पीसीओडी

Shantanu Abhyankar's picture
Shantanu Abhyankar in जनातलं, मनातलं
27 Jul 2018 - 4:43 pm

पीसीओडी
पीसीओडी (PCOD) ही भानगड काय आहे? आजकाल हे पीसीओडी, पीसीओडी फार ऐकू येते. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डीसीज. शब्दशः अर्थ, स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजेच बीजे दिसणे.
संप्रेरकातील घोटाळ्यामुळे उदभवणारा हा एक आजार आहे. यात स्त्रियांच्या शरीरात पुरुषरसांचे (Androgens) प्रमाण वाढते. परिणामी स्त्रीबीजनिर्मिती महिन्याच्या महिन्याला होण्याऐवजी, अधून मधून व्हायला लागते. सोनोग्राफी केली, तर स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजांची रेलचेल दिसू लागते.
खूप बायकांना असतो हा विकार. दर विसात एखाददुसरीला. प्रत्येकीला त्रास होतोच, असेही नाही. बरेचदा काही सुद्धा होत नाही. पाळी नियमित येत रहाते, मुले होत रहातात आणि ओव्हरी पॉलीसिस्टिक दिसत रहातात. काहीत पाळी थोडी पुढे जात रहाते, वजन थोडे वाढते, थोडी मुरुमे येतात आणि अंगावर, चेहऱ्यावर लव थोडी जास्त रहाते; एवढेच. काहींना मात्र मूल रहात नाही आणि बहुतेकदा निदान होते ते मूल व्हायला उशीर होतोय म्हणून तपासण्या केल्या जातात तेंव्हा.

