शतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :
लेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.

-साहित्य संपादक

"मोहिम बागलाणची" भाग दुसरा

Primary tabs

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
27 Dec 2018 - 11:42 pm


"मोहिम बागलाणची"


दिवस दुसरासाल्हेर, सालोटा

अलंग-मदन-कुलंग हे दुर्गत्रिकुट पाहिल्यानंतर त्याच ट्रेकला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट अर्थात कळसुबाईवर जाणं झालं होतं. हे कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात येतं तर महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात मोडतो. आकडेवारी अशी सांगते की नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त किल्ले आहेत. आता जास्त म्हणजे किती असतील? तर थोडे थोडके नव्हे, तब्बल साठ किल्ले आहेत नाशकात, तेही एकापेक्षा एक सरस असे.
त्यामुळं आजच्या ट्रेकच्या दुसर्‍या दिवशी, बर्‍याच दिवसांची सर्वात उंच किल्ल्यावर जाण्याची सर्वांच्या मनातली एक सुप्त इच्छा पूर्ण होणार होती. आज आम्ही साल्हेर आणि सालोटा असे दोन किल्ले पाहून भिलाईच्या पायथ्याशी असलेल्या दगडी साकोड्यात मुक्कामाला जाणार होतो.
सकाळी लवकर आवरलं आणि नाश्त्यासाठी कालच्या उरलेल्या चपात्या, मटकीचा रस्सा आणि साध्या भाताचा मस्तपैकी फोडणीचा भात बनवला. ज्यांच्याकडे आमचा रात्रीचा मुक्काम होता त्यांच्याकडूनच आजच्या रात्रीच्या जेवणासाठी अजून चपात्या बनवून घेतल्या.

.

.

घरच्यांसोबत फोटो काढले. त्यांना आमचा मनाजोगता पाहुणचार करता आला नसल्याचं दुःख त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. त्याची काही प्रमाणात उतराई म्हणून की काय त्यांनी नाचणीचं एक पोतं आम्हाला देऊ केलं होतं. ते प्रयत्नपूर्वक टाळत त्यांच्याच घरामागच्या शेताडीतून साल्हेरकडे निघालो. वाटेला लावून द्यायला एकनाथच्या मित्राचे काका आले होते.

.

.

शेतातुन पुढे जाऊन ओढा ओलांडला आणि वाट चढणीला लागली. वाटेतल्या भातशेतीची तोडणी झाली होती. भाताचे बांधलेले पेंढे पाहिल्यावर सोबत असलेल्या महादेव पाटीलमधला बहुधा शेतकरी जागा झाला.

.

.

.

.

आमच्या 'क्वॉर्टर मास्टर'ला मदत करायला आमच्यातल्याच काहीजणांना सांगितलं होतं. त्यांनी करायच्या कामाच्या बाबतीत क्वॉर्टर मास्टरची पहिल्याच दिवशी तक्रार आली होती. तीचं वेळीच निराकरण कुणाचंही मन न दुखवता होणं गरजेचं होतं. असं 'Damage Control' वेळीच झालं नाही तर पुढे जाऊन खुप मोठी समस्या उभी राहते. हे असं प्रत्येक ट्रेकला, खास करुन जंबो ट्रेकला तर हे दररोज करावंच लागतं. साल्हेरकडे जाण्यापूर्वी मुद्दाम वेळात वेळ ते काढून केलं.

.

आता वय झालं म्हणून काय झालं थोडंतरी जगाबरोबर चालावंच लागतं नाही का? म्हणून हल्लीचे कॉर्पोरेट्स काढतात तसे फोटो काढून पुढे निघालो.

.

.

आता पुढे चुकण्याचा काही प्रश्नच नव्हता. वाट सरळ एका धारेवरुन साल्हेर-सालोट्याच्या खिंडीत जात होती. वाटेतल्या मेटावरच्या चौकीच्या बांधकामाच्या अस्पष्ट खुणा पाहिल्या आणि खिंडीच्या पलिकडच्या बाजूने डावीकडे वळून अरुंद वाटेने सालोट्याकडे निघालो.

.

बरंच अंतर चालून गेल्यावर घसार्‍याची वाट चढून कातळकोरीव पायर्‍या गाठल्या. काही पायर्‍यांनंतर गडाचा कातळात कोरलेला पहिला दरवाजा लागला.

.

.

.

.

पुढे असलेल्या दुसर्‍या दरवाज्याच्या नंतर कड्यातल्या खांब टाक्यातले थंड पाणी भरुन घेतले. इथून साल्हेरची हरिहर पायर्‍यांच्या तोडीसतोड असलेली पायर्‍यांची वाट दिसली.

