उन्हाळी भटकंती: कोयनानगरजवळचा भैरवगड ( Bhairavagad near Koyananagar )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
4 May 2018 - 12:31 pm

महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर सपाट असणारा देश आणि समुद्रसपाटीला असणारे कोकण यांच्या मधोमध एखाद्या द्वारपालासारखा सह्याद्री खडा आहे. उंच सुळके, बेलाग शिखरे, अडचणीच्या खिंडी, नाळेच्या वाटा आणि जणु बोट धरुन उतरायला लावणारे घाट वाटा इथे आहेत. यावर नजर ठेवायला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अनेक गड, किल्ले फार प्राचीन काळापासून उभारले आहेत. अश्यापैकी एक गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग म्हणजे कोयनेजवळचा "भैरवगड". महाराष्ट्रात चार भैरवगड आहेत, त्यापैकी कोयनेच्या म्हणजेच सध्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात , सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा पुढे कोकणात झुकलेला हा गड तसा दुर्लक्षित आहे. या परिसराचे मुख्य संरक्षण म्हणजे दिवसाही सुर्यप्रकाश जमीनीवर पडू न देणारे गर्द जंगल. यातच वासोटा, प्रचितगड यासारख्या महत्वाच्या किल्ल्यामधे पालीचा किल्ला, जुंगटीचा किल्ला, जंगली जयगड आणि भैरवगड अशी दुर्गसाखळी या परिसरात आहे. पैकी पालीचा किल्ला आणि जुंगटीचा किल्ला या परिसरात आता कोणालाही सोडले जात नाही, त्यामुळे तिथे आता मानवी वावर नाही. आत्ताच जंगली जयगडाचा राबताही बंद केला आहे. तेव्हा रहात राहिला भैरवगड. आज आपण तिथेच जाणार आहोत.
Bhairavgad 1
भैरवगड हा कोयनानगर विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या (सह्याद्रीच्या) सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाहीत. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.मुळात भैरवगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्तपणे फिरता येत नाही. यासाठी आधीच कोयनानगरच्या वनखात्याकडून इथे येण्याची परवानगी काढावी. कोयना वनखात्याच्या ऑफिसचा दुरध्वनी क्रमांक-(०2372) 284091, तरीही अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास रुपये ५०,०००/- दंड / ३ वर्षाची सजा होऊ शकते.
Bhairavgad 2
( भैरवगड परिसराचा नकाशा )
भैरवगडावर जाण्यासाठी ६ वाटा आहेत.
१) हेळवाकची रामघळ मार्गे :-
हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.. ही रामघळ पाहून , रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.
वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्यास पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन हेळवाक मार्गे भैरवगडापर्यंत जाता येते. (हेळवाक ते भैरवगड अंतर साधारणपणे २० किमी आहे.) सध्या भैरवगडावर किंवा जवळच्या भैरवनाथ मंदिरात मुक्काम करण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा पर्याय बाद झाला असे म्हणले तरी चालेल. या रस्त्याने जायचे झाले तर चाफ्याचा खडक या धनगरवाड्यातील वाटाडे वाट दाखविण्यासाठी अडवून मोठी रक्कम मागतात असा अनुभव आहे.

