मैत्र - ११

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
9 Apr 2019 - 7:09 am

आम्ही माथ्यावर उभे होतो. मी मागे पसरलेल्या गवताकडे पाहीले. ते छान हवेवर डोलत होते. पण आता दुरवरुन यावेत तसे हळू हळू बंदुकींच्या फैरी झडाव्या तसा कडकड आवाज यायला सुरवात झाली. डोलणाऱ्या गवताच्या वर हवा एकदम मृगजळासारखी हलताना दिसायला लागली. अचानक अतिशय गरम हवेचा एक झोत अंगावरुन गेला. डोळ्यांची आग झाली. घसा एकदम कोरडा पडल्यासारखा झाला. धुर दिसत नसला तरी त्याचा वास सगळ्या वातावरणात भरुन राहीला होता. धोंडबाने एका झटक्यात माझा हात ओढला. चांगलाच हिसडा बसुन मी त्याच्या मागे ओढला गेलो. पण आम्ही जाणार कुठे? दोन्ही बाजूला उंच वाळलेले गवत होते. मागच्या बाजूला हरणाच्या वेगाने धावणारा वणवा होता आणि समोर काय होते ते आम्हाला माहीत नव्हते. कदाचीत उतार असेल किंवा खोल दरीही असेल. पण आम्हाला तिकडे पळण्यावाचून दुसरी वाट नव्हती. माझ्या डोळ्यापुढून आई-बाबा, इन्नी यांचे चेहरे तरळून गेले.
आम्ही काहीच मिनिटात समोरच्या कड्यावर पोहचलो. मी फार आशेने खाली पाहीले. वाटले होते उतार असेल. पण तो उतार फक्त दहा एक फुटच दिसत होता. त्यापलीकडे दरी पसरली होती. गडावर बहुतेक बाजुंना किंचीत उतार व लगेच तासल्यासारखे सरळ कडे अशी रचना आहे. उताराच्या पलीकडे एका झाडाचे काही शेंडे बाहेर आलेले दिसत होते. समोरच्या कातळाच्या उताराचा अंदाज येत नव्हता कारण त्यावरुन पावसाचे पाणी वाहुन पांढरे शुभ्र पट्टे उमटले होते. झेब्रा क्रॉसींगसारखा दिसणारा तो उतार नजरभुल करत होता. दहा बारा फुटांचा दिसणारा उतार तेवढ्याच लांबीचा असेल हे खात्रीने सांगता येत नव्हते. आमच्या मागची जमीन जरी जळालेली असली तरी दोन्ही बाजुंना असलेले गवत आम्ही उभे होतो तेथवर येऊन भिडले होते. त्यामुळे समोर दिसणाऱ्या वणव्याला आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी जळालेल्या जमीनीला वळसा मारावा लागणार होता. अर्थात त्यामुळेच आम्हाला विचार करायला दहा पंधरा मिनिटे जास्त मिळणार होती. हवेचे तापमान खुप वाढले होते. गरम झालेली हवा झपाट्याने वर आकाशाकडे ओढली जात होती व त्या जागी दुरवरची थंड हवा खेचली जात होती. हवेच्या या खेळामुळे ठिणग्यांचा एक तेजस्वी आणि प्रंचड आकार अत्यंत मनमोहक हालचाली करत दुर वरच्या बाजूला सरकत होता. त्याची जागा दुसऱ्या ठिणग्या घेत होत्या. वाळलेल्या गवताचा जळताना होणारा ताड तड, तडाड तड आवाज कर्कश्श वाटत होता. लढाईच्या ऐन धुमाळीत रणवाद्यांवर बेभान टिपरी पडावी तसा भास होत होता. एखाद्या पिवळ्याधम्मक नागाने ओंजळीपेक्षा मोठा फणा काढावा आणि त्या मृत्यूच्या फण्यावरच समोरच्या भक्ष्याने मोहुन जावे तसे मी त्या वणव्याच्या तांडवाकडे मंत्रमुग्ध होऊन पहात होतो. त्या अग्नीशिखांनी माझी सारासार विचार करायची बुध्दी अगदी क्षिण झाली होती. ठोब्बा आणि राम यांचीही अवस्था भितीमुळे काहीशी माझ्यासारखीच झाली होती. शाम, दत्त्या आणि धोंडबा यांचेच मेंदू अत्यंत जलद गतीने विचार करत होते. शकील आम्हा सगळ्यांवर नजर ठेऊन होता.
दत्त्या माझ्याकडे पहात म्हणाला “हैला अप्पा ती भेकर जव्हा भेदरुन पळाली तव्हाच माझ्या ध्यानी यायला पायजे व्हतं. पन कुनाच्या देवाला ठावं हे असं व्हनार हाय ते”
मी नुसताच हुंकार दिला.
माझा थंड प्रतिसाद पाहून दत्त्या जरा गडबडला. त्याने माझ्याकडे वळून पाहिले आणि माझी अवस्था चटकन त्याच्या ध्यानी आली. त्याने गडबडीने माझे वणव्याकडे असलेले तोंड फिरवून दरीकडे केले आणि म्हणाला “आगीनचळ लागला का काय तुला अप्पा? पघू नको आगीकडं नाय तर पार भानावर राह्यचा नाय तु. रानातली आग भानामती करतीय मानसावर. पाखरं बी कव्हा कव्हा घालून घेत्यात त्या जाळात”
आणि खरच, वणव्याकडे पाठ केल्यावर मी एकदम भानावर आल्यासारखा झालो. चेहऱ्याची कातडी काचेसारखी तडकते की काय असे वाटत होते. घशाला भयानक कोरड पडली होती. मी दत्त्याकडे पाणी मागीतले. धोंडबाने चटकन दत्ताकडील पाण्याची बॅग घेतली. तिचे झाकण उघडून तिचे लहानसे तोंड माझ्या तोंडाला लावत म्हणाला “दोनच घोट घे अप्पा”
मी दोन घोट घेतले नाही तोच त्याने पिशवी मागे ओढली आणि माझ्या डोक्यावर थोडे पाणी ओतले. मग प्रत्येकाला दोन दोन घोट बळेच पाजले आणि सगळ्यांची डोकी ओली केली. त्याच्या छोट्याशा कृतीने वणव्याचा त्रास एकदम कमी झाल्यासारखा वाटला. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो म्हणाला “लय खुश नको व्हवू अप्पा. हे घडीभरबी टिकायचं नाय. रस्ता पघायला हवा बाहेर पडायचा. नायतर इथंच मक्याच्या कनसागत भाजुन निघू सम्दी. आगीनडाग द्यायचीबी गरज ऱ्हानार नाय”
ते ऐकून दत्त्या वैतागला “उभारी द्यायची ऱ्हायली बाजूला, तु भ्या कह्याला दावीतो रं. वाटंचं पघा लवकर कायतरी”
शकील दरीकडे पहात म्हणाला “देख धोंडबा, वो सामने पत्तीया दिख रही है. बडा पेड असणार नक्की. आता तो कड्यावर असेल तर कुछ नही हो सकता. पण जर कपारीवर असेल तर आपल्याला जागा मिळेल तेथे. मग खाली उतरायची वाट शोधू. नाहीच सापडली तर वहीपे रात गुजार सकते है. कमसे कम आग से तो बचेंगे”
मला जरा आशा दिसायला लागली. मी विचारले “पण शकील झाड कड्यात असले तर काय करणार? येथून कसे कळणार कपार आहे का नाही ते? काही दिसत नाहीए”
धोंडबाचे डोळे चमकले. “हायला शकील, मपल्या टाळक्यातच आलं नाय ते झाड. द्येव पावला” असे म्हणत त्याने पाठीवरची ब्लँकेटची वळकटी काढून सोडली. कड्याच्या कडेने चालत तो डाव्या बाजुला सरकला आणि खालच्या फांद्यांचा अंदाज घेत बरोबर त्या न दिसणाऱ्या झाडाच्या समोर आला. मागचा वणवा मधे चांगलाच भडकला होता पण अगोदर जळालेल्या निष्पर्ण जमीनीने त्याची गती तेथेच रोखली गेली होती. आता त्याच्या दोन्ही बाजू जळालेल्या जमीनीच्या कडेने वेगाने पुढे सरकत होत्या. महाराजांना पहाताच अफजुल्याने जसे बाहू पसरले असतील तसे वणव्याचे डावे उजवे हात आमच्या दिशेने पसरत होते. फारतर दहा मिनिटात वणव्याचे ते हात एकत्र येऊन आम्हाला कवेत घेणार होते. आता विचार करायलाही वेळ नव्हता. सगळा भार आता रामरायावर होता.
दत्त्या मागे वळून वणव्याकडे पहात थुंकत म्हणाला “थु तुह्यायला. आरं परवा तर गुळ खॉब्रं आन पुरानपोळी खाऊ घातली की तुला. आन असा वैऱ्यासारखा डाव साधीतो काय तू. आम्हाला उलसाक खेट तर खरं मंग सांगतो तुला”
धोंडबा ओरडला “ए शान्या, कांबळं धर. मी उतरतो खाली”
या सगळ्या गडबडीत आमचे फार तर तिन चारच मिनिट गेले असतील. पण तेवढ्या वेळात ठोब्बाच्या भितीने कळस गाठला आणि शेवटी अती भितीमुळे तो एकदम भितीला कोडगा झाला. दत्त्याला नेहमी हलक्या आवाजात दत्तू म्हणून हाक मारणारा ठोब्बा सणक आल्यासारखा ओरडला “ए दत्त्या, बावळटा लक्ष कुठे आहे तुझे? तो धोंडबा काय म्हणतोय ते पहा अगोदर मग थुंक त्या जाळावर काय थुंकायचेय ते”
