रंग माझा वेगळा - रंगाशी दोन हात

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
17 Apr 2018 - 8:43 am

*** *** *** *** ***
कंजूस
 यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***

आपलं घर स्वच्छ, टापटीप आणि सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या सौंदर्यात लाकडी - लोखंडी सामानासह घराच्या रंगाचाही मुख्य वाटा आहे. दिवसेंदिवस शहरांमध्ये मोठ्या इमारतीमधला आपला एक ब्लॅाक/फ्लॅट असतो आणि चित्रामधलं टुमदार स्वतंत्र घर ही कविकल्पना होऊ लागली आहे. बाहेरचा रंगही कसा असावा हे आपल्या कक्षेबाहेरच गेलं आहे. आतल्या भिंतींचा रंग ठरवणे एवढेच उरले आहे. रंग काढायला झाला आहे हा विचार केव्हा चर्चेला येतो? घरामध्ये काही कार्य निघाल्यावर, सणासुदीच्या अगोदर,नवीन ब्लॅाक घेतल्यावर, केवळ पहिल्या रंगसंगतीचा कंटाळा आला म्हणून किंवा अगोदरचा रंग खराब झाल्यावर. कारण काहीही असो कोणता रंग द्यायचा आणि बजेट किती यासाठी इंटरनेटवर शोधणे, किंवा ओळखीपाळखीच्या लोकांना विचारणे सुरू होते. रंगाच्या आणि टुअरच्या बाबतीत कुणालाही विचारा "त्यांचा" माणूस किंवा निवड ही अल्टिमेटच असते. "मग अमुकवेळा दुसरीकडे का गेलात?" याचे उत्तर "तो अवेलबलच नव्हता हो." असो.

मुख्य विषयाकडे वळूया. रंगकामाचे दोन प्रकार पडतील - अ) कॅान्ट्रॅक्टरकडून(ठेकेदार) करवून घेणे, ब) स्वत: ( डु-इट-युवरसेल्फ) करणे.
पहिला अ प्रकारच भारतात प्रचलित आहे. यामध्ये ठेकेदार येतो,तुमच्या घराच्या भिंतींचे निरीक्षण करतो,तुम्हास कोणत्या प्रकारचा भारी/हलका रंग लावायचा आहे हे विचारतो, मापं काढतो आणि एस्टीमेट उर्फ खर्चाचा अंदाज सांगतो. हो म्हटल्यास थोडी रक्कम अडवान्स घेऊन साधारणपण चारचार दिवसात एकेक 'रूम' पूर्ण करतो. आणखी एक फाटा फुटतो तो म्हणजे पूर्ण कामच देणार का रंगसामान तुमचे, मजुरी आमची? इथे चक्रव्युहात फसण्याची शक्यता वाढते. वाघ्या म्हणा किंवा वाघोबा म्हणा तो खातोच.
प्रकार ब एवढा रुळला नाहीये. इंटरनेटवर यासंबंधी बरीच माहिती परदेशी साइट्सवर उपलब्ध आहे. त्यांच्या आणि भारताच्या अर्थकारणात बराच फरक आहे. त्यांना निरनिराळी उपकरणं विकत घेऊनही काम स्वत: केल्यास फारच स्वस्त पडते.

रंगकामाचा प्रकार कोणताही असो त्यासंबंधी थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहे. मिसळपाव साइटवर गेल्या तीनचार दिवसांत "खरडफळ्यावर" थोडी प्रश्नोत्तरे झाली ती इथे येतीलच. शिवाय प्रतिसादांतून विचारलेल्या प्रश्नांतूनही अडचणी समजतील त्या कशा सोडवता येतील ते पाहू. सर्वांनीच आपापले अनुभव लिहिले की उत्तम संग्रह होईल.

१) रंग छान का वाटतो -
मुख्य म्हणजे रंगसंगती आणि रंगकामाचा सफाइदारपणा. शिवाय रंगाला व्यक्त होण्यासाठी जागा लागते ती आता कमी होत चालली आहे. खोल्या लहान आणि सामान वाढत आहे. मोठी कपाटं किंवा उंच फर्निचर- वॅाडरोबमुळे एक मोठा रंगवलेला चौकोन दिसतच नाही. घरात भरपूर प्रकाश येणे उत्तम.
काही जुन्या रंगसंगती
# हलक्या क्रीम कलरच्या भिंती + चेस्टनट ब्लॅकचे उभे खांब - केरळ स्टाइल.
# पांढरी भिंत, आणि छत यामध्ये ब्रेक करण्यासाठी वरचा नऊदहा इंचाचा ओरेंज पट्टा , ओरेंज खांब - पोंडिचरी कॅाम्बिनेशन
# खाली मातीचा रेडिश ब्राउन पट्टा ( लहान डेडो) वर पांढरा - गुजरातमधील गावात असतं तसं.

२) रंग खराब का दिसतो? / उठून का दिसत नाही?
-अपुरा प्रकाश. भिंतींचे प्लास्टर चांगले नसणे. भिंतींना ओल आल्याने पोफडे निघणे. रंगसंगती चांगली न निवडणे. फर्निचर/पडदे यांच्याशी मॅचिंग न होणे. प्लास्टरिंगमधल्या कमी प्रतिच्या साहित्यामुळे रंग काळवंडतो - चमक जाते. इत्यादी. इलेक्ट्रिकल ओपन वायरिंग हे सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम असते. वायर्स तापत नाहीत परंतू रंगाच्या उठावात कमतरता आणतात. त्यावर प्लास्टिक केसिंग असले तरीही एक अखंड रंगीत चौकोन दिसत नाही.

