अन्नदाता सुखी भव भाग ८ (अपूर्ण): तोतयांच्या शोधांत

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
2 Mar 2018 - 5:56 am

या आधीचे "अन्नदाता सुखी भव" चे भाग
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
भाग ६: http://www.misalpav.com/node/33829
आणि
http://www.misalpav.com/node/41702
भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (अपूर्ण): http://www.misalpav.com/node/41733
भाग ७: जग(व)ण्यापुरते (च) अन्न (पूर्ण) http://www.misalpav.com/node/41771

(वि. सु. या लिखाणांत कुठल्याही पद्धतीचा किँवा "मी म्हणतो तेच बरोबर" असा प्रचार करण्याचा हेतू मुळीच नाही. लेखाच्या शेवटी असलेली संदर्भसूची वापरून आपापली मतें बनवणे किंवा आपल्याकरता काय चांगले याच शोध घेणें सहज शक्य आहे. हे लिखाण The Lancet सारख्या शास्त्रीय मासिकाकरता नसून मि. पा. करता असल्याने जी सोपी आणि स्वैर भाषा वापरली आहे त्यामुळे कांही भाग "ललित" वाटणे शक्य आहे. http://www.misalpav.com/node/42033 आणि http://www.misalpav.com/node/41287 या मि. पा. वरील लेखातील कांही माहिती या लेखातही दिसेल, पण हा लेख insulin किंवा glucose वर नसून "पर्यायी" साखरेवर आहे हे लक्षांत घेणे जरूर आहे).

पुण्यातल्या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांत बिनसाखरेच्या लाडवांची मोठी परात काचेच्या कपाटांत विकण्याकरता ठेवलेली होती. त्या सोबतची पाटी मात्र "शुगर्फरी लाडू" किंवा "शुर्गफ्रि लाडू " अशासारखी काहीतरी होती. पाटी होती मात्र झोकदार. अक्षरे छापीलच होती. लिहिणाऱ्याला काय लिहायचे हे नक्की माहित होते - विचार हा असावा, इंग्रजीतले शब्द वापरले म्हणजे कसे भारदस्त दिसते पण बिनइंग्रजीवाल्याना देखील वाचता येईल असे असायला हवे, कारण आपलं गिऱ्हाईक कुठे इंग्रजी शिकलेलं आहे? - पण मराठीतील जोडाक्षर नक्की कसे लिहायचे याबद्दल विचार पक्का न झाल्यासारखे दिसत होते. अशी "सुद्द म्हराटी"तील ही पाटी वाचल्यावर "आमचेकडील प्रत्येक पाटीवरचा मजकूर खरा असतोच असे नाही" अशी एखादी पाटी (वि. सू.: "आमचेकडील" हा अगदी खानदानी शब्द लक्षांत घ्यावा) वाचल्यासारखे तर वाटलेच पण साखरेविरुद्ध सर्वत्र चाललेले युद्ध समाजाच्या कुठल्याही स्तरांत आहेच हेही लक्षात आले.

साखरेविरुद्ध या जगभर चाललेल्या युद्धाचे मूळ साखरेच्या मूळ "गुणां"तच आहे. साखरेमुळे आपण खातो त्या गोष्टीना गोड चव येते तसेच ऊर्जेचाही पुरवठा होतो. "अति सर्वत्र वर्जयेत्" किंवा "अती तेथे माती" या अगदी मूलभूत शिकवणीचा, साखरेच्या वापराबाबत (आणि इतर अनेक गोष्टींबाबतदेखील) पडलेला विसर, जगभरच्या जीवनपद्धतीत झालेला बदल, संप्रेरकांचा (hormones) वाढता "लोचा" अशा अनेक बाबींचा परिणाम म्हणजे जगातल्या "अतिविशाल" तसेच मधुमेहग्रस्त लोकांच्या संख्येत गेल्या कांही दशकांत झपाट्याने होत असलेली वाढ. "अतिविशाल"पणाचे (अनेकांतील एक) कारण आहारामधून मिळालेली ऊर्जा जर पुरेपूर वापरली गेली नाहीतर तिची साठवण चरबीच्या रूपात झाल्याने लठ्ठपणा येतो. शरीरात साखरेचा वापर होतांना तयार होणाऱ्या glucose चा मधुमेहग्रस्त लोकांना (वेगवेगळ्या कारणांमुळे) योग्य/पूर्ण वापर करता न आल्याने त्यांच्या शरीरांत वाढणारे glucoseचे प्रमाण आटोक्यात न राहता हळूहळू शरीरास घातक ठरते. साखरेच्या वापरानंतर दातांची योग्य काळजी न घेणाऱ्याना दंतवैद्यांचे आयुष्यभराचे देणेकरी व्हावे लागते ते वेगळेच.

