आयुबोवेन रत्नद्वीप -- भाग ८

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
1 Dec 2018 - 4:07 pm

आज सकाळी सुद्धा लवकरच जाग आली. काल संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहणे झाले असल्याने आज समुद्रात पोहायला जाण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे झटपट तयार होऊन समुद्रावर गेलो.

आमच्या हॉटेलसारखीच किनाऱ्याला लागून इतरही हॉटेल होती आणि त्यातले पर्यटक समुद्रावर फिरायला किंवा डुंबायला किंवा जॉगिंग ला बाहेर पडलेले दिसत होते.वेळ भरतीची होती आणि समुद्रकिनारा बराच उतरता होता त्यामुळे लाटांचा जोरही जास्त वाटत होता. विशेष करून परतीच्या लाटेला जास्त ओढ होती. त्यामुळे कमरेपेक्षा जास्त पाण्यात जायचे नाही असे आधीच ठरवून टाकले. तरीही समुद्र किंवा एकूणच पाणी ही अशी गोष्ट आहे कि एकदा तुम्ही पाण्यात डुंबायला लागलात कि त्या आनंदात हळूहळू वेळेचे आणि खोलीचे भान राहत नाही. तास दोन तास धम्माल करून होतेय तोच उपुल बोलवायला आला कि मदू नदीवर बोटिंग करायला जायचे आहे आणि ऊन फार वाढले कि त्रास होईल.त्यामुळे नाईलाजाने हॉटेलच्या रूमवर परतलो आणि तयार होऊन मदू नदीकडे प्रस्थान केले.
साधारण ८० डॉलर एका फेरीला अशा "कन्सेशनल" रेटमध्ये आम्ही एका बोट भाड्याने घेतली आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली.