ठोब्बाचा तो अवतार पाहुन दत्त्या क्षणभर आवाक झाला मग त्याच्या पाठीत हलकासा दणका घालत म्हणाला “आंग आश्शी. असं पाह्यजे मानसानं मर्दावानी. कुठय धोंड्या?”
धोंडबाने ब्लँकटची वळकटी उघडून समोरच्या उतारावरुन खाली सोडली होती. एव्हाना आम्ही सगळे पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या गावातील लोक जसे पाणी चढेल तसे हळू हळू उंच भागाकडे सरकुन एकत्र यायला लागतात तसे वणव्याच्या झळांनी एकत्र येत एका जागी गोळा झालो होतो. धोंडबा मात्र धोका पत्करुन कातळाच्या उतारावर बराच पुढे सरकला होता.
धोंडबा म्हणाला “सम्दी मिळून कांबळं धरा. मी त्याला धरुन खाली खाली सरकत जातो जमन तितकं आन मंग खाली उडी मारतो”
मी घाबरुन म्हणालो “अरे पण धोंडबा खाली कपार नसेल तर काय करणारेस? सरळ खाली दरीत जाशील. दिसायचा नाहीस पुन्हा आम्हाला तू”
“हे पाह्य अप्पा, आता पार वखुत नाय याचा इचार करायला. मी जातो. म्हादेवाचा डोंगर हाय. कव्हा दगाफटका व्हनार नाय. तुम्ही धरा कांबळं आन म्हणा हर हर म्हादेव”
दत्त्या घाईने म्हणाला “दम धोंडबा. तु वर ये पह्यला. मी जातो. आयला तुझं वजान झेपायचं नाय आम्हाला आन सम्द्यांसोबत तुच पाह्यजे इथं. मी उतरतो”
धोंडबाला आणि आम्हा सगळ्यांनाच हे पटले. दत्त्या धोंडबापेक्षा चपळ होता. त्याने लिलया कपार गाठली असती. (पण जर खाली कपार असेल तर.) आम्ही धोंडबाला वर यायला सांगीतले. तोवर दत्ताने पाठीवरची बॅग शाम्याकडे दिली. सोपानाच्या पिशवीतले उपरणे काढून त्याने दोन्ही कान घट्ट झाकत डोक्याला गुंडाळले. सोपानाने त्याच्या कमरेची आकडी काढून ती दत्त्याच्या कमरेला बांधली. कोयती बरोबर उजव्या बाजुला थोडी मागे लटकेल याची काळजी घेतली होती त्याने.
सोपाना म्हणाला “दत्तू जरा जपुन. पातं अंगाखाली येनार नाय हे पघ निट. परवाच धार काढलीय. तेज हाय पातं.”
“व्हय. तु नको काळजी करु. माऊली हाय संगं आपल्या” म्हणत दत्त्याने सोपानाच्या पाठीवर थोपटले मग माझ्याकडे वळत त्याने मला चक्क मिठी मारली. “अप्पा, माऊलीनी कव्हा आपलं वाईट क्येलं नाय पन येळ कव्हा सांगुन येती का! जर माझं काय बरंवाईट झालं तर माझ्या म्हतारीकडं पघा सगळे. रान पघायला दादा हायच”
मला एकदम पोटात कालवल्यासारखे झाले. मी घाबरलो नक्कीच होतो. सगळेच घाबरले होते. पण दत्त्याच्या या वाक्याने सगळ्या प्रसंगाला एक वेगळेच वळन लागले. मी त्याच्या भोवती दोन्ही हात गुंफत म्हणालो “काही होणार नाही रे दत्ता. तु उगाच घाबरु नकोस. की मी उतरु अगोदर?”
मीठी सोडत दत्त्या म्हणाला “तु कह्याला? मी घाबारलो नाय रं. पुन्हांदा तुमी दिसता, नाय दिसता”
धोंड्याने त्याला मागे ओढत म्हटले “आयला काय रडारड लावली रं दत्ता? तु काय मरत नाय. आन म्येला तर तुझ्या दसपींडाला शाक-बुंदी करु आम्ही समदी. तु व्हय पुढं. वनवा भिडन पघता पघता”
“हायला या धोंड्याच्या. काय पाचपोच हाय का नाय? दोस्त मरनाच्या दारात चाल्लाय आन हा दसपींड घालायच्या गप्पा हानतोय. जगलो वाचलो तर सांगतो तुला मी काय हाय ते” म्हणत दत्त्या ब्लँकेटवर पालथा झोपला आणि उतारावरुन हळू हळू मागे सरकायला लागला. गरज नसतानाही आम्ही सगळ्यांनी ब्लँकेट अगदी घट्ट पकडून धरले होते.
मी धोंडबाला म्हणालो “अरे त्याला धिर द्यायचा सोडून असं काय बोललास रे? कसं वाटलं कानांना ते ऐकतानासुध्दा”
“आरं अप्पा, अशा टायमाला मुळूमुळू काम नाय चालत. आता पेटलाय कसा पघ दत्ता. वनवा झक मारल त्याच्याम्होरं. नायतर ‘माझं रान, माझी म्हतारी’ करत रडत गागत ग्येलं असतं ते येडं”
सोपाना म्हणाला “अजबच ग्यान हाय या धोंडबाचं. द्येव करो दत्तूला ठाव मिळूंदे. यवढं मोठं झाड कव्हा कड्यावर उगवत नाय. ठाव असनारच खाली. पर किती खोलावर हाय ते काय कळंना इथुन”
राम, शाम, ठोब्बा सगळेच चवड्यावर बसुन खंडोबाच्या तळीला हात लावावे तसे ब्लँकेट धरल्यासारखे करत होते. सगळ्यांचे डोळे फक्त दत्त्यावर खिळले होते. गवत पुर्ण जळाल्याने मागच्या झळा आता कमी झाल्या होत्या. पण लवकरच अगोदर होती त्यापेक्षा मोठी आग आम्हाला दोन्ही बाजुने वेढणार होती. आम्ही सगळे गवत आणि कातळ यांच्या सिमेवरच होतो. आजुबाजूचे दाट गवत पहाता आगीच्या जिभा अगदी कातळाच्या पलीकडच्या टोकाला सहज पोहचू शकल्या असत्या. जर दत्त्याला खाली ठाव मिळाला तर आणि तरच आम्ही वाचणार होतो. दत्ता आता ब्लँकेटच्या टोकाला पोहचला होता पण कातळाचा उतार अजुनही सहा सात फुट बाकीच होता. आता त्याला ब्लँकेटचा आधार सोडावा लागणार होता. दत्त्याने तेथेच काही सेकंद खोल श्वास घेतला आणि कातळाला अगदी घोरपडीसारखा चिकटला. अंगाचा शक्य तेवढा भाग त्याने कातळाला भिडवला आणि हातातले ब्लँकेट सोडले. त्याने मान आडवी करुन कातळावर गाल घट्ट टेकवल्याने त्याला आम्ही दिसत नव्हतो. पण वरुन आम्हाला त्याच्या हालचाली दिसत होत्या. गोंधळ नको म्हणुन सगळे गप्प झाले. फक्त धोंडबा त्याला सुचना देत होता. “आंगं हाश्शी, भले” म्हणत त्याचा धिर वाढवत होता. दोन्ही बाजुने वणवा झपाट्याने आमच्याकडे सरकत होता पण धोंडबाच्या आवाजात अजिबात घाई नव्हती. तो दत्त्यालाही घाई करत नव्हता.
“दत्तूबा, घाई करु नगस. कातळ सोडू नगस. हातभर राह्यलाय ढाळ. दमानं सरक मागं” धोंडबा सांगत होता तसे दत्ता करत होता. स्वतःचे डोके वापरणे त्याने बंद केले होते. प्रत्यक्ष अॅक्शनमध्ये असलेल्याने आपले डोके न वापरता नेव्हीगेटरचे म्हणने तंतोतंत पाळायचे असते हे ज्ञान या मळ्यातळ्यात राहणाऱ्या पोरांना कुठून येते याचे मला आजही आश्चर्य वाटते. दत्त्याची पायाची बोटे अचानक अधांतरी झाल्यावर त्याला अंदाज आला की आता येथून पुढे आपली खरी कसोटी आहे. तरीही त्याने मान वर करुन आमच्याकडे पाहीले नाहीच. आता तो अत्यंत सावकाश मागे सरकत होता.
धोंडबा वरुन मोठ्याने ओरडला “दत्तूबा, उजव्या पायाची आटनी लाव कड्याला आन डावीकं वळ उलसाक. जरा दमानं घे पन. घाई नाय पाह्यजे”
दत्त्याने त्या प्रमाणे केले. एका पायाने त्याने कड्याच्या कोरेला घट्ट दाबले आणि तिरका होत होत तो कड्याच्या टोकावर आडवा झाला. मग त्याने बोटे घट्ट रोवली आणि प्रथम डावा पाय खाली सोडला. जरा श्वास घेतला आणि मग हळू हळू उजवा पाय खाली सोडून तो पुन्हा सरळ झाला. आता दत्त्याची छाती आणि पोट कातळावर होते आणि कंबरेखालील भाग दरीत लोंबकळत होता. त्याचा शर्ट गोळा होऊन अगदी छातीपर्यंत आला होता. त्याचे पोट नक्की चांगलेच सोलवटले असणार होते.
राम मला म्हणाला “अप्पा, आपल्यालाही असच जावे लागेल ना? तोवर वणवा भिडेल आपल्याला. कसे करायचे?”