पीसीओडीचे कारण नेमके कळलेले नाही त्यामुळे जनुकीय दोष, एनव्हायरनमेंट, स्थौल्य वगैरे सराईत गुन्हेगारांवर वहीम आहे. आपल्याला एवढे ठाऊक आहे की, अशा पेशंटमध्ये मुळात पुरुषरसाचे प्रमाण वाढते. पुरुषरस वाढल्यामुळे लव वाढते. स्त्री-पुरुष दोघांत, अंगावर प्रतीचौरस सें.मि. जागेत, केसांची मुळे सारख्याच प्रमाणात असतात. फक्त पुरुषरस अत्यल्प असल्यामुळे स्त्रियांत अंगावर केस विशेष वाढत नाहीत. जे वाढतात ते अतिशय पातळ, पारदर्शक आणि आखुड असतात. त्यामुळे ते दिसत नाहीत. पीसीओडी असेल तर केस जाड आणि काळे होतात आणि ठळकपणे दिसू लागतात. पीसीओडी असलेल्या मुलींना मुरुमेही जास्त येतात, तीही पुरुषरस वाढल्यामुळे. पुरुषरसाचाच परिणाम म्हणून शरीरात असलेले इन्सुलिन निष्प्रभ ठरते, पुढे जाऊन शुगर वाढते, आपण म्हणतो, तिला डायबेटीस झाला बरेका. असते ते इन्सुलिन निष्प्रभ ठरल्यामुळे शरीरात अधिकाधिक इन्सुलिन निर्माण केले जाते. पण अती झाले आणि हसू आले यातला प्रकार. या अतिरिक्त इन्सुलिनमुळेच स्त्री-पुरुष संप्रेरकांचा तोल ढळतो आणि पुढचे रामायण घडते. एक प्रकारचे दुष्टचक्रच हे. पहिल्यामुळे दुसऱ्याला जोर येतो आणि दुसऱ्यामुळे आता पहिल्याला चेव चढतो.
स्त्रीपुरुष संप्रेरकांचा तोल ढळला की पुनरुत्पादनाची क्रिया बिघडते. बीज निर्मिती अनियमित होऊ लागते. पाळी पुढे पुढे जाते. वजन जास्त असेल तर दिवस राहिले तरी गर्भ नीट रुजत नाही. अर्थात पीसीओडी आहे म्हणजे फक्त त्यामुळेच मुले होत नाहीयेत असे नाही. अन्यही कारणे असू शकतात. खरुज झाली म्हणजे नायटा होत नाही असे थोडेच आहे? तेंव्हा इतर कारणे नाहीत ना, यासाठीही तपासण्या कराव्या लागतात. पीसीओडीचे नेमके निदान करण्यासाठी एकच एक टेस्ट नाहीये. तक्रारी, शारीरिक तपासणी, सोनोग्राफी इत्यादींचा साकल्याने विचार करून रक्त तपासण्या सुचवल्या जातात. या पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कराव्यात हे उत्तम.
कारण नेमके माहित नाही तेंव्हा उपचारही नेमके ठरलेले नाहीत. त्या त्या डॉक्टरचा कस पहाणारा हा आजार आहे. वजन जास्त असेल तर ते उतरवणे महा महत्वाचे आहे. एखादे व्रत करावे तशा निष्ठेने हा वसा घ्यावा. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. वजन कमी करण्याचे फायदे अनेक. पीसीओडी तर आटोक्यात येतोच, पण पाळी नियमित होऊन दिवसही राहू शकतात. एकूणच दीर्घकालीन आरोग्यासाठी वजन नियंत्रण उपकारक ठरते. काही वेळा कितीही आटापिटा केला तरीही वजन रहित अवस्था काही प्राप्त होत नाही. अशा काही पेशंटमध्ये, पचन क्रियेदरम्यान, चरबीसाठी आत जाणार मार्ग असतो पण बाहेर येणारा मार्गच नसतो. यांना वजन कमी करण्याच्या ऑपरेशनचा चांगला फायदा होतो. पण त्या क्षेत्रातील तज्ञांचा विचार घेऊनच हा निर्णय घ्यावा.
शरीरात इन्सुलिन भरपूर असूनही पेशी त्याला दाद देत नाहीत हे आपण वर पहिले. पेशींच्या या कोडगेपणावर उतारा म्हणून काही औषधे आहेत, उदाः मेटफोर्मीन (Insulin Sensitising Agents). एकदा हे दुरुस्त झाले की, वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणामही कमी होतात. पाळी नियमित यायला मदत होते. दिवस रुजायला मदत होते.
दिवस रहाण्यातील मुख्य अडचण, ही अनियमित स्त्रीबीज निर्मिती ही असल्याने, स्त्री बीज निर्मिती नियमित होईल अशी औषधे दिली जातात. गोळ्या इंजेक्शने वगैरे गरजेनुसार वापरली जातात. कधी कधी लॅपरोस्कोपी करून बीजग्रंथींवर काही शस्त्रक्रिया केली जाते, ज्याने बीज निर्मिती सुलभ होते. काहीच उपयोगे ठरले नाही तर टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय अवश्य आणि वेळेत वापरावा.
एरवी गर्भ निरोधक म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे अनेकानेक उपयोग आहेत. पीसीओडीवरती ह्या गोळ्या हे एक स्वस्त आणि परिणामकारक औषध आहे. याने पाळी अतिशय नियमित येते, पिशवीचे अस्तर मर्यादेत वाढते. रक्तस्राव मर्यादेत होतो. पुरुषरस कमी होतात, लव आणि मुरुमेही आटोक्यात येतात. अविवाहित किंवा इतक्यात मूल नको असलेल्या स्त्रियांसाठी ही उत्तम मात्रा आहे.
तरूण मुलींना बरेचदा पाळी अनियमित येत असते. निदान होते पीसीओडीचे. यांना आणि यांच्या आयांना पाळी अनियमित म्हटले की भयंकर भीती वाटते. भ्यायला आमची काही हरकत नाही. पण कितीही समजावून सांगितले तरी आजाराचे स्वरूप समजावून घेण्याची त्यांची मानसिकता नसते, हे अधिक भयावह आहे. त्यांचा एकच धोशा, पाळी नियमित यायला पाहिजे असे एकदाच काय ते औषध द्या. पीसीओडी या आजारात अशी एकदाच एक गोळी नसतेच. पण या बायका अशी गोळी शोधत रहातात, शॉपिंग करत फिरत रहातात, डॉक्टर आणि दवाखाने बदलत रहातात, देशोदेशीचे वैद्य हकीम करत रहातात. पण अशी गोळी मिळत नाही. कारण तसा शोधच लागलेला नाही. आयांनी आणि मुलींनी हे समजावून घेतले पाहिजे की पीसीओडी ही शरीराची उपजत सवय आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो. लग्न होईपर्यंत आणि पुढेही मूल हवे असा निर्णय होईपर्यंत, ही गोळी चालू ठेवायला हवी. पण बहुतेकदा अशा गोळ्या परस्पर बंद केल्या जातात. कारण प्रत्येक बाईच्या शेजारी एक बाई रहात असते. ही ‘शेजारची बाई’ नावाची चीज फार महत्वाची ठरते. ती एकच वाक्य म्हणते; वाक्यसुद्धा नाही दोनच शब्द, ‘अग्गोबाईsss गोळ्याsss?’ मग पेशंटच्या आणि पेशंटमातेच्या काळजात कालवाकालव होते. त्यांना वाटते गोळ्याची आता ‘सवय लागेल’. त्या बंदच केलेल्या बऱ्या. खरेतर मुलीला अनियमित पाळीची ‘सवय’ असते म्हणून तर गोळ्या सुरु केलेल्या असतात. त्यामुळे त्या घेणे शहाणपणाचे.
गोळ्यांविना पण अनियमित पाळी चांगली? का गोळ्या घेऊन नियमित पाळी चांगली?; असा हा पेच आहे. आमचे उत्तर आहे गोळ्या घेऊन पण नियमित पाळी चांगली! कारण पाळी अनियमित आली की अनेक त्रास होतात. आतले अस्तर उगीचच अव्वाच्या सव्वा वाढते, ‘पीसीओडी’चे इतर त्रास वाढतात, ई. ई.
पण एकदा औषध करताच पुढे वर्षानुवर्षे बिन गोळ्यांनी नियमित पाळी आली पाहिजे, ही अपेक्षा डोक्यात फिट्ट बसलेली असते. त्यामुळे ह्यांना हे पटत नाही.
पीसीओडी साठी आयुष्यभर गरजेप्रमाणे गोळ्या घ्याव्या लागू शकतात. सुरवातीला लहान वयात, पाळी नियमित येण्यासाठी, मग मूल नको असेल तर तशा गोळ्या, मूल हवे असेल तर वेगळ्या गोळ्या, भरपूर मुले झाल्यावर पुन्हा वेगळ्या गोळ्या... तुमच्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्ही आहात यावर औषध बदलत जाते.
ह्या आजाराचे स्वरूप नीट समजावून घ्यायला हवे. साधक बाधक विचार करून कोणते उपचार निवडायचे हे ठरवायला हवे. वास्तववादी अपेक्षा ठेवायला हव्यात. अन्यथा अपेक्षांच्या ओझ्याखाली डॉक्टर दबून जातो आणि फक्त उपेक्षाच वाट्याला आली असे पेशंटला वाटत रहाते.