३) रंग देण्याची प्रक्रिया काय असते? किती तास लागतात? किती रंग लागतो?
- सामान्यपणे भिंत विटांची, चुना/नेरु/सिमेंटची गिलावा केलेली, कोकण- केरळ किनारपट्टीला जांभ्या दगडाची असते. त्यावर चुना/नेरु/पिओपी ( जिप्सम)/ लांबीचा गिलावा (प्लास्टर) केले जाते. घासून गुळगुळीत केल्यावर त्यावर रंगाचे दोन हात ( coats) देतात. एका रंगकामाचे मेहनतीचे फक्त ( मध्यंतरी गिलावा/ रंग वाळण्याचे तास सोडून) चाळीस तास धरले तर त्यातले बत्तीस तास गिलावा करून भिंत 'तयार' करण्यात खर्ची पडतात, आठ तास रंगवण्यात. खडबडीत पृष्टभाग रंग अधिक "पितो", अधिक लागतो. दहा फुट x दहा फुट चौकोनाला एक ब्रास म्हणतात अशा खोलीत फरशी सोडून पाच ब्रास किंवा कमी जागा असते ( खिडक्या दरवाजांमुळे कमी). पाच किलो डिस्टेंपर, पाच किलो व्हाइटिंग पावडर, लांबीसाठी अर्धा लिटर पांढरा ऑइलपेंट लागेल.

४) रंग म्हणजे काय? तो खराब का होतो?
-
अगदी थोडक्यात -
रंग/ पेंट =अ) कोणतीतरी टिकाऊ पूड किंवा माती ( पांढरी अथवा रंगीत ) +ब) चिकट द्रव्य /बाइंडर (नैसर्गिक किंवा कृत्रिम) + रंग द्रव्य / डाइ/ह्यू .

अ आणि ब यांवर किंमतीत फरक पडतो.

भिंत >> सिंमेटचा / चुन्याचा/पिओपी चा गिलावा केलेली
कोरडी/ भिजणारी/दमटपणा येणारी .

भिंती कोरड्या राहण्याची खात्री असल्यास महागडे रंग देता येतात. अन्यथा अक्रिलिक वॅाशबल डिस्टेंपर देणे उत्तम. डिस्टेंपरची एक नैसर्गिक मंद चमक असते ती कायम राहते. शिवाय रिपेअर लगेचच करता येतो. ओल्या भिंतीवरही रंग देता येतो.

रंगातली पांढरी पूड = पांढरी माती/क्ले > चुना पावडर >> शिंपले पावडर>>झिंक ऑक्साइड>>टाइटेनिअम ऑक्साइड अशी उत्तरोत्तर महाग होते. शिवाय ती किती बारीक चाळली आहे यावरही किंमत वाढते.
टाइटेनिअम वगळता इतरांस पिवळटपणा येतो. तो दिसू नये म्हणून नीळ( इंडिगो) अथवा कृ० जांभळा रंग ( फास्ट वाइलट) टाकतात.

मॅट अथवा ग्लोस फिनिश
अती बारीक सूक्ष्म मॅट फिनिश डोळ्यांस चांगला वाटतो तो डिस्टेंपरात नैसर्गिकच येतो. प्लास्टिक/इनेमल पेंटमधल्या बाइंडरमुळे आणि भुकटी बारीक असल्याने एक प्रकारची चकाकी( ग्लोस) रंगाच्या पापुद्र्यास येते ती ट्युबलाइटच्या प्रकाशात चमकते. तसं होऊ नये म्हणून रंग ओला असतानाच रोलर ( स्पंजचा) फिरवून मॅट फिनिश करावे लागते.

पाणी रंगाचा शत्रू आहे. पोफडे पडतात,रंगाचे पापुद्रे निघतात. पाणी पाझरून उडतो तेव्हा क्षार तयार होतात ते रंगाला भिंतीपासून दूर ढकलतात.
बाहेरच्या कंपाउंड वॅाल आणि इमारतीला दिला जाणारा सिमेंट पेंट आहे याचा मात्र पाणी मित्र आहे. पाण्यानेच तो अधिक घट्ट बसतो. तो भिंत ओली करूनच देतात. उन्हामुळे हा फिका पडतो. पण हा रंग फाइन नसतो. आतमध्ये देत नाहीत. बय्राच इमारतींच्या जिन्याच्या कोपय्रांत लोकांनी थुंकून घाण केलेली असते. अशा ठिकाणी त्यावर हा सिमेंट पेंट मारल्यास स्वच्छ जागा बघून तिथे कोणी घाण करत नाही. पाट्या आणि देवांची चित्रे लावण्यापेक्षा बरे.

