ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला

Primary tabs

व्लॉगर पाटील's picture
व्लॉगर पाटील in भटकंती
19 Feb 2019 - 4:58 pm

ढवळगड - एक इतिहासात हरवलेला किल्ला (Dhaval gad - Unkown Fort)

इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. फेसबुक च्या एक पोस्ट वरून या किल्ल्याबद्दल समजलं .भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1932 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो.

गडावर पाहण्याची ठिकाणे -
किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे.

पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे . गणपती मंदिर पासून काही पायऱ्या चढलं की आपण पोहचतो गडाच्या दरवाज्या जवळ . दरवाजाची थोडी पडझड झाली आहे , शेजारीच एक बुरुज ही दिसतो .दरवाज्यातून पुढे आले की दोन पाण्याची टाके आहेत.

गडावर ढवळेश्वराचं मंदिर , बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड अस नाव पडल असावे.

गडाच्या बांधणी वरून समजत की हा एकदा पेशवेकालीन किल्ला असावा, जो निगरणीचा किल्ला म्हणून बांधला असावा जसकी जवळचेच मल्हारगड आणि भुलेश्वर .

गडाच्या अधिक माहिती खाली दिलेला विडिओ पहा आणि अजून ही असाच गडांच्या माहिती साठी "Subscribe" करा SPOTVAR

धन्यवाद!!
https://youtu.be/-Yp0HE0ylmY

प्रतिक्रिया

हा विडीओ वरील धाग्यात अपडेट करता येईल का..?

व्लॉगर पाटील's picture

19 Feb 2019 - 5:25 pm | व्लॉगर पाटील

आपल्या पैकी कोणास माहीत असेल तर नक्कीच कंमेंट मध्ये सांगा

कपिलमुनी's picture

19 Feb 2019 - 5:13 pm | कपिलमुनी

शिवजयंतीच्या मुहूर्तावर मिपावर झालेल्या नवीन किल्ल्याची ओळख आवडली. व्हिडीओ आणि कॉमेंट्री मुळे मजा आली.
मराठीत असे vloging वाढायला हवे . पुढील ट्रेक साठी शुभेच्छा

व्लॉगर पाटील's picture

19 Feb 2019 - 5:21 pm | व्लॉगर पाटील

आपल्या चॅनेल वरती असेच भरपूर ट्रेक सफर आहेत ,त्या पाहण्यासाठी नक्कीच #subscribe करा youtube/spotvar

कंजूस's picture

19 Feb 2019 - 6:39 pm | कंजूस

>>मराठीत असे vloging वाढायला हवे .>>

तसे पुर्वी केले असते पण इंटरनेट महाग होते. आता प्रत्येकाला मोबाइलमध्ये स्वस्तात प्लान मिळतो रोज १/१.५/२ जीबीचा.
विडिओ काढून त्यास ओडिओ नंतर जोडण्याची अॅप्स आहेतच॥ एक प्रयत्न माथेरान -पनोरमा पॅाइंटचा केलेला इथे दिला होता. असेल तो अजुनही.

माथेरान -पनोरमा पॅाइंटचा केलेला

हा विडिओ https://youtube.com/watch?v=6QdUVr7sZAE

कंजूस's picture

20 Feb 2019 - 3:49 am | कंजूस

ढवळागड

आवडल्यास subsribe करा SPOTVAR

ढवळागड

ट्राइअल

व्लॉगर पाटील's picture

25 Feb 2019 - 8:04 pm | व्लॉगर पाटील

विडिओ कसा इथे add केला सांगू शकाल,

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2019 - 10:48 pm | चौथा कोनाडा

मलाही हे।माहीत करून घ्यायचे आहे.
मिपा मदत पानांवर कुठं सापडलं नाही.

