"मोहिम बागलाणची" भाग पहिला

Primary tabs

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
19 Dec 2018 - 12:42 am

"मोहिम बागलाणची"

दिवस पहिला

मुल्हेर, मोरागड, हरगड

महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाची म्हणजेच आपल्या सह्याद्रीची मुख्य रांग नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यापासून सुरु होऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातल्या पारगडापाशी संपते. या मुख्य रांगेच्या उत्तरेकडे असणार्‍या बागलाण तालुक्यात सेलबारी आणि डोलबारी नावांच्या दोन उपरांगांवर महाराष्ट्रातील उंचच उंच आणि चढाईस दमवणारे असे काही किल्ले आहेत. त्या भागात अहिराणी भाषा बोलली जाते. अहिराणीत बारी म्हणजे डोंगररांग ओलांडणारी वाट किंवा खिंड. बारीचा दुसरा अर्थ सांगायचा झाला तर 'बारी' म्हणजे रांग. काळाच्या ओघात मुळच्या 'शैलबारी' आणि 'डौलबारी' अशा सुंदर नावात बदल होऊन बहुधा सेलबारी आणि डोलबारी असं नामकरण झालं असावं. महाराष्ट्रातल्या दुसर्‍या क्रमांकाचं उंच शिखर आणि सर्वात उंच किल्ला असल्याचा मान मिळालेला साल्हेर हा यातल्याच डौलबारी रांगेवर आहे.

शैलबारी-डौलबारी, सातमाळ-अजिंठा, त्र्यंबक, कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र-बालाघाट वगैरे पूर्वपश्चिम पसरलेल्या उपरांगांना उत्तरेतुन दक्षिणेकडे येणार्‍या वाटेवरच्या तटबंद्याच म्हणावं लागेल कारण उत्तरेतुन दख्खनेत कसंही उतरायचं झालं तरी या रांगा ओलांडूनच यावं लागतं. या रांगांमधे असलेल्या या खिंडी म्हणजे जणू काही त्यांचे दरवाजेच. अशा या तटबंद्यांवर असलेल्या शेलापागोट्यांचा, दरवाज्यांचा पुरेपूर उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरूध्दच्या लढ्यात करून घेतला. इ.स. १६७० मध्ये दुसर्‍या सुरत लुटीच्यावेळी कांचनखिंडीत झालेलं मराठे-मोगल युद्ध हे त्याचं एक उत्तम उदाहरण सांगता येईल. अशा या सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या भागातल्या आठदहा किल्ल्यांची डोंगरयात्रा नोव्हेंबर महिन्यात २३ ते २५ अशा तीन दिवसांत नुकतीच पूर्ण केली.

२२ च्या रात्री म्हणजे गुरूवारी रात्री पुण्याहून निघून, शुक्रवारी मोरागड-मुल्हेर-हरगड, शनिवारी सालोटा-साल्हेर, रविवारी भिलाई-चौल्हेर पाहिल्यानंतर शिल्लक वेळेनुसार घरी येता येता प्रेमगिरी किंवा रामजी पांगेराचा कण्हेरगड असा भरगच्च कार्यक्रम ठरला होता. भीडू नेहमीचेच असल्यानं तसं काळजीचं कारण नव्हतं पण यावेळी ट्रेक थोडा मोठा असल्यामुळं नियोजनात किंचितसा बदल केला होता. यावेळी पूर्ण ट्रेकमधे एक नवीन गोष्ट आम्ही करणार होतो ती म्हणजे 'स्वयंपाक बनवणं'. आता स्वतःचा स्वयंपाक स्वतः तयार करणं आणि त्या बरोबरच किल्लेही पाहणं याचं गणित जुळवून आणण्यासाठी एकूणच डोंगरयात्रेचा कार्यक्रम थोडासा आवरता घ्यावा लागणार होता. स्वयंपाकासाठी तीन दिवसांचे नाश्ता-जेवणाचे मेनू ठरवणं, त्यासाठी लागणाऱ्या शिध्याची आणि भाजीपाल्याची यादी माहितगाराला विचारुन तयार करणं, ती विकत घेण्याची जबाबदारी सोपवणं, आणलेल्या सर्व शिध्याचे दिवसवार पॅकींग करणं, पुरेशी भांडी सोबत घेणं, गॅस सिलेंडर आणि शेगडीची व्यवस्था करणं आणि हे सगळं करत असतानाच कातळारोहणाचं साहित्यही न विसरता घेणं. यासारख्याच इतरही अनेक महत्वाच्या कामांच्या जबाबदाऱ्या सोपवणं आणि त्या सर्व वेळेत पूर्ण करुन घेणं वगैरे सोपस्कार एकदाचे पार पडले होते. आता एवढी सगळी तयारी करुन झाल्यावर मात्र सर्वांना ट्रेकला निघण्याचे वेध लागले होते...

