पूर्व आफ्रिका भटकंती - इथियोपिया लाईव्ह ब्लॉग

Primary tabs

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
18 Feb 2019 - 9:42 am

माझ्या पूर्व आफ्रिकेतील भटकंतीचा त्यावेळी लाईव्ह प्रकाशित केलेला वृत्तांत. मुख्यतः इथियोपिया देशांतील प्रवास पण दक्षिणेत सीमेवरील आदिवासी भागांत केनिया व दक्षिण सुदान प्रांतातही फेरफटका मारला. अफगाणिस्तानभेटीप्रमाणेच लाईव्ह ब्लॉगिंग चा हेतू जोखमीच्या भागातून भटकताना आवश्यक ती माहिती काही लोकांसाठी प्रकाशित करत राहणे व बाकी वाचकांनाही आडवाटेवरच्या भटकंतीची एक व्हर्चुअल सफर. तसा आफ्रिकेतील हा दुसरा प्रवास, गेल्या वेळी फ्रेंच भाषिक पश्चिम आफ्रिकेत भटकंती झाली त्यात आफ्रिकेची तोंडओळख झाली, आता यावेळेस कैक पटींनी कठीण व दुर्गम भागातून प्रवास...

फेब्रुवारी १७ आदिस अबाबा, इथियोपिया.

'शत शब्द' लेटेस्ट ट्रेंडचा भटकंतीत उपयोग होतोय का पाहू म्हंटलं... आणखी एक अॉलमोस्ट लाईव्ह भटकंती! पण यावेळेस टोलेजंग इमारती किंवा स्मारके असे काहीच नसणारे... सुसंस्कृत मानव ते सुसंस्कृत भारतीय ही उत्क्रांती जेथे सुरू झाली त्याचा मागोवा घेत अफगाणी दऱ्याखोऱ्यातली भटकंती हा २०१८ विशेष होता, यावेळेस इतिहासाची आणखी काही पाने, किंबहुना खंड अलिकडे जात आद्य पाउलखुणांचा शोध... ज्ञात इतिहासाच्या अगदी मूळारंभापाशी नेणारा... पृथ्वीवरचा एक अतिप्राचीन आणि अस्थिर भूभाग व परग्रहावरील वाटावे असे एक्स्ट्रीम वातावरण यांतून वाटचाल... काल दुबईत ४० मिनीटांच्या लेओव्हरमध्ये प्रकाशन जमलं नाही... आता देशांत दाखल झालो आहे व पुढे ईशान्येकडे प्रयाण! अतिदुर्गम भूभाग असल्याने पाहू जमेल तसे...आफ्रिकेचा किनारा

फेब्रुवारी १८ दानाकील, इथियोपिया.

काल आदिस आबाबाहून उत्तरेस मेकेलेपर्यंत प्रवास केला, पहिला मुक्काम मेकेले. नेहमीप्रमाणे अॉनलाईन ओळखीवर एकाच्या घरी मुक्काम. अनाथाश्रमात वाढलेले २३-२४ वयाचे दोन मित्र दुनियादारीस तोंड देत एका अर्धवट बांधलेल्या इमारतीत स्वतःची दुनिया उभी करत असलेले पाहून आयुष्यावर एक वेगळी केस स्टडी मिळाली!

असो, पुढील प्रवास रिफ्ट व्हॅलीकडे. दानाकील डिप्रेशन, समुद्रसपाटीपासून १०० मीटरपेक्षाही खाली, जगातील सर्वांत उष्ण जागा. एकेकाळी समुद्राखाली असलेला भूभाग उलथापालथीमुळे अलग पडला व कालांतराने समुद्राचे पाणी आटत येथे विस्तीर्ण रण (सॉल्ट फ्लॅट्स) तयार झाले. पहिल्या मुक्कामी या भागास भेट. हा अफर प्रांत असून सोमाली वंशाच्या अफर टोळ्या इथे राहतात. मिठाचा व्यापार मुख्य. इरिट्रीया सीमा जवळच असल्याने येथे जाताना सशस्त्र गार्ड बरोबर न्यावा लागतो. आजपासून रिफ्ट व्हॅलीची एक एक नवलाई समोर यायला सुरूवात...

