्ये इंग्रजांनी आपला अंमल पुन्हा बसवल्यावर रावसाहेब आणि नानासाहेब पेशवे या लखनौ/कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना नेपाळमध्ये पळून जावे लागले.

मे १८५७ मध्ये इंग्रजानी झांशी संस्थान खालसा केलेले होते आणि "मेरी झांसी नहीं दूंगी " असे गर्जणाऱ्या राणी लक्ष्मीबाईने आपले राणीपद गमावल्याला कांही काळ झाला होता. मे १८५७ नंतर इंग्रजांकडून निघून आलेल्या हिंदुस्थानी सैनिकांनी विनंती केली तरी कांही काळ राणींनी त्यांचे इंग्रजांविरुद्ध नेतृत्व करणे टाळले. परंतु जेव्हा झांशी संस्थानचा कारभार पहाणारे इंग्रज झांशीला इतर ठिकाणांहून आलेल्या हिंदुस्थानी सैनिकांना घाबरून काहीच पक्की व्यवस्था न करता झांशीतून पळून गेले, तेंव्हा लुटालूट किंवा तत्सम प्रकार टाळण्याकरता राणी लक्ष्मीबाईने झांशीचे राज्य जे पुन्हा ताब्यात घेतले. ते राखण्याकरता मात्र तिने मरेपर्यंत इंग्रजांशी लढा दिला आणि त्यामुळेच कदाचित हिंदुस्थानी सैनिकांच्या इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा तिचा जास्त गौरव होतो.

रंगूनमध्ये स्थानबद्ध असतांना बहादूरशहांवरच्या मनांत काय विचार घोळत असतील? जर त्याला नियतीने पुढ्यात आणून ठेवलेल्या ५०,०००,-६०,००० सैनिकांची ( सुसज्ज पण बेशिस्त आणि एकत्र काम करण्यास नाखूष) शक्ती योग्य पद्धतीने वापरून इंग्रजाना जरी नामशेष करता न आले तरी जबरदस्त धक्का देता आला असता तर? हिंदुस्थानी सैनिकांना इंग्रजांवर हल्ला करतांना इंग्रजांची तारायंत्रें किती दूरगामी परिणाम करु शकतील याचा जास्त चांगला अंदाज आला असता तर? बहादूरशहांबद्दलच्या हिंदुस्थानी सैनिकांच्या आदराचा उपयोग करून बख्त खानाला इंग्रजांना दिल्लीबाहेरच्या टेकाडांवरून मागे ढकलता आले असते तर? हिंदुस्थानी सैनिकांनी पुढ्यात आणून दिलेले शिवधनुष्य जर बहादूरशहाला थोडेसेही पेलता आले असते तर आज त्याची स्मृती म्हणून फक्त दिल्लीत एका रस्त्याचे नांव आणि एक टपालखात्याने काढलेले तिकीट जे शिल्लक आहे, त्यापेक्षा त्याचा अधिक जोरदार ठसा भारतभर अजूनही दिसत राहिला असता.

बहादूरशहाचा "दर्द" लाल किला या १९६० च्या चित्रपटांत महंमद रफीच्या आवाजात आणि बहादूरशहाच्याच शब्दांत छान दाखवला गेला आहे.(इथे पाहता येईल: लगता नहीं हैं दिल मेरा https://www.youtube.com/watch?v=ha3V_87LvR0 आणि ना किसीकी आँख का नूर हूं https://www.youtube.com/watch?v=u8EvjC6uRz0 ) बहादूरशहाच्या आणखी काही रचना ऐकण्याकरता https://www.youtube.com/watch?v=2xUDF39lcpMhttps://www.youtube.com/watch?v=y7lGhu96Ovg)

बहादूरशहांच्या सेनानीपणाची पोंच कितीही मर्यादित असो, त्यांचे द्रष्टेपण वाखाणण्यासारखे होते, असेच त्यांच्या पुढील वेचक ओळी वाचून वाटेल