२) दुर्गवाडी मार्गे :-
या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून डेरवण मार्गे दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणत: १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्‍या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे - गोवळ पाती गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
दुर्गवाडीमार्गे भैरवगडाला जावयाचे झाल्यास एस्.टी. बसचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे-चिपळूणवरुन पहाटे ४.००, ७.५०,११.००, २.१५, ४.४५ ( मुक्कामी) तर दुर्गवाडीवरुन ७.३०,८.००,९.३० आणि संध्याकाळी ४.०० अशी बसची सोय आहे.
३) गोवळ पाती मार्गे :-
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जातांना "आसूर्डे फाटा" २१ किमीवर आहे. तिथून डावीकडील रस्ता २२ किमीवरील गोवळ पाती गावापर्यंत जातो.(यातील शेवटचे ५ किमी कच्चा रस्ता आहे.) गोवळ पाती गावातून गडावर जाण्यासाठी गावकर्‍यांनी पायर्‍या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायर्‍यांनी जाता येते.(येथे येण्यासाठी गावातून १.३० तास लागतो). पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात आपण भैरवगडावरील मंदिरात पोहोचतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
४) गव्हारे मार्गे :-
गडावर जाण्यासाठी गव्हारे (गोवारे) गावातूनही वाट आहे. हेळवाक किंवा संगमनगर पुलमार्गे गव्हारे (गोवारे) गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्‍या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन कोयनानगर - गव्हारे (गोवारे) - पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरा पर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
५ ) चिरंबे-नाव- कोळणे मार्गे :-
कोयनानगरच्या अलिकडे संगमनगर ( धक्का ) नावाचा कोयना नदीवर पुल आहे, तो ओलांडून चिरंबे-नाव-कोळणे मार्गे पाथरपुंज गाव गाठता येते. वाटेत एका ठिकाणी वनखात्याचे कंपाउंड लागते. हा कच्चा जीप रस्ता आहे. पाथरपुंज गावातून असाच कच्चा जीप जाण्याजोगा रस्ता थेट भैरवगडाजवळच्या भैरवनाथ मंदिरापर्यंत जातो.
६) मोरगिरी मार्गे :-
या परिसरात उभ्या रहात असलेल्या पवनचक्क्यामुळे पाटण- मोरगिरी- धावडे-गोकुळ- गोठणे-मळे-पाथरपुंज असा ट्रक जाण्यायोग्य कच्चा रस्ता आहे. यामार्गेही स्वताची मोटारसायकल किंवा जीप यासारखे वाहन असेल तर येणे शक्य आहे. सकाळी लवकर पाटणपासून किंवा कोयनानगरवरुन सुरवात केल्यास एका दिवसात भैरवगड पाहु शकतो.
भैरवगड कोणत्याही ऋतुत जाण्यायोग्य असला तरी तेथे जाण्याचा रस्ता सध्या वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने पावसाळ्यात जाण्यास परवानगी मिळत नाही, तसेच ३१ डिसेंबर, १ जानेवारी, बुध्दपौर्णिमेचा दिवस आणि त्याच्या आदला दिवस ( प्राणीगणनेमुळे ) परवानगी मिळत नाही. तरीही भैरवगडावर पावसाळ्यात जाण्याची परवानगी मिळाल्यास जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो, हि गोष्ट लक्षात ठेवावी आणि यापासून बचाव करण्यासाठी मीठ व हळद सोबत घेऊन जावे.
Bhairavgad 3
या पुर्वी "चाफ्याचा खडक" या हेळवाकजवळच्या धनगरवाड्यामार्गे मी व माझा मित्र प्रशांत याने जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटाड्यांनी वाट दाखविण्यासाठी खुपच मोठी रक्कम मागितली. ती देणे परवडणारे नव्हते. तसेच हा रस्ता खुप लांबचा आहे. नुसत्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहचण्यासाठीच जवळपास संपुर्ण दिवस जातो.
