हॅरी पॉटर भाग पाच - .
या भागात पुस्तकं न वाचलेल्यांसाठी खूप स्पॉईलर्स आहेत , कथेची जवळपास पुर्ण पार्श्वभूमी आहे .
हॅरी पॉटरच्या जगतातील महत्वाची पात्रे -
एल्बस डम्बलडोर आणि वोल्डेमॉर्ट नंतर हॅरी पॉटर विश्वातील सगळ्यात महत्त्वाची पात्रं म्हणजे स्वतः हॅरी त्याचा मित्र रॉन विज्ली आणि मैत्रीण हर्माइनी ग्रेन्जर . पण त्यापूर्वी किंचित दुय्यम पण कथेच्या दृष्टीने महत्वाची पात्रं म्हणजे -
१ . जेम्स पॉटर , २. लिली पॉटर , ३ . सिरियस ब्लॅक ,
४ . रीमस लुपीन , ५ . पीटर पेटीग्र्यू ,
६ . सेव्हरस / सिवियरस स्नेप
७ . डर्स्ली कुटुंब
८ . विज्ली कुटुंबातील सर्व व्यक्ती
८ . मॅल्फॉय कुटुंब
१ . जेम्स पॉटर , सिरियस ब्लॅक , रीमस लुपिन ,
पीटर पेटीग्र्यू -
जेम्स पॉटर हा प्युअरब्लड आणि श्रीमंत अशा जादूगार घराण्यात जन्माला आला होता . पण हे घराणं शुद्ध रक्ताला अवास्तव महत्व देणारं किंवा मगल लोक व मगल कुटुंबात जन्माला आलेल्या जादूगारांचा तिरस्कार करणारं नव्हतं . तर माणसांना त्यांच्या अंगभूत गुणांनुसार , स्वभावानुसार महत्व देणारं होतं . जेम्सचं लहानपण खूप प्रेमळ वातावरणात , लाडाकोडात गेलं . तो होताही अतिशय बुद्धिमान . जादूगारांच्या क्विडीच या खेळात तो निपुण होता . हॉगवर्ट्स मध्ये आल्यावर लवकरच त्याची ग्राइफिन्डोरच्या क्विडीच संघात धावक / चेसर म्हणून निवड झाली ... ( चित्रपटात सीकर दाखवलं आहे ) . आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि स्वभावाच्या जोरावर जेम्स सगळ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी बनला आणि क्विडीचमधल्या नैपुण्यामुळे सहाध्यायी विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत बनला .. ग्राईफिन्डोरच नाही तर रेव्हनक्लॉ आणि हफलपफ हाऊसेसच्या विद्यार्थ्यांमध्येही तो लोकप्रिय होता . हॉगवर्ट्समध्ये जेम्सला तीन जिवलग मित्र मिळाले - सिरियस ब्लॅक , रीमस लुपीन आणि पीटर पेटीग्र्यू .
सिरियस ब्लॅकही प्युअरब्लड घराण्यातील होता पण त्याचं कुटुंब जेम्सच्या कुटुंबाहून अगदी विरुद्ध टोकाचं होतं . शुद्ध रक्ताला अवास्तव महत्व देणारं , मगल व मगलबॉर्न लोकांना तुच्छ मानणारं , त्यांचा तिरस्कार करणारं . साधारणतः एका कुटुंबातील सर्वजण एकाच हाऊसमध्ये असत ... सिरियसचे आईवडील , आजीआजोबा आणि सगळे पूर्वज स्लायदेरीन हाऊस मध्ये होते . पण सिरियसला मात्र आपल्या आईवडिलांचे शुद्ध रक्त - अशुद्ध रक्त , उच्च नीचता इ. बाबतचे विचार पटत नव्हते ... पहिल्या वर्षी हॉगवर्ट्स मध्ये येताना ट्रेन मध्ये जेम्स आणि सिरियस यांची ओळख आणि लगेच मैत्री झाली , यावेळी दोघेही अकरा वर्षांचे होते . आपली निवड बहुतकरून स्लायदेरीनमध्येच होणार म्हणून सिरियस मनातून नाराज होता . पण प्रत्यक्षात मात्र त्याची निवड ग्राईफिन्डोर हाऊस मध्ये झाली . ही त्याच्या कुटुंबासाठी आणि इतर अनेकांसाठी बऱ्यापैकी धक्कादायक बाब होती . सिरियससुद्धा जेम्स इतकाच बुद्धिमान आणि जादूत निपुण होता ... त्यांची मैत्री दिवसेंदिवस गाढ होत गेली .
सिरियस व जेम्स यांना तिसरा मित्र मिळाला तो म्हणजे रीमस लुपीन ... रीमसही अतिशय बुद्धिमान होता .
चवथा मित्र पीटर बुद्धिमत्ता व जादुई कौशल्य यांच्या बाबतीत वरील तिघांपेक्षा खूप कमी होता .... थोडासा ढबू म्हणता येईल . आपल्यापेक्षा बुद्धिमान , निपुण आणि जादूत शक्तिशाली , वेळप्रसंगी उपयोगी येतील ,त्याचं संरक्षण करू शकतील असे खमके मित्र त्याने स्वतःसाठी निवडले ....
