मुसक्याबंद

Primary tabs

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
12 May 2018 - 1:10 pm

धक्क्याच्या कोप-यात (धक्का हे जुनं नाव, हल्ली त्याला जेट्टि म्हणतात.)आता जिथं कुरकुरे, भेळ , शोभेच्या वस्तुंचे स्टाॅल्स आहेत तिथं पूर्वी एक भिकारी रहायचा. भिका-याला थोडंच नाव असतं. आणि असलं तरी कोण त्याला ते आपुलकीनं विचारणार? पण त्याला सगळे " मुसक्याबंद" म्हणायचे.

केस आणि दाढीच्या जटा वाढलेल्या, खोल गेलेले डोळे. अंगावर मळकट्ट कपडे. कपडे म्हणजे कधीकाळी तो शर्ट असावा, असं वाटणारा कपडा आणि खाली फाटकी पॅन्ट. ती सुद्धा दुस-या एका फडक्याने बांधून कमरेवर टिकवलेली. पावसात भिजला तरच आंघोळ. त्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी यायची. दिवसभरात गावात त्याच्या दोन तीन फेऱ्या होत. खांद्यावर एक झोळी असे. त्यात गावात फिरताना सापडलेल्या, कच-यातल्या मोडक्या तोडक्या वस्तू असंत.
एकूणच तेव्हा गावात कचरा कमी होता. मुख्य म्हणजे प्लास्टिक नव्हतं. लोक कुठलीही वस्तू संपूर्ण पणे वापरून मगच टाकत. त्यामुळं मुसक्याबंदला कच-यात काय सापडायचं कोण जाणे. पण त्याची झोळी कायम भरलेली असे. आजोबांचं एक आवडतं गाणं होतं. "देणा-याचे हात हजार दुबळी माझी झोळी." ते ऐकताना माझ्या डोळ्यासमोर मुसक्याबंदची झोळी यायची. तो त्या सगळ्यांचं काय करतो ही मला उत्सुकता असे. पण कधी त्याच्याजवळ जायची हिंमत होत नसे.

कारण कुणी जवळ आलं की तो काही तरी अगम्य बडबडत , शिव्या देत रागारागाने अंगावर धावून येई. त्या बडबडीतून सुरवातीची दोनच वाक्यं समजत. "अन्न पाणी बंद तुझ्या मुसक्या बंद, तुझं खाणं पिणं बंद.". त्यावरून पडलेलं त्यांचं नाव मुसक्याबंद. कुठून त्याच्या तोंडी हे आलं असावं बरं? कदाचित पूर्वी त्याला घर असेलही. आई वडील गेल्यानंतर इतरांनी त्याची अशी अवस्था केली असेल का? घरून अन्न पाणी बंद केलं असेल, बांधून ठेवलं असेल म्हणून त्याच्या तोंडी हे बसले असेल?

एकदा दुपारी तो गावातून फिरत असताना रस्त्यावर एक अॅक्सिडंट झाला. एका मुलीला एस्टीचा धक्का बसला. लागलं काही नाही पण घाबरून तिची दातखिळी बसली. लोक जमले. पण नक्की काय झाले ते कळेना. तेव्हा मुसक्याबंदने स्पष्ट शब्दात काय घडलं ते व्यवस्थित सांगितलं. आता दातखिळी बसण्याची वेळ लोकांची होती. कारण तो बोलू शकतो हे पहिल्यांदाच कळलं. पण काही अर्थपूर्ण बोलण्याची त्याची ही एकमेव वेळ. त्यानंतर गावात अफवांना ऊत आला. कुणी म्हणायचं युद्धकैदी होता तो. तिथून परत आल्यावर त्याचं घरदार सगळं गेलं होतं. सरकार दरबारी काही मदत मिळाली नाही. म्हणून त्याला वेड लागलं. कोण म्हणे तो चांगला बीए झालेला आहे. पण वेड लागल्यानं हे असं झालं. तर गावात स्मगलिंग चाले त्यांचा तो खब-या आहे असंही लोक म्हणु लागले. खरं काही का असेना तो गावातला एकमेव वेडा भिकारी होता हे नक्की. अख्ख्या गावात फक्त देऊलकर मास्तर कधीतरी त्याच्याशी प्रेमानं बोलताना दिसत. मदत म्हणून पैसे पण देत असावेत.

