महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

उन्माद

Primary tabs

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Apr 2018 - 5:14 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात!
जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात. (आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात.) देशाची लोकशाही धोक्यात आली तरी आपले जात- धर्म टिकले पाहिजेत? ज्या महापुरूषांच्या उद्घोाषाने आंदोलने केली जातात ते असा धुडगूस खपवून घेतील?
राजकारणातून नक्की कोणतं समाजकारण केलं जातं? राजकारण हे सामाजिक कामाचं व्रत आहे का? राजकारणाचा समाजकारणाशी संबंध तरी उरला काय? राजकारणाला प्रचंड व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी? जात- धर्म धोक्यात आल्याच्या घोषणा देणारे लोक आपलं माणूसपण कुठं गहाण ठेवतात! मानव असण्यापेक्षा विशिष्ट जाती-धर्माचं असणं अस्मितादर्शक ठरू शकतं का?
घरांपासून चालत्या वाहनांपर्यंत दिसणार्याव रंगीबेरंगी झेंड्यांत अशोकचक्राचा तिरंगी कुठं आहे? (‍वर्षांतून दोन वेळा सरकारी कार्यालयांवर वाजत गाजत फडकवण्यासाठी राखीव ठेवण्यात आला का?) व्होटबँक वाढते म्हणून दिवसाढवळ्या भर रस्त्यांवर निर्लज्जपणे माणूस मारण्याचे थेट प्रयोग सुरू आहेत!
देशातला मतदार म्हणून नव्हे, देशाचे नागरिक म्हणून... लोकहो जागे व्हाल? लोकशाही धोक्यात आली आहे! हा उन्माद माणूसपण संपवणारा आहे! आपल्या आदिम रानटी टोळ्या होऊ नयेत! म्हणून सावधान!
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

विचारसमाज

प्रतिक्रिया

अंतरा आनंद's picture

16 Apr 2018 - 6:34 am | अंतरा आनंद

खरय. उन्मादच आहे हा.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2018 - 5:26 pm | डॉ. सुधीर राजार...

होना. काय करावे?

पैसा's picture

16 Apr 2018 - 9:14 am | पैसा

लेखातील भावना पोचल्या. पण लोकशाही संकटात वगैरे नाही. लोकशाही आहे म्हणूनच हे सर्व खपवून घेतले जाते आहे. पोर्तुगिज अंमलात गोव्यात गुन्हेगारीचा दर अत्यंत कमी होता पण तरी लोक खुश नव्हते.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2018 - 5:27 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद. आशावादी आहात आपण. लोकशाही टिकली पाहिजे देशात.

लोक आपला जीव ओवाळून टाकतात.....

खरा लोच्या तर इथेच आहे....

व्यक्तीपूजा हीच देशसेवा आणि जपामाळ ओढत मंदिरात बसणे हीच समाजसेवा.अशीच धारणा असलेल्या स्वार्थी आणि ढोंगी समाजाकडून भरीव कार्याची अपेक्षा करणेच चूकीचे आहे.

असो,

आता आमची चहा प्यायची वेळ झाली.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Apr 2018 - 5:29 pm | डॉ. सुधीर राजार...

खरंय. थोडा वेळ चिंता व्यक्‍त करून आपण चहा पाणी जेवण घ्यावंच लागतं. रोजचं रूटीन. त्याला इलाज नाही. धन्यवाद.

धर्मराजमुटके's picture

16 Apr 2018 - 5:44 pm | धर्मराजमुटके

लेखाच्या आशयाशी बहुतांश सहमत पण
"आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात." या वाक्याशी असहमत ! धार्मिक चिन्हे अंगावर मिरवणे गुन्हा समजू नये ही विनंती !

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2018 - 6:21 pm | डॉ. सुधीर राजार...

बरं . धन्यवाद

अर्धवटराव's picture

16 Apr 2018 - 9:15 pm | अर्धवटराव

हा अनेकमुखी राक्षस आहे. एक शीर छाटलं तर दुसरं उगवतं. उन्माद आता वाढायला लागला आहे, कि मिडीयामुळे तो आता जनतेसमोर यायला लागला आहे... काहि का असेना, तो बोचायला लागला आहे हे निश्चीत.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2018 - 6:22 pm | डॉ. सुधीर राजार...

