आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?...

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जनातलं, मनातलं
11 May 2018 - 11:48 am

एकंदरीत काहीतरी philosophical लिहायचा मूड झाला आज. सोसायटीची मीटिंग झाली. त्याच त्याच चर्चा, तेच तेच विषय.. आयुष्यात नाईलाजास्तव करावी लागणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपण राहतो त्या सोसायटी च्या कमिटी मध्ये काम करणं. परमेश्वर सगळी सुखं हात जोडून समोर उभी येऊ देत नाही. म्हणून जेव्हा आनंदाने मनस्वी जगायचं ठरवलं तेव्हा परमेश्वर म्हणाला थांब. अजून हिशेब चुकते करायचेत तुझ्या पापांचे. आणि मग मी सोसायटी चा सचिव झालो.

दर दिवशी आपण जगत असतो. वास्तविक जगणं हे सहज सुलभ असलं पाहिजे. पण आपण जगण्यासाठी किती आटापिटा करत असतो! आपल्या देशात हा आटापिटा जरा जास्तंच असतो अमेरिका, इंग्लंड देशांच्या मानाने. म्हणजे पाऊस पडत असला कि सगळीकडे चिखल, पाणी तुंबणे. त्यातून वाट काढत बसायचं. गाडीतून जायचं की ट्रॅफिक चा प्रॉब्लेम. उन्हाळ्यात घामाच्या धारांनी नको जीव. थंडी तर नुसती नावाला. कोणी आजारी पडल्यावर चांगला डॉक्टर किंवा हॉस्पिटल शोधत बसा. कुठला डॉक्टर लुबाडणारा तर नाहीना याचं टेन्शन. मॉर्निंग वॉक ला गेल्यावर भटके कुत्रे मागे लागतात. संध्याकाळी कुठेही फिरायला जा, ही गर्दी सगळीकडे. लोकल ट्रेन्स मध्ये मरणाची गर्दी. कुठे विजेचा तुटवडा तर कुठे पाण्याचा. मुलांच्या शिक्षणाचा फुगत चाललेला खर्च...
कोण झाड कोसळून मरतंय, तर कोण ट्रेन च्या गर्दीतून पडतंय. कोण रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे पडून मरतंय तर कोण दुषित रक्त पुरवठ्यामुळे मरतंय. कोण पुरामुळे मरतंय तर कोण दरडी कोसळून मरतंय!

अरे काय चाललंय हे! आपण रोजच्या जगण्याच्या प्रयत्नात खरं तर मरत चाललोय! आपण जन्माला येतो ते जगण्यासाठी की मरण्यासाठी? आठवतंय का या अगोदर कुठल्याही टेन्शन विना एखादा तरी दिवस कधी जगलो होतो? नक्की आनंद आनंद म्हणजे काय हो भाऊ?
कितीही आजूबाजूला दैन्यावस्था असली तरी परमेश्वराने एक चांगलं केलंय. ते म्हणजे आनंद ही त्याने मनाची अवस्था करून टाकली! म्हणजे झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा त्याने मनात आणलं तर आनंदाने राहण्याची मुभा दिली आहे! बाह्य गोष्टींवर आनंद अवलंबून असता तर आपण कधीच आनंदी राहिलो नसतो! मन करा रे प्रसन्न असं उगाच नाही म्हटलेलं तुकाराम महाराजांनी! कोणीही तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय दुःखी करू शकत नाही असं म्हणतात याचा अर्थ हाच! कितीही संकट आली पण जर तुम्ही ठरवलंत की दुःखी राहायचं नाही तर मग झालं की!

पूर्वी पेक्षा आता भौतिक सुखं कितीतरी जास्त प्रमाणात माणसाकडे आहेत. म्हणजे, टीव्ही, फ्रीज, गाडी, एसी, नोकर, मोबाईल, कॉम्पुटर... एक ना दोन! मग एव्हढी भौतिक सुखं मिळाल्यावर माणूस खरंतर किती जास्त आनंदी व्हायला हवा होता! पण झालं का तसं? वास्तविक आपण माणसांना कित्येक वेळा हेच बोलताना ऐकतो की पूर्वी मजा होती! बिनाका वरचं संगीत ऐकण्यात मजा होती, पाहुणे घरी आल्यावर मजा होती. गरम गरम घरची पोळी किंवा भाकरी आणि भाजी खाण्यात मजा होती! समुद्रावर जाण्यात मजा होती, पावसात भिजण्यात मजा होती. मित्रांबरोबर नदीवर पोहोण्यात मजा होती, कोजागिरी ला घरच्या गच्चीवर गप्पांची मैफल रंगवण्यात मजा होती. कधी तरी आई बाबांबरोबर सिनेमा ला जाण्यात मजा होती तर कधी घरच्या अंगणात खेळण्यात मजा होती!

