मागच्या दोन-तीन महिन्यात दोन चांगली मराठी पुस्तके वाचली. अतिशय आवडली. दोन अतिशय प्रतिभावंत मराठी दिग्गजांची ही पुस्तके वाचून मी खूप प्रभावित झालो. काही ठळक बाबी या ठिकाणी मांडाव्यात म्हणून लिहायला बसलो.
चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
हे पुस्तक मी दुसर्यांदा वाचले. जयंत नारळीकर हा किती अफाट माणूस आहे हे या पुस्तकातून कळते. या पुस्तकातून त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बनारस, केंब्रिज, मुंबई, आणि पुणे या चार शहरांमध्ये व्यतीत केलेला काळ उभा केलेला आहे. नारळीकरांचे वडील आणि दोन मामा रँग्लर होते. नारळीकरांनी रँग्लर या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या उपाधी सोबतच केंब्रिज विद्यापीठातली गणितासाठीची जगभरामध्ये सर्वोच्च समजली जाणारी सगळी बक्षिसे पटकावली होती. ट्रायपॉसची अतिशय अवघड अशी परीक्षा त्यांनी सहजपणे पार पाडली. केंब्रिज विद्यापीठाचा गणितामधला तीन वर्षांचा भयंकर अवघड असा अभ्यासक्रम त्यांनी विशेष गुणवत्तेसह पूर्ण केला. या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी पहिले दोन भाग एकत्र यशस्वीरीत्या पूर्ण करून इतिहास घडवला. तिथेच त्यांनी फ्रेड होएल या जगप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञासोबत संशोधन केले. होएल - नारळीकर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी या त्यांच्या संशोधनाला जगभरात मान्यता मिळाली.
इंग्लडमध्ये नारळीकरांचे खूप कौतुक झाले. तिथल्या त्यांच्या घरमालकिणीने, शिक्षकांनी, मित्रांनी, संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी, बाकी सगळ्या कर्मचार्यांनी त्यांना खूप आपुलकीने आणि सन्मानपूर्वक वागवले. ते प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एका ठराविक पोस्ट ऑफिसातून भारतात तार पाठवत असत. तो पोस्ट कर्मचारी त्यांचे प्रत्येक वेळेस मनापासून अभिनंदन करत असे. असे सलग तीन वर्षे त्याच तारमस्तराने नारळीकरांच्या सगळ्या तारी भारतात पाठवल्या. नारळीकरांनी इंग्लंडसोबतच युरोप आणि अमेरिकेत खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. सगळीकडे त्यांना आदरपूर्वक बोलावले जात असे. ई. एम. फॉर्स्टर (महान साहित्यिक), फ्रेड होएल, हरमन बॉण्डी, आणि अनेक नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ यांच्याशी नारळीकरांची नेहमीची ऊठ-बस होती. त्यांच्यासोबत चहा, नाष्ता, जेवण, मेजवान्या वगैरे ही नारळीकरांसाठी नित्याची बाब होती. फ्रेड होएल आणि त्याची बायको हे नारळीकरांचे खास मित्र आणि मार्गदर्शक होते. त्याच्या सोबत त्यांनी बर्याच सहली, ट्रेक्स, समारंभ, सेमिनार्स वगैरे अनुभवले. एका बुद्धिमान विद्यार्थ्याला, शास्त्रज्ञाला कसे वागवावे हे ब्रिटीश लोकांकडून खरंच शिकण्यासारखे आहे. भारतात त्यामानाने अशा लोकांना फारशी ओळख मिळत नाही. मागे रघुवीर मुळगावकर या प्रसिद्ध चित्रकारावर त्यांचा कन्येने लिहिलेला लेख वाचनात आला होता. अखेरच्या काळात त्यांनी पुढचा जन्म अमेरिकेत मिळावा अशी इच्छा आपल्या कन्येजवळ बोलून दाखवली होती असे वाचल्याचे स्मरते. तिथे कलेची, हुशारीची, कुशाग्रतेची ज्या प्रकारे कदर केली जाते तशी भारतात केली जात नाही अशी त्यांची (रास्त) खंत होती. नुकताच सत्येंद्रनाथ बोसांवर एक लेख वाचला होता. त्यांचे संशोधन आईनस्टाईन तपासत असे आणि त्यांना शाबासकीची पत्रे पाठवत असे. आईनस्टाईन स्वतः त्यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाशनांमध्ये छापून आणत असे. सत्येंद्रनाथांना कलकत्ता विद्यापीठातून संशोधनासाठी सुटी मिळत नव्हती. आईनस्टाईनच्या एका पत्राने जादूची कांडी फिरवली आणि त्यांची रजा मंजूर झाली! माणसाचे मोठेपण कळण्यासाठी आपल्याला परदेशातल्या प्रशस्तिपत्राची गरज भासते ही भारताची (आजही) मोठी शोकांतिका आहे. सत्यजित रेंना ऑस्कर मिळाल्यानंतर भारत सरकारने त्यांना भारतरत्न दिले. गोविंद तळवलकर निवृत्तीनंतर अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांच्या मते अमेरिकेत जितकी सुसज्ज ग्रंथालये आणि जितकी प्रगल्भ वाचनसंस्कृती आहे तितकी इतरत्र कुठेही नाही. निवांतपणे वाचन करत निवृत्तीपश्चात जीवन व्यतीत करण्यासाठी तळवलकरांनी अमेरिकेची निवड केली यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. अर्थात, त्यांची मुले तिथे आधीच स्थायिक झाली होती त्यामुळे त्यांना ते सोपे गेले हे उघडच आहे. नारळीकरांचा एक मोठा अपघात झाल्यानंतर त्यांच्या गोर्या घरमालकिणीने, शिक्षकांनी, शेजार्या-पाजार्यांनी, मित्रांनी त्यांची जी काळजी घेतली तशी काळजी भारतात सख्खे नातेवाईकदेखील करणार नाहीत.