आरोग्यआरोग्य

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

27 Jul 2018 - 5:45 pm | अनिंद्य

@ Shantanu Abhyankar

मिपावर बहुतेक पहिलाच लेख तुमचा आणि तो ह्या हटके विषयावर.

लेखन आवडले, लिहिते राहा अश्या शुभेच्छा

अनिंद्य

तुषार काळभोर's picture

27 Jul 2018 - 8:05 pm | तुषार काळभोर

+१

टर्मीनेटर's picture

27 Jul 2018 - 7:23 pm | टर्मीनेटर

खूप छान माहिती. _/\_

Nitin Palkar's picture

27 Jul 2018 - 8:25 pm | Nitin Palkar

+१

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2018 - 7:59 pm | टवाळ कार्टा

ब्राव्हो...मिपावर बर्याच दिवसांनी चांगला लेख वाचला

रंगीला रतन's picture

27 Jul 2018 - 8:10 pm | रंगीला रतन

@ टवाळ कार्टा सहमत! कंटाळवाणी चर्चासत्रे वाचून उबग आला होता. असे चांगले लेखच परत मिपावर येण्यासाठी मानसिक बळ देतात.
मस्त लेख!

कपिलमुनी's picture

27 Jul 2018 - 8:13 pm | कपिलमुनी

मुलींनो/महिलांनो कृपया हे आर्टिकल पूर्ण वाचा.