Bhairavgad 4
धनगरवाड्यातून थेट भैरवगडाला जाण्यासाठी एक वाट आहे, तर दुसरी वाट रामघळ पाहून तिथून थेट वर चढून या पहिल्या वाटेला मिळते. या ओढ्यात पाणी भरुन चालायला सुरवात केली कि दहा मिनीटात एका पठारावर पोहचतो. तिथे उजवीकडची गुरांची वाट सोडून देउन डावीकडची मळळेली वाट पकडायची. हि वाट एका दरीच्या काठाकाठाने गर्द झाडीतून डोंगराच्या उघड्या टोकावर येते. रामघळीपासून ईथेवर येण्यासाठी साधारण दिड तास लागतो. इथून खाली नदीचे पात्र दिसते. त्या दिशेने उतरुन नदी पार करायची. यानंतर समोर जुन्या वाघेना या गावाचे अवशेष दिसतात. आज इथे एखादे झोपडे आहे. १९६७ च्या कोयनेच्या प्रलयांकारी भुकंपानंतर हे गाव येथून उठले.
Bhairavgad 5
पुढे नदीच्या उजव्या काठाने परंतु टेकडीजवळच्या रस्त्याने निघायचे. पंधरा मिनीटात रस्ता पुन्हा दाट झाडीत शिरतो. त्या झाडीतुन वाट एका ओढ्याजवळ वाट उतरते.
Bhairavgad 6
हा ओढा ओलांडला कि वाट खड्या चढावरुन वर एका गवताळ पठारावर पोहचते. हि वाट नंतर पाथरपुंज ते भैरवगड या रस्त्याला मिळते. या वाटेच्या शेवटी आपल्याला भैरवनाथाचे मंदिर दिसू लागते. हि सर्व वाटचाल म्हणजे अनोखी जंगल भ्रमंती आहे. हिचा अवश्य अनुभव घ्यावा अशीच हि भ्रंमती आहे, मात्र वनखात्याने भैरवनाथ मंदिरात आणि या परिसरात मुक्कामाला बंदी केल्याने एका दिवसात हि वाटचाल शक्य असल्यासच हा पर्याय निवडावा. तेव्हा या मार्गे जायचे तर आम्हाला मुक्कामाची तयारी करुन जाणे भाग पडले असते. अखेरीस रामघळ पाहून परतण्याचा निर्णय घेतला.
धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
Bhairavgad 7
एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
Bhairavgad 8
या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. रामघळीच्या माथ्यावरुन पावसाळी धबधबा पडतो.
Bhairavgad 9
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
Bhairavgad 10
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
धनगरवाड्याचा पर्याय बाद झाल्यानंतर आम्हाला चिरंबेमार्गे नाव ते पाथरपुंज ह्या गाडीरस्त्याविषयी समजले. या सगळ्या अडचणीचा विचार करुन आम्ही चौघा मित्रांनी भैरवगड मोहिम आखली आणि एका सुप्रभाती पुरेशी तयारी करुन बाईकवरून संगमनगर ( धक्का ) पुल ओलांडून चिरंबे मार्गे नाव या गावाकडे निघालो.त्यावेळी हा संगमनगर पुल जेमतेम ऊंचीचा होता. पावसाळ्यात बहुतेक आठवडा- दहा दिवस हा कोयनामाईच्या पोटात गुडूप व्हायचा आणि पैलतीरावरच्या गावकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागायचे, 'पाउस उघडीप केव्हा देतोय'. आता मात्र उंच पुल झाला आहे.असो.
पुल ओलांडून चिरंबे गावात पोहचलो, तो शाळकरी मुले भेटली, त्यांनी ' पाथरपुंज डोंगरात लई लांब हाये आणि ततंपासून बैरामगड पुढ हाये, रस्ता बी लयी खराब हाय' हि शुभवार्ता दिली. अर्थात कोणत्याही परिस्थितीत भैरवगड बघायचाच हा निश्चय केलेल्या आमच्या चमुच्या मनोधैर्यावर कोणताही परिणाम झाला नाही, "अभी नही तो कभी नही".