हैं कितना बदनसीब ज़फ़र, दफ़्न के लिये (तू किती कमनशिबी आहेस रे जफर, तुझ्या कबरीसाठी )
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में (दोन गज जमीन सुद्धा, तुला तुझ्या मित्रांजवळ मिळेनाशी झाली) किंवा

बहादूरशहांना शेवटच्या काळांत मिळालेला एक टोमणा

दमदमेंमें दम नहीं, खैर मांगो जान की (तुमचे बुरुज डळमळत आहेत, आता जीवाची भीक मागा)
ऐ ज़फ़र, ठंडी हुई शमशेर हिंदुस्थान की (अरे जफर, हिंदुस्थानची तलवार थिजून गेली आहे)

या टोमण्याला बहादूरशहांनी दिलेले उत्तर
गाझियोंमें बू रहेगी जब तलक ईमान की (आमच्या शूरवीरांत जोपर्यंत थोडेतरी ईमान शिल्लक असेल)
तब तो लंदनतक चलेगी, तेग हिंदुस्थानकी (तोपर्यंत हिंदुस्थानी तलवार लंडनपर्यंत तळपेल)

शेवटचा मुघल बादशहा दिल्लीतून हद्दपार झाल्यावर १९ पिढयांचे ३०० वर्षांपेक्षा जास्त चाललेले "मुघल पर्व" पूर्णतः संपले. उर्दू आणि फारसी शेरोशायरी आणि वाङ्मयाचा हिंदुस्थानांतला सुवर्णकाळ तर संपलाच पण राज्यकारभारातून उर्दू आणि फारसीचे उच्चाटण होऊन इंग्रजीचे आगमन झाले.

(क्रमशः)

भाग १ ते भाग ५ यांमधील लिखाणाबद्दल ज्यास्तीची माहिती हवी असणाऱ्या जिज्ञासूंनी पहावीत अशी संकेत स्थळे पुढे दिली आहेत. या मालिकेतील पुढील भाग जरी विषयाशी संबंधित असतील तरी "अवांतर गंमत जंमत" म्हणायला हरकत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Ghalib
https://en.wikipedia.org/wiki/Siege_of_Delhi
https://en.wikipedia.org/wiki/Mughal_emperors
https://en.wikipedia.org/wiki/Mohammad_Ibrahim_Zauq
https://en.wikipedia.org/wiki/British_Army_during_the_Victorian_Era
https://archive.org/details/TheGreatMutinyIndia1857ChristopherHibbert/pa... (information scattered in several pages)
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.70028 (information scattered in several pages)
https://archive.org/details/mylifebeingtheau031135mbp/(information scattered in several pages)
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.80794/page/n375(information scattered in several pages)
https://archive.org/details/mylifebeingtheau031135mbp/page/n27(information scattered in several pages)
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.335902/page/n29 (information scattered in several pages)
https://www.nam.ac.uk/explore/decisive-events-indian-mutiny
https://www.thehindu.com/features/metroplus/society/in-search-of-zauq/ar...
https://www.speakingtree.in/allslides/end-of-mughal-empirebahadur-shah-z...
https://www.historynet.com/indian-mutiny-of-1857-siege-of-delhi.htm
https://www.msn.com/en-in/news/photos/57-stunning-images-from-the-sepoy-...
https://www.bbc.com/news/world-asia-418843903
http://www.catchnews.com/culture-news/what-bahadur-shah-zafar-did-on-his...
https://www.citizenthought.net/Indian_Mutiny.html
https://www.dailyo.in/arts/mughals-fall-old-delhi-bahadur-shah-zafar-rev...
https://www.thoughtco.com/the-mughal-empire-in-india-195498
https://www.dawn.com/news/1434080/beloved-delhi-exploring-how-dilli-beca...
https://www.deccanchronicle.com/lifestyle/viral-and-trending/071117/baha...
https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/5114995/The-Last-M...
https://www.gresham.ac.uk/lecture/transcript/print/the-last-mughal/
http://www.bl.uk/onlinegallery/sacredtexts/podwilliamdalrymple.html
http://www.newworldencyclopedia.org/entry/Bahadur_Shah_II
https://www.thefamouspeople.com/profiles/bahadur-shah-zafar-5489.php
https://www.thebetterindia.com/101982/mughal-emperors-cherished-subjects
The Last Mughal : The Fall of a Dynasty (by William Dalrymple)
https://www.dailymail.co.uk/news/article-2424410/The-Mughal-emperor-ance...
https://books.google.com/books?id=mD2-fatW9DAC&printsec=frontcover&dq=is...
https://nation.com.pk/02-Oct-2012/dastan-e-ghadar
https://books.google.com/books?id=h8RMuo3a79kC&pg=PR3&source=kp_read_but...

