महत्वाची सूचना

नमस्कार,
मिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.

दोसतार-६

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Apr 2018 - 6:11 am

मागील दुवा : https://misalpav.com/node/42377

या शंकेत हसण्यासारखे काय होते कोण जाणे. घाटे सरांना प्रचंड हसू आले. पोट धरून ते हसत राहिले. सरच हसता आहेत म्हंटल्यावर सगळा वर्ग हसायला लागला. निमीत्तच हवं होतं कायतरी.
हे हसू थांबतय न थांबतय तोच दारात महादू शिपाई येवून उभा राहिला.

तो दारात उभा राहिल्याचे कोणाच्याच लक्ष्यात आले नाही. सरांसहीत सगळा वर्गच हसण्यात सामील होता . मग कशाला इकडे तिकडे लक्ष्य जातंय.
शेवटी महादू नेच दारावर हात आपटून आपण आल्याचे जाणवून दिले.
काय रे काय झाले.
काही नाही सर काल काही विद्यार्थ्यांची दप्तरे वर्गात विसरली होती. मी ती शाळेच्या पर्ययवेक्षक सरांच्या खोलीत ठेवली होती. त्यानी सांगितले आहे की मुलांना ओळख पटवून दप्तर घेवून जायला सांगा.
दप्तर इतक्या लग्गेच सापडेल आणि तेही अशा ठिकाणी हे आमच्या कल्पनेपलीकडे होते. एखाद्याला न मागता अचानक कॅडबरी चोकलेटची आख्खी पेटी मिळावी तसे काहीसे वाटले. पोटामधे एखादे प्रचंड भांडे आसते आणि त्यात जीव नावाची वस्तु धापकन्न पडल्यावर एकदम आनंद वाटतो.एखाद्या उनाड पोराला; न मागताच सरांनी शाबासकी द्यावी तसेच काहिसे. हायसे की काय म्हणतात ना ते वाटले.
एवढे गणीत पूर्ण होऊ देत.हा तास झाला की येतील मुले. घाटे सराना काल काम वेगाचे गणीत पूर्ण करायचे होते.आणि आता आम्हालाही फारशी चिंता नव्हती.
आहो सर त्या दप्तरात काय आहे काय माहीत एकदम वास मारायला लागलाय. पर्ययवेक्षक सर पार हैरण झाले आहेत. त्या मुलाना लगेच पाठवा.
पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखे आम्ही सरांना जाऊ का म्हणून न विचारताच वर्गाबाहेर पडून महादू शिपायाच्या मागे गेलो.
"कसला वास येत असेल रे दप्तरात"? टंप्या ला आता नवनवीन शंका येवू लागल्या. " मी काल झुंजारराव कथेचे पुस्तक वाचत होतो. त्यात लिहीले होते की इन्स्पेक्टरानी घरातून कसलासा वास आला म्हणून घराचे दार फोडून त्यातून मृतदेह बाहेर काढले. आपल्या दप्तरात काहितरी वास मारतोय म्हणे".
तो आपल्याच दप्तरातूनच कशावरून येत असेल? यल्प्याचे प्रतीप्रश्न. " तो वास महादू शिपायाच्या तंबाखूच्या डबीचापण असू शकेल किंवा दुसर्‍या कुणाचेतरी दप्तरही असू शकेल तेथे.
हॅट रे. काल वर्गातून राहिलेली दप्तरे महादू शिपायाने नेऊन ठेवली. त्याला ती दप्तरे आपल्या वर्गातली आहेत हे माहीत आहे.
किंवा मग पर्यवेक्षक सराच्या खोलीत उंदीर किंवा घूस मरून पडली असेल. आमच्या घरी एकदा असाच उंदीर मरून पडला होता. इतका घाण वास येत होता की उंदीर शोधायला आणलेले मांजरही पळून गेले होते त्या वासामुळे.
जाऊ दे. आपण फार विचार करण्यापेक्षा दप्तरच उघडून बघू.
आणि त्या वासामुळे आपण बेशुद्ध झालो तर? त्या झुंजार कथेच्या पुस्तकात लिहीलंय की झुंजार ने क्लोरोक्वीन रुमालावर टाकून त्याचा वास देऊन रातराणी काटकरला बेशुद्ध केले.
क्लोरोक्वीन नाय रे. क्लोरोफॉर्म. त्यानं बेशुद्ध करतात. क्लोरोक्वीन म्हणजे मलेरीयावरचं औषध.
त्यात क्लोरो आहे ना मग झालं. नुसत्या नावानं ही बेशुद्ध होऊ शकतो माणूस. नामस्मरणाचा महीमा ..... टंप्या
पर्यवेक्षक सरांच्या ऑफीसच्या दारातूनच आम्हाला तो वास जाणवला. चांगलाच जोरात वास येत होता. कसला माहीत नाही. पण भिजलेल्या गादीतून यावा तसा किंवा जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत वटवाघुळ ठेवलेल्या बरणीतून यावा तसा किंवा कधीच न उघडलेल्या जुन्या फडताळातून उघडल्यावर भसकन यावा तसा किंवा मग या सगळ्याचा एकत्रीत यावा तसा तो वास होता. भयानकच होता तो. नाकात त्या वासामुळे हुळहुळू लागले.
महादू ने आम्हाला लांबूनच आमची दप्तरे दाखवली.
ई तुबचीच दप्तरे आहेत दा? नाक दाबून धरल्यामुळे महादू शिपाई पडसे झाल्यासारखे बोलत होता.
हो.
ती तुबचीच आहेत ए कशावरूद टरवायचे? महादू शिपायाला म, न, ठ ही अक्षरे बोलता येत नव्हती. त्या ऐवजी तो ब्,द ,ट म्हणत होता. पण एकुणातच त्या दप्तरांमधुन येनारा वास भयानक होता. गल्लीत कुत्रे मरुन पडावे आणि म्युनिसिपालीटीचे लोक लवकर न आल्यामुळे गल्लीतल्या लोकांची व्हावी तशी महादूची अवस्था झाली होती. पर्यवेक्षक सर तर वास असह्य झाला म्हणून सुतारकामाच्या वर्गात जाऊन बसले होते.