चिरंब्यावरुन एक रस्ता नाव या गावाकडे वर चढत होता, आम्ही या रस्त्याने जाणार आहे हि खबर पसरल्यामुळे कि काय, सार्वजनिक बांधकाम खात्याने नेमका तोच मुहुर्त काढून रस्त्याच्या पिचिंगचे काम हाती घेतले होते. रस्त्यावर टोकदार खडी पसरुन त्यावरुन रोडरोलर फिरवून रस्त्याचे काम सुरु होते. त्यावरुन बाईक नेताना प्रचंड कसरत करावी लागली. रस्त्याच्या मधून गाडी न्यावी, तो टोकदार दगडामुळे चाक पंक्चर होण्याचा धोका, कडेने न्यावी, तर त्याबाजुला दरी. शेवटचा चढ तर माती भरला होता, त्या मातीत चाक रुतून जागेवर फिरु लागले आणि मातीत रुतायला लागले.अखेरीस कसेबसे नाव गावाच्या सपाटीवर आलो आणि लांबवर कोयना धरणाच्या भिंतीचे आणि निळ्याशार शिवसागराचे दर्शन झाले. मात्र फार वेळ घालवून चालणार नव्हते, अजून बराच पल्ला गाठायचा होता. या सपाटी नंतर वाट थोडी खाली उतरली आणि एक अवघड वळण घेउन वर चढू लागली. हि वाट मस्त, दाट झाडीतून जात होती. मात्र दगडाच्या टेंगळावरुन गाडी चढवताना तोंडाला फेस आला. इथेच वनखात्याची हद्द दर्शविणारे कंपाउंड आणि गेट लागले. अर्थातच चौकीदाराचा पत्ता नव्हता. यानंतर पुन्हा मातीचा रस्त्याने एक खडे वळण घेउन वरच्या सपाटीवर पोहचलो. वाटेत नजर जावी तिकडे हिरव्या रंगाचा दाट वनसागर पसरला होता. जंगल विलक्षण बोलके होते, पार्श्वभुमीला निरनिराळ्या पक्षांचे आवाज आणि वन्यप्राण्यांचे साद चालु होते. या रस्त्याने दर रविवारी कोयनानगरवरुन खाजगी वहातुक करणारी जीप येते असे आम्हाला समजले. हे असे जीप ड्रायव्हर शोधून त्यांना फॉर्म्यला वनचे ट्रेनिंग द्यायला हरकत नाही.
सपाटीवरुन पुढे जातो, तो कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले. या गर्द अरण्यात अजून काही गावे चिकाटीने वस्ती करुन राहिली आहेत, त्यापैकी एक, "कोळणे". काही गुंठा जमीन, त्यात येणारी भात, नाचणी अशी पिके, जंगलाच्या कृपेने मिळणारा आंबा, फणस, करवंदे, जांभुळ हा रानमेवा कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण येथे विकायचा हेच काय ते उत्पन्नाचे साधन असणारे हे वनवासी काय चिकाटीने बापजाद्याने वसवलेल्या जमीनीवर तगून राहिलेत.
यानंतर एक ओढा ओलांडून आमचा प्रवेश पाथरपुंज या शेवटच्या मानवी वस्ती असलेल्या गावात झाला. इथून पुढे थेट कोल्हापुर-रत्नागिरी मार्गावरच्या उदगिरी या गावापर्यंत मानवी पाउलखुणा सापडत नाहीत. फक्त आणि फक्त जंगल. पाथरपुंज अड्यानिड्या जागी असले तरी इथे प्राथमिक शाळा आहे, गावात वीज आली आहे आणि घरांवर चक्क डिशअँटेना आहेत. मागे आम्ही यामार्गे प्रचितगडाला जाण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा गावातील परशुराम नावाच्या वाटाड्याला बरोबर घेतले होते. तो रस्ता दाट जंगलात इतका हरविला होता कि वाट न सापड्लयाने आम्ही एका सड्यावर रात्री मुक्काम केला आणि परत आलो. आम्ही पाथरपुंजात प्रवेश करायला आणि हा परशुराम समोर यायला एकच गाठ पडली. एकदाची ओळख पटल्यानंतर त्याने आम्हाला पुन्हा येण्याचे आवतान दिले आणि भैरवगडाकडे जाणारी वाट दाखवली.
भैरवगड ते प्रचितगड असा 2 दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात करावा लागतो. त्यासाठी तंबू बरोबर घेऊन जावा. जंगलात वन्य पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही, तसेच जंगल खात्याच्या कारवाईच्या भितीने सध्या मात्र वाटाडेही प्रचितगडावर यायला तयार होत नाहीत.
Bhairavgad 11
हा रस्ता एखादी जीप जाईल ईतका प्रशस्त पण कच्चा आहे. याच रस्त्याला एके ठिकाणी हेळवाक-कोंढावळ धनगरवाडामार्गे येणारी वाट मिळते.
अर्ध्या- पाउण तासातच आम्ही एक मस्त उतार ओलांडून भैरवनाथ मंदिरासमोर दाखल झालो.
Bhairavgad 12