केंब्रिजमध्ये नारळीकरांना शिष्यवृत्ती, भत्ते, मानधन अशा स्वरूपात आर्थिक मदत होत राहिली. त्यांच्या यशामुळे त्यांना ही मदत मिळणे अशक्य नव्हते. भारतातून टाटा ट्रस्टने त्यांना वेळोवेळी भरीव मदत केली. त्यांच्या वडिलांनादेखील (१९३० च्या आसपासचा काळ) टाटा ट्रस्टकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. हिर्यांना पारखून त्यांना पैलू पाडण्याच्या कामात सिंहाचा वाटा उचलायचा हा टाटा उद्योगसमूहाचा सामाजिक दृष्टिकोन खरोखर वाखाणण्याजोगा! संशोधनाच्या कामानिमित्त नारळीकर प्रचंड फिरले. केंब्रिज विद्यापीठाने आणि तिथल्या शिक्षकवृंदाने त्यांना भरभरून आणि मनापासून मदत पुरवली.
पंधरा वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर नारळीकर मुंबईला आले. अपेक्षेप्रमाणे इथे त्यांना भयंकर अडचणींना तोंड द्यावे लागले. दुधाची टंचाई, टेलिफोनचे परमिट, घरगुती गॅसचे रेशनिंग, विजेचा भयंकर असा तुटवडा, मिळायला अतिशय कठीण अशा शाळांच्या अॅडमिशन्स, त्यासाठी वणवण, घरासाठी प्रचंड धडपड अशा अडचणींचा सामना करत नारळीकर एकदाचे टीआयएफआर मध्ये रुजू झाले. विचार करा थेट पंतप्रधानांशी संपर्क असलेला प्रतिथयश, जगप्रसिद्ध असा शास्त्रज्ञ भारतात हवालदिल होतो तर सामान्य लोकांची काय कथा! या मुद्द्यावर पुस्तकात चांगले भाष्य केलेले आहे.
पुस्तकात टीआयएफआरमधील नारळीकरांची कामगिरी, तिथले राजकारण, ढासळता दर्जा, प्रशासकीय दिरंगाई, वशिलेबाजी वगैरे बाबींवर झगझगीत प्रकाश टाकलेला आहे. मुंबईनंतर पुण्यात येऊन आयुका स्थापन करणे, त्यातील अडचणी, निधी जुळवणे, जागा शोधणे, नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांना व्याख्यांनांसाठी बोलावणे वगैरे सगळाच भाग अतिशय उत्कंठावर्धक आणि वाचनीय आहे.
बनारसमध्ये गेलेले बालपण आणि झालेले सुरुवातीचे शिक्षण, केंब्रिजमधला उमेदीचा, लोकप्रियतेचा आणि कमालीचा यशस्वी असा काळ, मुंबईमध्ये केलेले संशोधन आणि पुण्यात केलेली आयुकाची उभारणी अशा चार भागांमधून एक अतिशय हुशार, बुद्धिमान, नम्र, कमालीचे साधे, कुटुंबवत्सल, माणूसप्रेमी, देशभक्त असे नारळीकर आपल्यासमोर येतात. विज्ञानाने त्यांच्यावर आणि त्यांनी विज्ञानावर अपार प्रेम केले. पत्नी खूप आजारी असतांना अंबाबाईला नवस बोलण्याचा मोह ते कटाक्षाने आवरतात. त्यांचे तितकेच बुद्धिमान वडील त्यांना हे अंधश्रद्धेचे जळमट काढून फेकायला सांगतात. नंतर त्यांच्या पत्नी संपूर्णपणे बर्या होतात. सुशिक्षित लोकांनी नारळीकरांवर प्रेम केले, इंग्लंडने आणि विशेषतः केंब्रिजने नारळीकरांना लेकरासारखे जपले. वडिलांच्या एरवी संतुलित वाटणार्या स्वभावाचा निराळाच पैलू समोर आल्यानंतर आणि आई आणि पत्नी यांच्यातील निरर्थक बेबनाव बघून विषण्ण झालेले नारळीकर वाचतांना 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा प्रत्यय येतो. या घरगुती तक्रारी आणि त्यापासून झालेला मनस्ताप नारळीकर निर्विषपणे आणि त्रयस्थ भूमिकेतून मांडतात. काही ठिकाणी सखोल वर्णनामुळे आणि तुलनेने कमी महत्वाच्या माहितीमुळे किंचित रसभंग होतो खरा पण असे भाग खूपच थोडे आहेत.
