आ..आ... च्छी ! अर्थात अ‍ॅलर्जिक सर्दी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
31 Dec 2018 - 9:59 am

सध्या आपल्याकडे थंडी पडली आहे. पहाटे व रात्री एकदम थंड तर दुपारी बऱ्यापैकी गरम असे विषम हवामान अनेक ठिकाणी आहे. आता पुढचे ३ महिने हवेतील अ‍ॅलर्जिक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत जाईल. मग या लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच जणांना फटाफट शिंका येत राहतील. त्यापुढे जाऊन सर्दी अथवा नाक बंद होणे, डोळे चुरचुरणे आणि एकूणच बेजार होणे अशा अवस्था येऊ शकतील. एकंदर समाजात या त्रासाचे प्रमाण लक्षणीय आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे. या आजाराची कारणमीमांसा, लक्षणे, तपासण्या आणि उपचार या सर्वांचा आढावा या लेखात घेत आहे.

pict

या आजाराचे शास्त्रीय नाव Allergic Rhinitis असे आहे. Rhino = नाक व itis = दाह. ‘सर्दी’ होण्याचे हे समाजात सर्वाधिक आढळणारे कारण आहे. हवेतील सूक्ष्मकण नाकात जातात आणि मग त्यांचे वावडे (allergy) असलेल्या व्यक्तीस नाकाच्या आतील पातळ आवरणाचा(mucosa) दाह होतो. परिणामी त्या व्यक्तीत खालीलपैकी काही लक्षणे दिसतात:
१. शिंका येणे
२. नाक चोंदणे व खाजणे
३. नाकातून सर्दी वाहणे
४. डोळे चुरचुरणे
५. घसा खवखवणे
६. कान अथवा कपाळ दुखणे

कारणमीमांसा
साधारणपणे असा त्रास होण्यास हवेतील काही पदार्थकण कारणीभूत ठरतात. त्यामध्ये धूळ, परागकण, बुरशीचे बीजकण (mold spores) आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कातून आलेले कण (mites) यांचा समावेश होतो. परागकण हे विविध झाडे, गवत आणि तण यांच्यातून येतात. भौगोलिक स्थानानुसार यांचे प्रमाण काही ऋतूंत वाढते. भारतात डिसेम्बर ते मार्च या काळात झाडांची पानगळ खूप होते. त्यातून सूक्ष्मकण हवेत पसरतात. अगदी घरातही गालिचे, सोफ्याची आवरणे, उशांचे अभ्रे आणि पडदे अशा अनेक वस्तूंतून धुलीकण हवेत पसरतात. याव्यतिरिक्त काही व्यावसायिकांना त्यांच्या रोजच्या कामामुळे असा त्रास सहन करावा लागतो. यात सुतारकाम, रासायनिक प्रयोगशाळा व कारखाने, शेती आणि जनावरांचे दवाखाने असे व्यवसाय येतात.

जर अशी व्यक्ती धूर, प्रदूषण किंवा तीव्र वासांच्या संपर्कात आली तर तिची लक्षणे अजून वाढतात. मुळात एखाद्याच्या शरीरात अ‍ॅलर्जिक प्रवृत्ती निर्माण व्हायला त्याची जनुकीय अनुकुलता असावी लागते. आता अशा कणांच्या (allergens) श्वसनातून नाकात पुढे काय होते ते पाहू.

अ‍ॅलर्जिची शरीरप्रक्रिया:
आपल्या प्रतिकारशक्तीचा एक भाग म्हणजे आपल्या रक्त आणि इतर स्त्रावांत असलेली प्रतिकार-प्रथिने अर्थात इम्म्युनोग्लोब्युलिन्स (Ig). त्यांचे ५ प्रकार असतात आणि त्यातला अ‍ॅलर्जिच्या संदर्भातला प्रकार आहे IgE. प्रथम अ‍ॅलर्जिक कण नाकात शिरतो. त्यावर प्रतिकार म्हणून विशिष्ट IgE तयार होते. नाकाच्या आतील आवरणात विशिष्ट पांढऱ्या पेशी असतात. हे IgE त्या पेशींवर चिकटते. आता या पेशी उत्तेजित होतात आणि काही रसायने बाहेर सोडतात. त्यातली दोन प्रमुख रसायने आहेत Histamine व Leukotrienes.
ही रसायने आवरणातील म्युकस-ग्रंथींना उत्तेजित करतात आणि मग तिथे भरपूर द्रव तयार होतो. ह्यालाच आपण ‘सर्दी’ म्हणतो. मग तेथील चेतातंतू उत्तेजित होतात आणि त्यामुळे शिंका येणे व नाक खाजणे ही लक्षणे दिसतात. ही प्रक्रिया नाकापुरती मर्यादित नसते. ती पुढे जाऊन सायनसेस, कानातील नलिका, घसा आणि डोळे इथपर्यंत पसरते. या भागांतील पेशींत (रक्तातील) पांढऱ्या पेशी उत्तेजित होऊन लढू लागतात. परिणामी दाह होतो. नाकातील द्रवाचे प्रमाण खूप वाढल्यास त्याची धार (postnasal drip) तयार होते आणि ती आपसूक खालील श्वसनमार्गात उतरते.

दीर्घकालीन परिणाम :
अ‍ॅलर्जिक सर्दी वारंवार झाल्यास त्यातून नाकाच्या आजूबाजूच्या इंद्रियांच्या समस्या निर्माण होतात. या रुग्णांना पुढे कानाचा अतर्गत दाह होतो आणि Eustachian नलिकेचा बिघाड होतो. तसेच विविध सायनसेसचेही दाह (sinusitis) होतात.
बऱ्याचदा या रुग्णांना दमा आणि त्वचेचा अ‍ॅलर्जिक दाह बरोबरीने असल्याचे दिसते. जेव्हा विशिष्ट मोसमात अ‍ॅलर्जिक सर्दी होते तेव्हा हे आजार अजून बळावतात. एकंदरीत असे रुग्ण त्रस्त व चिडचिडे होतात.

रुग्णतपासणी:

वर वर्णन केलेले या आजाराचे स्वरूप बघता रुग्णाने योग्य त्या तज्ञाकडून नाक, घसा, कान व डोळे यांची प्रामुख्याने तपासणी करून घ्यावी. अशा तपासणीत साधारणपणे खालील गोष्टी आढळतात:
१. नाक: पातळ आवरणाचा भाग सुजलेला आणि निळसर-करडा दिसतो. कधी तो लाल देखील असतो.
२. घसा: सूज आणि रेषा ओढल्यासारखे दृश्य दिसते. टॉन्सिल्स आकाराने मोठे व सुजलेले असू शकतात.
३. कान ; दाहाची लक्षणे.
४. डोळे: लालबुंद, काहीशी सूज आलेली आणि अश्रूंचे प्रमाण वाढते.
गरजेनुसार अशा रुग्णाची छाती व त्वचेची तपासणी करतात.

प्रयोगशाळा आणि अन्य तपासण्या
अ‍ॅलर्जिचे निदान करण्यासाठी यांची मदत होते. सामान्यतः खालील दोन चाचण्या केल्या जातात:
१. रक्तातील eosinophil या पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे : अ‍ॅलर्जिक रुग्णात यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते.
२. रक्तातील IgE या प्रथिनाचे प्रमाणही वाढलेले असते.

या दोन्ही चाचण्या अ‍ॅलर्जिच्या निदानासाठी पूर्णपणे खात्रीच्या (specific) नाहीत. पण त्या करण्यास सोप्या आहेत व सामान्य प्रयोगशाळांत होतात. रुग्णाचा इतिहास, तपासणी आणि या चाचण्यांचे निष्कर्ष असे सर्व एकत्रित अभ्यासल्यास रोगनिदान होते. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत हे पुरेसे असते.
काही विशिष्ट मोजक्या रुग्णांसाठी याहून वरच्या पातळीवरील चाचण्या करण्याची गरज भासते. त्या अशा आहेत:

१. त्वचेवरील अ‍ॅलर्जिक तपासणी: ही करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ लागतो. रुग्णाचा इतिहास आणि राहायच्या ठिकाणानुसार ठराविक अ‍ॅलर्जिक पदार्थांची निवड केली जाते. मग असे पदार्थ इंजेक्शनद्वारा सूक्ष्म प्रमाणात त्वचेत टोचले जातात. त्यानंतर काही वेळाने टोचल्याच्या जागेवर काय प्रतिक्रिया (reaction) दिसते ते पाहतात. जेव्हा ही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची असते, तेव्हा त्या पदार्थाची रुग्णास अ‍ॅलर्जि आहे असे निदान होते.
२. असे पदार्थ रुग्णास टोचल्यानंतर त्याच्या रक्तातील IgEचे प्रमाण मोजणे. परंतु या चाचणीचे निष्कर्ष पहिल्या चाचणीइतके विश्वासार्ह नसतात.
एक लक्षात घेतले पाहिजे. या विशिष्ट चाचण्या करूनही रुग्णास नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे याचा शोध दरवेळी लागेलच असे नाही. बऱ्याचदा ‘अमुक इतक्या पदार्थांची अ‍ॅलर्जी नाही’ असा नकारात्मक निष्कर्षच हाती पडतो ! म्हणूनच उठसूठ या चाचण्या करीत नाहीत.

उपचार :
यांचे ३ गटांत विवेचन करतो:
१. अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे
२. नेहमीचे औषधोपचार
३. इम्युनोथेरपी

अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे:
तसे पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरेल. अर्थात हा सांगायला सोपा पण आचरायला महाकठीण आहे ! तेव्हा जेवढे शक्य आहे तेवढे टाळावे असे म्हणतो. भारतात डिसेंबर ते मार्चदरम्यान पहाटे व सकाळच्या वेळेत अशा कणांचे प्रमाण जास्त असते. त्या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. तसेच धूर, धूळ व तीव्र वासांपासून जमेल तितके संरक्षण करावे. बाहेर पडताना गरजेनुसार तोंडावरील ‘मास्क’चा वापर करावा.
घरात साठणाऱ्या धुळीसाठी योग्य ते स्वच्छतेचे उपाय केले पाहिजेत. उशीचे अभ्रे, पडदे, अंथरूण आणि गालिचे यांची योग्य निगा राखणे महत्वाचे.
परागकणांची अ‍ॅलर्जी असणाऱ्या रुग्णांना मात्र वरील काळजी घेऊनही ठराविक मोसमात त्रास होतोच. तो कमी करण्यासाठी औषधोपचार गरजेचे असतात.