©अंजली झरकर

तिला १३ व्या वर्षी पाळी सुरु झाली होती पण जशी सुरु झाली तेव्हापासून काही ना काही दुखणी मागे लागलीच होती. अति रक्तस्त्रावाचा त्रास तर पहिल्या वेळेपासून च सुरु झालेला होता. शाळेत जेव्हा ती आजूबाजूच्या मुलींचं निरीक्षण करायची तेव्हा सगळ्या मुली तिला सुंदर दिसायच्या. उत्साही, तजेलदार त्वचेच्या, शिडशिडीत शरीरयष्टीच्या तिच्या मैत्रिणी बघून तिला कळायचं नाही त्यांच्यात आणि आपल्यात काय नक्की अंतर पडलय. या ही मोठ्याच झाल्यात. यांनाही पाळी सुरु झालेली असणारेय पण यांचे केस गळत नाहीत, यांची स्कीन काळी कुरूप पडलेली नाही, यांचं वजन वाढलेलं नाही मग मी अशी का झालेय? मला का कोणत्या गोष्टीत उत्साह वाटत नाही? मला हे अचानक डिप्रेशन कुठून येतं?

या विषयावर तिच्याशी बोलायला तेव्हा कुणीही नव्हतं. स्वत:च्या मनात पडणारे प्रश्न कुणाला सांगावे? ना कुणी मैत्रीण, ना समुपदेशक, ना शिक्षिका. तिने या विषयावर आईशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण बाहेरच्या १२-१२ तासाच्या हेवी ड्युट्या करून आणि घरातील कामे करून शिणून थकून गेलेली आई तिच्याशी बोलायला राजी नसायची.
“सगळ्या जगाचं असच असतं, तू काय आभाळातून पडली नाहीस, मी ही हेच सहन केलय, तुला ही तेच सहन करायचय.” तिच्या मनातलं प्रश्नाचं जाळं कायम ठेवून आई – मुलीचा संवाद आटपायचा.

ती १० वी ला गेल्यावर हा त्रास प्रचंड वाढला. दर १० दिवसांनी, १५ दिवसांनी कधीही पाळी यायला लागली, इडलिंबू असते तितक्या मोठ्या आकाराच्या रक्ताच्या काळ्या गाठी पाळीतून पडायला लागल्या, ते बघून तिचा जीव घाबरा घुबरा व्हायचा, असह्य वेदनांनी ८ -८ दिवस पाळी संपेपर्यंत ती बिछान्यावर निपचित पडून रहायची. शेवटी अनेकदा रडल्यानंतर तिला आई दवाखान्यात घेवून गेली. तिथे तिला overol-L चं प्रिस्क्रिप्शन मिळालं. इथून खरे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले.

overal-L या गोळ्या तिने पहिल्या तीन महिने खाल्ल्या तरीही तिच्या पाळीची सायकल नॉर्मल होईना म्हणून पुन्हा एकदा ३ महिन्यासाठी तिला त्याच गोळ्या प्रिस्क्राईब केल्या गेल्या. ६ व्या महिन्यात एके दिवशी तिने overal-L चा डोस घेतला. ४ तासात अचानक गर्रकन सगळ जग तिच्याभोवती फिरायला लागलं, प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला, हृदयाच्या हार्ट्सबीट जबरदस्त वाढल्या. गोळी घेतल्यापासून ६ तासात तिची कंडीशन सिव्हीयर झाली. त्याच्यानंतर जवळपास ३ महिने बिछान्याला ती खिळून होती. याबद्दल जेव्हा दुसऱ्या MBBS MD. डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं गेलं तेव्हा तिने overal-L चा डोस घेतला हे ऐकून डॉक्टर उखडले. तिच्या आईला ताडताड बोलले.

“ कमाल आहे तुमची, १५ वर्षाच्या मुलीला कोणी ६ महिने contraceptive pills वर ठेवतं का? बघा तिची अवस्था काय झालीयेय. किती भयानक वजन वाढलंय, pcod ची कंडीशन पहिल्यापेक्षा गंभीर झाली आहे. गंभीर साईड इफेक्ट झालेत या गोळ्यांचे. बंद करा त्या गोळ्या पहिल्या. वाचवा तुमच्या मुलीला”

तिच्या गोळ्या बंद झाल्या पण गोळ्यांचे परिणाम कायम पाठलाग करत राहिले. ८५ किलो वर गेलेलं वजन, संपूर्ण चेहऱ्यावर उगवलेले केस, सतत मुरुमांच्या गाठी येवून खडबडीत झालेला काळा चेहरा, संपूर्ण शरीरावर आलेली सूज, खोबणीतून बाहेर आलेले डोळे आणि आयुष्यभरासाठी भेट मिळालेलं डिप्रेशन.

