मुक्कामी यष्टी अन संगीचा दृष्टांत

Primary tabs

जेम्स वांड's picture
जेम्स वांड in जनातलं, मनातलं
17 May 2018 - 1:41 pm

"आता ग बया, आता आन काय डायवरच्या शीट वर बसू व्हय ग भवाने"

"तुजी आय"

"तुजा बा"

"सुक्काळीच्या"

"ये आये माला येक केळ द्ये के (सुर्रर्रर्रर्र)"

"कर्रर्रर्रर्रर्रर्रकच्च्च"

"आज लका कामानं लै येरबाडल्यागत झालंया"

"पॉ पॉ पॉ"

रोजच्यापरमाने कराड - कुंडल (मुक्कामी) शेवटली यष्टी आपल्या रंगात आलती. रामपाऱ्यात येरवाळीच कामावर गेल्याली, कामाला गेल्याली , कचेरीत डोसक्याचा भुगा करून घेतल्याली, दिसभर उन्हातान्हात रापुन चिरडीला आल्याली माणसे आंबलेल्या अंगानं खच्चून भरलेल्या यष्टीत उलथली हुती. आधीच तिरसट असल्याली समदी टाळकी अजूनच वाकडी झालती.

तसं पाहता ह्या शेवटल्या धाच्या यष्टीत रोजची पाशींजरे ठरल्यालीच असत. कारव्यासनं माळवं इकाया पंताच्या कोटात आल्याली गोदाक्का म्हातारी, हायवे वरच्या कृष्णा हॉस्पिटल मधला कारकून शेणोली स्टेशनचा रहिवाशी व्हनमाने, मामलेदार कचेरीतला साहेबांचा पट्टवाला आन सा ला हापीस आटोपल्यावर बी शेवटल्या यष्टीचा टेम होईस्तूवर देशी हाणत बसल्याला ताकारीचा किसन कुदाले, ही काही नमुनेदार रोजची पाशींजरे. शेवटली यष्टी म्हंजी हिच्यात चडणारी माणसं दान्याव आल्याल्या कोंबडीवानी कलकलाट करीत कराड स्टँड वर योट करीत. एकदा का यष्टी सुटली का मात्र उकिरड्याव बसल्याल्या खुडूक कोंबडीवानी सगळी गप पडत, वारं खात, तंबाकू पाने देवाणघेवाण करीत, मदीच शिवीगाळ करीत, अन हळूहळू येक येक नमुना आपापल्या वाडीवस्तीला उतरून आपापलं घर जवळ करी.

आजची रात बी काय येगळी नवती. सवा धा ला कराडास्न स्टँडवरून सुटल्याली यष्टी तासगाव रोडला लागून कृष्णेच्या पुलापाशी आल्याव, जोंधळ्याच्या ठिक्यावानी दिसनारा शिंदे मास्तर उगा परत एकदा उटला, अन यष्टीच्या मिणमिणत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात नजर घोळवत पाहू लागला. एरवी त्यो आपल्या 'वाहकाचे आसन' असल्याल्या शीटवर म्हैशीचा पऊ पसरल्यावानी सूशेगाद बशी, आता मात्र त्यो एकदा कोकलला,

"तिकीट हाय का कुनी उरल्यालं?, बोला तिकीट" .

तशी यष्टीच्या फुडं पाक डायवर निकमच्या मागं जाळीला चिकटून बसल्यालं पाशींजर आरडलं,

"मास्तरssss येक शेणोली द्या के"

शिंदे मास्तर चरफडत उठलं आन आता त्याच्या शीट पासून ते डायवर मागच्या जाळीपत्तर पोचाय कसं ह्यो इचार करत परत बसलं. त्येच्या त्या बोदल्या अंगाला सावरत त्येला वाटतली माणसं, झोपल्याली बारकी प्वारं पसरल्याली ठिकी बारदानं, अन त्यांच्यातूनच बसल्याल्या तोंडाळ कजाग म्हाताऱ्या वलांडून जाळीपासल्या पाशींजर जवळ जायाचा कट्टाळा आल्ता, शिंदे वराडला

"खाली उतरताना तिकीट घी रं आटवनीनं"

"ब्वार" म्हणून पोचपावती आल्याव शिंदे परत पोतं झालं.

जाळी म्होरं गाडी दामटनारा डायवर निकम बी नमुनाच. साडे सहा फूट उच्चा सडेशिटलीच्या लंबाळा निकम बस कशी आवरतु ह्ये एक हुमन पुऱ्या सातार जिल्ह्याला पडल्यालं असावं. यष्टी बी नमुनेदार, लांब पल्याच्या यष्ट्या कश्या साजूक नाजूक सुरेखा पुणेकरणी वानी असत, ही यष्टी मात्र रिटायर होऊन बी ४० सालं उलटल्याल्या पुणेकरणीवानी हुती. तिचे लाईट सुरू कराय बटनावर गुच्ची चढवाय लागत असे, इलेक्ट्रिक हॉर्न बंद झाल्यामुळं निकमाने त्याच्या एका मुसलमान ऑटोरिक्षा डायवर मित्राकडून एक पॉ पॉ करनारा पोंगा पैदा केलता. ह्यो पोंगा म्हंजी 'शेवटली जनता गाडी आल्याची' वर्दी असे. शिवाय गाडीतला मूळ हॉर्न सोडून पूर्ण गाडीच थरथरून शिस्तात वाजवा रं वाजवा करीत असे.

"मास्तराला डायवर शीट वर उलथवून निकमाला मास्तर करने" हा ह्या मजेदार यष्टीच्या समद्या समश्येचा येकच तोडगा असल्याचा इनोद रोजची पाशींजरे गेली धा वर्स करीत हुती, पर तरी बी गाडी पळतच हुती.

कारव्यासनं फुडं शेणोली स्टेशन, शेणोली, मच्छिन्द्रगड पायथा , येडे मच्छिन्द्र फाटा करीत यष्टी ताकारीला पोचली अन कुदाले भेलकांडत खाली उतरला तशी निम्मी बस मोकळी झाली. टनटन करत शिंदेनं डबल बेल मारली तशी निकमानं जीव खाऊन पहिला गियर हानला अन आता मरती का मग अशी ती यष्टी फुडं निगाली. आता कुंडलपात्तर मदी बारक्या बारक्या वाड्या वस्त्या वर उतरणारी छाटछूट पाशींजरे सोडून उरल्याली गाडी थेट कुंडललाच रीती हुनार हुती. गाडीच्या तब्येतीला मानवाल अश्या बेताबेतानं तिला हाकत निकमानं एकदाची गाडी कुंडल फाट्याव डावीकडं आत घातली. मधल्या वढ्याच्या गारेगार पानदीतून उन्हाळ्याला श्या घालत त्यानं कशीबशी गाडी कुंडल स्टँड वर आणून उभी केली अन ब्रेक मदली हवा सोडून, बत्तीस शिराळ्याच्या नागोबावानी हीस्ससsssssss आवाज करीत ती बया शिस्तात उभारली. चढाय कालवा करणारी माणसे पेंगुळल्यामुळं असल कदाचित पण गप गुमान उतरली. धा पाच मिनिटात यष्टी स्टँड म्हणावं का मसण इकती तिथं शांतता पसरली. अंधारानं पुन्यानदा स्टँड गिळून टाकलं तवा अकरा वाजून गेलते.