मुसक्याबंद समुद्रावर धक्क्याशेजारच्या कोप-यात रहात असे. त्या जागेला दोन बाजूंना कंबरभर उंचीची धक्क्याची सिमेंटची भिंत होती. बाकी दोन बाजू मोकळ्याच. खाली वाळू. समोर समुद्र. वरती स्वच्छ निळं आकाश. आम्ही त्याच्या त्या जागेला गुहा म्हणायचो. तेव्हा ट्राॅलर नव्हते, पर्यटकांची गर्दी नव्हती. किनारा स्वच्छ पाांढरा होता. शंख शिंपले, समुद्र चांदण्या, फेणी कवड्या वाळूत विखुरलेल्या असतं. वाळूत खेळताना फ्रॉकच्या सुपात आम्ही हा खजिना गोळा करू. मग फ्रॉक हातांना जड झाला की नाईलाजाने सगळा खजिना पुन्हा किना-यावर रिता करू. धक्क्यावर गावातल्या काही ज्येष्ठ नागरिकांचा( त्यांना म्हातारे कोतारे म्हणत) ग्रुप बसे. भाऊ आजोबा( कामत), बाबा आजोबा, तात्या आजोबा काकी आजी, भांडारकर काका काकी, जस्टिस सावंत वगैरे. ते तिथं असल्यामुळं आम्ही उसनं अवसान आणून मुसक्याबंद असं मोठमोठ्याने म्हणत चिडवत असू. पण ते सुद्धा, तो अंगावर आला तर पळायची तयारी ठेवून. त्याच्याहून जोरात आपण पळू शकतो शिवाय आजोबा इथंच आहेत असा आमच्या बालमनात दुर्दम्य विश्र्वास होता. पण समुद्राकाठी तरी कधी तो आमच्या मागे आला नाही. पावसात समुद्राला उधाण येई. पाणी त्याच्या गुहेपर्यंत पोचत असे. तेवढे चार महिने तो आपला बाडबिस्तारा कस्टमच्या आॅफीससमोरच्या शेडखाली हलवत असे.

गावातून त्याची चक्कर दुपारी असे. कुणी काही खायला दिलं तर किंवा उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्यात किंवा झाडाखाली पडलेले आंबे फणस पेरू जांभळं तर सहज मिळत. कारण झाडं आत्तासारखी काटेकोर सिमेंटच्या कुंपणात बंदिस्त नव्हती. त्यानंतर तो त्याच्या जागी जाऊन बसे. त्यामुळे तो जमवलेल्या कच-याचं काय करतो? त्याने तिथं बोचक्यात काय लपवलंय याची आम्हाला अमाप उत्सुकता होती . कुणी म्हणे त्यात पैसे आहेत, कुणी म्हणे मागे स्मगलिंगची बोट फुटली ना त्यातल्या सोन्याची बिस्किटे आहेत. आम्ही समुद्रावर जायच्या वेळी तो तिथंच बसलेला असल्यानं आम्हाला शेरलॉक होम्स बनता येत नसे. बरं सकाळी उन्हात समुद्रावर जायला घरून परवानगी नसे. कशाला जाताय या वेळेला? हा प्रश्र्न असेच आणि भिका-याचा खजिना शोधायला जायचंय म्हटल्यावर जो काही दहिकाला घरी झाला असता त्यांची आम्हाला चांगलीच कल्पना होती. पण एक दिवस अशी संधी आपोआप चालून आली.

घरी आलेल्या पाहुण्यांना किल्ल्यावर जायचं होतं. आणि होडी कुठून सुटते ते दाखवायच्या कामी आमची नियुक्ती झाली. मी आणि दादा. मे महिन्यातली भर दुपार. समुद्रावर रणरणतं ऊन होतं. पाहुण्यांना धक्क्यावरती होडीत बसवून आम्ही निघालो. आणि कोप-यात मुसक्याबंदची गुहा दिसली. आमचे डोळे लकाकले. चक्क तिथं मुसक्याबंद नव्हता. आम्ही आजूबाजूला बघितलं. एकमेकांकडे बघितलं आणि धक्क्याच्या तिरक्या भिंतीवरून तिथं उतरलो.

आठ दहा बोचकी क्रमाने लावलेली होती. त्यांच्या मध्ये एका माणसाला झोपेपुरेशा जागेत खड्डा केला होता. वाळूचीच उशी होती. परत वर बघितलं आणि कुणी येत नाही याची खात्री केली. मग हळू एक गाठोडे उघडलं. इतकं मळकट घाणेरडं बोचकं त्याला कसा हात लावला आम्ही याची आता कल्पनाही करवत नाही. पण म्हणतात ना? भोचक बोको त्येचा न्हाणीयेत तोंंड. बोचकं उघडलं खरं.

