दोसतार - १५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Aug 2018 - 5:02 am

मागील दुवा https://www.misalpav.com/node/42996

आम्ही भूगोल आणि नागरीक शास्त्र एक करत समुद्राला उधाणाची भरती आणि ओहोटी येताना लोकप्रतिनीधींची कामे वाचून हसू लागलो.
मराठी आणि भौतीक शास्त्रातील न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम क्रीया आणि प्रतिक्रीया या नेहमीच समान परंतु एकमेकंच्या विरुद्ध दिशेने घडतात. तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. हे वाचत राहीलो.
मधली सुट्टी संपून नव्या तासाचे सर वर्गावर आले तरीही आमचे वाचन चालूच राहीले.

पुस्तकं उपलब्ध नसणं याचा दोनतीन दिवसातच सगळ्यांना कंटाळा आला. नुसतंच काय वर्गात बसून रहायचं. तरी बरं चित्रकला , संगीत, शारीरीक शिक्षण यांचे तास सुरू होते. ज्यानी कार्यानुभव विषय घेतलाय त्यांचं सुतारकाम, बागकाम वगैरे सुरू झालं होतं. दिवसभर नुसती चित्रं काढणं काढणं एकवेळ जमू शकेल निदान त्यात मुलांचा वेळ तरी जातो. संपुर्ण वर्गानं एकत्र गाणं म्हणणं हे एका तासाताही थोडा वेळच जमत होतं. पण दिवसभर बागकाम शक्य नव्हतं. पावसाळा असल्यामुळे पाणी घालणे वगैरे पण नव्हतं. शिवाय वृक्षारोपण परायला शाळेच्या बागेत खड्डे तरी किती काढायचे. आठवीच्या पाच तुकड्या.अ तुकडीतल्या मुलांनी गादी वाफे, सरी वाफे आणि शेवटी खड्डे करून त्यात अनुक्रमे मेथी , ज्वारी आणि गुलमोहोराची झाडे लावली. ब तुकडीने तेच केले. त्यानी कोथीम्बीर, गहू आणि फणस लावला, क तुकडीने मिरची , तुरी आणि लिंबाची झाडे लावली. हे सगळं एकाच जागेवर लावलं गेलं. त्यामुळे आम्हाला चार महिन्यांनंतर डाळ ज्वारी गहू कोथिंबीर लिंबू मिरची ,मेथी असं सगळं मिळणार होतं. यात मिठाचं झाड तेवढं नव्हतं. ते लावता आलं असतं तर मजा आली असती. जयंता दामले ने सरांना विचारलं सुद्धा. ते म्हणाले . लावू हं. त्याचं बियाणं मिळालं की लावू.
आमच्या पैकी कोणीच मिठाचं बी पाहिलेलं नव्हतं. बारीक मीठ हे काही मिठाचं बी नसणार. ते दळलेलं असतं. खडे मीठ पण नसणार बहुतेक. झाडाच्या बी वर साल असते, खडे मीठावर साल नसते. पण समुद्रात मीठ असतं म्हणजे त्याची झाडं नक्कीच असणार . त्याचा शोध लावायचाच. हे सगळ्यांच ठरलं.
या वेळेला टंप्या आणि एल्प्या गालातल्या गालात हसत होते. त्याना माहीत असावं मिठाचं बी कुठे मिळते ते.
पण हे सगळं शाळेत बसुन जमणार नव्हते. हातात कोणतीही पुस्तके नसताना वर्गात बसणं तेही शांतपणे म्हणजे एक शिक्षाच की. ती बहुतेक सगळ्या सरांना आणि बाईनाही होत असावी. पन्नास मुलांचा वर्ग , गप्प बसा असे तरी किती वेळा म्हणणार. सरांनी "गप्प बसा" हे जितक्या वेळा म्हंटले तितक्या वेळा फळ्यावर लिहीले असते ना तर आपली पैज. चार पाच फळे तरी नक्की भरून गेले असते. शेवटी सोनसळे सरांनी एक गम्मतीदार खेळ शोधून काढला. कोणी बोलताना दिसला की ते पहाणाराने गाणे म्हणायला सुरवात करायची. वर्ग सुरवातीला शांत होता. अचानक जयंत्या दामले ने झूट बोले कौव्वा काटे काले कौवे से डरीयो म्हणायला सुरवात केला. त्याला म्हणे त्याच्या शेजारी बसलेला महेश काहीतरी विचारत होता. पण जयंत्याला गाण्याची तेवढी एकच ओळ येत होती. तो तीच ओळ परत परत म्हणत होता.
तो शांत होत नाही तोवर वर्गाच्या दुसर्‍या कोपर्‍यातून "डफली वाले डफली बजा" हे गाणे ऐकू आले. ते संपतय ना संपतय तोच मुलींच्या ओळीतून लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई सुरू झाले. सोनसळे सरांच्या काय होतंय ते लक्ष्यात आले असावे. त्यानी सगळयाना पुन्हा शांत बसवले. म्हणाले सिनेमाची गाणी नंतर म्हणू.
त्या ऐवजी गेल्या वर्षीच्या कविता म्हणूया. सगळ्या मराठी हिंदी इंग्रजी सुद्धा. कविता चालीसकट सगळ्यांना पाठ आहेतच . त्यामुळे रेडीओवर कधी कधी पीन अडकल्या सारखे होते तसे त्याच त्याच ओळी पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागणार नाहीत. सर हे म्हणतच होते त्याच वेळेस गुरसाळे ने कविता म्हणायला सुरुवात केली "मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर"