थोड्याच काळात रीमस आपल्यापासून काहीतरी लपवत आहे हे त्या तिघांच्या लक्षात आलं व रीमस वेअरवुल्फ आहे हे रहस्य समजलं . तत्कालीन जादूगार समाजात वेअरवुल्फ्स बद्दल प्रचंड दहशत , तिरस्कार व घृणा होती व वेअरवुल्फ झालेल्या जादुगार मुलाला हॉगवर्ट्स मध्ये प्रवेश कदापीही मिळाला नसता ..... इतर पालकांनी आपापल्या मुलांना शाळेतून काढून टाकू अशी धमकी देऊन दबाव आणला असता . पण यावेळी मुख्याध्यापक डम्बलडोर होते . त्यांच्या मनात वेअरवुल्फ्स विषयी सहानुभूती होती ... काहीही चूक नसताना दुर्दैवाने वेअरवुल्फ बनलेल्या मुलाला जादुई शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये यासाठी त्यांनी रीमस लुपीनच्या पालकांशी बोलून एक योजना आखली ..... वेअरवुल्फ झालेला जादूगार केवळ पौर्णिमेच्या रात्रीच नरलांडग्यात रुपांतरीत होतो , इतर 29 दिवस माणूसच असतो , तेव्हा दर महिन्याच्या पौर्णिमेच्या रात्री रीमसला हॉगवर्ट्सपासून दूर , गुप्त ठिकाणी हलवायची व्यवस्था करायची जेणेकरून तो पौर्णिमेची रात्र तिथे घालवू शकेल व पुन्हा माणसात रुपांतरीत झाल्यावर परत येऊ शकेल ..... अशाप्रकारे शाळेत कोणालाही तो वेअरवुल्फ आहे ह्याचा पत्ता लागणार नाही आणि तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल .
जेम्स आणि सिरियसशी मैत्री झाल्यानंतरही त्यांना हे सत्य सांगण्याचा धीर रीमसला झाला नाही ... कारण सत्य समजताच ते मैत्री तोडतील व आपण एकटे पडू अशी भीती त्याला वाटत होती . पण दर महिन्याला ठराविक दिवशीच रीमस गायब होतो व तो दिवस पौर्णिमेचा असतो यावरून सत्य काय हे समजायला जेम्स आणि सिरियससारख्या बुद्धिमान विद्यार्थ्यांना फार काळ लागला नाही . पण रीमसची भिती खोटी ठरली . जेम्स आणि सिरियसने मैत्री तर तोडली नाहीच उलट रीमसला इमोशनल सपोर्ट दिला , काही असलं तरी आम्ही तुझे मित्र आहोत व राहणार हा विश्वास दिला आणि एवढंच नाही तर रीमसचं पौर्णिमेचं रूपांतरण आणि त्या रात्री त्याला होणारा त्रास सुसह्य व्हावा म्हणून आपणही प्राणिरुपधारी - ऍनिमॅजस बनायचं असा निर्णय घेतला .... कठोर परिश्रमांनी जेम्स आणि सिरियस ऍनिमॅजस बनले . पेटीग्र्यूला सिरियस आणि जेम्सच्या मदतीची गरज भासली .... पण शेवटी हॉगवर्ट्स मधल्या पाचव्या वर्षांपर्यंत ते तिघेही ऍनिमॅजस बनण्यात यशस्वी झाले . जेम्स काळविट हरीण / बारशिंगा , सिरियस काळ्या रंगाचा मोठा कुत्रा तर पीटर उंदीर बनला . हे तिघे ऍनिमॅजस झाल्याचं कुणालाही माहीत नव्हतं , त्यांनी अगदी हेडमास्टर डम्बलडोरना देखील कसला पत्ता लागू दिला नाही .
ऍनिमॅगस बनण्यात यशस्वी झाल्यानंतर लवकरच हे चौघेही रीमसला पौर्णिमेसाठी दिलेली गुप्त जागा सोडून हॉगवर्ट्सच्या मैदानांत आणि जंगलात पौर्णिमेची रात्र घालवू लागले ....
हे अतिशय बेजबाबदार वर्तन होतं , वेअरवुल्फ प्राण्यांना इजा करत नाही पण अशा प्रकारे भटकताना एखादा माणूस समोर आला तर तो त्या माणसावर हल्ला करू शकला असता .
पण काळवीट आणि कुत्रा हे शक्तिमान आणि मोठ्या आकाराचे प्राणी होते , ते अशी वेळ आल्यास वेअरवुल्फला आवरू शकत होते . आणि अशा काही वेळा आल्याही होत्या . पण हे चौघे 15 - 18 या वयोगटात होते ... त्यामुळे स्वतःबद्दल थोडा अतिआत्मविश्वास , तारुण्यातला बेजबाबदारपणा , प्राणीरुपात मुक्त भटकण्याचा मोह ... आदीमुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ...
अशा भटकण्यातून त्यांना हॉगवर्ट्स आणि आजूबाजूच्या परिसराची खडान् खडा माहिती झाली ... या माहितीचा उपयोग करून त्यांनी हॉगवर्ट्स किल्ल्याचा जादुई नकाशा बनवला .... या नकाशात किल्ल्यातील कोणती व्यक्ती त्याक्षणी कुठे आहे , कुठे जात आहे हे दिसत असे . याचा वापर करून कुणाच्याही नजरेस न पडता स्वैर भटकणं त्यांना आणखीच सोपं झालं .