सहलीच्या सुरुवातीलाच झाडावर ऊन खात पहुडलेल्या एका मगरीने दर्शन दिले. या झाडाची फांदी पाण्याजवळ झुकली असल्याने तिला वर चढणे शक्य झाले असावे.बोट पुढे निघाली आणि जवळच्याच घनदाट झाडीत बोटवाल्याने काळतोंड्या माकडांचा एक कळप दाखवला. वाटेत ठिकठिकाणी पाण्यात काठ्या लावून कुंपणे घातलेली दिसत होती. ती कोळंबीची शेती आहे असे समजले. पान बगळे त्या कुंपणावर भक्ष्य शोधायला टपून बसले होते.
q
मदू किंवा मदू गंगा ही नदी बालपितिया गावाजवळ समुद्राला मिळते आणि तिच्या मुखाशी अनेक प्रवाह तयार होऊन किंवा तिला अनेक फाटे फुटून सुमारे ६४ बेटे तयार झाली आहेत. यातील काही बेटांवर लोक राहतात आणि ती बेटे मुख्य भूमीला पुलाने जोडलेली आहेत.नदीच्या काठाकाठाने अनेक ठिकाणी दाट मॅन्ग्रोव्ह ची झुडुपे दिसतात आणि त्यात राहणारे अनेक जलचर तसेच बेटांवर निवास करणारे पक्षी आणि वन्यजीव या सहलीत आपल्याला दिसू शकतात.
q
जरा पुढे गेल्यावर बोटवाल्याने आम्हाला एका बेटावर उतरवले. ते होते दालचिनीचे बेत. म्हणजे तिथे दालचिनीची झाडे तर होतीच पण तिथले लोक दालचिनीची निगा राखून किंवा शेती करून त्यावरच गुजराण करत होते. एका विक्रेत्या बाईने आम्हाला समोरच एक खोड तासून त्याचे साल काढून दाखवले आणि हीच दालचिनी म्हणून सांगितले.
q
ती साल चावून बघितली असता खरोखरच गोड दालचिनीचा स्वाद लागत होता.अशाच साली एका ठिकाणी सावलीत वाळत ठेवल्या होत्या त्या आम्ही थोड्या विकत घेतल्या. आणि परत आल्यावर शेजारीपाजारी वाटून टाकल्या.
q
q
पुढे जात असताना एक अजून छोटे बेट बघितले ज्यावर आजही २०० कुटुंबे राहतात आणि ते बेट मुख्य भूमीला केवळ एका पुलाद्वारे जोडलेले आहे. अजून एक बेट केवळ ४ माणसे उभी राहू शकतील इतकेच आहे आणि त्यावर एक हिंदू मंदिर पडक्या अवस्थेत तग धरून आहे.
q
पुढे जात असताना बोट अचानक घनदाट मॅन्ग्रोव्ह च्या जंगलात घुसली आणि तिथे थोडे फोटो सेशन झाले. काही दुर्मिळ पक्षी जसे की गरुड ,खंड्या, वेगवेगळे बगळे वटवाघळे अधून मधून दर्शन देत होतेच.
q
मजा म्हणजे वाटेत एका बेटावर आयलंड फॉर सेल अशी पाटीसुद्धा बघायला मिळाली. ती पाहून आमचा बोटवाला सुद्धा हसत होता. पण काय सांगावे ? काही धनदांडगे लोक ही बेटे विकत घेतीलाही आणि मग पुढच्या पिढीसाठी मदू गंगेत बोटिंग करणे दुरापास्त होऊन जाईल. मिपाकरांपैकी कोणाला घ्यायचे असल्यास खाली चित्रात नम्बर दिलाय.
q
आता शेवटचा टप्पा आला ज्यात नदीतच काठाकाठाने काही ठिकाणी तरंगती पिंपे आणि जाळ्या लावून फिश टँक तयार केले होते आणि तिकडे पायांना फिश मसाज थेरपी करून मिळत होती.
qघाबरत घाबरतच एका कुंडात पाय सोडले आणि लगेच लहान मोठे मासे येऊन पायाला लुचू लागले.पहिले पहिले वाटणारी भीती हळूहळू निघून गेली आणि त्या लुचण्याची मजा वाटू लागली.माणूस आपल्या सुखासाठी प्राण्यांना कशा प्रकारे वापरू शकतो त्याचे हे उत्तम उदाहरण होते. थोडा वेळ तिथे घालवून आम्ही परतलो आणि हॉटेलवर येऊन पोहोचलो.
आता दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी खरेदी आणि कंद विहार हे बुद्ध मंदिर बघायचे होते. तसेच वोटर स्पोर्ट करायचे होते.
वातावरणात जरा उकाडा वाटत होता कारण हे ठिकाण विषुव वृत्तापासून २०० कि,मी.वर आहे. पण फार वेळ आराम करता येणार नाही असे सांगूनच उपुल गेला. लगेच ४ च्या सुमारास आम्ही निघालोच आणि पहिले वोटर स्पोर्ट्स करायला गेलो.पण गोव्याला जसे वोटर स्पोर्ट्स असतात तसेच इथे वाटले आणि मुख्य म्हणजे जेट स्कुटर वगैरे बरीच महाग होती. इतकी कि फॉरेनर लोकांचा एक ग्रुप तिकडे आला होता तेही कुरकुर करत होते आणि किमतीत घासाघीस करायला बघत होते. शेवटी एक ट्यूब राईड करून आम्ही पुढे निघालो.
q
कंद विहार बुद्ध मंदिरात पोचण्याआधीच प्रचंड उंच बुद्ध मूर्ती नजरेला पडली आणि एक टेकाड चालून गाडी वर गेल्यावर त्या मूर्तीचे भव्यता अजूनच नजरेत भरली.
q
मूर्तीच्या पुढे सुंदर दगडी कमल दोन सिंह आणि काचेच्या पेटीत एक समई ठेवली होती.
q
श्रीलंकेत सिंह मुळीच नाहीत. पण त्यांच्या झेंड्यावर, ठिकठिकाणी पुतळ्यांच्या रूपात सिंह सर्वत्र दिसतात. मूर्तीचे दर्शन घेऊन पाठीमागच्या देवळात गेलो. तिथे भिंतीवर बुद्धाच्या जीवनातले प्रसंग सुंदर रित्या चित्र बद्ध केले होते.
q
q
q
थोडी फोटोग्राफी केली आणि परत निघालो. वाटेत बेन्टोटाच्या बाजारात थोडीफार किरकोळ खरेदी केली आणि हॉटेलवर परतलो.
q
पुन्हा एकदा स्विमिंग पूलमध्ये उतरलो. आज एक मोठा गुजराथी ग्रुप इथे मुक्कामाला होता. त्यामुळे जेवणाचा बुफे लावला होता. त्यांच्या गोंधळात आम्हाला जायचे नसल्याने आम्ही जरा जास्तच वेळ पूलमध्ये टाईमपास केला आणि सावकाश ९ नंतर जेवायला गेलो.
उद्या सकाळी काही घाई नव्हती. ट्रिप जवळ जवळ संपत आली होती. उशिरा उठून कोलंबोला प्रयाण आणि थोडेफार स्थळ दर्शन करून सायंकाळी एयरपोर्टला पोचणे असा कार्यक्रम होता. ट्रीपच्या स्मृती मनात घोळवत झोपी गेलो.

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

1 Dec 2018 - 5:12 pm | श्वेता२४

नदीत अशाप्रकारची भ्रमंती एक वेगळाच अनुभव वाटतो. फोटो खूप सुंदर.

सुधीर कांदळकर's picture

1 Dec 2018 - 7:44 pm | सुधीर कांदळकर

बेट विकत घेण्याची कल्पना खरेच सुरेख आहे. सोबत छोटे विमान, लॉंच वगैरे हवेच. विख्यात माजी टेनिसपटू बियाँ बोर्ग स्वतःच्या मालकीच्या बेटावर राहतो.

संधिप्रकाशातले माडांचे चित्र सुंदर. शेवटच्या चित्रातील गहिरे रंग नजरबंदी करून हुरहूर लावताहेत.

अनेक, अनेक धन्यवाद.