मी रामच्या खाद्यावर थोपटले आणि म्हणालो “अरे दत्ता जाईल आता. त्याला ठाव मिळाला की धोंडबा जाईल. दोघे खाली असले की आपल्याला इतकी काळजी घ्यावी लागणार नाही. देवाचे नाव घ्यायचे आणि अंग सोडुन द्यायचे उतारावर. वर देव आणि खाली आपले दत्ता धोंडी आहेत आपल्याला वाचवायला. घाबरु नकोस. रात्री मामांच्या खळ्यात वाफवड्याची आमटी खाऊ आज सगळे मिळून. आहे काय त्यात एवढे घाबरण्यासारखे” मी रामला धिर देत होतो पण माझेच चित्त थाऱ्यावर नव्हते. राहुन राहुन बाबा, इन्नी यांची आठवण येत होती. राम कसाबसा हसला. पण त्याचा चेहरा पाहुन मला अंदाज आला की त्याला बराच धिर आला होता. मित्र सोबत असल्यावर काळजी कशाला करायची? असेच त्याचे डोळे सांगत होते. दत्त्या सिंगल बारवर व्यायाम करावा तसा दोन्ही हातावर सरळ झाला आणि त्याने सगळे शरीर दोन्ही हातांवर तोलत अत्यंत सावकाश दरीत सोडले. आता आम्हाला फक्त त्याच्या हाताची बोटे आणि डोके दिसत होते. तो सरळ आमच्याकडेच पहात होता.
धोंडबाने मोठ्याने ओरडून विचारले “दत्ता काय लागतय का पायाला खाली? वळून पघू नगस”
दत्त्याची हनुवटी कातळावर टेकली होती त्यामुळे त्याला बोलता येत नव्हते. त्याने कशीबशी मान हलवून “नाही” म्हणून सांगीतले. धोंडबाच्या चेहऱ्यावरची काळजी वाढली. तो म्हणाला “दत्तूबा, तुह्या खालीच झाडोरा हाय तव्हा भिती नाय कसली. अदुगर तसाच खाली व्हय पन हात सोडू नगस. पायाला ठाव लागला तर द्येव पावला, नायतर हलक्या अंगानं झाडोऱ्यावर झोकून दे सवताला. आम्ही हाय समदी. ध्यान धरुन मार उडी”
‘आम्ही हाय समदी’ असं जरी धोंडबा म्हणाला तरी दत्ताने उडी मारली आणि खाली ठाव नसला तर आम्ही काय करणार होतो येथुन? हा तो क्षण होता की दत्त्याचे हे दर्शन आमच्यासाठी कदाचीत शेवटचे दर्शन असणार होते. हा जींदगीचा जुगार होता. ही उडी मृत्यूची उडीही ठरु शकणार होती. दत्त्याच्या काळजीने ठोब्बा नकळत उतारावर बराच पुढे सरकला होता. सोपानाने मागुन त्याच्या पँटचा पट्टा घट्ट धरुन ठेवला होता. राम डाव्या कुशीवर झोपुन पुढे सरकला होता आणि त्याचा डावा हात शामच्या हातात घट्ट धरलेला होता. मी आणि शकील दोघेही गुडघ्यावर बसुन दत्ताला धिर देत होतो तर सगळे धोके विसरुन धोंडबा कातळावर सगळ्यात पुढे उभा होता. त्याची दत्तावरची नजर क्षणभरही ढळत नव्हती. दत्त्याने आम्हा सगळ्यांवरुन आळीपाळीने नजर फिरवली आणि हनुवटी मागे घेत त्याने शरीर हळूहळू खाली सोडले. त्याचे डोके मावळत्या सुर्यासारखे हळू हळू कड्याच्या आड दिसेनासे झाले. त्याच्या दोन्ही हाताची बोटे कातळावर दिसत होती. काही क्षण मध्ये गेले. आमचे डोळे दत्त्याच्या बोटांवर रोखलेले होते. त्याने बहुतेक दोन्ही अंगठे वर केले असावेत. निदान मला तरी तसे वाटले.
कड्याच्या पलिकडून दत्त्याचा आवाज आला “ठाव हाय रं खालच्या अंगाला. परस दिड परस आसन फक्त. चाल्लो रे”
खाली ठाव आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे, आमच्या आयुष्याची वाट आहे हे समजण्याच्या अवस्थेत कुणीच नव्हते.
“आलो हो माऊली, संबाळा आता” अशी दत्त्याची आरोळी आली आणि कड्यावरची दत्त्याची बोटे नाहीशी झाली. आमचे सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. मी मनातल्या मनात “माता रामो, मत्पिता रामचन्द्रः। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।” म्हणायला सुरवात केली. माझ्याबरोबर शामनेही म्हणायला सुरवात केली. माझ्या मनातली रामरक्षा याला कशी समजली याचे मला आश्चर्य वाटले पण मग माझ्या लक्षात आले की अतीकाळजी पोटी आणि भितीने मी मोठ्याने स्तोत्र म्हणत होतो. माझे ‘माता रामो’ देखील पुर्ण झाले नाही तोच कड्यापलीकडून दत्त्याची किंकाळी आली “आयंव” ते ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. शकीलने माझा खांदा घट्ट दाबला.
पुढे उभा असलेला धोंडबा जोरात ओरडत म्हणाला “काय नाय वला दत्ता. उगा उलसक लागलं तं बोंबलतो कह्याला? हाय का ठाव खाली. समदी मावतीला का तिथं?"
मला खात्री होती की धोंडबाचे काळीजही लक्ककन हालले असणार पण तो खंबीर रहायचा प्रयत्न करत होता. खाली नक्की काय झालय हे कुणालाच माहित नव्हते तरी ‘चांगलेच झाले असणार’ असं गृहीत धरुन तो दत्त्याला तशाही परिस्थितीत धिर देत होता. दत्ताचे ब्लँकेटला धरुन खाली उरतण्यापासुन ते आता या किंकाळीपर्यंत फार तर पाच मिनिटे झाली असतील पण हा प्रसंग अगदी दिवसभर चालल्यासारखा वाटला होता मला. आताही त्याची किंकाळी ऐकूण काही सेकंदच झाले होते पण मला काळ थांबल्यासारखा वाटत होता. आम्ही होतो तेथील हवा आतापर्यंत शांत होती पण अचानक वावटळ उठावी तसा वारा हलायला लागला. म्हणजे वणवा आता आम्हाला अगदी भिडायच्या बेतात होता. वाराही वेड लागल्यासारखा सारखी दिशा बदलत कसाही वहात होता. ताक घुसळल्यासारखा घुसळला जात होता. आमच्या अंगावर डाव्या बाजुने थपडा मारणारी हवा अचानक पुर्णपणे थांबली. त्यामुळे कानात एकदम दडा बसल्यासारखे झाले आणि काही समजायच्या आत उजव्या बाजुने आमच्या अंगावर ठिणग्यांचा पाऊस पडला. ठिणग्यांनी आम्हाला भाजले वगैरे नाही पण अगदी लखलखत्या उन्हातही त्या भगव्या चमकदार रेषांचा पडदा पाहून माझ्या छातीत धडकी भरली. तो ठिणग्यांचा पाऊस जितक्या अचानकपणे आमच्यावर आदळला तितक्याच झपाट्याने तो कड्याकडे सरकत दिसेनासा झाला आणि गवताच्या जळालेल्या लहान लहान काळ्या कणांचा झोत आमच्या अंगावरुन गेला. निसर्गाचे हे कधीच न पाहिलेले रौद्र रुप पाहुन सगळेच हबकलो. प्रत्येकाचा चेहरा, कपडे उजव्या बाजुने काळवंडले.
खालुन दत्त्याची आरोळी आली “धोंडबा अदुगर कांबळी फेक समदी मंग पिशव्या फेक समद्यांच्या. आन तु ये पह्यला. इथं मांयदांळ जागा हाय. कातळ सोडू नगस पर”
आता खाली काय आहे ते फक्त दत्त्याला माहीत होते. त्यामुळे धोंडबाने क्षणभरही विचार न करता किंवा त्याला काहीही प्रश्न न विचारता ब्लँकेटच्या वळकट्या खाली फेकल्या. आता तो दत्ता सांगेल तसे वागणार होता. त्याने मागोमाग हाताशी येतील त्या पिशव्या फेकल्या. वाघुर काढून त्यात पाण्याची बॅग अडकवून ती पाठीवर बांधली आणि तो पोटावर घसरत पहाता पहाता कातळावरुन कड्याच्या आड दिसेनासा झाला. धोंडबा कड्याच्या आड नाहीसा होताच मला एकदम निराधार झाल्यासारखे वाटले. शकीलला हे जाणवले असावे.
माझ्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला “फिकीर करु नकोस अप्पा. बस कुछ देर की बात है. हम सब निकलेंगे यहाँसे”
खालून धोंडबाचा आवाज आला “एक एक या चटशीरी. कड्याचं पोट पोखरल्यालं हाय. खरचटायचं बी नाय कुनाला. कातळ मातर सोडू नका टिचभरसुदीक. इठूबाला पाठव रे अदुगर शकीलभाऊ. आमी झोळना धरलाय खाली कांबळ्याचा”
या जीवावरच्या प्रसंगात देखील धोंडबाचे डोके हुशारीने काम करत होते. खाली मित्र, वर मित्र असले तरच ठोब्बा मधला प्रवास करु शकणार होता हे त्याने ओळखले होते. मी ठोब्बाला पुढे काढले.
पण तो अजीजी करु लागला “अप्पा शाम आणि मी जातो बरोबर”
मी त्याला बळेच तयार केले “अरे दोघे दोघे गेलात तर ते कुणाला झेलतील झोळीत? गोंधळ नाही व्हायचा का त्यांचा? तु असं कर, शामला जावूदे अगोदर मग तु जा”