२ . लिली इव्हान्स आणि सेवरस / सिवीयरस स्नेप -
लिली ही मगल कुटुंबात जन्मलेली जादूगार होती .
लिली आणि पेटुनिया ह्या दोन सख्ख्या बहिणी असूनही जादू करण्याची क्षमता मात्र फक्त लिलीतच आली होती . पेटुनिया लिलिहून 1-2 वर्षांनी मोठी होती . पेटुनियाच्या मनात सुरुवातीला नैसर्गिकपणेच असूया निर्माण झाली .. लिलीच्या आईवडिलांना आपली मुलगी जादूगार आहे हे समजल्यावर अतिशय आनंद झाला होता आणि लिलीचा त्यांना खूप अभिमान होता , पेटुनियाच्या असूयेत भर पडण्यास ही बाबही कारणीभूत झाली .
सिवीयरस स्नेप हा लिलीच्याच वयाचा मुलगा त्याच परिसरात राहणारा होता , त्याची आई हॉगवर्ट्सची एकेकाळची विद्यार्थीनी असलेली जादूगार तर वडील मगल होते , आईवडिलांचं एकमेकांशी अजिबात पटत नसे , त्याचे वडील हे त्याची आई आणि त्याच्याशी फार वाईट वर्तन करत असत . आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती . लहानशा स्नेपला एकच दिलासा होता की 11 व्या वर्षी आपण हॉगवर्ट्समध्ये जाऊ आणि या सततच्या भांडण - वादावादीने भरलेल्या घरातून , वातावरणातुन आपली सुटका होईल . त्याला कुणी मित्रही नव्हते . त्याच्या मनात आपल्या मगल वडीलांमुळे एकूणच मगल लोकांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली होती शिवाय आपण जादूगार यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशीही भावना होती . लिलीला बाहेर खेळताना ऍक्सिडेंटल मॅजिक करताना स्नेपने पाहिलं होतं . लिलीला जादूगार समाज , शाळा यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती , आपण जादूगार आहोत हेही तिला नीटसं समजलं नव्हतं . मित्रांअभावी एकट्या पडलेल्या स्नेपला लिलीमध्ये मैत्रीची संधी दिसली . त्यांची हळूहळू चांगली मैत्री झाली . स्नेपपुढे पहिल्यांदाच कुणीतरी मैत्रीचा हात पुढे केला होता , त्याला बरोबरीच्या नात्याने वागवलं होतं . लिलीच्या प्रेमात पडायला त्याला वेळ लागला नाही पण ही भावना एकतर्फी होती . लिली सिवीयरसला फक्त चांगला मित्र समजत होती .
लिलीच्या 11 व्या वर्षी हॉगवर्ट्स मधून लिलीला प्रवेश मिळाल्याचं पत्र घेऊन आणि तिच्या मगल आईवडिलांना जादूगार समाज , हॉगवर्ट्स जादू विद्यालय यांची सविस्तर माहिती द्यायला हॉगवर्ट्स मधून जबाबदार व्यक्तीला पाठवण्यात आलं . एकीकडे पेटुनिया लिलीला ही जादू वगैरे सर्व वेडे भयानक लोक करतात , तू वेडी / विचित्र आहेस आहे आणि आता तसल्याच लोकांच्या शाळेत जाणार आहेस म्हणून हिणवत होती तर दुसरीकडे आपल्याला मात्र जादू करता येत नाही आपण चारचौघींसारख्याच सामान्य आहोत या विचाराने ती मनातून दुःखी झालेली होती . तिने कुणालाही न सांगता हॉगवर्ट्सच्या पत्त्यावर आपल्यालाही प्रवेश द्यावा असं पत्र पाठवलं , जे की अर्थातच शक्य नव्हतं . पण हे समजण्याएवढं तिचं वय नव्हतं . हॉगवर्ट्सचे हेडमास्टर एल्बस डम्बलडोर यांनी अतिशय मृदू , प्रेमळ शब्दात हे शक्य नसल्याचं पत्र पेटूनियाला पाठवलं , पण पेटुनियाच्या हाती पडण्यापूर्वी हे पत्र लिली आणि स्नेपच्या हातात पडलं . लिली सुद्धा लहानच होती त्यामुळे पुढच्यावेळी पेटूनियाने तू वेड्यांच्या शाळेत जात आहेस असा टोमणा मारल्यावर तिने ह्या गोष्टीचा उल्लेख केला की तुला ही त्यावेळी तर वेड्यांची शाळा वाटत नव्हती जेव्हा तू आपल्यालाही प्रवेश द्या म्हणून पत्र पाठवलंस , डम्बलडोरचं पत्र मी वाचलं आहे .. आपलं खाजगी पत्र वाचलं याचा पेटुनियाला राग आला , ती दुखावली गेली ... अशाच छोट्या छोट्या गोष्टींनी 2 बहिणींमधला दुरावा हळूहळू वाढत गेला . लिलीचं आपल्या बहिणीवर खूप प्रेम होतं पण पेटुनियाच्या मनात मात्र कडवटपणा निर्माण झाला होता . परिणामी तिने जादूचा तिरस्कार करायला सुरुवात केली आणि पुढे तारुण्यात जोडीदारही तसाच सगळं नॉर्मल असण्याचा अट्टाहास असणारा शोधला .
