फसता फसता जमलेली गोष्ट

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
26 Apr 2018 - 1:10 am

मी शक्यतो मंगळवारी कोणतही महत्वाचे काम करत नाही. काही तरी सुचलेलं लिहूण काढणे किंवा फुटपाथवरील पुस्तकांची, रद्दीची, एमपी3ची दुकाने धुंडाळणे, जुन्या बाजारात भटकणे किंवा एखाद्या मित्राला सरप्राईज व्हिजीट देणे याच भानगडीत दिवस जातो. बऱ्याच जणांना वरिलपैकी एकही गोष्ट आवडत नाही. पण माझ्याकडे असलेल्या अनेक दुर्मीळ गोष्टी याच सवयीतुन मला मिळाल्यात. या मंगळवारी मी अति ऊन्हामुळे बाहेर जायचे टाळले होते. घरीच पुस्तके विषयवार लाव, लॅपटॉपची सफाई, बॅकप घे, पुस्तके विषयवार लाव यात गुंतलो होतो. इतक्यात बेल वाजली. मी डोअर आय मधुन पाहीले तर मित्र हात हलवत होता. आता हे साहेब कशाला आले? असं वाटलं. कारण दोन-तिन पुस्तके जाणार हे नक्की. पण दार ऊघडल्यावर मात्र प्रसन्न वाटलं. कारण त्याच्या हातात बटरस्कॉच आणि अफगान ड्रायफ्रुट आईस्क्रीमचे फॅमीली पॅक होते. मी तोंडभर हसुन मित्राचे स्वागत करुन त्याला घरात घेतलं. बायकोने दिलेले पाणी पिऊन “वहिणी पाणी मस्त झालतं हां!” सारखा रटाळ विनोद करुन हा मला पुस्तके वगैरे आवरायला मदत करायला लागला. हाकेच्या अंतरावर रहात असूनही हा प्राणी काही काम असल्याशिवाय सहसा माझ्याकडे फिरकत नाही. पण बराच वेळ झाला तरी हा ईकडच्या तिकडच्याच गप्पा मारत होता. खरंतर हा पेशव्यांच्या साडेतीन शहाण्यांपैकीच एक व्हायचा. पक्का मुत्सद्दी. एकदम बोलघेवडा. सगळ्या विषयांवर बोलायची कला साधलेला. कधी कुणाला शब्दात गुंतवील ते समजणार नाही. त्यामुळे मी सावध होतो. पण माणूस मोठा दिलदार. आम्हाला जोडणारी तार म्हणजे खाणे, वाचणे आणि किशोरी अमोणकर. यातल्या एकएका विषयावर आम्ही रात्र जागवू शकतो.

आम्ही सगळी पुस्तके व्यवस्थित लावून झाल्यावर बाहेर आलो. आईस्क्रीमचे दोन्ही फ्लेवरचे एक एक चांगले लठ्ठ स्लाईस कापुन डिशमध्ये घेतले आणि सोफ्यावर पुढच्या गप्पा सुरु केल्या. लहाणपणी घरी बनवलेली आईस्क्रीम, शाळेपुढे मिळणारी वडाच्या पानावरची कुल्फी, म्हातारीचे केस, करवंदे-कैऱ्या यावरुन आमची गाडी हळू हळू प्रांतिय खान्याकडे वळली. हैद्राबादला खाल्लेली बावर्ची आणि पॅराडाइजची बिर्याणी, टुंडे कबाब खायला जोगेश्वरीला गेलो असताना झालेला आमचा पोपट, औरंगाबादजवळ एका धाब्यावर चुकून मिळालेली काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगाची अप्रतिम भाजी, खानदेशात एका मित्राने त्याच्या शेतात दिलेली भरीत आणि कळण्याच्या भाकरीची भन्नाट पार्टी असं काय काय आठवत समोरची आईस्क्रीम संपवायचं काम चालू होतं दोघांचे. तोवर बायकोने अजुन एक एक स्लाइस आणुन दिली व “आता संपले” ही खोचक सुचनाही केली. कारण आम्ही आईस्क्रीम सुद्धा पोटभर खातो हो.