तोवर शाम्याने त्याच्या पाठीवरची पिशवी काढून त्यातली चादर काढली. माझ्याकडचा हंटींग नाईफ घेऊन त्याने चादरीच्या पट्ट्या केल्या आणि प्रत्येकाकडे दोन तिन दिल्या. स्वतःही दोन पट्या घेवून त्याने गुडघे गुंडाळले आणि ओरडला “धोंडबा मी येतोय रे” ठोब्बाकडे पाहुन तो म्हणाला “आवाज दिल्यावर लवकर ये ठोब्बा, मी जातो अगोदर. काही होत नाही. घसरगुंडी तर खेळायची आहे. घाबरु नकोस अजीबात”
शाम्याने कड्याकडे पाय केले आणि पोटावर झोपत तो वेगाने मागे मागे सरकत गेला. टोकावर पोहचल्यावर त्याने परत एकदा धोंडबाला आवाज दिला आणि स्वतःला सरळ खाली झोकून दिले. तो गेल्यावर सोपानाने ठोब्बाच्या पायाला पट्या गुंडाळल्या आणि त्याला कातळावर पालथे सोडले.
खालून शाम्या ओरडला “अरे मज्जा येतेय ठोब्बा. सावकाश ये फक्त. घाबरु नकोस बिलकुल”
ठोब्बाने सगळा धिर एकवटला आणि तो घसरत घसरत मागे सरकला आणि कड्यावर पोहचला. शकीलने ओरडुन ठोब्बा आल्याचे शामला सांगीतले. ठोब्बानेही एकदाची उडी मारली. मग राम गेला. मी सोपानाला खुप सांगुनही त्याने मलाच पाठवले. मागोमाग शकीलही आला. सगळ्यात शेवटी सोपाना आला. खाली पोहचल्यावर मात्र लक्षात आले की दत्ता नशिबाने वाचला होता आणि आमचे प्रत्येकाचे लँडींग सुध्दा फारच धोकादायक होते. पण जो खाली जात होता तो वरच्यांना धोक्याची कल्पना देत नव्हता. तेथे ठाव होता पण आडवा तिस पस्तीस फुट लांब आणि जेमतेम पाच फुट रुंद होता. म्हणजे आमची उडी इंचभरही बाहेर पडली असती तर सरळ दरीतच जाणार होती. दत्त्याने आणि धोंडबाने अगदी टोकाला उभे राहून ब्लँकेट ताणून धरले होते. त्यामुळे अगदी अलगद नाही झेलता आले तरी शाम्याला त्यांनी आपटण्यापासुन रोखले होते. खाली पोहचलेला प्रत्येकजन येणाऱ्यासाठी ब्लँकेट ताणुन धरायला मदत करत होता. त्यामुळे शकील आणि सोपानाला तर आम्ही अगदी वरच्या वर झेलले होते. शिवाय आमचे नशिब जोरावर असेल बहुधा कारण कातळ जेथे संपत होता तेथून कडा आतल्या बाजुला वळला होता. कोकणकड्याची दुसरी आवृत्ती. त्यामुळे कड्यावर आदळून कुणी दरीत फेकले गेले नव्हते. तेथे एक प्रकारची पाच फुटाची रुंदी असलेली आडवी गुहाच होती म्हटले तरी चालेल. आम्ही ज्या झाडाच्या भरवशावर दत्ताला धोक्यात घातले होते ते झाड खाली कुठेतरी होते आणि वरपर्यंत आले होते. शेवटी सोपाना आला. आम्ही सगळे कड्याला पाठ टेकून काहीही न बोलता शेजारी शेजारी बसलो होतो. पाच मिनिटे आम्ही दमसास ठिक करतो न करतो तोच लाह्या फुटाव्या तसा आवाज आला आणि आमच्या समोरुन ठिणग्यांचा पाऊस सुरु झाला. पाण्याच्या धबधब्यामागच्या कपारीत बसुन तो पाण्याचा पडदा आरपार पहावा तसे आम्ही त्या खोबणीत बसुन एक दिड मिनिट बरसणारा तो तेजस्वी ठिणग्यांचा धबधबा अनमिष नेत्राने पहात राहीलो. हवेबरोबर तो पडदा मंद हलल्यासारखा होत होता. झाडाच्या फांद्यांवर पडणाऱ्या ठिणग्या आणखी फुटून त्या पडद्याला छेद देत आडव्या उडत होत्या. रामला रहावले नाही.
तो म्हणाला “अप्पा अरे हे असं काही कधी पाहीले नाही रे आयुष्यात. हे पाहील्यानंतर आता येथे बसल्याजागी मी मेलो तरी मला वाईट नाही वाटणार”
दत्त्याने अगदी कडेला उभे राहून त्या पडद्याखाली हात धरायचा प्रयत्न केला पण ठिणग्यांचा तो प्रवाह जवळ दिसत असला तरी कड्यापासुन बराच दुर होता. आम्ही डोळे विस्फारुन निसर्गाचा तो चमत्कार पहात होतो. अचानक कुणी तरी नळ फिरवून पाणी बंद करावे तसा तो प्रकार एकदम थांबला. अगदी चुकार ठिणगीसुध्दा दिसेना झाली. आम्ही समोर पाहीले. बऱ्याच खाली उतरते पठार दिसत होते. उन्हात तेथले गवत आणखी पिवळे धम्मक दिसत होते पण आम्ही ज्या कपारीत बसलो होतो तेथे मात्र अंधारुन आल्यासारखे झाले होते. बहुतेक वरच्या बाजुला हवेत धुर आणि इतर कचरा पसरला असावा. शकीलने घड्याळात पाहिले. अडीच वाजत आले होते. त्या खोबणीत बसुन आम्हाला अर्धा तास तरी झाला असेल.
ठोब्बा म्हणाला “अप्पा भुक लागली रे मला खुप. एखादी दशमी आहे का?”
हे विचारताना त्याच्या डोळ्यात चक्क पाणी होते.
दत्त्या म्हणाला “असं काय करतो इठूबा, आता पोचू आपन मामाकडं. जरा दम धर की. असा बारक्या पोरासारखा काय गागतो भुक लागली म्हनुन”
माझ्या लक्षात आले. ठोब्बाला काही भुक वगैरे लागली नसणार. तो ज्या भयानक मानसीक ताणातुन गेला होता त्याचा हा परिणाम असावा. त्याची वृत्ती मुळातच जरा सुखवस्तु. कधी भुक सहन होणार नाही की कधी कष्ट करणार नाही. अडचणींना, संकटांना पाठ दाखवून नेहमी पळवाट काढणार. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही सायास करावे लागणार असतील तर त्या वस्तुचा नाद सोडून देणार असा हा ठोब्बा.
मी त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारले “घाबरलास का ठोब्बा?”
तो मान हलवत म्हणाला “अप्पा मी एकटाच आहे रे घरात. मालतीचे लग्न करायचेय पुढच्या वर्षी. आईची तब्बेत तुला माहीतच आहे कशी तोळामासा असते. मला मरायची परवानगी नाही रे अप्पा इतक्यात”
“अरे असं काय करतो. एवढं काही झालं नाही ठोब्बा. तु कशाला एवढा टोकाचा विचार करतोय? आता काही भिती नाही. येथून पुढची वाट सहज मिळेल आपल्याला. पोहचू आपण लवकर खाली”
वातावरण जरा हलके करावे म्हणून धोंडबा म्हणाला “इठूबा जीव वाचावलाय तुझा. आता सोन्याचं वळं करुन घाल माह्या बोटात. जमन का?”
ठोब्बा मस्त हसला, म्हणाला “तुम्हीच मला ड्रेस शिवा या वेळी. मी मेलो असतो तर मालतीचे लग्न तुमच्या गळ्यात पडले असते”
शाम्या मला कोपराने ढोसत कुजबुजत म्हणाला “कसा वर तोंड करुन बोलतोय बघ. जसं काय मालतीचे लग्न हा एकटाच लावून देणार आहे”
दत्त्या उठत म्हणाला “उठा रे समदी. गप्पा काय हानताय खळ्यात बसल्यावानी? आगीतुन निघालोय आन फुफाट्यात अडाकलोय. धोंडबा, निघायचं पघा. वाट नाय घावली तर कपारीतच मुक्काम करावा लागन”
धोंडबा उठला. त्याने सगळ्यांच्या पिशव्या ज्याच्यात्याच्याकडे दिल्या. तरीही तो काहीतरी शोधत होता. शेवटी त्याने शाम्याला विचारले “तुही पिश्वी कुठशीक हे श्याम? दे जरा माह्याकडं”
शाम इकडे तिकडे शोधत म्हणाला “अरेच्चा, राहीली वाटते वरच. मी चादरीच्या पट्ट्या करायला काढली होती पाठीवरुन. अप्पाचा नाईफही राहीला वरतीच”
“असा कसा रं मुलखाचा इसराळू तू? आरं माह्यावाला कॅन्ड व्हता त्यात. गरजच्या टायमालाच घात कर बामना तू”
धोंडबाला पुढच्या वाटेसाठी वारुणीच्या उर्जेची गरज असावी पण नेमकी शाम्या पिशवीच वर विसरला होता. शकीलने माझ्यासाठी हंटींग नाईफ म्हणून वापरायला किती प्रयासाने नेपाळवरुन मागवलेली माझी कुकरीही वर राहीली होती. त्या नाईफला मी जीवापाड जपत होतो. मी आणि धोंडबाने शाम्याकडे खावू का गिळू अशा नजरेने पाहिले.
शाम्या म्हणाला “असं पाहू नका माझ्याकडे. माझ्यामुळेच तुमच्या गुडघ्याच्या वाट्या जागेवर आहेत. वाट शोधा अगोदर. उशीर झालाय”
दत्त्या माझी बॅग घेत म्हणाला “ए अप्पा जावूंदेना. सोपानाची कोयती हाय ना येळ पडली तर. मंग झालं तर. तुह्यासाठी पुन्ह्यांदा मागवीन शकील दुसरा सुरा. कह्याला त्या बामनाला पिडीतो उगा”
