.

पालकाची सुकी भाजी - ज्वारीचं पीठ वापरून

Primary tabs

योगेश कुळकर्णी's picture
योगेश कुळकर्णी in पाककृती
26 Sep 2018 - 11:14 pm

साहित्य:
- पालकाची एक जुडी (साधारणपणे २५० ग्रॅम)
- दोन मध्यम टोमॅटो
- ८-९ लसूणपाकळ्या
- सुक्या लाल मिरच्या ३/४
- हळद
- मोहोरी
- हवं असेल तर लाल तिखट
- मीठ
- तेल
- चिमटीभर'च' साखर
- लागेल तसं ज्वारीचं पीठ (तरी प्रमाण म्हणून २-३ मोठे चमचे लागेल)

कृती:
- पालक धुवून ओबडधोबड चिरून घ्यावा
- टोमॅटो ही धुवून मध्यम आकारात चौकोनी चिरावा
- लसणी सोलून ठेचून घ्याव्यात. याचा लगदा करायचा नाही, एका पाकळीला एक दणका या पद्धतीनं
भाजीत पाकळ्या सुट्या दिसायला हव्यात, म्हणजे नाकार्डे तो खरपूस लसूण बाजुला काढतात आणि परमानंदास मुकतात न आपण आवड असणारे
चापू शकतो
- सुक्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत
- लोखंडी कढई सणसणून तापू द्यावी आणि मग जरासं तेल घालून ते तापलं की मोहोरीची फोडणी करावी
- आता आच जरा मंद करून लसूण लालसर परतावा आणि मग त्यात टोमॅटो, सुक्या मिरच्या घालून परतावं
- मिनिटभरानंतर चिरलेला पालक घालून नीट हलवावी भाजी. याला आता लगेचच पाणी सुटायला सुरुवात होईल आणि पालक आकारमानानं कमी होईल, तसा तो झाला की मगच मीठ घालावं (आधीच घातलं तर आकारमान, हो भाजीचंच; जास्त असल्यानी मीठ जास्त पडण्याची शक्यता असते); चिमटीभर साखर घालावी आणिक झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ येऊ द्यावी.
- ५ मिनिटांनंतर यात हळद, वापरणार असाल तर लाल तिखट आणि ज्वारीचं पीठ पसरून घालावं आणि गुठळ्या न होऊ देता भाजीत मिसळावं.
- सगळी भाजी नीट गोळा झाली की अजून एक ५-७ मिनिटं वाफ काढावी म्हणजे पीठ शिजेल.
- गरमगरम (ऊनऊन!) भाजी तयार आहे. फुलके, ज्वारीची/बाजरीची भाकरी यांबरोबर गट्टम करावी.
- आवडत असेल तर वरून जिवंत फोडणीही घेता येईल (यांत मोहोरी, जीरं आणि आजून लसूण हवा असेल तर तोही असं सगळं घालता येईल)

टिपा:
- लसूण जरा जास्तच घ्यावा, त्यानी चव मस्त खुलते
- साखर जस्ट चव खुलवायला वापरायचीय (नाही घातली तरीही चालेल) या भाजीत साखर मीठ तिखट बरोबरीनं नाही वापरायचं...
- मीठ आधीच घालायचं नाही, पालक जरा खाली बसला की मगच अंदाजाने घालायचं. (कुठेही मीठ जास्त पडलं तर काही करता येत नाही, पण कमी झालं तर वरून घेता नक्कीच येतं)
- ही भाजी ताजी-ताजी करावी अन लगेच संपवून टाकावी. लोखंडी कढई, पालक आणि टोमॅटो असल्यानं नंतर ती कळकेल, चवही एखाद वेळी बिघडू शकेल
- चव अजून एनहान्स करण्याकरता वरून फोडणी अवश्य घ्यावी

माहितीचा स्रोत:
कुणी नै, नेहेमी चण्याच्या डाळीचं पीठ लावून केली जाते, आज ते मला काही केल्या सापडलं नाही, कुठे ठेवल्या गेलंय ते, सो समोर ज्वारीचं पीठ होतं तेच लावलं... खूप सुरेख चव जमली... :)

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

27 Sep 2018 - 11:56 am | श्वेता२४

पाकृ छानच पण फोटो पाहिजेतच. करुन बघेन.

योगेश कुळकर्णी's picture

27 Sep 2018 - 5:41 pm | योगेश कुळकर्णी

फोटो आहेत, कुणी मला लिंक देइल का लेखात फोटो कसे द्यावेत याची?

वा ! सांगण्याच्या पध्दतीनेच भाजी समोर दिसायला लागली.
भाजी छान खुलवली आहे.

सविता००१'s picture

28 Sep 2018 - 2:53 pm | सविता००१

सुंदर च. आता फोटो टाकाच मात्र

जुइ's picture

15 Oct 2018 - 5:24 am | जुइ

ज्वारीचे पीठ घालून करुन पाहते.

योगेश कुळकर्णी's picture

25 Oct 2018 - 9:55 pm | योगेश कुळकर्णी

फोटो टाकणे शक्य होत नाहीय कारण मी गुगल फोटोज वापरत नाही आणि मजकडे फ्लिकर अकाउंट नाही :(
कायतरी करतो; दमा जरा...

कंजूस's picture

27 Oct 2018 - 7:47 am | कंजूस

पालक
फोटो १

फोटो २

फोटो ३