ही कथा एकट्या कस्तुरीची नाहीयेय. ही कथा त्या हर एका मुलीची आहे जी वयाच्या १२ व्या १३ व्या वर्षापासून तिच्या पाळीबरोबर झगडतेय.

overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत.
पण...पण
या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले.

जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा.

दुसरा मुद्दा आहे पाळी बरोबर येत नसल्याने वजन वाढून आलेल्या लठ्ठपणाच्या वेदनांचा. कुणी choice म्हणून जाड होत नाही. कुणी choice म्हणून कुरूप देखील होत नाही. मग असं असताना जाडपणाच्या वेदना घेवून चालणाऱ्या बाईला ढोली, जाडी, काळी, कुरूप, जम्बो असली विशेषणे कोणत्या तोंडाने हा पुरुषी समाज लावत असतो? कामाच्या ठिकाणी स्वत:पेक्षा अनेक वर्षाने लहान असणाऱ्या ज्युनियर च्या वाढलेल्या पार्श्वभागावर विनोद करणारे सिनियर्स मला ठावूक आहेत. come on! या वेळी कुठे जाते तुमची डिग्री, तुमचं उच्च शिक्षण, तुमचं गोल्ड मेडल, तुमचे एथिक्स? माहीत नाही उच्च नीच जात कदाचित जन्माने मिळत असेल ही पण दुसऱ्याची वेदना समजावून घेणारं संवेदनशील मन फार दुर्मिळ आहे ते जन्माने मिळेलच असं नाही.

त्यामुळे बाईला देवळात पाळीत प्रवेश द्यावा किंवा नाही ह्यावर भांडत बसणारा समाज मला कायम मुर्ख वाटत आलाय. बाईला पाळीमध्ये घरकामाची सक्ती नाही केली पाहिजे, बाईला पाळीमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छ toilets उपलब्ध करून दिले पाहिजेत, बाईने स्वत:च्या पाळीच्या त्रासाबद्दल उघडपणे बोलले पाहिजे, पाळीबद्दल जनजागृती केली गेली पाहिजे, पाळीमध्ये बाईला कुठल्या प्रकारची औषधे दिली तर तिला बरं वाटेल, कुठल्या प्रकारच्या औषधानी तिचा त्रास वाढू शकतो याबद्दल कधी कुठली चर्चा ऐकू येत नाही. ज्या गरीब मुलींची ऐपत नाही त्यांना चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड पुरवले गेले पाहिजेत, बाईला स्वच्छ toilets तिच्या कामाच्या परिसरात असावी याबद्दल कुणी आंदोलने करत नाही. ज्याला त्याला जावून फक्त गाभाऱ्याला धडका मारायच्या असतात.
हे बघा भाई मला पाळीत ना देवळात जायचय, ना मशिदीत, ना चर्च मध्ये. मला घरात राहायचय, मला आराम करायचाय, मला माझी पाळी वेदनामुक्त जगायची आहे. मला pcos free असं हेल्दी लाईफ जगायचं आहे त्यासाठी तुम्ही माझी काय मदत करू शकता? हा माझा जाहीर सवाल आहे!
- अंजली झरकर

या ढकलपत्रात गोळ्याबद्दल वेगळी माहिती दिली आहे

Nitin Palkar's picture

27 Jul 2018 - 8:24 pm | Nitin Palkar

.....पण हा प्रतिसाद वेगळा लेख म्हणून बरा वाटला असता...

सुबोध खरे's picture

27 Jul 2018 - 8:34 pm | सुबोध खरे

ढकलपत्रातील बरीच गोष्टी कचऱ्यात ढकलण्याच्या लायकीच्या आहेत.
उदा "overal-L असं जर तुम्ही नेट वर सर्च करून पाहिलं तर तुम्हाला कळेल या गर्भनिरोधक गोळ्या आहेत.
पण...पण
या गोळ्या मुलींची पाळीची सायकल नॉर्मल व्हावी म्हणून देखील सर्रास दिल्या जातात. काही डॉक्टर या देतात. बरेच डॉक्टर या गोळ्यांचा विरोध करतात. कारण या गोळ्या म्हणजे फक्त कृत्रिम इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन आहेत. बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत. ही सायकल जर बिघडली तर तिला पाळीचे त्रास सुरु होतात त्याची ट्रीटमेंट म्हणून बऱ्यापैकी birth control pills किंवा गर्भनिरोधक गोळ्या प्रिस्क्राइब केल्या जातात पण खुद्द अनेक डॉक्टर या गोळ्या लहान टीन एज मुलींना देण्याचा विरोध करतात कारण कृत्रिम इस्ट्रोजेन घेवून प्रोब्लेम कधीच संपत नाहीत. गोळ्या बंद केल्यावर अजून जास्त वाढतात. गंभीर बनतात जसे कस्तुरीचे बनले.