...आणि तोही दिवस लवकरच उजाडला, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते. ठरल्याप्रमाणे सगळेजण जेवण करुनच आले होते. ट्रेकसाठी केलेल्या तयारीवर शेवटचा हात फिरवला आणि नेहमीप्रमाणे गाडीची पुजा करुन थेट नारायणगाव गाठलं.

.

.

हल्ली नाशिक रस्त्यावरच्या ट्रेकची सुरुवात करताना नारायणगावात 'मसाला दुध' पिणं नेहमीचंच झालंय.

.

.

नारायणगावाच्या पुढे नाशिक-आग्रा महामार्गावरच्या सटाणा फाट्यापर्यंतचा रस्ता चारपदरी असल्यामुळं लवकर मुल्हेर गावात पोहचू असं वाटलं होतं पण फाट्या पुढचा रस्ता चांगला असूनही वळणावळणाचा असल्यानं मुल्हेर गावात पोहोचेपर्यंत पार उजाडलं होतं. गावाच्या थोडं पुढे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या वस्ती दरम्यान एक छोटासा 'स्वच्छता थांबा' घेऊन ऐन चढाई सुरु होते तिथल्या शेताडीत पोहोचलो. रात्री येतानाच मित्राच्या हॉटेलातुन आणलेली वाटाणा-बटाटा रस्सा भाजी गरम केली आणि पोळीभाजीचा भरपेट नाश्ता केला आणि वर आमच्या ट्रेकचे बल्लवाचार्य अर्जून ननावरे यांच्या हातचा वेलची घातलेला फक्कड चहा प्यायला. आजपासून तीन दिवस आम्ही त्यांच्याच हातचं जेवण करणार होतो आणि त्यांनीच बनवलेलं अमृततुल्य पिणार होतो.

.

.

.

.

.

दुपारच्या जेवणासाठी पुण्याहुनच आणलेल्या परोठे, दही, शेंगाचटणीच्या शिदोर्‍या बांधुन घेतल्या. ट्रेकमधे चहा होणार नव्हता म्हणून मधल्या वेळेसाठी तयार केलेलंच पन्हं घेतलं आणि मुल्हेरमाचीकडे निघालो. वाटेतल्या पडक्या तटबंदी-बुरुजांचे आणि तीन दरवाज्यांचे अवशेष पहात मुल्हेरमाचीवरच्या गणेश तलावापाशी पोहोचलो.

.

.

.

.

.

.

.