पहा ना कसा या काही लोकांच्या नशिबात "कटु शर्करा" योग आहे! साखर असलेला काहीही पदार्थ खातांना यांच्या डोक्यांत "लठ्ठपणा", "मधुमेह" किंवा गोड खाण्याच्या संबंधात मागच्या वैद्यकीय तपासणीच्यावेळी मिळालेली तंबी, हेच विचार असतात. कुणी त्यावर तोडगा म्हणून "बिनसाखरेच्या" ("शुगर्फरी " किंवा "शुर्गफ्रि" अशा गोंडस, मोहमयी किंवा अनाकलनीय नावाखालील) पदार्थांचा मार्ग धरला तर हमखास त्यात काहीतरी खोट निघतेच - कधी त्या पदार्थाना काहीतरी कडवटपणा असतो तर कधी ते असावे तसे (म्हणजे साखर वापरून केलेल्या पदार्थांसारखे) नरम/कडक, खमंग, तोंडात विरघळणारे नसतात. एवंच जरी "शुगर्फरी " किंवा "शुर्गफ्रि" नावामुळे guilt free वाटले तरी जिव्हासौख्यात काहीतरी कमतरता जाणवतेच. नशिबातला खडतर "कटु शर्करा" योग याखेरीज दुसरे काय म्हणणार अशा लोकांपुढच्या विवंचनेला?

ही "अतिविशाल" तसेच मधुमेहग्रस्त लोकांच्या संख्येत होणारी वाढ (आणि त्याचे आरोग्यव्यवस्थेवरील दुष्परिणाम) जितक्या प्रकर्षाने जाणवू लागली तितक्या जोराने साखरेविरुद्धच्या युद्धाचे पडघम जास्तच जोरात वाजू लागले आणि एक विचार शास्त्रज्ञाना सतावू लागला - "साखर" ही साखरच असणे जरूर आहे का? आपण "साखर" म्हणून जर इतर काहीही वापरून "साखरे"इतकीच आणि "साखरे"सारखीच गोड चव जर आपण खातो त्या पदार्थाना आणू शकलो तर साखरेपासूनचा लठ्ठपणा आणि मधुमेह टाळू नाही का शकणार? अर्थातच जे काही "साखर" म्हणून वापरायचे ते "साखरे" इतकीच आणि "साखरे"सारखीच गोड चव देणारे तर असले पाहिजेच पण साखरेइतकी ऊर्जा देणारे (आणि म्हणून लठ्ठपणा टाळण्याकरता ऊर्जेच्या पूर्ण वापराचे बंधन घालणारे) आणि साखरेसारखे "अभिसरणाकरता Insulin आवश्यक" या प्रकारचे असून उपयोगाचे नाहीं. बराच काळ चाललेला "प्रति- साखरेचा" किंवा साखरेच्या तोतयाचा शोध या विचारसरणीवर आधारित आहे.

आदिमानवाच्या काळांत अनेक कारणांनी शरीरात ऊर्जेचा सांठा असणें (किंवा झटपट ऊर्जा देणारे फळांसारखे पदार्थ पट्कन खायला मिळणे) हा जीवनमरणाचा प्रश्न होऊ शकत असे उदा. शिकार करतांना किंवा वाघ किंवा तत्सम प्राणी मागे लागलेला असतांना. म्हणूनच आदिमानवाच्या काळापासून मानवी शरीराला लागलेली ऊर्जेच्या शोधाची (खाण्याकरता गोड वस्तू शोधून मिळवण्याची) संवय किंवा ऊर्जा साठवण्याची वृत्ती अजूनही आपल्या सगळ्या शरीरसंस्था टिकवून आहेत.

इथे थोडासा अगोड, अंमळ कंटाळवाणा, रटाळ - "गोडपणा" म्हणजे नक्की काय आणि गोड खाण्याचे परिणाम याबद्दलचा- उहापोह करणे जरूर आहे. सोप्या शब्दात वर्णन करायचे तर कल्पना करा हात आणि हातमोजा या "जोडी"ची. हें दोन्ही जिथे एकमेकांभोवती चपखल बसतात तेव्हाच ते व्यवस्थित काम करतात. किंवा कल्पना करा कान आणि त्यांत अडकवलेला ध्वनिवर्धक या "जोडी"ची. हें दोन्ही जिथे एकमेकांभोवती चपखल बसतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्यामधून वाहणारे संगीतदेखील "आवडणारे" असते, विना-खरखरीचे ऐकू येत राहते तेव्हाच हा सगळा संच व्यवस्थित काम करत असल्याची भावना टिकून रहाते आणि हे काहीतरी "आवडणारे आणि आनंद देणारे आपल्याला मिळत आहे, ते चालूच ठेवावे" हा विचार बळावतो.