हॉगवर्ट्सला नेणाऱ्या ट्रेनमध्ये लिली आणि सिवीयरसची भेट जेम्स पॉटर आणि सिरियस ब्लॅकशी झाली . लाडाकोडात , श्रीमंतीत वाढलेल्या जेम्सने सिवीयरसचा पहिल्याच भेटीत अपमान केला . 4 हाऊस मध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करताना जेम्स आणि लिली ग्रिफिन्डोर मध्ये तर स्नेप मात्र स्लायदेरीन हाऊस मध्ये गेला . स्लायदेरीन हे हाऊस इतर हाऊसेस मध्ये अप्रिय होतं , कारण एकेकाळी वोल्डेमॉर्ट स्लायदेरीनमध्ये होता आणि त्याचे बहुसंख्य समर्थक , गुन्हेगार हेही स्लायदेरीन हाऊसचेच , शुद्ध रक्ताच्या जादूगारांचं वर्चस्व असावं ह्या विचाराचे होते . विशेषतः स्लायदेरीन आणि ग्रिफीन्डोर हाऊसच्या विद्यार्थ्यांमध्ये सतत एकमेकांच्या वरचढ होण्याची , एकमेकांच्या हाऊसच्या विद्यार्थ्यांना कमीपणा दाखवण्याची चढाओढ असे .. स्लायदेरीन वगळता इतर तीन हाऊसेसचे संबध आपापसात चांगले होते . हफलपफ आणि रेव्हनक्लॉ ही दोन हाऊसेस स्लायदेरीनला एका विशिष्ट अंतरावर ठेवणं पसंत करीत तर ग्रिफिन्डोर आणि स्लायदेरीनमध्ये द्वेषाचे संबंध होते .
एकमेकांचे सगळ्यात चांगले मित्र असलेले लिली आणि स्नेप ह्या दुफळीमुळे एकमेकांपासून काहीसे दुरावले . जादूमध्ये कुशल , हजरजबाबी , सुंदर आणि सगळ्यांशी प्रेमळपणे वागणारी लिली लवकरच सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनली आणि जेम्स पॉटर तिच्या प्रेमात पडला . पण जेम्सच्या जादुई मस्कऱ्या , आपल्या क्विडीच नैपुण्याचा , बुद्धिमत्तेचा , जादूच्या कौशल्याचा त्याला स्वतःलाच असलेला थोडासा गर्व आणि विशेषतः स्नेपशी त्याच्या वारंवार होणाऱ्या चकमकी यामुळे लिलीच्या मनात मात्र जेम्सबद्दल अढी होती . सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जेम्स अगदी लोकप्रिय होता पण लिलीच्या नजरेत मात्र तो गर्विष्ठ , असंवेदनशील , अतिशहाणा वगैरे होता ..
स्लायदेरीन हाऊस मध्ये गेलेला स्नेप वोल्डेमॉर्टच्या " शुद्ध रक्ताच्या जादूगारांची सर्वंकष सत्ता असावी , जादूगार समाजाला लपून राहावं लागू नये , मगल्सवर जादूगारांचं वर्चस्व असावं इत्यादी तत्वज्ञानाने प्रभावित झाला ... दुष्ट / डार्क समजल्या जाणाऱ्या जादुई कलांकडे त्याचा ओढा वाढला .. ही बाब जेम्स पॉटर आणि सिरियस ब्लॅकच्या मनात त्याच्याबद्दल आणखी द्वेष निर्माण करायला कारणीभूत झाली तर क्विडीच निपुण , जादूत कुशल , शिक्षकांचा लाडका आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेला जेम्स लिलीला आपल्यापासून हिरावून घेईल या विचाराने सिवीयरसच्या मनात शत्रुत्वाची भावना प्रबळ झाली , शिवाय जेम्स - सिरियसची जोडी जादूचा वापर करून त्याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न करीत असे ही गोष्टही त्याला कारणीभूत होतीच . आपल्याशी धड 2 शब्द न बोलणारी लिली याची मात्र मैत्रीण आहे याचा जेम्सला राग होता शिवाय स्नेप नको त्या गोष्टीत नाक खुपसून आपल्याला त्रास देऊ पाहतो याचाही राग होता . रिमस लुपिन वेअरवुल्फ असल्याचं सत्य हॉगवर्ट्स मध्ये फक्त त्याचे 3 मित्र जेम्स , सिरियस , पीटर आणि मुख्याध्यापक डम्बलडोर यांना माहीत होतं . पण दर पौर्णिमेला त्याचं वर्गात अनुपस्थित असणं इतर कुणाच्याही नाही तरी चलाख स्नेपच्याही लक्षात आलं होतं . अर्थात डम्बलडोरच्या साहाय्याने लुपिनला शाळेत प्रवेश मिळाला आहे याची त्याला कल्पना नव्हती . काही असलं तरी लुपिनचं सत्य जगासमोर आणून त्याला शाळेतून काढून टाकण्यास लावावं आणि आपल्याला त्रास देणाऱ्या या चांडाळचौकडीची चांगली जिरवावी असा स्नेपचा मानस होता . लुपिन वेअरवुल्फ आहे ही बाब जर उघड झाली असती तर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या दबावाखाली त्याला शाळेतून काढून टाकणं भाग पडलं असतं .