यष्टी स्टँड वर मिणमिणत्या उजेडात कोपऱ्यातल्या खुलीत कुलकर्णी पेंगुन आकडी आल्यागत खुर्चीतच वेडावाकडा पसरला हुता. शिंदे यष्टीतून उतरता उतरता परत थांबला अन मागच्या शीट वरची येक अन डायवरच्या डाव्या बाजूला घंटीच्या वाटीजवळची येक अश्या गाठी सोडवून त्यानं बेल मारायची दोरी 'गाबडी तिच्यायला दोऱ्या बी सोडनात आजकाल चोरट्या भोकाची' असे स्वगत म्हणत गुंडाळून बरुबर घ्यातली.

"उठय ये कुलकरण्या" अशी हाळी तोवर निकमानं घातली , डोळं चोळत कुलकर्णी बाहेर आला अन शिंदे मास्तराला पाहून म्हनला

"काय मास्तर लै थकलाय जनू?"

"अन मग लका, दिसभर ही भवानी हाकाय लागती की, आता झोपाय बाबा लवकर"

शिंदे निकम जोडगोळी शिदुरी उगडून बसनार तेवढ्यात कुलकर्णी लगबगीनं आला

"दमा दमा जरा ल्याकांनु" म्हणत त्यानं बाकड्याव भजी पुडा ठिवला, तीन ग्लास पैदा केले, बारदान गुंडाळून पाणी गार केल्याली येक बाटली मदी ठिवली, पिशवीतून मध्यम आकाराची जुनी कॅन काडली.

"सागरेश्वरच्या पाहुण्यानं पाटवल्या, शिंदोळीची हाय, पहिल्या धारंची" म्हणत येक डोळा बारीक करीत कॅन बाकड्याव आदळली. इतक्यात अर्धं नागडं चिंध्या गुंडाळलेलं कुंडल स्टँडवर फिरणारं एक खुळ त्यांच्याकडे पाहत तिथवर पोचलं. एका हातानं ढिली प्यांट सावरत वरती सडा उघडाबंब असणाऱ्या त्या खुळ्यानं तिघांकडे पाहून 'यें यें यें' करत याचना क्याली. एरवी एखादं बेनं त्या खुळ्याला इकत्या रातीचं अंधारात पाहूनच गाभडलं असतं पर ह्या तिघांना त्येची सवय हुती, ते वेडझवं सदानकदा स्टँडवरच पडीक असल्यामुळं त्यांना काय वाटलं नाय.

"च्यायला आलं का आता ह्या खुळ्याचं धसकट मदीच" म्हणत निकम कुरकुरला पण त्या खुळ्याच्या बिन अंगुळीच्या आंगाची दुर्गंधी नकोशी होऊन, कुलकरण्याने एका प्लास्टिकच्या पिशवीत उगा थेंबभर दारू घिऊन त्यात मोप पाणी वतून गाठ बांधली अन त्ये मैंदाळ दुरूनच खुळ्याच्या अंगाव भिरकावुन गुरगुरला,

"पी अन गप पड भडव्या तुज्या उकिरड्यावर"

यें यें यें करीत वाढल्याल्या दाढीमिश्यांच्या जंजाळातून आनंद व्यक्त करत त्ये येडं पिशवी उचलून पळालं त्ये थेट उकिरड्याव जाऊनच थांबलं.

मग मात्र बाकड्याव एकदम जनू चैतन्य उसळलं. तिघांनी मिळून प्रत्येकी ३-३ टाक शिंदीची दारू लावत कदी भजी उडीवली अन कदी भाकरी खाल्ली पत्त्या बी लागला नाय. झोकांड्या खात कॅनला बुच लावत कुलकर्णी बोललं, 'चला मंडळी शेड मदी वैच लवंडूया'

तवा आधीच तलखीनं बेजार झाल्याल्या दुक्कलीनं त्याला नकार दिला अन झोकांडत यष्टीकड गेले, मास्तरांच्या शीट वरती जाळीव ठिवल्यालं अंथरून पांघरुणाचं गाठूडं उचलून दोघं यष्टी मागं आली अन भेलकांडत तडफडत एकदाची शिडीला झोम्बुन यष्टी वरल्या हौदात चढली. वढ्यावरून येणाऱ्या गारव्यात निजायचं म्हणत त्यांनी येक येक तंबाखूचा बार लावला पंधरा मिनिटांनी गरगराय लागलं तसं तंबाखू थुकून वरूनच खाली भुईवर गुळण्या शिपडल्या अन वरच्या सामान ठिवायच्या हौदात दोघं दोनच मिनिटात पार साखरझोपेत घसरले.

कडक दारू पिऊन नरडं पार कोरडं झाल्यामुळं रात्री एकदा कुलकर्णी एकटंच उटलं पर बारदानातल्या बाटलीचं वैच पाणी पिऊन परत भिरभिर करत लवंडलं, तवा यष्टी समोरच मेल्यागत उभारली हुती अन हौदाच्या रेलिंग वरून बाहेर आल्याला शिंदे मास्तराचा एकच पाय त्याच्या झोपेची परिस्थिती सांगत हुता.

