गाणे कसे बनते?

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
11 Apr 2018 - 11:31 am

केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो.
-------------
कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय?
कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी. जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे सगळं कायद्याच्या भाषेत जवळजवळ एकच असतं. कवितेत जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे पूर्णतः मित्यांच्या तीन अक्षांसोबत काटकोनात असू शकतं. गाणं कवितेच्या मानानं लोकभाषेशी जवळचं असावं, अर्थातच बर्‍याच कविता स्वतः गाणी असतात हे आलेच. कविता त्यामानाने आशयघन असतात. कवितेत कधीही सविस्तर वर्णन नसतं. अगदी अलंकारांनी दिलेली शक्ती जरी दोन मिनिटं बाजूला काढून पाहिली तरी कवितेतले शब्द आशयाच्या दृष्टीनं फार विस्तारलेले दिसतात. कवितेत अनेकदा न लिहिलेले शब्द दिसू लागतात. अनेक कवी अशा कविता लिहितात ज्या वाचून अज्ञान प्रांतात घोड्यावर बसवून एकटेच सोडून दिले आहे असे वाटते. जो आशय पाहायचा आहे तो पाहा, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाला जा. म्हणून माझ्यासारख्या माणसाला अशा अ‍ॅडव्हेंचर टुरिझम पेक्षा गाण्यांचा नॅचरल टुरिझम भावतो.
-----------------
गाणी त्यामानानं सोपी असतात. जे एरवी गद्यात लिहिता आलं असतं ते मिठ-मिर्चू-लोणी लावून पद्यात सांगीतलं जातं. गाण्याचं एकमात्र आवश्यक नि पुरेसं लक्षण म्हणजे चाल असावं. चाल नसली तर त्याला थेट गद्य म्हणावं. गाण्यात बाकी बर्‍याच गोष्टी नसतील तर चालतील. चालीत बसणार्‍या वारंवार उधृत होणार्‍या ओळींपासून आदिवासी लोकांनी पहिलं मुखडा-गाणं बनवलं असावं. मग ते लांबत जाऊन मोठं गाणं बनलं असावं. आज एक विकसित कला म्हणून कवी लोक कथानकात दिलेल्या परिस्थितीच्या अवतीभोवती रेटून गाणी बसवताहेत. पण कधी काळी कोण्या मोठ्या बृह्त्कथेचा भाग नसलेली सुटी सुटी गाणी लोकांना सुचत असावीत.
==========================================================
आता गाणं कसं बनतं? (हा प्रश्न आहे. उत्तराचा उपोद्घात नाही.). माझ्यासारख्या लेमॅनला वाटतं ते असं:
एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे.
=============================================================
लेखकाला (म्हणजे मला) या क्षेत्रातलं अजिबात काही कळत नाही. सहज वाटलं ते लिहिलं आहे.

कलाविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

11 Apr 2018 - 11:51 am | विजुभाऊ

मी ही प्रोसेस जवळून अनुभवली आहे. गाणे लिहीन्यापासून ते त्याला चाल लावणे, त्याचे संगीत अ‍ॅरेंज करणे , रेकॉर्ड करणे, एडीट करणे ( त्यात वाद्ये मिसळणे , स्केल चेंज करणे , वेग वाढवणे, तोडणे जोडणे, एखादा ध्वनी रीपीट करणे ई.)
मजा येते.
पण गोष्टी डिजीटल झाल्यापासून खूप सोपे झाले आहे सगळे

चौकटराजा's picture

11 Apr 2018 - 1:50 pm | चौकटराजा

विजुभाउ नशीबवान आहात ! मला कधी असा चान्स मिळाला नाही . माझ्याकडे अर्थात ऐकीव असे किस्से या बाबतीत भरपूर आहेत. नय्यर ना दोन तीन वेळा मी भेटलेला आहे पण ते ही प्रोसेस सांगण्यास कधी उत्सुक दिसले नाहीत. बाकी नौशाद यांच्या " दास्ताने नौशाद " या पुस्तकात असे किस्से आहेत. राम कदम हे ही आपल्याला गाणे कसे सुचले हे सांगत असत. पं. ह्रदयानाथ मंगेशकर हे देखील कोणत्या बंदिशी वरून चाल बांधली आहे हे सांगतात. मी स्वत: फार पूर्वी सुरेश भट यांच्या " रूप कैफी प्रत्ययाचा गलबला प्राणात झाला " या गीताला रूपक तालात चाल लावून पाहिली आहे. " सुनी सुनी रैना हे ... सुना सुना ही दिल मेरा ,,, " हे शब्द माझे व ही चाल दादरा तालात चंद्र कंस हा राग वापरून फार पूर्वी केली होती. नय्यर यांची काही गाणी त्याचीच शैली वापरून एकदम वेगळ्या अंगाची चाल असा ही प्रयोग मी केला आहे . उदा "एक तू ही पिया " हे गाणे मुजरा आहे ती मी नशिल्या पस्चीमी ढंगात केले आहे.

मी स्वतःच त्यावेळी गीतकार आणि संगीतकार या दोन्ही भूमिका निभावत होतो.

चौकटराजा's picture

11 Apr 2018 - 2:05 pm | चौकटराजा

मंग बरूबर हाय !!

पण गोष्टी डिजीटल झाल्यापासून खूप सोपे झाले आहे सगळे

रेकॉर्ड करणे आणि एडिट करणे इथपर्यंत ठिक आहे. पण संगीत देणे आणि चाल लावणे हे कंप्यूटर कसं करेल? कोणत्या प्रसिद्ध गीताची चाल संगणकाने दिली आहे?

arunjoshi123's picture

12 Apr 2018 - 12:25 pm | arunjoshi123

स्केल चेंज करणे

म्हणजे आवाजाची पट्टी बदलणे?
===================================
गायक लोकांची फुफ्फुसे मजबूत असावीत. शेवटी दम न लागता लांब आणि उच्च स्वर लावून लांबलचक ओळ पूर्ण करणे कठीण कर्म आहे.
=============================================
आपण (म्हणजे आपण आणि हा प्रतिसाद वाचणार्‍या कोणीही) गायनात दमाची परीक्षा घेणारा असा कोणता अंतरा वा मुखडा जो गायकांतही प्रसिद्ध आहे तो सांगू शकाल काय?

पुंबा's picture

12 Apr 2018 - 12:46 pm | पुंबा

आपण (म्हणजे आपण आणि हा प्रतिसाद वाचणार्‍या कोणीही) गायनात दमाची परीक्षा घेणारा असा कोणता अंतरा वा मुखडा जो गायकांतही प्रसिद्ध आहे तो सांगू शकाल काय?

शंकर महादेवनचे ब्रेथलेस?

चौकटराजा's picture

14 Apr 2018 - 10:08 am | चौकटराजा

वरील गीत महेन्द्र कपूर यानी गायलेले आहे. त्यात त्यान्च्या आवाजाच्या रेंजची परीक्षा तर आहेच पण दमसासा चीही ! अन्धेरी रातके.......... यानंतर खास करून कपूर साहेबाना ऐका !

पण गोष्टी डिजीटल झाल्यापासून खूप सोपे झाले आहे सगळे

गोष्टी डिजीटल झाल्यापासून क्लासिक गाणी बनणे बंद झाले आहे का? केवळ १-२% गाणी इव्हरग्रीन, अजरामर, पुनःपुनः ऐकावीशी वाटणारी, अवीट, तीच प्रेम इ इ ची रटाळ थीम असली तरी सुश्राव्य म्हणून कोणत्याही वयात भावणारी, ऐकलेल्या अनेक गाण्यांपासून वेगळ्याच चालीची / पठडीची, ३-४ वर्षांनी मरून न जाणारी, रेडिओवर वारंवार लागणारी, टीवीवर लागली तर पुढचा चॅनल न पाहता इथेच थांबावे असे वाटवणारी अशी असतात.
संगीताचा बाजार (म्हणजे एका वर्षात उत्पन्न होणार्‍या एकूण गाण्यांची संख्या) प्रचंड वाढली आहे आणि निकृष्ट दर्जाचे कलाकार (फ्रेज करता क्षमस्व, पण काय करा) आपले गीत मार्केटींग करून सर्वात आधी लोकांसमोर नेत आहेत असं आहे कि मुदलातच कोणत्याही वर्षात बनणार्‍या एकूण उत्कृष्ट गीतांची संख्या आणि उत्कृष्टता आजघडीला कमी झाली आहे?
================================
वरील प्रश्नाच्या उत्तरात आजच्या पिढीची जी गाण्यांची चव आहे तिच्या अनुषंगानेच उत्कृष्ट गाण्यांची मागणी समजायची आहे. ती चवच अयोग्य आहे असं म्हणणं नाही. (असलं तरी अन्यत्र कुठे त्यावर बोलू.)

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 6:13 pm | प्रदीप

विजूभाऊ तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतीलच. त्यांना काय अभिप्रेत आहे, ते मला जसे समजले आहे, त्याप्रमाणे मी सांगतो.