हॉगवर्ट्सच्या पाचव्या वर्षाच्या शेवटी जेम्स आणि त्याचे मित्र स्नेपला सगळ्या विद्यार्थ्यांसमोर अपमानित करत असताना लिली मध्ये पडली . यावेळी अपमानाने प्रचंड लज्जित आणि संतप्त झालेल्या स्नेपने रागाच्या भरात मगल कुटुंबात जन्मलेल्या जादूगारांसाठी वापरला जाणारा सर्वात वाईट अपमानजनक शब्द / जो जवळजवळ एक शिवीच समजला जातो तो म्हणजे mudblood / मडब्लड ज्याचा अर्थ डर्टी ब्लड , खराब रक्त असा होता तो वापरून तुझ्यासारख्या मडब्लडच्या मदतीची मला गरज नाही असं उत्तर दिलं . लिली अर्थातच वोल्डेमॉर्टच्या विचारांच्या विरोधात होती , जर वोल्डेमॉर्टची सत्ता आली असती तिच्यासारख्या मगलबॉर्न जादूगार आणि तिच्या आईवडिलांसारख्या मगल लोकांची अवस्था भयंकर वाईट होणार होती , वोल्डेमॉर्टचे अनुयायी मगल्सना आणि विरोधात जाणाऱ्या सर्व जादूगारांना क्रूरपणे ठार मारत होते .. आणि अशा वोल्डेमॉर्टचं अनुयायित्व स्वीकारण्याच्या मार्गावर स्नेप वाटचाल करीत होता . तरीही आपल्या एकेकाळच्या मित्राशी मैत्री तोडू नये म्हणून लिली मैत्री टिकवून होती . पण हा प्रसंग ही तिच्या सहनशक्तीची परिसीमा ठरली . ह्या घटनेनंतर तिने स्नेपशी मैत्री पूर्णपणे तोडली , त्याने खाजगीमध्ये येऊन वारंवार क्षमायाचना केल्यावरही तिने आपला निर्णय बदलला नाही . तू वोल्डेमॉर्टची निवड केली आहेस यापुढे तुझ्याशी मैत्री ठेवणं मला शक्य नाही असं सांगून तिने मैत्रीला पूर्णविराम दिला .
अशा अनेक लहान लहान गोष्टींनी जेम्स आणि स्नेप मधले संबंध खूप गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण केले होते . शेवटी लिलीचं मन जिंकायचं तर आपल्या वागण्यात बदल घडवून आणणं गरजेचं आहे ही गोष्ट जेम्सला उमजली . आणि त्याने जादुई खोड्या , आपल्या जादुई कौशल्याची शान झाडणं हे सगळं बंद केलं आणि स्नेपची स्वतःहून कुरापत काढणं हेही बंद केलं .. आपल्या वागण्यात जाणीवपूर्वक बदल घडवून आणून तो अधिक समंजस , मॅच्युरिटीने वागू लागला . आणि शेवटी हॉगवर्ट्सच्या शेवटच्या म्हणजे सातव्या वर्षात लिलीने त्याचं प्रेम स्वीकारलं . अर्थातच ही गोष्ट स्नेपच्या मनातील जेम्स पॉटर बद्दलचा द्वेष द्विगुणित करण्यास कारणीभूत ठरली आणि दुखावला गेलेला , सगळ्या बाजूंनी हरल्याची भावना झालेला स्नेप वोल्डेमॉर्टचा अनुयायी होण्याच्या मार्गावर आणखीन पुढे ढकलला गेला .
वोल्डेमॉर्टचा बंदोबस्त करणं जादू मंत्रालयालाही शक्य होत नव्हतं , तिथेही त्याचे हस्तक पेरलेले होते . खुद्द जादू मंत्रालयात फितूर कर्मचारी होते . अशा परिस्थितीत खंबीरपणे त्याच्या विरोधात पाय रोवून उभी असलेली , त्याच्या दुष्ट कारवायांना काही प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न करणारी निपुण जादूगारांची एकच गुप्त संघटना होती , या संघटनेत शिरकाव करून घेणं त्याला शक्य झालं नव्हतं .. ही संघटना म्हणजे ऑर्डर ऑफ फिनिक्स . एल्बस डम्बलडोरने आपल्या अद्वितीय संघटनकौशल्याखाली ही संघटना निर्माण केली होती आणि टिकवून ठेवली होती , कुशल आणि अगदी विश्वासातील जादूगारांचाच यात समावेश केला होता . जेम्स , सिरियस , रिमस , पीटर , लिली हेसुद्धा या संघटनेचे सदस्य होते . वोल्डेमॉर्ट विरुद्धच्या लढ्यात आपले प्राण धोक्यात घालून सहभागी झाले होते .
पण हे सोपं नव्हतं . वोल्डेमॉर्टच्या अनुयायांची संख्या ऑर्डर ऑफ फिनिक्सच्या सदस्यांपेक्षा 20 पटीने जास्त होती आणि ते अक्षरशः एक एकाला टिपून ठार करत होते . अत्यंत वाईट परिस्थिती होती , सगळीकडे दहशतीचं वातावरण होतं .. वोल्डेमॉर्ट संपूर्ण सत्तेपासून केवळ काही हात अंतरावर होता . जर तो सत्तेवर आला असता तर मगल म्हणजे जादूगार नसलेल्या लोकसंख्येची त्याने निघृण कत्तल केली असती , त्यांना गुलाम बनवलं असतं , संपूर्ण जग रक्तरंजित केलं असतं आणि मगलबॉर्न जादूगारांची अवस्थाही भिकारी / गुलामांसारखी केली असती जशी त्याने सातव्या पुस्तकात अल्पकाळ सत्ता प्राप्त झाली असताना केली . ह्या सगळ्याला थोपवत होती ती फक्त विश्वासू जादूगारांची छोटीशी संघटना - ऑर्डर ऑफ फिनिक्स .