मांडणीविचार

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

13 Apr 2019 - 9:53 am | महासंग्राम

भारी लिहिलंय

कुमार१'s picture

13 Apr 2019 - 9:59 am | कुमार१

छान रंगत आहे !

यशोधरा's picture

13 Apr 2019 - 3:51 pm | यशोधरा

सुरेख लिहीत आहात. वाचताना दुःख, त्रास, चीड, हतबलता असे बरेच काही वाटून जाते. करुण आहे हे सारे.

अनिंद्य's picture

15 Apr 2019 - 7:36 am | अनिंद्य

संदर्भ यादी दिलित हे बेस्ट झाले - आता निवांत वाचता येईल.

पु भा प्र

हिंदुस्थानी सैनिकांनी पुढ्यात आणून दिलेले शिवधनुष्य जर बहादूरशहाला थोडेसेही पेलता आले असते तर

त्याला त्याच्या लायकीच्या प्रमाणापेक्षा किती तरी पटीने अधीकच मिळाले होते. कोणतेही कर्तृत्व दाखवले नसताना , आयुष्यभर केवळ पतंग उडवणे , आणि इतरांकडून स्वतःच्या नावावर कविता लिहून घेणे हेच काय ते त्याने केले होते.
एक काव्यगत न्याय मात्र झाला. ज्या सुंदर वास्तुचे वर्णन मुघल साम्राज्यातील पहिले भव्य स्मारक असे केले जाते त्याच वास्तूत मुघल साम्राज्याचा अंत झाला. अर्थत
औरंगजबाच्या वेळेस ज्या वेळेस अफगाणीस्तान पासून ते ब्रम्हदेश पर्यंत पसरलेले ते साम्राज्य अंत झाला त्या वेळेस त्याच्या सीमा लाल किल्ला च्या भिंती पुरत्या उरल्या होत्या.

शेखरमोघे's picture

15 Apr 2019 - 7:49 pm | शेखरमोघे

हिंदुस्थानी सैनिकांनी हे शिवधनुष्य पुढ्यात आणून ठेवण्याकरता इतर कोणी राम शोधण्याऐवजी हा सम्पत आलेला रहीम का शोधला असावा? काहीतरी कारण असायला हवे , पण ते अजून मला तरी मिळालेले नाही.

पुणेकर भामटा's picture

15 Apr 2019 - 10:45 pm | पुणेकर भामटा

लेखमाला आवडली.

चित्रगुप्त's picture

16 Apr 2019 - 5:44 am | चित्रगुप्त

सर्व भाग अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत.
आता पुढील अवांतर गमतीचे भागाबद्दल उत्सुकता लागली आहे.
बहादुरशहाने इंग्रजांच्या संगीताबद्दल केलेल्या प्रशंसेवरून वाटले की त्याने इंग्रजांचे कोणकोणत्या प्रकारचे संगीत ऐकले असावे ? मिलिटरी बँड, ऑपेरा, सिंफनी ऑर्केस्ट्रा, चर्च मधील मास की आणखी काही? तसे काही उल्लेख आहेत का ? नसले तरी काय शक्यता आहे ? त्याकाळच्या भारतातील पाश्चात्य संगीताबद्दल कुठे वाचायला मिळेल ? (मी गूगलवर प्रयत्न केला, फारसे काही मिळाले नाही)

बहादुरशहाच्या अटकेबद्दल खालील चित्रे सापडली:
.