इथून डावीकडचा छोटासा मोरागड, मधला मुल्हेर आणि उजवीकडं खिंडीपल्याडचा हरगड अगदी स्पष्ट दिसत होते. या तिन्हींमधला मुल्हेर हा खरं म्हणजे मुख्य किल्ला. पण आज्ञापत्रातल्या उल्लेखानुसार "किल्यासमीप दुसरा पर्वत किल्यास मुर्दुई असो नये. कदाचित असला तरी सुरंग लाऊन पाहून गडाचे आहारीं आणावा. सुरंगास असाध्य असला तरी तोहि जागा मोकळा न सोडितां बांधोन मजवूद करावा"(१) अशी नेमकी परिस्थिती इथं असल्यामुळं मुल्हेरच्या बाजूच्या मोरागड आणि हरगडालाही अगदी व्यवस्थितपणे किल्ल्यांचं बांधकाम केलेलं आहे. आज दिवसभरात पहिला मोरागड नंतर मुल्हेर आणि सरतेशेवटी हरगड पाहून साल्हेर गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघांब्यात मुक्काम असा एकंदरीत व्यस्त कार्यक्रम ठरला होता. त्यामुळं फारसा वेळ न वाया घालवता डावीकडच्या मोरा किल्ल्याकडे पहिला मोर्चा वळवला. वाटेत वनखात्याने नव्यानेच बांधलेल्या विश्रांतीस्थळात बसून किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला.
बागलाणात बागूलवंशीय राठोडांचं इ.स.१३१० ते १६३८ या कालावधीत राज्य होतं. मुल्हेरगड हा त्यांच्या राजधानीचा किल्ला होता. या राठोड राजांच्याकडून बागलाणचा ताबा मोगलांनी मिळवला. शिवाजीराजांनी जानेवारी १६६४ व ऑक्टोबर १६७० मधील सुरत लुटीकरता सुरतेला जाताना बागलाणमधून जाणार्‍या मार्गाचा अवलंब केला होता. पहिल्या सुरत लुटीच्यावेळी पुण्यापासून सुरतेपर्यंतचा प्रदेश मोगलांकडे होता. दुसर्‍या सुरत लुटीच्यावेळी बागलाणात मोगलांची सत्ता होती. दुसर्‍या सुरत लुटीच्या नंतर परत जाताना पाठलाग करणार्‍या मोगल सैन्याचा राजांनी कांचनाखिंडीत पराभव केला आणि त्यानंतर लगेच बागलाणातील मोहिम उघडली. जानेवारी १६७१ मधील या मोहिमेच्या पहिल्या धडाक्यात साल्हेर किल्ला स्वराज्यात दाखल झाला. त्यानंतर मराठ्यांनी मुल्हेरवर हल्ला केला, पण तो हल्ला किल्ल्यावरील मोगल सरदारानं थोपवून धरला. त्यामुळे मराठ्यांना मुल्हेरचा नाद सोडावा लागला, पण त्याऐवजी चौल्हेर स्वराज्यात सामील करुन घेतला.पुढे ऑक्टोबर १६७१ मधे मोगल सैन्याने साल्हेरला वेढा दिला. तेव्हा राजांनी मोरोपंत व प्रतापराव यांना साल्हेरचा वेढा मोडून काढण्यासाठी पाठवलं. त्यांनी साल्हेरचा वेढा तर मोडून काढलाच, शिवाय मुल्हेरवर धडक देऊन फेब्रुवारी १६७२ मधे मुल्हेरगड पण काबीज केला आणि संपूर्ण बागलाण स्वराज्यात दाखल करुन टाकला.(२)

.

.

इथून पुढल्या मळलेल्या वाटेनं सोमेश्वर मंदीर गाठलं. हे वैशिष्ट्यपूर्ण मंदीर इ.स. १५४० च्या सुमारास बांधलेलं आहे. काटकोनातल्या जवळपास दहाबारा पायर्‍या उतरुन तळघरात गेल्यावर शंकराची पिंडी आहे. सगळेजण दर्शन घेऊन आल्यावर शेवटच्या भीडूला अरुंद पायर्‍यांवर दोनएक फुटांचा साप दिसला. एका सर्पमित्राला whatsapp वर फोटो पाठवल्यावर त्यानं तो मण्यार जातीचा विषारी साप असल्याचं सांगितलं आणि शक्यतो त्याच्यापासून लांबच रहा असंही वर सांगितलं. मंदीराच्या पायर्‍यांच्या एका सापटीत बसल्यामुळं तो जाताना कुणालाच दिसला नव्हता. आधी कळलं असतं तर बाकी कुणाची हिंमत झाली नसती मंदीरात जायची. पोर्णिमेच्या दिवशी शंकराच्या मंदीरात सकाळीसकाळी सापाचं दर्शन झाल्यानं सुरवात तर चांगली झाली होती. मंदीरात जाऊन नेहमीप्रमाणे आरती केली.

.

.

.

.

.

मुल्हेर आणि मोरागड याच्यामधून एक नाळ नेमकी सोमेश्वर मंदीरापाशीच उतरली आहे. या नाळेतुन चढून दोन्ही किल्ल्यांमधल्या खिंडीत पोहोचलो. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात तीन तटबंद्या असल्याचं जाणवलं. पैकी पहिली तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. तिच्या काही पुसटच्या खुणाच शिल्लक आहेत. दुसरी तटबंदी आणि दरवाजा थोडाफार शिल्लक आहे तर तिसरी तटबंदी बर्‍यापैकी शाबूत आहे.

.

.

.