डिजिटलमुळे 'सर्व सोपे झाले' म्हणजे पूर्वी जसे सव्यापसव्य करावे लागत असे, ते तांत्रिक प्रगतीमुळे जवळजवळ संपूर्ण टळले. पूर्वी एकाच टेकमधे सलग गाणे रेकॉर्ड करत, आता तसे करावे लागत नाहीत व करतही नाहीत. मल्टिट्रॅक रेकॉर्डिंग (ही काही डिजिटलचीच मक्तेदारी नव्हे) व डिजिटल माध्यमात रेकॉर्डींग ह्यांमुळे वेगवेगळे ट्रॅक्स वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड करता येऊ लागले, व त्यांची 'लॉसलेस' जोडणी करता येऊ लागली. अर्थात एकाच टेकमधे अथपासून इतिपर्यंत रेकॉर्डिंग करण्याची आवश्यकताही संपुष्टात आली. तुकड्या तुकड्याने गाता येऊ लागले, तसेच वाद्यांचे ट्रॅकसही तयार करता येऊ लागले. इतकेच नव्हे,. आता डिजिटल रेकॉर्डिंगमुळे 'पीच'ही इतर कसलाही साईड- ईफेक्ट न करता बदलता येऊ लागला. ह्याचा फायदा एकादा गायक- गायिका बेसूर गायला असेल, तर ते करेक्ट करता येऊ लागले, तसेच ड्युएट्समधे दोघे वेगवेगळ्या सुरांत येऊन (वेगवेगळ्या वेळी) गाऊन गेले तरी ते करेक्ट करता येऊ लागले.

डिजिटलच्या ह्या काळात, सिंथेसायझरवरच वेगवेगळी वाद्ये वाजवली जाऊ लागली. तेव्हा इतके सारे म्युझिशियन्स असण्याची गरजच संपुष्टात आली. पुन्हा ह्या प्रकारात १००% रीपीटेबलीटी आहे, मूळ जे वाजवले ते अनेकदा करेक्ट करता येण्याची मुभा आहे. इत्यादी.

तेव्हा, 'सगळे' सोपे झाले, ह्याचा इथपर्यंतच अर्थ घ्यावा. चाल, सध्यातरी माणसानेच बांधावी लागते, शब्दही माणसानेच लिहावे लागतात. ए.आय.च्या जमान्यात ते तरी तसे किती राहील, नक्की सांगता येत नाही.

विजुभाऊ's picture

16 Apr 2018 - 4:04 pm | विजुभाऊ

डिजिटलमुळे 'सर्व सोपे झाले' म्हणजे
हे सांगण्यापूर्वी अगोदरच्या काळात गाणे कसे रेकोर्ड होत असे हे सांगतो.
अगोदर संगीतकार चाल लावत असे.
त्या नंतर अ‍ॅरेंजर त्या चालीनुसार कडव्याच्या सुरवातीचे. मधले म्यूझीकचे पीसेस बसवत असे.
या सर्वांचे स्वरलेखन कले जायचे.
ते वादकांकडे/कंडक्टरकडे दिले जायचे. वादक आपल्याला जे वाजवायचे त्याची प्रॅकटीस करायचे.
कंडक्टर सर्व वादकांसमवेत आणि एखाद्या डमी गायका समवेत पूर्ण गाण्याची प्रॅक्ट्झीस करायचे.
ही प्रॅक्टीस झाली की जे गायक प्रत्यक्ष गाणार असतील त्याना हे रेकॉर्डिंग ऐकवले जायचे.
गायक त्यांच्या गाण्याची प्रॅक्टीस करायचे.
आता प्रत्यक्ष स्टुडिओ मधे गाण्याचे रेकोर्डिंग व्हायचे. या वेळेस कोरस, वादक मुख्य गायक हे सर्व उपस्थित असायचे.
एक्खादी जरी चूक झाली तरी गाणे पुन्हा सुरवातीपासून रेकॉर्ड व्हायचे.
डिजीटल झाल्यापासून
सम्गीतकार चाल लावतो
तो ती चाल गायकाना मोबाईलवरुन पाठवतो. तालवाद्याचा ट्रॅकही पाठवतो.
गायक ते गाणे एक एक ओळ सुटी सुट्टी गाऊन संगीतकाराला पाठवून देतात.
गरज असेल तर वादकाना स्टुडिओ मध एबोलावले जाते. त्याना नोटेशन ऐकवले जाते. त्यंच्या कडून हवे तसे पीसेस वाजवून घेतले जातात.
हे स्वतम्त्रपणे रेकॉर्ड होते.
गरज भासल्यास गायकाने गायलेल्या ट्रॅकचे स्केल वर किम्वा खाली आणले जाते.
आता संगीतकार तालवाद्याचा ट्रॅक वापरून गायकानी गायलेले ट्रॅक मिक्स करतो. एकावर एक किंवा क्रमवार लावले जातात.
आता अ‍ॅरेंजर सिंथेसायझरवर तयार केलेला फक्त म्यूझीकचा ट्रॅक यावर इंपोज करतो.
यात वादकाने वाजवलेली धून हव्या त्या ठिकाणी मिक्स करतो.
गरज असेल तेथे कोरस चे स्वतंत्र केलेले रेकॉर्ड केलेले ट्रॅक मिसळतात ( एकाच गायकाच्या स्केलमधे थॉडेफार फरक करत गेले तरी तीन चार गायक गात आहेत असा भास निर्माण करता येतो)
आता हे सर्व ट्रॅक्स एकमेकात मिसळले जातात.
यात कुठेही या सर्व कलाकारंचा एकमेकांशी समोरासमोर सम्बंध येत नाही. जो तो स्वतःच्या वेळेनुसार गाण्याचा भाग रेकॉर्ड करतो आणि संगीतकार ते एकत्र करतो.
हे झाले डिजीटल रेकॉर्डिंग.
गायकाच्या श्वासाचे आवाज वगैरे एडीकरून काढून टाकता येतात. हवे तेथे व्हायब्रेशन्स आणता येतात. एको ,हॉलो, रीव्हर्ब हे इफेक्ट आणता येतात.
हे सगळे झाले के हे रेकॉर्डिंग फिल्मवर इंपोझ करता येते.
पूर्वी गाने रेकॉर्ड करून ते ग्रामोफोन रेकॉर्डवर आणून प्रकाशीत करत असायचे . तशी मशिनरी अस्ल्याशिवाय हे कॉपी करणे अशक्यच होते. त्या नंतर कॅसेट निघाल्या. कॅसेट कॉपी करणे तुलनेने सोपे होते पण वेळखाऊ होते. त्या नंतर सी डी आल्या. पेन ड्राईव्ह आले. पण प्रत्यक्ष लोकांपर्यंत गाणे पोहोचवणॅ हे अजूनही अवघड होते
पण यू ट्यूब सारखे माध्यम वापरून एखादे गाणे काही सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहोचवले जाते. सोनू तुला माझ्यावर भरोस नाय का सारखे कोणतीही सम्गीत गुण नसणारे गाणेही लोकप्रीय होते.
मुद्दा हा आहे की डिजीटल झाल्यापासून गाणे रेकॉर्ड करण्यापासून ते पब्लीश करणे हे सर्व सोप्पे झाले आहे.

सुनील's picture

11 Apr 2018 - 1:58 pm | सुनील

पूर्वीचा आधी गीत नंतर संगीत हा प्रवास सध्या आधी संगीत आणि मग त्यावर शब्द असा बदलला आहे, असे ऐकीवात आहे.

खखोठाना.

चौकटराजा's picture

11 Apr 2018 - 2:07 pm | चौकटराजा

आज देखील असा सरसकट नियम नाही पण फिल्मी जगाताच्या संगीतात असा ट्रेंड आला आहे हे खरे ! कारण ते बरेचसे तालाच्या अंगाने जाणारे येत आहे !

चित्रपटांत चित्रीकरण या दोहोंनंतर होत असावं. नै का?

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 7:00 pm | प्रदीप

गाणे प्रथम रेकॉर्ड होते, व मग त्यावरील चित्रीकरण होते. चित्रीकरणाच्या वेळी, एका विशीष्ट प्रकारच्या रेकॉर्डर्वर ते गाणे वाजवले जाते-- हा विशीष्ट अशासाठी की कॅमेरा त्याला लॉक केला जातो.

चित्रीकरण जवळ येऊन ठेपले आहे, पण गायक गायिका गीत रेकॉर्ड करण्यासाठी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत हे गाणे, इतर कुणी गायक/ गायिकेला घेऊन रेकॉर्ड केले जाते. व त्यावर चित्रीकरण केले जाते. नंतर नियोजित गायक/ गायिका उपलब्ध झाल्यावर तो ट्रॅक बनवला जातो, व तो मूळ गायक/ गायिकेच्या ट्रॅकच्या जागी आणण्यात येतो.

'दस्तक' चित्रपटातील 'माई री' चे मूळ रेकॉर्डिंग मदन मोहनने स्वतः गाऊन केले. नंतर लता उपलब्ध झाल्यावर ते तिने गायले. 'सख्या रे घायाळ मी हरिणी' च्या वेळीही, मूळ ट्रॅक रवींद्र साठेंनी गायिला होता.

मराठी कथालेखक's picture

12 Apr 2018 - 6:51 pm | मराठी कथालेखक

पुर्वीसुद्धा शंकर जयकिशन नेहमीच आधी चाल लावत आणि गीतकार त्यावर गीत लिहित असे वाचले आहे. त्यामुळे कोणत्यातरी प्रसिद्ध गीतकारासोबत (आता नाव आठवत नाही) त्यांनी कधी काम केले नाही कारण तो गीतकार नेहमीच आधी गाणे लिहायचा आणि संगीतकार त्याला चाल लावायचे असेही ऐकून/वाचून आहे.