इकडं, निकम डायवर अन शिंदे मास्तर आपापल्या सपानात मस्त हुते. निकम विनावाहक विना थांबा कोल्हापूर स्वारगेट आशियाड बसचा कुर्रेबाज डायवर झालता. अहाहा काय तेज्यायला गुळगुळीत रस्तं, झालंच तर पाशींजरनी. निकम गालातल्या गालात गुलुगुलु हसत हुतं. इकडं डाराडूर झोपल्याला शिंदे मास्तर पण असाच कुटंतर गटाळ्या घालीत हुता. सपानच त्ये, त्येला कसलं बंधन, ह्या सोंडग्याच्या सपानात तर पाक हेमा मालिनी अलती, त्येला बेस्ट यष्टी मास्तर बक्षीस देयाला. शिंदे मास्तर बक्षीस घेऊन झोकात घरी आलते, कदी नाय ते बायकूनं भाकरीचा तुकडा वोवाळून उंबऱ्याच्या कडंला फ्याकला, मग शिंदे (आपल्याच) बायकूच्या मांडीत डोस्कं ठिऊन झोपला. बायकू पदरानं वारं घालत हुती, अहाहा काय गारेगार वारं वाटत हुतं तिच्यायला. मात्र शिंदे मास्तरांना फुडं सुख जरा बोचू लागलं, वारं गार लागाय हवं त्ये काकडा भराय लागला , शिंदे मास्तर बायकुला लाडीकपणे म्हनले

"चंदे जरा हळू की गं, इकतं गार वारं कंडक्टराला नसतं पचत, मरीन की म्या"

पर शिंदेबाई कसल्या ऐकतायत व्हय, तिचं आपलं सुरूच, शेवटी वारं असह्य होऊन शिंदे मास्तर चिडलं अन

"आवर के टवळे!"

असं जोरात वराडलं तशी सपानात आल्याली त्यांचं समदं ऐकणारी बायकू गडपच झाली. इकतं समदं झाल्याव काय मग, शिंदे मास्तराची झोप लगीच उडाली. अन त्यानंतर तेच्या जे ध्यानात आलं त्यानं त्योच उडता उडता राह्यला. शिंदे मास्तराला हिव सपानात नाय खरंखुरं खुद्दच भरलं हुतं, हौदात पडल्या पडल्या मास्तर इचार करू लागला, तेच्यायला वादळ सुटलं का काय, शेड मदीच झोपलो असतो तर बरं. इतकं म्हणूस्तोवर त्याला गप्पकन एक झटका खुब्याच्या हाडाला बसला तवा त्यो अजूनच सर्द झाला, कारन आता त्याचे डोळे उघडे हुते आन त्यांच्यासमोरून झाडाचं शेंडं सरसर पळत होतं, शिंदे मास्तर लैच गोंधळला हुता, यायला ह्ये खुळ्या बोड्याचं निकम मला हौदात निजवून कश्यापाय यष्टी पळवल राव? असा विचार करता करता शिंदे मास्तर कुशीवर वळलं तसं त्याची दारू खाडकन उतरली, कारन त्याच्या शेजारी लांबड्या सापानं येटोळं करावं तसा निजला हुता साक्षात निकम!. आता मातूर शिंदे मास्तर घाबरला, त्यानं हाताच्या घड्याळात पाह्यलं तर पहाटचे पाच वाजले हुते. पारच येरबाडल्यावानी घाबराघूबरा झाल्याला शिंदे मास्तर लगीच भेलकांडत निकमकडं सरकला, त्याला गदागदा हलवून म्हणाला

"आरं ये उठ पटकन, भाड्या तू हिथं उलथलाईस तर ही यष्टी कोण हाकतोय?"

ऍ ऊ ऑ करत निकम जड झालेलं डोकं सावरत उठला अन शिंदेनं पाह्यलेलं समदं ह्याची देही ह्याची डोळा समक्ष पाहून त्याची दातखीळच बसली,

"आ आ आ आ आरं शिं शिं शिं शिंदे हे रे काय आणि भुताटकी?"

गाडी रिकामीच हुती, आन मजेत इंजिन अन सगळी पार्ट मोकळी करीत धावत हुती, काय सुधरनां तवा शिंदे निकमानं उलट्या हाताची बोंब ठोकून कालवा सुरू केला, पर इकत्या रामपारी लोटे घिऊन हागाय जाणारी तुरळक माणसे किंवा अजून बी झोपेत असल्याली कशीबशी मशेरी भाजत बसल्याली म्हातारी माणसे इकतीच काय ती सडकेवर दिसत हुती. बरं यष्टी इकती जोरकस पळत हुती का मारलेली बोंब रस्त्यावर कोणाच्या कानात पडस्तोवर गाडी तडक म्होरं असायची, शेवटी पाच मिनिटे सतत बोंबलून जवा दोघांची बी नरडी सुजून वाईट दुखाय लागली तवा मातूर त्यांनी त्वांड बंद अन डोस्कं चालवणं सुरू केलं.

हौदात उटून बसल्याल्या शिंदे मास्तराला मागच्या कैक वर्षांच्या अनुभवानं आपण कुंडलकडून ताकारीकडं निगालोय इकतं कळलं. त्यानं धडपडत्या निकमाला हात देऊन कसंबसं हौदात बसवलं तवा निकम गळ्यातला रुद्राक्ष उजव्या हातात चेंदून 'ज्योतिबाराया वाचीव' करत हुतं. जोरकस वाहत्या वाऱ्यानं डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्यालं शिंदे हौदाच्या फुडल्या भागात घसटत ग्येलं अन फुडं पाहायला लागलं, तसं त्येला ताकारी रेल्वे फाटक दिसलं, सुसरीच्या उघड्या जबड्यावानी उघडं फाटक पाहून त्यो अजूनच चिडचिडला खरा पन लगीच सावरून चक्क मांडी घालून बसला हौदात फुडं, तसाच रेलिंगला धरून त्यो वराडला

"निकम तू पळ मागच्या टोकाव, आता ताकारी यील, रस्ता बाजारातूनच जातूय, बाजार दिसला का मी इकडून बोंबाबोंब करीन, यष्टी फुडं सरकली का मागून तू बोंबल, तिच्या बायली कोनाला तरी गाटाय हवंच नायतर हे काय सुरू हाय त्ये तुज्या माझ्या सरणाव जाऊनच थांबल"

शिंदे मास्तरानं धीर दिला तशी निकम सावरून परत सरपटत हौदाच्या मागल्या बाजूला गेलं अन रेलिंग घट धरून ढुगान आवळून बसलं. ताकारी उपसा प्रकल्पाची भलीमोठी पायपं उजव्या अंगाला टाकून गाडी जवा गावकुसाला लागली तवा ही जोडगोळी तारस्वरात कोकलाय लागली

"ये आरं कोन तरी बगा, बस कोन पळीवतोय, आरं आवर घाला पटकन"