सेलीचे घर ०१


सेलीचे घर ०२


सेलीचे घर ०३


इथिओपियन कॉफी


लवण-रण (salt flats) ०१


लवण-रण (salt flats) ०२


लवण-तलावात डुबकी (Dip in salt lake; close to Dead Sea in salinity)


फेब्रुवारी १९ दानाकील, इथियोपिया.

काल बऱ्याच दुर्गम भागांत प्रवास असल्याने अपेक्षेप्रमाणे इंटरनेट नव्हते. सॉल्ट फ्लॅट्स जवळच अहमदिया खेड्यात मुक्काम होता. मस्त उघड्यावर खाटेवर ताणून दिली...
त्यानंतरच्या दिवशी, दाल्लोल येथे एक अत्यंत विस्मयकारक गोष्ट पाहिली. खनिज मिठाच्या पर्वतावर भूअंतर्गत प्रक्रीयांची खुली प्रयोगशाळा! सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे व पाण्याचे उकळते झरे, गंधक व इतर क्षारांचे साठे अशी पहिला जीव जन्माला येण्याआधी निसर्गाने जा तयारी केली असेल त्याचे अवशिष्ट संग्रहालयच म्हणा ना! पृथ्वी वरील वाटूच नये असे... वर्षभर कमाल तापमान ४०–५० च्या घरात, ३० म्हणजे थंडी! भोवताली अनेकविध भूरूपे... सर्व पाहून मुख्य गंतव्याकडे प्रयाण, एर्ता आले जागृत ज्वालामुखी! रात्रीची चढाई करून थेट क्रेटरच्या काठी मुक्काम!दल्लोल येथिल गंधकाची पुटे असलेली आम्ल डबकी (Acidic ponds and sulfur deposits at Dallol) ०१


दल्लोल येथिल गंधकाची पुटे असलेली आम्ल डबकी (Acidic ponds and sulfur deposits at Dallol) ०२


दल्लोल येथिल गंधकाची पुटे असलेली आम्ल डबकी (Acidic ponds and sulfur deposits at Dallol) ०३


मंगळाचा पृष्ठभाग (Martian landscape)


लवण-घाट (salt terraces)फेब्रुवारी २० एर्ता आले, इथियोपिया.

आत्ताच ट्रेक संपवून मेकेलेच्या परतीच्या वाटेवर. आधी कालचे अपडेट टाकले, रंगीबेरंगी क्षारांच्या दुनियेची सैर झाल्यानंतर आठ तासांची ड्राईव्ह, त्यातील तीन तास डांबरी रस्ता, एक तास वाळू आणि पुढे लाव्हा फील्ड मधून... कल्पनेपलिकडे रफ... पुढे बेस कॅंपवर जेवण आटोपून रात्री ट्रेक. रात्री तापमान सहसा तिशीत उतरते त्यामुळे. अन्याथा ४०-५० डिग्रीत काळ्याकभिन्न कातळावर १० किलोमिटर चाल अशक्य... साधारण साडेतीन तासात माथ्यावर. एकूण तीन मोठी विवरे असून मधल्यात जिवंत लाव्हा आहे. प्रचंड प्रमाणात विवीध वायू सतत उत्सर्जित होत असतात. रात्रीत विवर जवळून पाहिले. प्रचंड धूर नि त्याला भगवा ग्लो... थकवा बराच होता, पण ५ पर्यंतच झोप, सकाळी सूर्योदयाला ज्वालामुखीचे उजेडातले दर्शन आणि तातडीने उतरण, उन्हं चढायच्या आत खाली बेस कॅंप. थोडंसं खाऊन पुन्हा धक्केखाउ ड्राइव्ह वर... आत्ताच वाळूचा पॅच संपून थोडे अंतर येतायेता पटापट लिहितोय. काही खाणी व कारखान्याचे टॉवर लागताहेत अधमधे तेव्हा पोस्ट करतो. फोटोसाठी गूगल साथ देत नाहीये परंतु रात्री पाहतो आज.सशस्त्र संरक्षक


