तो आणि ती........ मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी! (भाग 10)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
25 Jul 2018 - 7:52 pm

तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956

तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957

तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969

तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980

तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995

तो आणि ती...... द्रौपदी!: https://www.misalpav.com/node/43004

तो आणि ती..... सुभद्रा!: https://www.misalpav.com/node/43027

तो आणि ती....... सत्यभामा!: https://www.misalpav.com/node/43043

तो आणि ती... जांबवती!: https://www.misalpav.com/node/43052

तो आणि ती.... मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा, कालिंदी!

(श्रीकृषणाच्या अष्ट पत्नींपैकी मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा, कालिंदी या पंचम पत्नींबद्दल फार माहिती पुराणात मिळत नाही. त्यातही मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा यांच्याशी श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे भविष्यातील महाभारतीय युद्धाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आहेत; असेच प्रतीत होते. त्यामुळे या स्त्रियांच्या मनीचे भाव शब्दात उतरवणे थोडे कठीण होते. मात्र प्रत्यक्ष नारायणाशी विवाह होणे ही घटना देखील या स्त्रियांच्या मनाला आयुष्यभर दडपून टाकणारी असावी; असे मला सतत वाटते. त्याच अनुषंगाने मी त्यांच्या मनाचा विचार करून तो मांडला आहे. श्रीकृष्णाने कालिंदीशी मात्र प्रेम/गांधर्व विवाह केला... तिला पाहताक्षणी त्याच्या मनात प्रेमभाव निर्माण झाले असा उल्लेख आहे. त्यामुळे कालिंदीच्या मनीचे भाव त्या थोडे वेगळे लिहिले आहेत.)

तो आणि ती........ मित्रविंदा!

"श्रीश्वरा, तुमच्या आयुष्याचा य:किंचित का होईना; पण एक भाग झाल्याने माझ्या आयुष्याचे सार्थक झाले. तुमच्या अस्तित्वात मी इतकी हरवून गेले की माझी मी उरलेच नाही."

"मित्रविंदे, तू माझी धर्मपत्नी आहेस. मला माहित आहे की तू माझ्यात हरवून गेली आहेस. परंतु तरीही आपले स्वत्व असे त्यागून देणे योग्य नाही."

"यदुकुलभूषणा, मी तुम्हाला कधीतरी समजू शकेन का? सत्यभामाताई ज्यावेळी त्यांच्या क्षत्राणी तेजाने बोलतात किंवा हट्ट करतात त्या प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना प्रेमळ रुक्मिणीताईंचे उदाहरण देता आणि सांगता की एकरूप होणे हेच पूर्णत्व आहे. मग हे देवेश्वरा, आज मी एकरूपतेबद्दल सास्न्ग्ताच तुम्ही मला हे असे का सांगता आहात?"

"प्रिये, तू देखील एक क्षत्राणी यादव कन्या आहेस. आत्या राजधिदेवी आणि अवंती नरेश जयसेन यांची सुपुत्री आहेस. जरी मी तुला तुझ्या स्वयंवरातून हरण करून आणले असले तरी देखील मी हे मनोमन जाणून आहे की त्यावेळेपासूनच  तुझ्या मनात माझ्याप्रती प्रेमभाव होते. खरे तर त्यावेळी मी नरकासुरावर चाल करून जाण्यासाठी सत्यभामेला घेऊन निघालो होतो. मात्र तुझ्या स्वयंवराच्या बातमीने मन विचलित झाले आणि नकळतच तुझ्याकडे ओढले गेले.... मित्रे.... प्रिये.... तुला तुझ्या क्षात्र तेजाची जाणीव आहे परंतु त्याचा गर्व नाही; हे एक कारण आहे की मी तुझ्यामध्ये गुंतलो गेलो. मात्र हे क्षत्राणी तेज हा तुझा मान आहे; त्या आंतरतेजाला विसरू नकोस. तू म्हणतेस ते खरेच; मी सत्यभामेला जरूर म्हणतो की एकरूप होणे हेच पूर्णत्व आहे. मात्र त्यावेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की  सर्वस्वाने विलीन होण्यापेक्षा सर्वार्थाने विलीन होणे महत्वाचे." 

"मी समजले नाही.........."

"मित्रविदे, प्रिये............. प्रेम आणि भक्ति यांचे जेव्हा मिलन होते आणि स्वत्वावर विश्वास असूनही त्याचा मोह उरत नाही त्याला सर्वार्थाने विलीन होणे म्हणतात.............. तू क्षत्राणी तेजाचा अभिमान न करता त्याचा मान राखूनही माझ्या आयुष्याला आपलेसे केले आहेस; हे निस्सीम प्रेमाचे प्रतिक आहे आणि ते तसेच मी मनापासून स्वीकारले आहे. त्यामुळे तू आहेस तशीच राहा! केवळ मी सत्यभामेला एकरूपतेबद्दल काही सांगितले म्हणून तू तुझ्या भावनांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रत्येकाने आपल्या स्वभावारूप राहावे; हेच अंतिम सत्य आहे. प्रिये, तू जशी आहेस तशीच मला प्रिय आहेस! येतो मी!"