उसापासून बनणाऱ्या "नेहमीच्या" साखरेचा (व्यावहारिक नांव cane sugar रासायनिक नांव sucrose रासायनिक सूत्र C12H22O11 म्हणजे हा पदार्थ "पिष्टमय" या यादीतला, sugar beet सारख्या कंदांपासून बनणारी साखर देखील sucrose/ C12H22O11 च असल्यामुळे sugar beet पासूनच्या साखरेचा वेगळा असा उल्लेख केलेला नाहीं) सूक्ष्मतम आकार (molecule) साधारणतः आजोबांच्या जमान्यातल्या आडव्या होऊ शकणाऱ्या दोन आरामखुर्च्या पायाला पाय लाऊन जमिनीच्या थोड्याशाच वर राहातील अशा पसरल्यावर दिसतील तसा असतो. आपल्या जिभेवरच्या गोडपणा जाणवणाऱ्या मज्जातंतूच्या टोकांचा (receptors) आकार आणि या खुर्च्यांचा आकार हात आणि हातमोजा या "जोडी" सारखा किंवा कान आणि त्यांत अडकवलेला ध्वनिवर्धक या "जोडी"सारखा एकमेकांभोवती चपखल बसणारा असतो. त्यामुळे ही साखर एखाद्या पदार्थांतून (किंवा पिष्टमय पदार्थामधील) जेव्हा तोंडात अवतरते तेव्हा लगेचच अशा चपखल बसण्याने तिची जाणीव मज्जासंस्थेत होते आणि त्यानंतर अनेक तऱ्हेच्या संवेदनांना सुरवात होते (आपल्या मज्जासंस्थेचे स्वतःचे आणि इतर संस्थांशी संबंधित कार्य कसे चालते याचे शास्त्रीय आणि विस्तृत वर्णन बरेच लांबलचक आणि क्लिष्ट झाले असते. म्हणून जरूर तेव्हढेच वर्णन शक्य तेव्हढ्या साध्या भाषेंत तसेच थोडेसे रोजच्या जीवनातले दाखले देत लिहिले आहे).

थोड्या सोप्या आणि स्वैर भाषेंत सांगायचे तर जिभेवरच्या गोडपणा जाणवणाऱ्या मज्जातंतूच्या टोकांचे (receptors) साखरेची जाणीव झाल्याबरोबर लगेचच मेंदूशी "आपल्याला नेहेमी लागणारी ऊर्जा (आणि छान चव) देणारा पदार्थ आला आहे हो, जमेल तेव्हढा साठा करून ठेऊ" असे संदेशवहन सुरू होते. कानांत अडकवलेल्या ध्वनीवर्धकातून "आवडते" संगीत विना-खरखरीचे ऐकू येत राहते तेव्हा हा सगळा संच व्यवस्थित काम करत असल्याची भावना आणि त्यातून लागणारी तंद्री या सगळ्याचा परिपाक अंमळ रेंगाळण्यात, तल्लीन होण्यात आणि म्हणून "आणखी थोडावेळ(च) ठेऊया की चालू हा आनंददायक कार्यक्रम" असा विचार करण्यात होऊ लागतो. जर अशा तल्लीन माणसाला वेळोवेळी घड्याळाने (किंवा "अहो, ऐकलं कां" सारख्या "alarm" ने) फटकारले नाही किंवा तो जाता येता घड्याळाला आणि स्वतःलाही संपूर्ण विसरला तर हळूच हा कार्यक्रम व्यसनांत जमा होऊ लागतो. अगदी त्याचप्रमाणे जितकी "ओळखीची" साखर असेल (म्हणजेच तिचे सूक्ष्म रूप जितके "साखर किंवा गोडवा ओळखणाऱ्या" मज्जातंतूच्या टोकांवर चपखल बसणारे असेल) तितका जोरदार "अरे व्वा, आली वाटतं साखर" तसेच "जमेल तेव्हढा तिचा -ऊर्जेकरता -साठा करून ठेऊ" या मंत्रांचा गजर सुरू होतो आणि काही काळाने "येत राहू दे की अजून थोडी " (म्हणजेच आणखी थोडे खाऊन घेऊ) हा विचारदेखील वारंवार त्यांत - "पोट भरले" हा संदेश येईपर्यंत - मिसळत रहातो.

आदिमानवाच्या काळात ऊर्जा मिळवण्याचे मार्ग म्हणजे पिकलेली फळेच नव्हे तर कंद किंवा आजूबाजूला मिळणारे झाडांचे खाण्यासारखे भाग (जसे कोवळा फुलोरा/पालवी, खाण्यासारख्या बियांपासून सालीपर्यंत मुख्यतः असे पदार्थ की ज्यातून पिष्टमय पदार्थ मिळतील) अथवा एखादी शिकार (मुख्यतः नत्रयुक्त पदार्थ). या सगळ्याच नैसर्गिक आणि काहीही प्रक्रिया न केलेल्या पदार्थांत चोथा, साली वगैरे ऊर्जा देण्याच्या दृष्टीने कमी दर्जाच्या पण खनिजे, क्षार,जीवनसत्वे वगैरे पोषक/पूरक द्रव्ये अशा गोष्टीही सामील असत की ज्यामुळे खाद्याचा एकूण आकार तसेच आहाराचे पोषणमूल्य वाढत असे.