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 6:22 pm | प्रदीप

तसे करीत, हे खरे आहे. पण अगदी सचिनदाही तसेच करीत. शं-ज उगाच 'बदनाम' झाले.

सचिनदांच्यावर यूट्यूबर 'मोती लालवानी' ह्यांचे चॅनेल येथे पहावे. त्यात त्यांजबरोबर काम केलेल्या अनेक गायक- वादकांनी अतिशय उत्कट्पणे त्यांच्या कार्याची, व्यक्तिमत्वाची माहिती दिली आहे. त्यात कर्सी लॉर्ड, 'कांचा', सुषमा श्रेठ, इथपासून उत्तम सिंग, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, झरीन दारूवाला, अमृत काटकर.. वगैरे खूप माहिती देऊन गेले आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 Apr 2018 - 2:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.youtube.com/watch?v=HDI6js4aAu0
ये वादा रहा चित्रपटातील प्रसिद्ध गाणे.. खुद्द पंचम त्याची चाल तयार करताना.. १९८२/८३च्या सुमारास.

मजा आ गया. कल्ला व्हिडीओ शेअर केलाय. ही मंडळी असले प्रकार दिवसभर करत असतात हे कल्पून पडोसन मधल्या नाटक कंपनी वाल्या किशोररावांची आठवण झाली.

दुर्गविहारी's picture

11 Apr 2018 - 5:15 pm | दुर्गविहारी

चाल लावणे, एखादी कविता सुचणे, एखाद्या कथेचा प्लॉट डोक्यात येणे, एखादी नृत्याची स्टेप तयार करणे किंवा एखादा खेळाडू एखादी नवीन प्रकारची शैली किंवा फटका किंवा चाल करतो, हि प्रतिभावंताची लक्षणे आहेत. जे करु शकतात त्यांची हि एकप्रकारची बुध्दीमत्ताच म्हणावी.
आता धाग्याचा विषय घेतला तर चाल केव्हाही सुचू शकते. बर्‍याच संगीतकारांनी असे किस्से सांगितले. जितके मला माहिती आहेत ते लिहीतो.
१ ) प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र उर्फ रामचंद्र चितळकर एन बहारात असतानाचे किस्से आधी सांगतो. अलबेलाच्या वेळी "धीरेसे आजा रे अखियन मे" हि कदाचित सर्वोत्कृष्ट अंगाई संगीतबध्द करुन गाणे रेकॉर्ड करायचे होते. तेव्हा रेकॉर्डींगची वेळ आली तरी चाल तयार नव्ह्ती. सी. रामचंद्र घरुन निघाले, ते कारमधून रेकॉर्डींग स्टुडिओपर्यंत पोहचत आहेत, तोपर्यंत चाल डोक्यात तयार झालेली होती.
संगीतकार सी.रामचंद्र आणि गीतकार राजेंद्रकृष्ण अशी जोडी होती. या दोघांना "आझाद" या दिलीपकुमार काम करत असलेल्या चित्रपटाची गाणी तयार करण्यासाठी तेव्हाच्या मद्रासला बोलावुन घेतले, निर्माता पक्षीराज प्रॉडक्शन. आठवडाभर दोघांनी मद्रासला टंगळमंगळ करण्यात घालवला. निर्मात्यांनी नौशाद यांनी नकार दिलेला म्हणुन सी.रामचंद्राना करारबद्द केले होते. ते काळजीत पडले. शेवटच्या रात्रीत या दोघांनी मिळून सगळी गाणी तयार करुन दुसर्‍यादिवशी सकाळी निर्मात्याच्या हातात ठेवली, तेव्हा ते थक्क झाले.
मात्र पुढे याच रामचंद्राचा एक किस्सा माझ्या वाचनात आला, कि त्यांनी चाली सुचतील तश्या एका डायरीत लिहून ठेवल्या होत्या. त्या एका पक्क्या वहीत लिहून ठेवा असे बर्‍याच जणांनी सुचवले, पण त्यांनी आळस केला. आणि एके दिवशी ती वही चोरीला गेली आणि चितळकरांचा संगीतकार म्हणून फॉर्म गेला.
गंमत म्हणजे असाच किस्सा संगीतकार हेमंतकुमार यांच्याबाबतीत घडला. एकदा त्यांच्या घरी चोरी झाली, मात्र त्यांची चालीची वही चोरट्याने नेली नाही, त्यावर हेमंतकुमार यांनी त्या चोरट्याचे जाहिर आभार मानले.
२ ) संगीतकार सलील चौधरी यांचे, " ओ सजना बरखा बहार आयी" हे सुप्रसिध्द आहे. हि चाल त्यांना कारच्या व्हायपरच्या आवाजाने सुचली असे त्यांनी सांगितले.
३ ) "मेरा कुछ सामान तुम्हारे पास " ह्या गीताचा कागद जेव्हा गुलजारने आर.डी.बर्मन यांच्या हातात ठेवला तेव्हा राहुल गंमतीने गुलजारना म्हणाले," उद्या मला एखाद्या अग्रलेखाला चाल लावायला सांगु नकोस". अर्थात त्यांनी या काहीश्या पद्द गाण्याला अजरामर चाल लावली. आर.डी.नी चालीचे केलेले प्रयोग हा एक वेगळ्या धाग्याचा विषय आहे. त्यामुळे एखाद्या जाणकाराने धागा लिहावा अशी विनंती.
४ ) मराठीमधेही अशी उदाहरणे आहेत. पिंजरा या चित्रपटाच्या वेळी शांताराम बापुंनी गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम यांना अक्षरशः एका खोलीत कोंडून पिंजराची गाणी करायला संगितली. त्यावेळी खेबुडकरांनी पानामागून पाने खरडली तरी मनासारखी लावणी होत नव्हती. अखेर रात्री दोन वाजता," ज्वानीच्या आगीची मशाल हाती" हे गाणे लिहून झाले. बापुंनी सांगितल्याप्रमाणे खेबुडकरांनी त्यांना फोन करुन लावणी एकवली. शांताराम बापु खुष झाले आणि म्हणाले ," उद्या आता त्या रामला ( कदम) चालीसाठी असाच पकडतो", तेवढ्यात फोन हातात घेउन राम कदम म्हणाले," बापु चाल तयार आहे" आणि त्यांनी चाल एकवली सुध्दा. अश्या प्रकारे एका अजरामर गाण्याचा जन्म झाला.
असे अनेक किस्से अजून सांगता येतील. बाकीच्यांना लिहू देत म्हणून थांबतो.

सस्नेह's picture

11 Apr 2018 - 6:08 pm | सस्नेह

पहिल्या पॅराशी बाडिस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Apr 2018 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं प्रतिसाद. इतर लिहितिलच, पण त्यांची वाट न पाहता अजून नक्की लिहा.

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 7:21 pm | प्रदीप

'आझाद' चा किस्स्सा मी असाच ऐकला आहे, पण किंचीत वेगळा. राजेंद्र कृष्णला (बहुधा पूर्वानुभावरून) तेथील निर्माता- दिग्दर्शक ह्यांच्या 'पुशी' कार्यपद्धतीबद्दल चांगले ओपिनियन नव्हते. म्हणून तो त्यांच्या समोरच बरेच दिवस गेला नाही. पण हळूच त्याने व अण्णांनी गाणी बनवून ठेवलेली होती. मग अगदी निकराची वेळ आल्यावर त्यांनी ती गाणी निर्माता- दिग्दर्शक ह्यांना ऐकवली. हे अशा तर्हेने केले गेले की, त्यांना त्यात ढवळाढवळ करता येणे आता शक्य नव्हते. तसेच पन्नास लीरिक्स करायला सांगावयासही आता वेळ उरला नव्हता. असे करूनही. त्या द्वयीने 'आझाद'साठी काय गाणी दिली आहेत!

तुम्ही लिहीलेला 'ओ सजना'चा किस्सा मला ठाऊक नव्हता, आवडला. मला वाटते, वायपरचा आवाजामुळे, सलीलदांना ठेका कसा असावा, ह्याविषयी काही कल्पना आली असावी. हे गीत मूळ बंगालीमधे 'ना जेऊ ना' प्रथम रेकॉर्ड झाले. त्यात तबला 'पचकट' म्हणता यावा, असा वाजवला आहे. मग त्याचे हिंदीकरण करतांना हा तुम्ही लिहीलेला स्टॅकॅटो ठेका वापरला आहे. त्या तबलासाथीने, त्या गाण्यास अक्षरशः चार चाँद लागले आहेत. मी ऐकल्याप्रमाणे ही कमाल लालाभाऊ गंगावणेंची. ह्या हिंदीकरणात अर्थात चाल प्रथम व गीत नंतर असेच झाले आहे. ही करामत शैलेंद्रची. 'शैलेंद्र गेल्यानंतर मला त्याची उणीव खूपच भासत राहिली', असे सलीलदांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

प्रदीप's picture

11 Apr 2018 - 7:55 pm | प्रदीप
  • एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे.

ह्यात 'गाणे' म्हणजे चित्रपटातील गाणे असा अर्थ अभिप्रेत आहे, तेव्हा त्यापुरतेच इथे लिहीतो.