आत लाकडी छोटी फळकुटं , सन्मायकाचे तुकडे भरलेले होते. आम्ही ते गाठोडं बंद केलं. दुसरं उघडलं. त्यात सोनं असेल अशी आमची पक्की खात्री होती. आत सायकलचे मोडके फोक्स, पत्र्याचे तुकडे, असलं धातूचं सामान होतं. मग तिसरं उघडलं रद्दी पेपर, कागद. चौथ्यात चिंध्या. पाचव्यात मातीच्या खाप-या. सहाव्यात तुटक्या चपला. आमची खजिन्याची आशा हळूहळू मावळत चालली होती. पण अजून काही बोचकी उघडायची बाकी होती. आम्ही यात दंग झालो असताना मागून कधी तो मुसक्याबंद आला ते कळलंच नाही. "एss अन्पानी बंद" म्हणत चवताळून त्याने हातातली झोळी रागात आपटली आणि आम्ही ओरडत जीव मुठीत धरून घाबरून तिथून पळत सुटलो. तो अर्थातच मागे लागला. त्या धावपळीत दादाचं चप्पल ( चप्पल म्हणजे स्लिपर्स, निळी पांढरी स्लिपर्स एकदम स्टॅंडर्ड होती तेव्हा) वाटेतच पडलं पण ते उचलण्याची ती वेळ नव्हती. कारण काळ मागून येतच होता..

आमच्या वेगापुढं तो कधीच मागे पडला असावा. त्या दिवशी आम्ही हुसेन बोल्टला नाही पण निदान पी टी उषाला तरी नक्कीच हरवलं असतं. घरी पोचलो तेव्हाच मागे वळून बघितलं. नंतरचे काही दिवस दादाने "चप्पल कसं काय हरवतो आणि ते पण एकच?" यावर बोलणी खाल्ली. पुढचे कित्येक महिने आम्ही समुद्रावर जायचं टाळलं. पण मित्रमंडळीत जो काही आमचा भाव वधारला त्यापुढे हे काहीच नाही. न उघडलेल्या बोचक्यात नक्की सोनं असणार यावर गोट्या, विट्यांच्या आणि काजीच्या पैजा सुद्धा लागल्या. पण पुन्हा त्या गुहेत जायची कुणाची हिंमत झाली नाही.

पुढं शिक्षणासाठी गाव सुटलं. आणि मुसक्याबंद कधी विस्मरणात गेला ते कळलंही नाही. मागे एकदा आई म्हणाली की त्या जागेतून वास यायला लागला म्हणून लोकांनी बघितलं तर तो मेलेला होता. बेवारशीच तो. म्युन्सीपाल्टीनंच त्याचं प्रेत जाळलं. त्याबरोबर सगळी बोचकी सुद्धा. मला खात्री आहे नाकाला रुमाल लावूनच त्यांनी ती काठीनं उचलली असणार. इतकी गलिच्छ बोचकी उघडलीही नसणार.

काजीगोट्यांची पैज लावणारी मुलं तर केव्हाच मोठी झाली होती....
गोट्या विटी दांडू असे खेळसुद्धा इतिहासजमा झाले होते.....
आणि भिकारी? ते तर सूट- बूट गांधी टोपी घालून कधीचेच राजकारणात शिरले होते, लोकशाहीच्या जणू मुसक्या आवळायला...

लेखकथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 May 2018 - 1:14 pm | पद्मावति

सुंदर व्यक्तीचित्र.

व्यक्तिचित्रण चांगले जमले आहे.

शाली's picture

12 May 2018 - 3:08 pm | शाली

छान लिहिलय.

सतिश पाटील's picture

12 May 2018 - 3:21 pm | सतिश पाटील

अश्याच लेखांची वाट पाहत असतो, मस्त जमलय

जेम्स वांड's picture

12 May 2018 - 3:34 pm | जेम्स वांड

शेवटी राजकारणावर टिप्पणी थोडी अस्थानी वाटली, पण ते माझं वैयक्तिक मत झालं. बाकी व्यक्तिचित्रण भागात एक काडी इकडली तिकडे नाहीये, सगळं परफेक्ट आहे एकदम.

अपेक्षित शेवट. पण तरीही थोडासा हुरहूर लावणारा. मला वाटतं, व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ शब्दांनी बांधलेलं पोर्ट्रेट नसतं, तर त्याला मागे त्या व्यक्तीच्या कथेची पार्श्वभूमीदेखील असावी लागते, तेव्हा ते व्यक्तिचित्रण प्रभावी बनतं. तुमच्या या व्यक्तिचित्रणातल्या छोट्या मुलीची कथा आणि त्या मुसक्याबंदची गूढ कथा ह्या एकमेकींना छेद देणाऱ्या प्रतलांंनी हे व्यक्तिचित्र फार प्रभावीपणे तोलून धरलं आहे. पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.

उगा काहितरीच's picture

12 May 2018 - 6:56 pm | उगा काहितरीच

छान ! आवडलं व्यक्तीचित्रण.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 May 2018 - 1:48 am | अमरेंद्र बाहुबली

आवडला लेख

बबन ताम्बे's picture

13 May 2018 - 2:41 pm | बबन ताम्बे

शेवटच्या टिपणीने एव्हढ्या चांगल्या कथेला थोडेसे गालबोट लागल्यासारखे वाटले.