----------------------------------------

तो आणि ती........ सत्या!

"द्वारकाधीशा, तुमच्या पत्नीपदाचे स्थान प्राप्त करून मी समाधानी आहे. मला राज्ञीपद नसले तरी चालेल. श्रीश्वरा, जन्मापासूनच मी आपल्या दिंगत कीर्तीवर मोहित झाले होते. ज्यावेळी माझ्या पिताश्रींनी माझे स्वयंवर मांडले त्याचवेळी माझ्या मनात आले की केवळ तुम्हीच मला जिंकावेत म्हणून सात वृशभांना वेसण घालून वृशभरथाला जोडण्याचा पण माझ्या पिताश्रींनी ठेवला आहे. मात्र स्वयंवराचे आमंत्रण करताना आपला अपमान केला गेला हे कानावर आल्यावरआपण या आमंत्रणाचा स्वीकार कराल की नाही याविषयी माझे मन शाशंक झाले होते. मात्र आपण केवळ आमंत्रणाचा स्वीकार केलात असे नाही तर; लाहानपणीच्या गोकुळातल्या आठवणी जागवत त्या वृशभांना काबूत आणून रथनिडाला जुंपलेत आणि मी सर्व कोसलनगरवासीयांच्या समोर कायमची आपली झाले. तरीही का कोण जाणे माझ्या मनात राहून राहून एकच विचार येतो की माझे अस्तित्व तुम्हाला जाणवत असेल का?"

"सत्या, आपण आता द्वारकेच्या राज्ञी आहात. माझ्या प्रिय पत्नी आहात. कायम थंड असणाऱ्या हिमवानाच्या पायथ्याच्या कोसल राज्याच्या कन्या असूनही आपण सागरकिनारी वसलेल्या या द्वारकेला आपलसं केलत... यातच आपल्या मनातील भाव माझ्यापर्यंत पोहोचले आहेत; हे वेगळे सांगायला हवे का? एकात्मता ही केवळ शब्दात व्यक्त होत नसते प्रिये........ आपल्या त्यागातून देखील ती आपल्या भावमूर्तिकडे पोहोचत असते. तुझ्या कौसल देशातील हिमाच्छादित थंड प्रदेश तू केवळ माझ्या प्रेमाखातर सोडलास आणि तुझ्या निरामय अस्तित्वाचा भाग मी माझ्यात सामावून घेतला."

"मोहेश्वरा! याहून जास्त मोठी पोचपावती ती काय असू शकते? माझ्या आयुष्याची सांगता आता केवळ आपल्या चरणीच असू दे इतकीतच या श्रीचरणी इच्छा!"

"शुभमsभवतु!"

-------------------------------------------

तो आणि ती............... लक्ष्मणा आणि भद्रा!

"लक्ष्मणे... प्रिये.... तुझ्या स्वयंवराचा पण द्रौपदी स्वयंवराप्रमाणे मत्स्य नेत्र भेदाचा ठेवण्याचा मानस तुझ्या पूज्य पिताश्रींनी.... मद्र नरेश बृत्सेन महाराजांनी... का ठेवला हे एक कोडंच आहे. जलातील प्रतिबिंबाचा वेध घेऊन छतातील मत्स्याचा नेत्रभेद! तोवर संपूर्ण भारतवर्षाला हे समजले होते की हा पण केवळ धनुर्धर अर्जुन पूर्ण करू शकतो. कारण नुकतेच द्रौपदी स्वयंवरात हा पण जिंकून अर्जुनाने हे सिद्ध केलेच होते. तरीही हा पण ठेवून तुझ्या वडिलांनी सर्व योद्ध्यांना स्वयंवरासाठी आमंत्रित केले... त्यात द्वारकेला देखील आमंत्रण पोहोचले. या आमंत्रणाचा मान राखून मी या स्वयंवरामध्ये उतरलो आणि तो पण जिंकलो देखील. राज्ञी, मात्र या स्वयंवरातील पण जिंकण्याचा उद्देश...."

"महाराज, काही गोष्टी न सांगता देखील स्त्रीमनाला जाणवतात. तुम्ही न सांगता देखील मला तुमच्या मनीचा उद्देश माहित आहे. आपल्या कृष्णनितीचा अचूक फासा आपण हा पण जिंकून टाकलात. पांचाल देशाप्रमाणे मद्र देशीच्या लढाऊ योध्यांचा विचार करूनच आपण हा पण जिंकलात ना?"

"....................... लक्ष्मणे........... असे क्षण माझ्या आयुष्यात क्वचित आले आहेत की ज्यावेळी मी शब्दातित होऊन जातो. प्रिये, तू म्हणते आहेस ते जरी सत्य असले तरी माझ्या मनातील तुझ्याबद्दलचे प्रिती भाव अगदीच खरे आहेत; हे तू जाणून आहेस ना?"