'चार नगरातले माझे विश्व' हे आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. अपार कष्ट, इच्छाशक्ती, निर्मळ भाव, प्रामाणिकपणा, नम्रता, माणसे जोडण्याची हातोटी, मोठी स्वप्ने बघण्याची हिम्मत, संतुलित विचारशक्ती, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक आणि जिज्ञासू दृष्टिकोन या गुणांचा वापर करून एक भव्य जीवन कसे साकारता येते हे या पुस्तकातून शिकायला मिळते. संग्रही असावे असे आणि वारंवार वाचावे असे पुस्तक!
मी कसा झालो - आचार्य अत्रे
आमच्या कार्यालयात मागे एकदा पुस्तकांचे प्रदर्शन होते. तिथे मला हे पुस्तक दिसले. एकच प्रत होती. थोडे चाळले असता हे पुस्तक फारच वाचनीय वाटले. घेऊन टाकले. वाचायला सुरुवात केली आणि आचार्य अत्रे ही काय चीज होती हे कळायला लागले. तोपर्यंत एक नाटककार, लेखक, राजकारणी अशी त्यांची जुजबी ओळख मला होती. पुस्तक वाचून संपवल्यावर आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व किती बहुआयामी, बुद्धिमान, प्रतिभावान होते हे लक्षात आले. पन्नासच्या दशकात लिहिलेले हे पुस्तक वाचून मी थक्क झालो.
अत्रेंचा जन्म पुण्याजवळ सासवडला झाला. शिक्षण संपवल्यावर काय करावे या चिंतेत मुंबईमधल्या रस्त्यांवर नोकरीच्या शोधात फिरत असतांना त्यांना एक खूप हाय-फाय शाळा दिसली. तिथे बेधडक जाऊन त्यांनी नोकरी मागीतली. वर्ग घेत असतांना फाडफाड इंग्रजी बोलणार्या मुलांनी त्यांची टर उडवली. त्यांना वाटले हा धोतर-कोट घातलेला गावंढळ मास्तर त्यांना इंग्रजीमधून काय कप्पाळ शिकवणार. अत्र्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये सुरुवात करून मुलांची मने जिंकून तर घेतलीच शिवाय नोकरीदेखील पटकावली. कधीही इंग्रजी बोलण्याचा सराव नसलेले अत्रे तिथे बिनधास्त इंग्रजीमध्ये शिकवू लागले आणि लोकप्रिय झाले. पुढे ते पुण्यात आले आणि कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत रुजू झाले. ही शाळा त्यांनी पूर्ण नव्या स्वरूपात घडवली. ज्या शाळेचा लौकिक उडाणटप्पू आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांची शाळा असा होता तिथे पुण्यातल्या सुशिक्षित लोकांनी आपापल्या मुलांच्या प्रवेशासाठी झुंबड उडवली. मग्रूर मॅनेजमेंटला धूळ चारून अत्रे शाळेच्या कमिटीमध्ये दाखल झाले. शिक्षणाचा ध्यास घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन एक वर्षाचा प्रतिष्ठेचा शिक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केला. तिथल्या प्राथमिक शाळेत काम करून त्यांनी ती शाळा नावारुपाला आणली. इंग्लंडमधल्या नावाजलेल्या शिक्षणतज्ञांनी अत्र्यांच्या हुशारीला नावाजले.
शिक्षणक्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावल्यानंतर अत्र्यांनी लोकप्रिय अशी नाटके लिहिली. 'मोरूची मावशी', 'साष्टांग नमस्कार', 'लग्नाची बेडी', 'तो मी नव्हेच' अशी अपरंपार लोकप्रियता लाभलेली नाटके त्यांनी लिहिली. त्यांचा 'झेंडूची फुले' हा विडंबनकाव्यसंग्रह अमाप लोकप्रिय झाला. सिनेमा क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे या इर्षेने त्यांनी मुंबईमध्ये एक अख्खा स्टुडिओच विकत घेतला. मराठी माणसाने मुंबईसारख्या मायानगरीत एक स्टुडिओ विकत घेणं ही आजच्या काळातही खायची गोष्ट नाही. ज्या मुंबापुरीत पंजाबी, मारवाडी, सिंधी अशा अनिवासी मुंबईकरांनी आधीपासून राज्य गाजवलेले आहे अशा श्रीमंतीची कवचकुंडले मिरवणार्या या विशाल शहरात चाळीसच्या दशकात मराठी माणसाने स्टुडिओ विकत घेणे ही अभिमानास्पद बाब होती. अर्थात या पराक्रमाचे नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात फारसे कौतुक झाले नाहीच. मराठी समाजाने, साहित्यकारांनी, राजकारण्यांनी आपल्या उपजत मराठी स्वभावाला अनुसरून अत्र्यांना मनापासून पाठिंबा दिला नाहीच. पुढे कर्जबाजारीपणात हा स्टुडिओ त्यांना विकावा लागला. 'श्यामची आई' हा अप्रतिम चित्रपट अत्र्यांच्या नावावर जमा आहे. राष्ट्रपतींचे सुवर्णकमळ जिंकणारा हा पहिला मराठी चित्रपट! त्यानंतरही त्यांनी बर्याच चित्रपटांची पटकथा लिहिली आणि बरेच चित्रपट निर्माण केले. 'ब्रह्मचारी', 'ब्रँडीची बाटली' हे तर त्यांचे अत्यंत यशस्वी झालेले चित्रपट होते. 'महात्मा फुले' या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजतकमळ मिळाले होते.