औषधोपचार

साधारण जेव्हा ‘सर्दी’चा त्रास सुरु होतो तेव्हा रुग्ण प्रथम घरगुती उपचारांचा अवलंब करतो. मात्र ही सर्दी जर अ‍ॅलर्जिक असेल तर त्यांचा फारसा उपयोग होत नाही. हळूहळू हा त्रास वाढू लागतो आणि रुग्णास बेजार करतो. अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. अ‍ॅलर्जिक सर्दीसाठी अनेक उपचारपद्धतींची औषधे उपलब्ध आहेत. या लेखाची व्याप्ती आधुनिक वैद्यकातील औषधांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांची जुजबी माहिती देत आहे. (ज्या वाचकांना अन्य उपचारपद्धतींची माहिती वा अनुभव असतील त्यांनी ते प्रतिसादात जरूर लिहावेत. त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल). खालील सर्व औषधे ही वैद्यकीय सल्ल्याविना कोणीही घेऊ नयेत ही सूचना.

औषधांचे प्रमुख गट:
१. Antihistamines : ही गोळ्यांच्या रुपात वापरतात. अ‍ॅलर्जीमुळे शरीरात जे Histamine तयार होते त्याचा ती विरोध करतात.
ही औषधे सुमारे ५० वर्षांपासून वापरात आहेत. त्यातील पहिल्या पिढीच्या गोळ्यांमुळे रुग्णास गुंगी येत असे. आता दुसऱ्या पिढीची औषधे ही त्या बाबतीत सुधारित आहेत. तरीही काहींना त्यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि त्वचेवर पुरळ येऊन खाजणे असे दुष्परिणाम जाणवतात. यावर मात करण्यासाठी आता या औषधांचे नाकात मारायचे फवारे निघाले आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण शरीरातील दुष्परिणाम फारसे होत नाहीत. मुळात अ‍ॅलर्जीविरोधी औषधे म्हणून ही विकसित झाली; पण त्यांच्या वापरानेसुद्धा काहींना (वेगळी) अ‍ॅलर्जी होऊ शकते हा विरोधाभास आहे ! ‘सर्दी’च्या अन्य काही प्रकारांसाठी ती स्वतःहून उठसूठ घेऊ नयेत.

२. Decongestants : ही औषधे चोंदलेले नाक मोकळे करतात. ती वरील गटाच्या बरोबर देतात. अलीकडे या दोन्ही गटाच्या औषधांचे मिश्रण उपलब्ध आहे.

३. नाकातील Steroidsचे फवारे: जेव्हा हा आजार दीर्घकालीन होतो तेव्हा वरील औषधांपेक्षा हे फवारे उपयुक्त ठरतात. ही औषधे आता विकसित होत तिसऱ्या पिढीत पोचली आहेत. पहिल्या पिढीतील औषधांचे नाकातून रक्तात शोषण होई व त्यामुळे शरीरभरातील दुष्परिणाम होत. आता तो भाग बराच सुधारला आहे. या औषधांमुळे रुग्णाच्या शिंका, नाक खाजणे, नाक चोंदणे आणि वाहणे ही सर्व लक्षणे कमी होतात. त्यामुळे ती वरील दोन गटांपेक्षा अधिक फायद्याची आहेत. अर्थात त्यांच्यामुळे डोळ्यांची खाज मात्र कमी होत नाही. या फवाऱ्यामुळे नाकात चुरचुरणे किंवा रक्त येणे असे तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात.

४. Steroids च्या पोटातून घ्यायच्या गोळ्या: जेव्हा रुग्णास हा त्रास असह्य होतो व निव्वळ वरील औषधे व फवाऱ्यानी आटोक्यात येत नाही तेव्हाच याचा विचार अगदी थोड्या कालावधीकरता केला जातो; ही उठसूठ घ्यायची नसतात.

५. Antileukotrienes : वर पाहिल्याप्रमाणे अ‍ॅलर्जी प्रक्रियेत तयार होणारी अन्य एक रसायने आहेत leukotrienes. ही औषधे त्यांच्या विरोधी कार्य करतात. Antihistaminesना पर्याय म्हणून ती वापरता येतात.
औषधोपचाराबरोबर गरम पाण्याची वाफ घेणे इत्यादी पूरक उपचार उपयुक्त ठरतात.
(वरील सर्व औषधांची माहिती सामान्यज्ञान होण्याइतपतच दिली आहे. त्यांपैकी कुठलेही औषध वैद्यकीय सल्ल्याविना घेऊ नये).

इम्युनोथेरपी

हे उपचार काहीसे लसीकरणासारखे आहेत. ज्या रुग्णांना अ‍ॅलर्जीचा असह्य त्रास होतो त्यांच्या बाबतीत याचा विचार केला जातो. पण त्यासाठी रुग्णास नक्की कुठली अ‍ॅलर्जी आहे हे त्वचा-अ‍ॅलर्जी चाचणीने सिद्ध झालेले असले पाहिजे. समजा एखाद्याला गवतातून उडणाऱ्या सूक्ष्मकणांची अ‍ॅलर्जी आहे. तर या व्यक्तीसाठी त्या कणांपासून तयार केलेले अर्क (allergen extract) उपलब्ध असतात. त्या अर्काच्या गोळ्या जिभेखाली ठेवून घेतात. संबंधित अ‍ॅलर्जीचा मौसम सुरु होण्याच्या ४ महिने अगोदर हे उपचार सुरु करतात. हे उपचार दीर्घकाळ घ्यावे लागतात. त्याने फरक पडल्यास पुढे काही वर्षे चालू ठेवतात.

समारोप

अ‍ॅलर्जिक सर्दी हा समाजात बऱ्यापैकी आढळणारा आजार आहे. साधारण ३०% लोकांना तो असतो. मुलांतील त्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. हा आजार वरवर दिसायला साधा वाटला तरी प्रत्यक्षात तसा नसतो. या त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो. काहींना तर दर ३ सेकंदांना एक अशा वेगाने शिंका येतात. अशा रुग्णांना त्या संपूर्ण मोसमात नैराश्य येते. हा आजार नाकापुरता मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर परिणाम करू शकतो. काही जणांना याच्या बरोबरीने दम्याचाही त्रास असू शकतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे आणि योग्य ते उपचार करून घेणे आवश्यक ठरते.
**********************************************************************
लेखातील प्रातिनिधिक चित्र जालावरून साभार.

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

आगाऊ म्हादया......'s picture

31 Dec 2018 - 10:36 am | आगाऊ म्हादया......

सर्दी तर कानातून बाहेर येतीय आता. Xray PNS ani Eosinophil count ह्या टेस्ट करायलाच जातो आहे.

लेखामुळे मार्गदर्शन मिळाले.

वीणा३'s picture

31 Dec 2018 - 11:26 am | वीणा३

खूपच छान माहिती दिलीत.

मला गेली १५+ वर्ष एलर्जी चा त्रास आहे. भारतात तो कधी कोणाच्या लक्षात आला नाही. मी कायम दळण आणायला गेले किंवा घरात तांदूळ मोठ्या डब्यातून काढून दिले, किंवा केर काढला तरी शिंकाना सुरवात व्हायची. मग आल्याचा चहा, हा काढा ते आसव करत ती सर्दी क्रोनिक व्हायची. मग डॉक्टर कडे गेले कि अँटी बायोटिक द्यायचे. हे चक्र वर्षानुवर्षे चालत राहील.

मग अमेरिकेत आले आणि आल्या आल्या २-३ वर्ष काहीच त्रास झाला नाही. आई तिकडे आश्चर्यचकित, पोरगी पार बर्फात राहत्ये आणि सर्दी कशी नाही, आणि इथे एक मैत्रीण एलर्जी वाली होती, तिने इथे प्रिस्क्रिप्शन न लागणाऱ्या (ओव्हर द काउंटर ) गोळ्या सांगितल्या. त्या गोळ्या लगेच लागू पडल्या. फक्त एक गोष्ट करायला लागते म्हणजे अक्षरश पहिली शिंक अली, किंवा कां डोळे चुरचुरायला लागेल कि लगेच घेऊन टाकायच्या. सर्दी व्हायची वाट बघायची नाही.

मला तरी आत्तापर्यंत यावर काही नैर्सर्गिक उपाय सापडला नाहीये, प्राणायाम इ करून काहीच उपयोग झाला नाहीये (प्राणायामाचे ईथर चांगले फायदे जाणवतात पण एलर्जी वर फरक नाही वाटलं). कोणाला काही नैर्सर्गिक उपाय माहित असतील तर नक्की सांगा.

प्रसाद गोडबोले's picture

12 Jan 2022 - 9:54 pm | प्रसाद गोडबोले

सेम अगदी सेम अनुभव !

भारतात जरा मौसम बदला तरी किंव्वा जरा कुठे घरकाम साफसफाई केली तरी लगेच नाक गळायला लागायचं , सर्दी , घसा खवखवणे वगैरे सुरु व्हायचं ! पण अमेरिकेत अगदी सब झिरो टेम्परेचर ला सुध्दा कधीही त्रास झाला नाही . अगदी -२० , -२२ सुध्दा अगदी मनापासुन एन्जोय केलें आहे !
काय तरी जादु आहे हिरव्या देशात ! बहुतेक धुळीचा लवलेशही नाही म्हणुन असेल कदाचित ! कदाचित बॅक्टेरियाच नसतील हवेत .