आतील रंग खराब होण्याचे ओल येण्याचे कारण आहे त्याशिवाय एक म्हणजे रंगाला "घसट" असणे. हे सर्वांकडे असेलच असे नाही. भिंतीजवळ बेड असल्यास टेकून बसल्याने रंग जातो,तेलकटपणा येतो. खुर्च्या सरकवण्याने एका रेघेत खरडा निघतो. खिडक्यांचे लांब पडदे वाय्राने हलतात,रंगाला घासतात. लहान मुले भिंतींवर रेघोट्या ओढतात. रस्त्याजवळच्या शहरातल्या घरांत जी धूळ रंगावर बसते ती डिजेलमिश्रीत असते. ती एक वेगळाच चिकट काळपटपणा आणते.

५) भिंतींना ओल येण्यामुळे रंग खराब होतो त्यावर काही उपाय करता येतील का?

ओल जिथून येते ती बंद करणे हा खरा उपाय असला तरी ती ओल बाजुच्या/वरच्या ब्लॅाकच्या बाथरुममधून होत असल्यास त्यावर आपण काहीच करू शकत नाही. आपल्या बाजूने त्यावर येणारी बुरशी टाळण्यासाठी चुना वापरावा.

पिओपी आणि तयार पुट्टी यांच्या भलामण जाहिरातींतून चुन्याचे प्लास्टर असतं हे आपण विसरूनच गेलो आहोत.अजुनही काही दुकानांत ओल्या चुन्याची पाचपाच किलोंची तयार पाकिटे मिळतात.सर्व भिंतीला नाही पण कमीतकमी ओल येणाय्रा भागास हे प्लास्टर करून बुरशी नक्की थांबवता येते. बुरशीचा एक नंबर शत्रू. चुना सेट होण्यास वेळ ( एक महिनासुद्धा) लागतो पण ढलपी अजिबात पडणार नाही. वरती मात्र साधा डिस्टेंपर रंग द्यायचा. ओल आल्यास तेवढ्याच भागाचा रंग निघेल पण पुन्हा लावणे अगदी सोपे.प्लास्टिक एनॅमलचा आख्खा पापुद्राच निघतो तसा नाही. एनॅमल पेंटचे कण भिंतींना जेवढे घट्ट धरतात त्यापेक्षा ते एकमेकांस अधिक घट्ट धरतात. डिस्टेंपरचे उलट असते.
सिलींग/ छतातून पाणी टपकत असेल तरी चुना पातळ करून रंगासारखा लावला तर पडणार नाही. शिवाय पांढरेपणा छान असतो.

आपल्याकडे डु-इट-युवरसेल्फ फार नाही पण काही सोपी कामे करायची तयारी ठेवली तर फारसं अवघड नाही.
पद्धत :
५-१) जिथे ओल येऊन पाणी झिरपते तिथे रंग आणि प्लास्टर पडते आणि पांढरा बुरा दिसतो. पाण्यातले क्षार वाळतात. यास इफ्लोरेसन्सही म्हणतात.
५-२) बराचसा सैल भाग पत्र्याने( putty blade) काढून टाकायचा. ओल असल्याने यावर कोणताही प्राइमर बसणार नाही. सिमेंटचे पाणी/ पातळ सिमेंट ब्रशने लावायचे. सिमेंट पाण्यामुळेच पक्के होत असते आणि जुन्या भागास पकडते.
५-३) चुन्यात वाळू कालवून त्यावर लेवल करायचे.
भिंतीला सिमेंट पकडते आणि सिमेंटला चुना पकडतो.
५-४) यावर एक पांढरा डिस्टेंपर पेंट ( नेरोलॅक किंवा एशियन) लावायचा.
५-५) चुना न मिळाल्यास नेरू लावायचा.
सिमेंट विकणाय्राकडेच "नेरू" नावाची पांढरी,मऊ,जड पावडर विकत मिळते. सिमेंट लावल्यावर या नेरूला ओले करून वर लावल्यावर सिमेंटचा काळेपणाही दिसत नाही. सिमेंट अधिक वाळू अधिक नेरू ओले करूनही लावता येते. दुसय्रा दिवशी डिस्टेंपर लावायचा.
( चुन्याचं काम करण्यावेळी एक सेफ्टी चष्मा हवाच. )

जेव्हा येणारी ओल ही बाहेरून पावसाने भिंत भिजल्यामुळे येते तेव्हा बाहेरूनही काही उपाययोजना करणे आपल्याला शक्य असते. परंतू ही ओल इमारतीच्या दुसय्रा ब्लॅाकच्या बाथरूमच्या पाणाच्या गळतीमुळे होते तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. त्याने केलेले कन्सील्ड प्लंबिंग किंवा टाइलमधून पाणी झिरपत असते आणि तो ते तोडायला तयार नसतो.

आता हे माहित झाल्याने रंगाय्राने पैसे घेतले अन "चुना लगाया" असं कुणी म्हणणार नाही कारण याठिकाणी चुनाच तुमचे पैसे वाचवेल.

६) प्लास्टरिंग / गिलावा

६-१) विटांची भिंत असल्यास त्यावर सिमेंट अधिक नेरूचे प्लास्टर केलेले असते. सुरवातीस घरे बांधताना भिंती ओल्याच असतात त्यामुळे हे प्लास्टर महिन्याभरात घट्ट होते. ( setting.)
यावर पिओपी ( जिप्सम)चे प्लास्टर करून रंग देतात. हे पिओपी पंधरा मिनिटांत सेट होते त्यामुळे रंगारी यासच पसंती देतात. खोटे छत उर्फ फॅाल्स सिलिंगसाठी याचे नवनवीन डिझिइनचे तयार पाट ( बोर्डस) मिळतात ते वर छताला लावतात. सध्या कन्सील्ड इलेक्ट्रिकल वाइअरिंगचा जमाना आहे. तर या वायरी छतामध्ये लपवता येतात ( पंखा आणि सुशोभित लाइटिंगच्या केबल दिसत नाहीत.)