अशा परिस्थितीत एका भविष्यवेत्त्तीने भविष्यवाणी केली की वोल्डेमॉर्टचा पराभव करणारा अशा अशा दाम्पत्याच्या पोटी जन्म घेणार आहे , त्याच्यात अशा शक्ती असतील ज्याची वोल्डेमॉर्टला कल्पनाही नसेल आणि तो या जगाची वोल्डेमॉर्टपासून सुटका करेल .
हॅरी पॉटरच्या जादुई जगातली भविष्यकथन म्हणजे एक पूर्ण निराळा प्रकार आहे . ही शक्ती काही अगदी मोजक्याच जादूगारांना प्राप्त होते . ही भविष्यवाणी ज्या भविष्यवेत्तीने केली तिचा त्या भविष्यवाणीचे शब्द बोलताना स्वतःच्या शरीरावर कसलाही ताबा नसतो , इतकंच काय ती बोलून गेल्यावर भानावर आल्यावर आपण काय बोललो याची तिला सुतराम कल्पना नसते . भविष्यवाणी ही खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे , केली गेलेली प्रत्येक भविष्यवाणी खरी होईलच अशी काही खात्री नसते , कोणती खरी होईल आणि कोणती नाही हे अनेक अज्ञात घटकांवर अवलंबून असतं . तसा भविष्यकथन हा विषय हॉगवर्ट्समध्ये शिकवला जातो पण तो ऐच्छिक आहे , कम्पलसरी नाही आणि त्यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या बाबींच्या खरेपणाबद्दल अनेक शिक्षकांच्या मनात साशंकता आहे . बरेच जण तर हे शास्त्र वगैरे काही नाही निव्वळ ढोंगीपणा आहे असंही मानतात तर काहीजण हे शिकवून येणारं शास्त्र नाही तर जन्मजात येणाऱ्या शक्तींपैकी एक आहे असं मानतात .
तर ह्या भविष्यवाणीतील इतर माहिती अनुसार त्या वर्षाच्या जुलैच्या शेवटी जन्माला आलेले 2 मुलांपैकी एक हा वोल्डेमॉर्टच्या पाडाव करणारा ठरणार होता . त्यापैकी एक मुलगा अनेक पिढ्या शुद्ध रक्त असलेल्या घराण्यातील होता तर दुसरा मुलगा वडील शुद्ध रक्ताचे व आई मगलबॉर्न जादूगार असल्यामुळे हाफब्लड होता - हा मुलगा म्हणजे हॅरी . वोल्डेमॉर्ट स्वतः हाफ ब्लड होता त्यामुळे आपला पराभव करण्याची शक्ती एका हाफ ब्लडमध्येच असेल असा कयास त्याने बांधला आणि हॅरीला लहानपणीच ठार करण्याचा निर्णय घेतला .
ही भविष्यवाणी काही मोजक्याच लोकांना ठाऊक होती . एल्बस डम्बलडोर समोर ही भविष्यवाणी केली गेली .. यावेळी ती वोल्डेमॉर्टचा अनुयायी झालेल्या स्नेपने ऐकली परंतु अर्धवट ऐकत असतानाच तो पकडला गेला व त्या ठिकाणाहून त्याला बाहेर काढलं गेलं . अर्धवट ऐकलेला भाग त्याने वोल्डेमॉर्टच्या कानावर घातला . पण ज्यावेळी वोल्डेमॉर्टने भविष्यवाणीत वर्णन केलेला मुलगा लिली पॉटरचा मुलगा असा निष्कर्ष काढला तेव्हा स्नेपला भयंकर पश्चाताप झाला कारण वोल्डेमॉर्ट हॅरीच्या मागावर गेल्यावर लिलीला जिवंत सोडेल ही कल्पनाही अशक्यकोटीतील होती . तरीही लिलीला न मारण्याची विनंती त्याने वोल्डेमॉर्टकडे केली . वरवर जरी ती वोल्डेमॉर्टने मान्य केलेली असली तरी प्रत्यक्ष घटनेच्या वेळी तो ह्या विनंतीला महत्व देईल याची फारशी शक्यता नव्हती . लिलीला वाचवण्यासाठी स्नेपने डम्बलडोरची भेट घेतली आणि मदतीची याचना केली , आपलं काहीही होऊ दे पण लिलीला वाचवा अशी याचना केली . परिणामी डम्बलडोरनी लिली आणि जेम्स यांच्या राहण्याची सोय एका अज्ञात ठिकाणी केली आणि एका जटील जादूतर्फे त्यांच्या राहण्याचं ठिकाण लपवण्याचा प्रस्ताव मांडला .