खरंय धन्यवाद

सुबोध खरे's picture

17 Apr 2018 - 12:39 pm | सुबोध खरे

लोकहो जागे व्हाल? लोकशाही धोक्यात आली आहे.
लोक जागेच आहेत.
सलमान खान निर्दोष आहे म्हणून मोर्चा काढतात त्याच्या घरासमोर.
श्रीदेवीच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी तासन तास उभे राहतात.
शिर्डी, अजमेरशरीफ, वेलंकांनी च्या जत्रेला तासंतास उभे राहतात
कुडानकुलमचा अणुवीज प्रकल्प होऊ नये म्हणू मोर्चे काढतात.
बाकी असहिष्णुता वगैरेचे मोर्चे मेणबत्त्या बद्दल तर बोलायचेच नाही.
कुठे लोकांना जागे करताय उन्हाळ्याचे?
टीव्ही मोबाईल फेसबुक वगैरे बंद करून वाळ्याचे तट्टे वगैरे लावून थंड झोपा हो.
लोकशाही काही धोक्यात वगैरे आलेली नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2018 - 6:23 pm | डॉ. सुधीर राजार...

बरोबर आहे तुमचं म्हणणं.

हो ना माझ्या बुडाखाली अजून आग लागली नाही ना. म्हंजे लोक्शाही धोक्यात नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2018 - 6:24 pm | डॉ. सुधीर राजार...

असं म्हणायलाही हरकत नाही

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2018 - 7:57 pm | श्रीगुरुजी

देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला? बलात्कार (घरात, शेतात, ऑफिसात, रस्त्यावर चालत्या वाहनात आणि आता मंदिरातही), भ्रष्टाचार, हिंसक आंदोलने, अस्हिष्णुता (घासून गुळगुळीत झालेला शब्द), शिस्तीने नव्हे, झुंडींनी- कळपांनी हत्यारबंद लोक रस्त्यावर उतरतात. बलात्कारी लोकांच्या (संत- महात्मे- बाबा- बुवांच्याही) समर्थनासाठी लोक आपला जीव ओवाळून टाकतात आणि कायद्याच्या रक्षणासाठी निवडून आलेले लोक हिंसक कळपाचे नेतृत्व करतात!

बलात्कार, भ्रष्टाचार इ. गुन्हे अत्यंत घृणास्पद आहेत व या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.

परंतु हे प्रकार फक्त आताच घडत आहेत का? "देशात काय चाललंय? काय झालंय या देशाला?" हे प्रश्न जितके सध्याच्या काळासाठी समर्पक आहेत तितकेच ते भूतकाळासाठीही समर्पक आहेत. भूतकाळातही हे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत होते . आताही होत आहेत. एक अपवाद आहे तो म्हणजे उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार. तो मात्र मागील ३-४ वर्षात काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे. मग आताच हा प्रश्न का पडावा? या गुन्ह्यांचे कधीही समर्थन होऊ शकत नाही. परंतु देश रसातळाला गेला आहे असे म्हणणे म्हणजे एकदम टोकाची भूमिका वाटते कारण भूतकाळातही हे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतच होते व तरीसुद्धा अजूनपर्यंत देश रसातळाला गेलेला नाही.

गुन्हेगारांच्या समर्थनासाठी रस्त्यावर झुंडी उतरणे हे सुद्धा आज नव्याने होत आहे असे नाही. हे प्रकार पूर्वीही होत होते, आताही होत आहेत आणि भविष्यातही होत राहतील. ज्याप्रमाणे देशात सर्वत्र आलबेल होते व २०१४ पासून देश असहिष्णु झाला हा जावईशोध काही जणांना अचानक २-३ वर्षांपूर्वी लागला, तसेच देशात काहीतरी कधीही न घडलेले भयंकर असे काहीतरी होत आहे हा शोधही लागला आहे.

जाळपोळ, तोडफोड, हत्त्या, फसवणूक, कटकारस्थान करणारे सत्तेतले पाताळयंत्री मोरखे भुमिगत सूत्रे हलवतात. जात, धर्माचा टिळा लाऊन लोक अस्मितेने घराबाहेर पडतात. (आवश्यकता नसतानाही धार्मिक चिन्हे अंगावर मिरवतात.) देशाची लोकशाही धोक्यात आली तरी आपले जात- धर्म टिकले पाहिजेत? ज्या महापुरूषांच्या उद्घोाषाने आंदोलने केली जातात ते असा धुडगूस खपवून घेतील?