६-२) पूर्वी वाळूमिश्रीत चुन्याचे प्लास्टर केले जायचे. हे सर्वोत्तम समजले जाते कारण त्याचा पाणीविरोधकपणा आणि उष्णतेने भिंतीचे होणारे प्रसरण याशी मेळ खाते. बुरशीही वाढू देत नाही. परंतू आता ( १९७० नंतर) चुना प्लास्टर गायबच झाले आहे. चुन्याला घट्ट होण्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागतो. पण त्यानंतर तो कठीण आणि लवचिकही राहतो - भेगा पडत नाहीत.

इथे थोडी चुन्याची अधिक रंजक माहिती बघुया -
कित्येक जुन्या महालांत आणि देवळांत चुन्याचा गिलावा करून त्यावर भित्तीचित्रे काढली आहेत. चुना हा नैसर्गिक स्वरुपात जमीनीत,खाणीत चुनखडीचे खडक ( कॅल्शम कार्बोनेट) म्हणून मिळतो. त्याचे मोठे तुकडे उंच भट्टीत तापवले की पाणी आणि कार्बनडाइअक्साइड वायू निघून जाऊन चुनकळी मिळते. वापरण्याच्यावेळी यात पाणी घातल्यावर पाणी उकळते आणि चुन्याची विरी ( स्लेक्ट लाइम) तयार होते. याचा लगदा खूप मळतात त्याचा गिलावा करतात. शंखशिंपल्यांतही चांगले कॅल्शम कार्बोनेट असते (मोत्यांमध्ये याहूनही शुद्ध असते.) असे बेटवा नदीतले शिंपले भाजून त्याचे प्लास्टर ओर्छा ( झाशीजवळ अठरा किमी) येथील महालांत केले आहे. लिंपल्यानंतर नदीतलेच गोटे घेऊन ते घोटून गुळगुळीत केले आहे. निरनिराळ्या गेरू,वनस्पतींचे रंग,कोळसा इत्यादी वापरून चित्रे काढली आहेत. ही सर्व चित्रे म्युरल्स प्रकारातली म्हणजे गिलावा वाळल्यावर काढलेली आहेत. ( परदेशातली अशी भित्तीचित्रे फ्रेस्कोज प्रकारची म्हणजे चुना ओला असतानाच काढलेली आहेत.)
केरळमधल्या देवळांत अशा चित्रांसाठी पांढरी माती वेलींच्या रसात वाटून लेप केला आहे. रंग नैसर्गिकच माती/वनस्पतींचे वापरले आहेत. इजिप्तमध्ये ज्या कबरी आहेत त्यातही सुंदर चित्रे आहेत.

६-३) लांबी प्लास्टर -

खरं म्हणजे लांबी/putty/filler हे भिंतीवरचे बारीकसारीक खड्डे भरण्यासाठी आहे परंतू याचा उपयोग एक प्लास्टर म्हणूनच रंगारी करतात. कारण काम उरकणे. यासाठी व्हाइटिंग ( पांढरी/राखाडी शेडची शाडूची बारीक माती) वापरतात. तर ही व्हाइटिंग पाण्याने भिजवून नंतर ओइलपेंट घालून मळून लगदा बनवतात त्याचे प्लास्टर केल्याने एका दमात गिलावा आणि खड्डे बुजवले जातात. भिंतीवरचा अगोदरचा रंग पत्र्याने खरवडून काढल्यावर प्रथम प्राइमर रंगाचा एक हात ( coat) दिल्यावरच ही लांबी लावता येते. वाळल्यावर एमरी पेपर २२०ने घासून गुळगुळीत केले की रंगवण्यासाठी भिंत तयार होते. हीच लांबी दारे खिडक्यांच्या लाकडालाही वापरता येते. लांबी करताना सिमेंट प्राइमर,लिनसीड ओइल मिसळल्यास चमक येते पण कधीकधी रंग काळवंडतो. क्वालटी चांगली हवी.

डिस्टेंपर लावणार असेल तर व्हाइटिंगमध्ये जो रंग देणार तोच मिसळायचा म्हणजे रंगाला मंद तजेला येतो.