मोरा किल्ल्याच्या कातळकोरीव पायर्‍या चढून दरवाज्यातून माथा गाठला. हा मुल्हेरचा उपदुर्ग विस्तारानं अगदी छोटा आहे. यावर एक तलाव आणि पाण्याच्या टाक्या सोडल्या तर फारसं काही शिल्लक नाही.

.

.

.

.

आल्या वाटेने परत खिंड गाठली. खिंडीत पाण्याचं भलंमोठं टाकं आहे. पाण्यावर जमलेल्या शेवाळ्यावर पंचधारी निवडूंगाचा उतारा कसा काम करतो याचं प्रात्यक्षिक सोबत्यांना दाखवलं आणि पायर्‍या, खोदीव दरवाजा ओलांडुन मुल्हेर माथा (१३०६ मी.) गाठला.

.

गडावरुन शैलबारी रांगेवरले न्हावी, तांबोळ्या, मांगी-तुंगी धुसर दिसत होते. गडावरचं भडंगनाथाचं मंदीर, राजवाड्याचे भग्नावशेष आणि त्याचा एकमेव दरवाजा पाहिला. गडावर लक्ष वेधणारी आणखी एक गोष्ट म्हणजे गडावर असलेला पाणीसाठा. मोठ्या प्रमाणावर इथे पाण्याच्या टाक्या पहायला मिळाल्या. आणखी एक मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मुल्हेर-मोराच्या खिंडीच्या नेमक्या विरुद्ध बाजूला अगदी तशीच अजून एक खिंड आहे. तिथेही तिहेरी तटबंदी आहे. तिथपर्यंत उतरायला कातळात पायर्‍याही खोदलेल्या दिसल्या. त्यातल्या सर्वात वरच्या तटबंदीत पूर्वीच्या काळी एक दरवाजाही असावा. तशा खाणाखुणाही तिथं दिसल्या. तिथंच पाण्याचं एक मोठ टाकं आणि पहारेकर्‍यांच्या चौकीचं जोतंही दिसून आलं. या बाजूनेही गडावर येण्याची एखादी वाट असावी का? अशी एक शंका मनात आली. त्या दिवशी हातात काही वेळ नव्हता पण एखाद्या दिवशी मुद्दाम वेळ काढून तिथं काय आहे ते शोधायला यायलाच हवं. पाहूया कधी जमतंय ते?

.

.

.

.

.

.

.

गडफेरी आवरती घेत माचीत उतरणार्‍या दुसर्‍या वाटेने म्हणजेच गडाच्या मुख्य दरवाज्याच्या वाटेने उतरायला सुरवात केली. या वाटेवर असलेले तीन दरवाजे, लेण्या, कोरीव मारुती वगैरे पाहून पाऊणएक तासात माचीत उतरलो आणि सरळ पुढे जात मुल्हेर-हरगड दरम्यानच्या खिंडीकडे निघालो.

.

.

.

.

.

.

सुर्यदेव माथ्यावर आल्यामुळं चटका जाणवू लागला होता म्हणून खिंडीच्या थोडं अलिकडंच सावलीत थांबून थंडगार पन्हं पिऊन घेतलं. आता समोरच्या हरगडाची चढाई करताना पूर्णपणे ऊन लागणार होतं.

.

प्रत्येक किल्ल्यावर चढाई आणि उतराईच्या वेळी आम्ही वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. हे असं केल्यानं होतं काय की एका फेरीत गडाच्या कमीतकमी दोन वाटा पाहून होतात आणि कमी वेळात किल्ल्यावरची बहूतेक सर्व ठिकाणंही बघता येतात. या ट्रेकला तिन्ही दिवस हे असंच करण्याचा आम्ही जास्तीतजास्त प्रयत्न करणार होतो. त्यामुळं हरगडावर चढण्यासाठी समोरच्या खिंडीतुन एक जास्त चढावाची, निसरडी आणि दृष्टीभय असणारी वाट तर उतरण्यासाठी थोडी लांबीची नाळेतली वाट आम्ही निवडली होती. हाच क्रम उलटाही करता आला असता पण जी वाट चढाईसाठी निवडली होती ती घसार्‍यामुळं उतरण्यासाठी त्रासदायक ठरली असती आणि उतरण्यासाठीची वाट लांबचलांब अंतर असल्यामुळं चढण्यासाठी.
खरं म्हणजे चढण्यासाठीची ही वाट अशा ठिकाणी होती की इथून वाट असेल अशी नवीन माणसाला पुसटशी कल्पना देखील येणार नाही. त्या निसरड्या वाटेवरुन गडाचा दरवाजा गाठला. हा दरवाजा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातुन आत गेल्यावर अक्षरे जीर्ण झालेला एक कोरीव शिलालेख देखील पहायला मिळाला.