तीची कविता चालू असतानाच डीक्या मोरे ने "राजास जी महाली सौख्ये किती मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या" सुरू केले.
इकडे योग्याने पण "म्हातारी उडता न ये ची तिजला माता मदीया अशी. कांता काय स्मरो नवप्रवसवा साता दिसांची जशी" म्हणायला सुरवात केला.
ती होतंय ना होतंय तोच आणखी कुणीतरी " लाडकी बाहुली होती माझी एक . मिळणार तशी ना शोधूनी दुसर्‍या लाख" सुरू केलं.
इंदुमतीने हिंदीतली कविता सुरू केला " लेकर पीला पीला थैला पत्र बांटने आता. यह है मुंशीराम डाकीया सबकी चिठ्ठी लाता"
मराठी हिंदी कवितांची कमी होती म्हणून की काय सुषम ने जॅक अँड जील वेंट अप द हील टु फेच अ पेल ऑफ वॉटर सुरू केले.
त्याला उत्तर म्हणून मंग्या " बाउन्स द बॉल बाउन्स द बॉल अगेन्स्ट द वॉल बाउन्स इट राईट अप टु द स्काय " गायला लागला.
आत्ता पर्यंत शांत असलेल्या एल्प्याने त्या च्या घोगर्‍या आवाजात " किर्र रात्री सुन्न रानी गार वाडा शार भिंती, दार त्याचे हस्ती दंती. कोण आले , दार आपोआप खोले" ही विंदा करंदीकरांची पिशी मावशीची भुतावळ सुरू केली.मुले आठवून आठवून कविता म्हणत होती.
आता वर्गातल्या प्रत्येक बाकावरून एकेक कविता येत होती. सगळे एकत्रच म्हणत होते. कोणी एखादी कविता सुरू केली की बाकीचेही त्याच्या बरोबरीने म्हणत त्याच्या सुरात सूर मिसळत होते. काही जण तर हाताने टाळ्या वाजवत ताल ही धरत होते. मस्त मजा येत होती.
"माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट.माझ्या मराठीचा ठेवा नित्य मन मोहवीत. ज्ञानोबाची तुकयाची मुक्तेशा ची जाईची. माझ्या मराठीची गोडी रामदास शिवाजीची."
" कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो. किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो"
"चित्रांची ही विचित्र वीणा अजून करीते दिडदा दिडदा"
"खबरदार जर ताच मारुनी जाल पुढे चिंधड्याअ उडवीन राई राई एवढ्या"
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेवून , निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातुनी"
" गडबड घाई जगात चाले. आळस डुलक्या देतो . पण गंभीर पणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण. या घड्याळास घाई नाही विसावाही नाही. पण त्याचे म्हणणे ध्यानी येई. आला क्षण गेला क्षण"
" गाई पाण्यावर काय म्हणोनी आल्या. का गं गंगा यमुना त्यासी मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला. कोण बोलले माझीया गोरटीला.
" सदैव सैनीका पुढेच जायचे , न मागुती तुवा कधी फिरायचे...."
" उठा उठा चिऊ ताई सारीकडे उजाडले. डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी. डोळ्यावर झोप कशी अजूनही अजूनही"
" खळखळ छन छन धूम पट धूम पट लेझीम चाले जोरात........."
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे. क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे."
" बाळ चालला रणा. घरा बांधी ते तोरण.पंच प्राणांच्या ज्योतीने तूज करीते औक्षण'
" गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी"
" रे हिंद बांधवा थाम्ब या स्थळी . अश्रु दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली"
" टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. भिर भिर त्भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे"

वर्गात कवितेचा उत्सव सुरू होता.
वर्गा बाहेरून त्यावेळे कोणी गेले असते तर त्याला एकाच वेळेस दहा बारा रेडीओ ऐकतोय असे वाटले असते.
शाळा सुटल्याची घंटाही आम्हाला कुणालाच ऐकू आली नाही आणि त्या अगोदर झालेले" अभ्यासाची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत " हे प्रकटनही ऐकू आले नाही.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

5 Aug 2018 - 9:38 pm | ट्रम्प

बालपण आठवले हो !!!, अरे वा पंधरा भाग झाले सुद्धा !! , पुढच्या भागांची वाट बघतोय .

सस्नेह's picture

5 Aug 2018 - 9:47 pm | सस्नेह

सुरेख !

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2020 - 8:23 pm | चौथा कोनाडा

सुरेख !

बालपणीच्या कवितांची सुंदर मैफिल !