७) कलर /शेड ठरवणे.
७-१) एशिअन अथवा नेरोलॅक कंपन्यांचे कलर कार्ड मिळते. त्यातल्या सर्वच शेड सर्वच प्रकारच्या रंगांत ( डिस्टेंपर, प्लास्टिक,इमल्शन, वॅाटरबेस्ट, नॅान वॅाटर बेस्ट ) उपलब्ध नसतात. ज्या शेडस आहेत त्या ठरवल्यावर त्या तिथेच दुकानामध्ये मिक्सरवर बनवून मिळतात. पुढेमागे रंग खराब झाल्यावर तो शेडचा नंबर सांगितल्यावर अचूक तोच रंग बनवून मिळतो. हा थोडा महाग पडतो. पेंटर लोक स्वत: हवी असलेली शेड बेस पेंटमधून बनवतात. यासाठी स्टेनर ( पातळ डाईज ५० -१०० एमएल बॅाटल्समध्ये मिळतात.) उदाहरणार्थ एक किलो डिस्टेंपर (६०रु किलो)मध्ये "फास्ट येलो ग्रीन" स्टेनरचे वीस थेंब टाकून ढवळून पोपटी रंगाची शेड मिळेल. डाइचे थेंब मोजून प्रथम कमीच टाकायचे. ते वाढवत गेले की गडद शेड मिळते. हे स्वस्त पडते. जेवढा रंग भारी तेवढे स्टेनरचे थेंब कमी लागतात हे लक्षात ठेवा. तयार मिक्सरचा रंग १००रु किलोने मिळतो. .

७-२) हा लेख लिहिण्याचे प्रयोजन ठरलेला प्रश्न - पांढरा {रंग/पेंट} कोणता लावावा?
- पांढय्रा पेंटमध्ये ज्या गिलाव्यावर लावला आहे त्यातल्या सर्व अशुद्ध अवांछित शेडस वर येणार आहेत. त्याची शुद्धिता फार महत्त्वाची आहे. अथवा ग्रेईश,पिवळसरपणा मिसळून अपेक्षित पांढरेपणा दिसणार नाही. पिओपीवर लावू नये हे माझे मत. बिरला पुट्टीवर एका ठिकाणी ट्राइ करून पाहा. चुना प्लास्टरवर फार पांढरे दिसेल परंतू भरड राहील.

८) हलका / भारी रंग

यात वापरलेली पूड आणि बाइंडरचा दर्जा यावर दर्जा ठरतो हे आपण पाहिलेच आहे. "कवरिंग पॅावर" भारी रंगाची अधिक असते म्हणून त्यासाठीचा गिलावाही अधिक फाइन करावा लागतो. अन्यथा योग्य परिणाम दिसणार नाही. दुसरी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे डिस्टेंपरला पाणी घालून तयार केल्यावर चार तास ठेवल्यावर डब्याच्या तळाशी जाड रंग साठू लागतो तसे भारी रंगाचे होत नाही. दोन दिवसांनंतरही भारी रंगाचा साका तळाशी जमत नाही.

९) आताच रंग लावून घेतला आणि पाचसहा महिन्यांत भिंतीला भेग पडली/ तळाकडून पाण्याने रंग सुटला पोपडे पडले/ बुरा धरला. काय करू?

ब्रशने पाणी लावून तो भाग भिजवायचा. पडणारा सुटा झालेला भाग,प्लास्टर काढून सिमेंटचेच पाणी /ओलसर सिमेंट ब्रशने चांगले चोपडायचे. चारपाच तासांनंतर सिमेंट अधिक नेरू अर्धे मिक्स करून लगदा करून भरायचा/फासायचा - थोडी लेवल करायची. यावर रंगाचा एक हात द्यायचा. दोन दिवसांनी दुसरा हात द्यायचा. अगोदरच्या रंगाच्या शेडचा नंबर माहित असल्यास तोच रंग एक किलो बनवून आणायचा. शेड नंबर माहित नसल्यास रंगाचा सुटलेला एक पापुद्रा दुकानात घेऊन जायचा. त्यांच्याकडे दोनतीन हजार शेडसचे कलर पुस्तक असते त्यातून मॅच करून लगेच शेड बनवून देतात. ९९टक्के काम होईल.

१०) लाकूड /लोखंडी वस्तुंचे रंगकाम

१०-१) फर्निचर
वर सांगितल्याप्रमाणे ओइलपेंट घातलेली लांबी लावून लेवल करायची. प्लाइवूडसाठी फेविकॅाल आणि प्लाइचेच पापुद्रे वापरून लेवल करायची. वर पुन्हा ओइलपेंट द्यायचा.
१०-२) लोखंडी वस्तू
उदाहरणार्थ पंखा किंवा कपाटाचा थोडासाच भाग खराब झाल्यास "कार पॅच" नावाची लांबी भरायची.( एक मिनिटात सेट होते,जलद काम करायचे.) हलकासा पातळ ओईलपेंट मारायचा.
हल्ली लोखंडी सांगाड्यांचे फर्निचर -बेड,शु रॅक वापरणे वाढले आहे. याच्या "पावडर कोटिंग"चे टवके उडून वाइट दिसते. तिथे कार पॅच लावून ३२० नंबर एमरी पेपरने घासून लेवल करावे. वॅालनट/चेस्टनट ब्लॅा स्प्रे विकत मिळतो तो मारला की झाले.
१०-३) लाकडाचे पॅालिश
हे एकदाच करता येते. अगोदरचेच केलेले असेल तर पहिले पॅालिश पॅालिश -पेपरने संपूर्ण काढल्यावरच दुसरे चांगले बसते. नाहीतर चिकट होते. यासाठी एका बशीत डिनेचर्ड स्पिरिट(लाइसनशिवाय दुकानदार देत नाहीत) घेतात. दुसय्रा एका बशीत "रॅासेना नावाची पिवळी माती घेतात. कापडाची चिंधी स्पिरिटमध्ये आणि रॅासेनात बुडवून एकाच दिशेने लाकडावर फिरवायची. संपले की पुन्हा घ्यायचा पण अगोदरच्या जागेवर पंधरा सेकंदानंतर हात फिरवायचा नाही. चिकट होईल. प्रॅक्टिस हवी. तयार टचवुडसुद्धा मिळते. लाख अधिक स्पिरिटही वापरतात. अजून एक चंद्रूस पॅालिश म्हणजे पाइनवुड झाडाचा गोंद उर्फ राळ स्पिरिटमध्ये भिजवून लाकडाला अथवा जांभ्या दगडाच्या भिंतीला -दगडाला लावता येते. चमक येते, आतला रंग खुलतो, पाणी लागत नाही.
१०-४) हल्ली लाकडी दारे खिडक्या जाऊन फ्लश प्लाइवुड आणि अलुमिनियमचा वापर वाढल्याने रंग द्यावा लागत नाही. अन्यथा लाकडी दरवाजे एकेक लिटर+ पेंट घेतात.