धोंडबाने दत्त्याच्या कमरेचा कोयता घेतला आणि समोरच्या झाडाच्या काही अडचणीच्या फांद्या सपासप तोडल्या. मुख्य फांदी कड्याला दाबूनच वर गेली होती. तिला धरुन तो जरासा खाली सरकला. त्याने निट निरखुन पाहीले आणि म्हणाला “खाली बी ठाव हाय अप्पा. पंधरा एक फुटावं आसन. चांगला मोठा हाय. मी उतरतो. एक एक करुन या समदे. जपुन येवा. जर घसारला कुणी तर दरीत नाय जानार, ठाव मोठा हाय. पन हात पाय मातर मोडनार हे पक्कं. सावध उतरा”
धोंडबा सरसरत खाली उतरला. त्याच्या मागोमाग पुन्हा मगाच्याच क्रमाने आम्ही उतरलो. पंधरा मिनिटात सगळे खालच्या टप्प्यावर होते. हा पट्टा चांगलाच मोठा होता. सगळा कातळच होता. तो डाव्या बाजुला जात खाली उतरत गेला होता. आम्ही आता जीवाच्या संकटातुन वाचलो होतो त्यामुळे सगळे उत्साहात होते. तेथल्या कातळावर आम्ही वेळ न घालवता डाव्या बाजुला सरकायला सुरवात गेली. ती कातळपट्टी साधारण १५० मिटर तरी लांब असावी. सुरवातीला आम्ही सहज पण सावधपणे सरकत होतो. पण जसजसे पुढे जात होतो तसतसं ती पट्टी अरुंद होत चालली होती. एका बाजुला आधारासाठी कडा होता तर दुसरऱ्या बाजुला सरळ खोल दरी होती. मधल्या चार साडेचार फुटांच्या कातळपट्टीवरुन आम्ही एकामागोमाग एक चालत होतो. अर्थात गप्पा बंद होत्या. सगळे गंभीर होतो. नंतर तो रस्ता (?) अरुंद होत होत अगदी अडीच फुट झाला. एक एक पाऊल सावकाश पण भक्कम रोवून आम्ही पुढे जात होतो. ती आडवी पट्टी पार करायला आम्हाला अर्धा तास तरी लागला असेल. या वेळेस मात्र वेळ कसा गेला ते कळले नाही. पुढे चालणारा धोंडबा थांबला. मग सगळेच थांबले. प्रत्येकाला आपल्या समोरच्याची फक्त पाठ दिसत होती, पुढचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे धोंडबा का थांबला हे मागच्यांना काही कळायला मार्ग नव्हता.
मी ओरडुन विचारले “काय झालं रे धोंडबा? वाट संपली की काय?”
“व्हय वाट सरली रं अप्पा. थांबा वाईच. मी पघतो” धोंडबाचा आवाज आला.
मला वाटले आम्ही अजुनच बिकट परिस्थितीमध्ये सापडलो की काय. कारण एका बाजुला उंच सरळ कडा होता आणि दुसऱ्या बाजुला साधारण १२५ फुट दरी होती. आमच्या पायाखाली तिन सव्वातीन फुटांची जागा होती. धोंडबाच्या सुचनेनुसार आम्ही आहे तेथेच खाली बसलो. मी मात्र उभाच राहीलो. आता मला धोंडबा दिसत होता आणि पुढे काय आहे तेही दिसत होते. धोंडबा जेथे उभा होता त्याच्या समोरचा कडा थोडा पुढे जावून आत कुठेतरी वळाला होता. मला काहीच मार्ग दिसेन.
मी धोंडबाला विचारले “काय आहे रे धोंडबा? काही मार्ग सापडतोय का?”
“व्हईन काय तरी. दम जरा. मला इचार करुंदे अप्पा” म्हणत धोंडबाही खाली बसला.
पाच दहा मिनिटे आम्ही स्तब्ध बसुन होतो. धोंडबाची हाक ऐकायला आली “अप्पा जराशीक म्होरं येतो का?”
मी प्रत्येकाला ओलांडून हळू हळू धोंडबाजवळ पोहचलो. वाट जेथे संपली होती तेथे तिची रुंदी पाच सहा फुट झाली होती. समोर कातळाची भिंत होती. एकाद्या खोलीचा कोपरा असावा तशी तेथे जागा तयार झाली होती.
धोंडबा म्हणाला “अप्पा, तुला इचारीत नाय सांगतोय. आता काय बी कर उतरायला यवढीच जागा हाय”
धोंडबाने हात करुन दाखवलेल्या जागेकडे पाहिले तेंव्हा माझ्या लक्षात आले की आम्ही उभे होतो तो अखंड कातळ होता आणि त्याला समोर मोठी भेग पडली होती. दोन फुट रुंद आणि आतमध्ये किती होती ते दिसत नव्हते. एखादी मशिन वापरुन कोरावे तशी ती फट एका सरळ रेषेत थोडीशी तिरकी होत खाली कुठे तरी गेली होती.
मी म्हणालो “धोंडबा, जर दुसरा मार्ग नसेल काही तर यावर उगाच चर्चा करुन बाकिच्यांचा गोंधळ नको करायला. आपण उतरु. कसं म्हणतो?”
“मी तेच म्हन्तो, समदी एकामागोमाग चाल्लीच हायत तर इथबी नादात उतरतील. म्होरं काय वाढुन ठेवलय म्हादेवाने ते त्यालाच म्हायीत. उतरुच. उजाडन तिथं उजाडन. पह्यला मी उतरतो. माह्यामागं सोपाना, शकील, श्यामला येवूंदे. शेवटी दत्ताला ठिव. तुच पाह्य आता कसं करायचं ते. भक्कम गडी खाल्ल्या अंगाला असलीली बरी. पिशव्या समद्या काढून इथच ठिवा. संगं घेता नाय यायच्या. तसबी त्यात काय लय मोठा खजीना नाय आपला. कापडं आन् भगुनी तर हायती. मी जातो. माझं पाहुन एकाकाला सोड. ध्यानात ठिव अप्पा, पाठ घट्ट दाबून पायाचा, हाताचा आधार घ्येत खाली सर्कायचं हाय”
धोंडबा त्या फटीत उतरला. एका बाजुला पाठ लावल्यानंतर त्याच्या नाकासमोर दिड फुटाची जागा राहीली असावी फक्त.
तो सरकत जरा खाली गेला आणि थांबला. मी त्याने सांगितल्याप्रमाणे एकेकाला जायची खुण केली. कुणीही शंका विचारली नाही, की दुसरा काही मार्ग सुचवला नाही. थोडा फरक इतकाच झाला की दत्ता ऐवजी सोपाना मागे राहीला. आम्ही एकमेकांमध्ये फार थोडे अंतर ठेवून खाली सरकत होतो. फट अगदी व्यवस्थित कोरल्यासारखी सपाट आणि एका रेषेत होती. त्यात ती बरीचशी तिरकी होत खाली उतरल्यामुळे हातापायांवर फारसा ताण येत नव्हता. तरीही सुरवातीला सहज वाटणारी ही पाठीवरची चाल नंतर मात्र त्रासदायक वाटायला लागली. गुडघे आणि तळहात सोलपटुन निघतायेत की काय असं वाटत होतं. दंडात पेटके यायला लागले होते. अवघडल्यामुळे पोटऱ्यांचे स्नायुही दुखायला लागले होते. उतरताना ठोब्बा हट्टाने दत्तामागे उतरला होता.
मध्येच तो ओरडला “मला दम लागलाय अप्पा खुप”
धोंडबा थांबला. दत्त्याने पाठ आणखी भक्कम दाबत ठोब्बाला सांगीतले “इठूबा एक एक करुन तुहे पाय ठिव माह्या खांद्यावर आन घडीभर उभा राह्य जरा. बरं वाटन तुला”
ठोब्बा त्या फटीत दत्त्याच्या खाद्यावर पाय ठेवून अंग सैलावून उभा राहीला. दत्त्याचा कसा जीव निघत असेल याचा मला अंदाज आला. जरा वेळाने ठोब्बानेच “बरं वाटतय रे दत्ता, सरक खाली आता” म्हणत दत्ताला मोकळे केले. फटीच्या डाव्या बाजुने आम्हाला दुरवरच्या डोंगररांगा दिसत होत्या तर उजवी बाजू अंधारात किती आत गेली होती ते समजायला मार्ग नव्हता. वणवा पेटल्यापासुन कोणत्या ना कोणत्या प्रकारे आम्हाला मार्ग सापडत होता, अडचणी दुर होत होत्या. आता देखील ही फट जर दोन्ही बाजुने बंद असती तर अंधारात कुणीही उतरायचे धाडस केले नसते. आणि उतरलो असतोच तर अंधारामुळे नक्कीच आमचा जीव गुदमरला असता. डाव्या बाजुने दिसणारे गडाचे दर्शन आम्हाला कितीतरी आधार देत होते. आम्ही गोगलगायीच्या गतीने, मध्ये मध्ये थांबत उतरत होतो. जवळ जवळ तासभर आमची ही चाल सुरु होती. खाली जावून पुन्हा पुढे काय हा प्रश्न होताच. कारण खाली पुन्हा अतिशय तिव्र उतार दिसत होता. धोंडबा थांबला, मागोमाग सगळेच थांबले.
धोंडबा ओरडुन म्हणाला “संपली रे वाट. पन खाली साताठ फुट तरी उडी मारावी लागन. मी अदुगर मारतो उडी, मंग येवा एकाएकाने दमाने” तासभर आम्ही फक्त एकमेकांचे आवाजच ऐकत होतो. बाजूचे फटीबाहेरील दृष्य आणि नाकासमोरचा खडक याव्यतिरीक्त काही दिसायला मार्गच नव्हता.