मग नक्की आता चुकतंय कुठे? गम्मत अशी आहे की अधिकाधिक सुखाने जगायच्या भानगडीत सुख नक्की कशाने मिळतं हेच आपण विसरलो! आनंदी राहण्यासाठी आपण आजूबाजूच्या गोष्टींवर अधिकाधिक अवलंबून राहू लागलो. याचाच अर्थ आपण आपल्या सुखाला ओलिस ठेवलं भौतिक गोष्टींच्या ताब्यात! म्हणजे आधी काही नसलं तरी माणूस आनंदी राहू शकत होता पण आता त्याला आनंदी राहण्यासाठी गाडी, मोबाईल, एसी लागायला लागला. थोडक्यात पैसा आवश्यक झाला. आणि मग या नादात जगण्यासाठी पैसा मिळवायच्या ऐवजी आपण पैशासाठी जगायला लागलो! म्हणजे जी गोष्ट साधन म्हणून वापरायची त्या गोष्टीलाच आपण साध्य करून टाकलं! संवादापेक्षा फोन आपल्यासाठी प्रतिष्ठेचा झाला, शिक्षणाऐवजी महागडी शाळा (एसी असलेली) आपल्यासाठी प्रतिष्ठेची झाली! भरपूर कष्ट केले की झोप चांगली लागते, मग निजायला अगदी धोंडा असला तरी चालतो. पण कष्ट करणं आपण बंद केलं, मग झोपायला आपल्याला मऊ गादी लागायला लागली. संवादासाठी भाषा ही केवळ माध्यम असते पण आपण भाषाच प्रतिष्ठेची केली आणि मातृभाषेत बोलणं कमीपणाचं वाटू लागलं. समाजप्रिय माणसाला सोशल मिडिया वरची माणसं (ज्यांना आपण भेटत देखील नाही) जवळची वाटू लागली आणि आजूबाजूच्या माणसांचे मतभेद मात्र डोईजड वाटू लागले. सगळ्यांनाच सुखाने जगता यावं म्हणून धर्म निर्माण झाला. पण आपण धर्मालाच जगण्यापेक्षा जास्त प्रतिष्ठेचं बनवलं स्वतःचा खोटा अभिमान जपण्यासाठी. जगायचं कसं याचं किंवा आपल्याला आनंद कशात वाटतो याचं शिक्षण घ्यायचं सोडून, काय शिकल्याने पैसा जास्त मिळेल ते आपण शिकू लागलो.

जी गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला मनापासून आनंद मिळतो ती गोष्ट करा. सुखं म्हणजे दुसरं काय असतं हो? पण नाही, आपला आनंद बाजूला ठेऊन जिथे पैसा मिळेल ते काम माणूस करू लागला आणि यातच खरी गम्मत आहे असं स्वतःला खोटं वर पटवून देखील देऊ लागला. मग सिव्हील इंजिनिअर होऊन माणसं सोफ्टवेअर प्रोग्राम लिहू लागली, लिखाणाची आवड असणारी माणसं सीए होऊ लागली. गणिताची आवड असणारी माणसं कॉल सेंटर मध्ये काम करू लागली. अन इतिहासाची आवड असणारी माणसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट च्या गप्पा मारू लागली. एकंच ध्येय उराशी बाळगलं जाऊ लागलं. पैसा मिळाला पाहिजे! पण गम्मत अशी झाली की पैसा घेऊन सुखी होण्याच्या इर्षेत माणसं दुःख ओढवून घेऊ लागली. How much land does man need? ह्या शेक्सपिअर च्या गोष्टीप्रमाणे How much money does man need? याचं उत्तर देखील माहीत नसल्यामुळे माणसं अधिकाधिक या गर्तेत ओढली गेली. आयुष्य संपायची चाहूल लागली आणि कळायला लागलं की पैसा तर आला पण आता जगायला आयुष्यच उरलं नाही!

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

आयुष्य नक्की इतकं तापदायक आणि कंटाळवाणं झालंय का नक्की? पूर्वी अडचणी नव्हत्या का? आजच्या सुखसोयी बोचत असतील तर पुनरेकवार पूर्वीप्रमाणे खडतर आयुष्य जगायला कोणी बंदी घातलीये का? तेव्हाही सुख होते, दुःखही होते. आजही सुखदुःखे आहेतच. त्यांचं स्वरूप बदललंय इतकं म्हणता येईल हवं तर. बघा पटतंय का.

त्यानी लिहिलय ते अगदीच काही चूक नाही. पैसा आणि भौतिक सोयी अधिकाधिक मिळवण्याच्या नादात आपण छोट्या छोट्या आनंदांना मुकतोय हे खरच आहे.

नाही हो, ईतकही वाईट नाही झालं अजुन जगनं. खुप काही सुंदर आहे. अगदी हाताच्या अंतरावर आहे.

पुंबा's picture

11 May 2018 - 1:31 pm | पुंबा

लेख आवडला थोडा पण तुमचं सदस्यनाम अधिक आवडलं..