ज्वालामुखीचे मुख (Edge of the crater)


ज्वालामुखी (Edge of the crater)

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् ।होतारं रत्नधातमम् ॥
अग्निः पूर्वेभिरृषिभिरीड्यो नूतनैरुत । स देवां एह वक्षति ॥

सूर्योदयसमयी अग्नीसुक्ताने त्रिरूप अग्नी स्तवन, सूर्यरूपी अग्नी, पृथ्वीच्या गर्भातील अग्नी व अंतःस्थ वैश्वानर!लाव्हा प्रदेश (Lava fields) : ०१


लाव्हा प्रदेश (Lava fields) : ०२


लाव्हा प्रदेश (Lava fields) : ०३

फेब्रुवारी २१ आदिस अबाबा, इथियोपिया.

आज कदाचित २ अपडेट्स टाकेन. सकाळी मेकेलेहून निघून आदिस आबाबा, पुढे आता सुदूर नैरुत्येस आदिवासी प्रदेशात प्रवास. दक्षिण सुदान, इथियोपिया व केनियाच्या सीमा येथे एकत्र येतात. आधुनिक सीमारेखांना फारसे न जुमानता अनेक जमाती इथे शतकानुशतके नांदत आहेत. त्यांपैकी काहींचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न.

उत्तरेतील प्रवास फारच उत्तम पार पडला. अतिप्राचीन मानवाचे सर्वात जुने अवशेष जिथे सापडले ते हे दोन प्रदेश. त्यातील सुप्रसिद्ध कुलमाता (earliest known descendant of genetic ‘Mitochondrial Eve’) ‘ल्युसी’ ही देनाकील येथील तर ओमो ग्रुप दक्षिण सीमेवरचा. Human archeology and anthropology चा हा आरंभबिंदू. येथून मानव कुलवंश विस्तारत झपाट्याने अन्य भागांत पसरला. त्यामुळे वंश रूप निरपेक्ष, तुम्हा-आम्हासहित सर्वांनी येथून आणलेला काही भाग पिढ्यानुपिढ्या संक्रमित करत स्वतःत जपलेला आहे...

फेब्रुवारी २१ तुर्मी, इथियोपिया.

Southern nations, nationalities and people’s region (SNNP) हे इथियोपियाच्या नैरुत्य सीमेवरील राज्याचे नावच बरेच काही सांगून जाते. आधुनिक राष्ट्र-राज्य संकल्पना जिथे पुसट होतात तो हा प्रदेश. विवीध जमातींचा आपापला इलाका, बाजारपेठा, उत्सवपेठा अशी शतकानुशतके चालत आलेली पद्धत. आदिसहून या राज्यांत जिंका येथे पोहोचलो, पुढे पहिला थांबा ‘के आफेर’. आज गुरूवारचा बाजार लागतो तिथे. हामार बेणा आणि आरी अशा तीन जमातींची ही पेठ. कलाकुसरीच्या वस्तू, अन्न, बाकी उपयोगाच्या गोष्टी अशा व्यापाराची ही जागा. पहिलाच दिवस असल्याने इथली औपचारिकता जरा समजून घेणे चालले आहे. इथेच जेवण करून मुक्कामासाठी पुढे तुर्मी येथे. हे हामार लोकांचे गाव. इथून साधारण पन्नास किलोमीटर च्या परिघात दक्षिण सुदान व केनिया च्या (कागदोपत्री) सीमा आहेत. आता पुढील प्रवास या क्षेत्रात. आफ्रिकेची सांस्कृतिक विवीधता!