एक अत्यंत प्रभावी वक्ता म्हणून अत्रे यांचे नाव महाराष्ट्रात अजरामर आहे. एका वेळेस ऐंशी-नव्वद हजार श्रोत्यांच्या सभेला खिळवून ठेवण्याची क्षमता असणारे अत्रे हे त्या काळी एकमेव वक्ते होते. राजकारणी त्यांच्या सभांना घाबरत असत. पंतप्रधानांनंतर एवढी गर्दी त्याकाळी फक्त अत्र्यांच्या सभांना आणि भाषणांना होत असे. अत्र्यांनी केलेले आयुष्यातले पहिले भाषण म्हणजे त्यांच्या जिव्हारी बसलेला घाव होता. शाळेत असतांना टिळकांवर भाषण करण्यास ते उभे राहिले पण त्यांना काहीही आठवले नाही. शाळेतल्या मुलांनी येथेच्छ खिल्ली उडवल्यानंतर शरमेने मान खाली घालून अत्रे खाली बसले ते या कलेला आत्मसात करायचेच अशी प्रतिज्ञा करूनच! पुढे अत्रे यशस्वी वक्ता म्हणून प्रसिद्ध झाले.
अत्रे एक यशस्वी पत्रकारदेखील होते. चार वर्तमानपत्रांची स्थापना करून त्यापैकी 'मराठा' आणि 'नवयुग' त्यांनी कित्येक वर्षे सर्वाधिक खपाची वर्तमानपत्रे म्हणून यशस्वी करून दाखवली. अत्रे यथावकाश राजकारणात शिरले. पुण्यातून नगरसेवक म्हणून निवडून आले. काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख मिळवली. पुण्यातील भांबुर्डाचे शिवाजीनगर असे नामकरण त्यांनीच केले. ब्राह्मण महापौर चालणार नाही म्हणून ऐनवेळेस त्यांचा पत्ता कापून पक्षाने शिरोळे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकली. जातीपातीचे हे राजकारण भारतातून कधी हद्दपार होईल असे वाटत नाही; किंबहुना जात-पात आणि त्यायोगे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पद्धतशीरपणे आपापसात विद्वेष पेटवणे ही प्रथा भारतातून कधीच हद्दपार होणार नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पाळणीच्या काळात नेहरू, गांधी, पटेल, आचार्य कृपलानी या तथाकथित ध्येयनिष्ठ वगैरे नेत्यांनी जे बोटचेपेपणाचे स्वार्थी धोरण अंगिकारले त्यावर अत्र्यांनी त्यांच्या जहाल भाषणांमधून आणि वर्तमानपत्रांतून जहरी टीका केली. काँग्रेसला स्वातंत्र्य मिळवून सत्ता काबीज करण्याची घाई लागली होती. नेहरू पंतप्रधानपदासाठी व्याकूळ झाले होते. नेहरूंच्या मते फाळणी ही प्रदेशाची होती, मनांची नव्हती. त्यांच्या या भंपक आणि निरर्थक युक्तिवादाला अत्र्यांनी कडाडून विरोध केला. लाखो लोक या फाळणीदरम्यान मारले गेले. लाखो लोक बेघर झाले. काँग्रेस, मुस्लीम लीग, जीना, गांधी, नेहरू या स्वतःला सुज्ञ म्हणवणार्या संघटनांनी आणि नेत्यांनी काय होऊ शकेल याची पर्वा केलीच नाही कारण त्यांना स्वतःला याचा कुठलाच त्रास झाला नाही. हे सगळे सत्तेच्या लोण्याकडे डोळा लावून बसले होते. शिवाय धर्माधिष्ठित अशा ऐतिहासिक फाळणीवर काँग्रेसने जाहीररीत्या मुस्लीमांना कुठलेच आव्हान केले नाही. मुस्लीम समाज आपल्यावर नाराज होईल ही एकमेव भीती त्यावेळेस त्यांच्या मनात होती. त्याचवेळेस पाकिस्तानात मात्र हिंदू, शीख वगैरे लोकांवर फाळणीदरम्यान अनन्वित अत्याचार झाले. त्यांना अक्षरशः नेसत्या वस्त्रानिशी त्यांच्या घरांमधून हाकलून देण्यात आले. स्त्रियांवर अमानुष बलात्कार झाले. काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या या दुटप्पी धोरणावर अत्र्यांनी कडाडून हल्ला केला. फाळणीवर या पुस्तकात खूप मोलाचे आणि सत्य उघड करणारे विस्तृत असे भाष्य अत्र्यांनी केले आहे. प्रत्येकाने हे वाचायलाच हवे.