.

शेखरमोघे's picture

16 Apr 2019 - 8:20 pm | शेखरमोघे

इन्ग्रजान्च्या सन्गिताची प्रशन्सा गालिबने केलेली होती - त्यात देखील त्यान्चे सन्गीत कसे वेगळ्याच तर्‍हेने वाजायचे त्याबद्दल ("मिझराब"चा वापर न करता). मला वाटते की गालिब बहुढन्गी असल्याने त्याने "जिन्दगी" चे जे अनेक पैलू पाहिले असतील त्यातलेच हे ही असावे.

त्या काळात अजूनही बहादूरशहा ज्या स्थानावर होता तेथून त्याला "कुठे चर्च मध्ये गेला किन्वा बारमध्ये डोकावला हे करणे शक्य नव्हते ( protocol मुळे) आणि त्याच्याकडे येणार्‍या पाश्चात्याना तो बहुतेक फक्त formally भेटत असल्याने खुद्द त्याने पाश्चात्य सन्गीत फारसे ऐकलेले नसावे, हा माझा अन्दाज आहे.

त्या वेळच्या पद्धतीन्प्रमाणे गोर्‍या लोकान्च्या मेळाव्यात फारशा "देशी" लोकाना मिसळता येणे अवघड असल्याने ज्या कुणाला थोडीबहुत पाश्चात्य सन्गिताची माहिती असावी ती काहीतरी "कानावर पडणे" इतपतच असावी. हा ही एक तर्क.

याला अपवाद हा लष्करी सन्गीताचा. इन्ग्रजान्च्या सैन्यातील हिन्दुस्थानी सैनिक त्यान्च्या कवायती तसेच हालचाली ("हल्ला करा", "मागे परता", "बन्दुका रोखून तयार", "असाल तेथे थाम्बा") इन्ग्रजी वाद्ये आणि सन्गीत वापरून करत असल्याने, हिन्दुस्थानी लोकाना त्याची माहिती बरीच असावी.

माझ्या लिहिण्यात मुद्दाम टाकण्यासारखे न वाटल्याने वगळले गेले पण इन्ग्रजान्च्या सैन्यातून फुटून दिल्लीत पोचलेले हिन्दुस्थानी सैनिकदेखील त्यान्च्या हालचाली इन्ग्रजी वाद्ये आणि सन्गीत वापरूनच करत असल्याने (ज्यावर त्यान्चे शिक्षण झाले होते) काही वेळा गोन्धळ होत असे (नक्की कुठली बाजू कुणाला काय सान्गत आहे याबद्दल) किन्वा एकमेकान्च्या हालचाली/उद्देश सहज विरुद्ध बाजूला कळत.

@ मोघे साहेब,

मिर्झा गालिबच्या संदर्भाने आलेल्या घटना रोचक आहेत, मी आधी कधी वाचल्या नव्हत्या.

बहादूरशहा ज्या स्थानावर होता तेथून त्याला कुठे चर्च मध्ये जाणे शक्य नव्हते..........

तसे नसावे. अकबर आणि त्यानंतरच्या जवळपास सर्वच मुघल शासकांनी चर्चला आश्रय, देणग्या आणि प्रत्यक्ष भेटीगाठी दिल्याचे लेखी संदर्भ आहेत. नाताळ उत्सवात तर मोगलांचा जनाना सुद्धा आग्र्याच्या चर्चमध्ये येशुजन्माचे देखावे आणि नाटिव्हिटीची नाटके प्रत्यक्ष बघायला जात असे ! राजधानी दिल्लीत आल्यानंतर ही प्रथा सुरुच राहिली असण्याची दाट शक्यता आहे.

तुम्ही पुढे गमती-जमतीचे भाग कधी लिहिणार आहात त्याची प्रतीक्षा आहे.