पण अमेरिकेतही , मधल्या राज्यांमध्ये नेब्रास्का वगैरे मध्ये भयानक अ‍ॅलर्जीचे त्रास होतात असे ऐकुन आहे !

तुषार काळभोर's picture

31 Dec 2018 - 11:28 am | तुषार काळभोर

घरात मासिक/त्रैमासिक/वार्षिक साफसफाई असते, त्यावेळी मी ४-१० दिवस शिंका, चोंदलेले नाक यांनी बेजार असतो. काही वर्षांपूर्वी जर एखादा कॉम्प्युटर २-४ वर्षांनी उघडला तर मी पार आउट व्हायचो.
त्यावेळी easybreath/carvol+ ची वाफ घ्यायचो, गाडीवर प्रवास करताना रुमालात एक ट्यूब फोडून ठेवायचो अन तो रुमाल नाकातोंडावर बांधायचो. सेट्रीझिन हा एक रामबाण उपाय असायचा.
आता (बहुतेक सवयीने) हळू हळू त्रास कमी झालाय. आता साफसफाई करताना एखादी शिंक येते. विशेष काही नाही.
मागच्या चार दिवसात गारठा वाढल्यापासून नाक वाहतंय, पण अजून काहीच नाही केलं. सवय आहे त्याची.
बरेच दिवस झाले, वाफ/सेट्रीझिन नाही घेतली. एकूण बरं चाललंय आता.

अशी कशी बरी होते काही जणांची सर्दी ते पण सांगाल का ? माझ्या माहितीत वर्षभर सर्दी ने त्रस्त असलेले लोक आहेत त्यापैकी ५-६ आपले आपले बरे झाले. कसे ते त्यांना पण कळलं नाही

मी पण त्याच कॅटेगरीतला होतो. पाच सहा वर्षांपूर्वी (त्याआधी पंधराएक वर्षे)मला महिन्यातून दहा दिवस सर्दी, मग दहा दिवस तोंड येणे, मग काही दिवस सामान्य असं चक्र सुरू असायचं.
मग हळू हळू कमी होत गेलं. आताही सर्दी होते, पण वर्षातून तीनचार वेळा. तिचेही मी जास्त लाड करत नाही. माहेरवाशीण असल्यासारखी चार दिवस राहते आणि जाते. कधी कधी वर्षातून एक दोन वेळा तोंड येतं, पण ते पण दोनतीन दिवसात बरं होतं.

कशाने झालं माहिती नाही.
सहा वर्षांपूर्वी साधारण मागेपुढे आयुष्यात दोन घटना घडल्या होत्या. लग्न आणि सध्याची नोकरी. या घटनांचा संबंध आहे का ते माहिती नाही.

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 9:54 am | कुमार१

लग्न आणि सध्याची नोकरी. या घटनांचा संबंध आहे का ते माहिती नाही. >>>

लग्न या मुद्द्यावर थोडे भाष्य करतो, हलकेच घ्यावे ! जे लिहितोय त्यामागचे 'शास्त्र' असे नाही सांगता येणार पण स्वानुभव आहे.
समागमाच्या 'व्यायामा'मुळे जे तालबद्ध श्वसन होते त्याने चोंदलेले श्वसनमार्ग काहीसे मोकळे होतात. त्यापुढे या क्रियेतून येणारी जी तृप्ती आहे त्याने जो मानसिक आनंद मिळतो, त्याचा एकंदर आरोग्यरक्षणासाठी फायदा होतो.
त्रासिकपणा कमी होण्याने सुद्धा बऱ्याच आजारांना तोंड द्यायची शक्ती वाढते.

हाच मुद्दा पुढे वाढवून.....
समजा तुमच्या नोकरीने तुम्हाला उत्तम आर्थिक स्थैर्य व भरभराट दिली असेल तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा आरोग्यास होईल.

तेजस आठवले's picture

1 Jan 2019 - 2:38 pm | तेजस आठवले

मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्य उंचावण्यास समागमरुपी व्यायाम मदत करतो हे काही प्रमाणात सिद्ध झाले आहे.(American Heart Association चे संशोधन) सर्दी तसेच हृदयरोगाशी संबंधित विकार कमी होऊ शकतात असे हे संशोधन सांगते.
लग्नानंतर काहींचा आत्मविश्वास वाढल्याची पण उदाहरणे दिसतील.( हा बाह्य जगातला आत्मविश्वास असतो, एकदा घरात पोचल्यानंतर ह्याच आत्मविश्वासाच्या ठिकर्या उडालेल्या असू शकतात.) ह. घे. :)

सविता००१'s picture

31 Dec 2018 - 11:44 am | सविता००१

माझ्या नवर्‍याला हा त्रास प्रचंड प्रमाणात आहे. धूळ, धूर च काय, तो कचरापेटीच्या शेजारुन गेला तरी नाक कामातून जाते त्याचे. इतकी सर्दी आणि शिंका, डोकेदुखी की बास. वर अनेकांनी लिहिलंय तसे घरगुती आणि प्रत्येक पॅथीचे उपाय झाले असतील. पण करणार काय? बाहेर न पडणे शक्यच नाही. त्याला सध्या डॉ. नी नेसल स्प्रे च दिलेत. पण सांगितलय की सतत नाही वापरायचे कारण त्यांची सवय होउन उपायच होणार नाही नंतर. शिवाय सर्दीच होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची. बाहेर पडले की मास्क लावायचा वगैरे. पण ते त्याला दर वेळी नाही शक्य होत. आत्ताही आम्ही गाडीवरुन आलो तर कुठेतरी कचरा पेटवला होता. तर झालाच त्याला त्रास. अशावेळी सतत गरम सूप वगैरे देउन पाहिलं. पण फार उपयोग होत नाही - निदान त्याला नाही झाला. आणि एकाने सांगितलं म्हणून कोमट पाणी दिवसभर प्यायला दिलं तर सगळ्या अंगावर पुरळ उठलं त्याच्या. उष्णता अगदीच सहन होत नाहीये त्याला. त्यामुळे हा उपाय तर अगदीच वैताग ठरला.

कुमार१'s picture

31 Dec 2018 - 12:30 pm | कुमार१

आपल्या सर्वांचे अनुभव इतरांसाठी मार्गदर्शक आहेत.

अनिंद्य's picture

31 Dec 2018 - 12:48 pm | अनिंद्य

सध्या घरी 'ऍलर्जिक ब्रॉंकोयटिस' असे निदान झालेला आणि तीन महिने खोकून खोकून दमलेला पेशंट आहे. :-(

ऍलर्जीने असे रूप गाठल्यावर श्वासावाटे (नेब्युलायझेशन/रोटो) पद्धतीने स्टिरॉइड्स हाच उपाय असतो का ?

डॉ श्रीहास's picture

20 Jan 2019 - 12:01 pm | डॉ श्रीहास

Bronchitis - (Bronchus श्वसन नलिका itis सुज येणे)

व्याख्या : खोकला सलग १५ दिवस किंवा जास्त कालावधीसाठी , असं सलग तिन वर्षे... परंतु प्रत्येक खोकला ह्या व्याखेत बसेल असा नसतो !!

Smokers bronchitis, Allergic/ Bronchitis, Winter Bronchitis, Asthmatic Viral Bronchitis, Gastric Reflux induced Bronchitis...... असे प्रकार आहेत. नावावरूनच अंदाजा आला असेल हे गृहित धरतो.

नेब्युलायझर किंवा ईन्हेलर द्वारे दिली जाणारी औषधे हेच मुख्य कारण डायरेक्ट श्वासनलिकेत दुसरं कोणतही औषध जात नाही त्याहूनही महत्वाचं की स्टिराॅईड किंवा स्टिराॅईड + ब्राॅन्कोडायलेटर हाच सर्वोत्तम पर्याय !! ह्या स्टिराॅईडची भिती बाळगायची काहीच गरज नाही हे अतिशय कमी म्हणजे मायक्रोग्राम्स मध्ये लागतं शिवाय रक्तात जाण्याचं प्रमाण नगण्य म्हणून साईड ईफेक्टस् (घसा बसणे, खोकला वाढणे किंवा बुरशीचं इन्फेक्शन होऊ शकतं जे ईन्हेलरचा वापर केल्यावर साध्या पाणाच्या गुळण्या/gargles केल्या तर टाळता येतील ) जवळजवळ नाहीतच.

स्टेराॅईड हे अतिशय गुणकारी औषध आहे परंतु त्याबद्दलचे गैरसमज हे त्याबद्दच्या अर्धवट माहिती मुळे पसरले आहेत.

कुमार१'s picture

31 Dec 2018 - 12:54 pm | कुमार१

निव्वळ Steroid फवाऱ्यापेक्षा Steroid + beta agonist अशा मिश्रणाचे फवारे अधिक उपयुक्त असतात.
हाच त्यातल्या त्यात समाधाकारक उपाय आहे.

अर्थात अधिक माहिती रुग्णतपासणी केल्यावरच.

अनेक धन्यवाद.
अशा रुग्णांना झोपेमध्ये श्वास अडकल्यासारखे होते हे खरे आहे का ?

कुमार१'s picture

31 Dec 2018 - 5:39 pm | कुमार१

होय. अशा रुग्णांना श्वास घेताना काहीसा अडथळा होतो आणि तो पाठीवर झोपल्यावर बराच वाढतो.
या सर्दीचा दीर्घकाळ झाल्यास झोपेवर अनिष्ट परिणाम होतो.

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 11:03 am | कुमार१

येथील सर्वांचे अनुभव वाचनीय आहेत.
छान चर्चा

चौकटराजा's picture

31 Dec 2018 - 4:40 pm | चौकटराजा

सर्दी ही विषाणू व असात्म्यता .. या दोन्ही कारणानी होत असता लक्षणे अगदी वेगळी असतात का ? दोन्ही कारणांनी होणारी सर्दी बरी होताना कालावधी वेगळा असतो की कसे ? माझ्या अंदाजाने विषाणू सर्दी वर फक्त लक्षणे निवारक उपाय केले तर चालतात .झाली सर्दी घे गोळी हे बरे का ?