Bhairavgad 13
मंदिरा समोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो.
Bhairavgad 14

Bhairavgad 15
पुर्वी हे मंदिर प्रशस्त आणि कौलारु होते. आता मात्र या राहाळातील मुंबईला रहाणार्‍या गावकर्‍यांनी एकत्र येउन मंदिराचे नवनिर्माण केलेले आहे.
Bhairavgad 16
आता मंदिर तर प्रशस्त झालेले आहेच, पण पुढे पत्राचा मांडव केल्याने मंदिरात सध्या किमान शंभरजण आरामात झोपु शकतात.
Bhairavgad 17
पण आम्ही नेमक्या कोणत्या वाईट मुहुर्तावर बाहेर पडलो होतो याची कल्पना नाही, कारण इथेही मंदिराचे बांधकाम सुरु होते. बांधकाम करणारर्‍या गंवड्यांची लगभग सुरु होती. मात्र बांधकामामुळे मंदिराचे दरवाजे बसवले नव्हते, सहाजिकच बंदिस्त मंदिरात सुरक्षित मुक्काम आम्हाला करता येणार नव्हता.
Bhairavgad 18
वन्यप्राणी विशेषतः अस्वल, गवे आणि बिबटे असणार्‍या जंगलात उघड्यावर मुक्काम म्हणजे आत्मघात ठरला असता, सहाजिकच मंदिराच्या स्लॅबवर चढून आम्ही वर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
Bhairavgad 19
बरोबर आणलेल्या कॅरीमॅट, शेकोटी पेटविण्यासाठी आणलेले रबरी टायर, सॅक या सर्व वस्तुंची स्लॅबवर व्यवस्था लाउन आधी भैरवनाथाच्या दर्शनासाठी गाभार्‍यात गेलो.
Bhairavgad 20
दरीच्या काठाशी या मंदिराने अचुक जागा पकडली आहे. आत अरण्याचा राजा भैरोबा डोळे वटारुन बसला आहे.
Bhairavgad 21
मंदिरात भैरी देवी, श्री तुळाई देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फुट ऊंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र वद्य प्रतिपदेला इथे यात्रा असते, तीच ईथली वर्दळ, एरवी सुट्टीदिवशी येणारे गडभटके आणि हौशी पर्यटक सोडले तर या भैरवनाथाला सक्तीचा एकांतवासच नशीबी लिहीला आहे.
Bhairavgad 22
मंदिराच्या समोरच एक धातुचा शिवपुतळा पाटणच्या दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका चौथर्‍यावर बसविलेला आहे,
Bhairavgad 23
तिथेच शेजारी माहितीफलक देखील लावण्याचा स्त्युत्य उपक्रम केला आहे.
Bhairavgad 24
मुक्काम करायचा तर पाण्याची व्यवस्था महत्वाची. मंदिराच्या मागच्या बाजुला मंदिराच्या कोकणातील दुर्गवाडी गावात उतरणारी वाट आहे या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते. आम्ही एन मे महिन्यात गेल्याने पाणी खुपच कमी होते, मात्र थोड्या थोड्या वेळाने पाणी झिरपून विहीर भरत होती. आमच्याकडच्या बाटल्या भरुन एका सॅकमधे घेतल्या आणि गडदर्शन करण्यासाठी निघालो.
Bhairavgad 25
( भैरवगडाचा नकाशा )
Bhairavgad 26
बहुतेक किल्ल्याप्रमाणे भैरवगडसुध्दा एका चिंचोळ्या धारेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडला गेला आहे.
Bhairavgad 27
उजव्या बाजुला दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी, पाथ, मंजुत्री, फुरुस हि गावे उत्तरेला दिसत होती, पैकी दुर्गवाडी गावातून एक वाट पुर्ण सह्याद्रिची धार चढून भैरवनाथ मंदिराच्या मागे येते.
Bhairavgad 28
तर वाटेच्या दक्षिणे बाजुला म्हणजे डाव्या हाताला एक वाट गोवळपाती गावात उतरते. या वाटेने थोडे उतरुन गेलो, तो हादरलोच. एका गव्याचा शेणाचा परातभर पो पडला होता. म्हणजे गवे या वाटेने ये जा करत होते.