धोंडबाने खाली उडी मारली आणि तो खुप मोठ्याने ओरडला “द्येव पावला रं. आरं आपन सरळ वाटंवरच आलोय पार राजदरुज्याच्या. हाना उड्या समद्यांनी” (भिंतीवर असलेल्या एखाद्या उभ्या पाईपमधुन खाली उतरावे आणि जेथे पाईप संपतो तेथून जमीन सात आठ फुट खाली असावी अशी कल्पना केली तर तुमच्या लक्षात येईल आम्ही कसे उतरलो ते.) एकामागोमाग एक सगळ्यांनी खाली उड्या टाकल्या. आम्ही जेथे उभे होतो त्याच्या पलीकडे एक पायवाट होती व दुसऱ्या बाजूला आम्हाला फटीतुन दिसणारा तिव्र उतार होता. मला दिशाभुल झाल्यासारखे झाले होते. आम्ही नागाच्या फण्यासारख्या असलेल्या कड्याच्या खाली उभे होतो त्यामुळे सुर्यही दिसत नव्हता. आम्ही नक्की किती गड उतरलोय, कोणत्या बाजूला आलोय मला काहीच समजेना. फक्त एकच समजत होते की बाजूलाच पायवाट होती म्हणजे आम्ही आता सुरक्षीत होतो.
मी सोपानाला विचारले “पुर्व कोणती आहे रे सोपाना? आणि आपण किती उतरलोय? खिरेश्वर कोणत्या दिशेला आहे? कोतुळ कोणत्या दिशेला आहे?”
सोपाना एकदम हरखला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नुसता ओसंडुन वहात होता. मामांनी त्याला आमच्या सोबत वाट दाखवायला पाठवला होता. दुसऱ्यांच्या घरची पोरं त्याच्या हवाली होती, त्याची जबाबदारी होती. आणि गेले काही तास आम्ही ज्या परिस्थितीमध्ये अडकलो होतो त्यातुन सुखरुप बाहेर पडणे फक्त नशिबावर अवलंबुन होते. आता सगळेच सुरक्षीत वाटेवर आल्याने सोपानाच्या डोक्यावरचे आमच्या जबाबदारीचे ओझे एकदम उतरले होते.
तो म्हणाला “असं काय करतो अप्पा? आरं आता चतकोर गड राह्यला उतरायचा फक्त. पल्याडच्या घळीमाग खिरेसर. ह्या अंगानी सरळ वर ग्येलो तर राजदरुज्यावर जात नाय का ही वाट? निट पाह्य जरा. ह्या अंगाला उगवती हाय. आता आलं का ध्यानात. आन तो समोर हाय तो मनाईचा सुळका. ध्यान धरुन पाह्य”
हळू हळू धुकं विरत जावे आणि समोरचा परिसर स्पष्ट होत जावा तसे मला आजुबाजूला अनोळखी वाटणारे डोंगर, टेकड्या, वाटा सगळं काही स्पष्ट होत गेलं. एकेका गोष्टीची ओळख पटत गेली. आम्ही जेथे उभे होतो तिथून मी कितीतरी वेळा गडावर गेलो होतो. अगदी पायाखालची वाट होती ती माझ्या. एवढा कसा भांबावलो मी. आणि आम्ही उतरलो ती फट आजवर आम्हाला कशी दिसली नाही या वाटेने जाताना? मी वर पाहीले तर ज्या खोबणीने आमचे प्राण वाचवले होते ती खोबणही दिसत नव्हती. ना ते मोठे झाड दिसत होते. मी सोपानाला बाहेरच्या बाजुला घेतले आणि विचारले “सोपाना आपण ज्या कातळावरुन घसरलो आणि ज्या कपारीत बसलो ती दाखव मला”
सोपानाने निट निरखून पाहीले आणि मला नेमकी जागा दाखवली. ते झाडही दाखवले. इतक्या खालून पहाताना ती जागा अगदी सुरेख दिसत होती. तिथे काही उतार असेल, कपार असेल किंवा अत्यंत धोकादायक अशी ती जागा असेल असे काही वाटतच नव्हते. उलट तिथे उडी मारुन सहज पार करता येईल असा छोटा टप्पा दिसत होता. दुरुन डोंगर साजरे ही म्हण किती खरी आहे याचा मला चांगलाच प्रत्यंतर आला.
“किती वाजलं रं शकील?” म्हणत धोंडबा तेथेच आडवा पसरला. आम्हा सगळ्यांचेच हात, पाय, पाठ अगदी भरुन आले होते. आम्हीही तिथेच जमिनीवर अंग टाकले. शकीलने पडल्या पडल्याच चार वाजल्याचे सांगीतले. येथून दौलतमामाच्या घरापर्यंतची वाट अवघ्या दिड एक तासाची होती. आम्ही वेळेचा कसलाही विचार न करता आडवे झालो होतो. ठोब्बाच्या डोळ्यात पाणी होते. तो चार चार वेळा धोंडबाला म्हणत होता “वाचवलेस गड्या तू. शिफारस आहे तुझी”
शाम्या म्हणाला “हो ना! आज धोंडबा नसता तर सावडायला सुध्दा राख सापडली नसती आपली कुणाची”
धोंडबा म्हणाला “वाचावलं ते मरुंदे. आयला यवढं गहू त्या आबाच्या मढ्यावर घातले म्या आन तू ती मोलामहागाची दारु घालावली माझ्यावाली. तिची काय ती सोय लावून दे मला अदुगर”
दत्त्या मध्येच उचकला “आयला मला कड्याखाली सोडून समदी निवांत झाल्ता. मी मेलो अस्तो तर ज्यानी त्यानी आपापला रस्ता धरला अस्ता. आन हा धोंड्या माझ्या दसपींडाला शाक बुंदी करायला निगाला व्हता त्याचं काय? कापडं काढा रे सम्दी चटशीरी”
शाम्या हसुन म्हणाला “दत्त्या लेका तुझ्यामुळे आमची शाक-बुंदी राहीली. मेला असता मित्रांसाठी तर तुला स्वर्ग आणि आम्हाला बुंदी भात तरी मिळाला असता”
दत्त्याने बसल्या जागेवरुन शाम्याला लाथ घातली जोरात आणि म्हणाला “ऐतवारी ये, नंद्याला बुंदी पाडायला लावतो पाटीभर. त्यापायी मला कह्याला मारीतो?”
शाम्या दत्त्यापासुन दुर सरकत मोठ्याने हसत म्हणाला “पण दत्ता कार्याच्या बुंदीला जी चव असते ती घरच्या बुंदीला नाही येत नाही ना”
“कापडं काढा ना पटकन, उशिर झालाय मरनाचा” म्हणत दत्त्या स्वतःच उठला आणि प्रत्येकाला शर्ट काढायला लावला. तेंव्हा कुठे आमच्या लक्षात आले कुणाला किती लागलेय ते. सगळ्यांच्याच पाठी लालभडक झाल्या होत्या. हाताचे कोपरे सोलवटले होते. दत्त्याच्या पोटालाही चांगलेच खरचटले होते. रामच्या पायाचा अंगठा रक्ताळला होता. ठोब्बाच्या उजव्या पोटरीचे स्नायु राहुन राहुन आकसत होते आणि त्याच्या पायाला रग लागत होती. पण एकंदरीत अर्धे दारुचे कॅन, महागाचा कुकरीचा दोन पाती असलेला सेट, आमचे काही कपडे, ब्लँकेटस् आणि काही पातेली यांची किंमत देऊन आम्ही सगळे हातीपायी सुखरुप खाली उतरलो होतो.
साडेचार वाजले होते. आमच्याकडे आता काही सामान वगैरे नव्हते. दमलो होतो, दुखावलो होतो पण आता घरची ओढ लागली होती. आम्ही झपाट्याने गड उतरत होतो. दत्त्या म्हटलाही होता की “आज नाय कळनार काय, उद्याच्याला समजन काय काय दुखातय ते” पण उद्याची चिंता उद्या. गड उतरायचा असल्याने फारसे कष्ट नव्हते फक्त काळजी घ्यावी लागत होती.
धोंडबा म्हणाला “जरा दमानं चला रं. नायतर लढाईवरुन आला आन अंगनात ठेच लागून म्येला अशी गत व्हायची.
प्रचंड तहान लागली होती पण या वाटेवर कुठेही पाणी मिळणार नव्हते. जे होते ते आम्ही वरच संपवले होते. ठोब्बाला मात्र आता चालणे अशक्य झाले होते. त्याला एक पाय खालीच टेकवता येत नव्हता. बहुतेक पोटरीतले स्नायु दुखावले असणार होते. अर्ध्या तासाची वाट राहील तेंव्हा मात्र त्याने रस्त्यातच बसकन मारली. शेवटी धोंडबाने त्याला पाठंगुळी घेतले आणि आम्ही चाल जरा सावकाश करुन निघालो. दौलतमामाच्या अंगणात येईतोवर आम्हाला साडेसहा झाले होते. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरवात होणार होती. दौलतमामा अंगणातच बाजेवर बसला होता. आम्हाला पाहुन तो उठला आणि घरातुन त्याने पाण्याने भरलेले मातीचे छोटे मडके बाहेर आणुन ठेवले. घरात चहा ठेवायला सांगीतला.