मी हे जे लिहीतोय, ते मुख्यतः डिजिटलच्या अगोदरच्या जमान्यातील, म्हणजे १९४५ पासून सुमारे १९९० पर्यंतच्या जमान्याबद्दल आहे, कारण मला त्याविषयी थोडीफार माहिती आहे.

तर तेव्हा(तरी), गाणे नेहमीच तुम्ही लिहीले आहे ह्या लिनीयर पद्धतीने बनत नसे. किंबहुना तसे ते बनत नसेच असे म्हटल्यास फारशी अतिशयोक्ती ठरू नये. तेव्हा चित्रपटांचा, गाणी हा प्रमुख 'सेलिंग पॉईंट' होता, त्यामु़ळे संगीतकारास अतिशय महत्व असे.त्यामुळे, नौशादांसारखा एकाद दुसरा अपवाद सोडल्यास, सर्व टॉपचे संगीतकार प्रथम चाल सुचवत व त्यानुसार गीतकार ('लिरीसिस्ट'चा मराठी/हिंदी प्रतिशब्द) मग चपखल शब्द बसवत. अर्थात ह्या प्रक्रियेत ह्या दोघांचे ट्यूनिंग असणे अतिशय जरूरी असे. त्यामुळे आपणांस, शंकर-जयकिशन| हसरत व शैलेंद्र, एस. डी. बर्मन | शैलेंद्र किंवा मजरूह सुलतानपुरी, सी. रामचंद्र| राजेंद्रकृष्ण, ओ.पी.|एस.एच. बिहारी, लक्ष्मी-प्यारे|आनंद बक्षी, मदन मोहन्|राजेंद्रकृष्ण... अशा जोड्या दिसतील. 'दुय्यम' दर्जाच्या (कमर्शियली, [निदान मला जाणवलेल्या] गुणवत्तेनुसार नव्हे]) चित्रगुप्त, रोशन, जयदेव, सलील चौधरी ह्यांच्याही, अनुक्रमे राजेंद्र कृष्ण, साहीर, साहीर व शैलेंद्र ह्यांच्याशी अशा जोड्या होत्या.

माझ्या मते ह्या वर दिलेल्या प्रक्रियेत काहीच चुकीचे नाही. प्रत्येक गाणे हे एक प्रोजेक्टच असते, ते शेवटी आपल्यासमोर कसे येते, हे महत्वाचे. आणि तेव्हाच्या- वर निर्देशिलेल्या सर्वच, तसेच इतरही काही- संगीतकारांची व त्यांच्यासमवेत काम करणार्‍या गीतकारांची प्रतिभा इतकी उच्च प्रतिची होती, की त्यातून अनेकानेक सुंदर गीते तयार झाली.

आता, ह्या प्रथम ग्रेडच्या संगीतकारांच्या चालींना धरून गीत करायचे म्हणजे त्यासाठी तशी सिच्युएशन चित्रपटात असायला व्हावी. अनेकदा चाली तयार असत, पण चित्रपटांत व्यवस्थित सिच्युएशन मिळत नसल्याने त्या तशाच पडून राहत. पुढेमागे कुठल्यातरी चित्रपटात यथानुरूप त्यांचा वापर केला जाई. शक्य असल्यास, व प्रोड्युसरला एकादी चाल आवडल्यास चित्रपटात योग्य अशी सिच्युएशन निर्माणही केली जाई.

वरील प्रक्रियेस सर्वच संगीतकारांच्या व गीतकारांच्या बाबतीत अपवादही होतेच. म्हणजे गीताचे शब्द प्रथम लिहीले गेले व चाल त्यावर लावली गेली असेही होई. काही गीतकारांच्या संदर्भात हे विशेष होई-- उदा. साहीर.

गीताची सर्वसाधारण चाल व शब्द हे झाले की अ‍ॅरेंजमेंटचे काम सुरू होई. हे जिकीरीचे पण अत्यावश्यक काम करणारे अ‍ॅरेंजर्स, विशेषतः गोवन कॅथॉलीक्स होते, ह्याचे कारण त्यांना पाश्चिमात्य क्लासिकल संगीताची चांगली जाण असे, व वेस्टर्न नोटेशन्स त्यांना येत. सॅबेस्टियन, 'चिक चॉ़कोलेट', जॉनी गोम्स, ईनॉक डॅनियल ही ह्यातील काही प्रमुख नावे. ह्याव्यतिरीक्त बासू, मनोहारी, कर्सी लॉर्ड ह्यांचेही कार्य वाखाणण्याससरखे आहे.

अ‍ॅरेंजर्स प्रथम गीताचे वेस्टर्न नोटेशन बनवत. मग ते त्या गीतासाठी, प्रील्युड, इंटरल्युड्स, व असल्यास शेवटचे कोडा हे पीसेस काँपोज करत. तसेच गीताच्या 'मेलडीनुसार' गायनाच्या मागे,स्ट्रिंग, विंड, ब्रास इत्यादी 'सेक्शन्ससाठी' सविस्तर म्युझिक बनवत व त्यांची नोटेशन्स वादकांना देत.दोन वाक्यांच्या मधे काही छोटे सोलोज असावे, ते काय व कुठल्या वाद्याचे असावेत, हे ते ठरवत. ह्या सर्वांसाठी कुठली वाद्ये हवीत, व ती कुठले वादक वाजवतील, हेही अ‍ॅरेंजर्स ठरवत. मग त्यांच्या रिहर्सल्स करणे, गायकांसमवेत रिहर्सल्स करणे व शेवटी टेक करणे ह्या क्रमाने गीत तयार होई.

र्हिदम अ‍ॅरेंजर्स वेगळे असत. दत्ताराम, मारूतीराव कीर, कर्सी लॉर्ड, बुर्जी लॉर्ड, गुलाम महमद ही ह्या क्षेत्रातील काही ठळक नावे. संपूर्ण गीताच्या र्हिदमची जोखीम ह्यांच्यावर असे.

गायक- गायिकांचा सहभाग अर्थात अतिशय महत्वाचा. गीताची चाल आत्मसात करून घ्यायची, तिच्यावर स्वतःचा विचार करून त्यातील जागा निश्चीत करावयाच्या, कुठला शब्द कसा उच्चारला पाहिजे, कुठला 'मागे ठेवला' पाहिजे, हे स्वतः ठरवायचे व त्याप्रमाणे ते गायचे, ही अतिशय महत्वाची कामगिरी गायक- गायिका बजावत.

आणि अतिशय महत्वाचे, म्हणजे, गीताच्या वादकांच्या रिहर्सल्स, मग संपूर्ण रिहर्सल्स, व शेवटी टेक्स, हे सर्व अर्ध्या शिफ्टमधे (४ तासांत) आटोपले जाई. आणि त्याकाळी संपूर्ण गाणे, सलग, सुरूवातीपासून, शेवटापर्यंत एकाच झपाट्यात करायची प्रथा होती, म्हणजे एडिट्स नसत. तसेच वर उल्लेखिलेले सर्वच पार्टिसिपंट्स एकाच वेळी वाजवत, गात. हे किती जिकीरीचे होते, ह्याची कल्पनाच केलेली बरी.

नव्वदीच्या दशकापासून हे सर्व अनेक कारणांमुळे बदलले. गीताच्या "ऑडिटरी" भागावरील भर बराच कमी झाला, त्यांच्या व्हिडीयो प्रेझेंटेशनचा भाग महत्वाचा झाला. त्याचबरोबर, डीजिटलच्या जमान्यात मल्टिट्रॅ़क्स, व लॉसलेस जनरेशन्सची सुविधा चुटकीसरशी उपलब्ध झाली. त्यामुळे वरील सर्वच पात्रे एकाच वेळी हजर असण्याची गरज संपली. तसेच प्रत्यक्ष वाद्ये व वाजवता ('अ‍ॅकॉस्टिक'), सिंथेटिकचा जमाना सुरू झाला. ह्यात अर्थात गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या खर्चात, प्रचंड सेव्हिंग होऊ लागले.

अजून बरेच काही लिहीण्यासारखे आहे. ते नंतर लिहीतो.

प्रचेतस's picture

11 Apr 2018 - 8:12 pm | प्रचेतस

अजूनही लिहा ह्या विषयावर, उत्तम माहिती मिळत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Apr 2018 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रतिसाद. बर्‍याच गोष्टींची ओळख झाली. अजून नक्की लिहा.

अगदी योग्य माहिती दिली आहे प्रदीपदांनी. गाण्याची चाल आधीच बनवून नंतर त्यावर बोल लिहिणे हा प्रकार जवळपास नव्व्याण्णव टक्के गाण्यांच्या बाबतीत घडत असे. फार कमी गीतकार आधी गीत लिहून देत असत. उदा. मला आठवते त्याप्रमाणे कवी प्रदीप यांनी नेहमीच आधी गीत लिहून दिले व संगीतकारांनी ते नंतर चालीत बांधले.