कुमार१'s picture

31 Dec 2018 - 5:47 pm | कुमार१

माझ्या अंदाजाने विषाणू सर्दी वर फक्त लक्षणे निवारक उपाय केले तर चालतात .झाली सर्दी घे गोळी हे बरे का ?

चांगला प्रश्न. सर्दीची अनेक कारणे व त्यानुसार प्रकार आहेत. या लेखात फक्त ऍलर्जिक सर्दीचे उपचार दिले आहेत.
इतर वेळेस जरूर दम धरावा. आजीबाईचा बटवा, वाफ इ. उपाय नेटाने करावेत. शरीर-प्रतिकारशक्ती बरे होण्यास मदत करेलच. सामान्य सर्दी ८-१० दिवसात जाते.
उठसूठ भारी गोळ्या नकोतच.

तेजस आठवले's picture

31 Dec 2018 - 9:45 pm | तेजस आठवले

स्वानुभवावरून माझी वैयक्तिक मते आणि उपाय पुढीलप्रमाणे.
मला लहानपणापासून सतत सर्दीचा त्रास असे.नाक सदैव चोंदलेले, थोड्याश्या कारणाने लालबुंद होऊन शिंका चालू होत. खूप वेळ पंख्याखाली बसले की घसा जड होत असे.घश्यात खवखवणे, मग टॉन्सिल्सला इन्फेकशन आणि नंतर सर्दी होत असे. ह्या सगळ्यात १५ दिवस सहज जात. चिडचिड खूप होत असे.
मी काही उपाय केले आणि ते मला लागू पडले.
१. कानाला वारा सहन होत नसल्याने रोज झोपताना कानावर पट्टी बांधून (दुचाकीवरचे लोक कानाला बांधतात तशी) झोपणे. मी गेली १४ वर्ष हे करत आहे.
२. अधूनमधून पाण्याची वाफ नाकावाटे ओढून घेणे.व्हेपोराइझर वापरायचा. ५ मिनिटे पुष्कळ झाली.
३. जमेल तेव्हा / शक्य तेव्हा रुमालाचे टोक, किंवा वर्तमानपत्राचा तुकडा नाकात घालून, नाक हुळहुळवुन शिंका येऊ देणे. पहिल्या ४ शिंकानंतर पुढच्या शिंकांवाटे थोडा थोडा कफ बाहेर पडतो. रोजची १० मिनटे पुरे.वर्तमानपत्र वाचताना किंवा मालीका पाहताना कधीही करू शकता, वेळेचे बंधन नाही.तुमचे नाक मोकळे झाले आहे आणि श्वास घेताना बरे वाटते आहे हे तुम्हाला जाणवेल. मुख्यत्वे सायनस मधला कफ ह्याने कमी होतो. सातत्य ठेवलेत तर रोज बाहेर पडणारा कफ कमी असला तरी आपल्याला दर २/३ महिन्यांनी होणारी सर्दी आता तेवढी पटकन होत नाही हे जाणवते.(मलातरी जाणवले). सर्दी झालेली असल्यास हे करू नये. होऊ नये म्हणून करायचे आहे. बघणार्याला जरा विचित्र / गलिच्छ वाटते. जुन्या ओढणीचा तुकडा कापून किंवा टिश्यू पेपर वापरून त्यात शिंकावे.
४. सुंठ उगाळून / सुंठीचे चूर्ण एका चहाच्या चमच्यात घेऊन थोडे पाणी घालून पातळसर करावे आणि गॅसवर गरम करून कपाळ आणि नाकाबाजूच्या सायनस वरील भागावर लावावे. उष्ण पडते त्यामुळे उन्हाळ्यात करता येण्यासारखे नाही. दोन तासांनी धुतले तरी चालेल किंवा रात्री लावून सकाळी धुवून टाकावे, चांगलाच आराम पडतो.
५.शीतकपाट टाळणे.बऱ्याच घरी शीतकपाट म्हणजे दिसेल ती वस्तू आत टाकून अगदी गोडाऊन करून टाकलेले असते. त्यातील तापमान सर्दीच्या विषाणूंच्या वाढीला पोषक असते असे माझे मत आहे(विदा नाही). मी स्वतः शीतकपाटाच्या जवळ फिरकतही नाही. जेव्हा पर्याय नसतो तेव्हा खोल श्वास भरून घेतो, हवी ती वस्तू काढतो / ठेवतो, शीतकपाटाचे दार बंद करतो आणि दुसऱ्या खोलीत जाऊन उच्छवास सोडून नेहमीसारखे श्वसन चालू करतो.(हा चक्रमपणा असला तरी मला ह्याचा प्रचंड फायदा झालेला आहे). मी थंड पदार्थ खातो, पण ते जेव्हा शीतकपाटात असतात तेव्हा डब्यात अथवा झाकण ठेवलेले असले पाहिजेत. कुठलाही उघडा पदार्थ(झाकण न ठेवलेली दह्याची/खिरीची वाटी किंवा अर्धी कापलेली फळाची फोड इ.) मी खात नाही. शिल्लक राहिलेला पदार्थ डब्यात बंद करून शीतकपाटात ठेवलेला असल्यास खाल्ल्यानंतर काहीही त्रास होत नाही असा माझा अनुभव आहे.
६. सर्दीवर दिली जाणारी बहुतांश औषधे हे एक्सपेक्टरांट(expectorant) असतात, त्याने सर्दी मोकळी होऊन बाहेर पडण्याऐवजी चोंदते आणि कालांतराने जुनाट(क्रोनिक) अवस्थेत जाते. मी स्वतः १९९६ पासून एकदाही सर्दीवर डॉक्टरांचे औषध आणलेले नाही.गरम पाणी, वाफ, सुंठीचा लेप आणि बेलतुळशीचा काढा(तुळस+बेल+थोडे जवस+आल्याचा तुकडा+दालचिनी तुकडा+ पाती चहा ह्या पैकी जे काही मिळेल ते वापरून काढा करावा) ह्याने बऱ्यापैकी फरक पडतो.

वरचे सगळे मुद्दे ऍलर्जिक आणि ऍलर्जिक नसलेल्या सर्दी दोन्हींवर लागू पडतात. सर्दी घडवून आणणारे विषाणू काय किंवा परागकण/धूर/धूळ/रासायनिक मूलकण काय हे सगळे त्यांना फोफावण्यासाठी शरीरांतर्गत असलेले म्युकस आपला बेस म्हणून वापरतात.शरीराची प्रतिकारशक्ती हे सर्दीवर मात करण्याचे एक प्रभावी साधन आहे. त्याला वरील उपायांची जोड दिली की सर्दी कमी होते. सर्दी होऊच नये म्हणून सायनसच्या पोकळीत साठवले जाणारे म्युकस आपण शिंका काढून(induced sneezing)कमी करू शकतो.(वरचा उपाय 3).

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचे तापमापीय संतुलन. जर तुम्ही थंड प्रदेशात गेला आहेत जिथे बर्फ पडत आहे तर तिकडे सगळे काही, तुमच्या शरीर आणि वातावरणासकट थंडच असते. तुम्ही एक कप गरम चहा/कॉफी प्यायला तर शरीराला उब मिळते. पण जर तुम्ही गरम तापमानाच्या प्रदेशात असाल आणि तुम्ही थंडगार पेय किंवा आईस्क्रीम खाल्लेत तर शरीरात अचानक थंडपणा येतो.किंवा रणरणत्या उन्हातून प्रवास करून तुम्ही एकदम एसी मध्ये गेलात तरी हे संतुलन बिघडते. हवेतील आर्द्रता हा घटक इथे अतिशय महत्वाचा ठरतो.ह्या असंतुलनाचे आणि सर्दीचे घनिष्ट नाते असते.(अर्थात हे व्यक्तिसापेक्ष आहे) . त्यामुळे रात्री आईस्क्रीम खाल्लेत तर त्यामुळे सर्दी होऊ नये म्हणून झोपायच्या आधी गरम पाणी पिऊन झोपू नये. शरीर थंड तापमानाचा पदार्थ पचवत असताना गरम पाणी पचनसंस्थेत येऊन आदळते आणि शरीराचे संतुलन बिघडते.

सर्दी हा काही जीवघेणा रोग नाही, पण सर्दीचे त्रासमूल्य प्रचंड आहे. प्रचंड चिडचिड होते, कुठल्याही गोष्टीचा धड आनंद घेता येत नाही.गिळायला त्रास होतो. सर्दी हे कफाचे दुखणे असले तरी सततची सर्दी माणसाला वात आणते.

लई भारी's picture

1 Jan 2019 - 9:43 am | लई भारी

नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती आणि जिव्हाळ्याचा विषय!

हा त्रास गेली २० एक वर्षे असल्यामुळे सगळ्या 'पॅथी' करून झाल्या.
अगदी स्प्रे, सेट्रिझिन/अझिथ्रोमायसिन गरजेनुसार ओव्हर-द-कौंटर घेत होतो कॉलेज ला असताना एवढा त्रास व्हायचा आणि निश्चित माहिती मिळत नव्हती(आता नाही करत असं म्हणा!) आणि वाफ/गरम पाणी तर अजुनपण घेतो.
मध्ये इतका त्रास वाढला होता की घरात फोडणी टाकली की शिंका सुरु. दही खाण्याची वेळ चुकली किंवा जास्त थंड/आंबट असलं की घसा धरलाच!

मला ऍलोपॅथी औषधाने फरक पडतो, पण परत ऍलर्जी होतेच. त्यामानाने आयुर्वेदिक सल्ल्याने घेतलेल्या औषधांचा दीर्घकाळ परिणाम दिसला.
बाकी थंडीत कान झाकणे(रात्री) आणि बाईकवर चेहरा/नाक रुमालाने झाकणे, थंड पदार्थ उठसुठ टाळणे, धुळीच्या संपर्कात येताना रुमाल वापरणे हे करतोच आणि त्याचा फायदा होतो असं वाटत.