अत्र्यांच्या झंझावाती आयुष्याकडे या पुस्तकाच्या चष्म्यातून बघतांना एका पहाडाएवढ्या व्यक्तिमत्वाचे दर्शन होते. एका अर्थाने हे अत्र्यांचे हे आत्मचरित्रच आहे. त्यांनी या पुस्तकाची प्रकरणे त्यांच्या निरनिराळ्या क्षेत्रातील जडण-घडणीच्या पायावर रचलेली आहेत. ख्यातकीर्त शिक्षक आणि कुशल प्रशासक, प्रतिभावंत लेखक, कवी, आणि नाटककार, धाडसी चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक, धडाडीचा पत्रकार आणि संपादक, मुत्सद्दी राजकारणी आणि समाजसेवक, प्रभावी वक्ता, आणि एक आधुनिक विचारवंत अशी अत्र्यांची चतुरस्त्र ओळख या पुस्तकातून समोर येते. आयुष्य समरसून जगणार्या, लोकांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी लढणार्या एका लढवय्या कलाकाराचे हे नुसते चरित्र नसून अगणित नवीन गोष्टी शिकण्यासाठीची ही एक नामी संधी आहे. हे पुस्तक वाचून आपल्या आयुष्यासाठी एक निश्चित दिशा आणि ध्येय जरी आपण ठरवू शकलो तरी ते या सुरेख पुस्तकाचे यश म्हणावे लागेल!
हे ही पुस्तक मी पुन्हा वाचणार आहे. माझ्या मते तुम्हाला आवडलेले पुस्तक कमीतकमी दोनदा वाचल्याशिवाय त्या पुस्तकाचा आत्मा तुमच्यात मिसळत नाही. एकदाच वाचलेले पुस्तक काही दिवसांत पूर्णपणे विसरले जाते.
प्रतिक्रिया
22 Jan 2019 - 2:59 pm | कपिलमुनी
दलदलीत कमळ फुलावे असा तुमचा लेख मिपावर वाटत आहे.
दोन्ही पुस्तके मिळवून वाचण्यात येतील.
पुस्तक ओळखींबद्दल धन्यवाद
23 Jan 2019 - 10:58 am | समीरसूर
दोन्ही पुस्तके खरोखर खूपच चांगली आहेत. अगदी संग्रही ठेवण्यासारखी.
22 Jan 2019 - 3:10 pm | श्वेता२४
ही दोन्ही पुस्तके अजुन वाचली नाहीत.तुमच्या वर्णनामुळे वाचाविशी वाटत आहेत.
22 Jan 2019 - 4:27 pm | प्रसाद_१९८२
'मी कसा झालो' या आचार्य अत्रेंच्या पुस्तकातील 'मी आरोपी कसा झालो' हे प्रकरण वाचायला खूप आवडते. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी हे आत्मचरित्र्यपर पुस्तक लिहिले आहे. त्यांचे 'हशा व टाळ्या' हे पुस्तक देखिल असेच वाचनिय आहे.
--
पुस्तक ओळख आवडली.
23 Jan 2019 - 10:59 am | समीरसूर
हे प्रकरण विशेष मजेदार आहे. त्यांचा काहीही दोष नसतांना त्यांना कायद्याच्या बडग्याला कसे सामोरे जावे लागले हे वाचण्यासारखे आहे.
22 Jan 2019 - 8:13 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर पुस्तक परिचय. बऱ्याच दिवसांनी एवढी छान पुस्तक परीक्षणे, रसास्वाद वाचायला मिळाला._/\_
23 Jan 2019 - 12:40 am | गामा पैलवान
समीरसूर,
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.
नारळीकरांवरनं त्यांची यक्षांची देणगी हा विज्ञानकथासंग्रह आठवला. त्यातली गंगाधरपंतांचे पानिपत ही कथा विशेष आवडती आहे. ती अघटितत्व ( = Catastrophe Theory ) वर बेतलेली कथा आहे. एखाद्या विवक्षित क्षणी घडलेली छोटीशी घटना व्यापक प्रमाणावर बदल कशी घडवते याचं वर्णन करण्यास हे शास्त्र वापरतात. त्यानुसार नारळीकरांनी भारताच्या इतिहासाचं किंचिदपि पुनर्लेखन केलं आहे. त्यासाठी अघटित घटना म्हणून पानिपताची योजना केली आहे. प्रत्यक्षात पानिपतात विश्वासराव गोळा वर्मी लागून ठार होतात, पण या कथेत ते बचावलेले दाखवले आहेत. त्यामुळे मराठ्यांना जोम चढतो व ते अब्दालीचा पूर्ण पराभव करतात असं दाखवलं आहे. विनाब्रिटीश १९७० च्या दशकातली मुंबई कशी दिसली असती याचं वर्णन मनोज्ञ आहे. नारळीकरांना इतिहासाचंही बऱ्यापैकी भान होतं असं पदोपदी जाणवतं.