'म्युझिक अरेंजर' ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती भारतीय चित्रपटसंगीतात श्रेयनामावलीत नेहमीच खूपच दुर्लक्षित राहिली आहे. मारुतीराव कीर हे पंचमचे राईटहॅण्ड होते. पंचमच्या यशात आशाबाईंचा वाटा किती हा प्रश्न एकवेळ लोक आवडीने चघळतात, पण मारुतीरावांचे श्रेय त्यांना मिळत नाही. हे केवळ एक उदाहरण झाले. आणि खाली राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे अरेंजरला केवळ आजकालच इतकं महत्त्व आलेलं नाहीये. ते पूर्वीपासूनच आहे.

एलपी ऊर्फ लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे शंकर-जयकिशन जोडीचे सहाय्यक होते. पुढे 'पारसमणी' पासून ते स्वतंत्र संगीतकार म्हणून प्रसिद्ध झाले. शंकर-जयकिशन यांची एक खुबी म्हणजे ते त्यांच्याकडील रेडिमेड परंतु अद्याप न वापरलेल्या चाली ह्या एखाद्या गाण्यात पेरून ठेवायचे. एवढा म्युझिक पीस हा पुढील गाण्याची चाल असायचा.

आणि बॉलिवूड संगीतातील प्लॅजियरिझमबद्दल काय बोलावं! कित्येक प्रसिद्ध गाणी ही पाश्चात्य किंवा तत्सम संगीतावरून ढापलेली आहेत. कधी एखादा निर्माता आग्रह धरतो म्हणून, किंवा कधी संगीतकाराला आवडली म्हणून (पक्षी: त्याला दुसरं काही सुचलं नाही म्हणून) अशी चोरी केली जाते. एक समकालीन संगीतकार शंकर-जयकिशनबद्दल बोलायचे, 'न जाने रात को डेढ-दो बजे कौन सा रेडियो स्टेशन लगा के सुनते रहते हैं ये दोनो।'

:-)

विजुभाऊ's picture

12 Apr 2018 - 11:12 am | विजुभाऊ

शंकर-जयकिशन यांची एक खुबी म्हणजे ते त्यांच्याकडील रेडिमेड परंतु अद्याप न वापरलेल्या चाली ह्या एखाद्या गाण्यात पेरून ठेवायचे. एवढा म्युझिक पीस हा पुढील गाण्याची चाल असायचा

.
बरोबर
उदाहरण " चल अकेला चल अकेला" या गाण्यामागे चल संन्यासी मंदीर मे या गाण्याची सुरावट वाजते
https://youtu.be/1HsLqPcayh4

विजुभाऊ's picture

12 Apr 2018 - 11:20 am | विजुभाऊ

शंकर-जयकिशन यांची एक खुबी म्हणजे ते त्यांच्याकडील रेडिमेड परंतु अद्याप न वापरलेल्या चाली ह्या एखाद्या गाण्यात पेरून ठेवायचे. एवढा म्युझिक पीस हा पुढील गाण्याची चाल असायचा

.
बरोबर
उदाहरण " चल अकेला चल अकेला" या गाण्यामागे चल संन्यासी मंदीर मे या गाण्याची सुरावट वाजते
https://youtu.be/1HsLqPcayh4

योगी९००'s picture

12 Apr 2018 - 10:01 pm | योगी९००

उदाहरण " चल अकेला चल अकेला" या गाण्यामागे चल संन्यासी मंदीर मे या गाण्याची सुरावट वाजते
पण या चल अकेला गाण्याचे संगीतकार ओ पी नय्यर आहेत. आणि चल संन्यासी चे शंकर जयकिशन...!! पण मला तरी चल अकेला मध्ये दुसर्‍या गाण्याची सुरावट वाजत आहे असे वाटले नाही.

'जिस देश में गंगा बहती है' या चित्रपटातील एक प्रख्यात गाणं आहे, 'ओ बसंती पवन पागल...'. या गाण्याची धून आपल्याला त्याआधी सात वर्षे आलेल्या 'आवारा'च्या शेवटच्या दृश्यात ऐकायला मिळते.

https://m.youtube.com/watch?v=_071zvBrB7I

'जाने कहाँँ गये वो दिन' ची धून अशीच या 'जिस देश में..' चित्रपटात, आणि त्याआधी 'आह'मध्येही सापडते.

आणि केवळ एसजे असं करायचे असं नाही. सलील चौधरी ते पंचम ते राजेश रोशन ते शिव-हरी इत्यादी बऱ्याच संगीतकारांनी जुन्या गाण्यातले इंटरल्यूड्स किंवा बॅकग्राऊंड म्युझिक पिसेस दुसऱ्या गाण्यांच्या चालीसाठी वापरले आहेत.

अजूनही अशी अनेक उदाहरणे आहेत. शोधून देतो.

हे हम तुम चित्रपटातील गाणे
https://www.youtube.com/watch?v=-HmqNcNlgaE

आणि हे त्याच चालीचे फना चित्रपटातील गाणे
https://www.youtube.com/watch?v=1JCszwP5tl8

किंबहुना फना चित्रपटात बर्‍याच ठिकाणी ही धून वापरली आहे. https://www.youtube.com/watch?v=zWEOx7TSM6I ह्या गाण्यातील शिटी ही ह्याच चालीवर वाजवली आहे

जाबाली's picture

12 Apr 2018 - 11:49 am | जाबाली

"कित्येक प्रसिद्ध गाणी ही पाश्चात्य किंवा तत्सम संगीतावरून ढापलेली आहेत.

नव्वद % पेक्शा जास्त !

arunjoshi123's picture

12 Apr 2018 - 12:19 pm | arunjoshi123

सगळी मानवात एकच आहे हो.
पाश्चात्यांची जीवनशैली आपण अंधपणे कॉपी करत आहोत त्यापेक्षा गाणी ढापणे कधीही चांगले. आणि त्यांनी कॉलोनायझेशनचे पैशे दिले कि आपणही त्यांचे कॉपीराइटचे पैशे देऊ.

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 7:38 pm | प्रदीप

उत्कृष्ट तबलावादाक होते. त्यांच्या करीयरची सुरूवात वसंत प्रभूंच्या गाण्यांना साथ करून झालेली आहे. त्यांचे प्रभूंबरोबरीचे अ‍ॅसोशिएशन जबरदस्त होते. आणि त्या गीतांची, त्यांतील चालींसकट, ऑर्केस्ट्रेशनसकट व अगदी लक्षात येणार्‍या तबलासाथीसकट, आठवण आजही मनात जागी आहे.

प्रभूंबरोबर काम करतांनाच मारूतीराव सचिनदांबरोबर काम करू लागले. त्यानंतर सचिनदांशिवा, ते पंचमसाठीही काम करू लागले. ते ह्या दोघांचे र्हिदम अ‍ॅरेंजर होते. सुमारे १९७० च्या सुमारास दादांच्या एका रेकॉर्डींगचे काम होते. तेव्हा ऐनवेळी पंचमबरोबर त्यांचे इतर सर्व अ‍ॅरेंजर्स, (बासू- मनोहारी) कामानिमीत्त मद्रास येथे गेले होते. त्यानंतर बासू- मनोहारींना दादांनी कधीही बोलावले नाही. मारूतीराव मात्र शेवटपर्यंत त्यांच्या समवेत होते.

अनेक संगीतकारांनी प्रथम इतर कुणाबरोबर अ‍ॅरेंजरचे काम केले आहे. व नंतर स्वतःच संगीतही दिले आहे. दत्ताराम (शंकर- जयकिशन), एल.- पी. (कल्याणजी- आनंदजी), चित्रगुप्त (एस. एन. त्रिपाठी), ओमी (मदन मोहन), डी. दिलीप (चित्रगुप्त), एन. दत्ता (एस. डी. बर्मन), पंचम (एस. डी. बर्मन), जयदेव (एस. डी. बर्मन) ही अशी काही ठळक नावे. अनेक प्रथितयश अ‍ॅरेंजर्सनी मात्र तसे केले नाही, हेही खरे. उदा. सॅबेस्टियन, चिक चॉकोलेट, जॉनी गोम्स, शामराव का़बळे.

चौकटराजा's picture

14 Apr 2018 - 9:59 am | चौकटराजा

जी एस कोहली ( ओ पी नय्यर ) मोहमद शफी ( नौशाद ) रवी ( हेमन्तकुमार ) गणेश ( लक्ष्मिकान्त प्यारेलाल) राम कदम ( वसन्त पवार) प्रभाकर जोग ( सुधीर फडके) अनिल मोहिले ( अनेक संगीतकार ) कल्याणजी आनण्दजी ( हेमन्त कुमार ) याना विसरून कसे चालेल ?

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 7:58 pm | पगला गजोधर

समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का?

गाणे कोणी बनवत नाही, तर गाणी निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली की आपसूकच गाणे बनते.
असं का ? तर लय ताल ही माणसांत भिनलेली आहे,
कशी ? तर आपल्या हृदयाची धडधड ही एक लय तालच आहे, तर लयीतालीचा पहिलावहिला सबंध माणूस गर्भात तयार होत असताना प्रथम आईच्या हृदयाची धडधड व नंतर स्वतः ची धडधड, माणसाच्या मनात लयी ताली विषयी आवड तयार करते, लहान बाळाला आई थोपटून झोपवले, ती सुद्धा एक लय तालच.
म्हणून अनादी काळापासून, लय व ताली विषयी माणसाला असलेले ममत्व हे उपजतच असते.
--------–---------------
मलाही या क्षेत्रातलं अजिबात काही कळत नाही. मीही सहज वाटलं ते लिहिलं आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Apr 2018 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं लेख. काही प्रतिसादही अप्रतिम आहेत !