गाव अन बसथांबा जवळ आला तसं काय बोंबलायचं ह्ये भानच इसरून दोघं फक्त जोर जोरात 'ह्यो ह्यो ह्यो ह्यो ह्याक ह्याक ह्याक' करत म्हस हुलल्यावानी आरडायला लागली. शिंदे मास्तराची ही शक्कल कामी आली गाडी बुंग करीत जवा ताकारी स्टँड वरून पुढं पळाली तशी ताकारी स्टँड वर नुकतंच आंचवून चा चा कप हाती घेतल्याल्या मुक्कामी यष्टीचे डायवर गावडे अन म्हैसकर ताडकन उटून उभारले. काय हुतंय हे कळस्तोवर बस फुडं गेलती अन हौदात मागं प्राणपणानं वरडणारा निकम तितका त्यांना दिसला. एकदम काय बोलावे ते कळेना झाल्याव ती दोघं बी ठणाणा बोंबलत यष्टी मागं धावली, यष्टीची ही वरात पाहून रामपारी इस्लामपूरला दूध संघात कॅन टाकून आलेला सदा पोळ बी त्याच्या छोट्या हत्ती मदनं उतरून डोळे शिपुरी इतकाले करून पाहू लागला. बस परत झूमकन गुल, त्वांड फाडून उभा असल्याल्या सदा सावरस्तोवर मागून गावडे, म्हैसकर, त्यांच्या कालव्यानं येरबाडलेला अंडी ब्रेड इकणारा जब्बार मुलाणी , सकाळ सकाळ पायी चालाय निगाल्याला गणा कोतकर अशी अजून चार पाच मंडळी आली अन सदाच्या भवती कालवा माजला, ताकारीतुन भैर पडल्याव दून फाटे फुटत्याती एक उजवीकडला थेट कराड, ह्यो म्हंजी आपल्या यष्टीचा रोजचा रोड आन दुसरा डावीकडं काटकोनात त्यो थेट इस्लामपूरकडं. गाडी इस्लामपूरकडं वळता वळता अंमळ स्लो झाली तशी गावडे म्हैसकरनं हौदाच्या मागून बोंबलत असल्याला रडकुंडीला आल्याला निकम झटक्यात वळखला अन क्षणभर सर्दच झाले. ताबडतोब सदानं गाडी वळीवली अन गावडे म्हैसकर त्यात चडून बसली, जब्या अजून काय करावं न ठरल्यामुळं येड्यागत आ वासलेलं उभंच हुतं.

"काढे गाडी मुलाण्या " म्हणून जवा कोतकर वराडला तवा जब्यानं त्याच्या मागं बांधलेल्या अंडी ब्रेडच्या क्रेट सहित त्याची डिस्कवर वळीवली. ती चौघं गाडी मागं पळाली तसं कोतकरला भान आलं, अन त्यानं ब्याम्बीच्या देटापासून कोकलाय सुरवात क्येली, तवा पाचच मिनिटात अजून 3 गाड्या इस्लामपूरकडं सुटल्या मग मात्र शुद्ध आलेला कोतकर चौकीकडं बुडाला पाय लावून धावत सुटला.

रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं इस्लामपूरकडून ताकारीचा सब इन्स्पेक्टर शेळके आपल्या तीन हवालदारांसोबत बुलेरोतुन ताकारीकडं येत हुते, तितक्यात बुंग पळणारी रिकामी यष्टी अन तिचं घाबरल्यालं दोन पाशींजर त्यांना दिसलं, इकडं पोलिसांची गाडी पाहून हौदातली दोघं अजूनच जोरात केकाटायला लागली, गाडी कडंला घिऊन काय झालं ह्यावर शेळके इचार करीत असतानाच मागून आल्याला छोटा हत्ती अन डिस्कवर धापा टाकीत आल्या अन गाडी स्लो करूनच

"सायेब कोणतरी यष्टीच पळवल्या" म्हणत धावता आढावा देऊन पसार झाल्या, तशी शेळकेंनी गाडी परत वळीवली अन 'काय बी झालं तरी यष्टी धरायचीच' म्हणत डायवरला गाडी पिदवाया सांगितली. फुडं सिनेस्टाईल पाठलाग सुरूच व्हता. छोटा हत्ती यष्टीओव्हरटेक कराय आलता तितक्यात समोरून येणारा दुदाचा ट्रक पाहून सदानं गाडी परत डावीकडं यष्टी मागं घातली, पण डिस्कवरवर जब्या पाकच पेटलं हुतं, या खुदा म्हणत त्यानं गाडीचा उजवा कान पिरगाळला तशी ती अंडी ब्रेड अन मालक सावरत वरकड जोरात पळाया लागली, म्हणता म्हणता जब्या यष्टीच्या डायवर जवळ पोचला अन साट सत्तरच्या स्पीडनंच गाडीवरील माला संगट तीनताड उडाला, त्याच्या अंगाला थरथर सुटली. कारण मदीच रातीचा उरल्याला कॅन तोंडाला लावत निवांत येक येक घोट शिंदीची दारू कोरीच पित गाडी हाकत हुता कुंडल स्टँडवरला खुळा!!.

"आरं दम खा भडव्या, गाडी कडंला घी" करत आरडणाऱ्या जब्याला पाहून दाढी मिश्यातून मिठ्ठास हसत खुळ्यानं 'यें यें' करीत हात हलविला अन बस फुडं रेटली तसे पार गळपटल्याला जब्या गाडी हळू करून रस्त्याकडंला थांबला अन डोसक्यावरच हात मारून घेतला.

सदानं गाडी बाजूला घिऊन त्याला इचारलं तसं त्यो ततपप करीत फक्त 'कुंडल डायवर खुळा कॅन त्यो पितोय' इतकं बोलला, त्याला तिथच उभं करून सोबतीला म्हैसकराला सोडून सदा अन गावडे फिरून यष्टी मागं सुटलं. मागून आलेल्या शेळके अन पार्टीला मात्र जब्यानं थोडक्यात गोडवा मदी पूर्ण मॅटर सांगितलं तसं येड लागल्यागत शेळके पार्टी फुडं पळाली, मागून आल्याला त्याच्याच ताकारी पोलीस स्टेशन पार्टीला बी म्हैसकरनं तीच टेप वाजीवली तशी ती बी पार्टी सुसाट सुटली,

"कुंडल स्टँड परिसरात वावरनारा येक खुळा अख्खी यष्टीच घिऊन सुटलाय, वरच्या हौदात वाहक अन चालक अडकलेत" ही फ्लॅश तडक सातारा अन सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक वायरलेस वर झळकली. जवळपास पाच किलोमीटर असली पळापळ झाल्याव शेळकेच्या बुलेरोनं कशीबशी बस गाठली अन फुल सायरन सुरू करून ओव्हरटेक केली, वाजनारे पोलिसांचे पोंगे, लैटं वगैरे पाहून डायवर झाल्याला खुळा बी सटपटला अन एकदाची त्यानं यष्टी शिस्तीत कडंला घिऊन उभी केली, तडक सगळी हवालदार मंडळी अन सब इन्स्पेक्टर शेळके उड्या मारून गाडीजवळ आली, अन शेळके तिरिमिरीत वरडलं,

"खाली उत्तर माकडीच्या, तुझ्या आयचा तुझ्या रांडच्या"