वर म्हटल्याप्रमाणे याच उपद्रवमूल्य खूप आहे. सगळ्यांची ऍलर्जी बरी होवो ही सदिच्छा! :)

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 11:41 am | कुमार१

हा त्रास गेली २० एक वर्षे असल्यामुळे सगळ्या 'पॅथी' करून झाल्या. >> +१

अशा सर्व रुग्णांना समाधान देईल अशी कुठलीच औषधे नाहीत. त्याबद्दल मी sympathy व्यक्त करतो !

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 9:44 am | कुमार१

सुंदर विवेचन. बर्याच दिवसांनी तुमची भेट झाल्याने आनंद झाला.

तुम्ही सुचविलेले उपाय इच्छुकांनी जरूर करून बघावेत. जेवढे 'औषध'मुक्त राहता येईल तेवढे चांगले.
शीतकपाटाबाबत सहमत. मी सुद्धा ते कमीत कमी वेळा उघडतो आणि त्यावेळेस नाकाला रुमाल लावतो.
हे कपाट घरात नकोच यावर कौटुंबिक एकमत होणे अवघड असते. त्यामुळे ज्यांना त्रास होतो त्यांनी अशी काळजी जरूर घ्यावी.
धन्यवाद !

तेजस आठवले's picture

1 Jan 2019 - 2:39 pm | तेजस आठवले

धन्यवाद कुमारजी, असाच एखादा अभ्यासपूर्ण लेख आम्लपित्त(एसिडिटी) वर पण येऊ द्या.

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 2:47 pm | कुमार१

लग्नानंतर काहींचा आत्मविश्वास वाढल्याची पण उदाहरणे दिसतील.( हा बाह्य जगातला आत्मविश्वास असतो, एकदा घरात पोचल्यानंतर ह्याच आत्मविश्वासाच्या ठिकर्या उडालेल्या असू शकतात.) ह. घे. :) >>>> + १११११ ...
अहो, वास्तव आहे ते ! सगळेच कबूल करतील की !!
...
आम्लपित्त या विषयाची नोंद घेत आहे.
लोभ असावा.

डॉ श्रीहास's picture

20 Jan 2019 - 11:39 am | डॉ श्रीहास

honeymoon rhinitis !

वन's picture

5 Jan 2019 - 9:36 am | वन

असाच एखादा अभ्यासपूर्ण लेख आम्लपित्त(एसिडिटी) वर पण येऊ द्या.>>>>अनुमोदन.

सुधीर कांदळकर's picture

1 Jan 2019 - 12:44 pm | सुधीर कांदळकर

लेख आवडला. बालकांना होणारी सर्दी हा आणखी एक वेगळा प्रकार. आमच्या चि.ला तो एक ते दोन वर्षे वयाचा असतांना अचानक सर्दी होऊ लागली आणि बरी होईना. मग मुंबईच्या वाडिया बालरुग्णालयात नेले. तेथील डॉ. तज्ञांनी विशिष्ट पदार्थांची अ‍ॅलर्जी म्हणून निदान केले. ड्रायफ्रूट्स, सायट्रस फळे आणि खोबरेल तेल या गोष्टी टाळायला सांगितले आणि लक्षणमुक्तीसाठी - सिम्टोमॅटिक रिलीफसाठी - नेहमीची अ‍ॅन्टीहिस्टॅमिनिक्स दिली. (आता ३० वर्षांनंतर नावे ध्यानात नाहीत.) खोबरेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल सुरू केले. बाकी गोष्टी टाळल्या आणि दोन दिवसात पूर्ण बरे वाटले.

वयाची पहिली पाच वर्षे पूर्ण झाल्यावर ही अ‍ॅलर्जी आपोआप नाहीशी होईल असे पण सांगितले आणि नंतर खरोखर नाहीशी झाली.

असो. आपल्या अप्रतिम लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2019 - 12:52 pm | मुक्त विहारि

एक ग्लास कोमट पाण्यात, अर्ध्या लिंबाचा रस टाकून प्यायचे.

दिवसातून २-३ वेळा.

मला फायदा झाला.

सध्या रोज एखादा आवळा (मोरावळ्याच्या स्वरूपात) किंवा एक लिंबू जेवणात असतेच.त्यामुळे सर्दीचा म्हणावा तसा खूप त्रास नाही.खूपच थंडी पडली तर एक-दोन दिवस त्रास होतो.

बहूदा सी-व्हिटॅमिन काम करत असावे...

कुमार१'s picture

1 Jan 2019 - 1:12 pm | कुमार१

मु वि,
तुम्हाला फायदा झाला हे छानच. पण, इथे थोडा गैरसमज दूर करतो. ‘सर्दी’ चे अनेक प्रकार आहेत आणि त्यापैकी फक्त अलर्जिकचा विचार लेखात केला आहे. आता क’ जीवनसत्व हे सर्दीवर उपाय होऊ शकते का, हा वैज्ञानिक वादाचा विषय आहे.
‘क’ जीवनसत्व आपली साधारण प्रतिकारशक्ती वाढवते या तत्वास अनुसरून सर्दीच्या रुग्णांवर त्याचे प्रयोग झाले. त्यांचे निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही. पण ती झाली असता तिची तीव्रता व कालावधी त्याच्या डोसने कमी होऊ शकतो.

म्हणून प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ‘क’ जरूर घ्या. पण, कुठलीही सर्दी ‘बरी’ होईल या भ्रमात राहू नये असे सुचवतो.

सुधीर, अनेक आभार. तुमच्या मुलाची अलर्जी अपोआप गेली हे छान झाले.

मुक्त विहारि's picture

1 Jan 2019 - 9:24 pm | मुक्त विहारि

माहितीबद्दल धन्यवाद..

वन's picture

2 Jan 2019 - 2:12 pm | वन

माझे एक नातेवाईक मुंबईत असतात. जर ते फेब्रुवारी-मार्च दरम्यान पुण्यास आले तर शिंकानी प्रचंड बेजार होतात. आता ते या काळात पुण्यातल्या समारंभास येत नाहीत.

सुबोध खरे's picture

2 Jan 2019 - 7:21 pm | सुबोध खरे

काँग्रेस गवताची एलर्जी असलेल्या लोकांना उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोरड्या वातावरणात असा जबरदस्त त्रास होतो.

थंडी असताना पडण्याऱ्या दवामुळे परागकण हवेत "उडत" नाहीत पण थंडी संपताना होणाऱ्या कोरड्या हवेत या वनस्पतीचे परागकण हवेत तरंगत असतात

त्यामुळे संवेदनशील लोकांना दमा, श्वास लागणे,सर्दी होणे नाक चोंदणे वाहणे त्वचेला खाज येणे पुरळ येणे सारखे अनेक ऍलर्जीचे त्रास होतात.

सुदैवाने मुंबई किंवा कोकण पट्टी येथे हवा दमट असल्याने मुळात काँग्रेस गवत फारसे वाढत नाही आणि असे हवेत तरंगणारे परागकण फारच कमी असतात.

कुमार१'s picture

2 Jan 2019 - 6:08 pm | कुमार१

बरोबर आहे. असे लोक समुद्री हवेला सरावलेले असतात. तिथे कमाल-किमान तापमानातील फरक कमी असतो.
एकदा हा त्रास मागे लागला की मग या विरुद्ध हवामानाने त्रास होतो.

वन's picture

2 Jan 2019 - 8:32 pm | वन

डॉ कुमार व सुबोध
उपयुक्त माहिती मिळाली.

कुमार१'s picture

3 Jan 2019 - 12:29 pm | कुमार१

चर्चेत सहभागी सर्वांचे अनुभव वाचनीय आहेत. समाजात बऱ्यापैकी आढळणाऱ्या या आजाराचे अनुभव एकमेकांना यातून समजले हे चांगले झाले. अशा रुग्णांपैकी संपूर्ण समाधानी कोणी नसते. विशिष्ट मोसमात मनात भीती असतेच. या आजाराचे मूळ आपल्या जनुकांत दडलेले आहे. त्यामुळे प्रतिबंध व उपचार यांनी त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.

यासाठीची कुठलीच उपचारपद्धती परिपूर्ण नाही. त्या प्रत्येकाची बलस्थाने व मर्यादा स्पष्ट आहेत. ज्याला ज्यामुळे बरे वाटेल तो मार्ग त्याने स्वीकारावा हे उत्तम. एखाद्याला अमुक उपचाराने बरे वाटले म्हणून त्यामुळे दुसऱ्याला वाटेलच असे नाही.

गरम वाफ आणि तत्सम घरगुती उपचार हे औषधपूरक आहेत. ते जरूर करावेत. नाकात तेल वा तूप घालणे हे आधुनिक वैद्यकानुसार अयोग्य परंतु ( येथे तुम्ही काहींनी लिहिल्याप्रमाणे) आयुर्वेदानुसार योग्य आहे. त्यामुळे असे उपाय स्वतःच्या जबाबदारीवर करावेत. अनेक औषधे घेऊन पिडलेला रुग्ण हा शेवटी स्वतःच स्वतःचा डॉक्टर होतो हे खरे !

असो…..
भारतातील येणारे २-३ महिने अशा सर्व पीडितांना सुखाचे जावोत यासाठी मनापासून शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या देखील !
लोभ असावा.

ॲलर्जीमुळे होणारी सर्दी आणि दमा ह्यातच माझी स्पेशॅलिटी प्रॅक्टीस आहे. तसं तुम्ही लिहीलेला लेख परिपुर्ण आहे (माझ्या आळशीपणामुळे मी आनंदी आहे कारण महत्वाचं काम तुम्हीच केलं आहे) तरिही काही प्रश्नांवर मला आणि पेशंटना आलेले अनुभव शेअर करु ईच्छीतो.