बेणा जमात


हामार जमातफेब्रुवारी २२ कोर्चो, इथियोपिया.

कालपासून तुर्मी मध्ये वीज नाहीये. रात्रीनंतर मोबाइल टॉवरचा जनरेटर पण बंद पडला व रेंजही गेली. आत्ताच डिझेल आलं नि तो चालू झाला. असो...

आज पहाटेच लवकर आटोपून कारो जमातीच्या कोर्चो खेड्याकडे प्रस्थान. कच्चा रस्ता, पण बरा आहे. काल राहिलो तिथली शेजारची अजून दोन छोटी मुलं आज बरोबर येतो म्हणाली त्यामुळे आता एकूण ६ जण झालो आहोत. वाटेत नाश्ता आटोपून लवकरच गावात पोहोचलो. हे गाव ओमो नदीच्या उंच काठावर वसले आहे. ही जमात अंगभर पांढरी चित्रे काढतात, त्याने सनस्क्रीनचेही काम होते. इथून पुढे जरा सेन्सिटिव्ह इलाका आहे. सर्व जमाती आपापसातील वैर अजूनही बाळगून आहेत आणि बाकी काही नाही सुधारले तरी काळानुरूप त्यांची शस्त्र मात्र सुधारली... काही ठिकाणी आम्हालाही गन बाळगावी लागेल... वाटेत निसर्गाची अमाप श्रीमंती!! उल्लेखनीय, माळढोक पाहिला... जवळून... पिल्लासहित! व्हूप व्हूप करत झेप घेतानाही...सूर्योदय


ढाबा... मित्र/कुटुंब एका ताटातच जेवायची पद्धत आहे


कारो जमात


पारंपारिक थाळी : डोशासारखा टेफ पासून बनवलेला इंजिरा व भाज्या/डाळीफेब्रुवारी २३ जिंका, इथियोपिया.

काल संध्याकाळ नंतर भरपूर धावपळ, तुर्मीहून दक्षिणेकडे ‘दासानेच’ जमातीच्या इलाख्यात. यांत सीमेपलीकडचे क्षेत्रही येते. त्यामुळे दक्षिण सुदान, तिथून केन्या व पुन्हा परत इथियोपिया. प्रवासातला हा दुसरा व सर्वात जोखमीचा भाग. म्हंटलं तर बेकायदेशीर, कारण बाकी दोन देशांचे व्हिझा नव्हते, पण असूनही उपयोग नसताच कारण इथे त्यांच्या चौक्याच नाहीत. पण सैनिकी गस्त असते. Took a chance बिनधास्त जाउन आलो आणि सगळं व्यवस्थित पार पडलं पण पायपीट फार झाली. कालच द. सुदानमधे यादवीमुळे पुन्हा आणिबाणी लागू झाली आहे पण या भागांत त्याची झळ नाही. असो, तर, दासानेच लोकांना भेटून आलो. याच भागांत ओमो नदीच्या खोऱ्यात प्राचीन मानवी अवशेष मिळाले ती जागाही जवळच (https://en.m.wikipedia.org/wiki/Omo_remains). तिथून परत येईपर्यंत दुपार झाली. थेट दिमेका येथे गेलो, तेथे बाजार भरतो शनिवारचा. बेणा हामार व त्सेमे जमातींमधील लोक येतात. क्वचित कारो व न्यांगाटुमही. तिथे एक उत्तम घटना घडली, ‘बुल जंपिंग’ चे आमंत्रण आले. हि एक हामार प्रथा, वयात आलेल्या मुलांसाठी, लग्न करण्याच्या अधिकारासाठी त्याला भर गावासमोर १०-१२ गाई-बैलांच्या पाठीवरून नागव्याने उड्या मारत २-४ वेळा पार व्हायचे असते. गुरं शिंगानी व शेपट्यांनी पकडलेली असतात. सारा गाव त्याचा उत्सव करते. फार वेगळा व अनुभवण्यासारखा प्रसंग, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य माणसाबरोबर असल्याने निरोप मिळाला व हामार जीवन जवळून पाहता आले. जाम तंगडतोड झाली आज... आज मुक्काम जिंका येथे, उद्या कमी जोखमीचा कार्यक्रम पण तरी सशस्त्र साथी सोबत असेल...दिमेका शनिवार बाजार