या गुंतागुंतीच्या आणि कठीण , वरच्या निपुणतेच्या लेव्हलच्या जादूमध्ये एखादं राहण्याच्या ठिकाणाची माहिती व्यक्तीच्या आत्म्यामध्ये लपवली जाते , जेणेकरून जर त्या व्यक्तीने स्वतःहून सांगितलं नाही तर त्या ठिकाणाचा पत्ता लागणं कुणालाही शक्य होत नाही , ते ठिकाण जणू सर्वांपासून अदृश्य होतं . डम्बलडोरने स्वतः ती व्यक्ती म्हणजे सिक्रेट किपर होण्याची तयारी दर्शवली पण जेम्सने त्यांना नकार देऊन आपला जिवलग मित्र सिरियस याला सिक्रेट किपर करण्याचा निर्णय घेतला . सिरियस वर आपला पूर्ण विश्वास आहे आणि माझा विश्वासघात करण्याऐवजी तो प्राण सोडील तेव्हा तुम्ही निर्धास्त असा असं उत्तर दिलं , डम्बलडोर याबाबतीत नाराज आणि साशंक होते पण त्यांनी जेम्सचा निर्णय मान्य केला .
पण प्रत्यक्षात सिरियसने स्वतः जेम्सचं मन वळवलं की पीटरला जो जादूत सर्वात कमी निपुण होता त्याला सिक्रेट किपर केलं असेल असा संशय कोणालाही येणं शक्य नाही उलट मला ते टार्गेट करण्याची जास्त शक्यता आहे .. पीटर अधिक सुरक्षित पर्याय आहे . जेम्सलाही हे पटलं आणि ऐन वेळी त्यांनी सिरियस ऐवजी पीटरची सिक्रेट किपर म्हणून निवड केली पण डम्बलडोर मात्र यापासून पूर्ण अनभिज्ञ होते . त्यांना सांगितल्यानुसार जेम्सने सिरियसलाच सिक्रेट किपर केला असा त्यांचा समज होता . अगदी रिमस लुपिनला सुद्धा ह्या गोष्टीचा पत्ता नव्हता .
जादूमध्ये फारसा निपुण नसला तरी जेम्स , सिरियस आणि लुपिनने पीटरला नेहमीच जिवलग मित्र मानलं होतं , कुटुंबाच्या एखाद्या सदस्याप्रमाणेच वागवलं होतं . पीटर आपला विश्वासघात करू शकेल हा विचारही त्यांच्या कुणाच्या मनात कधी आला नव्हता . पण पीटर वोल्डेमॉर्टच्या दिवसागणिक वाढणाऱ्या शक्तीने घाबरून गेला होता आणि प्रभावितही झाला होता , ह्याला विरोध करण्यात आता काही अर्थ नाही , याचा विजय निश्चित आहे , आपण आताच याला सामील झालो तर आपला जीव वाचेल आणि आपण त्याच्या मर्जीतले बनू ह्या विचाराने तो वोल्डेमॉर्टला फितूर झाला होता . जेम्स , सिरियसच काय खुद्द डम्बलडोरची माणसाची पारख पीटरच्या बाबतीत साफ चुकली होती .
पीटरला सिक्रेट किपर करणं ही जेम्सची सगळ्यात मोठी चूक होती . त्याने जेम्स लिलीच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती सरळ वोल्डेमॉर्टला पुरवली . ही जादू इतकी प्रभावी आणि शक्तीशाली होती की जर सिक्रेट किपरने विश्वासघात केला नसता तर वोल्डेमॉर्टने प्रत्यक्ष ते गाव चाळून जरी काढलं असतं तरी ते राहत असलेलं घर मात्र अज्ञातच राहिलं असतं .
त्यामुळे वोल्डेमॉर्ट आला त्यावेळी जेम्स लिली अगदी निर्धास्त होते , छोटयाशा हॅरीबरोबर खेळत होते , आपण पूर्ण सुरक्षित आहोत ही खात्री असल्यामुळे वेळ आली तर प्रतिकारासाठी छडी सुद्धा जवळ ठेवली नव्हती . छडी असती तर काहीतरी प्रतिकार शक्य झाला असता , त्याचा कितपत उपयोग झाला असता माहीत नाही पण त्यांना प्रतिकाराची संधीही मिळाली नाही . जेम्सने वोल्डेमॉर्टला हॉल मध्ये अडवून धरण्याचा प्रयत्न केला , लिलीला तू हॅरीला घेऊन जा मी त्याला थांबवतो असं सांगितलं पण सुटकेसाठी कुठली वाटच नव्हती . लिली वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये हॅरीला उराशी कवटाळून उभी होती , खाली हॉलमध्ये वोल्डेमॉर्टने त्याचा ट्रेडमार्क असलेल्या मृत्यूदायी शापाचा वापर करून जेम्सचा जीव घेतला .
तो हॅरीला मारणार याची खात्री असलेल्या लिलीकडून तिच्याही नकळत एक खूप प्राचीन फारशी प्रचलित नसलेली जादू केली गेली .. या जादूचा ना कोणता मंत्र होता ना यासाठी जादुई छडीची गरज होती . मृत्यूदायिनी शापासमोर संपूर्ण स्वेच्छेने शरीराची ढाल करून तो शाप आपल्या अंगावर घेणं आणि त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान करणं ही त्या जादूची प्रोसेस होती . हे सर्वोच्च पवित्र बलिदान ज्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केलं गेलं त्या व्यक्तीला एक अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली सुरक्षा कवच प्राप्त होत असे , हे सुरक्षा कवच ज्या व्यक्तीने तो मृत्यूदायी शाप वापरला त्या व्यक्तीपासून तिचं संरक्षण करीत असे .