अशा खाद्याचा तोंडात आणि पोटात प्रवेश झाल्याची जाणीव झाल्यावर मेंदूकडून आलेल्या आज्ञा पाळत वेगवेगळे पाचक स्राव (आणि इन्शुलिन) जरूरीप्रमाणे पाझरू लागतात. वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे "पचन" होतांना ऊर्जेची आवक (पिष्टमय पदार्थातील तसेच cane sugar /sucrose यातून मिळणारी) आणि ऊर्जेची जरूर यांचा "समतोल सांभाळणे" याची जबाबदारी इन्शुलिनची असते. मेंदूकडून "साखर आली, इन्शुलिन तयार व्हायला हवे" असा संदेश आल्यावर स्वादुपिंडांत तयार झालेल्या इन्शुलिनमुळे साखरेच्या (आणि पिष्टमय पदार्थातील इतर घटकांच्या) विघटनातून तयार झालेले glucose हे "ऊर्जा" म्हणून वापराकरता शरीरपेशींकडे किंवा साठवणाकरता म्हणून (glycogen च्या रूपांत) यकृताकडे पाठवल्याने हा समतोल सांभाळला जाऊन रक्तांतील glucoseचे प्रमाण नियंत्रित राहाते. इतर अन्नद्रव्यांचे "पचन" होण्याकरता जरूर असलेल्या पाचक रसांची निर्मिती आणि नियंत्रण देखील अशाच वेगवेगळ्या ग्रंथी करतात. "पोट भरले" हा संदेश आल्यावर पचनसंस्थेवरचा अन्नाचा मारा थांबला की लगेच हे सगळे नियंत्रक आपले काम हळूहळू थांबवत पण पुढच्या माऱ्याच्या अपेक्षेत आणि "in process" असलेल्या अन्नाचे पचन पूर्ण करत "सावधान" अवस्थेतून "हजर" पण "विश्राम" अवस्थेत जातात. या "विश्राम" अवस्थेत त्यांना जी उसंत मिळते त्यामुळे पुढच्या माऱ्याच्या वेळी ते पुन्हा पूर्ण उत्साहाने काम करू शकतात. या त्यांच्या कामांत संप्रेरकांचा (hormones) मोठा कार्यभाग असतो. अन्नघटकांखेरीजच्या चोथा इ.इ. च्या पचवण्यात या नियंत्रकांच्या खांद्यावर फारसे ओझे नसते.

glucose च्या तराजूचा समतोल सांभाळणे हे कांही अंशी एखाद्या अनेक नर्तकांच्या वेगवेगळ्या शैलीत, वेगवेगळ्या वाद्यांच्या आणि गायकांच्या संकेतांनुसार चाललेल्या गुंतागुंतीच्या दीर्घ नृत्यासारखे आहे. साखर तसेच इतर पिष्टमय पदार्थ आणि त्यांच्या विघटनाने तयार होणारी glucose सारखी द्रव्ये याच नर्तकांच्याबद्दल आपण बोलत असलो तरी त्यांचा पदन्यास इन्शुलिन सारख्या नियंत्रकांच्या हातात आहे आणि त्याचवेळी आपल्या पचनसंस्थेच्या रंगमंचावर प्रथिने, स्निग्ध पदार्थ असे इतर नर्तक आणि त्यांचे नियंत्रक तसेच संप्रेरक हे ही आहेत. "भूक लागली" ही घंटा झाल्यावर चौरस अन्न मिळाले तर हे सगळेच नर्तक आपापल्या लयीत, आपापल्या शैलीत, कोणी आधी कोणी नंतर पण एकमेकांच्या अधेमधे न येता सुसूत्र काम करत राहतील. "पोट भरले" ही घंटा झाल्यावर हा कार्यक्रम आवरता घेण्याची सुरवात होईल. अर्थातच हा सगळाच कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी "भूक लागली" किंवा "पोट भरले" ही घंटा वाजली पाहिजे आणि वाजल्यावर लक्षातही घेतली गेली पाहिजे नाही कां?