म्हणजे आत आमच्या वह्या पुस्तके आहेत. त्यावर नावे आहेत आमची. काढून दाखवतो.
माझ्या दप्तरात डबा आहे त्यावर आमचे नाव कोरलेले आहे. काढून दाखवतो.
मी काल डब्यात माशाची तुकडी आणली होती. डबा खायला विसरलो. अजून असेल डब्यात शिळी तुकडी. उघडून दाखवतो.
यल्प्या डबा उघडून दाखवणार आणि त्यामुळे तो येणारा भयानक वास याला घाबरून महादूने आम्हाला ती दप्तरे घेऊन जायला सांगितले.
मात्र दप्तरे थेट वर्गात देण्या ऐवजी अगोदर पटांगडावर द्या. महादू अजूनही नाक दाबुनच बोलत होता.
आम्ही दप्तरी उचलली आणि तडक पटांगणावर गेलो. तीघांपैकी कोणाच्यातरी एकाच्या दप्तरातून तो वास येत होता.
ए टंप्या तुझ्या दप्तरातून येतोय तो वास.
ए नाय रे यल्प्याच्या दप्तरातून येतोय. बघ रे बघ तूच बघ वास घेवून
"आपण असं करुया. दप्तरं वेगवेगळी उघडूया. लांब ठेवुन". इतका घाण वास स्वतः होऊन घेण्यापेक्षा मी पटांगणाला चार फेर्‍या मारायची किंवा दहा वेळा धडा लिहून आणायची शिक्षा स्वेच्छेने घेतली असती.
लांब कशाला हे बघ मी माझे दप्तर उघडतो. म्हणत टंप्याने त्याचे दप्तर एकदम उपडेच केले. त्यातून काय काय घरंगळले. वह्या पुस्तके तर होतीच त्या शिवाय शिसपेन्सील चे तुकडे,तेली खडूचे , मधे भोक पडलेला खोडरबर, पेन्सील ला टोक करायचे टोकयंत्र, आख्खे तोंड वासलेला करकटक. दोन तुकड्यात विभागलेला कोनमापक.
"अरे हे तुझ्या कडे आहे होय. मी कवापासनं शोधत होतो. आमच्या कडे माझ्यात आणि आणि ताई मधे भांडणं पण झाली की याच्यावरून. " करंडीतून हापूसचा आंबा घेताना निरखून बघावा तसा यल्प्या ते टोकयंत्र हातात घेवून निरखून बघत होता.
टंप्याचे त्या कडे लक्ष्यच नव्हते. तो डबा घेवून त्याचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होता. बघ बघ येतोय का रे वास कशातूनतरी. तो वास या यल्प्याच्या दप्तरातूनच येतोय. काय म्हणाला तो काल डब्यात काय ते माशाची तुकडी काय आणली होती त्याचा असेल. सांग सांग याला त्याच्या डबा उघडायला.
यल्प्याने त्याचे दप्तर हातात घेतले .
ए थांब आम्हाला लांब जाऊदेत मगच तू उघड तुझे दप्तर.टम्प्याने त्याचा मुद्दा लावून धरला होता. बरोबरच होते ते. यल्प्याच्या डब्यातल्या वासामुळे जर आम्ही बेशुद्ध वगैरे झालो झालो असतो तर महादू शिपायाने आम्हाला त्या वास येणार्‍या दप्तरासकट पर्यवेक्षक सरांच्या खोलीत ठेवून दिले असते.
आम्ही लांब गेल्यावर यल्प्याने त्याचा डबा उघडला. त्याच्या चेहेर्‍यावरून त्याच्या डब्याला येणारा वास किती बेक्कार येत होता ते समजतच होते.माणूस घाईची लागल्यावरसुद्धा इतके चित्रविचीत्र चेहेरे करत नसेल . तो बेशुद्ध झाला नाही इतकेच. त्याने डबा उघडला. डब्यात जे काय होते ते पटांगणाशेजारच्या ओढ्यात टाकुन दिले. टाकीच्या नळावरून डबा मातीने घासून धुतला .
आमच्या कडे येताना त्याच्या चेहेर्‍यावरचा मोकळे झाल्याचा आनंद लपत नव्हता.
आरे ती काल डब्यात आणलेली माशाची तुकडी. त्याचा वास येत होता. अगोदरच माशाचा वास त्यात तो आंबलेला. पर्यवेक्षकच काय पण माशाला स्वतःला सुद्धा तो वास सहन झाला नसता. मी म्हणून सहन करू शकलो.
हो ना. आता घरी गेल्यावर ते दप्तर उन्हात वाळत घाल. म्हणजे पुस्तकाना लागलेला वासही जाईल.
"कुठलीही गोष्ट वाया जात नाही हे पटलं मला. आज्जी म्हणते प्रत्येक गोष्टीला काहीतरी उद्देश असतो. भगवंताने या जगात प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्य करायलाच पाठवलेले असते". दप्तरांचा शोध लागला होता. त्या वासाचाही उगम समजला होता त्यामुळे टम्प्या आता रामाच्या देवळातल्या कथेकरी बुवासारखा बोलायला लागला होता.
म्हणजे ...
तुमच्या लक्ष्यात येतंय का. त्या माशाच्या तुकडीचे कार्य काय होते. त्या माशाच्या तुकडी च्या वासामुळे पर्यवेक्षक सराना आपल्या कालच्या गायनाच्या चुकीचा विसर पडला. आणि शिक्षा मिळायच्या ऐवजी आपली सुटका झाली. मासा होऊन देवाने मनुची प्रलयातून सुटका केली. तसेच एकदा तशी माशाच्या तुकडीने आपली पर्यवेक्षक सरांच्या जुलमापासून आपली सुटका केली. आपली सुटका करणे हे त्या माशाच्या तुकडीचे कार्य होते. टंप्याच्या जिभेवर सरस्वती नाचत होती. त्याने या अवस्थेत किमान एक तासभर तर रामाच्या देवळात कीर्तन केले असते.
आपल्याला भगवंताने कोणते कार्य करायला पाठवले असावे हे सांगता येईल का?
यल्प्याच्या या प्रश्नाचे उत्तर टंप्याच काय पण आमच्या तिघांचे पालकही देऊ शकत नव्हते.
क्रमशः