.

.

.

.

.

.

हरगडाच्या (१३४० मी.) माथ्यावर 'Forge Welded Cannon' प्रकारची एक पूर्णपणे स्वदेशी आणि आकाराने मोठी असलेली एक तोफ दिसली. खरं म्हणजे एवढी मोठी तोफ ओतण्याचा कारखाना त्याकाळी आपल्या इथे विकसित झालेला नव्हता म्हणून भारतीय लोकांनी एक नवीन प्रकारची शक्कल लढवली, ती म्हणजे लोखंडाच्या मोठाल्या बांगड्या तयार करुन त्या एकमेकांना जोडून तोफेची नळी तयार करणे. जंजीरा किल्यातली बहुतेकांनी पाहिलेली 'कलाल बांगडी' तोफ हे तशा प्रकारच्या तोफेचं अजून एक उदाहरण सांगता येईल. शेजारीच असलेल्या बुरुजावर ती तोफ बसवण्याचा दगड होता. प्रत्यक्षात तोफांचं काम कसं चालत असे, त्यांना फिरवून दिशा कशी देत, त्यात गोळे कोणकोणत्या प्रकारचे वापरले जात, तोफांच्या मारगिरीच्या क्षमतेनुसार दोन बुरुजात असलेलं अंतर आणि त्याचा कोन वगैरे त्याचं एकूण तंत्रज्ञान सोबत्यांना थोडक्यात समजावलं आणि गडावरच्या एकमेव शंकराच्या मंदीरात पोहोचलो. मंदीराबाहेरच्या काही दगडी तोफगोळ्यांना शेंदूर फासून देवपण बहाल केलं गेलं होतं.

.

.

.

.

जेवणाची वेळ झाल्याचं पोटातले कावळे ओरडून सांगायला लागले होते त्यामुळं देवळाच्या सावलीच्या आडोश्यात शिदोर्‍या सोडून पोटपूजा उरकली.

.

देवळासमोरच्या गडाच्या मुख्य म्हणजेच नाळेच्या वाटेने तटबंदी ओलांडत पुन्हा मुल्हेर-हरगड मधल्या खिंडीत उतरलो. ही खिंड बुरुज आणि तटबंदी बांधून पूर्णपणे संरक्षित केली आहे. हरगडाच्या नाळेत खैराची आणि कढीपत्त्याची झाडं बाकी खुप दिसली. या खैराच्या झाडापासून तयार होणार्‍या काताचे बरेच औषधी उपयोग आहेत.

.

.

खिंडीतुन तीन दरवाजे पार करत मुल्हेरमाचीत येताना वाटेतल्या राजवाड्याचे, राम-लक्ष्मण मंदीराचे अवशेष पाहिले आणि वाटेतला बारमाही पाण्याचा झरा पाहून गाडीपाशी उतरलो. आता आम्हाला साल्हेर पायथ्याशी असलेल्या वाघांब्यात जायचं होतं. म्हणून आलो तसे परत फिरलो आणि मुल्हेर गावातून डावीकडे वळलो. हा रस्ता सरळ सुरतेला जातो. या रस्त्याने साल्हेर फाट्याला परत डावीकडे वळून आमच्या सोबत असलेल्या एकनाथ तेलवेकरच्या मित्राच्या घरी मुक्कामाला पोहोचलो.

.

.

.

.

.

.

.

चहापाणी झाल्यावर लगेचच स्वयंपाक तयार करायला घेतला. आज रात्रीच्या जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून व्हेज मंचाव सुप होतं आणि मेन कोर्स होता मटकी-बटाटा रस्सा, चपाती, भात, लोणचं आणि पापड.

.

.

.

.

.

आदल्या रात्रीचा चिंचवड ते मुल्हेर प्रवास आणि नंतर दिवसभराचं ट्रेकींग झाल्यामुळे सगळे चांगलेच थकले होते. त्यामुळे जेवल्यानंतर फार वेळ न काढता लगेचच पथार्‍या पसरल्या.