“मामा, उलसाक गुळ द्या आता. दोन तास थेंब नाय नरड्यात. पानी प्येलो तर बाधन” असे म्हणत धोंडबाने निःसंकोचपणे मामांकडे गुळ मागितला. “माझं बी टकुरं काम करना झालय” म्हणत दौलतमामा स्वतः आत गेला आणि बशीमध्ये मोठा गुळाचा खडा घेवून आला. सगळ्यांनी गुळ खाल्ला आणि धोंडबाच्या दटावण्यामुळे फक्त एक एक ग्लास पाणी पिला. जरावेळाने चहा आला. गुळ खाल्ल्याने चहाची चव लागली नाही पण तरीतरी आली. दौलतमामाच्या प्रश्नांना उडती उत्तरे देऊन आम्ही निघालो. मी शकीलच्या हातातून चावी घेतली आणि त्याला शेजारी बसवले. मामाचा निरोप घेतला आणि मी हायवेकडे जीप वळवली. अत्यंत खराब रस्ता असुनही हायवेवर येईपर्यंत शकीलचे डोळे मिटले होते. मागे दत्त्या ठोब्बाचा पाय मांडीवर घेवून दोन्ही अंगठ्यांनी त्याच्या शिरा मोकळ्या करत होता. धोंडबाने सोपानाला व्यवस्थित समजावून सांगीतले होते त्यामुळे तो मामीला किंवा मामांना काही सागणार नव्हता. गाडीच्या इंजीनचा आणि मी अधुन मधून बदललेल्या गिअरचा आवाज सोडला तर गाडीत शांतता होती. मामांच्या अंगणात पोहचेपर्यंत पुर्ण अंधार पडला होता. अंगणात मामा, मामी, सोपानचे वडील आणि इन्नी उभे होते. रस्त्यावरची गाडी जेंव्हा अंगणात येऊन उभी राहीली तेंव्हा त्यांचे चिंतेने काळवंडलेले चेहरे सैल झाले.
इन्नीने आणि राधाकाकूने अंगणात गरम पाण्याचे घंगाळे आणून ठेवले. अंगणातल्या केळीखाली आमच्या अंघोळी उरकल्या. तेथवर लाईटचा फारसा उजेड पोहचत नसल्याने इन्नीच्या किंवा मामांच्या काही लक्षात आले नाही. आहे तेच कपडे घालून आम्ही अंगणात टाकलेल्या घोंगडीवर निवांत बसलो. कढत पाण्यामुळे आता खुप बरे वाटत होते. इन्नीचे सारखे आत बाहेर चालले होते. आम्हाला उशीर झालेला पाहुन आम्ही आज मुक्काम करणार याचा मामींना अंदाज आला होता. त्यामुळे त्यांनी राधाकाकूंना स्वयपाकाचे सांगितले असावे. आठ वाजत आले असावे. मामींनी बाहेर येवून “लगुलग घेते वाढायला, थोडी कळ काढा” असे सांगितले होते. भुका तर दहा जन्म जेवलो नाही अशा लागल्या होत्या. सोपाना कुठे दिसत नव्हता. एवढ्यात इन्नी धावत बाहेर आली. “अप्पा, काय काय झाले मला सांग अगोदर. काय्यएक लपवायचे नाही. अगोदर सांग पाहू. आत सोपानदादा राधाकाकुला काय काय सांगतोय. कुठे कुठे लागलय? कुणाकुणाला लागलय?”
शाम्याने तिला चुप करायचा प्रयत्न केला “अगो गप्प बसशील का जरा. मामांना कळाले तर खरडपट्टी काढतील सगळ्यांची”
तेवढ्यात मामाच बाहेर आले. त्यांनी रागाने आमच्याकडे पाहीले. आता कधीही तोफेला बत्ती मिळणार होती. आम्ही उगाच इकडे तिकडे पहात मामांची नजर टाळत होतो.
इतक्यात मामा कडाडले “कंच्या रांडच्यानं तुम्हाला त्या अंगाला उतराया सांगीतलं व्हतं? अप्पा पुढं ये असा. मुंडकं काय हलवयो नुस्ता. सत्येनारायनाची कथा सांगतुय का म्या? तुह्या मामीनं ध्यान धरुन सांगीतलं व्हतं ना राजदरुज्याकडं जावू नका म्हनून?”
मामांची म्हातारी कुडी संतापाने नुसती थरथरत होती. मामा इतके रागावतील याचा इन्नीलाही अंदाज नव्हता. तिही भेदरुन अंगणातच उभी होती. आमच्या तर मानाच वर होत नव्हत्या. मामांचा आवाज ऐकून मामी आणि राधाकाकूही बाहेर आल्या.
“त्या सोपान्याला बोलव राधे” म्हणत मामा पुन्हा आमच्याकडे वळले. त्यांनी पुन्हा सुरवात करायच्या अगोदर मामी म्हणाल्या.
“आवो असं काय करता? पोरं घाबारली असतील अदुगरच. त्यात तुम्ही आजुन रागेजला तर कसं व्हायचं. भुक्याली हाय पोरं. दोन घास खावूद्या. आली ना देवाच्या किरपेनं घराला सुखरुप, मंग झालं तर. जेवूंद्या पोरांना सुकानं दोन घास. तुमी चला आत”
मामा आत गेले. राधाकाकूंनी सगळी भांडी बाहेर आणून ठेवली. आम्ही थांबणार म्हणुन राधाकाकूने तांदळाची खिर, पुरी, वाटाण्याची उसळ, कुरडया पापड्या असा साग्रसंगीत बेत केला होता. इन्नीही आमच्याबरोबरच जेवायला बसली. समोर वाढलेले ताट पाहुन ‘आत्ताच मामा खरडपट्टी काढुन गेल्याचे’ आम्ही विसरलो आणि जेवणावर तुटून पडलो. जेवताना मामी, राधाकाकू कुणी काही बोलले नाही. आमची जेवणे उरकली. इन्नीने आणि राधाकाकूने सगळे आवरुन पुन्हा अंगण स्वच्छ करुन त्यावर घोंगडी अंथरुन दिली. आम्ही जड पोटाने सुस्त हालचाली करत तेथेच लवंडलो. मामीही उठून आत गेल्या. जरा वेळाने मामा आणि सोपानाचे वडील बाहेर आले. मामांना पाहुन आम्ही सावरुन बसलो.
मामा म्हणाले “रागावला कारं अप्पा? अरं दुसऱ्याची पोरं अशी गडावर जीव गुतवत्यात तव्हा कसं वाटातय ते तुला कसं सांगू? तुम्हाला कायबाय झालं असतं तर बाईला आणि गुर्जीला काय ताँड दाखावलं अस्तं सांग बरं. अजान हाय बाळांनो अजुन तुम्ही. माहितगार मानूस नसन तर जीव घ्येत्यात हे डोंगर. माझं बोलनं मनावं नका घेवू तुम्ही कुनी”
आम्ही काय बोलणार? फक्त माना हलवल्या.
मामा म्हणाले “आता असं करा, धुळवडीपासुन तिन दिस चावडीवर शाहीरांचा आखाडा भरतोय आपल्याकं. पहाटंपर्यंत चालतो. हा ढोलकी तुनतुन्याचा आवाज येतोय तो त्याचाच. घडीभर जावा चावडीकडं. पाटलालाबी बरं वाटन आन तुम्हालाबी एकादी छक्कड ऐकायला मिळन. कसं? जाच तुम्ही. कटाळा आला की या माघारी. राधीला सांगतो अथरुनं घालून ठिवायला अंगनात”
आम्ही रात्री दहा वाजता चावडीच्या मैदानात आलो. आम्हाला पाहुन पाटील लगबगीने पुढे आले. “मामा म्हनलं व्हतं तुमी कालच आलाय म्हनून. लई येळ लावला यायला. चला, जागा करुन देतो” म्हणत पाटलांनी अगदी अगत्याने हात धरुन चावडीच्या अगदी समोरच नेवून बसवले. तेथे बसलेल्या लोकांनीही चटकन आम्हाला जागा करुन दिली. समोर चार कोपऱ्यात टांगलेल्या बल्बच्या पिवळ्या प्रकाशात एक शाहीर चांगला रंगात येवून डफावर थाप मारत गात होता. साथीला एक ढोलकी, तुणतुने आणि लहान झांज होती फक्त. आम्ही बसलो आणि त्याने नविन पाहुने पाहुन एक उडत्या चालीची छक्कड घेतली. पहिल्या ओळीलाच लोकांची टाळी पडली. आम्ही पाठीचे पायाचे दुखने विसरुन समोरील छक्कड, लावण्या ऐकण्यात रंगुन गेलो. थोड्या वेळाने फटके सुरु झाले. हा दत्त्याचा आणि धोंडबाचा अत्यंत आवडता प्रकार. शाहीर आमच्याकडे पाहुन गात होता आणि धोंडबा त्याला “भले शाब्बास!” म्हणत दाद देत होता. पाठीमागची ढोलकी, तुनतुने आणि झांजेने अशी काही लय पकडली होती की मीही नकळत डोलू लागलो होतो. मध्येच शाहीराने नवं कडवं घेताना “ऐका बरं” म्हटलं आणि शेवटी धोंडबा उठलाच. मधल्या मोकळ्या जागेत जात त्याने खिशातला रुमाल काढला. दोन्ही हातात रुमाल ताणून धरत तो पुढे झुकला आणि वर आकाशाकडे तिरकी मान करत, डावीकडे फिरत तो अत्यंत लयीत स्वतःभोवती सुफी अवलिये फिरतात तसा फिरु लागला. त्याला तसे नाचताना पाहून शाहीरानेही डफावर कडक थाप मारुन आदर्श पुरुषाचे वर्णन करणारी फटक्याची पुढली ओळ धोंडबाकडे फेकली. मला वाटले ती खास धोंडबासाठीच असावी.
अंगानं खंबीर, बोलण्यात गंभीर, सरदार हंबिर असावा
---------------------------------------------------------------------------
आम्ही उतरलो त्या भागाचे वर्णन मला व्यवस्थित करता आले नाही. त्यामुळे येथे छोटेसे रेखाटन देतो आहे. हे रेखाटन प्रमाणात नाहीए. ते फक्त अंदाज येण्यासाठी आहे. प्रत्यक्षात परिस्थिती खुप भितिदायक होती. तेथुन उतरने म्हणजे गिर्यारोहकांसाठी खुप मोठा शॉर्टकट ठरला असता पण आश्चर्याची बाब म्हणजे त्यानंतर कैकदा गडावर जाऊनही हा भाग काही आम्हाला पुन्हा सापडला नाही.
.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