बलिदान केलेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या घरात राहत असेपर्यंत ती व्यक्ती सुरक्षित राहील अशी बरीच गुंतागुंतीची अशी ही प्राचीन आणि सगळ्यात शक्तिशाली जादू होती . मृत्यूदायी शापापासून दुसरं कोणतंही सुरक्षा कवच वाचवू शकत नाही . फक्त ही एकाच प्रकारची जादू त्यापासून वाचवू शकते . यातही मेख अशी की ही शरीराची ढाल करणाऱ्या व्यक्तीला ते न करता जिवंत राहण्याचा पर्याय असला पाहिजे . जर आपलं बलिदान न करता जिवंत राहता येण्याची काही शक्यता असेल तरच ही जादू होईल .
या ठिकाणी वोल्डेमॉर्टने स्नेपच्या विनंतीनुसार मुलाला ठेवून तू बाजूला हो , मी तुला मारणार नाही असा पर्याय लिलीला दिला . तो नाकारून छोट्या हॅरीसमोरून बाजूला होण्यास लिलीने नकार दिला आणि ही प्राचीन जादू जागृत झाली .
लिलीला मारल्यावर वोल्डेमॉर्टने तोच शाप छोट्या हॅरीवर वापरला पण त्याने स्वप्नातही कल्पना न केलेली गोष्ट घडली . वोल्डेमॉर्टने हजारो लोकांवर वापरलेला शक्तिशाली मृत्यूदायी शाप जो आजवर कुठलंही सुरक्षा कवच रोखू शकलं नव्हतं तो मागे फिरून त्याच्यावरच उलटला . सामान्य जादूगार असता तर तो त्याच क्षणी मरण पावला असता पण वोल्डेमॉर्टने अमरत्व प्राप्ती साठी जे जादूच्या भयानक निषिद्ध प्रांतातले उपाय योजले होते त्यामुळे त्याचा जीव वाचला .. त्याचं शरीर पूर्ण नष्ट झालं , जादूच्या सगळ्या शक्ती गेल्या , अदृश्य छायेइतक्या कमकुवत स्वरूपात तो भूमिगत झाला दूर जंगलात लपून आश्रय घेतला . आपले अनुयायी आपला शोध घेत येतील आणि आपली मदत करतील या आशेवर त्याने बराच काळ वाट पाहिली पण त्याच्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच अनुयायांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला , त्यांनाही त्यात यश आलं नाही .
प्रतिक्रिया
8 Feb 2019 - 5:59 pm | Blackcat (not verified)
छान
9 Feb 2019 - 12:25 am | nishapari
धन्यवाद
8 Feb 2019 - 8:29 pm | तुषार काळभोर
अदृश्य छायेइतक्या कमकुवत स्वरूपात भूमिगत झाला होतात की काय!!
9 Feb 2019 - 12:27 am | nishapari
रायटर्स ब्लॉक आला होता .
9 Feb 2019 - 12:27 am | nishapari
:D
9 Feb 2019 - 3:24 pm | विनिता००२
मस्त :)
9 Feb 2019 - 8:53 pm | nishapari
धन्यवाद . आधीचे 4 भाग बऱ्याच काळापूर्वी लिहिले होते , आधी वाचले नसतील तर ह्या त्यांच्या लिंक -
https://www.misalpav.com/node/41332
https://www.misalpav.com/node/41340
https://www.misalpav.com/node/41361
https://www.misalpav.com/node/41362
9 Feb 2019 - 5:53 pm | आनन्दा
आवडतंय..
कंटाळा असल्यामुळे इंग्रजी पुस्तके वाचलेली नाहीत, आणि चित्रपटात इतकी सविस्तर माहिती येत नाही, त्यामुळे हे वाचायला मजा येतेय.
9 Feb 2019 - 8:54 pm | nishapari
धन्यवाद . आधीचे 4 भाग बऱ्याच काळापूर्वी लिहिले होते , आधी वाचले नसतील तर ह्या त्यांच्या लिंक -
https://www.misalpav.com/node/41332
https://www.misalpav.com/node/41340
https://www.misalpav.com/node/41361
https://www.misalpav.com/node/41362
हिंदी पुस्तकांच्या पीडीएफ इंटरनेटवर उपलब्ध आहेत , सहज डाउनलोड करू शकता जरासा शोध घेतलात तर ... खूप सोपं आणि रसभरीत भाषांतर आहे .
9 Feb 2019 - 11:03 pm | जालिम लोशन
सुदंर. आशय पहिल्यांदा कळला. ईतक्या वेळा पुस्तक वाचलेपण समजले नव्हते.
10 Feb 2019 - 1:20 pm | अनिरुद्ध.वैद्य
कॉपीराईटवगैरे बाबी पण तपासून घेत चला!
10 Feb 2019 - 1:34 pm | आनन्दा
मला वाटत नाही कॉपीराईट चा काही इश्यू येईल म्हणून.
हे टीकात्मक लिखाण आहे.
कॉलिंग माहीतगार
10 Feb 2019 - 5:23 pm | अनिरुद्ध.वैद्य
सगळी स्टोरी आहे सो.