Bhairavgad 29
गव्यांना आज तरी या वाटेने येण्याची बुध्दी होउ नये अशी प्रार्थना करुन आम्ही गडाच्या दिशेने निघालो. वाटेत दगडाच्या कपारींचा खच पडला आहे. वर कड्यात एक नैसर्गिक गुहा आहे. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक बांधीव बुरुज लागला. या बाजुने होणार्‍या सैन्याच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हा बुरुज उभारला असावा.
Bhairavgad 30
या बाजुला सह्याद्रीची कातळधार उतरत्या उन्हात मोठी मनमोहक दिसत होती.
Bhairavgad 31
गडाचे कोकणात कोसळणारे कडे आणि त्याला चिकटलेला सुळका मोठा थरारक दिसत होता.
Bhairavgad 32
गडाला तीन प्रवेशद्वारे असली तरी त्यातल्या त्यात पहिला दक्षिणमुखी दरवाजा थोडाफार तग धरुन आहे, बाकीचे दरवाजे नामशेष झालेले आहेत. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.
Bhairavgad 33
भैरवगड दोन टेकड्यांनी मिळून बनला आहे. दोघांच्या खिंडीमधुन पलीकडे जाउन पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते. इथून खाली गोवळपात या गावाकडे उतरणारी कड्याची धार दिसते.
Bhairavgad 34
याच बाजुला पुन्हा पुर्वे बाजुच्या टेकडीवर आले कि एक कातळकोरीव पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. इथे थोडी सपाटी आहे. तिथे एक चुल आणि जळालेली लाकडे दिसली. याचा अर्थ आम्ही येण्याच्या आधी कोणीतरी गडावर मुक्काम केला असणार.
Bhairavgad 35
पाण्याच्या टाक्यातील पाणी मनसोक्त पिउन आणि बाटल्यात भरुन आम्ही दाट झाडीतून माथ्याकडे निघालो.
Bhairavgad 36
माथा तसा चिंचोळा आणि फारचे अवशेष नाहीत, बहुधा झाडीने गिळून टाकले असावेत. मात्र सगळ्या बाजुने खोल दर्‍या आहेत.
Bhairavgad 37
माथ्यावरुन समोर भैरवनाथ मंदिर आणि तिथे काम करणार्‍या गवंड्याचा कोलाहल एकु येत होता. मे महिना असल्याने माथ्यावरची जंगली जांभळांची झाडे भरली होती, अर्थातच त्याचा मनसोक्त आस्वाद घेउन खाली उतरलो.
Bhairavgad 38
गडावरून लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. हवा स्वच्छ असेल तर दक्षिणेला प्रचितगडाची धार तर उत्तरेला जंगली जयगडाची सोंड दिसते. ह्या माथ्यावर उभारलो तर गडाची उंची ३००४ फुट चांगलीच जाणवते. गडावर मानवी वावर फार नसला तरी जनावरांचा बर्‍यापैकी राबता असल्याचे ठश्यावरुन जाणवते.
मंदिराकडे येणार्‍या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे, येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.
खाली उतरुन मंदिरात परत येउन टेकतोय, तोच गवंड्यानी आवराआवर सुरु केली. फार उशीर होण्याच्या आतच त्यांना पाथरपुंज गाठायचे होते. गंवड्यांनी परतीचा रस्ता पकडला आणि एकदाचे त्यांचे आवाज यायचे बंद झाले आणि आम्हाला जाणिव झाली, आपण या अटंग्या वनात एकटे आहोत. जवळची मानवी वस्ती अगदी गाडीने गेलो तरी अर्ध्या-पाअण तासावर होती. सुर्यास्त झाला तसे जंगलातून निरनिराळे आवाज भिती घालू लागले. जंगलातील मुक्कामाचा एक थरारक अनुभव आम्ही घेत होतो. रात्री पाणवठ्यावर जायला लागु नये म्हणून पुरेसे पाणी आणून ठेवले होते. जरी देवळाच्या स्लॅबवर आम्ही सुरक्षित असलो, तरी नेमेके एक झाड थेट स्लॅबवर आलेले होते, त्या झाडावर चढून एखादा बिबटा आमच्यापर्यंत पोहचू शकत होता. अखेरीस चौघांपैकी दोघा दोघांनी तासतासभर जागे रहायचे ठरविले आणि खिचडी शिजायला ठेवली. खाली कोकणातील रेंज असल्याने घरच्यांना फोन करुन झाले आणि इतरही फोन येत होते. केलेला फोन कोठे घेतला जातोय हे बघायची सोय असती तर आम्ही कोयनेच्या जंगलात कशाला कडमडलोय? हा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असता.