प्रसाद गोडबोले's picture

11 Apr 2018 - 8:47 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर लेख ! माहीतीपुर्ण प्रतिसाद !

अलिकडेच आलेली काही गाणी इतकी सुरेख आहेत कि बासच मजा आली !!,
:
बापजन्म मधील देवाने दिधली लोचने तुला पाहण्या अप्रतिम आहे ! हे बहुतेक आधी चाल नंतर गीत असे लिहिले असावे !
कॉफी आणि बरेचकाही मधील तु असतीस तर ही पाडगावकरांची कविता ! काय भारी चाल लाव्लई आहे ! काय सुंदर म्हणाली आहे संजीव अभ्यंकरांनी !!
पुणे रॅप देखील अतिषय विनोदी वाटले ! =))

मला वाटते कि उपलब्ध्द असलेल्या चालीवर आशयघन गीत लिहिणे हे आधीच उपलब्ध असलेया कवितेला चाल लावण्या पेक्षा काकणभर कठीण आहे , तुम्हाला काय वाटते !

अवांतर : नुकतेच पॉपकॉर्न पे चर्चा ह्या कार्यक्रमात सौमित्र ला प्रश्न विचारला होता की तुम्ही सध्या गाणी लिहाय्चहे बंद का केले आहे तर तर तो अगदी सहजतेने म्हणाला कि ति जबाबदारी गुरु ठाकुर सारख्या नव्या पिढीच्या लोकांनी अतिषय सक्षमरित्या पेलली आहे म्हणुन ! त्याचा हा मनमोकळेपणा भावुन गेला !!

राही's picture

11 Apr 2018 - 9:15 pm | राही

सध्या अरेंजर हा खूप महत्त्वाचा घटक बनला आहे. प्रील्यूड, इंटरल्यूड हे तर तो बघतोच पण कुठली वाद्ये (म्हणजे कुठले वाद्यनाद) वापरायचे हे देखील तोच ठरवतो. ह्या लोकांना अलीकडे म्युझिक प्रोड्यूसर् म्हणतात. कित्येकदा संगीतकार गीताची नुसती कच्ची चाल मोबाइलवर पाठवून देतो. बाकीचे सर्व सोपस्कार म्यूझिक प्रोड्यूसर करतो. इतके महत्त्वाचे काम करत असूनसुद्धा श्रेयनामावलीत यांचे नाव मागेच असते. रवी, रामलाल, लक्ष्मीकांत प्यारेलाल हे एकेकाळी साहाय्यक म्हणजे आताचे म्यूझिक प्रोड्यूसरच होते. सध्याचे या क्षेत्रातले एक मराठी नाव म्हणजे आनंद सहस्रबुद्धे . कधी कधी हे लोक संगीतकार (कंपोझर) बनतातही.

राही's picture

11 Apr 2018 - 9:44 pm | राही

वरील प्रतिसादात म्यूझिक कंपोझर या शब्दाऐवजी म्यूझिक डिरेक्टर (संगीत दिग्दर्शक) हा शब्द अधिक योग्य ठरेल .

चौकटराजा's picture

12 Apr 2018 - 6:31 am | चौकटराजा

गाणे बनताना आधी काव्य बनत असे . काही वेळेस मात्र संगीतकार त्याच्या सोयीनुसार बदला सुचवीत असे. खळे व पाडगावकर यांचा श्रावणात घननिळा बरसला या गीताचा किस्सा सर्वाना माहीत आहे . रोज एका अंतरा खळेकाकाना पाडगावकार देत त्यामुळे त्या गीतांत सर्व अन्तरे वेगळ्या चालीचे आहेत. यशवंत देव व ओ पी नय्यर हे तर आधी चाल या पद्ध्द्तीच्या पूर्ण विरोधी होते. ओ पी म्हणत "पहले कफन बादमे मुरदा या कैसा हो सकता है ?" शब्दच चाल घेऊन येतात हे या दोघांनी वारंवार ठासून सांगितले आहे. ते मी स्वत: त्यांच्या मुखातून ऐकले आहे .

कोणतीही चाल लावताना त्याचा अर्थ काय आहे हे संगीतकाराला माहीत असावे लागते. त्यात कोणत्या बोली भाषेचा वापर आहे की कसे हे ही पहावे लागते. जसे हिन्दीत ब्रज बोली . भारतीय शास्त्रीय रागांचे ज्ञान असल्यास व लोकसंगीताचे ज्ञान असल्यास मग सोनेपे सुहागा.तसेच काही पारम्पारिक चाली व वेस्टर्नां अभिजात संगीताचे ज्ञान हे लागते . जपानी मुलगी सिनेमात आहे असे माहीत असल्यास सायोनारा .. सायोनारा ( लव इन टोकियो ) किंवा कितना हसीन ई जहान ( हमसाया ) सारखे भूप रागाचे सूर घेउन गीत येते कारण तो जपानी लोकसंगीतात आहे. मेरे मेहबूब तुझे , किसीकी यादमे दुनियाको ही भूलाये हुवे, हमको तुम्हारे ईश्कने क्या क्या बना दिया ही गीते पारंपारिक मुशायरा मध्ये वापरात असलेल्या चालीवर आधारित आहेत . आपल्याला आश्चर्य वाटेल कधी बहर कधी शिशिर हे गीत व " कम सप्टेंबर " या सिनेमाचे थीम गीत एकाच म्हणजे किरवाणी रागात आहे. जाने कहां गये वो दिन हे गंभीर गीत शंकर जय नी ज्या शिवरंजनी रागात बांधले आहे त्याचा रागात ओ पी नी " दिल जनाबके कदमोमे " हे कडक केबरा गीत केले आहे .
गाणे कसे बनते याची प्रक्रिया इथे https://www.youtube.com/watch?v=fA_HIYOh7vE आपल्याला चक्क पहायला मिळेल , नंतर तयार माल इथेच आहे .या मध्ये तयार माल मध्ये जे मेंडोलीन वाजते ते रेकॉर्डीग चे वेळी एल पी मध्ये लक्ष्मीकांत वाजवताना तुम्हाला दिसेल .

गाणे कसे बनते याची प्रक्रिया इथे https://www.youtube.com/watch?v=fA_HIYOh7vE आपल्याला चक्क पहायला मिळेल

काही सेकंद डोकं खाजवून चाल शोधणारी मंडळी अफलातून म्हणायची! यांनी क्षणभर डोकं चालवायचं आणि अख्ख्या देशानं दशकानुदशके तारिफ करत राहायचं!!!

या मध्ये तयार माल मध्ये जे मेंडोलीन वाजते ते रेकॉर्डीग चे वेळी एल पी मध्ये लक्ष्मीकांत वाजवताना तुम्हाला दिसेल .

हे कळणं प्रत्यक्ष आपल्या शेजारी बसून ऐकलं तर कळण्याची अधिक संभावना आहे. सध्याला हे अवघड वाटतंय.

ओ पी म्हणत "पहले कफन बादमे मुरदा या कैसा हो सकता है ?" शब्दच चाल घेऊन येतात हे या दोघांनी वारंवार ठासून सांगितले आहे.

आपल्या नि वरच्या अनेक प्रतिसादांत "आधी चाल, नि मग बोल" याचं अनेकवार जिक्र आहे. रागांबद्दलही मला फार कल्पना नाही, पण राग म्हणजे चालींची एक टेंप्लेट (साचा) असावेत. पण रागाधारित नसलेलं जे गाणं आहे त्याची चाल अगोदर कशी काय असू शकते. अक्षरे, शब्द, बोल, इ इ नसलेल्या केवळ चालींची ऑडियो वा व्हिडिओ जालावर आहेत काय? म्हणजे अशा चाली ज्यांचे बोल अजून ठरायचेत. वा असे अपलोड्स जे बोल ठरायच्या अगोदर केले होते.

चौकटराजा's picture

12 Apr 2018 - 5:07 pm | चौकटराजा

प्यासा या चित्रपटात सचिनदा नी हे गीत https://www.youtube.com/watch?v=CpsO5qu4Jsw तंग आ चुके हे गीत शायर सादर करताना दिसत आहे . हा आहे मुशायरा . यातील चाल ऐका व लगेच हे राग "छायानट" रागावर आधारित ओ पी चे गीत ऐका ... https://www.youtube.com/watch?v=zVRR-35lzdQ दोन्ही चालीत साम्य आहे ना ? कारण दोन्ही चाली त्या त्या संगीतकारांच्या नाहीतच मुळी. मात्र दोघानी त्यात आपल्या शैली चा सुगन्ध टाकला आहे .

arunjoshi123's picture

12 Apr 2018 - 11:11 am | arunjoshi123

खळे व पाडगावकर यांचा श्रावणात घननिळा बरसला या गीताचा किस्सा सर्वाना माहीत आहे . रोज एका अंतरा खळेकाकाना पाडगावकार देत त्यामुळे त्या गीतांत सर्व अन्तरे वेगळ्या चालीचे आहेत.