दुर्गविहारी's picture

24 Feb 2019 - 9:48 am | दुर्गविहारी

ढवळगडासंदर्भात काही माहिती देतो. गाव -आंबळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे समुद्रसपाटीपासून उंची 885 मीटर, पुरंदर दुर्ग च्या उत्तरेस, भुलेश्वर डोंगर रांगेवर उभा ठाकलेला, आत्तापर्यंत चा दुर्ग. गिरीमित्र ओंकार ओक आणि इतिहास संशोधक श्री सचिन जोशी यांनी अथक प्रयत्न करून हा गड शोधला. पुणे- फुरसुंगी -दिवे घाट- सासवड - सिंगापूर - वाघापूर - आंबळे असे आपण जाउ शकतो. अतिप्राचीन गाव, सरलष्कर दरेकर यांचं गाव, महान पराक्रमी दरेकर घराणे, यांचे 2 अतिभव्य असे वाडे आहेत, सुसज्ज दरवाजे, तटबंदी, गावातील मंदिरे तर काय बोलावे जबरदस्त भैरवनाथ मंदिर, राजेश्वर मंदिर, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, काळा मारुती, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, गरुड मंदिर, गावात अष्टमी चैत्र वैद्य महिण्यात मोठी यात्रा असते. गावात दरेकर, जगताप, काळे, कुंजीर, बधे,गायकवाड, शेंडगे, रोकडे, शेम्बडे, बिचकुळे, थोरात, ढोणे, ढोले, होले, शेख, अशी आडनाव मिळून 2000 लोकसंख्या आहे. गावात माहिती घेतली असता ढवळगड चा ढवलेश्वर झाला असे सांगतात. पाणंद रस्ताने गेल्यावर आपल्याला ढवळगड दिसतो, गावच्या पश्चिम उत्तरेस उभा राहिला आहे. गडाकडे निघाल्यावर अगदी 5 मिनिट अंतरावर वेगळ्या धाटणीचा हनुमान पाहायला मिळतो , एकाच दगडात दोन्ही बाजूंनी कोरीव मारुतीराया आहे, अप्रतिम आहे. मग थोडं पुढं गेल्यावर जुजबी तटबंदी मग गणेश मूर्ती दिसते अप्रतिम आहे. मग अर्धा पडलेला दरवाजा, शेजारी एक बुरुज, वर विटांचे बांधकाम, आणि शेजारी लागून उंच तटबंदी आहे. त्याला लागून 3 दगडी खोल्या आहेत. दरवाजा पुरातन अस्तिव दाखवून देतो. मग पुढं गेल्यावर एक कोरीव कमी बांधीव विहीर टाक आहे अंदाजे 20 फूट खोल. तसच पुढं एक खांब टाक आहे 15 फूट बाय20 फूट एक कोरीव खांब दिसतो. बरोबर मंदिर दरवाजा समोर आहे, सुंदर आहे. मग मुख्य मंदिर ढवलेश्वर अप्रतिम कोरीव पिंड, शिवलिंग खूप खूप खूप सुंदर आहे. सभामंडप, नंदी अफलातून आहे, मुख्य गाभारा तर सुबक आहे. 2 दरवाजे ,मुख्य दरवाजा सगळं कसं अप्रतिम आहे. पूर्वेला दौलतमंगळ गड (भुलेश्वर मंदिर), दक्षीण दिशेने पुरंदर वज्रगड, पश्चिमेला मल्हार गड उत्तरेस रेल्वे रूळ आणि 3 बोगदे .संपुर्ण गड फेरीत या व्यतिरिक्त काही ही अवशेष सापडले नाही. नैसर्गिक तटबंदी, बांधीव नाही. छोटेखानी टेहळणी दुर्ग असावा.
हा गड उजेडात येत असताना काही वाद झाले. ओंकार ओक यांचा प्रतिसाद उपलब्ध होउ शकला.
ढवळगड - एक खुलासा
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात वसलेल्या ढवळगड ह्या किल्ल्यावरील अवशेषांची नोंद घेऊन व तो दुर्गप्रेमींसाठी प्रकाशात आणल्याबद्दल अनेक जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. ढवळगड किल्ल्यावर मी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा दिलेल्या भेटीत किल्ल्यावरचे तटबंदी, पडलेला दरवाजा, मेटांच्या जागा, पाण्याची टाकी, मंदिर इत्यादी अवशेष दिसल्यावर इतक्या सुंदर किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध रीतीने तपासणी करून व त्यावर अभ्यास करून तो दुर्गप्रेमींसमोर मांडला पाहिजे असं लक्षात आल्याने त्या कामात डॉ. सचिन जोशी यांची मदत घेण्यात आली. दि. 19 मे 2018 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केलेल्या पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आम्ही दुर्गमित्रांचे आभारी आहोत. काल भारत इतिहास संशोधक मंडळातील पाक्षिक सभेचे निमंत्रण व ऑनलाइन वृत्तपत्र, Whatsapp वरील काही मेसेजेस व वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या यावरून अनेक दुर्गप्रेमी मित्रांनी अभिनंदन केले. तसेच काही मित्रांनी फेसबुकवर ढवळगडाच्या "शोध" या शब्दाबद्दल विचारणा केली. त्याबाबत हा छोटासा खुलासा.
1. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ढवळगड हा किल्ला आधीपासूनच त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तो हरविला होता असे आमचे कोणाचेही मत नाही. गडावरील ढवळेश्वर मंदिर व ढवळगड संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असल्याने स्थानिक ग्रामस्थ बांधवांनाही ते माहीत आहेच. आंबळी येथील ग्रामस्थांना याबद्दल माहिती होती हे आम्ही आमच्या सादरीकरणात सांगितले होते. तसेच सादरीकरण झाल्यावर आंबळी ग्रामस्थांचे आभारही मानले. त्यामुळे आम्ही हा किल्ला शोधलेला नाही.
2. संशोधन निबंध सादरीकरणाच्या वेळी आम्ही किल्ला शोधला असा कुठेही दावा न करता ढवळगडाच्या वास्तूंचा व अवशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला आहे असे मांडले होते. ढवळगडाला "किल्ला" या स्थापत्यप्रकाराची सर्व परिमाणे वापरून तो दुर्गप्रेमींना परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे असेच नमूद केले होते. आमच्या रिसर्च पेपरचा मथळा जरी "शोध ढवळगडाचा" असा होता. पण त्याविषयीचा खुलासा पाक्षिक सभेच्या सुरुवातीलाच केला होता. त्यावरील अवशेषांची नोंद घेऊन भटक्यांच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले इतकंच.
3. काही दुर्गप्रेमी मित्रांनी शिवाजीराव एक्के सरांच्या " पुरंदरचे धुरंधर"पुस्तकामध्ये ढवळगडाचा फोटो सकट उल्लेख आल्याचा खुलासा केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्के सर स्वतः या सादरीकरणाच्या वेळी त्या सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यावेळी आमच्या संशोधनाविषयी कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी आमच्या या अभ्यासबद्दल शाबासकीची थापच दिली.एक्के सरांच्या पुस्तकात ढवळगडचा फक्त एक फोटो आहे. पण किल्ल्याची संपूर्ण माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.याच बरोबर जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे सर, आनंद पाळंदे सर, पुणे जिल्ह्यातील किल्ले या विषयावर लिखाण केलेले तापकीर सर यांच्या पुस्तकात या किल्ल्याची माहिती आलेली नाही.
एक्के सरांच्या पुस्तकात व इतर काही पुस्तकांमध्ये ढवळगडाचे निश्चित वर्णन आढळून न आल्याने आम्ही त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून, त्याची मोजमापे घेऊन, त्याची शास्त्रशुद्ध रेखाटने ( Drawings) करून, त्यांची पुरातत्वीय पद्धतीने नोंद घेऊन ती संशोधनाच्या व्यासपीठावर मांडली होती. तसेच त्या किल्ल्याचा कालखंड व तेथील सर्व अवशेष याची माहिती लोकांसमोर आणली. एक्के सरांच्या म्हणण्यानुसार त्या किल्ल्याची ऐतिहासिक दृष्ट्या (घटना वगैरे) फारशी माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या मूळ संशोधनाचा विषय पुरंदर परिसर हा असल्याने त्यांनी ढवळगडावर लिखाण केले नाही. त्यामुळे कदाचित त्या पुस्तकात त्या फोटोपुरता व उल्लेखापुरता ढवळगड मर्यादित राहिला व त्यावरील अवशेषांवर विस्तृत लिखाण झाले नसल्याने त्याची नोंद दुर्गप्रेमींच्या नकाशावर आली नसावी. पण त्यांनी यासंदर्भात केलेल्या प्रदीर्घ कामाचा आदर आहे.
४. मग आता आम्ही काय वेगळं केलं ??