थोडीफार प्रॅक्टिकल माहिती दिली आहे. सूचना आणि प्रश्नांचे स्वागत आहे.
रंगाशी माझे दोन हात.
रंग माझा वेगळा.

*लेख लिहिण्यास उत्तेजन देणाय्रा सर्वांचे आभार. वाचकांनीही आपापले अनुभव अवश्य लिहावेत माहितीत भर घालावी.

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

23 Apr 2018 - 9:22 pm | मार्मिक गोडसे

स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टीकोनातून सांगू इच्छितो की विनाकारण छतावर कायमस्वरूपी वजन वाढणारा उपाय वाटतोय.
अगदी बरोबर, brick bat कोबा वजन तर वाढवतोच परंतू कालांतराने त्यालाही भेगा पडतात व आतील विटांची पाणी शोषण क्षमता संपून जाते व भुसभुशीत बनतात. पून्हा गळती सुरू होते.
मोठे पॅकिंग चे पुठ्ठे अंथरल्यास टेरेस अजिबात तापत नाही. अजूनही स्वस्त प्रकार आहेत टेरेस थंड ठेवायचे. लिहिल कधीतरी त्यावर.

पैसा's picture

25 Apr 2018 - 9:31 pm | पैसा

आणि लवकर लिहा. गावाच्या घरावर पत्रे आहेत. घरात पाय ठेवला तर भट्टीत घातल्यासांरखे होतंय सध्या.

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 10:40 pm | मार्मिक गोडसे

ते प्रकार rcc टेरेस साठी आहेत. पत्र्यासाठी , एकतर नारळाच्या झावळ्या टाका पत्र्यावर, किंवा आतून फॉल्स सीलिंग करून घ्या. लाकडी आढे असल्यास साधे प्लायवुड ठोकून काम होऊ शकते. कोणताही सुतार करू शकतो. लोखंडी अँगल असल्यास खर्च वाढतो. PoP sheet स्वस्त पडतात परंतू त्या कामाला कुशल कारागीर लागतात, त्यांची मजुरी बरीच महाग पडते. फॉल्स सीलिंग कोणतेही केले तरी एक १२ इंची एकझोस्ट फॅन लावावा, त्याने घरातील गरम हवा बाहेर फेकली जाते व घर थंड राहते. एकझोस्ट फॅन २ way लावल्यास रात्री बाहेरची थंड हवा आत घेता येते.

कंजूस's picture

26 Apr 2018 - 6:36 am | कंजूस

बरोबर आहेत.
टेरस थंड राहण्याचे उपाय -
(माझे मत -)
१) कोकणात नारळाच्या झावळ्या टाकणे हा उपाय स्थानिक आहे. दिवसेंदिवस माडातलं कौलारू कोकण संपून शहरी कोकण वाढत आहे. बरे दिसणे आणि झावळ्या मिळवणे याचा विचार करावा लागेल.
२) गवत वगैरेचा फार जाडा थर कार्यक्षम असलातरी आगीचा धोका असतो.
३)>>लाकडी आढे असल्यास साधे प्लायवुड ठोकून काम होऊ शकते. >>
- पूर्वी गावातल्या चहा व्यापाऱ्याकडे चहाचे खोके येत त्याला नंबर लावून प्लाइवूड मिळवले जायचे. स्वस्तात काम होते.
४) इक्झास्ट फॅन : चांगला उपाय आहे.
दिवसा काही फरक होत नाही पण संध्याकाळी सातनंतर हवा आत घेतल्यास गारवा होतो. एकझोस्ट फॅन २ way न मिळाल्यास साधा वनवे एकझोस्ट आतमध्ये हवा फेकेल असा लावता येतो.
फॅन विकत घेताना त्याचे रेटिंग पाहावे. १२ इंची इंडस्ट्रीअल घेतल्यास 0.8 amps असतो त्याचे बिल फार येते. शक्यतो कमी वॉटिजचा (२४ वॉट्स ) ९ इंची सहज मिळतो. याचा आवाज कमी, बिल कमी येते.