खिचडी शिजता शिजता गप्पा सुरु झाल्या. विषय वळाला या गडाच्या ईतिहासाकडे. या गडाच्या जवळून उतरणार्‍या घाटवाटा तश्या दुय्यम असल्याने आणि गडावर जागा बेताची असल्याने या गडाला ईतिहासात फार महत्व नाही.या गडाचा वापर केवळ टेहळणीसाठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते. ग्रँट डफच्या मते, पन्हाळ्याच्या दुसरा शिलाहार भोजाने या गडाची उभारणी केलेली असावी. यानंतर बहामनी कालखंडापासून शिर्के घराण्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणून भैरवगड प्रसिध्द होता.इ.स. १४५३ मधे मलिक उत्तेजारने हा गड घेतला. मराठी कागदपत्रामधे गडाचा उल्लेख सारंगगड आणि भैरवगड अश्या दोन्ही नावानी येतो. गडावर असलेल्या काळभैरव मंदिरामुळे याला भैरवगड किंवा बहिरवगड म्हणतात. शिवकाळात आदिलशाहीचे या प्रदेशावर नाममात्र वर्चस्व होते. शिवाजी महाराजांनी सन १६६१ च्या सुमारास दक्षिण कोकण जिंकण्यासाठी स्वारी केली, त्यात शृंगारपुरवगैरे ठिकाणे घेतली, त्यात भैरवगड त्यांच्या ताब्यात आला. तो अखेरपर्यंत मराठ्यांच्या अंमलाखाली राहिला. मराठ्यांबरोबर झालेल्या शेवटच्या युध्दात २३ मे १८१८ रोजी हा गड कर्नल केपनने ताब्यात घेतला.
Bhairavgad 39
अखेर खिचडी आणि चुलीवर भाजलेले पापड खाउन आळीपाळीने जागे रहात रात्र ढकलू लागलो. रात्रभर चोहोबाजुला पसरलेल्या जंगलामधून आवाज येत होते. मात्र मी जागा असताना देवळाजवळ आलेल्या रानमांजराखेरीज कोणत्याही वन्यप्राण्याने दर्शन दिले नाही. खरेतर ट्रेकसाठी भल्या पहाटे उठणे, दिवसभर बाईक चालवून गडाचा पायथा गाठणे आणि दुर्गभ्रमंती याने थकलेल्या शरीराने जागे रहाणे अवघड जात होते, तरी कशीबशी रात्र सरली. दिवस उगवला तसे चक्क एन मे महिन्यात धुके अनुभवायला मिळाले. कोकणातून दरीतून ढग अक्षरशः उसळत वर येत होते. हे अनोखे दृष्य आम्ही देवळावर बसुनच पहात होते. किमान सात वाजल्याशिवाय खाली उतरु नका, अशी सुचना मी सर्वांना केली होती, कारण देवळामागे असलेल्या विहीरीमुळे या परिसरात भल्या पहाटे प्राणी येतात याची मला कल्पना होती. मागे पुण्याचा एक ग्रुप याच देवळात मुक्काम करुन होता. त्यांच्यापैकी एकजण पहाटे पाणी आणण्यासाठी मागच्या विहीरीवर गेला, तर नेमक्या त्याच वेळी तिथे आलेल्या गव्याने त्याला शिंगाने जखमी केले होते.
राहिलेल्या खिचडीचा नाष्टा उरकून बाईकवर स्वार होउन गडाचा निरोप घेतला आणि त्याच प्रशस्त रस्त्याने निघालो, तो एका भल्या मोठ्या शेकरूने झाडावर दर्शन दिले. कॅमेरा काढेपर्यंत ती उड्या मारत अदृष्य झाली सुध्दा. पुन्हा एकदा रस्त्याची कसरत करुन संगमनगर पुलाजवळ जेवणासाठी थांबलो. मागच्या बाजुला पसरलेला गर्द जंगलाच्या वनराईचे घोंगडे पांघरलेला सह्याद्रीचा निरोप घेतला. एक अनगड दुर्ग बघण्याचे स्वप्न पुरे झाले होते.