नारळीकर केम्ब्रिज विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासातले एकमेव बिगर कॉलेज ज्येष्ठ रँग्लर आहेत. असा पराक्रम परत कोणी केल्याचं ऐकिवात नाही.
नारळीकर नास्तिक असल्याने त्यांची सगळी मतं पटंत नाहीत. मात्र ती वगळता माणूस वंदनीय व अनुकरणीय आहे.
आ.न.,
-गा.पै.
23 Jan 2019 - 11:02 am | समीरसूर
कथा मस्त वाटते आहे. कुठे मिळेल?
नारळीकर हे केंब्रिजच्या इतिहासातले पहिले आणि एकमेव भारतीय सीनियर रँग्लर आहेत. केंब्रिजच्या ८०० वर्षांच्या देदीप्यमान इतिहासात सीनियर रँग्लर आतापर्यंत फक्त १०० च्या आसपास झालेले आहेत. नारळीकर त्यापैकी एक!
24 Jan 2019 - 12:01 am | गामा पैलवान
समीरसूर,
ही कथा यक्षांची देणगी या कथासंग्रहात आहे : https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4740442739420541809?BookN...
आ.न.,
-गा.पै.
25 Jan 2019 - 11:28 am | समीरसूर
धन्यवाद!
25 Jan 2019 - 11:44 am | समीरसूर
आत्ताच केले ऑर्डर बुकगंगावर
23 Jan 2019 - 10:31 pm | नाखु
माणसांचा उत्कटतेने परिचय करून दिला आहे
अभिनंदन
वाचकांची पत्रेवाला नाखु
23 Jan 2019 - 11:04 pm | तुषार काळभोर
मी शाळेत असताना आमच्या विज्ञान शिक्षकांनी मी व अजून दोन विद्यार्थ्यांना आयुकामध्ये ४-५ वेळा नेले होते. तेव्हा मनावर ठसलेल्या गोष्टी म्हणजे, एक तर त्यांचा अतिशय विनम्र स्वभाव व बोलणं, दोन अस्खलित मराठी व इंग्रजी - मराठी बोलताना विनाकारण इंग्रजीचा वापर नाही आणि इंग्रजी बोलताना इतकं सुरेख की त्याचा हेवासुद्धा वाटावा आणि ते ऐकत बसावं असं वाटायचं, आणि तिसरं म्हणजे त्यांचा मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि प्रेम. मी गेलेल्या प्रत्येक वेळी केवळ एक दोन गट मराठी शाळेचे होते आणि इतर सर्व पंधरा वीस गट इंग्रजी शाळांचे होते. पण जयंत नारळीकर त्यांचं प्रत्येक व्याख्यान आधी मराठीत आणि मग इंग्रजीत करत. शिवाय व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तराच्या वेळीसुद्धा प्रश्न इंग्रजीत असला तरी आधी त्याचं मराठीत उत्तर मग इंग्रजीत.
24 Jan 2019 - 11:01 am | समीरसूर
आमच्या कार्यालयात त्यांचे एक भाषण झाले होते. बहुधा ४-५ वर्षे झाली असावीत. तुडुंब गर्दी होती. लोकांना बसायला जागा मिळाली नाही म्हणून जवळपास १००-१५० लोक उभे होते. सुरेख भाषण केले होते त्यांनी. खूप नम्र आणि साधा माणूस. म्हणूनच आदर दुणावतो त्यांच्याबद्दल. या पुस्तकात त्यांनी मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवे हा मुद्दा मांडलेला आहे. भारतात त्यांना मिळायला हवी तशी प्रसिद्धी, आदर, वगैरे मिळाले नाही. कोकणातल्या काप्रेकर गुरुजींनी शोधलेला काप्रेकर काँन्स्टंट बाकी जगाला माहिती आहे पण दुर्दैवाने भारतात फारसा कुणाला माहिती नाही. अतिशय साधा प्राथमिक शिक्ष़क होता हा माणूस. सायकलवरून शाळेत जायचा पण गणितात खूप काम केले आहे त्यांनी.
नारळीकरांनी परदेशातच राहून संशोधन केले असते तर त्यांना कदाचित नोबेल प्राईझ मिळाले असते अशी चर्चा मागे ऐकीवात होती. एकदा एक यादी प्रसिद्ध झाली होती. कुणाला नोबेल मिळू शकेल अशा व्यक्तींची. त्यात नारळीकरांचे नाव होते. यादी कुणी प्रसिद्ध केली होती ते आता आठवत नाही.