"देवेश्वरा, केवळ मीच नाही तर माझ्यानंतर माझ्याच पावलांवर पाउल ठेऊन द्वारका नगरीमध्ये आपली सप्तम पत्नी म्हणून आलेली भद्रा देखील हे जाणून आहे. केकेय राज धृष्टकेतु आणि आपली आत्या श्रुताकीर्ती देवी यांच्या कन्येशी.... भद्रेशी... आपण विवाह केलात तो केवळ आपल्या आत्येची इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून भविष्यात जर युद्ध स्थितीला सामोरे जावे लागले तर त्यावेळी मद्र योध्यांप्रमाणे पंचनादातील योद्धा बळ देखील आपल्या पाठीशी उभे राहावे हा उद्देश देखील होताच."

"प्रिये...... तू आणि भद्रा दोघीही मला तितक्याच प्रिय आहात........."

"परमेश्वरा, आम्हाला आपल्या पत्नीपदाचे स्थान मिळाले........ त्याला कारण काहीही असुदे! आमचे अस्तित्व कदाचित पुढील आयुष्यात फार चर्चिले जाणार नाही. मात्र त्याची चिंता आम्ही का करावी? लाभलेला स्वर्गतुल्य मान शिरोधार्य मानून आम्ही मानाने आणि स्वतंत्र मनाने रुक्मिणीताईंच्या प्रेमछायेत सुखात नांदतो आहोत.... हे देवकीनंदना.......... मी आपल्याला आश्वस्त करते की याहून जास्त मला किंवा आपल्या सप्तम पत्नीला भद्रेला काहीच नको!"

-------------------------------------

तो आणि ती........... कालिंदी!

"मनमोहना........... आपल्यापर्यंत माझी तापसी हाक पोहोचेल याची अलीकडे मी आशाच सोडली होती."

"कालिंदी........ तुझ्यासारखी केतकी कांतीची, सुडौल रुपसुंदरी अशाप्रकारचे तापस व्रत करू शकते हे पाहून मला पार्वतीने त्या भोळ्या शंभोसाठी केलेल्या तपश्चर्येची आठवण झाली. आज यामुनाजलातील तुझ्या ओलेत्या मोहक मात्र तापसी तेजाने झळाळून गेलेल्या चर्येला पाहून मी देहभान हरपून गेलो आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू माझी वाट पाहाते आहेस........ मात्र तुला पाहातच माझ्या मनाने मला ग्वाही दिली आहे की आज जर तू माझा स्वीकार तुझा पती म्हणून केलास तर प्रेमतपस्येचे सार्थ महत्व सिध्द होईल."

"प्रभू.............. माझ्याशी गांधर्व विवाह करून माझ्या आयुष्याला अर्थप्राप्ती करून द्यावीत ही विनंती."

-----------------------------------

प्रकटन

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

26 Jul 2018 - 10:19 am | प्राची अश्विनी

सर्वस्व आणि सर्वार्थ ... आवडलं.

श्वेता२४'s picture

26 Jul 2018 - 12:19 pm | श्वेता२४

पण हा भाग विशेष आवडला
प्रेम आणि भक्ति यांचे जेव्हा मिलन होते आणि स्वत्वावर विश्वास असूनही त्याचा मोह उरत नाही त्याला सर्वार्थाने विलीन होणे म्हणतात..............
मस्तच

एकूण थीम चांगली आहे परिचय देण्याची. पण सर्व पत्नींचा असा लीनदीन आणि शून्य स्वत्व असलेला भाव का असावा प्रत्येक वाक्यात मांडलेला?

ज्योति अळवणी's picture

26 Jul 2018 - 2:41 pm | ज्योति अळवणी

गवि जी,
रुक्मिणीशी श्रीकृष्णाचा विवाह झाला तोपर्यंत श्रीकृष्णांनी द्वारका वसवली होती. परंतु तरीही श्रीकृष्णाची प्रतिमा ही गोकुळातला गोप, एक योद्धा आणि द्वारका वसविणारा इतकीच होती. मात्र मिटरविंदेच्या सोबतच्या विवाहापर्यंत त्याची ओळख त्या काळातील लोकोत्तर पुरुष... द्रष्टा... राजनितीमध्ये निपुण अशी झाली होती. त्याने त्याकाळात घेतलेले निर्णय आज आपण भगवंतांचे निर्णय म्हणत असलो तरी त्याकाळात त्याकडे कृष्णनिति म्हणून बघितले गेले. परंतु यासर्वांमुळे श्रीकृष्णाची कीर्ती संपूर्ण आर्यवर्तामध्ये पसरली होती. त्यामुळे त्याच्याशी विवाह होणे म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा लाभ.... असे जर स्त्रीला वाटले तर त्यात फार काही चुकीचे असावे असे मला वाटत नाही. त्यातूनही..... हे माझे विचार आहेत. दुसरं परसेप्शन असू शकतेच.