क्रमशः

.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

19 Dec 2018 - 12:11 pm | मार्मिक गोडसे

मस्त मोहीम.
पाण्यावर जमलेल्या शेवाळ्यावर पंचधारी निवडूंगाचा उतारा कसा काम करतो याचं प्रात्यक्षिक सोबत्यांना दाखवलं
पाणी शुद्ध होते की शेवाळ नष्ट होते?

दिलीप वाटवे's picture

19 Dec 2018 - 2:07 pm | दिलीप वाटवे

पंचधारी निवडुंगाच्या चिकाचा एक थेंब जरी शेवाळ्याच्या तवंगावर टाकला तरी शेवाळे बाजूला आपोआप सरकते. त्यामुळे टाक्यातले पाणी काढताना त्यात शेवाळे मिसळत नाही. शेवाळ्याखालचे स्वच्छ पिण्यायोग्य पाणी भरता येते.

दिलीप वाटवे's picture

19 Dec 2018 - 2:08 pm | दिलीप वाटवे

पंचधारी निवडुंगाच्या चिकाचा एक थेंब जरी शेवाळ्याच्या तवंगावर टाकला तरी शेवाळे बाजूला आपोआप सरकते. त्यामुळे टाक्यातले पाणी काढताना त्यात शेवाळे मिसळत नाही. शेवाळ्याखालचे स्वच्छ पिण्यायोग्य पाणी भरता येते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Dec 2018 - 3:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

तीन दिवसात ईतके सगळे किल्ले करायचे म्हणजे एकतर माहितगार गाईड आणि तयारीचे ट्रेकर्स पाहिजेत. सुरुवात तर मस्त झालेय. पु.भा.प्र.

दिलीप वाटवे's picture

27 Dec 2018 - 2:47 pm | दिलीप वाटवे

हाच ट्रेक मी पुर्वी केल्यामुळे थोडी माहिती होती आणि बरोबरीचे सगळेजण चांगले चालणारे होते त्यामुळे फारशी अडचण आली नाही. बाकी तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

लिखाण आवडले. फोटो मात्र दिसत नाहीत.

यशोधरा's picture

19 Dec 2018 - 3:22 pm | यशोधरा

दिसले, दिसले!

टर्मीनेटर's picture

19 Dec 2018 - 4:00 pm | टर्मीनेटर

सुंदर वर्णन आणि छान फोटो. पुढील लेखनास शुभेच्छा!

प्रमोद देर्देकर's picture

19 Dec 2018 - 4:18 pm | प्रमोद देर्देकर

जबरदस्त मोहीम .

अनन्त्_यात्री's picture

19 Dec 2018 - 4:23 pm | अनन्त्_यात्री

दोन्ही मस्त!

रोचक आणि माहितीपूर्ण, पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Dec 2018 - 4:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट ट्रेक ! सुंदर फोटो !

सोन्या बागलाणकर's picture

20 Dec 2018 - 8:44 am | सोन्या बागलाणकर

थरारक ट्रेक !
फोटो झकास.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Dec 2018 - 9:59 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त फोटो!!

जिन्क्स's picture

21 Dec 2018 - 12:48 pm | जिन्क्स

मस्त ट्रेक आणि माहिती. तो साप Common Wolf Snake (खवड्या) आहे . बिनविशारी.

दिलीप वाटवे's picture

27 Dec 2018 - 2:52 pm | दिलीप वाटवे

ओह. तुम्ही सापाविषयी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. मला तशी सापांबद्दलची काहीच माहिती नाही त्यामुळे कुठलाही साप दिसला तरी मी त्याच्यापासून चार हात लांबच राहतो.

दुर्गविहारी's picture

24 Dec 2018 - 8:39 pm | दुर्गविहारी

जबरदस्त लिहिले आहे. मी केलेल्या ट्रेकची आठवण झाली. बाकी मुल्हेर माचीवर बघण्यासारखे भरपूर आहे.
पुढचा भाग लवकर टाका.

दिलीप वाटवे's picture

27 Dec 2018 - 2:53 pm | दिलीप वाटवे

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

साबु's picture

28 Dec 2018 - 2:23 pm | साबु

मस्त हो...

वेडसर's picture

28 Dec 2018 - 2:51 pm | वेडसर

एक नंबर!

सिरुसेरि's picture

28 Dec 2018 - 6:41 pm | सिरुसेरि

सुरेख प्लॅनींग आणी एक्झीक्युशन .