ओमो नदी


एका दासानेच युवतीने माझ्या कॅमेरासाठी अलंकार सुचवले... तिची कल्पकता व मार्केटिंग या दोन्हीचे कौतुक म्हणून कसेही दिसत असले तरी मी ते घेतले


हामार उत्सव


Bull jumping ceremony


दासानेच भगिनी... योगायोग की कपड्याचे रंग ठरवल्यासारखे मॅच झालेत... मित्राने ‘तू जुनेपाने कपडे घेउन जातोस ना ट्रिपला, हा घेउन जा, टाकून द्यायचाय’ म्हणत मला दिलेला माझाही नाहीये खरं टीशर्ट... it had destiny too!


केनिया सीमा

फेब्रुवारी २४ आदिस आबाबा, इथियोपिया.

आज भटकंतीचा शेवटचा दिवस. तीन दिवसांनी आज काही वेळ वीज मिळाली पण वादळी पावसाने तीही गेली. पहाटेच आज प्रवासास सुरूवात, गंतव्य मागो नॅशनल पार्क, व तेथील मूर्सी वस्ती. मुर्सी ही सगळ्यात आक्रमक जमात, त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात जाताना सुरक्षा रक्षक बरोबर असावा लागतो. या भागांत बरीच दाट झाडी आहे. मुख्य गावातील अनुभव ठीक होता. या लोकांची स्व-सजावटीची आवड जगावेगळी आहे. ओठात व कानात मोठाले मातीच्या चकत्या, दात, हाडे, शिंगं, फळं फुलं सगळे वापरतात. हा या भटकंतीतला शेवटचा थांबा. परतीचा प्रवास सुरू...मूर्सी जमात


या भटकंतीचा मुख्य हेतू बाकी जगापेक्षा वेगळे भौगोलिक व सांस्कृतिक सौंदर्य अनुभवणे हा होता व हवामान, भेटलेले लोक, व उत्तरेत सहप्रवासी यामुळे उत्तम साध्य झाला. या प्रवासाचे आणखी एक वैशिष्टय, दक्षिणेत आदिवासी भागांत इतक्या दिवसांत एकही अन्य सोलो/एकल प्रवासी भेटला नाही. शारीरिक श्रम, मानसिक तयारी व खुद्द सहलीत आलेले अनुभव, सर्वच पातळीत या सफरीने काठिण्याचे सर्व विक्रम मोडीत काढले. अगदी अफगाण प्रांतातही वैयक्तिक सुरक्षेसाठी सोय केली नव्हती ती इथे लागली. प्रत्येक जमातीची वेगळी भाषा, वेगळ्या रिती त्यामुळे त्या अडचणी अजूनच निराळ्या... पण या सर्व अनुभवात आफ्रिकेच्या थेट हृदयाला स्पर्श नक्की केला! आणि ते प्रवासाचे साफल्य!।। इति लेखनामर्यादा ।।अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2019 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

मादागास्कर ?

रिफ्ट व्हॅली, इथिओपिया ?

पैलवान's picture

19 Feb 2019 - 8:01 am | पैलवान

मनात n'th वेळा परत तोच प्रश्न...
कसं काय जमतं ब्वॉ!!

कंजूस's picture

19 Feb 2019 - 8:36 am | कंजूस

नाही जमत.

जव्हेरगंज's picture

19 Feb 2019 - 10:19 am | जव्हेरगंज

ग्रेट. वाचतोय..!