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटिअर
२ ) आव्हान- आनंद पाळंदे
३ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतीश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७ ) http://pkothavade.blogspot.in/ हा ब्लॉग

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

4 May 2018 - 1:04 pm | दुर्गविहारी

मी हा धागा लिहीत असताना कोयनेच्या जंगलात काही ट्रेकर्सना पकडल्याची बातमी आली. हि लिंक
डोंगर चढता चढता तुरुंगात पोहचले, या ट्रेकर्सनी केलेली चूक तुम्ही करू नका
या साठिच धाग्यात स्पष्ट लिहून सुध्दा लोक अशा चुका करतात.

सुमीत's picture

4 May 2018 - 3:12 pm | सुमीत

मला वाटते, खेड तालुक्या पासून पुढे (कोयना समांतर) सर्व सह्याद्रिचा भाग वनखात्याने संरक्षित केला आहे.
बरेचसे दुर्गम किल्ले ह्या भागात येतात.
असो, हा ट्रे़क छान पण थरारक झाला.

उत्तम माहिती. जंगली जयगड, पाथरपुंजेचा भैरवगड, प्रचितगड हे किल्ले आता सामान्य दुर्गभटक्यांना जायला अवघड होऊन बसले आहेत. वनखाते आता प्रवेशबंदी वगैरे जास्त जागरूकपणे राबवते आहे ही चांगली गोष्ट आहे. पण योग्य ती परवानगी घेऊन निसर्गप्रेमींना अशा कोअर एरियात जाण्याची मुभा जास्त सुलभपणे दिली गेल्यास वनसंवर्धनास त्याचा फायदाच होईल असे वाटते.

प्रचेतस's picture

5 May 2018 - 7:02 am | प्रचेतस

सहमत आहे

अभिजीत अवलिया's picture

6 May 2018 - 11:50 am | अभिजीत अवलिया

सहमत.
गड आवडला.

दुर्गविहारी's picture

18 May 2018 - 10:38 am | दुर्गविहारी

या दिशेने वनखाते प्रयत्न करत आहे. चांदोलीवरुन सध्या झोळंबीच्या सड्यापर्यंत जाण्याची परवानगी आहे. तिथून थेट कोयनेपर्यंत ट्रेकरूट तयार करुन मर्यादित प्रवेश देण्याची योजना आहे. जंगलात मर्यादित स्वरुपात मानवी वावर राहिला तर चोरट्या शिकार्‍यांवर वचक रहातो. त्यामुळे पुढे कोयना अभयारण्यात किमान जंगली जयगड परिसरात तरी अशी परवानगी द्यावी असे वाटते. नुकत्याच दिलेल्या भेटीत वनमंत्र्यांनी तसे आश्वासन दिले आहे, पाहु या काय होते.

उपेक्षित's picture

4 May 2018 - 8:32 pm | उपेक्षित

हा हि भाग जबरदस्त झालाय, मस्त

प्रचेतस's picture

5 May 2018 - 7:06 am | प्रचेतस

जबरदस्त लिहिलंय.
ह्या भागातील सर्वच किल्ले दाट रानामुळे दुर्गम आहेत आणि आता व्याघ्रप्रकल्प झाल्यामुळे तेथे जाणे जवळपास अशक्य झाले आहे.

लोनली प्लॅनेट's picture

6 May 2018 - 12:24 pm | लोनली प्लॅनेट

मस्त ट्रेक झाला... फारच छान

मस्तच दुविसाहेब . मजा आणता तुम्ही तुमच्या भटकंतीतून . सुंदर सादरीकरण नेहेमीप्रमाणे . त्यातही माझं जवळचं ठिकाण निवडल्याने अजूनच मजा आली वाचताना . धन्यवाद

दुर्गविहारी's picture

18 May 2018 - 10:24 am | दुर्गविहारी

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.