विरंगुळाकथा

प्रतिक्रिया

हाहाहा! चांगलंय तत्त्वज्ञान. :-D

स्पार्टाकस's picture

11 Apr 2018 - 7:53 am | स्पार्टाकस

शाळेचे दिवस आणि त्यातले असेच अचाट उद्योग आठवले.
धमाल तत्वज्ञान!

प्रचेतस's picture

11 Apr 2018 - 8:50 am | प्रचेतस

झक्कास

सविता००१'s picture

11 Apr 2018 - 12:52 pm | सविता००१

विजुभाऊ, कित्ती दिवसांनी जबरदस्त एन्ट्री केलीत हो...
मस्त लिहिताय.
छानच

बांवरे's picture

12 Apr 2018 - 1:12 am | बांवरे

मजा आली वाचताना.
वाचतोय, लिहीत रहा भाउ !

गवि's picture

12 Apr 2018 - 6:49 am | गवि

भारी आहे.. पण या भागात तुम्ही माशाची तुकडी इतकी खराब केलीत की आता ताजी खातानाही हे आठवणार. :-(

या आणि स्पार्टाकस यांच्या dead man's hand या कथामालिकेच्या निमित्ताने एक विचार मांडायचा आहे. पण कोणतीतरी एक मालिका संपल्यावर कदाचित मांडीन.

बाकी विजुभौ, झक्कास मालिका. श्रीलंकासे लगे रहो.

अनिता's picture

20 Apr 2018 - 3:56 am | अनिता

ही एक मजेदार कथा आहे!

सुधीर कांदळकर's picture

24 Apr 2018 - 7:00 pm | सुधीर कांदळकर

सगळे भाग आताच वाचले. मजा आली. धन्यवाद.

पैसा's picture

25 Apr 2018 - 9:24 am | पैसा

मस्त चालू आहे!

लई भारी's picture

25 Apr 2018 - 3:03 pm | लई भारी

हसून हसून फुटलो ऑफिस मध्ये :)
सगळे भाग एकदम वाचले. जमलंय.
अजून येऊ द्या.