लुब्री

गीतांजली टिळक's picture
गीतांजली टिळक in जनातलं, मनातलं
29 Oct 2018 - 2:42 pm

हो... कुत्रीच होती ती.
या घरात आम्ही रहायला आलो. यायच्या आधी मागच्या अंगणाला गेट करुन घेतलं. दिवसा बिल्डींगच्या पार्किंगच्या आवारात इकडून तिकडे पळणारं एक कुत्रं दिसायचं वरचेवर.. भटकं..
रहायला आल्यावर काही दिवसानी नवीन करुन घेतलेल्या गेटला लागून असलेल्या भिंतीवर, नुकत्याच दिलेल्या पांढर्‍या रंगावर मातीचे घासल्यासारखे डाग दिसू लागले. आणि ते वाढायला लागले. कशाने त्या अडचणीच्या जागेत असं होतय काही कळत नव्हतं. मग एके दिवशी दुपारच्या वामकुक्षीच्या शांत वेळी मी काही कारणाने स्वयंपाकघराचे दार उघडून मागे अंगणात गेले. आणि त्या गेटच्या फटीतून जीवाच्या आकांताने धडपडत स्वतःला ओढून काढत, ते आवारात हिंडणारं कुत्रं स्वतःला बाहेर ढकलायचा प्रयत्न करत होतं. त्या बरोबर त्याच्या नख्यांचा जमिनीवर येणारा करकराट, घाबरुन चाललेली कुईकुई.. माझ्या चाहुलीने ते घाबरुन पळून जायचा प्रयत्न करत होतं. मी एका जागी स्थीर उभी राहून तो एखाद्या मिनीटाचा खेळ पाहत होते. कुत्रं निघून गेल्यावर भिंतीवर उमटलेल्या मातीच्या ठशांचा उलगडा झाला.
मग माझं त्या कुत्र्याकडे विशेष लक्ष जायला लागलं.पहिली गोष्ट लक्षात आलेली म्हणजे ती कुत्री होती. खूप गिड्डी, अतिशय हाडकुळी. पाठीवर काळा आणि दोन्ही बाजूने पोटाकडे तपकिरी होत गेलेला रंग. एक कान वरच्या टोकाला कुरतडलेला आणि एक डोळा नसलेली, कोणीतरी खाल्ल्यागत, डोळ्याची खोबणही नव्हती तिथे. थानं ओघळलेली होती म्हणजे हिची तीन चार बाळंतपणं झाली होती हे लक्षात आलंच.
गरीब वाटली मला ती. दया आली तिची. ही काही खायला मिळतंय का शोधत आपल्या अंगणात घुसत असणार हे लक्षात आलं. तसं नवर्‍याला सांगितलं. त्या गेटच्या फटीचा काही बंदोबस्त करता येईल का पाहण्याचा नादात तो होता. ते जरा अवघडच दिसत होतं. पण आता हिची मला दया आली होती, कीव वाटत होती म्हणून आधी पडलेल्या भिंतीवरच्या डागाकडे मी दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
एकदा सोसायटी स्वच्छ करणार्‍या म्हातार्‍या आंधळ्या मामूला काही खायला देताना त्यातला अर्धा पोळीचा तुकडा तिथे जवळच घुटमळणार्‍या त्या कुत्रीला टाकला. ती धावत तिथे आली आणि आता ही तो खाईल असं गृहीत धरुन आत निघून आले. थोड्या वेळाने कामाच्या मावशीना गेट उघडायला गेल्यावर पाहिलं तर पोळी तिथेच. ही भवानी तो तुकडा नुसता हुंगून निघून गेली होती. आधी मला रागच आला पण माझं कुतूहलही तिने वाढवलं.
परत चार पाच दिवसानी मामूला खायला देताना आशाळभूत केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे पाहत ही तिथेच उभी. मला वाटलं मागच्या वेळची पोळी कोरडी होती. ही म्हातारी दिसतेय, म्हणून आज परत पोळीचा तुकडा देताना त्यावर थोडं दूध घालून दिला. नंतर पाहिल्यावर तिथे काही नव्हतं. मला बरं वाटलं. दुसर्‍या दिवशी खिडकी खाली पाहिलं तर दुध लागलेली पोळी खाऊन राहिलेली पोळी तशीच तिथे लोळत पडलेली.
बेंगलोरला असताना एकदा वाण्याच्या दुकानातून बाहेर पडताना एक अत्यंत गलिच्छ भिकारी भीक मागायला आला. पर्समधली चांगली मूठभर चिल्लर मी त्याच्या पसरलेल्या हातावर ठेवली. चिल्लर दिली म्हणून रागाने काहीतरी बडबडत त्याने ती सगळी माझ्यासमोर भिरकावून तो निघून गेला. त्या माजोर्‍या भिकार्‍याची आठवण, मला तो पोळीचा पडलेला तुकडा पाहिल्यावर आली.
ती फेकलेली चिल्लर पाहिल्यावर जसं मी कधीच कुठल्या भिकार्‍याला भीक द्यायची नाही हे ठरवलं होतं तसंच हिला खायला तर द्यायचं नाहीच पण अंगणात घुसून खायला शोधायला आली तर हाणायचं हेही. नंतर एकदा ती मला गेटच्या फटीत अडकलेली सापडली पण मी तिला हातातली काठी फेकून मारुच शकले नाही. उलट माझा पाय अडखळून मलाच लागलं.
काही दिवसांनी तिच्यासारखाच एका डोळ्याने आंधळा पण जरा तगडा गोरा कुत्रा तिच्याबरोबर दिसला. त्याचा रुबाब युद्धात जखमी झालेल्या सैनिकाचा होता. मग ते दोघं जवळच्या सगळ्या गल्ल्यांमधून हिंडताना दिसायचे. ती अगदी त्याला खेटून खेटून चालायची, खुशीत असायची. तो रुबाबातच.
परत पुढे काही महिने तो दिसलाच नाही. ही एकटीच लुब्री मागे. सगळ्या गल्ल्या धुंडाळत.
माझ्या मुली, त्यांच्या मैत्रिणी त्याला वेडं कुत्रं म्हणायच्या. आधी मी एक दोनदा त्यांना ती कुत्री आहे असं सांगून पाहिलं पण त्यांना काही लिंगभेद करण्यात फारसा उत्साह दिसला नाही. 'अग आम्ही खेळताना ते मागं लागतं कुत्रं, वेडं आहे ते. अंगावर येतं चावायला' त्या सारख्या सांगायच्या. पण मी त्यावर अजिबात विश्वासच ठेवायला तयार नव्हते. याचं कारण ती खूप भेदरट, मुलखाची भित्री होती. मी खूप वेळा पाहिलेलं. आजूबाजूच्या गल्ल्यातून कुत्री भुंकतानाचा आवाज जरी आला तरी ही इथे भेदरुन अंगाचं मुटकुळं करुन बसायची. रस्त्यावरुन कुत्री नुसतीच पळत जरी निघाली तरी हिची लपून बसायची घाई. एकदा तर एक बोका हिच्या अंगावर धावून आला तर ही भितीने गच्च गोळा झाली शेपूट आत घालून घाबरलेल्या आवाजातली कुई कुई. ती ऐकून मी पळत बघायला गेले हिला काय झालं तर समोर गलेलठ्ठ बोका हिच्यावर दादागिरी करतोय.
आणि ही कोणाच्या मागे लागणार ? शक्यच नाही.
पण एक दिवस कॉर्पोरेशनची कुत्री पकडणारी गाडी आली. समोरच्या मैत्रिणीचा पत्ता विचारायला गाडीतला माणूस आला. कुत्र्याची तक्रार आहे, ह्या मॅडमनी केलीय कुठे राहतात. मी समोरचं घर दाखवून शिल्पाला विचारलं 'कुठलं कुत्रं ग?' तर तिने हिची माहिती सांगितली. 'अग अनुला चावणार होतं ते परवा, खूप मागे लागतं लहान मुलांच्या. बेकार कुत्रं आहे ते'. मग तिच्या धरपकडीचा गलका, तिची घाबरलेली आरडा ओरड. मला काही पाहवलं नाही. मी आत निघून आले. मला वाटलं पकडून नेतात किंवा मारुन टाकतात. नुसत्या समोर दिसणार्‍या प्राण्याची पण किती सवय होते. त्यामुळे थोडीशी उदासी.
तर कसलं काय ही बया परत संध्याकाळी दारात उभी. मी आश्चर्याने शिल्पाला विचारलं तर म्हणाली तिला मारता येत नाही म्हणे. तिचं आॅपरेशन झालंय. त्यामुळे धरुनही नेत नाहीत.
पण त्यानंतर ती जी काही आधी चार गल्ल्या, दोन बिल्डींग चोरुन खात हिंडायची ती फक्त एकाच शेवटच्या गल्लीत रहायला लागली. क्वचित एखाददिवशी गल्लीच्या तोंडाशी उभी दिसायची. तिचा तो आंधळा जोडीदारही सुरुवातीला एकदा दिसला त्यानंतर तीन चार वेळाच. सैन्यातून रजेवर आल्यासारखाच सलग काही दिवस, मग परत गायब. तोही नाही दिसला बरेच दिवसात.
आता ती पण दिसेनाशी झाली. मी न राहवून चौकशी केली तर चार जणांकडून वेगवेगळंच ऐकायला मिळालं. 'अग तुमचं वेडं कुत्रं मेलं बहुतेक' मी जेवताना सांगत होते. धाकटी मुलगी म्हणाली 'हा! बरं झालं मेलं किती त्रास द्यायचं आम्हाला ते खेळताना'.... मी परत थोडीशी उदास... आणि तिचा विषय तिथेच संपून गेला.