उत्तरादाखल खुळ्यानं निवांत कॅन मदी उरल्याली शेवटली अर्धा येक घोट शिंदी ढोसली अन मजेत डायवरच्या खिडकीतून मुंडकं काडून दाढी मिश्यातून हसत इंस्पेक्टरला म्हनला

'येंsssssss'

तडक येका हवालदारनं वर चडून दार उगडलं अन खुळ्याला थेट खाली खेचून जिमीनच दावली, पाच दहा मिनिटं त्याला यथेच्छ कुदलल्यावर शेळके जरा गार झाला तंवर मागून आल्याल्या ताकारीच्या पोलीस पार्टीनं परत खुळ्याचा खुळखुळा करून टाकला. परत येकदा वायरलेस दुमदुमला त्यो ताकारी पोलीस अन सब इन्स्पेक्टरच्या शेळकेच्या शौर्यगाथेनंच. पोलीस डायवरला यष्टीत बसवून, खुळा-शिंदे-निकम बुलेरोत घालून वरात परत आली ती ताकारी पोलीस स्टेशनला. तिकडून सांगली सातारहुन एसपी अन होमसाहेब फोन वर फोन करून आता शेळकेचे कान खाया लागली. पोलीस स्टेशन मदी खुर्चीत बसल्यालं शेळके, जिमीनीवर बसल्याला खुळा अन चार लोकांनी सावरून पाणी पाजूनही अंगाला कापरं भरल्याली शिंदे निकमाची जोडी, बाकड्याव बसली होती. जब्या, व इतर बगे बाहेर कोंडाळे करून उभारले हुते.

"काय रे भोसडीच्या, यष्टी काय बापाचा माल वाटला व्हय रं भाड्या?"

"यें यें" परत कुदलणे सुरू. असं किमान अर्धा तास चाललं. शेळके त्याला बडवी, त्यो यें यें करी, हसत सुटे, मग शेळके एसपीला फोन वर 'सर ह्ये काय बोलनां आरोपी' म्हणत तिकडून श्या खायी.

शेवटी बऱ्यापैकी सिनियर हवालदार कांबळे म्हणलं ,

" दमा जरा सायब, वैच पानी प्या मी बघतो"

त्यानं प्रेमानं येड्याला पानी पाजलं, जब्याला पिटाळून येक चा अन पाच रूपायचा पार्ले पुडा मागवला अन चा समोर ठिऊन समजुतीच्या सुरात कांबळे बोलला,

"आरं का असल्या पंचायती केल्यास बाबा, सरकार आता तुला जेलात टाकतंय बग"

तशी चा पिऊन दारू जरा उतरल्याल्या खुळ्यानं भोकाड पसरलं अन म्हणाला

"आन मंग आमी कोल्हापूरला आमच्या लाडक्या संगीला भेटाय कसं जायाचं हो सायेब"

"आता आणि ही संगी कोण रं हंडग्या?" सोबत कुदलणे सुरू!.

परत भोकाड, परत त्याला आणिक येक पार्ले पुडा दिउन भोकाड आवरलं अन बोलतां केला तवा कळल्याली हकीकत अशी का खुळ्याला साक्षात त्याच्या भूतपूर्व प्रेयसीनं सपानात यिऊन दृष्टांत दिलता की 'यष्टी चालवत मला भेटाय यी की रं माज्या राज्या" म्हणून हा समदा कारभार, ही सगळी हकीकत कळल्यावर सगळ्यांनी कपाळावर हात मारून घितला.

आता मात्र शेळकेतला पोलीस जागा झाला अन त्यानं शिस्तात शिंदे-निकमला राऊंड मदी घेतलं.

"इतकी घाई झाली वती व्हय रं?"

"क क कसली सायेब?" निकम अजून थरथरतच हुतं अन शिंदे शून्यात नजर लावून बसलं हुतं.

"आरा भोसडीच्यानू, राती मुक्कामाला जाताय तवा यष्टीची चावी इग्निशन मदीच सोडून झोपताय व्हय रं टिऱ्या वर करून आँ?"

शिंदेनं हळूच यकदा निकमकडं पाह्यलं अन एकदा शेळकेकडं पाहून त्यो शांतपणे बोलला

"सायब, यष्टी पाक कंडम बोड्याची हाय, तिला इग्निशनच नाय!"

"ऑ!!! अन मग सुरू कशी करताय रं ?"

" टीरिंगच्या म्होरंच जेवत्या हाताला येक बटन काडून दिलंय वर्कशॉपनं सायब, त्येच दाबून करतो गाडी स्टार्ट" चाचरत निकम बोलला

"आन ह्या खुळ्याकडं दारू कुटून आली रं?"

क्षणात डोळ्याला डोळा लावत शिंदे निकम साळसूदपणे म्हणाले

"काय की बाबा, आमी तर राती अकराला गाडी लावून भाकरी खाल्ली अन उकाड्याला तोडगा म्हणून हौदात पहुडलो".

पुढल्या अर्ध्या तासात शेळकेनं रामपारी आल्याली ही कटकट कशीबशी सांगलीतल्या आपल्या सायबाला जमल तशी समजवून सांगितली, त्याच्याशी काहीतरी बोलला अन वेगानं पुढल्या हालचाली केल्या.

दुसऱ्या दिवशी पुढारीत भारी बातमी आलती

"वेडसर इसमाने पळवली अख्खी बस (वार्ताहर):
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री कुंडल स्टँडला मुक्कामी असलेली कराड-कुंडल बस, पहाटे पाच वाजता एका मनोरुग्णाने गाडीच्या हौदात निजलेल्या चालक व वाहकांच्या अपरोक्ष पळवली. खबर मिळताच ताकारी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री शेळके व त्यांच्या चमूने सिनेस्टाईल पाठलाग करून संबंधित बस ताकारी पासून ५ किमी अंतरावर बोरगावच्या (बहे) अलीकडे यशस्वीरित्या अडवली. सुदैवाने सदर मनोरुग्णाने पहाटे ही बस पळवल्यामुळे बस मध्ये प्रवासी नव्हते, ज्यामुळे एक मोठा अपघात होता होता वाचला. ह्या संबंधात एसटीचे चालक निकम अन वाहक शिंदे ह्यांचे जाब नोंदवले गेले असून पुढील तपास श्री शेळके, पोलीस उपनिरीक्षक, ताकारी ह्यांच्या नेतृत्वात सुरू आहे". सोबत आपली गुणी यष्टी, तिचे तितकेच गुणांचे डायवर कंडक्टर अन उत्सवमूर्ती खुळ्या संगट ताकारीचे हवालदार अन शेळके ह्यांचा एक पुसट फोटो !