विशुमित's picture

11 May 2018 - 2:36 pm | विशुमित

आ-बोल पाहिजे होते. म्हणजे आ- बोल आणि लिही.
===
छान लिहलंय ... लिहते राहा.

सतिश पाटील's picture

11 May 2018 - 2:39 pm | सतिश पाटील

आज मनुष्य प्रचंड यांत्रिक झालाय.भौतिक सुखात गुरफटलाय.
आपले मन संवेदनशील असल्यानेच हे आपण उत्तम प्रकारे टिपलय.

अबोलघेवडा's picture

11 May 2018 - 3:49 pm | अबोलघेवडा

उत्स्फुर्त प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद

श्वेता२४'s picture

11 May 2018 - 3:50 pm | श्वेता२४

लेखनाचा सूर थोडा नकारात्मक वाटला तरी जे लिहीलय त्यात तथ्यही आहे. आज पैसा या गोष्टीच्या मागे धावताना जगणे विसरत चालल्याची भावना लेखात दर्शविली असली तरी बदलत्या काळानुरुप हे स्वाभाविक झाले आहे. आणि त्याच बदलानुसार माणुस शोधत असलेले जगण्याचे, आनंदाचे क्षण हेही बदलेलं आहे. आज रक्ताचे नातेवाईक जवळ नसताना सोशल मिडीयावर का होईना एखाद्या व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करणे शक्य आहे व त्यास प्रतिसाद देणारेही आहेत ही चांगली गोष्ट नाही का. प्रत्येकवेळी भेटणे शक्य नसले तरी व्हीडीओ कॉलिंगद्वारे दूर राहणाऱ्या नातवाला हसता खिदळताना पाहून खूश होणारी आजी, हे चांगली गोष्ट नाही का. कोणत्याही गोष्टीची यथार्तता त्याचा वापर आपण कीती उपयुक्ततेने करतो व नियंत्रितपणे करतो यावर असतो. असो. लेखन आवडले. लिहीत राहा.

मराठी कथालेखक's picture

11 May 2018 - 4:01 pm | मराठी कथालेखक

जी गोष्ट साधन म्हणून वापरायची त्या गोष्टीलाच आपण साध्य करून टाकलं

पण हे नैसर्गिकच आहे ना ? आणि कोणत्याही कालखंडात हे लागू होतेच की.
साधन आपल्यापाशी उपलब्ध होईपर्यंत ते साधन मिळवण्यासाठी धडपड करावी लागते मग त्या धडपडीसाठी 'साधन' हेच साध्य असणार ना ? जसे भात खाणे हे साध्य आहे आणि कुकर हे साधन. पण घरात कुकर नसेल तर तो विकत आणण्यासाठी बाहेर पडलो , चार दुकानं पाहिली, चार ब्रँड्स पाहिलेत तर कुकर हे त्यावेळेपुरते साध्यच झाले ना मग मध्येच मला तर कुकर मध्ये रस नाही भात हवा अहे म्हणत मी खरेदी न करताच रिकाम्या हातानी घरी परतलो तर माझ्याकडे ना कुकर असेल ना भात.
सामान्य माणसाचे अंतिम साध्य सहसा एकच असते , ते म्हणजे ताण तणावरहित जीवनशैली...जर मी पैसे कमावले नाही तर अशा ठिकाणी कदाचित रहावे लागेल जिथे मला साध्या रोजच्या पाण्यासाठी दोन -तीनतास घालवावे लागतील ..म्हणजे ताण आहेच ना ?. याउलट मी जास्त श्रम करुन पैसे कमावलेत , घरात नळ उघडले की पाणी येते.. .. कामाचा ताण मला आताही असेल पण त्याचे स्वरुप बदललेले आहे आणि बहूधा हा ताण मी सहन करु शकतो.

अर्धवटराव's picture

12 May 2018 - 2:49 am | अर्धवटराव

जन आणि मन, दोघांचेही ऐकता येणे महत्वाचं. आपल्या बहुतांश प्राथमीकता आपण ठरवत नाहि तर जग ठरवतं आपल्यासाठी. जगाच्या कल्लोळात मनाचा कौल उमगणे म्हणजे ध्यान लागणे. त्याची प्रॅक्टीस/सवय शक्य तितक्या लवकर लागायला हवी. बाकी सब तकदीर कि बात है.

प्रकाश घाटपांडे's picture

12 May 2018 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

मॉर्निंग वॉक ला गेल्यावर भटके कुत्रे मागे लागतात

माझ्या पण. माझ्याकडून त्यांच्या अंगावर हात फिरवून घेण्यासाठी तडफडत असतात. त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवला की कुठ मला सोडतात. काही भुभु मात्र मी हात लावेल म्हणून लांब पळतात. भुभु तितक्या भुभृती

पुंबा's picture

12 May 2018 - 6:34 pm | पुंबा

भुभु तितक्या भुभृती

काका, हे भारीये..