मरणाचं अर्थशास्त्र

Primary tabs

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
15 Mar 2019 - 12:38 pm

काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली.

कसंही मरण येऊ शकतं आपल्या देशात. कोणी उघड्या गटारात पडून मरतं, कोणी रस्त्यावरच्या सुट्या विजेच्या तारेला धक्का लागून मरतं, कोणी झाड पडून मरतं. कोणी भिंत पडून मरतं तर कोणी इमारत कोसळून मरतं. कोणी सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याने मरतं तर कोणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून मरतं. कुठेना कुठेतरी या सगळ्याची मुळं भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेत आणि मानसिकतेत असतात. आपण तरी धुतल्या तांदळासारखे पवित्र कुठे असतो? काही जणं 70% भ्रष्ट असतील तर कदाचित आपण 30% च असू. फक्त प्रमाण काय ते तेवढं कमी जास्त असतं इतकंच. पण हमाम मे सब नंगे होते हैं तसच इस देश में सब भ्रष्ट होते हैं असच समजायचं का?

आता ह्या पुलाची देखभाल करायची जबाबदारी कोणाचीच नव्हती हे तर शक्यच नाही. आपण समुद्रात पूल बांधू शकतो, सरदार पटेल यांचा अवाढव्य पुतळा उभारू शकतो. पण त्याच देशात पूल मात्र कोसळू शकतो. आता हे विदारक सत्य मी पचवायला पाहिजे. कारण आताशा माझ्या लक्षात आलंय की मरणाला सुद्धा अर्थशास्त्र असतं. ज्या अर्थशास्त्राचा जन्म माणसाचं जगणं सुलभ करण्यासाठी झाला तेच अर्थशास्त्र काही वेळा विदारक सत्य कळण्यासाठी उपयोगाला येतं. जिथे पुरवठा वाढतो तिथे मूल्य कमी होतं हेच तर सांगतं अर्थशास्त्र आपल्याला. आपल्या देशात माणसांचा पुरवठा वाढला आणि मग माणसाचं मूल्य (value) कमी झालं. मग अतीपरीचयात अवज्ञा तसं, माणसाला माणसाबद्दल काही वाटेनासं झालं. सगळं अर्थशास्त्र आहे.

आपण जेव्हा रोजच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतो तेव्हा रोज हेच सत्य नंगा नाच करत डोळ्यांसमोर येत असतं आपल्या. अर्थात आपणही या अर्थशास्त्राला आपल्यापरीने हातभार लावतच असतो. एकमेकांना स्माईल द्यायला जिवावर येतं पण खेकसायला मात्र आतूर असतो. टीका करण्यासाठी आपण तत्पर असतो पण कौतुक करताना मात्र जीभ जड होते. आपल्याकडून चूक होते त्यामागे परिस्थिती किंवा दुसरं कोणीतरी कारणीभूत असतं पण दुसरा कोणी चूक करतो तेव्हा फक्त तो आणि तोच कारणीभूत असतो असं आपल्याला सतत वाटत राहतं. भले दुसऱ्याने चांगलं काम केलं की त्यावेळी त्याचं कौतुक करायला आपण संवादाच्या कलेत पारंगत नसू पण आपल्या गाडीला रस्त्यावर दुसऱ्याच्या गाडीचा नुसता स्पर्श जरी झाला तरी आपण अस्खलितपणे आपल्या भावना व्यक्त करायला लागतो. रस्त्यावर अपघातात सापडलेल्या माणसाला मदत करायला सुद्धा आपण थांबत नाही कारण आपल्याला सतत कुठेतरी जायचं असतं किंवा आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं.