24 Jan 2019 - 2:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
खूप मोठ्या व्यक्ती ह्या. १९६७-१९७२ च्या दरम्यान नारळीकरांना बघायला मात्र प्रचंड गर्दी व्हायची. अगदी भारतात कोठेही गेले तरी(खुद्द त्यानीच तसे पुस्तकात नमूद केले आहे. मात्र संशोधनावर बोलायला चालू केले की माणसे हळूहळू पळ काढत. कदाचित विज्ञान सर्वसामान्य माणसाला समजले पाहिजे, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे.. ह्याची जाणीव त्यांना झाली असावी).
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी पद्मभूषण नारळीकरांना मिळाले होते.
25 Jan 2019 - 11:31 am | समीरसूर
ते त्या काळातले मोस्ट एलिजिबल बॅचलर होते असा उल्लेख आहे पुस्तकात. आणि हो, सत्ताविसाव्या वर्षी पद्मश्री मिळाली होती हे ग्रेटच. मला वाटते २००३ मध्ये पद्मविभूषणदेखील मिळाले होते. नोबेल मिळाले असते तर मजा आली असती पण बहुतेक आयुकाच्या काळात आणि त्यानंतर त्यांनी संशोधनाच्या मार्गावर फार काही अंतर कापले नाही. अर्थात, हा माझा गैरसमजदेखील असू शकेल. पण बहुतेक ते नंतर निवृत्तच झाले.
24 Jan 2019 - 2:21 pm | पद्मावति
खुप सुंदर ओळख.
24 Jan 2019 - 5:25 pm | शेंडेनक्षत्र
इंग्लंडमधे राहून पदवी मिळवून भारतात आल्यानंतर लगेच त्यांना मराठीतून भाषण करायचे होते. अत्रे एक उत्तम वक्ते होते पण आपण नुकतेच इंग्लंडमधून आल्यामुळे आपल्या भाषणात इंग्रजी नको इतके येणार म्हणून त्यांनी आपले भाषण पुन्हा पुन्हा तपासून त्याचे मराठीकरण केले. सामान्यत; इंग्लडमधून येणारा माणूस इंग्रजाळलेले असण्याचा अभिमान बाळगतो. पण अत्र्यांनी इंग्रजीवर प्रभुत्त्व असूनही मराठी भाषेचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न खूप प्रभावित करतो.
अत्रे काही वेळा फार अर्वाच्य बोलायचे. टीका करताना कधी कधी सभ्यतेची पातळी सुटली की काय असे वाटेल इतके. परंतु त्यांची लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके कमालीची सुंदर आहेत. निव्वळ साने गुरुजी टाईप भाबडेपणा नाही. खट्याळपणा, विनोद, दु:ख, प्रेम अशा अनेक रसांनी युक्त आणि तरीही लहान मुलांना कळतील, आवडतील अशा गोष्टी, कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यातल्या कित्येक प्राथमिक मराठी शाळेच्या पाठ्यपुस्तकात आहेत.
24 Jan 2019 - 6:26 pm | जालिम लोशन
प्रकाशकांची नावे कळतील का?
25 Jan 2019 - 11:37 am | समीरसूर
चार नगरातील माझे विश्व - जयंत नारळीकर - मौज प्रकाशन
https://www.amazon.in/Nagarantale-Vishwa-Jayant-Vishnu-Naralikar/dp/8174...
मी कसा झालो? - आचार्य अत्रे - परचुरे प्रकाशन
https://www.amazon.in/Mi-Kasaa-zaalo-Acharya-Atre/dp/8186530886/ref=sr_1...
थोडा सर्च मारला तर लगेच मिळते ही माहिती.
24 Jan 2019 - 6:33 pm | बोलघेवडा
या दोन पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!!
नारळीकरांचे पुस्तक वाचले नाही पण या लेखामुळे नक्की वाचीन.
बाकी "मी कसा झालो" बद्दल काय बोलणार. एक अप्रतिम संग्रही ठेवावे असे पुस्तक. अगदी पहिल्या प्रकरणापासून, म्हणजे अत्रे सासवड हुन पुण्याला यायला निघतात त्या प्रसंगापासून ते पार शेवटपर्यंत पुस्तक खाली ठेववत नाही. एक माणूस त्याच्या आयुष्यात किती वेगवेगळ्या भूमिका /जबाबदाऱ्या किती लीलया हाताळू शकतो याचे अत्रे साहेब एक उत्तम उदाहरण आहे.
जाता जाता- आपल्या विनोदी शैलीचा पाया आपल्या शाळेने म्हणजेच पुण्यातील भावे हायस्कुल ने घातला हे अत्रे साहेब नमूद करतात. धन्य ती शाळा आणि ते विद्यार्थी. :)
24 Jan 2019 - 7:32 pm | बबन ताम्बे
अत्र्यांनी केलेले त्यावेळच्या पुण्याचे वर्णन वाचून त्यावेळचे पुणे कसे असेल याची कल्पना येते.