.

.

उरलेल्या पायर्‍या चढून सालोटा (१३५० मी.) गडमाथ्यावर आलो. गडावर पाण्याच्या टाक्या सोडल्या तर फारसं काही शिल्लक नाही. दरवाज्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मारुतीला नैवेद्य दाखवून आरती म्हटली आणि आल्या पावली साल्हेर-सालोट्याच्या खिंडीत परतलो.

.

.

साल्हेर-सालोट्याच्या खिंडीतले तटबंदीचे अवशेष पाहिले आणि माळदर गावाच्या बाजुने साल्हेरकडे निघालो. थोडं पुढं गेल्यावर खिंडीच्या नेमकं वर एक पाण्याचं टाकं दिसलं. थोडीशी वाट वाकडी करुन मुद्दामहुन ते पाहिलं आणि परत फिरुन मुख्य वाटेला लागलो.

.

.

कातळातल्या वाटेनं जाताना तीन दरवाज्यानंतर डाव्या बाजूला असंख्य गुहा दिसल्या. त्या पार करुन चौथ्या दरवाज्यातून गडाच्या पठारावर आलो. समोरच गडाच्या सर्वोच्य माथ्यावर असलेलं परशुरामाचं मंदीर दिसत होतं.

.

.

.

.

.

.

.

.

आता बाकी कुठेही न रेंगाळता तडक मंदीर गाठलं आणि नेहमीप्रमाणे आरती केली.

.

.

आमचं बर्‍याच दिवसांचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. इथंही आम्ही कॉर्पोरेट्स असल्यासारखे काही फोटो काढले.

.

.

.

महाराष्ट्रातल्या सर्वोच्च किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्याचा आनंद काहींना इतका झाला होता की त्यांच्यात साक्षात रामदेवबाबाच संचारले होते. पन्नाशी-साठीतले असूनही आमच्यातल्या काहींचा फिटनेस तर अगदी तरुणांना लाजवेल असाच आहे.

.

.

.