कुमार१'s picture

18 Jan 2019 - 5:57 pm | कुमार१

जरूर लिहा ! विशेषतः allergen immunotherapy भारतात कितपत वापरली जाते हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.

डॉ श्रीहास's picture

20 Jan 2019 - 11:05 am | डॉ श्रीहास

तर मग सुरवात करतो...

साध्या शब्दात सांगायचं झालं तर ॲलर्जी म्हणजे आपल्या संपर्कात आलेल्या एखाद्या गोष्टीला शरीर अशी प्रतिक्रीया देतं ज्यामुळे शरीराला त्रास होतो जसे की बरेच जणांनी म्हटलं आहे की जुन्या धुळीचा संपर्क आला की फटाफट शिंका येणे, डोळ्याच्या कडांना खाज येणे, खोकला आणि नाक गळायला सुरवात होते. तर ही झाली जुन्या धुळीतल्या House Dust mites ची , बुरशीच्या कणांची किंवा fungal spores ची , झुरळांची घाण......... तर ही झाली धुळींची ॲलर्जी !!
अशीच ॲलर्जी असू शकते धान्याच्या धुळीची, पिठांची, घरातल्या पाळीव प्राण्यांच्या (कुत्रा /मांजर) केसांची, बागेमधल्या फुलांच्या परागकणांची, शेतातल्या पिकांच्या फुलोऱ्याची (माझ्या अनुभवात मका, ज्वारी हे जास्त )आणि तण जसे की गाजर गवत/ काॅंग्रेस गवत... लक्षात घ्या हे सगळे aeroallergens आहेत (हवेतून पसरणारे)

ॲलर्जी चे दोन प्रमुख प्रकार
१.Seasonal किंवा मौसमिक
२.Perineal किंवा वर्षभर आढळणारी

Seasonal ॲलर्जी किंवा मौसम बदलतांना होणाऱ्या त्रासाला सर्वात जास्त कारणीभूत ठरतात ते परागकण (फुलांचे, तणांचे आणि पिकांचे) ह्यासाठी Pollen Calendar चा वापर करून त्या त्या भागातल्या परागकणांची माहिती ॲलर्जी टेस्ट च्या दरम्यान अतिशय उपयुक्त ठरते !!
Perineal ॲलर्जी अश्या गोष्टींची असते ज्या वर्षभर तुमच्या संपर्कात येऊ शकतात.. जुनी धुळ, बुरशी , जनावरांचे केस ...

बरेच वेळा दोन्ही प्रकारच्या गोष्टी एकत्रच टेस्ट मध्ये आढळतात.

ॲलर्जी टेस्ट
१.त्वचेवरच्या तपासण्या
२.रक्ताच्या तपासण्या

१.त्वचेवरच्या तपासणीमध्ये दोन मुख्य प्रकार Skin Prick test / Scratch test आणि intradermal test

ह्यातली Skin prick test मी नियमित करतो . ही करतांना ज्या गोष्टींची ॲलर्जी तपासायची आहे त्या अर्काचा एक शेंब forearm (हातावर) टाकून अगदी सुईचा हलकासा ओरखडा (त्वचेच्या ६/७ थरांपैकी पहील्या दोन थरांपुरता) म्हणजे सुईचं टोक आणि त्वचा यांचा संपर्क येईल ईतकाच घेतला जातो. ह्या तपासणी द्वारे ४०-४५ गोष्टींची ॲलर्जी तपासणी केली जाते. ज्या गोष्टीं positive येतात त्यापैकी फक्त Food allergens आणि animal danders सोडून बाकी गोष्टींसाठी Immunotherapy सुरू करावी लागते. ही इंजेक्शन द्वारे ,गोळ्या किंवा द्रव रुपात उपलब्ध आहे . माझा अनुभव इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या immunotherapy चा आहे कारण जगभरात ही पद्धत सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाते आणि ह्यावरच सर्वात जास्त अभ्यास केला गेलेला आहे.

दुसरी तपासणी म्हणजे intradermal test करतांना सुईद्वारे त्वचेमध्ये allergen चे इंजेक्शन दिले जाते . ह्यामध्ये वापरलं जाणाऱ्या अर्काचे प्रमाण बरच जास्त असतं. बव्हंशी ही तपासणी पाठीवर केली जाते. ह्यात ८० किंवा अधीक गोष्टी तपासल्या जाऊ शकतात कारण जास्त जागा उपलब्ध असते.

परंतू ॲलर्जी तपासतांना जितक्या कमी गोष्टीं तपासल्या तितकं चांगलं हा फारच महत्वाचा नियम आणि त्याहूनही महत्वाचं की जितक्या कमी गोष्टींची immunotherapy दिली जाईल तेवढा उत्तम रिझल्ट !!

World allergy Organisation आणि Indian allergy Organisation ह्या दोन्ही जागतिक संस्थांकडून Skin Prick Test ला Gold Standard दर्जा दिला गेला आहे कारण जास्त accuracy, सहजता, अतिशय कमी false positive निकाल ही प्रमुख कारणे. क्वचित काही ठिकाणी intradermal test केली जाते.

Immunotherapy चा कालखंड ३-३.५ वर्षांपर्यंत असतो ह्यात दर ८ दिवसांमध्ये एक असं महिन्यात ४ इंजेक्शन्स चा कोर्स असतो(ही इंजेक्शन्स subcutaneous पद्धतीनी हातावरच म्हणजे forearms
वरच दिली जातात), दर ५ महीन्यांनी ह्या इंजेक्शन्सची Strength (पाॅवर) वाढत जाते आणि ठराविक काळानंतर एकाच strength चं इंजेक्शन नियमीत दिलं जातं. हळूहळू immunotherapy चा असर दिसायला लागल्यावर Pharmacotherapy म्हणजेच औषधे (नाकतले स्प्रे, ॲलर्जीच्या गोळ्या आणि इन्हेलर्स) ची गरज कमी होऊ लागते पण हा कालावधी बराच मोठा (काही आठवडे क्वचित महीने) असू शकतो कारण ठराविक प्रतिकारशक्ती (specific immunity)हळूहळू तयार होते.

बरं वाटलं किंवा नाही वाटलं म्हणून Immunotherapy मध्येच बंद न करता पूर्ण कोर्स केल्यास १० ते १५ वर्षांपर्यंत पेशंट त्रासमुक्त (symptom free) राहील्याची असंख्य उदाहरणे आहेत; क्वचित बरेच वर्षांनी ॲलर्जी परत उद्धभवू शकते परंतु मधला मोठा कालावधी औषधरहीत आणि बिना त्रासाचा जातो हे नेहमीच महत्वाचं !!

२.रक्ताच्या तपासण्या अगदी तान्ही/लहान मुलं , वयस्क व्यक्ती आणि औषधांच्या ॲलर्जी निदानासाठी वापरल्या जातात परंतू त्वचेवरच्या तपासणी पेक्षा काकणभर कमीच ....

ॲलर्जी टेस्ट करण्याआधी काही दिवस/आठवडे औषधे देऊन त्रास कमी झाल्यावर अंदाजा घेतला जातो . तपासणी आधी किमान ४८ तास म्हणजे दोन दिवस ॲलर्जीच्या गोळ्या बंद करायला सांगितलं जातं....

ॲलर्जी आणि त्यावरचे उपचार हा तसा दुर्लक्षित किंवा उपेक्षितच भाग म्हटला तरी हरकत नाही, ह्यात काम करणारे तज्ञ कमी आहेत शिवाय ह्या निदानप्रणाली आणि उपचारपद्धतीबद्दल गैरसमज व भिती जास्त त्यामुळे विविध बाजूंनी ही उपचारपद्धत पुढे रेटावी लागते. ह्यात वेळ आणि संयम दोन्हीची सांगड घातली तर मिळालेलं यश अतिशय सुखावह असतं ....... _/\_

कुमार१'s picture

20 Jan 2019 - 11:40 am | कुमार१

अतिशय छान माहिती.
पुभाप्र हे वे सां न ल !

तुषार काळभोर's picture

20 Jan 2019 - 9:46 pm | तुषार काळभोर

अतिशय उपयुक्त, छान अन सोप्या शब्दात सांगितलेली माहिती.

सुबोध खरे's picture

21 Jan 2019 - 12:01 pm | सुबोध खरे

ऍलर्जी कधीच बरी होत नाही हा एक मोठा गैरसमज आहे. दुर्दैवाने बहुसंख्य डॉक्टरांना पण असा गैरसमज आहे त्यामुळे असंख्य रुग्ण ज्यांना या उपचारांचा फायदा होऊ शकतो असे रुग्ण या उपचारांपासून वंचित राहताना आढळतात

एक विनंती -- आपण ऍलर्जी वर एक सविस्तर लेख लिहावा म्हणजे बहुसंख्य लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.

जाता जाता --आपल्याला (माझ्या आळशीपणामुळे मी आनंदी आहे) लेखनाची ऍलर्जी आहे का? तसे असेल तर त्यावरही उपचार करून घ्या असे मी आपल्याला नम्रपणे सुचवतो
))=((

डॉ श्रीहास's picture

21 Jan 2019 - 3:42 pm | डॉ श्रीहास

ॲलर्जी बरी होत नाही हे अर्धसत्य आहे कारण नेमकी कशाची ॲलर्जी आहे त्यासाठी काय केलं पाहीजे (टाळणं / उपचार घेणं) हे ठरवता आलं तर ती ॲलर्जी आटोक्यात आणून सामान्य आयुष्य जगता येतं....