जरा एकदा आपल्या घरातल्या १३-१४ वर्षाच्या मुलीबरोबर पाळीच्या त्रासाबद्दल बोलून बघा, तिला नक्की कुठले मेडिसीन दिलेत त्याचा काय परिणाम होतो हे सर्च तर करून बघा. १४ वर्षाचा जीव कुठल्या वेदनेतून आणि दु:खातून चाललाय याची जाणीव तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या भारताच्या जागरूक आई बापांनो. जर पाळीच्या त्रासासाठी birth control pills, कृत्रिम इस्ट्रोजेन, T4 किंवा स्टेरॉईड कंटेंट असलेली औषधे तिला चालू असतील तर कृपा करून ती बंद करा."

बाकी त्या दुर्दैवी मुलीबद्दल आणि त्यांनी डॉक्टर नक्की काय म्हणाले हे सांगितले आहे याविषयी पूर्ण माहिती शिवाय काही लिहिणे चुकीचे ठरेल.

माझ्या स्वतःच्या अनुभवात दोन मुली अशा आहेत ज्यांनी अशाच गोळ्या नेट वर वाचून घेतल्याच नाहीत

एका मुलीने पाळी व्यवस्थित आली नाही म्हणून दुसऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेली असता त्यांनी सोनोग्राफी परत करायला सांगितली. ती माझ्याकडे आल्यावर तिने गोळ्या घेतल्याच नाहीत हे कबुल केले.

अशा ओसी पिल्स देणे हा "पी सी ओ एस" च्या उपचाराचा एक भाग नक्कीच आहे. काही स्त्रीरोग तज्ञ दुसरे उपचारहि करतात पण हा "तज्ञ डॉक्टरानी" प्रत्यक्ष रुग्ण पाहून घ्यायचा निर्णय आहे.
म्हणून या गोळ्या विष आहे अशा तर्हेचा अपप्रचार करणाऱ्या झरकर बाई साफ चुकीच्या गोष्टी पुढे ढकलत आहेत असेच मी म्हणेन.

बाईच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन naturally तयार होत नाही म्हणून पिरिअड वेळेवर येत नाहीत हे त्यांचे विधान असेच भंपक आहे.

त्यामुळे विषयाचे पूर्ण ज्ञान नसताना वाटेल ते लिहिणे हे रुग्णाची दिशाभूल करणे आहे.

कपिलमुनी's picture

27 Jul 2018 - 11:33 pm | कपिलमुनी

ढकलपत्रातील चुकीच्या गोष्टी सांगितल्याबद्दल धन्यवाद !

प्राची अश्विनी's picture

29 Jul 2018 - 8:39 am | प्राची अश्विनी

सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती.

शाम भागवत's picture

29 Jul 2018 - 5:03 pm | शाम भागवत

स्रीबीज निर्मिती ?
ते आजीकडून येते ना?
म्हणजे तस युयुत्सु व डाॅ. दिक्षीत म्हणतात.

चौकटराजा's picture

29 Jul 2018 - 5:45 pm | चौकटराजा

हा लेख लिहिणारे डॉ , हे वाईचे डॉ शरद अभ्यंकर यांचे चिरंजीव असतील तर " अरे या मुलाला तो लहान असल्यापासून ओळखतो असे विधान मी करीन . खरे तर डॉ शरद अभ्यंकर यांच्या विषयी मला फार आदर आहेच ! ते असो ... या डॉ च्या रूपाने आपल्याला एक मस्त मजेशीर पण अभ्यासू लेखक इथे मिळालेला आहे यात शंका नाही . आमच्या इथे अशी काहीशी समस्या आली होती पण गर्भ निरोधक गोळ्या महिना भर घेतल्याने आता मुलीला काही त्रास नाही .( पहिलया प्रथम मी " या" गोळ्यांचा उल्लेख झाला तेंव्हा चाट पडलो होतो कारण मुलगी गतिमंद गटातील आहे अरे बापरे हे काय भलतेच असे वाटून गेले .. असो ) .