तसं पहायला गेलं तर साल्हेर हा बागलाणातला सामरीक दृष्ट्या एक अतिशय महत्वाचा किल्ला. ज्याच्या ताब्यात साल्हेर, मुल्हेर, चौल्हेर, न्हावी ऊर्फ रतनगड असतील त्याची बागलाणात सत्ता. हा भाग म्हणजे जणू स्वराज्याची उत्तरेकडील तटबंदीच. त्यामुळे साहजिकच या भागात अनेक युद्धे झाली. बहुतेक सर्व ऐतिहासिक साधनांत या किल्ल्यांचा उल्लेख सापडतो. एवढं असूनही वर उल्लेखलेल्या सर्व किल्ल्यात बलदंड म्हणून पहिला मान मिळतो तो म्हणजे किल्ले साल्हेरलाच.
महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर १६४६ मी.(९) उंची असलेलं जसं कळसूबाई तसं किल्ल्यांमध्ये समुद्रसपाटीपासून १५६७ मी. उंची असलेला, गिरीदुर्ग प्रकारातला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्हेर, जो डौलबारी या डोंगररांगेवर आहे. आजूबाजूचा एकूणच सर्व भाग मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळं अतिशय समृद्ध झालेला आहे. इथली जमीन अतिशय सुपिक असल्यामुळं इथल्या भिल्ल, कोकणी,आदीवासी लोकांचं राहणीमान थोडं उंचावलेलंच आहे. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून त्याने व्यापलेले क्षेत्र सहाशे हेक्टर म्हणजेच तब्बल दिड हजार एकर एवढं मोठं आहे.
साल्हेर किल्ला परशुरामाची तपोभूमी म्हणून ओळखला जातो. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी इथूनच बाण सोडला अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवकाळात इथं झालेल्या लढाईमुळं मराठ्यांच्या इतिहासात बागलाणाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६७० मध्ये दुसर्‍यांदा सुरत लुटून बागलाणातुन परत येताना मुल्हेरजवळचे एक खेडे लुटले. मोगल सेनापती दाऊदखान मागावर आल्यानं त्याची आणि मराठ्यांची दिंडोरी इथं गाठ पडली. दाऊदखानाबरोबरची ही लढाई जिंकल्यावर मराठ्यांनी लगोलग अहिवंत, रवळा, जवळा, मार्कंडा आणि हातगडासोबत साल्हेरही जिंकून घेतला.(३)(४)(५)(६)
दिलेरखान आणि बहादूरखान या दोन मोंगल सरदारांनी १६७१ च्या पावसाळ्यानंतर लगेचच त्यांच्या सुरतेच्या तळाजवळून भली मोठी फौज घेऊन येऊन हिवाळ्याच्या सुरुवातीस बागलाण प्रांताची मोहिम हाती घेतली. त्यावेळी इखलासखान मियाना, मुहकमसिंंह चंदावत, राव अमरसिंह इत्यादी सरदारांनी साल्हेर किल्ल्याला वेढा दिला. तो वेढा तसाच चालू ठेऊन दिलेरखान स्वत: रवळागड घेण्यासाठी फौज घेऊन निघाला. शिवाटपट्टण येथे महाराजांना याची बातमी लागली आणि त्यांनी ताबडतोब मोरोपंत व प्रतापराव यांना साल्हेरचा वेढा मोडून काढण्यास पाठवले.(७)(५)(८)
सभासद बखरीत या युद्धाचं अतिशय सुरेख वर्णन आलं आहे. सभासद म्हणतो...
"इखलासखान नवाब ह्याणी येऊन सालेरीस वेढा घातला आणि गडाखाले उतरले. हें वर्तमान राजियांस कळोन राजियांनी प्रतापराव सरनोबत लष्कर देऊन सिताबीनें वरघाटे सालेरीस जाऊन, बेलोलखानालरि छापा घालून, बेलोलखान मारुन चालवणें आणि कोंतणातून मोरोपंत पेशवे ह्यास हशमानिशी रवाना केले. हे हिकडून येतील आणि तुम्ही वरघाटे येणें. असे दुतर्फा चालून घेऊन, गनिमास मारुन गर्दीस मेळविणें. असीं पत्रें पाठवली. त्यावरुन प्रतापराव लष्कर वरघाटे आले. मोरोपंत पेशवे कोकणातून आले. उभयंता सालेरीस पावले. एक तर्फेंने लष्करानी घोडी घातलीं. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे युद्ध जाहालें. चार प्रहर दिवस युद्ध जाहालें. मोंगल, पठाण, राजपूत, रोहिले, तोफाची, हत्ती, उंटे, आराबा घालून युद्ध जहालें. युद्ध होतांच पृथ्वीचा धुराळा असा उडाला कीं, तीन कोस औरस, चौरस आपलें परके माणूस दिसत नव्हतें. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मूर्दा जाहालें. घोडी, उंट, हत्ती गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहालें. त्यामध्ये रुतो लागले. असा कर्दम जाहला. मारता मारतां घोडे जिवंत उरले नाहींत. जे जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजियांकडे गणतीस लागले. सवाशें हत्ती सांपडले. साहा हजार उंटे सापडली. मालमत्ता खजीना, जडजवाहीर, कापड, अगणित बिछाईत हातांस लागली. बेवीस वजीर नामांकित धरले. खासा इखलासखान व बेलोलखान पाडाव झाले. ऐसा कुल सुभा बुजविला. हजार दोन हजार सडे सडे पळाले. असे युद्ध जाले. त्या युद्ध झाले. त्या युद्धांत प्रतापराव सरनौबत व आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रुपाजी भोसले व सुर्यकांत कांकडे, शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदजी जगताप संताजी जगताप व मनाजी मोरे व विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ व मुकूंद बल्लाळ, वरकड बाजे वजीर, उमराव असे ह्याणी शिकस्त केली. तसेच मावळे लोक व ह्याणी व सरदारांनी शिकस्त कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत ह्या उभयंतांनी आंगीजणा केली आणि युद्ध करिंता सूर्यराव कांकडे पंचहजारीचा मोठा लष्करी धारकरी, ह्याणो युद्ध थोर केले. ते समयी जंबूरियाचा गोळा लागून पडला. सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला. वरकडही नामांकित शूर पडले. असे युद्ध होऊन फत्ते जाहली.
मोगलांशी झालेल्या या युद्धात सुर्यराव काकडेंसारख्या अनेक मराठी वीरांना हौतात्म्य आलं. खरं म्हणजे अशा ज्ञात-अज्ञात वीरांची स्मारकं आज त्या त्या ठिकाणी उभी राहायला हवीत. ऐन मैदानावर बलाढ्य मोगलांविरुद्ध मिळालेल्या या ऐतिहासिक विजयामुळे, आपणही अशा प्रकारच्या मैदानी युद्ध प्रकारात समोरासमोर भिडूनही जिंकू शकतो हा आत्मविश्वास मराठ्यांमधे आला.

.
फोटो आंतरजालावरून साभार.