ही गुन्हेगारी कृत्ये पूर्वीही होत होती आणि आताही होत आहेत. पूर्वीच्या तुलनेत त्यात काही खास वाढ/घट झाली आहे असे दिसत नाही.

बाकी धार्मिक चिन्हे अंगावर मिरविणे याविषयी बोलायचे तर जवळपास सर्वधर्मीय अशी चिन्हे मिरवित असतात. हिंदू तिलक वगैरे लावतात, मुस्लिम स्त्रिया बुरख्यात असतात तर पुरूष दाढी व आखूड पायजम्यात असतात, ख्रिश्चन क्रॉस असलेली चेन वापरतात, सर्व शीख पुरूष पगडी घालतात. त्यामुळे एखादा विशिष्ट धर्मच असे करतो असे नाही.

मुळात जात-धर्म टिकल्याने देशाची लोकशाही कशी धोक्यात येईल?

लोकशाही धोक्यात आली आहे! हा उन्माद माणूसपण संपवणारा आहे! आपल्या आदिम रानटी टोळ्या होऊ नयेत! म्हणून सावधान!

ही वाक्ये वाचून हसू आले. ज्या गोष्टी पिढ्यानपिढ्या सुरू आहेत व ज्यामुळे आजतगायत लोकशाही धोक्यात आलेली नाही, ती लोकशाही अचानक कशी धोक्यात आली आहे? लोकशाही धोक्यात एकदाच आली होती व तो काळ होता १९७५-१९७७. या कालखंडात आणीबाणी लादून लोकशाहीला तुरूंगात बंदिस्त केले होते. यामागे कोणत्याही धार्मिक टोळ्या, उन्मादी, बलात्कारी इ. नसून तत्कालीन राजवट होती. या कालखंडाव्यतिरिक्त इतर काळात लोकशाही धोक्यात आल्याचे दिसत नाही. म्हणजे लोकशाही धोक्यात आली होती किंवा भविष्यात येऊ शकेल ती राजवटीमुळे, धार्मिक समूहांमुळे नाही.

२०१५ मध्ये तथाकथित विचारवंतांनी असहिष्णुतेचा जसा कांगावा केला होता तसाच हा लेख आहे. अर्थात असा कांगावा करण्यामागे सहिष्णुतेविषयी काळजी, लोकशाहीविषयी कळकळ, गुन्हेगारांविषयी चीड इ. कारणे नसून खरे कारण पूर्ण वेगळे आहे आणि म्हणूनच उच्चरवात कांगावा सुरू आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2018 - 6:25 pm | डॉ. सुधीर राजार...

नमस्कार. प्रथम धन्यवाद. विस्तृत प्रतिक्रियेबाबत. खरं तर लेखात यांनाही आणि त्यांनाही झोडपले आहे. एकालाच नव्हे. आणि मी कुणाकडचाच नाही.

मार्कस ऑरेलियस's picture

22 Apr 2018 - 9:46 pm | मार्कस ऑरेलियस

नमस्कार श्रीगुरुजी !

धागा वाचला तेव्हाच मनात विचार आलेला कि ह्यावर इतर कोणी प्रतिसाद द्यायची गरजच नाही , श्रीगुरुजी एकट्यानेच सारे मुद्दे गारद करतील !
अप्रतिम प्रतिसाद लिहिला आहेत ! इतका मुद्देसुद प्रतिवाद असल्याने मुळ धाग्यातील हवाच काढुन टाकलीत की आपण !

लोकशाही धोक्यात आलेली नसुन काँग्रेस आणि त्यांचे दांभिकपण धोक्यात आलेले आहे . मंदिरात जाणारे अत्याचारी असतात असं म्हणणारे लोकं मंदिरात जायला लागलेत , टोप्याघालुन मिरवणारे लोकं आता स्वतःला जानवेधारी हिंदु म्हणवुन घ्यायला लागतेल . ज्या दिवशी ( मग तो दिवस अजुन हजार वर्षांनी का येईना) हे काँग्रेसचे लोकं " राजीव गांधीने वादग्रस्त जागेची कवाडे हिंदुंना उपासनेला उघडुन दिली म्हणुनच आज मंदिर बांधले गेले " असे म्हणत राममंदिराचे ही श्रेय घ्यायला लागतील त्या दिवशी मिशन अकंप्लिशड म्हणाता येइल !!