तुमचा कयास बरोबर आहे. मी डॉ. शंतनू शरद अभ्यंकर.

लई भारी's picture

30 Jul 2018 - 2:42 pm | लई भारी

एका महत्वाच्या विषया बद्दल विस्ताराने लिहिल्या बद्दल धन्यवाद.
पीसीओडी च्या फेऱ्यात अडकल्यामुळे बराच त्रास झालाय.

आयांनी आणि मुलींनी हे समजावून घेतले पाहिजे की पीसीओडी ही शरीराची उपजत सवय आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो.

आमचा पण असा गैरसमज होता की मुलं झाली म्हणजे संपला त्रास! अलीकडेच एका डॉक्टरनी गरजेनुसार गोळ्या आणि मुख्य म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे 'वजन कमी करणे' हा सल्ला दिला.

श्वेता२४'s picture

30 Jul 2018 - 3:36 pm | श्वेता२४

पीसीओडीवर खूप वर्षे उपचार घेतले आहेत. होमिओपथी, आयुर्वेदीक, त्या ओवरॉल एलचा कोर्सतर कित्येकदा केला. काहीकाळ फरक पडल्यासारखे वाटून परत येरे माझ्या मागल्या. याबद्दल माझ्या तत्कालीन आयुर्वेदीक डॉक्टर मैत्रिणीचे मत होते की, हल्लीच्या काळात 60 टक्के मुलींना ही समस्या असतेच.
हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो.
हे आपल्या लेखामुळेच कळलेे. हा आजार आपल्या रोजच्या राहणीमानाच्या सवयी व आहारामुळे हार्मोनवर परिणाम होऊन होतो. हे नॉर्मल आहे, असंच ऐकत आलेय. डॉक्टर थायरॉईडची टेस्ट करण्याचा एक सल्ला देतात. वर्षातून एकदा ही टेस्ट करतेच. गरोदर होण्यापूर्वी डॉक्टरनी 10 किलो वजन कमी करण्यास सांगितले होते. ते मी फारच मनावर घेऊन 64 वरुन 52 वर आणले 7-8 महिन्यात. आता पुन्हा 64-65 वर आले आहे. पण फार स्थूल दिसत नसले तरी वजन आटोक्यात आले पाहिजे 60 च्या दरम्यान राहिले पाहिजे हे प्रकर्षाने जाणवतेय.
एक खूप माहिीतीपू्र्ण लेख व त्यानिमित्ताने चर्चा घडवून आणल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार

मिपावरच्या सर्व तज्ञ डॉक्टरांची लेख/प्रतिक्रिया वाचून नेहमीच मनात चांगली भावना येते. त्यांचं लिखाण असं वाटतं की ही डॉक्टर मंडळी त्यांच्या रुग्णांची मनस्थिती आणि पार्श्वभूमी समजून घेतात आणि रुग्णांना त्यांच्या आजाराविषयी व्यवस्थित माहिती देतात. मात्र प्रत्यक्षात असे डॉक्टर्स मला किंवा माझ्या जवळच्या वर्तुळातल्या कोणाला कधीच भेटले नाहीत.

उदा.माझ्या एका बहिणीला १३ वर्षाची असतांना पाळी आली पण नियमीत कधीच नव्हती. १५-१६ वर्षांची झाल्यावर उपचार सुरु केलेत. २-३ वर्ष गर्भनिरोधक गोळ्या झाल्या, तेवढे दिवस पाळी नियमीत होती. गोळ्या बंद केल्यावर ये रे माझ्या मागल्या. नंतर काही महिने आयुर्वेदिक तर काही महिने होमिओपॅथी झाले. पण काही फरक पडला नाही. असेच अनेक डॉक्टर्सकडून उपचार करत करत कालांतराने लग्न झाले आणि ज्याची सगळ्यांना धास्ती होती ते न होता मूलही झाले. मुलानंतर पाळीचा त्रास जास्त वाढला. एव्हाना ती परदेशात होती. तिथे तिला PCOD असल्याचे 'निदान' झाले आणि सोबतच डॉक्टरांनी त्यासंबंधीची सगळी माहिती (जी वरच्या मूळ लेखात आहे) पुरवली.