तर याआधी ढवळगडावर पुरातत्वीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नव्हते व ते कुठेही प्रकाशित नसल्याने ढवळगड हा तमाम दुर्गप्रेमींच्या तसा विस्मृतीतच गेला होता. ढवळगडाला आजवर अनेकांनी विविध कारणासाठी भेट दिली असेलही पण त्याच्या सर्व अवशेषांचा अभ्यास व त्यांची नोंद कुठेही प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या व दुर्गप्रेमींच्या यादीत समाविष्ट झाला नव्हता. तसेच पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही ढवळगडाची "किल्ला" म्हणून नोंद नाही. त्यामुळे कदाचित आमच्या अभ्यासानंतर आता याची नोंद इतर किल्ल्यांप्रमाणे ‘किल्ला’ म्हणून शासकीय गॅझेटियरमध्ये होऊ शकेल.
५. आम्ही काय नवीन केले ?
ढवळगड किल्ल्याचा अभ्यास करताना गडावर पुढील अवशेष दिसून आले. पाण्याची दोन टाकी(त्यापैकी एक खांब टाके), गडाबाहेर एक टाके, मेट्याच्या दोन जागा, तेथील गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके, दुसऱ्या मेटावरील चुन्याचा घाणा, तेथील राहत्या घरांचे अवशेष, गडाची तटबंदी. त्यात उभे असलेले बुरुज, उभे नसलेले बुरुज, देवडी, कमानीचे दगड, तटबंदीमध्ये बांधलेली खोली ( तेथे सध्या मंदिर झाले आहे), गडावरील विटांची, दगडाची बांधकामे, तेथे मिळालेले खापरांचे तुकडे, इ. अवशेषांची आम्ही तेथे जाऊन नोंद केली. सर्व वास्तुंची रेखाटने तयार केली. हे काम यापूर्वी कोणी केल्याचे आमच्या तरी माहितीत नाही. किल्ल्याचा उल्लेख त्रोटक स्वरुपात अनेक अभ्यासकांनी केला होता. उदा. श्री. कृ.वा. पुरंदरे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री. एक्के सर, श्री. अभिजित बेल्हेकर इ. पण वर उल्लेख केलेल्या अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण आणि त्याचा सखोल अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता. तो करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
काही वृत्तपत्रांच्या बातमीमध्ये आणि फेसबुक पोस्टमध्ये चुकून "किल्ला शोधला" हे शब्द वापरले गेल्याने कदाचीत काही दुर्गप्रेमींचा गैरसमज झाला असावा. त्या बातमीतील व पोस्टमधील शब्दांमुळे जो गैरसमज झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ती पोस्ट आम्ही लगेचच दुरुस्त केली.
आमच्या सादरीकरणाच्या वेळी अनेक भटक्या मित्रांनी उपस्थिती लावली तसेच त्यांनी संशोधनाविषयीचे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटी हाच खुलासा करावासा वाटतो की ढवळगड हा किल्ला आम्ही शोधला नसून त्याच्या वास्तूंची पुरातत्वीय अंगाने नोंद घेऊन, त्यांची रेखाटने करून व त्या नकाशावर मांडून त्या लोकांसमोर आणल्या व ढवळगड हा काहीसा विस्मृतीत गेलेला किल्ला पुन्हा एकदा भटक्यांच्या नकाशावर आणला. ज्या दुर्गप्रेमींना हा किल्ला माहीत नव्हता त्यांनी आता ढवळगड आपल्या यादीत नोंदवल्याने या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे व आमच्या अभ्यासाचं तसेच किल्ल्याच्या अवशेषांची नोंद घेण्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यामुळे हा शोध नसून विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची नोंद घेऊन तो भटक्यांच्या नकाशावर आणल्याचा खुलासा मी यानिमित्ताने करतो व या चर्चेला पूर्णविराम देतो.
ओंकार ओक

व्लॉगर पाटील's picture

25 Feb 2019 - 8:08 pm | व्लॉगर पाटील

मी पण अशीच एक पोस्ट पाहून या गडाला भेट देण्यासाठी गेलो होतो .
दिलेल्या माहिती बद्दल विशेष आभार!!

दुर्गविहारी's picture

24 Feb 2019 - 10:02 am | दुर्गविहारी

ढवळगडाचे काही फोटो पोस्करतॉतो.
dvh1
सचिन जोशी व ओंकार ओक
dvh2

dvh3

dvh4

dvh5

dvh6

dvh7

dvh8

कपिलमुनी's picture

24 Feb 2019 - 11:33 am | कपिलमुनी

परवानगीची समस्या आहे असा अंदाज आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2019 - 10:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आभार.

-दिलीप बिरुटे