आठवणीतली 'ती'

Primary tabs

गणेश.१०'s picture
गणेश.१० in जनातलं, मनातलं
13 May 2018 - 9:10 pm

ती घरी आली तेव्हा पहिल्याच नजरेत आमच्या दोघांची गट्टी जमली होती. मला ती सगळ्यात जास्त जीव लावायची. आणि मीही तिची खूप काळजी घ्यायचो. तिचं कुणाशीच जास्त पटायचं नाही. पण आमच्या दोघांच्या मात्र खूप गप्पा रंगायच्या. आम्ही तासन-तास एकत्र खेळायचो. मी क्रिकेट खेळत असताना ती मला खिडकीतून पाहत असायची. मी लिखाण करताना ती एकटक मी काय लिहितोय हे पाहत बसायची. मी तयार केलेल्या खेळणीला फक्त तिला हात लावू द्यायचो. मला घरी यायला उशीर झाला की तिचे डोळे दरवाजाकडे लागलेले असायचे. माझ्या खाऊतला वाटा मी आधी तिला द्यायचो.

मी कॉलेजला गेल्यावर मात्र आमचं भेटणं कमी झालं. तरीही मी सुट्टीला घरी आलो की ती आवर्जून भेटायची. लहानपणीचा खेळकरपणा आता कमी झाला होता पण नात्यातली ओढ मात्र अगदी तशीच, पहिल्या भेटीसारखी, निरागस.

पावसाळ्याचे दिवस होते. खूप अंधारून आलं होतं. मी सुट्टीसाठी घरी आलो होतो, सोबत काही पाहुणेही होते. खुशालीच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या. माझी नजर मात्र तिलाच शोधत होती. सहज खिडकीतून बाहेर लक्ष गेलं. मी धावतच दरवाजात पोहोचलो, आमच्या दोघांची नजरानजर झाली, पण का कुणास ठाऊक, काही क्षणात ती माझ्याकडे पाठ फिरवून निघून गेली. परत कधीही न दिसण्यासाठी.

आजही घरी गेलो की पाय दरवाजातच थबकतात, डोळे आपोआप मिटतात, शेवटची नजरभेट डोळ्यासमोरून तरळून जाते, 'मनी थांब' अशी हाक बाहेर पडते आणि चिखलात उमटलेली तिची इवलीशी पावलं आणि म्याऊ-म्याऊ असा प्रतिसाद कोसळणाऱ्या पावसात हळू हळू अदृश्य होत जातो...

लेखकथा

प्रतिक्रिया

गम्मत केली राव तुम्ही आमची.

सिरुसेरि's picture

15 May 2018 - 5:44 pm | सिरुसेरि

एकदम पल्टी