खरंच त्या पुलाची कोणीच देखभाल केली नसेल का? किंवा आता तो पूल पडल्यावर ज्या कोणाची ती जबाबदारी होती त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लागली नसेल का? का त्या 'ओह माय गॉड' सिनेमा सारखं, त्या ब्रिजचं पडणं हे act of God या सदरात मोडतं? दर आठवड्यातून एकदा मी त्या ब्रिजखाली उभा राहून टॅक्सी ची वाट बघत असतो. तोच पूल आज कोणासाठी तरी यमदूत ठरला म्हणून वाईट वाटून घ्यायचं का त्यावेळी त्या पुलाखाली मी नव्हतो म्हणून सुस्कारा सोडायचा आणि त्या पुलासमोर सेल्फी काढत बसायचं हा वास्तविक सदसद्विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या माणसासाठी प्रश्नच असता कामा नये. पण इथे सदसद्विवेकबुद्धी जागृत आहे कोणाची? मग आपण तरी मागे का रहा? गम्मत म्हणजे माणसांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या या सारख्या घटनांवर विधायक चर्चा करायला 24X7 news channels कडे वेळच नसतो आणि तिथेही सदसद्विवेकबुद्धीची बोंबच असते. त्यांना फक्त कोंबड्यांची झुंज लावतात तशी माणसांची झुंज लावायची असते स्वतःचं पोट भरण्यासाठी. फक्त असं कबूल करणं कमीपणाचं वाटतं मग त्याला Debate असं गोंडस नाव दिलं जातं.

या दुर्घटनेला सरकारी अनास्था किंवा भ्रष्टाचार जबाबदार आहे असं खुळचट विधान आतातरी मी करणार नाही. कारण आता मला अर्थशास्त्र कळलय. मरणाचं अर्थशास्त्र. जिथे पुरवठा वाढतो तिथे मूल्य कमी होतं. मग त्याला कोण काय करणार? शेवटी माझ्यासारख्या शिकलेल्याने अर्थशास्त्रावर विश्वास नाही ठेवायचा तर मग कोणी ठेवायचा?

समाजविचार

प्रतिक्रिया

वकील साहेब's picture

15 Mar 2019 - 1:15 pm | वकील साहेब

हृदयस्पर्शी लिखाण. थेट भिडले.
काल ती बातमी बघितल्यावर मीही खूप अस्वस्थ झालो होतो. पण रोज हर घडीला अजूबाजूला इतक्या घटना घडत असतात की सहवेदना तरी कुणा कुणा साठी व्यक्त राहायच्या? ज्यांच्या जगण्याला अन मरणालाही या देशात काडीचीही किंमत नाही त्या अनेक लोकांमध्ये आपणही एक आहोत ही भावना सुन्न करून सोडते.
आज अंथरुणाला पाठ टेकली यात आनंद मानायचा आणि उद्या तिरडीला टेकण्याची तयारी ठेऊन जगायचं.

कुमार१'s picture

15 Mar 2019 - 2:58 pm | कुमार१

लेखाशी सहमत !

विनिता००२'s picture

15 Mar 2019 - 3:42 pm | विनिता००२

खूप वाईट वाटलं बातमी बघून! तेव्हा मनात हाच विचार आला की , मेंटेनन्स करत नव्हते का पुलाचा?

अनिंद्य's picture

15 Mar 2019 - 4:40 pm | अनिंद्य

आता अशी पुढील दुर्घटना घटेपर्यंत आपण सर्व झोपी जाणार !

वाईट वाटते पण 'खऱ्या' समस्यांना थेट भिडून त्यांची उत्तरे मिळवण्याचे समाजभान आणि धमक आपल्यात नाही हे कटू सत्य आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Mar 2019 - 5:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम विवेचन
गम्मत म्हणजे माणसांच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या या सारख्या घटनांवर विधायक चर्चा करायला 24X7 news channels कडे वेळच नसतो
चेनल्सच कशाला, सरकारला(राज्य्/महानगरपालिका-नगर्सेवक) ह्यांना तरी कुठे वेळ असतो चर्चा करायला? सरकारी यंत्रणा अपयशी ठरली की मग चॅनेल्स्/नागरिक ह्यांना दोष द्यायला चालु होतो.

चौथा कोनाडा's picture

15 Mar 2019 - 5:43 pm | चौथा कोनाडा

दुर्दवी घटना !