उदा. औषधांची , अन्नपदार्थांची आणि जनावरांच्या केसांची ॲलर्जी आयुष्यभर राहते त्यासाठी निदान झाल्यावर ह्या गोष्टी टाळणे एवढाच पर्याय आहे. धुळीतले जंतू , जुनी धुळ , पराग कण, बुरशी (काही ठराविकच) ह्यांच्यासाठी immunotherapy घेणे सर्वोत्तम पण हा ऊपाय १००% आराम देईलच हे गृहीत धरता येणार नाही हे सांगणे महत्वाचे आहे कारण कोणत्या व्यक्तीला किती आराम पडू शकतो हे काही काळानंतर ठरतं (वेळ द्यावाच लागतो ).

घरातली जुनी धुळ आणि त्यातील जंतू (House Dust Mites) हे फारच मोठ्याप्रमाणात आढळणारे allergens आहेत. ह्यासाठी immunotherapy तर आहेच शिवाय गाद्या आणि उश्यांसाठी खास कपडा मिळतो जो धुळीपासून तुम्हाला दूर ठेवू शकतो परंतू सहज न उपलब्ध होणे आणि प्रचंड किंमत ह्यामुळे पाॅप्युलर नाहीये.

लेखनाची ॲलर्जी नसून कंटाळा हेच कारण त्यावर सध्यातरी काही उपाय सापडला नाहीये .... काही दिवसांपासून सलग लिहीणं जमतंय म्हणून हा विषय हाताळू शकलो .मुख्य लेखात आणि ह्या प्रतिक्रियांमधूनच अॅलर्जीबद्दल भरपूर सांगितलं आहे त्यामुळे वेगळ्या लेखाची गरज नाहीये . वै म

कुमार१'s picture

21 Jan 2019 - 5:00 pm | कुमार१

औषधांची , अन्नपदार्थांची आणि जनावरांच्या केसांची ॲलर्जी आयुष्यभर राहते >>≥> + १११११

टर्मीनेटर's picture

3 Jan 2019 - 1:12 pm | टर्मीनेटर

माहीतीपुर्ण लेख आणि चर्चा.

भ ट क्या खे ड वा ला's picture

20 Jan 2019 - 12:25 pm | भ ट क्या खे ड वा ला

हे ठाऊकच नव्हतं.

लेख आणि प्रतिसाद छानच ! धन्यवाद !
एक प्रश्न आहे ... शस्त्रक्रियेबद्दल .... नाकात हाड वाढणे किंवा मांस वाढणे यावर शस्त्रक्रिया हाच उपाय आहे का ....कारण श्वास घेण्यास त्रास होतो आणि नेहमी सर्दी होते ...
पण मी अनुभवलं आहे की एकदा शस्त्रक्रिया केल्यावर पुन्हा काही वर्षांनी परत करावी लागते ....

अवांतर :
लहान असताना मी निवडणुकीसाठी व्हिक्स हे निवडणूक चिन्ह घ्यायचं ठरवलं होतं कारण कायम सर्दी असायची आणि नेहमी हेच वापरायचो ☺️

कुमार१'s picture

22 Jan 2019 - 7:57 am | कुमार१

तुमच्या प्रश्नाचे उत्तर कान-नाक-घसा तज्ज्ञानेच द्यावे हे उत्तम.

व्हिक्स हे निवडणूक चिन्ह>>>☺️
व्हिक्स सारख्या उत्पादनांना सामान्य माणसाच्या लेखी 'उपचारा'चे स्थान मिळणे हे त्या जाहिरातींचे यश आहे.

कुमार१'s picture

24 Mar 2019 - 8:42 am | कुमार१

भारतात एलर्जीचा मोसम साधारण डिसेंबर चा मध्य ते मार्च ची सुरवात असा असायचा. गेली २-३ वर्षे हा पुढे सरकत चालला आहे. यंदा मार्चचा शेवटचा आठवडा आला तरीही असे बरेच रुग्ण अजून त्रस्त आहेत.

कुमार१'s picture

12 Jan 2022 - 4:37 pm | कुमार१

लेखात Antihistamines या प्रकारच्या औषधाबद्दल लिहिलेलेच आहे.
सावधान : खालची बातमी पहा आणि असे कधीही करू नका

“औषध खाऊन जर तुम्ही गाडीचं स्टेरिंग हाती घेत असाल तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण सिनेअभिनेता हेमंत बिर्जे यांची हीच चुक अपघाताला कारणीभूत ठरली आणि अख्ख्या कुटुंबांचा जीव टांगणीला लागला”.

https://marathi.abplive.com/entertainment/actor-hemant-birje-accident-on...

जेम्स वांड's picture

12 Jan 2022 - 5:53 pm | जेम्स वांड

हा धागा पहिले का वाचला नाही असे वाटू लागले आहे मला.

मी ह्या जुनाट सर्दीचा अतिपुरातन ग्राहक आहे, जरा सिझन चेंज झाला का एकतर नाक चोंदणे किंवा गळणे दोनपैकी एक काहीतरी सुरू होतेच, डोक्याला निव्वळ ताप होतो, खासकरून सकाळी उठून शौचास बसले रे बसले का सटासट एकामागे एक अश्या किमान १५-२० शिंका येणारच, त्यावेळी पार डोळ्यातून पाणी येऊस्तोवर हाल खराब होतात, कमी वेळेत इतक्या भयानक अन जास्त शिंका आल्यामुळे कित्येकवेळा बरगड्यांचा पिंजरा अन खांदे भरून येतात, कधी कधी हलक्या अंगाने बसलो असेल तर येणाऱ्या महामोठ्या शिंकांनी छातीला अन मानेला झिणझिण्या येईस्तोवर त्रास होतो, सतत नाक पुसणे अन डी कोल्ड टोटल खाणे हेच आजवर करत आलोय, आता मात्र एखाद डॉक्टरला दाखवावे वाटत आहे,

कान नाक घसा तज्ञ डॉक्टरला भेटावे ?

का

एलर्जी स्पेशालिस्ट ?

रच्याकने,

हा आजार आनुवंशिक असतो का ? कारण आमच्यासोबत कैकवेळा आमच्या तीर्थरूपांचीही शिंक-जुगलबंदी सुरू होते.

कृपया मार्गदर्शन करा कुमार सर...

कुमार१'s picture

12 Jan 2022 - 6:20 pm | कुमार१

या प्रकारच्या त्रासात अनुवंशिकता असू शकते. तुम्ही नाक कान घसा तज्ञांचा सल्ला घ्यायला हरकत नाही.
पण औषधांच्या बाबतीत 'आयुष'पैकी जी शाखा तुम्हाला पसंत असेल त्याची औषधे घेऊन बघा असे सुचवेन.
औषधे बऱ्यापैकी दीर्घकाळ घ्यावी लागतात म्हणून असे सुचवत आहे.

एलर्जी स्पेशालिस्ट

ह्यात मात्र फारसा अर्थ नाही. त्यातून विशेष शोध असा लागत नाही.
बऱ्याच जणांचा अनुभव आहे की, तुम्हाला अमुक इतक्या दहा-वीस गोष्टींची एलर्जी नाही असा निष्कर्ष हाती पडतो.
नक्की कशाची आहे हे शोधणे तितके सोपे नसते !

बाकी धूळ, धूर, जुनी पुस्तके, माळे आवरणे या सर्वांपासून लांब राहणे..... 😀

जेम्स वांड's picture

12 Jan 2022 - 6:53 pm | जेम्स वांड

बाकी धूळ, धूर, जुनी पुस्तके, माळे आवरणे या सर्वांपासून लांब राहणे...

आता हे कारण सांगून दरवर्षीच्या दिवाळी सफाईमधून यशस्वी अंग काढून घेण्यात येईल, फक्त पुस्तके सोडून, डबल मास्क लावेन पण जुनं उत्तम पुस्तक सापडलं तर धूर झटकत फडशा हा पाडणारच, लवकरच कान नाक घसा तज्ञ डॉक्टरांना नक्की भेटेन.

&#129321 &#129321 &#129321 &#129321

कुमार१'s picture

12 Jan 2022 - 7:03 pm | कुमार१

जुनी पुस्तके

मलाही असा त्रास आहे. याच कारणास्तव मी काही वर्षांपूर्वी वाचनालय बंद केले. कारण प्रत्येक वेळेस गेल्या दीड वर्षातले नवे पुस्तक आपल्याला मिळेल याची खात्री नसते.
आता वर्षाकाठी दोन-तीन पुस्तके विकत घेतो आणि दर तीन वर्षांनी त्यातली काही रद्दीत देतो.
घरी फार साठा करणे मला परवडणार नाही

हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आधी पण प्रतिसाद दिला होता त्यात या वर्षीची भर घालते.

मला दरवर्षी ऋतू बदलला कि हवेतील परागकणांमुळे ऍलर्जी चा त्रास होतो. भारतात धुळीचा व्हायचा अमेरिकेत परागकणांचा होतो. सध्या नाकारला फवारा आणि प्रिस्क्रिपशन शिवाय मिळणार (over the counter ) औषध घेऊन फायदा होतो.

पण जर औषध घ्यायला उशीर झाला किंवा त्रास जास्त होऊन सर्दी झाली तर अजून एक त्रास होतो. तो म्हणजे सायनस मध्ये साठलेली सर्दी घशात येऊन प्रचंड खोकला होतो. हा त्रास मला गेल्या वर्षीपर्यंत होता.

या वर्षी त्यात अजून एक भर पडली. वरील दोन्ही औषध घेऊन मला बराच फायदा होतो, पण या वर्षी घसेदुखी मुळे डॉक्टर ने ऍन्टीबीओटीक दिली, त्यामुळे ऍसिडिटी वाढली, त्यामुळे, नाक, आणि सायनस साफ असताना सुद्धा पोटातून कफ वर येऊन खोकला झाला.

हा मुद्दामून प्रतिसाद देण्याचं कारण कि, माझा डॉक्टर मला सर्दीचीच जास्त परिणामकारक औषध देत होता, आणि त्याने ऍसिडिटी वाढून जास्त खोकला येत होता. ऍसिडिटी मुले खोकला होऊ शकतो हेच मला माहित नव्हतं. इथे कोणाला यासारखी लक्षण असतील तर तुमच्या डॉक्टर ला ऍसिडिटी मुले खोकला होतोय का हे पण नक्की विचारा.