मित्र म्हणाला “अरे मावशीचा फोन होता पंधरा दिवसांपुर्वी, म्हणाली की बरेच दिवस झाले पोरांना पाहून. येवून जा. मलाही आठवण येतच होती. मग सोमवारची रजा टाकून शुक्रवारी संध्याकाळी निघालो. वाटेतच काही बाही खावून रात्री बारापर्यंत पोहचलो मावशीकडे. वाट पहात बसली होती रे तोपर्यंत.”
मीही “कशीए मावशी?” वगैरे विचारले.
मला वाटले गप्पांचा ट्रॅक बदलतोय म्हणजे हा आता मुद्यावर येणार. पण त्यानंतर त्याने मला काहीही बोलू न देता तास-दिड तास मावशीने या तिन दिवसात काय काय ‘खावू’ घातले याचे असलं भारी वर्णन केले की विचारता सोय नाही. हा वडे, सागोती आणि सोलकढीवर थांबला असता तर काही हरकत नव्हती. पण कुठेच्या कुठे पोहचला. मुलांसाठी मावशीने तवसोळी आणि शिरवाळे कसे केले, पातोळ्या काय सुंदर लागल्या, बायकोला आवडते म्हणून आंबोळ्या आणि काळ्या वाटाण्याचे सांबार कसे केले, हलव्याची कळपूटी कसली टेस्टी झाली होती हे आणि काय काय विचारू नका. बरं हे वर्णन अगदी रेसिपीसह. आम्ही पडलो घाटी. आधिच मासे आम्हाला दुर्मीळ, त्यात समुद्री माशांबद्दल तर बोंबच. आम्ही ‘गजाली’, ‘मालवणी' वगैरे नाव असणाऱ्या हॉटेलात जावून मासे खाणार. तिथे जी चव मिळते तिलाच कोकणी चव समजून खूष होणार. कुर्ल्या, तिसऱ्या वगैरे खायचं धाडस करणार नाही शक्यतो. कधी मासेवालीकडे गेलोच तर “कमी काटे असलेला मासा द्या” म्हणनार. हे आमचे माश्यांबद्दलच ज्ञान! खरा मासेखावू म्हणतो की “काटा जितका जास्त तितका मासा चवदार.” आम्ही काय बोलणार? आम्ही घाटावरचे लोक जेवताना तोंडात खवट शेंगदाणा आला तर तो न चावता बरोबर तोंडाबाहेर काढतो तसे हे मासेखावू जेवताना सहज तोंडातून टोकदार काटे काढतात. मला तर तो चमत्कारच वाटतो. माशांशी नावाने जवळीक साधणारी आपली आवडती डिश म्हणजे मासवड्या. मासवड्या असल्या की मी कंबरेचा पट्टा सैल करुनच जेवायला बसतो. पण मासे म्हटलं की मी ऊगाच याच्या त्याच्या तोंडाकडे वेंधळ्यासारखे पहाणार. माझी चुळबुळ आणि अस्वस्थता पाहून मित्राने आवरते घेतले. म्हणाला “जरा कॉफी होवून जावूद्या मस्त वहीणी. ऊशिरही झालाय, निघायला हवे.” मग मीच ऊठून मिक्सरच्या भांड्यात दही, जायफळ, साखर, भरपुर कॉफी आणि बर्फाचे खडे टाकून मस्त फिरवले. बियचे ग्लास काढले, कॉफी ओतली आणि दोघांच्याही हातात दिली. मीही घेतली. मित्र आता बायकोला विचारत होता, “काय वहिणी, कडवे वाल आहेत का संपले? ऊन्हं किती वाढलीयेत, पांढरा कांदा आणायला हवा. आमची चिंच परवाच संपली असं ही म्हणत होती. करंदीही संपली त्यामुळे वांगी बटाट्याची भाजी केलीच नाही हिने बरेच दिवस वगैरे वगैरे” याला कोणताच विषय वर्ज्य नाही. दहा पंधरा मिनिटे गप्पा मारून, तिघांचेही ग्लास स्वच्छ धुवून, पुसुन जागेवर ठेवून मित्र गेला. बायको माझ्याकडे आणि मी बायकोकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. हा नक्की आला कशाला होता? मोकळ्या हाताने कसा गेला? पुस्तकं कशी मागीतली नाही? काही कळेना. शेवटी विचार केला ‘जावूदे, आला, बरं वाटलं. तिन-चार तास मजेत गेले. मंगळवार काही अगदीच वाया गेला नाही.’