हळूहळू शेळकेंनं केस आवरती घेतली, खुळ्याचं मेडिकल वगैरे करून त्याची रवानगी मिरजेच्या यड्यांच्या इस्पितळातल्या झाली, पाचपंचवीस हजारात शिंदे निकम सहीसलामत बाहेर आलेच , शिवाय प्रसंगावधान राखून शासकीय मालमत्तेचे रक्षण केल्याबद्दल शेळके ते शिंदे सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या संबंधित खात्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत लायकीनुसार पैसे पुरस्कार स्वरूप वाटले, अर्थातच शिंदे निकमचे बक्षिसाचे पैशे थेट शेळकेकडं मांडवली पोटी गेले तवाच केस थंड झाली. "संबंधित यष्टी" कंडम मदी जाऊन शिंदे निकमच्या हातात परत एक कोल्हापूर आगाराची कंडम मदी काडल्याली दुसरी यष्टी आली.

कराड-कुंडल (मुक्कामी) बस आज बी राती सवा धा ला सुटती, अंबाबाईच्या अन ज्योतिबारायाच्या कृपेनं आज बी गोदाक्का, व्हनमान्या, कुदाले वगैरे नमुने त्याच यष्टीत रोज सुखानं प्रवास करत्यात तवा पुलाखालून कृष्णामाई संथ वाहत असती.

लेखकथा

प्रतिक्रिया

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गाआआआ.
फर्स्ट टाईम मिपावर इतका हासलो राव.
अफ्फाट, बेफाट आणि तर्राट लिहिलायसं वांडोबा.
.
शंकर पाटिल आणि मिरासदाराचा वारसा चलीवतोयस लगा.
प्रसन्न हाये सरसोती. लिहिता राहा.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 1:56 pm | जेम्स वांड

पहिला प्रतिसाद तुजा येणार असं वाटत हुतं, अन तू नाराज केलं न्हाईस लका!

पहिला माझा प्रतिसाद यीयनाका पण लेखन अस्सल बावनकशी है. मिपाची शान वाढवणारे आहे. इतके चोख आणि ऑथेंटिक नमुने ज्या लेखणीतून उतरतेत त्याला आपला सलाम है.
त्या नीलकांताला स्मरुन सांगतो इतका आनंद कुठल्या वाचनाने आजपरेंत मला दिला नाही.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 2:31 pm | जेम्स वांड

भरून पावलं!

ज्योतिबाच्या नावानं चांगभले :)

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 1:54 pm | जेम्स वांड

कथा पूर्णपणे काल्पनिक, हे डिस्क्लेमर टाकायचं राहिलं होतं!.

कपिलमुनी's picture

17 May 2018 - 2:12 pm | कपिलमुनी

अफलातून लिखाण आहे !
एकदम बावनकशी !

पुंबा's picture

17 May 2018 - 2:17 pm | पुंबा

ज ब र द स्त...
जेम्स वांड पाटलांच्या चंचीतून आणखी काय बाहेर पडतंय याच्या प्रतिक्षेत राहणार इथून पुढे..

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 7:19 pm | जेम्स वांड

जमेल तसं लिहितच जाणार :)

कराडकडची भाषा छान पकडून ( सुशेगाद नसतं तिकडे) मुक्कामी पोहोचवलंत. या आठवड्याचे दुसरे भारी लेखन ( दालबाटीनंतर) .

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 2:27 pm | जेम्स वांड

घोडे विकून बसणे/झोपणे ह्याला समानार्थी असलेला हा ग्रामीण शब्द आपला आवडता म्हणून वापरायचा मोह आवरला नाही, तुमची निरीक्षणशक्ती जबरीच म्हणायला हवी.

आवर्जून सांगितलेत कौतूक केलेत म्हणून आभारी तुमचा :)

काल्पनिक म्हटलं तरी या घटना तिकडे वेगवेगळ्या घडतात.

manguu@mail.com's picture

17 May 2018 - 2:33 pm | manguu@mail.com

छान

विशुमित's picture

17 May 2018 - 3:00 pm | विशुमित

जबरा जेम्स अण्णा,,,
===
आमच्या कडच्या स्वारगेट-मुरूम मुकामी गाडीत बसलोय असे वाटत होते.
===
खरा महाराष्ट्र अनुभवायचा असेल तर फक्त 'एसटी'तच.
(रेल्वे-लोकल-पससेंजर वाले आक्षेप घेतील, पण मला ते उत्तर भारतीय कल्चर वाटते, असो)

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 7:22 pm | जेम्स वांड

बरोबर पाटील, यष्टीत मराठीपण हाय, पण रेल्वेचा अंतरभारती अनुभव पण फर्मास असतोय, दोन्हीची तुलनाच नाय, पण होय यष्टीचा नाद नाय. पुढंमागं रेलवे प्रवासातील गमती बी लिहू, तूर्तास आभार. :)

प्रचेतस's picture

17 May 2018 - 3:08 pm | प्रचेतस

मस्तच.

बोलीभाषेवरील तुमचं प्रभुत्व जोरदार आहे.

स्वलेकर's picture

17 May 2018 - 3:33 pm | स्वलेकर

मस्तच.

शाम भागवत's picture

17 May 2018 - 4:29 pm | शाम भागवत

मस्तच.

लई भारी's picture

17 May 2018 - 4:38 pm | लई भारी

एकदम झक्कास लिवलंय राव! ष्टोरी बेश्ट आहेच, पण डिटेलिंग जबराट.
_/\_

पद्मावति's picture

17 May 2018 - 4:59 pm | पद्मावति

हा हा क्लास्सच! लिहित राहा हो, मस्तं लिहिता.

टवाळ कार्टा's picture

17 May 2018 - 5:02 pm | टवाळ कार्टा

अफाट

गामा पैलवान's picture

17 May 2018 - 5:40 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

लेखातनं वांडपणा कसा ओसंडून वाहतोय. जाम हसलो. कथा काल्पनिक व विनोदी असली तरी मध्यवर्ती कल्पना रोचक व गंभीर आहे. शिंदे मास्तरास पडलेलं स्वप्न खुळ्यासही पडतं. एकमेकांची स्वप्नं मिसळतात होय.

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 7:05 pm | जेम्स वांड

एक प्रेयसीच्या नादात येडं झालेलं अन एक बायकू पासून दूर ड्युटी वर, आता आणि स्वप्नात त्याच दिसणार की हो दोघांना!