अनिंद्य's picture

19 Feb 2019 - 12:10 pm | अनिंद्य

वाचणार !
तुमच्या देश / प्रवास निवडीचे फार कौतुक आहे.

नावातकायआहे's picture

19 Feb 2019 - 9:47 pm | नावातकायआहे

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११

निशाचर's picture

21 Feb 2019 - 4:01 am | निशाचर

मस्त चालली आहे भटकंती. फोटो मात्र पाचसहाच दिसत आहेत. बाकीच्या फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस नसावा.

नंदन's picture

19 Feb 2019 - 12:40 pm | नंदन

यावेळेस इतिहासाची आणखी काही पाने, किंबहुना खंड अलिकडे जात आद्य पाउलखुणांचा शोध... ज्ञात इतिहासाच्या अगदी मूळारंभापाशी नेणारा... पृथ्वीवरचा एक अतिप्राचीन आणि अस्थिर भूभाग व परग्रहावरील वाटावे असे एक्स्ट्रीम वातावरण यांतून वाटचाल

__/\__

तुमच्या सोयी-सवडीनुसार शशभचे भाग येऊदेत. आम्ही वाचनोत्सुक आहोतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2019 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो प्लिज.

-दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

19 Feb 2019 - 1:30 pm | सुधीर कांदळकर

सुग्रास मेजवानीच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

दुर्गविहारी's picture

20 Feb 2019 - 12:55 pm | दुर्गविहारी

उत्तम ! वाचायला मजा येणार. फोटो शिवाय भटकंती अपुरी आहे. पु.भा.ल. टा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Feb 2019 - 1:49 am | डॉ सुहास म्हात्रे

फोटो मस्तं आहेत.

सफर मस्तं चालली आहे... फोटोंमुळे अजूनच मजा येत आहे.

पैलवान's picture

21 Feb 2019 - 6:07 am | पैलवान

चे अपडेट भन्नाट!

फोटो फार वाढले धाग्यात तर धागा उघडत नाही. अॅल्बमची लिंक / कलादालनात टाका.
डायरी आवडली.

प्रचेतस's picture

21 Feb 2019 - 8:25 am | प्रचेतस

जबरदस्त आहे हे.

पैलवान's picture

22 Feb 2019 - 8:10 am | पैलवान

फक्त दिसतोय. बहुतेक पब्लिक ऍक्सेस नाहीये. क्रोममध्ये गुगल ला लॉगिन असताना ही दिसत नाहीयेत.

बाकी आपली मायटोकॉन्द्रियल पणजी कै. ल्युसी, त्या स्थळावर गेल्यावर मला तरी भरून येईल. कन्याकुमारीला कसं, आख्खा भारत आपल्या मागे उभा असल्यासारखं वाटतं, तस काहीसं वाटेल. यच्चयावत मानवजातीचं उगमस्थान!!

यशोधरा's picture

22 Feb 2019 - 8:33 am | यशोधरा

हेवा वाटतो तुमचा
आले मनात की चालले फिरायला!
फोटो दिसत नाहीयेत.

समर्पक's picture

22 Feb 2019 - 4:02 pm | समर्पक

बदल केला

श्वेता२४'s picture

22 Feb 2019 - 4:16 pm | श्वेता२४

काही फोटो दिसत आहेत. काही नाही. पण पुढील भाग येऊद्यात. तुम्ही भटकंतीसाठी निवडलेला भाग फारसा परिचयाचा नाही. सबब नवीन माहिती मिळत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Feb 2019 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे भटकंती.

आता सर्व फोटो दिसत आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

23 Feb 2019 - 10:58 am | प्रमोद देर्देकर

मला सर्व फोटो दिसत आहेत .
तुमची सफर हटके आहे. लोक युरोप आणि अमेरिका फिरायला जातात पण तुम्ही एक वेगळा प्रदेश निवडला आहे.