पण जाताना मात्र डोक्यात मासळीचे काहूर ऊठवून गेला. रात्री जेवतानाही आवडती गवार असुनही डोक्यात मासेच होते. रात्री झोपताना ऊगाच फुड ब्लॉग्जवर फिश रेसिपीज् पहात राहीलो. पण मासळी काही जाईना मनातून. विचार केला ऊद्या दुपारी जावू ‘मासेमारी’ला आणि यावेळेस अगदी वेगळ्या डिश ट्राय करु. पण मित्राने ईतकं काही रसभरीत वर्णन केले होते की वाटले, मासेमारीला जायचे म्हणजे पांडूरंगाची आठवण आल्यावर प्रतिपंढरपूरला जाण्यासारखे झाले. विठोबाला भेटायचे तर पंढरपुरपर्यंतच पायपीट केली पाहीजे. त्याशिवाय भेटीची मजा नाही. ठरलं तर. ऊद्या सकाळी मत्स्यपंढरी. मासे खायला कोकणात जायचे. रात्री साडेअकराला मी बायकोकडे दुसऱ्यादिवशीची ट्रिप जाहीर केली. काहीही बदल होणार नाही हे माहीत असुन तिने थोडा विरोध केला. पण ‘कडवे वाल’ ‘चिंच-आमसुल’ वगैरे सांगून शेवटी पटवले तिला. सहाचा गजर पाचवर सेट केला, सकाळी कोणते फोन करायचेत ते रिमांइईंडर वर टाकले आणि एकदाचा ‘समाधानाने’ झोपलो.

बुधवारी पाचचा गजर लावूनही साडेचारलाच ऊठलो. अंघोळ वगैरे ऊरकून केन बास्केट पुढे ओढली. दोन बर्मूडा, दोन टिशर्ट, टॉवेल, रुमाल टाकले बास्केटमध्ये. घरात जे काही सटर फटर फरसाण, चिवडा होते तेही टाकले. फ्रिजमधली दोन तिन लिंबे आणि सफरचंदेही घेतली. ब्लुटूथ साऊंड, पेन ड्राईव्ह, कॅमेरा यांची बॅग टाकली. शामने UK वरुन खास दोन व्हिस्की बोटल्स आणल्या होत्या माझ्यासाठी. त्यांना बरेस दिवस मुहूर्त लागला नव्हता. म्हटलं एखादी नीप सोबत घ्यावी. पण ऐन वेळेस हिपफ्लास्क सापडेना. मग अख्खी बाटली बास्केटमधल्या टॉवेलमध्ये गुंडाळली. बास्केट, चटईची गुंडाळी, कॅप्स खाली जावून डिक्कीत ठेवले. वर येवून बायकोला ऊठवलं. बंडी आणि बर्मूडा चढवला आणि बायकोचं आवरण्याची वाट पहात बसलो. स्वतः आवरुन बसले की बायकोला आवरायचं दडपण येतं हा स्वानूभव आहे. साडेसहा वाजले होते. वेळेनुसार गेलो तर दिड-दोन वाजता जेवण. चारला बिचवर. सुर्यास्तानंतर परतीला सुरवात. रात्री एकपर्यंत घरी. एकदम परफेक्ट नियोजन होतं एकून. ईतक्यात मोबाईल वाजला. पाहिलं तर काल आलेल्या मित्राचाच फोन होता. कमाल आहे, ईतक्या सकाळी? मी गुड मॉर्निंग करुन विचारले “लेका ईतक्या सकाळी सकाळी कधीपासून ऊठायला लागलास? बोल.” त्याने काहीतरी थातूर मातूर प्रश्न विचारले “किनोटमध्ये व्हिडीओ कसे इंपोर्ट करु? थ्रीडी चार्ट कसा ॲड करु? प्रेझेन्टेशन mp4 किंवा mov मधे सेव्ह करता येईल का?” मला समजेना, याला यावेळी कशासाठी हवं आहे हे? मी म्हणालो “अरे ऊद्या सांगतो तुला सगळे. नाहीतर स्क्रिन रेकॉर्डींग पाठवतो टेलेग्रामवर. अत्ता निघालोय कोकणात. काल तुझ्या ‘हे खाल्ले न् ते खाल्ले’ मुळेच पेटलोय आणि निघालोय. तुम्हीही येत असाल तर बघ स्वातीला विचारुन.” त्याने स्वातीला ओरडून विचारल्याचे मला फोनवरच ऐकू आले. मग म्हणाला “ठिके, तु आणि वैनीच आहात ना? मग येतो आम्ही. वहिणीला सोबत होईल आणि तुलाही. पंधरा मिनिटात गेटवरुन हॉर्न दे. आम्ही खालीच येतो. तुम्ही वर आले की परत अर्धा तास मोडेल. ठेवतो रे.” म्हणत त्याने फोन ठेवलाही. मला कळेना या सँडीला झालय काय काल पासून. काल घरी काय आला, आता ‘येतो का?’ विचारलं तर लगेच तयार काय झाला. पण वाटले चला, ड्रायव्हींगला पार्टनर झाला. तोवर बायकोचे आवरुन झाले होते. तिची बॅग ऊचलली आणि मी सरळ पार्कींगला आलो. मला माहीत होते की हिला आवरायला जेव्हढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ कुलूप लावायला लागतो. लॅच असुनही. लावलेले कुलूप ऊघडून परत घरात एक चक्कर मार, परत कुलूप लाव. असो. कुलुप लावणे हा एक कार्यक्रमच असतो आमच्याकडे. गाडी बाहेर काढीपर्यंत बायको खाली आली. निघालो. बरोबर पाच मिनिटात मी सँडीच्या सोसायटीच्या गेटवर हॉर्न वाजवत होतो.