सुबोध खरे's picture

26 Apr 2018 - 11:25 am | सुबोध खरे

कौलं असतील तर वानरांचा फार उपद्रव होतो. त्याने कौलं फुटतात आणि पावसाळ्यात गळती होते म्हणून आम्ही गावच्या घरची कौले काढून ऍसबेसटॉसचे पत्रे लावले आणि ऍसबेसटॉसचे फॉल्स रुफिन्ग केलं आहे. त्याने तापमान ४-५ अंश कमी राहते. पण त्यात जर फटी जास्त राहिल्या तर उंदीर शिरून वैताग आणतात.
या पत्र्याना वरून अल्युमिनियमचा रंग लावला तर उष्णता परावर्तित होऊन घर अजून २-३ अंशाने थंड राहते असे ऐकले आहे.

मार्मिक गोडसे's picture

26 Apr 2018 - 12:08 pm | मार्मिक गोडसे

ऍसबेसटॉसचे फॉल्स रुफिन्ग हे ही बेस्ट ऑप्शन आहे. प्लायवुड पेक्षा स्वस्त पडतं. फक्त काळजीपूर्वक लावावं लागतं. जास्त दाब दिल्यास तुटते. मी घरातील बाथरूमच्या सिलींगला स्क्रू ने फिट केले आहे. गिझरच्या गरम पाण्याच्या वाफेने सीलिंगचे स्टील गंजून फुगले होते. ऍसबेसटॉसचा पत्रा लावल्यामुळे स्टीलचा वाफेशी संपर्क तुटला त्यामुळे सिलींगचे नुकसान टाळता आले.

पैसा's picture

26 Apr 2018 - 12:51 pm | पैसा

हा चांगला ऑप्शन आहे. बऱ्याच लाकडी फळ्या (फणसाच्या) आणि असबेस्टोस पत्रे घरी पडले आहेत. छपराचा आधार मात्र लाकडी वासे/ तुळाया नाही तर लोखंडी आहे.

Exaust fan ऑप्शन बाद कारण तो बंद असताना त्याच्या flap मधून डास, उंदीर विंचू साप इत्यादी मंडळी आत येऊ शकतात.

पैसा's picture

26 Apr 2018 - 1:04 pm | पैसा

माडाच्या झावळ्या नुसत्या टाकण्यापेक्षा झाप विणून टाकले तर अधिक नीटनेटके आणि व्यवस्थित कव्हर करणारे होईल. झापाच्या मांडवात खूप थंड वाटते हे विसरायला झाले होते!

मार्मिक गोडसे's picture

26 Apr 2018 - 1:49 pm | मार्मिक गोडसे

2way exaust ला flap नसते, फक्त सिंगलला असते. Exaust बंद केल्यावर flap ही आपोआप बंद होतात. त्यातून मच्छर, पाली, उंदीर, साप येऊच शकत नाही. त्यामुळे exaust मस्ट.

मार्मिक गोडसे's picture

26 Apr 2018 - 1:59 pm | मार्मिक गोडसे

झाप विणून टाकले तर अधिक नीटनेटके आणि व्यवस्थित कव्हर करणारे होईल
अगदी बरोबर.
तुमच्याकडे Corrugated पत्रे असतील तर त्याचे फॉल्स सीलिंग नाही करता येणार, सपाट असतील तर चालतील.

एस's picture

26 Apr 2018 - 4:44 pm | एस

अॅसबेसस्टॉसचे फॉल्स सीलिंग मलाही आमच्या बाथरूमसाठी करून घ्यायचे आहे. हे कुठे मिळते, काय दर पडतो इत्यादी माहिती देऊ शकलात तर बरे होईल. तसेच शक्य असल्यास तुम्ही गिझरच्या वर लावलेल्या टाईलचा फोटो देऊ शकाल का?

मार्मिक गोडसे's picture

26 Apr 2018 - 6:53 pm | मार्मिक गोडसे

त्या घरात भाडेकरू ठेवले आहेत , ते गावी गेले आहेत. सोमवार पर्यंत येतील तेव्हा फोटो पाठवतो.
Asbestos चे पत्रे जेथे मिळतात तेथेच ह्या शिटही मिळतात. तुम्ही स्वतः बसवणार असाल तर इलेक्ट्रिक कटिंग मशीन हाताशी ठेवा त्याशिवाय हे पत्रे कापता येत नाही ,प्रचंड धुरळा उडतो. कापताना काळजी न घेतल्यास तडा जाऊ शकतो. कितीही काटेकोर कापले तरी कडेला गॅप राहतात. त्यामुळे कडेने अल्युमिनियमचे L सेक्शन लावावे लागते.
तेच जर PoP २*२ च्या शीट घेतल्या तर करवतीनेही कापता येतात. स्क्रू करताना कोटेशन करता येते. संपूर्ण फिटींग झाल्यावर कोटेशन् आणि कडेच्या फटीPoP ने भरून टाकले की स्क्रूही दिसत नाही व सलग सीलिंग दिसते. त्यावर रंगही छान बसतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2018 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

Asbestos असलेले पत्रे किंवा शिट्सचा वापर अजूनही होत आहे ?!

Asbestos तंतूमय असते व त्याचे तंतू श्वसनमार्गे फुफ्फुसांत खोलवर जातात. त्यांचे शोषण होत नाही त्यामुळे ते तेथे कायमस्वरूपी राहतात. त्यांच्या दीर्घ प्रभावामुळे pulmonary fibrosis व कर्करोग हे आजार होतात, हे एकोणिसशे सत्तरीच्या दशकांत (किंवा थोडे अगोदर) सिद्ध झालेले आहे... तेव्हा सावधान !