मी कसा झालो पुस्तकातील प्रत्येक प्रकरण जबरदस्त!! केवळ अचाट आणि अफाट व्यक्तिमत्व होते.
डॉ. नारळीकरांचे पुस्तक अजून नाही वाचले. आता वाचायलाच हवे.
24 Jan 2019 - 6:35 pm | बोलघेवडा
मी कसा झालो , परचुरे प्रकाशन, किंमत 250 रु
26 Jan 2019 - 6:48 pm | विनोद१८
उत्तम लेख आहे हा, आचार्य अत्रे व श्री. जयंत नारळीकर या दोन मराठी दिग्गजांची ओळख उत्तम प्रकारे नव्याने करुन दिल्याबद्दल.
येथे मी एका पुस्तकात त्या दोघांबद्दल वाचलेली एक गोष्ट सांगविशी वाटते ( पुस्तकाचे नाव आज आठवत नाही) श्री. नारळीकर केम्ब्रिजला असताना त्यांची व आ. अत्रे यांची भेट झाली होती, म्हणजे आ.अत्रे त्यावेळी केम्ब्रिजला गेलले असताना श्री. नारळीकरांना भेटायला त्या विद्यापिठात गेले होते व आ. अत्र्यांना त्या विद्यापिठातील एका विशिष्ठ हिरवळीवरुन या भेटीसाठी नेण्यात आले, त्या विशिष्ठ हिरवळीवर चालण्याचा मान हा फक्त खास प्रतिष्टीत लोकांनाच असे व तो मान आ. अत्र्यांना त्यावेळी मिळाला असे वाचल्याचे आठवते.
आज योगायोगाने त्या दोघांसंबधी हा लेख वाचला व त्यांची ती भेट आठवली. आज नेमके त्या पुस्तकाचे नाव व लेखक आठवत नाही.
28 Jan 2019 - 10:12 am | समीरसूर
या भेटीचा 'चार नगरातले...' मध्ये उल्लेख आहे. नारळीकर काहीतरी खात असतांना मागून येऊन अत्रे त्यांना भेटले होते. नंतर त्यांनी नारळीकरांचा भव्य सत्कार घडवून आणण्याचे ठरवले होते पण कार्यबाहुल्यामुळे नारळीकरांना वेळ देता आला नाही. मग नंतर हा सत्कार कधी झालाच नाही.
नारळीकरांनी पुलंना आणि सुनिताबाईंनादेखील केंब्रिजची सफर घडवली होती. काही दिवस ते सगळे एकत्र होते. पुढे पुलंनी अपूर्वाई प्रकाशित केले. या पुस्तकात या केंब्रिजभेटीचे वर्णन आहे पण नारळीकरांचा कुठेही उल्लेख नाही ही बाब नारळीकरांना खटकली. ही नाराजी त्यांनी 'चार नगरातले...' मध्ये व्यक्त केलेली आहे.
26 Jan 2019 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपापल्या क्षेत्रातल्या दोन पुरुषोत्तमांची, त्यांच्याच पुस्तकांच्या ओळखीच्या रुपाने ओळख करून देणारा उत्तम लेख !
28 Jan 2019 - 10:14 am | समीरसूर
सगळ्यांच्या उत्साह वाढवणार्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
28 Jan 2019 - 2:48 pm | मार्गी
मस्त लिहिलंय!! पण नारळीकरांच्या कादंब-या कथांच्या तुलनेत त्यांची इतर गंभीर पुस्तकं कधी फार अशी आवडली नाहीत.
31 Jan 2019 - 11:15 am | समीरसूर
मी त्यांची कथात्मक पुस्तके अजून वाचली नाहीत. 'यक्षांची देणगी' आता दोन-तीन दिवसांपूर्वी आलंय. 'चार...' मात्र मला आवडले. एक मराठी माणूस किती उंची गाठतो आणि त्यासाठी काय कष्ट घेतो हे समजून घेणे नुसते मनोरंजकच नाही तर प्रेरणादायीदेखील आहे...
30 Jan 2019 - 9:45 am | सुधीर कांदळकर
दोन्ही व्यक्तिमत्त्वे आदरणीय. एका रँग्लरची कहाणी हे नारळीकरांच्या मातोश्रींनी लिहिलेले पुस्तक पण जरूर वाचावे. फारच सुंदर आहे. पण जुने असल्यामुळे उपलब्धता कमी. पुणे मराठी वाचनालय, पत्र्या मारुतीजवळ, या नारायण पेठेतील वाचनालयातून सुमारे पाचसहा वर्षांपूर्वी मी आणले होते.
पुस्तकपरिचयात्मक लेख आवडला. धन्यवाद.
31 Jan 2019 - 11:16 am | समीरसूर
आभार! हे पुस्तक मिळाले तर नक्की वाचणार.
1 Feb 2019 - 10:25 pm | वीणा३
चांगलं परीक्षण लिहिलंय, नक्की वाचेन हि पुस्तकं
2 Feb 2019 - 4:37 pm | सिरुसेरि
सुरेख ओळख . छान .