परदेशातल्या पहिल्याच डॉक्टरने तिला योग्य निदान करून व्यावस्थित माहिती पुरवली तर आपल्याकडे अनेक डॉक्टर्सकडे जावूनही एकानेसुद्धा साधे आजाराचे नावही सांगू नये?? आपल्याकडे आजही वैद्यकीय ज्ञान नसलेला सामान्य माणूस डॉक्टरांवर पूर्णपणे अवलंबून असतो. त्याला काय आजार झाला आहे त्याचं नावं आणि त्याबद्दलची प्राथमिक माहिती डॉक्टर्स का देत नसावेत? बहुतेक डॉक्टर समस्या ऐकतात, चाचण्या सांगतात आणि त्यानुसार औषधे लिहून देतात; माहिती कोणीच देत नाही. आजकाल जरा 'अवेअरनेस' वाढल्याने मी प्रश्न विचारायचा प्रयत्न करते पण मला शक्य तेवढ्या त्रासिक चेहर्‍याने शक्य तेवढी त्रोटक उत्तरं देवून बाहेरचा रस्ता दाखवला जातो.

माझीही शॅम्पेन's picture

24 Aug 2018 - 8:44 am | माझीही शॅम्पेन

हल्लीच एका सेशन मध्ये एका बाईने तिचा PCOD तून बरे होण्याचा अनुभव शेयर केलेला ,
त्यात तिने मानसिक क्षमता मेडितेशन आणि अफर्मेशन्सने वाढवली होती त्याबरोबरच थोडीफार शारीरिक शक्ति वाढवायासाठी व्यायाम सुरू केलेल , आता ती त्यात्यून पूर्ण बरी झालेली आहे !

II श्रीमंत पेशवे II's picture

24 Aug 2018 - 12:55 pm | II श्रीमंत पेशवे II

+१

याचा काही फाय दा होतो आहे का बघावे.
तसेच तज्ञांनी मार्गदर्शन करावे.

यशोधरा's picture

26 Aug 2018 - 5:08 pm | यशोधरा

लेख आवडला. माहितीबद्दल धन्यवाद.

डॉ श्रीहास's picture

28 Aug 2018 - 1:00 pm | डॉ श्रीहास

बिपी चांगलंच वाढलेलं होतं म्हणून ईसीजी बघून बिपीच्या गोळ्या चालू केल्या.... तर पेशंट चा नवरा म्हणतो तिला गोळ्या घ्यायच्या नाहीत!! ईतक्या लवकर बिपीच्या गोळ्या नको म्हणते.......
मी म्हणालो हार्ट ॲटॅक किंवा पॅरलिसीसचा झटका आल्यावर गोळ्या सुरू करण्यापेक्षा आज केलेल्या चांगल्या नाही का ?
तरी पेशंटच्या चेहेऱ्यावर फारसा फरक दिसला नाही म्हणून मी म्हणालो की तुम्ही गोळ्या घ्या किंवा काय करायचं ठरवा मी माझं कर्तव्य पुर्ण करतोय आणि गोळ्या लिहून देतो आहे .

हे प्रसंग नेहमी घडतात कारण कोणीतरी (डाॅक्टर्स सोडून)सांगीतलेलं असतं की ईतक्या गोळ्या घेणं चांगलं नसतं, सवय लागते गोळ्यांची ......

पण सगळ्यात जास्त नुकसान त्या पेशंटचं होतं हे डाॅक्टरला पटवून देणं अवघड जातं म्हणूनच पेशंट प्रशिक्षण कार्यक्रम किंवा वर्कशाॅप घेणं काळाची गरज आहे

नाखु's picture

28 Aug 2018 - 1:24 pm | नाखु

कुठल्याही औषधोपचार यांचे दुष्परिणामच सांगण्याचा (बरेचदा कपोलकल्पित) त्या महिलेच्या जवळच्या नात्यातील जेष्ठ महिला करीत असतात,योग्य उपचार व नियमीत पूरक आहार याने चांगले होते अशी उदाहरणे यांना माहीतच नसतात का ते ज हेतुपुरस्सर लक्षात ठेवत नाहीत हे कळत नाही

एका वेगळ्या विषयावरील लिखाण

Prajakta Yogiraj Nikure's picture

1 Mar 2019 - 4:41 pm | Prajakta Yogira...

मस्त

Prajakta Yogiraj Nikure's picture

1 Mar 2019 - 4:42 pm | Prajakta Yogira...

+१ छान आहे लेख