क्रमशः

वावर

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

26 Apr 2018 - 1:17 am | राघवेंद्र

सुरुवात मस्त जमली आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत

पद्मावति's picture

26 Apr 2018 - 2:19 am | पद्मावति

मस्तच. पु.भा.प्र.

सस्नेह's picture

26 Apr 2018 - 6:57 am | सस्नेह

हायला, भारीच !

श्वेता२४'s picture

26 Apr 2018 - 10:21 am | श्वेता२४

पुढे काय याची उत्सुकता लागलीय. पुभाप्र

राजाभाउ's picture

26 Apr 2018 - 10:27 am | राजाभाउ

मस्त मुड सेट झालाय !! येउद्या लवकर पुढचा भाग.

पुंबा's picture

26 Apr 2018 - 12:54 pm | पुंबा

वा. वा. मस्त.
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2018 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं आहे गोष्ट. स्वतःला मासे खाण्याची इच्छा झाली म्हणून तुमच्या मित्राने तुमच्यावर माशांचे गारूड टाकले की काय असे उगाचच वाटून गेले ! :)

किसन शिंदे's picture

26 Apr 2018 - 1:30 pm | किसन शिंदे

एक नंबर लिहिलंय. पुढे काय होईल याची उत्सुकता लागलीये.

बाकी मासवड्या आणि गवार या दोन गोष्टींमुळे तुमच्या आणि माझ्या राशीचा ग्रह एकच असावा असे वाटते. ;) =))

सिद्धार्थ ४'s picture

26 Apr 2018 - 1:45 pm | सिद्धार्थ ४

लवकर पुधिल भाग येउ दे

चांदणे संदीप's picture

26 Apr 2018 - 4:45 pm | चांदणे संदीप

मत्स्यपुराण आवडले!

पुभाप्र!

Sandy (तो मी नव्हेच!)

अनिंद्य's picture

27 Apr 2018 - 12:41 pm | अनिंद्य

गोष्ट फसली नाही, जमली :-)
पु भा प्र

समाधान राऊत's picture

27 Apr 2018 - 12:54 pm | समाधान राऊत

मोठ्या कादंबरी/ पुस्तकाची सुरुवात असते तशी सुरुवात.......
आवडली
शुभेच्छा