मालक, अक्षरशः गडबडा लोळलो हसून हसून! अफाट निरीक्षणक्षमता आणि भाषाप्रभुत्व. _/\_

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 7:29 pm | जेम्स वांड

एस सर,

तुमाला म्हंजी सांगतु पावनं, हाश्य ह्येच जीवणाचे सार
बाकी हाय आपन समदीच क्यूबिकल मदी बेजार

(कवीचं नाव सांगितलं तर त्ये हिथं बी लंबीचवडी काहीतरी काशी करतील)

(जिंदगीच्या स्टँड वरला खुळा) वांडो :)

सिरुसेरि's picture

17 May 2018 - 5:50 pm | सिरुसेरि

एकदम जंक्शन गोष्ट . +१००

पैसा's picture

17 May 2018 - 6:25 pm | पैसा

=)) =))

अनन्त्_यात्री's picture

17 May 2018 - 6:38 pm | अनन्त्_यात्री

खटारा यष्टी! :)

यशोधरा's picture

17 May 2018 - 6:43 pm | यशोधरा

झक्कास लिहिलंय!

Ranapratap's picture

17 May 2018 - 7:02 pm | Ranapratap

अरे बऱ्याच्दा या एष्टीने कुंडला गेलोय, पण लेखन एकदम ज़कास, जबराट हसलो

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 7:09 pm | जेम्स वांड

ग्येलं ती बी दिस, राह्यल्या त्या आटवनी!

आजकाल इतक्या कंडम यष्ट्या बी कमीच हाईत, जुन्याकाळी हुती मज्जा.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 7:30 pm | जेम्स वांड

भाऊ लोक, ताय लोक, सवंगड्यानु सगळ्यांचे खूप खूप आभार :)

शिव कन्या's picture

17 May 2018 - 7:37 pm | शिव कन्या

येकदम बेष्ट गोष्ट.

शाली's picture

17 May 2018 - 8:33 pm | शाली

झकास! झकास!
मस्त हसलो. भारीच एकदम. छान बारकावे.
दमा आठवले एकदम.
अजुन पाहीजे. येवू द्या.

परत वाचले. हसुन पुरेवाट.
स्वप्नात हेमा येवून सुध्दा हे येडं 'बेस्ट यष्टी मास्तर'चं बक्षीस घेतय तिच्याकडनं म्हणजे काय बोलायचं?
तुमची कधा काल्पणीक असली तरी काही वर्षांपुर्वी आमच्या गावाकडे (नारायणगाव) हे घडले होते. फक्त त्या वेड्याने अर्धा एक किमीच गाडी पळवली आणि ठोकली. ते सर्व आठवलं. भाषाशैली भारीच. त्यामुळेच मजा आली.

कराड अन त्यो पट्टा पण पूर्ण एक गाव बारा भानगडी आहेच, लैच दंगा चाललेला असतो काय काय. पण माणसे मुळात प्रेमळ आहेत. ऊस पिकवणारी ही माणसे उसावानी हाईत, प्रेम दिलं का चावून खाल्लात तरी हसत हसत पण मुळाला हात घातला का त्वांड कडू करूनच सोडणार.

यशवंत पाटील's picture

17 May 2018 - 8:54 pm | यशवंत पाटील

बेश लिवलंय वो दादानु.
गावाकलडी लई आठवन आली बगा. जातुच आता शनवारी यष्टीनं.

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 9:03 pm | जेम्स वांड

कराडात स्टँड वर पैशाचं पाकीट निगुतीनं सांबाळा, अन बगा कसं जमतंय पर शेवटच्या यष्टीच्या नादी लागू नकासा.

सुखीमाणूस's picture

17 May 2018 - 10:57 pm | सुखीमाणूस

अफाट मस्त जमली आहे.

वीणा३'s picture

17 May 2018 - 11:26 pm | वीणा३

हॅहॅहॅ हे भारीये !!!

मोकार हसले. मागे एकदा वीटा बस स्टॅंडची बस एका ड्रायवरने बायकोला भेटायला घेवुन गेला होती त्याची आठवण झाली, झकास उतरलीत सारी पात्रे, एकच नंबर__/\__

"वीटा बस स्टॅंडची बस एका ड्रायवरने बायकोला भेटायला घेवुन गेला होता"
हे पण भारीए ;)

गणेश.१०'s picture

18 May 2018 - 12:38 am | गणेश.१०

यष्टी बुंगाट पळीवली की राव :-)
अचूक निरीक्षण. आणि जबरदस्त बोलीभाषा.

निशाचर's picture

18 May 2018 - 3:08 am | निशाचर

जबरदस्त लिहिलंय.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2018 - 10:01 am | बिपिन कार्यकर्ते

शिरसाष्टांग दंडवत!

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 10:12 am | जेम्स वांड

अभ्यानं तुमच्या अभिनंदनाचा धागा लिहिला तेव्हा तुम्ही कळून आलात. मिपावर आम्ही अजून बच्चे आहोत , साक्षात पुस्तके लिहिणाऱ्या बिपीन कार्यकर्ते सरांनी कौतुक केलं, मूठभर मांस अंगावर चढलं. लेखनाची नोंद घेतल्याबद्दल आपले आभार, आणि तुमच्या नवीन पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा :)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2018 - 4:55 pm | बिपिन कार्यकर्ते

मी काहीच नाही हो... माझ्यापेक्षा सहस्त्रपटीने मोठे लोक आहेत मिपावर. त्यांच्यासमोर माझं कौतुक ऐकताना लाज वाटते. (उदा. एकदा रामदासांचं किंवा संजोप रावांचं लेखन वाचा.)

हर्षद खुस्पे's picture

18 May 2018 - 10:32 am | हर्षद खुस्पे

वांड साहेब अप्रतिम लिहिलं आहे. राजकारणावर नको कृपया. हेच लिहा. लई झ्याक.

ठीक आहे, आता फक्त ललित :)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2018 - 4:58 pm | बिपिन कार्यकर्ते

असलं कोणतंही बंधन घालून घेऊ नका स्वतःवर... फक्त इतकं असू दे, स्वतःशी प्रामाणिक राहा, सभ्यतेच्या मर्यादा सोडू नका. बाकी सब चलता है! :)

विशुमित's picture

18 May 2018 - 10:46 am | विशुमित

अशा ग्रामीण बाज असणाऱ्या कथांना/धाग्यांना भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादावरून एक प्रस्ताव मांडू इच्छितो की मिपावर "ग्रामीण विभाग" देखील चालू झाला पाहिजे. देशविदेशातील आपल्या बांधवांना मुरलेल्या लोणच्याचा आस्वाद तरी घेता येईल.
--
वेगळी ओळख कशासाठी याबद्दल मतमतांतरं असू शकतात.
तुम्हाला काय वाटते मंडळी ?