अवांतर : मिपावरील बरेच लोक "तुम्ही भाजपाचे पेड ट्रोल आहात" असा क्लेम करतात , तसे असेल तर भाजपा हॅज मेड अ राईटफुल इन्वेस्टमेन्ट ! इतकेच म्हणतो . :)

बिटाकाका's picture

17 Apr 2018 - 10:43 pm | बिटाकाका

हाहाहाहा.....लोकशाही धोक्यात आहे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच हास्यास्पद होत चाललेलं आहे असे वाटते.
***********************
या देशात, एक थोर नेत्याची हत्या एका अमुक जातीच्या माणसाने केली म्हणून त्या अमुक जातीच्या लोकांना देशोधडीला लावण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका धर्माच्या माणसांनी एका पंतप्रधानांची हत्या केली म्हणून त्या धर्माच्या लोकांना चुन चुन के मारण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका विशिष्ट जातीचे धर्माचे लोक त्यांच्या मूळ प्रदेशातुन अक्षरशः हाकलून काढण्यात आले, मारून टाकण्यात आले तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका रेल्वेच्या डब्यात पट्रोल टाकून जाळण्यात आले, त्याची परिणीती म्हणून दोन धर्मात खुनी खेळ खेळला गेला तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
आज ज्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली असे काही लोकांना वाटतेय त्यांनी अशा घटनांचा इतिहास जरूर तपासावा. स्वतःचा दांभिकपणा स्वतःलाच कळून लोकशाही मजबूत असल्याची जाणीव नक्की होईल.
*************************
आपले नावडते सरकार आल्यावर जळफळाट होणे तसे स्वाभाविक आहे. म्हणजे हा ईव्हीएम घोटाळा आहे असे वाटणे, पैसे वाटून जिंकले आहेत वाटणे, जाती धर्माचे राजकारण करून जिंकले वाटणे, काहीच विकास होत नाही वाटणे वगैरे समजू शकतो. पण लोकशाही धोक्यात आहे...हे मात्र अनाकलनीय आहे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

19 Apr 2018 - 6:26 pm | डॉ. सुधीर राजार...

लोकशाहीला धोका नसेल तर आनंदच आहे.

बोका-ए-आझम's picture

22 Apr 2018 - 9:22 pm | बोका-ए-आझम

काय फरक पडतो? तसंही लोकशाही ही आदर्श राज्यपद्धती अजिबात नाही. ज्याला जास्त मतं पडतात तो जिंकतो. त्याने ती मतं कशी मिळवली याबद्दल कुणीही विचारत नाही. ज्याला कमी मतं पडतात तो हरतो. तो कदाचित उमेदवार म्हणून चांगला असेल पण त्याला मतं कमी असल्यामुळे तो विधिमंडळात जाऊ शकत नाही. झालंच तर मताधिकार असलेले किती लोक मतदान करतात? जर एकूण मतदारांपैकी फक्त एका मतदाराने मतदान केलं तरी तो ज्याला मत देईल तो उमेदवार विजयी समजला जातो. लोक लायकीपेक्षा जात, धर्म वगैरे घटक बघून मतदान करतात. ज्या पक्षाला जास्त मतं मिळतात तो सरकार स्थापन करुन आपल्याला हवे ते कायदे लोकांच्या बोकांडी मारु शकतो. न्यायालयात खटले वर्षानुवर्षे चालतात आणि ज्यांच्या बाजूने निकाल लागतात त्यांचे विरोधक केवळ लोकशाही आहे म्हणून त्याविरूद्ध राळ उडवून संपूर्ण प्रक्रिया दूषित करु शकतात.
असली राज्यपद्धती धोक्यात आलेलीच चांगली. निदान ' अंतिम सत्ता जनतेची ' वगैरे ढोंगीपणा तरी थांबेल. तसंही ' बळी तो कान पिळी ' हा जंगलाचा कायदा लोक राजरोसपणे वापरताहेत. तो अधिकृतपणे वापरणं कधीही बरं. उगाचच फालतू अपेक्षा ठेवल्या जाणार नाहीत.