कंजूस's picture

13 Jan 2022 - 7:13 am | कंजूस

सर्दी झाल्यास - तासातासाने नाकाचा भाग साबण पाण्याने धुवायचा. काढे, औषधं नाही घ्यायची.

पुस्तके वगैरे झटकायच्या अगोदर ओलसर कापडाने हलकेच पुसून घ्यायची.

कुमार१'s picture

13 Jan 2022 - 12:39 pm | कुमार१

**पुस्तके वगैरे झटकायच्या अगोदर ओलसर कापडाने हलकेच पुसून घ्यायची.
>>चांगला उपाय

स्वधर्म's picture

17 Jan 2022 - 5:40 pm | स्वधर्म

डॉ. कुमार, आपले खूप धन्यवाद. मला अशा प्रकारचे निदान हौऊन सव्वा वर्ष झाले. ऑगष्ट २०२० मध्ये आधी वास गेला पण चव होती. त्यावेळी कोवीड अगदी भरात असल्याने विलगीकरण केले होते, पण अनेक महीने झाले तरी वास काही येत नव्हता. आयुष्यात कधी झाली नव्हती अशी गंभीर सर्दी झाली. खूप शिंका येत. मग होमिओपॅथीचे औषध घेतले, फारसा परिणाम झाला नाही. मग नाक कान घसा तज्ञाकडून तपासणी व सिटी स्कॅन केल्यावर नाकात सायनसमुळे पॉलिप्स वाढली आहेत असे समजले. आजाराचे कारण जरी अॅलर्जी असे सांगितले तरी अलर्जी तपासणी करून फारसे काही हाती लागत नाही असेही सांगितले. तीन महिने औषधे घेतली - मुख्यत: नाकात आणि घशातले स्प्रे. त्यांनी स्प्रे मारत रहा व नंतर तीन महिन्यांनी स्कॅन करू, जर पॉलिप्स कमी झाली नाहीत तर मात्र शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. तरीही एखाद्या दिवशी अशी काही सर्दी खवळायची की पहाटेपर्यंत झोपू शकत नसे.
मग आयुर्वेदाचे औषध सुरू केले, ते सध्या सुरू आहे. बराच आराम पडला आहे, पण अजून वास आजिबात येत नाही.
वेगवेगळ्या पॅथीचे डॉक्टर्स दुसर्या पॅथीबद्दल काही बोलत नाहीत. तूर्त आयुर्वेदाचे औषध घेत आहे. बरोबरीने जॉगिंगचा व्यायाम आणि प्राणायामही करत आहे. निदान भयंकर शिंका येणे व छातीतून घरघर येणे बरेचसे कमी झाले आहे.
माझा एक प्रश्न असा, की सायनस डोऴ्यांच्या आजूबाजूला कपाळात वगैरे ‘साठतो’ हे खरे आहे का? तो सगळा हळूहळू काढून टाकला की विकार बरा होईल असे काहीसे सांगितले जाते. जरी आराम वाटत असला, तरी आयुर्वेद वाले स्कॅनिंग करून अगर नाकाची तपासणी वगैरे करत नाहीत. त्यामुळे नक्की सूज व पॉलिप्स कमी झाले आहेत का, हे पाहिले नाही. एकूण हा बराच चिवट विकार आहे आणि पूर्ण बरे होण्याची आशा आहे.

कुमार१'s picture

17 Jan 2022 - 6:00 pm | कुमार१

स्वधर्म,
तुमचा प्रश्न चांगला आहे. आपल्या नाकातोंडाभोवती काही सायनसेस असतात. निरोगी अवस्थेत त्यांच्यामधून जो स्त्राव निघतो तो त्यांच्या एका बारीक भोकाद्वारे नाकात म उतरतो. निरोगी अवस्थेत हा स्त्राव नेहमी एकेरी मार्गानेच पुढे प्रवास करतो. त्यामुळे सायन्सेस मोकळ्या व स्वच्छ राहतात.

जेव्हा ऍलर्जीचा त्रास होतो किंवा पॉलीप वगैरेमुळे स्थानिक अडथळा निर्माण होतो, तेव्हा सायन चे भोक सुजल्यासारखे होऊन काहीसे बुजते. त्यामुळे सायनसमध्ये स्त्राव साठू लागतो. असे जर दीर्घकाळ झाले तर तिथे जंतुसंसर्ग होतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार चालू ठेवा.
आजार किचकट, क्लिष्ट व दीर्घकालीन असतो.
नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा !

स्वधर्म's picture

17 Jan 2022 - 8:34 pm | स्वधर्म

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसादांबद्दल खूप धन्यवाद.

स्वधर्म's picture

25 Jan 2024 - 8:25 pm | स्वधर्म

बर्याच दिवसांनी हा धागा वर आला व माझा अनुभव लिहावा असे वाटले. जेंव्हा वरील प्रतिसाद लिहिला, तेंव्हा आयुर्वेदीक उपचारांना सुरूवात केली होती. पुण्यातील राजाराम पूलाच्या टोकाला असलेल्या प्रसिध्द आयुर्वेद तज्ञाकडून उपचार घेतले होते. चार महिने व भरपूर खर्च करूनही काही गुण आला नाही. त्रास वाढला व त्यातून त्या वैद्यराजांचा व आयुर्वेदाचा एकूण अप्रोचच काही काम करत नाही असे वाटले. त्यावर खरे तर एक अनुभवच लिहिता येईल. मग आधुनिक वैद्यकाकडे जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. तिकडे गोळ्या व फवारे सुरू केले.  अ‍ॅलर्जीची त्वचा चाचणीही पुण्यात करून घेतली, आणि नंतर रक्ताची चाचणी परदेशात करून घेतली. एकदा अ‍ॅलर्जी आहे असे तर एकदा नाही असे निकाल आले.
त्रास नियंत्रणात आला पण गोळ्या व फवारे घेण्यास पर्याय नाही अशी सध्या अवस्था आहे. डॉ.नी पॉलिप्सचे ऑपरेशन करून घ्यायला सांगितले आहे, पण तातडीने केलेच पाहिजे असे नाही. वासही येत नाही. किती वर्षे गोळ्या, फवारे घ्यायचे म्हणून आता मार्च महिन्यात ऑपरेशन करून घेण्याचा विचार आहे.

कुमार१'s picture

25 Jan 2024 - 8:55 pm | कुमार१

डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य ते उपचार करीत राहावेत.
एलर्जी चाचणीचे निष्कर्ष बऱ्यापैकी वादग्रस्त असतात.
शुभेच्छा !

जेपी's picture

17 Jan 2022 - 11:02 pm | जेपी

मला सर्दी चा बराच वेळेस होतो. Seson बदलला की लगेच.
एकदा कान फुटून बराच पुस गेला .
तेव्हा dr. सोबत बोल्यावर त्यांनी सायनस आहे. Operation करावे लागेल असे सांगितल. Ct scan केला. आणी रिपोर्ट घेऊन दुसऱ्या dr. कडे गेलो.
सेकंड ओपनियन घेतल्यावर दुसऱ्या dr. ने एक स्प्रे दिला नाकात मारायला.
त्या नंतर आजतागायत सर्दी झाली झाली नाही.
नेमक काय झालं होतं माहीत नाही अजून .

कुमार१'s picture

1 Mar 2022 - 7:12 pm | कुमार१

भारतात एलर्जीचा मोसम आता ऐन भरात आहे. झाडांची बारीक पानगळ आता वाढत जाईल.
गेल्या चार वर्षांपासून ऋतुचक्र एक महिना पुढे सरकल्याचे अगदी व्यवस्थित जाणवते.

पूर्वी जानेवारी अखेरीस हा मोसम चालू व्हायचा.
आता तो फेब्रुवारी संपताना ऐन भरात येतो.

Dr चे आणि प्रतिसाद कर्त्या चे ही शत:श आभार!!
खुप च उपयुक्त लेख आहे.

कुमार१'s picture

19 Mar 2023 - 12:51 pm | कुमार१

गेल्या तीन वर्षांची तुलना करता पश्चिम महाराष्ट्रात यंदाचा ऍलर्जीक मोसम बऱ्यापैकी सुसह्य होता. झाडांची पानगळ पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात जाणवली. तसेच हवेतील सूक्ष्मकणांचे प्रमाणही कमी वाटले. पानगळीच्या जोडीने होणारी वावटळ देखील कमी होती.

त्यामुळे बऱ्याच जणांचे डोळे तुलनेने कमी खाजले. श्वसनमार्गाचा दाह देखील कमी वाटला. बहुदा मार्च अखेर हा मोसम संपेल अशी आशा वाटते.

गेल्या तीन-चार वर्षात असे जाणवले आहे की निसर्गाचे ऋतुचक्र एक दीड महिन्याने पुढे गेलेले आहे. पूर्वी जानेवारीच्या सुरुवातीस सुरू होणारा हा त्रास आता जवळजवळ फेब्रुवारीच्या मध्यावर चालू होताना दिसतो.

कुमार१'s picture

25 Jan 2024 - 4:13 pm | कुमार१

सालाबादप्रमाणे सध्या भारतातील ऍलर्जीचा हा मोसम.
घराघरांत शिंकांचे आवाज घुमू लागले आहेत....

मुलांमधील वाढत्या प्रमाणातील ऍलर्जीची जनुकीय कारणे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्या दृष्टिकोनातून एक मोठा संशोधन प्रकल्प चालू आहे :

मूल गर्भावस्थेत असताना जर त्याच्या आईच्या फुफ्फुसांमध्ये eicosanoid या प्रकारातील विशिष्ट मेद पदार्थ जास्त असतील तर ते त्या मुलामध्ये संक्रमित होतात. त्याच्या भविष्यातील ऍलर्जीशी त्यांचा संबंध असावा या गृहीतकावर हे संशोधन चालू आहे.