एका वेगळ्या जगाची ओळख होतेय तेव्हा भरपूर लिहा आम्ही वाचतोय .

फक्त सांगा तिथे प्राणवायूचे प्रमाण कमी आहे काय ? आणि जास्त काळ राहिल्यावर वातावरणाचा शरीरावर काही परिणाम नाही का होत?

समर्पक's picture

26 Feb 2019 - 10:04 am | समर्पक

प्राणवायू फक्त ज्वालामुखी क्षेत्रात कमी आहे. विवरातून सतत धूर व वायू बाहेर पडत असतात, त्यातील सल्फर डायॉकसाईड सगळ्यात घातक कारण पाण्याबरोबर मिसळून त्याचे आम्ल तयार होते व फुप्फुसातील पेशींना मारक असते. पण दीर्घकाळ तिथे श्वास घेतला तर...
बाकी भागात किंबहुना प्राणवायू जास्तच असेल कारण हवेची घनता समुद्रसपाटीपेक्षाही कमी उंचीवर असल्याने अधिक

मार्कस ऑरेलियस's picture

23 Feb 2019 - 12:26 pm | मार्कस ऑरेलियस

भारीच !!

मी हिरव्या देशात होतो तेव्हा इथिओपियन इरिथ्रियन होटेलात चिकन टिब्स विथ इजेरा मायसर अ‍ॅन्ड फोसोलिया ऑन साईड्स खल्ल्याचे आठव्ले , एक नंबर चव असते !!

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2019 - 1:00 pm | चौथा कोनाडा

वाह, किती थरारक !
फोटोज आणि आटोपशीर वर्णानानं मला डायरेक्ट इथियोपियालाच नेलं !
ज्वालामुखी परिसरातील फोटो किती सुंदर आहेत ! दिलखेचक रंगांची नुसती उधळण !
समर्पक, तुम्हाला मानाचा मुजरा ! आणि अर्थातच पुढील भागाची आतुरतेने वाट पहातोय !
(तटि: मला पण सर्व फोटो दिसत आहेत)

सुधीर कांदळकर's picture

23 Feb 2019 - 7:45 pm | सुधीर कांदळकर

त्यामुळे थरार वाढला आहे. संपादक मंडळपैकी कोणीतरी फोटो दिसावेत म्हणून काहीतरी करावे. इतर लेखातले दिसताहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2019 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा भागही मस्त आहे.

दिमेका आठवडी बाजार, हामार उत्सव आणि बुल जंपिंग सेरेमनीचे फोटो खास आवडले !

एका वेगळ्या जगाचा रोचक परिचय होत आहे. सद्या फिरत असल्याने व तांत्रिक कारणांनी सविस्तर लिहिणे शक्य नसणार. मात्र, परतल्यावर अनुभवांचा सविस्तर लेख जरूर लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2019 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

मळलेली वाट सोडून केलेली रोचक सफर. फोटोही मस्तं.

आता परतल्यावर तपशीलवार अनुभव लिहिलेत तर वाचायला नक्की आवडतील.

पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्छा !

सुधीर कांदळकर's picture

28 Feb 2019 - 7:25 pm | सुधीर कांदळकर

त्रुटी काढणार्‍यास/काढणारीस धन्यवाद. आपला हा प्रवास आणि मध्य अमेरिकेतला प्रवास अफलातून, थरारक. मला तर इतिहासकार रिचर्ड बर्टन यांची आठवण झाली. पुभाप्र धन्यवाद.

पैलवान's picture

1 Mar 2019 - 8:08 am | पैलवान

अ.फ.ला.तु.न.

अनिंद्य's picture

1 Mar 2019 - 11:22 am | अनिंद्य

जबरदस्त.

तुमची पुढची भटकंती कुठली असेल याबद्दल तुमच्याएव्हढीच उत्सुकता आम्हा वाचकांना आहे.