आता कल्पना करा कोणीतरी आंघोळीची तयारी करतो आहे, नळाच्या तोटीतून किंवा झारीतून (shower) येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची अपेक्षा करत, आरामांत गाणे गुणगुणत अंगावर पाणी घ्यायला सुरवात करतांना जर एकदम धबधब्यासारखे धो धो पाणी डोक्यावर पडू लागले तर कमरेचे सांभाळणेही कठीण होईल ना? पोटातले पाचक स्राव आणि इन्शुलिन नेहेमी अन्नघटकांबरोबरच चोथा आणि साली वगैरे "फक्त भरीच्या" आणि म्हणून खांद्यांवर ओझे न टाकणाऱ्या पदार्थांच्याही तयारीत असतात. जेव्हा त्यांच्यावर चोथा, साली वगैरे कुठल्याही खोगीरभरती शिवाय फक्त शीतपेयातली किंवा मिठाईबरोबरच्या साखरेच्या पाकातली साखर पचवण्याचे ओझे पडते तेव्हा काही काळ overdrive मध्ये काम करून ते वेळ निभावून नेऊ शकतील. सारखेच असेच होऊ लागले (किंवा त्यांच्या लयबद्ध नाचात असाच इतर कुठलाही समतोल बिघडवणारा व्यत्यय येत राहिला - जसे ऊर्जेच्या नंतर वापरण्याकरता म्हणून ठेवलेल्या साठ्याचा वापर न होता नुसतीच त्यात भर पडत राहणे, म्हणजे अपुरी शारीरिक हालचाल) तर त्यांची जी धडपड सुरू होईल त्यांत हळू हळू ते ऊर्जानियंत्रण करतांनाही गडबडू लागतील. असे गडबडून जाणे म्हणजेच रक्तांत अवाजवी glucose शिल्लक रहाणे किंवा इन्शुलिनचे उत्पादन कमी होणे किंवा इन्शुलिनचा प्रभाव कमी होणे अशा तक्रारीना निमंत्रणच. खाल्लेल्या अन्नात जर पाने, चोथा, साली वगैरेचे प्रमाण कमी असेल (soluble fibre) आणि म्हणून खाद्याचा एकूण आकार कमी असेल तर "पोट भरले" हा संदेश निर्माण होऊन सगळ्या नियंत्रकांना थांबण्याची आज्ञा मिळेपर्यंत जरा जास्तच अन्न खाल्ले जाईल आणि त्यातूनही साखरेचा overload होईल. "पोट भरले" हा संदेश निर्माण होऊनही खाणे चालूच राहिले तर आपल्या पचनाच्या कार्यक्रमातले नर्तक काहीकाळच लयबद्ध राहू शकतील आणि मग glucose च्या तराजूच्या पारड्यांचा समतोल बिघडेल. Triglycerides सारखे आपल्या शरीरातील आणखी कांही खलनायक (वाईट विचारांची पात्रे पण त्यांचे वाकडे पाऊल प्रत्येक वेळी लक्षांत येतेच असे नाही) या नर्तकांचा गोंधळ उडवू शकतात.

म्हणजेच या तऱ्हेच्या sucrose overload ची, कोणत्याही कारणाने, पुनरावृत्ती होत राहिल्यास हळू हळू एकूण प्रकरण हाताबाहेर जाते आणि लट्ठपणा, मधुमेह याकडे झुकू लागते. अर्थातच तिखट किंवा इतर चवीच्या पदार्थांतल्या तिखटपणा किंवा इतर चव देणाऱ्या द्रव्यांचा आणि गोडपणाच्या receptors चा "हात आणि हातमोजा" यांच्यासारखा संबंध नसल्याने, त्यांच्या पोटांत येण्याने साखरेच्या बाबतीत होणाऱ्या "आली आली हो" सारख्या संवेदना सुरू होत नाहीत, पण त्यांच्या अतिरेकी सेवनानेही इतर दुष्परिणाम होतातच.

तर अशा या "साखर" नामक भगवंताच्या चरणी लीन होऊ पहाणाऱ्या पण या भगवंताचा फार पगडा बसू देणे हे अपायकारकही असू शकेल याचे भान न रहाणाऱ्या भक्तांना स्वतःपासून कसे वाचवावे याकरता अनेक शास्त्रज्ञ काही काळापासून प्रयत्नशील आहेत.

या "नेहेमीच्या साखरेचे" ( cane sugar/sucrose) गुणवर्णन करतांना लक्षांत ठेवण्याच्या कांही गोष्टी - एका चहाच्या चमचाभर साखरेत सुमारे १५-२० उष्णांक (calories) ऊर्जा असते किंवा एका ३३० मि. लि. आकाराच्या शीतपेयाच्या डब्यात सुमारे १५० उष्णांक (calories) ऊर्जा असते. म्हणजे रोज दोन डबे शीतपेय पिणारी व्यक्ती रोज आपल्या जेवणावर जास्तीची एखादी चमचमीत भाजी खाल्याइतपत ऊर्जा मिळवते आणि तिचा पूर्ण विनियोग (पुरेसा व्यायाम) न केल्यास "इंच इंच लढऊ" मोहिमेत, नकळतच, इंचाइंचाने सामील होत असते.

गोडपणा मिळवण्याकरता "नेहमीची साखर" न वापरता इतर काय वापरता येईल आणि चव "गोड वाटण्या"ची प्रक्रिया तसेच त्या मागोमाग मेंदूकडे येणारे आणि मेंदूकडून जाणारे संदेश आणि त्यांची कार्यप्रणाली यांना ही "प्रति-साखर" एक "तोतया" असण्याचा अंदेशादेखील न येऊ देता "गोड"पणाचा पुरेपूर आनंद घेतानाच लठ्ठपणा आणि मधुमेह देखील कसा टाळता येईल? असा कुठला तोतया, जो खरा म्हणून खपू शकेल, (साखरेने सध्या ताब्यात घेतलेल्या) गादीवर बसू तर शकेल पण "साखरभक्तांच्या" मना/शरीरावर राज्य मात्र करणार नाहीं ? साखरेला असा कुठला पर्याय, जो गोडी देण्याबाबत साखरेसारखाच आहे पण त्याच्या विघटनांतून मात्र उपद्रवी पदार्थ/ऊर्जा तयार होत नाही (की जे साखरेच्या बाबतीत होते)? हे सोपे वाटणारे कोडे सोडवण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत आणि चालूच आहेत पण आपल्या "नेहमीच्या" साखरेला अजून तितकाच प्रभावी पण निरुपद्रवी (किंवा कमी उपद्रवी) पर्याय मिळालेला नाही आणि म्हणून तोतयांचा शोध चालूच आहे.