Asbestosयुक्त पत्रे किंवा शिट्स करवत वगैरेने कापताना आजूबाजूला असलेल्यांच्या फुफ्फुसांत त्याचे तंतू जाणे नक्कीच सहजशक्य आहे.

राघवेंद्र's picture

28 Apr 2018 - 2:49 am | राघवेंद्र

हेच म्हणणार होतो. एका अमेरिकेतील प्रथितयश विमा कंपनीने आपल्या Asbestos च्या सगळ्या liabilities third -party कंपनीला विकल्या होत्या.

पैसा's picture

28 Apr 2018 - 7:25 am | पैसा

गावातल्या कॉन्ट्रॅक्टर च्यां म्हणण्यानुसार ते पत्रे ५००/ ६०० ला एक असे स्वस्त असतात. लोखंडी, सिमेंट वाले ६००० ला एक असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2018 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

"दर पत्र्यामागे ५५०० रुपये वाचवणे"
विरुद्ध
"फुफ्फुस कायमस्वरूपी निकामी करणारा pulmonary fibrosis आणि/किंवा जीवघेणा कर्करोग विकत घेणे"
असे या निवडीतिल साधेसोपे पर्याय आहेत.

या प्रकारात होणारा धोका, फक्त पैसे वाचवणार्‍या मालकापुरता मर्यादित न राहता, ते पत्रे बसवण्याचे काम करणारे कामगार आणि त्या जागेत वावरणार्‍या लोकांनाही होतो.

तसेही, 'घातक असलेल्या पण त्वरीत धोकादायक आणि/किंवा क्लेशदायक नसलेल्या' गोष्टींबाबतचे निर्णय घेताना अर्थकारण सहजपणे जिंकण्याचे (आणि सरकारने तिकडे सोईस्करपणे/अर्थपूर्ण) दुर्लक्ष करण्याचे हे केवळ एकच उदाहरण नाही. :(

पैसा's picture

28 Apr 2018 - 12:44 pm | पैसा

केंबळी छपराला न गळणारा आणि जरा टिकाऊ पर्याय शोधणारे लोक दुसरे काय करणार? पारंपरिक कौले आणि लाकडी वासे असणारी छपरे आता स्लॅब पेक्षा महाग पडतात. त्यांचा मेंटेनन्स सुद्धा फार असतो. गावात हल्ली सगळीकडे कौला ऐवजी पत्र्याची छप्परे सर्रास दिसतात. ती इथल्या हवामानाला योग्य आहेत का नाही याचा विचार करणेही परवडत नसेल.

मार्मिक गोडसे's picture

9 May 2018 - 2:14 pm | मार्मिक गोडसे

बाथरूम मधील ऍसबेसटॉस शीटचे फोटो .
.

.

प्रचेतस's picture

20 Apr 2018 - 8:35 am | प्रचेतस

लेख आवडला.
अतिशय तपशीलवार, संगतवार.

चौकटराजा रंगातले व्यास आहेत!>≥>>>> + १११
झकास !

नाखु's picture

22 Apr 2018 - 9:04 am | नाखु

केली, आहे

चौराकाका भन्नाट टिप्स.
पुढच्या उन्हाळ्यात रंगा साठी घाट घातला आहे

गृह रंगारी संसारी नाखु

नाखु's picture

22 Apr 2018 - 10:01 am | नाखु

एखाद्या रवीवारी मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आपलेकडे असलेला निलंबीत बेत लवकर ठेवल्यास या विषयावर चार अनुभव शब्द मिळावेत अशी विनंती.

स्मरणशील नाखु पिंपरी-चिंचवड मिपाकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Apr 2018 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

असा दोघादोघांत खाजगी मिसळीचा बेत करण्याच्या प्रयत्नाचा जोरदार निषेढ !

"बर्‍याच दिवसांत पिंचिकरांनी कट्टा केलेला नाही रे, याचे स्मरण द्या" संघटनेचा तळागाळाचा (पक्षी: मिसळपावाबरोबरच भजी, इ तळलेले आणि उसाचा रस, इ गाळलेले पदार्थ चवीने खाणारा-पिणारा) सभासद.

सहमत,
सगळे चालणारा नवपिंचिकर.

चौकटराजा's picture

22 Apr 2018 - 1:36 pm | चौकटराजा

अभ्या हिकड बी दुकान लावलं काय ? पिन्चीमधी ब्यानर चा लई जोर हाय म्हना ! पोटातल्या पोराचा बी वाढदिवस साजरा करत्यात बेने !

वकील साहेब's picture

24 Apr 2018 - 12:01 pm | वकील साहेब

भारीच. वाचनखून साठवली आहे.

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2018 - 1:04 pm | पिलीयन रायडर

म्हात्रे काकांशी सहमत. Asbestos वाचून आश्चर्य वाटलं. इंडस्ट्री मध्येही हे मटेरियल वापरू नये अशी गाईडलाईन असते. त्या संबंधित चेक्स आहेत. तेव्हा भारतात हे वापरात नसेल असं वाटलं होतं. स्वस्त सोपे पर्याय शोधायला हवेत मग तर. सरकारचे लक्ष नाही का ह्यात?

ईत्यंभुत माहीती मिळाली. बऱ्याच शंका दुर झाल्या. छान.