हे गाणं खूपदा खूपदा ऐकलं आहे. आणि गुणगुणायला मन गाणी शोधतं तेव्हा हे गाणं प्रामुख्यानं स्वतःस पुढे करतं. तुमच्या प्रतिसादानंतर हे गाणं पुन्हा ऐकलं. नुसते कानाला बरे वाटतात आणि त्यांतल्या आशयांमुळे काही भावना छेडून जातात म्हणून सर्वसाधारण लोकांना अलौकिक कलाकृती अनेकवार ऐकाव्या वाटतात. माझं असं निरिक्षण आहे कि बहुतांश सर्वांगसुंदर गीतांतही मुखडा त्यातली त्यात खूपच छान चाल दिलेला असतो. कदाचित म्हणून तो एकाच श्रवणात एकाच गीतात अनेकदा ऐकायला अजून चांगला वाटतो किंवा नकोसा अजिबात वाटत नाही.
====================================================
ह्या गाण्यात प्रत्येक अंतर्‍यात (त्या अंतरा आनंद आयडीचा उद्गम इथे तर नाही?) तीन ओळी आहेत. पैकी तिसरीची चाल मुखड्याशी मॅचिंग आहे. पण माझ्यासारख्याला ऐकणारास तरी ह्या गाण्यात इतक्या सर्व चाली आहेत असं जाणवत (वा माहित) नाही.
===============================================
बाय द वे, असले किस्से माहित असणारे "सर्व लोक" कुठे भेटतात म्हणे?

चौकटराजा's picture

12 Apr 2018 - 5:26 pm | चौकटराजा

जे सर्व मोठे , अनेक वर्ष टिकलेले संगीतकार होते त्या सर्वानी पाळलेला एका नियम म्हणजे मुखडा व अंतरा हे लक्षात रहातील असे सोपे करायाचे . त्यात एस जे यांचा तर जबाबच नाही .लोकांसाठी कला हे त्यांचे ब्रीद होते. हसरत जयपुरी व साहिर व बर्याच अंशी मजरूह हे उत्तम दर्जाचे शायर तर होतेच पण फिल्मी मालमसाला तयार करण्यासाठी , गाणी मीटर मध्ये बसविण्यासाठी त्यांचे डोके मिनिट नव्हे सेकंदात चालत असे. आधी धून मग बोल यात हसरत यांचा हात पकडणे मुशकील .चौर्यकर्म केले नाही असा भारतीय संगीतकार कोणी नाही . विश्वास बसणार नाही त्या यादीत आपले साधे भोळे स्नेहल भाटकर ही आले. पण याचा अर्थ या लोकांमध्ये फक्त ढापूगिरी चीच प्रतिभा होती का ? तर नाही . आपल्या शैलीने च्रोरलेले गीत ही ते मूळ गीतापेक्षाही उजवे होईल याची दक्षता घेत.

त्यात कोणत्या बोली भाषेचा वापर आहे की कसे हे ही पहावे लागते.

चालीत शब्द नसतात असं अन्यत्र म्हटलं असल्यानं हे विधान कळलं नाही.

मेरे मेहबूब तुझे , किसीकी यादमे दुनियाको ही भूलाये हुवे, हमको तुम्हारे ईश्कने क्या क्या बना दिया ही गीते पारंपारिक मुशायरा मध्ये वापरात असलेल्या चालीवर आधारित आहेत .

मुशायरा म्हणजे काय? (जालावर संध्याकाळची मैफल इ लिहिलं आहे, पण त्यानं ह्या शैलीची गाणी नि अन्य गाणी यांच्यातला फरक कळणार नाही.)

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 5:52 pm | प्रदीप
  • गाणे बनताना आधी काव्य बनत असे . काही वेळेस मात्र संगीतकार त्याच्या सोयीनुसार बदला सुचवीत असे

चित्रपट संगीत बहुतांशी मी, व इतरांनी लिहील्याप्रमाणे, प्रथम चाल व नंतर शब्द असा प्रवास असावयाचा. तुम्ही लिहील्याप्रमाणे ओ. पी. तसे करत नव्हते, हा एक अपवाद समजावा. तसेच मला वाटते, साहीर फारसा चालींवर शब्द बांधण्यास राजी नसावा. ह्याविषयी नक्की काही सांगता येत नाही. कारण त्याने सरसकट अशी भूमिका घेतली असती, तर तो चित्रपटसृष्टीत फारसा टिकला नसता. पण तो तसा टिकून होता, तो काही निव्वळ त्याच्या शायरीच्या जोरावर होता, असे मानने कठीण जाते. त्याच्या ईगोईस्टिक वागण्यामुळे रोशन सोडल्यास, प्रथम दर्जाच्या संगीतकारांनी त्याच्यासमवेत काम फारसे केले नाही. मग त्याची गीते, खैय्याम, चित्रगुप्त व जयदेव ह्यांजबरोबर आहेत. त्यातील काही गीतांवर 'इथे गीत प्रथम झाले आहे, व चाल नंतर' असा स्पष्ट ठसा दिसतो. उदा. 'तेरे बचपन को जवानी की दुवा देती हूं' हे आर्त गाणे.

मराठी भावगीतांच्या बाबतीत मात्र बहुतांश, गीत प्रथम व चाल नंतर असे होते. (मराठी चित्रपट संगीतात असे होतेच असे वाटत नाही). वसंत प्रभू, खळे व हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी अनेकानेक उत्तम कवितांना चाली लावून त्या अजरामर केलेल्या आहेत.

पैसा's picture

12 Apr 2018 - 12:06 pm | पैसा

बर्‍याच अंशी चर्चा छान चालली आहे. प्रदीपदा लिहीत आहेत हा मोठाच महत्त्वाचा पॉइंट आहे. गाण्याची चोरी याबद्दल पूर्वी बरेचदा चर्चा झाल्या आहेत तरी तेच तेच मुद्दे येताना बघून मजा वाटली.

प्रसाद_१९८२'s picture

12 Apr 2018 - 12:22 pm | प्रसाद_१९८२

गाण्याची चोरी याबद्दल पूर्वी बरेचदा चर्चा झाल्या आहेत तरी तेच तेच मुद्दे येताना बघून मजा वाटली.
--
या चर्चांचा एकादा दुवा मिळू शकेल काय ?

----
लेख व काही प्रतिसाद दोन्ही आवडले आहेत.

पैसा's picture

12 Apr 2018 - 1:24 pm | पैसा

https://www.misalpav.com/node/26715 हा एक लगेच सापडला. मला वाटते मारवा यांच्याशीही आमची या विषयावर उद्बोधक चर्चा झाली होती. अजून आहेत. ते परत कधीतरी. :)

https://www.youtube.com/watch?v=FOmsmhJ-gIs&t=1406s
-------------------------------
अनभिज्ञ श्रोत्यासाठी मालिका.

सुमीत भातखंडे's picture

12 Apr 2018 - 2:41 pm | सुमीत भातखंडे

प्रतिसादांमधूनही छान माहिती मिळत्ये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Apr 2018 - 2:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१९६७ चा सिनेमा शागीर्द. त्यावेळी 'दिल विल प्यार व्यार मै क्या..' ह्या गाण्याबद्दलचा रेडियोवर ऐकलेला एक किस्सा.
ह्या गाण्यात मजरूह सुलतानपुरीनी दिल्/प्यार. बरोबर अनेक ऊर्दु शब्दही घातले होते. गीत ऐकल्यावर दिग्दर्शक म्हणाले- गाण्यात जरा जास्तच जड शब्द आहेत.' वो(सायरा बानोचे पात्र) ये सब दिल/प्यार कुछ नही जानती.. दिल विल प्यार व्यार हटा दो..' हेच वाक्य मजरूहनी पकडले .. व गाण्यात बदल केला- जसे गाण्यात पुढे घर-वर नाम वाम.. लट वट. नैन वैन.. व थोड्याच वेळात दिग्दर्शकाना पाहिजे तसे गाणे तयार झाले.

नंदन's picture

13 Apr 2018 - 12:12 am | नंदन

नेहमीच्या रागदारी कोलाहलात चार सुरेल सूर कानी पडले. प्रदीपदा, चौरा, एस, विजुभाऊ, राही यासारख्या दर्दी रसिकांचे प्रतिसाद खासच.

नितिन थत्ते's picture

13 Apr 2018 - 10:51 am | नितिन थत्ते

चाल आधी, गाणे नंतर या विषयी मला वाटते ते.....

अरे संसार संसार हे गाणे घ्या. ते
ज्या वृत्तात आहे त्याच वृत्तात गीतकाराने नवे गीत लिहिले तर संगीतकाराच्या डोक्यात बाय डिफॉल्ट जुनी चाल आधी वाजेल आणि नवी चाल बांधण्यात अडचण येईल.

हृदयनाथांनी ही आठवण सांगितली आहे. सुरेश भट कविता वाचताना "स्वतःच्या" चालीवर गाऊन दाखवत. एका गीताच्यावेळी भटांनी गाऊन दाखवलेली चाल "अनलर्न" करण्यास सहा महिने लागले अशी आठवण हृदयनाथांनी सांगितली आहे.