परशुराम टेकडी उतरुन खालच्या गुहेपाशी आलो. आज दुपारच्या जेवणाला पोटभर ओली भेळ आणि वर ताक असा शॉर्टकट मारला होता.

.

.

.

.

.

.

.

.

गुहेसमोरचं रेणूका देवीचं उध्वस्त मंदीर पाहिलं. बाजूचा गंगासागर तलाव पाहिला आणि गडफेरी आवरती घेत साल्हेर गावाकडे निघालो. वरच्या पठारापासून तीन दरवाजे ओलांडून खालच्या माचीवर उतरलो.

.

.

.

माचीवर वाड्याचे अवशेष आणि पाण्याची टाकी पाहिली आणि शेवटच्या दरवाज्यातून बाहेर पडून साल्हेर गाव गाठलं.

.

.

सकाळी गाडी वाघांब्यात लावली होती तिथून ती घेऊन आलो. वाटेतल्या तेल्या आणि मोऱ्या घाटवाटा त्यांच्या माथ्यावरूनच पाहिल्या आणि कुठेही न वेळ घालवता तताणे मार्गे भिलाई किल्ल्याच्या पायथ्याच्या दगडी साकोडे गावात मुक्कामाला पोहोचलो.

.

दगडी साकोडे गाव तसं छोटसंच. तिथे पोहोचलो तेव्हा कट्टयावर काही वयस्क लोक गप्पा मारत बसले होते. त्यांना आम्ही तिथं येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि राहण्याच्या जागेबद्दल चौकशी केली. त्यातल्या एकाने शाळेचे गेट उघडून द्यायला सांगितलं आणि तसा किल्ली असणार्‍याकडे निरोपही पाठवला. त्यांच्यात एक गावचे पोलीस पाटीलही होते. त्यांनी शाळेशेजारच्या घरातून गावकीच्या मालकीची वायर टाकून रात्रभर लाईटची सोय सुध्दा करुन दिली. त्याशिवाय अजूनही काही मदत लागली तर तीही हक्कानं मागून घ्या असंही वर सांगितलं. आमच्यासारख्या अनोळखी लोकांसाठी अशा छोट्याश्या खेडेगावातल्या कोकणी लोकांनी केलेलं आदरातिथ्य त्या भागातल्या लोकांबद्दल बरंच काही सांगून गेलं. गॅस पेटवून फक्कड चहा बनवला आणि जेवणाच्या तयारीला लागलो. आजच्या रात्रीच्या जेवणाचा मेन्यु होता वांग-बटाट्याचा रस्सा आणि गवारीची सुकी अशा दोन भाज्या, चपाती, मसालेभात आणि पापड. तसं आज दिवसभर पोटभरीचं काही झालं नव्हतं म्हणून निवांत भरपेट जेवण केलं आणि ताणून दिली.

.

.

.

ट्रेकच्या आजच्या दुसर्‍या दिवसअखेर आमचे कालचे तीन आणि आजचे दोन असे एकूण पाच किल्ले अगदी आरामात पाहून झाले होते.

क्रमशः

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Dec 2018 - 8:32 am | यशोधरा

भारीच!

प्रचेतस's picture

28 Dec 2018 - 8:49 am | प्रचेतस

हा भागही जबरदस्त झालाय.
साल्हेरवरुन सालोटा अद्भूत दिसतोय.

चौकटराजा's picture

28 Dec 2018 - 9:20 am | चौकटराजा

पुणे नाशिक हा प्रवास पावसाळी दिवसात जरा मनमाड एक्स्प्रेस ने केला तर नाशिक जिल्हा स्कायलाईन च्या बाबतीत किती भाग्यवान जिलया आहे हे कळते . आपल्या लेखातील फोटो इतके उत्तम आले आहेत , त्यातील एकीचा संदेश फार प्रबोधक असा आहे . माझ्या एका नातेवाईकाचा पाथरडी इथे ब्लॉक आहे त्याच्या बाल्कनीतून असेच वैभव दिसते. मला त्याचा फार हेवा वाटतो .

दुर्गविहारी's picture

30 Dec 2018 - 4:13 pm | दुर्गविहारी

उत्तम ट्रेक वर्णन. पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे. पु.ल. टा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2018 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

जबरदस्त ट्रेक ! सुंदर फोटोंमुळे वाचायला अजूनच मजा येत आहे.

दिलीप वाटवे's picture

2 Jan 2019 - 10:00 am | दिलीप वाटवे

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या अशा प्रतिसादामुळेच पुढचं लिखाण करायला बळ मिळतं.