इथे थोडी पुनरावृत्ती करणे जरूर आहे - आपण पाहिलंच आहे की साखर ही साखरच असल्याची (आपल्या "माहितीची" गोडी तसेच ऊर्जा देणारी वस्तू) जाणीव आपल्या मेंदूला होण्याचे कारण म्हणजे या वस्तूचा जिभेवरच्या गोडपणा जाणवणाऱ्या मज्जातंतूच्या टोकांच्यात (receptors) चपखल बसणारा सूक्ष्मतम आकार! हा आकार जर पूर्णपणे चपखल बसणारा हवा असेल तर (म्हणजे गोडीच्या बाबतीत तडजोड करायला आपण तयार नसलो तर) ते फक्त उसापासून (किंवा sugar beet वापरून) बनणाऱ्या "नेहमीच्या" साखरेच्या (sucrose) वापरातूनच शक्य आहे आणि त्या मार्गाने जायचे म्हटले तर लठ्ठपणा,मधुमेह हे टाळण्याकरता आपले गोड खाणे अतिशय शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. "गोडी"मध्ये आपण काही खोट घ्यायला तयार असलो तर मात्र साखरेचा तोतया मिळवणे आणि लठ्ठपणा आणि मधुमेह टाळणे अंमळ सोपे होईल.

या सगळ्याच तऱ्हेच्या "पर्यायी" साखरेबद्दल एव्हढा उहापोह करण्याचे कारण म्हणजे सध्या पूर्ण जगात एकूण गोडी आणणाऱ्या पदार्थांचा वार्षिक वापर आहे १०,००० कोटी (अमेरिकन) डॉलर ( ६५०,००० कोटी भारतीय रुपये) आणि त्यातला ८३% - ८५% वाटा आहे "नेहमी"च्या साखरेचा (sucrose). जी कुठली "पर्यायी साखर" चव आणि उपयॊगातील वैविध्य या दोन्ही बाबतीत sucrose सारखीच असेल पण "माझ्या उपयोगाने लठ्ठपणा आणि मधुमेह होत नाही " आणि "माझ्या दीर्घ काळ वापरांतून आरोग्यास कांहीही धोका नाहीं" हे निःसंदिग्धपणे सिद्ध करून नेहमीच्या साखरेची (sucrose) जागा घेऊ शकेल तिला व्यापारी दृष्टीने प्रचंड यश मिळेल. मग का नाही सगळे जग साखरेचा तोतया शोधणार?

"नेहेमी"च्या साखरेच्या (sucrose) उत्पादनाचा आणखी एक पैलू : २०१६-१७ या वर्षांत जगभरांत झालेले उत्पादन (परिमाण: दशलक्ष टन) होते: ब्राझील ३९; भारत २२; युरोप १७; थायलंड १०; चीन १०; संयुक्त अमेरिका ८ इतर देश ६६ एकूण: १७२

High Fructose Corn Syrup (HFCS) हा "नेहेमी"च्या साखरेला (sucrose) एक मोठा पर्याय ठरतो आहे. सध्या पूर्ण जगात एकूण गोडी आणणाऱ्या पदार्थांच्या वापरांत HFCS चा हिस्सा ९%-१०% आहे. मक्यातील पिष्टमय पदार्थ - खळ (starch) - दळून वेगळे काढल्यावर त्यावर आम्ले आणि enzymes च्या प्रक्रियेने HFCS द्रव रूपात मिळते. वेगवेगळ्या उपयोगांकरता glucose आणि fructose चे वेगवेगळे प्रमाण असलेले (सगळ्यात जास्त वापर होत असलेले प्रमाण glucose ४५%; fructose - ५५%) आणखीन प्रक्रिया करून मिळवले जाते. संयुक्त अमेरिकन राज्यें, जपान आणि युरोप या तिन्ही मोठ्या बाजारपेठांत HFCS चा वापर हा साखरेवरील कर, मक्याच्या वापरात संयुक्त अमेरिकन राज्यांत मिळणारी सरकारी मदत (जिथे जरी HFCS चा वापर कमी होत असल्याची चिन्हे असली तरी वाढते उत्पादन निर्यात होते आहे) आणि मुख्यतः व्यापारी/औद्योगिक प्रमाणावर "साखर/गोडी देणारे" पदार्थ वापरणाऱ्या ग्राहकांच्या गरजा या सगळ्या बाबींवर अवलंबून आहे. उदा. शीतपेये बनवणारे, कर आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन काही देशांत गोडीकरता त्यांच्या उत्पादनांत १००% HFCS वापरतात तर कांही देशांत HFCS बरोबर इतर "गोडी देणारे पर्याय" देखील वापरतात. बहुशः HFCS द्रव रूपात बनत असल्याने त्याचा उपयोग मुख्यतः व्यापारी/औद्योगिक प्रमाणावर होतो. HFCS च्या वापराबद्दलही, जरी त्यावर अधिकृत किंवा कायद्याने कुठेच बंदी नसली तरी त्याचा वापर करणे आरोग्याला हानिकारक आहे किंवा नाहीं याबद्दल अनेक वैद्यकीय मते आहेत उदा. त्याच्या वापराने लठ्ठपणाची सुरवात होऊ शकते असा जोरदार मतप्रवाह आहे पण या सगळ्यांचाच थोडा अधिक विचार या लेखात पुढे पुन्हा करणार आहोत.