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 10:55 am | जेम्स वांड

प्रश्न गहन आहे! वेगळा धागा काढा. नायतर हिथं आमच्या कथेचाच ताजिया उठायचा मोहरमचा

Smiley face laughing

विशुमित's picture

18 May 2018 - 11:03 am | विशुमित

ओके ओके..!!

अभ्या..'s picture

18 May 2018 - 10:58 am | अभ्या..

सहमत आहे,
अस्सल मराठीचा हा झटका मिपाची शान बनला पाहिजे.
विशु पाटलांनी ह्याबातीत मालकाशी बोलावे असे सुचवतो.

गामा पैलवान's picture

18 May 2018 - 12:16 pm | गामा पैलवान

ग्रामीण विभागासंगे शहरी घाटी विभाग पन पायजेल. माज्यावानी शेरात व्हाडलेल्या गड्यास घाटी कुटं बोलाया भ्येटनार. दादा कोंड्क्याची पिच्चर बघून आमी घाटी शिकलो. त्येचं चीज व्हायला हवं!

-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2018 - 10:49 am | डॉ सुहास म्हात्रे

जंक्शन लिवलंय !!!

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 10:56 am | जेम्स वांड

आत्ता तुम्हालाच वाचून मत द्या म्हणून खरड टाकणार होतो :)

बिटाकाका's picture

18 May 2018 - 1:11 pm | बिटाकाका

वांड साहेब, वांडच लिखाण! लै जबरा! आक्षी समदी चित्तरकथा डोळ्यासमोर उबी रायली बगा! लिव्हत राव्हा, आसलं कायतर वाचलं तर दिवस पुरा झाल्यागत वाटतंय!

श्वेता२४'s picture

18 May 2018 - 2:16 pm | श्वेता२४

मिरासदारांचीच कथा वाचतेय असं वाटलं.हसून पुरेवाट झाली. बासरीची एकदम तरल भावविभोर करणारी गंभीर कथा एका टोकाला आणि ही पुरेपुर विनोदी कथा दुसऱ्‌या टोकाला. दोन्ही टोके ताकदीनं साकारणाऱ्या तुमच्या लेखणीला सलाम

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 2:45 pm | जेम्स वांड

बासरीमुळं लोक उदास झाले असे वाटले म्हणून ह्यो घाणा पाडला. फुडं बघू अजून जे काय काय सुचतं ते लिहीत जाऊच.

उपेक्षित's picture

18 May 2018 - 6:31 pm | उपेक्षित

जबरदस्त रे मित्रा, लयी दिवसांनी असले काही वाचायला मिळाले.

प्राची अश्विनी's picture

18 May 2018 - 7:37 pm | प्राची अश्विनी

भन्नाट लिहिलंय.

उगा काहितरीच's picture

18 May 2018 - 11:27 pm | उगा काहितरीच

मस्त !

रातराणी's picture

19 May 2018 - 1:57 am | रातराणी

खतरनाक!!

यष्टी चालवत मला भेटाय यी की रं माज्या राज्या"

काय दृष्टांत!! काय दृष्टांत!! मजा आली. बरेच दिवसांनी निखळ विनोदी कथा मिळाली वाचायला. मिरासदारी आठवलं. :)

प्रान्जल केलकर's picture

19 May 2018 - 3:50 am | प्रान्जल केलकर

हसून हसून मुरकुंडी वळली . ये ये

पद्मश्री चित्रे's picture

19 May 2018 - 8:23 am | पद्मश्री चित्रे

पार हौदात बसवून सफर घडवलीत..
पाटील मिरासदार यांची आठवण आली.

असंका's picture

19 May 2018 - 8:57 am | असंका

काय सुरेख!!!
धन्यवाद!!

प्रसाद_१९८२'s picture

19 May 2018 - 10:21 am | प्रसाद_१९८२

खुप आवडली.
----
मात्र एक कॅन शिंदीची कच्ची दारु रिचवून, जो माणूस, कुठलाही अपघात न करता एसटी चालवतो,
तो माणुस 'खुळा' कसा काय असू शकतो ?

जेम्स वांड's picture

19 May 2018 - 10:42 am | जेम्स वांड

पण दारू पिणे , अकसिडेंट, अन खुळेपणा संबंध असलाच पाहिजे असे नाही.

जव्हेरगंज's picture

19 May 2018 - 11:17 am | जव्हेरगंज

कडक!!!

नंदन's picture

19 May 2018 - 12:42 pm | नंदन

एक नंबर!

अभिजीत अवलिया's picture

19 May 2018 - 1:07 pm | अभिजीत अवलिया

छान लिहिलंय .

बबन ताम्बे's picture

19 May 2018 - 2:51 pm | बबन ताम्बे

खेड्यांत एक एक इरसाल नमुने असतात. तुम्ही भारी चित्रण केले आहे. हहपूवा.
आमचीही एक ग्रामीण कथा वाचून पहा.
http://www.misalpav.com/node/38930

दुर्गविहारी's picture

20 May 2018 - 1:18 pm | दुर्गविहारी

हसून लोळलो राव. कराडकर असल्याने सगळा प्रदेश डोळ्यासमोर आला. लाईव्हा बघीतली तुमची कथा. मस्तच. अजुन येउ द्यात.

ट्रेड मार्क's picture

22 May 2018 - 2:45 am | ट्रेड मार्क

जेम्सभाऊ, भारी लिहिलंय. विंग्लिश असूनही तुम्ही ग्रामीण बाज मस्त पकडलाय ;)

मास्तुरे शिंदीची प्यायल्यावर स्वप्न बघून बघून काय बघतोय तर हेमामालिनीकडून बक्षिस घेण्याचं! गरीब बिच्चारा...याला सज्जन म्हणतात!!

काही काही संवाद म्हणजे कहर आहे -

- खुळ्याला साक्षात त्याच्या भूतपूर्व प्रेयसीनं सपानात यिऊन दृष्टांत दिलता की 'यष्टी चालवत मला भेटाय यी की रं माज्या राज्या" म्हणून हा समदा कारभार

- सायब, यष्टी पाक कंडम बोड्याची हाय, तिला इग्निशनच नाय!

हाहाहा

उत्तरादाखल खुळ्यानं निवांत कॅन मदी उरल्याली शेवटली अर्धा येक घोट शिंदी ढोसली अन मजेत डायवरच्या खिडकीतून मुंडकं काडून दाढी मिश्यातून हसत इंस्पेक्टरला म्हनला

'येंsssssss' >>>>>
हसून हसून पोट दुखलं !!!! हा हा हा !!मला वाटलं खरंच काही बोललं काय ते खुळं !!!

king_of_net's picture

22 May 2018 - 12:45 pm | king_of_net

अगदी डोळ्यांंसमोर पूर्ण picture सरकलं!!! खुप आवडली.