- गीतांजली टिळक

वाङ्मयमुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2018 - 3:38 pm | यशोधरा

आई गं..

ज्योति अळवणी's picture

29 Oct 2018 - 11:14 pm | ज्योति अळवणी

त्या कुत्रीबद्दल कीव वाटते. पण अशा रस्त्यावरच्या कुत्र्यांचा त्रासच जास्त असतो

मुक्त विहारि's picture

2 Nov 2018 - 10:34 am | मुक्त विहारि

माणसांपेक्षा, प्राणीच उत्तम.

कुत्री चावली तर इंजेक्शन तरी घेता येते, पण प्रदूषण करणार्‍या माणसांना कोण चाप लावणार?

सिरुसेरि's picture

30 Oct 2018 - 6:24 pm | सिरुसेरि

अरेरे . चटका लावणारी कथा .

चौथा कोनाडा's picture

1 Nov 2018 - 9:09 pm | चौथा कोनाडा

दुर्दैवी लुब्री !
चटका लावणारी लुब्रीची कहाणी.

सुंदर लिहिलंय, ओघवतं आणि चित्रदर्शी !

गीतांजली टिळक's picture

2 Nov 2018 - 3:29 pm | गीतांजली टिळक

पहिला प्रयत्न

कलम's picture

2 Nov 2018 - 3:19 pm | कलम

अरेरे

नँक्स's picture

2 Nov 2018 - 4:49 pm | नँक्स

सुंदर लिहिलंय