सॅकरिन (व्यावहारिक नांव Sodium saccharin रासायनिक नांव benzoic sulfimide) या काही काळ जोरात असलेल्या "तोतया"चा शोध थोडासा अपघातानेच लागला. दगडी कोळशातून निघणाऱ्या रसायनांवर प्रयोग करणाऱ्या फालबर्ग (Fahlberg) नामक एका शास्त्रज्ञाला इ.स. १८७९ साली आपल्या हाताला काहीतरी गोड चव देणारा पदार्थ लागल्यासारखे वाटले आणि त्याने त्या चवीचे मूळ benzoic sulfimide असल्याचे सिद्ध करून त्यावरचे सगळे कायदेशीर हक्क मिळवले. सॅकरिन (benzoic sulfimide) चा सूक्ष्मतम आकार साखरेच्या जवळपास असल्याने पदार्थांत गोडसरपणा आणण्याचा साखरेचा गुण देखील त्यांत असतो. सॅकरिनचा शोध जरी १९व्या शतकाच्या शेवटी लागला तरी त्याचा वापर "नेहेमीच्या" साखरेची टंचाई भासू लागल्याने पहिल्या महायुद्धाच्या काळांत वाढला. ठरावीक गोडीकरता लागणारे सॅकरिन आणि म्हणून त्यामधून मिळणारी ऊर्जा नगण्य असल्याने दुसऱ्या महायुद्धानंतर हा पदार्थ लठ्ठपणाविरुद्ध झगडणाऱ्या लोकांच्या "खास आवडीचा" बनला. प्रयोगशाळेतल्या चाचण्यांत सॅकरिनमुळे उंदरांना कर्करोग होण्याची शंका उद्भल्यानें सॅकरिनचा वापर मंदावला पण त्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली नव्हती. इ.स. २००० नंतर ही शंका अवाजवी असल्याचे सिद्ध झाल्याने सॅकरिनचा वापर करण्याबाबत कोणतीही कायद्याची आडकाठी उरली नाही. सॅकरिन वापरून केलेल्या गोड पदार्थाना एक प्रकारचा पुसटसा कडवटपणा तसेच काही वेगळीच "aftertaste" (चव, जी पदार्थ खाताना जरी लक्षांत आली नाही तरी खाल्यानंतर तोंडात घुटमळते) असल्याने सॅकरिन साखरेला प्रत्येक वेळी पर्याय ठरू शकत नाही. Sweet ‘N Low, Sweet Twin या व्यापारी नावांखाली सॅकरिन जगभर वापरले जाते. सॅकरिन उष्णतेने विघटित होत नसल्याने त्याचा बऱ्याच पदार्थाना गोडी आणण्यास उपयोग केला जातो.

सायक्लॅमेट (sodium or calcium salt of cyclamic acid - cyclohexanesulfamic acid) या आणखी एका पर्यायी पदार्थाचा (साखरेपेक्षा ३०-५० पट गोड) शोध जरी इ.स. १९३७ साली लागला तरी त्याचा मानवी आरोग्यावरचा दुष्परिणाम पूर्णपणे न समजल्याने त्याचा उपयोग सर्वत्र प्रचलित होण्यात आणखीनच अडथळे आले. ब्रिटनमध्ये त्यावर अनेक वर्षे घातलेली बंदी इ.स. १९९६ साली उठवण्यात आली. संयुक्त अमेरिकेत त्याच्यावर बंदी आहे. अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या कायदेशीर बंधनांमुळे सायक्लॅमेटचा वापरसुद्धा देशाप्रमाणे बदलतो उदा. कॅनडात मिळणाऱ्या Sweet'n Low तसेच Sugar Twin मध्ये, सॅकरिनच्या चवीत थोडा बदल होण्याकरता काही प्रमाणांत सायक्लॅमेट मिसळलेले असते पण संयुक्त अमेरिकेत विकण्याकरता बनवलेल्या त्याच नावाने विकल्या जाणाऱ्या पर्यायी साखरेत असे मिश्रण करता येत नाही. अशा "संशयित" यादीत असल्याने हा तोतया बाजारांत उजळ माथ्याने दिसत नाही!