जिथे पुरवठा वाढतो तिथे मूल्य कमी होतं.

कमी मुल्यामध्ये आपण कधी मोडतो त्याची वा ट पहायची !

मुक्त विहारि's picture

16 Mar 2019 - 10:06 am | मुक्त विहारि

दुसरे काय?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Mar 2019 - 10:36 am | माईसाहेब कुरसूंदीकर

थोडेफार सहमत पण ज्या प्रदेशाचे प्रमाणाबाहेर शहरीकरण्,बकालीपणा आला आहे त्याच प्रदेशात पुन्हा टॉवर्स्,मॉल्स्,दुकाने बांधण्याची मागणी केली जाते व तो हट्ट पुरवलाही जातो. ज्या दक्षिण मुबईची गर्दी कमी करयची ठरली होती(१९७५) त्याच दक्षिण मुंबईत अधिकाधिक टॉवर्स्,मॉल्स्,दुकाने उभी राहिली.महापालिका श्रीमंत झाली, नगरसेवक/आमदार गब्बर झाले, राज्यसरकारलाही कर मिळाला आणी व्यापारी वर्गही खूष.

केली असेल, नक्की केली असेल. आता बिल फाडायला राजकारणी, पालिका वगैरे ठीक आहे. पण अफाट लोकसंख्या हेच सर्व समस्यांचे मुळ आहे. कमीत कमी मुंबईतील मंत्रायल, सरकारी कार्यालये गडचिरोली ला हलवावीत. इथल्या बर्‍याच गाड्या आणी वर्दळ कमी होईल. गडचिरोलीला मोठा विमानतळ बांधावा आणि सर्व मोठ्या शहरातून तिथे विमानसेवा सुरु करावी. पालिका मुख्यालय, रेल्वेची मुख्यालये मुम्बईच्या दुसर्‍या टोकाच्या सीमेवर हलवावीत.

सुबोध खरे's picture

16 Mar 2019 - 10:41 am | सुबोध खरे

केवल सरकारलाच दोष का द्यायचा?

आपण नागरिक म्हणून किती लायकीचे आहोत हे सतत दिसतच असते.

एक हजार रुपये घेऊन मत देणारे आणि नगरसेवक आमदार निवडणारे आपण लोक आपल्याला काय लायकीचे राज्यकर्ते मिळणार ते स्पष्ट आहे.

तीन तीन जण मोटारसायकलवरून जातात तेंव्हा त्याचा ब्रेक नीट लागणार नाही हे समजत नसते का?

हेल्मेट न घालता भरधाव जाणारे किती आहेत? रस्त्यावर उलट्या बाजूने येणारे लोक पुण्यात हजारांनी सापडतील.

मोबाईलवर बोलणे हे दारू पिऊन गाडी चालवण्याइतकेच धोकादायक आहे हे माहिती असून किती लोक वाहने चालवताना मोबाईल वर बोलत असतात.

बरं हे सर्व काही गरीब नसून मध्यमवर्गीय आणि थोडे फार शिकलेलेच असतात.

रेल्वे रूळ पार करणारे हजारात आहेत.

केळी खाऊन रस्त्यावर साली टाकणारे कमी आहेत का?

सर्रास सगळे ट्रक अतिरिक्त भार(OVERLOAD) घेऊनच चालवले जातात.

हीच वृत्ती असलेली माणसे सरकारी नोकरीतहि आहेत मग हे असे होणारच.

माणसाची किंमत हि एक भागिले लोकसंख्या इतकी आहे. जितकी लोकसंख्या जास्त तितकी माणसाची किंमत कमी.

बाप्पू's picture

16 Mar 2019 - 10:50 am | बाप्पू

याला सामान्य नागरिक आणि त्यांची बेशिस्तता देखील तितकेच जबाबदार आहेत.
कोणाला वेळच नाहीये इथे मूलभूत गोष्टीबद्दल तक्रार आणि फॉलोअप घ्यायला. जो तो आपल्या नादात.. अश्या कितीतरी गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते आणि शेवटी जे व्हायचे ते होते.