9 Apr 2019 - 8:45 am | आनन्दा

सत्य घटना की कल्पित?
कारण आगीच्या ज्वाळाचं इतकं चित्रदर्शी वर्णन करणं खूप कठीण आहे..

सत्यघटना आहे. त्यामुळेच शेवटी रेखाटन दिले आहे.
अर्थात बरेचसे तपशील काल्पनीक आहेत. त्या शिवाय लेख कसा खुलवणार?

आनन्दा's picture

9 Apr 2019 - 11:31 am | आनन्दा

बापरे...
जीवावरच होतं म्हणायचं

आम्ही असाच एक किडा घोरवडेढवर लेण्यांच्या तिथे केला तो आठवला...

सेम प्रकार, फक्त आम्ही एका कपारीतून वर चढत होतो, आणि खाली 400 मीटर खोल कडा होता.
8 फुटच चढायचं होतं, चढताना काही जाणवत नव्हतं, वर जाऊन बघितलं की कळत होतं आपण काय दिवे लावलेत ते.

सिरुसेरि's picture

10 Apr 2019 - 12:43 pm | सिरुसेरि

सत्य आणी काल्पनीकता यांची सुरेख गुंफण . साहसकथा रंगली आहे .

अभ्या..'s picture

9 Apr 2019 - 12:22 pm | अभ्या..

इलस्ट्रेशन अप्रतिम काढलंय. रीडर्स डायजेस्ट च्या इलस्ट्रेशन्सची आठवण झाली.
सुरेख.

विजुभाऊ's picture

9 Apr 2019 - 12:43 pm | विजुभाऊ

सुरेख
अक्षरशः श्वास रोखून वाचले

नाखु's picture

9 Apr 2019 - 2:19 pm | नाखु

तुमची तपशील भरण्याची शैली अफाट आणि गुंगवून टाकणारी आहे

सुचिता१'s picture

9 Apr 2019 - 4:31 pm | सुचिता१

अद्भुत !!! आगी चे वर्णन अंगावर काटा आणणारे आहे. गावा कडची भाषा पण गोड वाटतेय . आणि तुमची शैली तर +१००० !

साबु's picture

10 Apr 2019 - 3:31 pm | साबु

इलस्ट्रेशन साठी कुठले app अथवा tool वापरले?

शाली's picture

10 Apr 2019 - 11:19 pm | शाली

ॲडॉब स्केचबुक.

मैत्र चे सगळे भाग सुरेख जमून आलेत.

शाली's picture

10 Apr 2019 - 11:19 pm | शाली

सगळ्यांचे धन्यवाद!

सुचिता१'s picture

11 Apr 2019 - 8:37 pm | सुचिता१

पु भा प्र . प्लीज लवकर टाका पुढचा भाग 

सुचिता१'s picture

11 Apr 2019 - 8:37 pm | सुचिता१

पु भा प्र . प्लीज लवकर टाका पुढचा भाग 

अश्फाक's picture

12 Apr 2019 - 12:20 pm | अश्फाक

!!!!!!

शित्रेउमेश's picture

12 Apr 2019 - 12:27 pm | शित्रेउमेश

श्वास रोखुन वाचल....
बाकी तुमचं लिखाण भयंकर आवडल.. हरिशचंद्र गडावर रात्रीच्या मुक्कामाचा बेत पक्का केलाय मी.... करतो आता मित्र जमा.....

अमित खोजे's picture

15 Apr 2019 - 7:55 am | अमित खोजे

अगदी हेच म्हणायला आलो होतो. चित्र अगदीच छान काढले आहे. कथा सुंदर रंगवली आहे. या मैत्र चे पुस्तक काढायला खरंच हरकत नाही. पुढे मागे पिक्चरही निघेल कोणी सांगावे?