अस्पार्टेम (रासायनिक नांव methyl ester of the dipeptide of the natural amino acids L-aspartic acid and L-phenylalanine) या आणखी एका पर्यायी पदार्थाचा इ.स. १९६५ साली शोध लावणारी कंपनी (G. D. Searle & Co.) अनेक देशांत अनेक कायद्यांखाली मलोत्सारक औषधांपासून गर्भनिरोधक गोळ्यांपर्यंत अनेक नावाजलेल्या औषधांचे संशोधन आणि त्यांचा व्यापार करत असल्यामुळे अस्पार्टेमचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम तपासणे आणि त्यांच्याबद्दलच्या कायदेकानूंचा पाठपुरावा करून त्याचा उपयोग सर्वत्र होण्याकरता/वाढवण्याकरता प्रचार करणे या सगळ्याच बाबतीत सुरवातीच्या चाचण्यांत भराभर यशस्वी होत गेली. हा साखरेचा तोतया आता "नेहमीच्या" साखरेला (sucrose ) बाजूला सारून राज्यावर येणार अशी चिन्हे सुमारे १५-२० वर्षे चाललेल्या या खटाटोपानंतर दिसू लागली. NutraSweet या व्यापारी नावाखाली इ.स. १९८१ ला संयुक्त अमेरिकेतल्या प्राथमिक परवानग्या मिळवून सगळ्याच शीतपेये बनवणाऱ्याना साखरेच्याऐवजी अस्पार्टेमचा वापर करायला या कंपनीने "पटवले" आणि इ.स. १९८३ साली अस्पार्टेमचा खप ३३.६ कोटी (अमेरिकन) डॉलर पर्यंत वाढवला. या जोरदार सुरवातीनंतर कंपनीच्या इतर औषधांच्या चाचण्यांत "काही गडबड असल्याचे वाटल्यावरून" तसेच इतर औषधे वापरणाऱ्यांच्या तक्रारीवरून कंपनीच्या पुढील अडचणींना सुरवात होऊन परिणामतः प्रथम धंदा (काही भाग विकून टाकला गेला) मग व्यवस्थापन आणि शेवटी मालकी या सगळ्यातच बदल होता होता इ.स. १९९२ साली patent हक्क संपल्याने NutraSweet चे अनेक प्रतिस्पर्धी देखील जगभरांत बाजारात आले (अजिनोमोटो, हॉलंड स्वीटनर इ. इ.). सध्या अनेक तऱ्हेच्या पदार्थांना गोडी आणण्याकरता अस्पार्टेम वापरले जाते आणि NutraSweet खेरीज Equal आणि Canderel या सारख्या व्यापारी नांवांनी जगभर विकले जाते. त्याचे उष्णतेने विघटन होत असल्याने जिथे उच्च तपमानात गोडपणा आणण्याची जरूर असते (जसे भट्टीत भाजलेले बिस्किटे, केक यासारखे गोड पदार्थ) तिथें अस्पार्टेम वापरले जात नाही. आनुवंशिक रोग असलेल्या रुग्णाना मेंदूच्या बाबतीत अस्पार्टेम पासून कांही जास्तीचा धोका आहे का हा प्रश्नदेखील अजून जास्त अभ्यासला जाणे जरूर आहे असे काही तज्ञाना वाटते पण "कांही जनुकीय आनुवंशिक रोग असल्यास सावध" असा इशारा अस्पार्टेमच्या वापराबद्दल देणे हे अव्यवहार्य आणि म्हणून कठीण आहे.

(या भागातील उर्वरित लिखाण लौकरच प्रकाशित होईल).

मांडणीविचार

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

2 Mar 2018 - 7:26 am | manguu@mail.com

छान

वाचतोय. छान लिहिलंय.

कुमार१'s picture

2 Mar 2018 - 12:28 pm | कुमार१

साखरेचे कृत्रिम पर्याय वाइट्ट ! त्यापेक्षा साखर परवडली.
एका वैद्यकीय नियतकालिकातील लेखाचे शीर्षक पाहा :
'Artificial sweetners : A Wolf in Sheep's clothing !

अभिजीत अवलिया's picture

2 Mar 2018 - 1:27 pm | अभिजीत अवलिया

उत्तम लेख.

चमचाभर साखरेत सुमारे १५-२० उष्णांक (calories) ऊर्जा असते

समजा मला रोज ३००० कॅलरी लागतात. जर मी केवळ साखर खाऊन त्या मिळवल्या तर मी जिवंत राहीन का?

शेखरमोघे's picture

2 Mar 2018 - 9:38 pm | शेखरमोघे

काही काळ नक्कीच रहाल. पण ऊर्जेखेरीज इतरही गरजा - जसे क्षार, जीवनसत्वे - न भागल्याने एक एक सन्स्था हळू हळू बिघडत जाईल. शिवाय साखरेचे दुष्परिणाम
व्हायला लागतील ते वेगळेच.