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 9:18 pm | प्रदीप

खळ्यांनी 'गोरी गोरी पान' बद्दलही असेच म्हटले होते.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Apr 2018 - 1:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

इथे काही उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 5:37 pm | प्रदीप

अगोदरच्या प्रतिसादात मी 'जुन्या जमान्यातल्या' गाणी बनवण्याची प्रक्रिया लिहीली होती. त्यात थोडी माहिती लिहायची राहून गेली.

साँग- रेकॉर्डिंग स्टुडियोत, अर्थात एक कंट्रोल रूम असते, जिथे मिक्सर व मॉनिटरींगची सुबिधा असते. साउंड रेकॉर्डिस्ट, व संगीत दिग्दर्शक येथे बसून काम करतात. सिंगर्ससाठी वेगळा बूथ असतो, आणि वादकांसाठी मोठा हॉल असतो. ह्या हॉलमधे अ‍ॅकॉस्टिक इन्सुलेशनचे पडदे वापरून वेगवेगळे विभाग केलेले असतात-- स्ट्रिंगसाठी एक, पर्क्युजनासाठी एक इत्यादी. वादक ह्या विभागांत बसून वाजवतात. सिंगर्स व मुख्य पर्क्युजन्स ह्यांना हेडफोन्स दिलेले असतात, ज्यातून ते (संपूर्ण किंवा 'सबमिक्स') ऐकू शकतात, जेणेकरून ते एकमेकांशी 'सिंक' मधे रहातात. बाकी सर्व वादक नोटेशन्सवरून, व मुख्य पर्क्युजनचा आधार घेऊन वाजवतात. ह्याचा अर्थ बहुतांशी वादकांना, गायकांचे गाणे ऐकू येत नसते! आणि ह्या सर्व सव्यापसवातून गाणे जेमतेम तीन- चार तासांत रेकॉर्ड व्हायचे.

हे सर्व येथे सविस्तर अशासाठी लिहीले, की ह्या प्रक्रियेची कॉम्प्लेक्सिटी कळावी, व त्यात गुंतलेल्या सर्वांच्या स्किल्सची कल्पना यावी.

जर बरीचशी अ‍ॅरेंजमेंट अ‍ॅरेंजर्सच (तत्कालीन शब्दः सहाय्यक अथवा असिस्टंट) करत असतील, तर त्यात संगीत दिग्दर्शकाचे काय काम, असा प्रश्न केला जातो. तर, उत्तम अ‍ॅरेंजर्स घेणे, त्यांना तसेच वादकांना त्यांच्या प्रतिभेस अनुसरून काम करण्याची मुभा देणे, जेणेकरून ते मोटिव्हेट होतील, आणी तरीही त्या सर्व प्रक्रियेवर आपला ठसा उमटवणे, हे करण्यासाठी, मला वाटते, अतिशय धैर्य लागते, स्वतःविषयी भरपूर कॉन्फिडन्स असावा लागतो. ह्या दॄष्टीने त्या काळचे अनेक संगीतकार 'इन्स्टिट्यूशनस' होते. गुणी माणसांना हेरून आपल्याकडे कामास लावणे, त्यांच्या प्रतिभेस वाव देणे व तरीही आपली शैली, स्वतःच्या प्रत्येक गीतावर उमटवणे, हे येरागबाळ्याचे काम नोहे.

पैसा ह्यांनी 'ढापलेल्या चालीं' ह्या संबंधात पूर्वी झालेल्या चर्चेचा धागा टाकला आहेच, तेव्हा ते सगळे पुन्हा सांगत बसत नाही. पण, थोडक्यात, कुणाचीतरी चाल घेऊन ती सर्व गाण्यात तशीच्या तशी वापरणे व तिचा फक्त आधार घेऊन, त्यावरून गीत स्वतंत्ररीत्या विकसीत करणे, ह्यात फरक आहे. मला तर असे वाटते की, तत्कालीन संगीतकारांनी असे काही इकडून- तिकडून घेतल्यामुळे आमचा अतिशय फायदा झाला. फक्त भारतीय शास्त्रीय व लोकसंगीतावर आधारलेल्या गीतांचा विचार केला तरी, तसे केल्याने आमच्सासारख्या आम जनतेची शास्त्रीय संगीताची तोंडओळख झाली. आणि लॅटिन अमेरिकन लोकसांगीताची शैली व तेथील काही वाद्ये (कोंगो, बोंगो), ईस्टर्न युरोपियन शैली व काही वाद्ये (अ‍ॅकॉर्डियन), मध्यपूर्वेतील संगीत ह्यांनी आमच्या सांगितीक जीवनात बहुविधता आणली. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतावर तर तेव्हा सर्व ऑर्केस्ट्रेशनच अवलंबून होते-- व आताही आहेच. तेव्हा अनायासे आम्हाला, त्या संगीताची किंचीत का होईना, जाण आली; त्यांच्या व्हायोला, चेल्लो सारख्या वाद्यांना आम्ही आपलेले करून घेतले. ह्यामुळे कळत- नकळत आमचे कान त्या त्या प्रकारांच्या संगीतासाठी 'तयार' होत गेले, आमच्या सांगितीक सीमा सहजरीत्या विस्तारल्या. हे वाटते तितके साधे, सरळ नाही. त्यांनी तसे काहीच केले नसते, तर आम्ही अगदी खास जुन्या भारतीय शास्त्रीय संगीतावर(च) आधारलेली गीते ऐकत बसलो असतो! आता हेच पहा ना-- पौरात्य संगीतातून आपण काहीच घेतलेले नाही ('सायोनारा, सायोनारा' हा एकमेव अपवाद!) त्यामुळे मलातरी चिनी ऑपेराचे संगीत कानावर पडले की ते एकदम परके वाटते. ह्याउलट तुर्की रेस्टोराँमधे सुरू असलेले संगीत आपलेसे वाटते.

नितिन थत्ते's picture

14 Apr 2018 - 9:36 am | नितिन थत्ते

>>जर बरीचशी अ‍ॅरेंजमेंट अ‍ॅरेंजर्सच (तत्कालीन शब्दः सहाय्यक अथवा असिस्टंट) करत असतील, तर त्यात संगीत दिग्दर्शकाचे काय काम,

याचे उत्तर अ‍ॅरेन्जर्स संगीत दिग्दर्शक म्हणून फारसे यशस्वी झाले नाहीत यात आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल हा अपवाद असावा. आर डी स्वतः एसडींचे असिस्टंट होते पण
आर डी चे असिस्टंट असलेले बासू, मनोहारी सिंग किंवा कल्याणजींना असिस्ट करणारा बाबला हे संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी झाले नाहीत.

विशुमित's picture

13 Apr 2018 - 6:32 pm | विशुमित

माझा ५ गाणी रेकॉर्ड करायचा मानस आहे. पण मला संगीत संयोजनातला ग चा म येत नाही.
===
गीत आणि चाल एकदम रेडी असेल तर गायकासकट/ गायकाविना संगीत संयोजन, रेकॉर्डिंग, एडिटिंग करून फायनल गाणे लाँच करायला साधारण किती खर्च येतो ? किंवा
जरा मला तीच गाणी इतर संगीतकारांना विकायची असतील तर तशी सोय आहे का?

प्रदीप's picture

13 Apr 2018 - 6:48 pm | प्रदीप

मी त्या क्षेत्रात काम करत नाही, तेव्हा मी ह्याबद्दल आपणास काहीच ठोस माहिती देऊ शकत नाही. ह्याबद्दल माफी असावी.

मला वाटते, सध्या डिजिटलच्या जमान्यात,स्टुडिओचे भाडे (साउंड इंजिनीयरसकट) फारसे नसावे, कारण आता ही कमोडीटी झाली आहे. संगीत आयोजकांच्या व गायक गायिकांच्या बाबतीतही असेच. अर्थात टॉपचे अ‍ॅरेंजर्स, व गायक गायिका महागात पडणार, पण त्यांच्या कामाचा दर्जाही तसाच असणार (संपूर्ण प्रक्रियेस किती वेळ लागेल व म्हणून किती तासांसाठी स्टुडियोचे बुकींग करावे लागेल, हे जमेस धरून). थोडक्यात माझा होरा असा की अगदी कमी बजेटपासून, बर्‍याच खर्चिक -- अशी वाईड रेंज आता आपल्या येथे सध्या उपलब्ध असावी.

खरे तर, विजूभाऊंना ह्याविषयी विचारावे, कारण त्यांनी हे स्वतःच अलिकडे कधीतरी केलेले आहे.

विशुमित's picture

16 Apr 2018 - 4:15 pm | विशुमित

प्रदीप जी धन्यवाद...!!
विजू भाऊ कृपया तुम्ही या बाबतीत मदत कराल का??

विशुमित's picture

16 Apr 2018 - 4:15 pm | विशुमित

प्रदीप जी धन्यवाद...!!
@विजू भाऊ कृपया तुम्ही या बाबतीत मदत कराल का??

विजुभाऊ's picture

16 Apr 2018 - 4:33 pm | विजुभाऊ

नक्की

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Apr 2018 - 7:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम माहिती मिळत आहे. आतापर्यंत सर्व चालीना फक्त आणी फक्त संगीतकारच चाली लावतो असा समज होता. पण ह्या चाली लावण्यात त्याच्या टीममधले सहभागी असू शकतात असे दिसते.