इंगळी

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
5 Nov 2017 - 11:11 pm

चुलीतलं लाकूड तापून लालबुंद झालं होतं. निखारा तप्त होता. आग भडकली होती. छकुलीनं साडी वर करून पिंडरीला उगाचच एक चटका दिला. "आईSss गं.."

"काय झालं वैनी.." मास्तरानं भुरका भरत विचारलं.
"काय नाय जी... इस्तू लागला जरा.." चुलकांडातली लाकडं तिनं बाहेर काढली. "हिकडंच येत जावा की जेवायला... त्या डब्यातलं कसं खाव रोज.."
"सवय झालीय आता... परगावातली नोकरी म्हटलं की अडचणी या आल्याच..." मास्तरनं भातात अजून थोडं वरण ओतलं. अन पुन्हा एक भुरका भरला.
"मग बायकुच करावी की एकांदी.." छकुलीनं परातीत पाणी ओतलं. कंदिलाच्या अंधुक प्रकाशात मास्तर तिला लाजून गेल्यासारखा भासला. "कुटं कुटं म्हून मन मारायचं.." पिंडरीवर तिनं एक ठिबका सोडला. अन तो भाग गोड गुदगुल्या करत गारठून गेला.

"संसार कुणाला चुकलाय वैनी. एक दिवस तो ही करावाच लागणार.." शेवटचा भुरका मारून मास्तर उठला. बाहेर ओट्यावर जाऊन त्याने हात धुतले. मग रूमालाने हात पुसून घटाघट पाणी प्याला.
"मग उद्याचं कसं करताव. डबाच दिव का येताव जेवाय?" छकुली कवाडामागून गोड हसली.

मास्तर खोलीवर आला. अन त्यानं अंथरून घातलं.
छकुलीनं भांडी घासली. अन तिनंही अंथरून घातलं.

चढाई करण्यास अजून अवधी आहे. मुघलांची पिळवणूक. खंडप्राय देश. नागरिकशास्त्र. पान.५४. फुलपाखरे आणि त्यांच्या जमाती. मास्तरने तंबाखू मळायला घेतली. बाजूलाच पडलेल्या मॅगझीनचा एक उत्तान फोटो त्याचे लक्ष वेधून घेत होता. मूठ दाबून धरून त्यानं विडा चिमटीत पकडला.

धग कायम होती. चूल अजून उबदार होती. भिताड दणकट होते. अंधार रांगडा पडलेला. कुस बदलून गोधडी मात्र विस्कटलेली. छकुलीने उठून पिंडरीला अजून चटका दिला. रात सळसळून गेली.

कुठून कुठून पाखरे येतात. आणि चोच मारून निघून जातात. चणे, फुटाणे, डाळ खाऊन आदिवासी मात्र जगत राहतात.

"भिवऱ्या, शेरडी कुटं दिसली कारं?" टेकाडावर बसलेल्या तरण्याबांड पोराला छकुलीनं विचारलं. उन मी म्हणत होतं. जांभळीच्या झाडाखालची झुडपे गर्द भासत होती. झुडपात सशे राहतात म्हणे. कधीमधी भुरटे चोरही त्यातंच मुक्काम ठोकतात.

"हिकडं कुटं आली शेळ्या राखायला? आन मी म्हंतो. गवातंच घीऊन जायचं की घरला." डोक्यामागून टावेल ताणत भिवऱ्या म्हणाला.
"गवातंच न्ह्याय आलती. म्हणलं तू दिसला इचरावं.." शिवाय त्या झुडपांमध्ये भरदुपारी गारगार झोप येते. काळ्या मातीत आंग टाकलं की एक रांगडेपणा मनात घुमतो.

"न्हाय दिसली बा.. खाल्ल्या घळीत शिरली आसली तर बग गड्या.." म्हशीच्या मागं काठी हाकारत भिवऱ्या पळत सुटला. "हाल्या हो..." चा आवाज आसमंतात घुमून राहिला.

बराच काळ थांबल्यावर छकुली वाट तुडवत चालत राहिली. कडुलिंबाच्या गार सावलीत जरा विसावली. लिंबाच्या बुळबुळीत लिंबुण्या तिनं उगाचच चिरडल्या.

भिवऱ्या जोंधळ्यात शिरला तेव्हा तिथं कुत्र्याचं हेंडगाळ लागलं होतं. म्हैस माजावर आली.

अलक निरंजन. कुण्या दूरदेशीचा एक साधू गळ्यात नवनाथांचा फोटू घालून फिरत होता. मजल दरमजल करत शेवटी तो पठारावर लागला. कडुलिंबाच्या झाडाखाली येऊन त्याने बूड टेकवले.

"बालिके, संसार म्हणलं की हे असं चालायचंच." घोटभर पाण्याच्या प्रतिक्षेत त्यानं रूद्राक्षाची माळ काढून ठेवली."कधीपासून बेपत्ता आहे तूझा नवरा..."
"आता सहा म्हैनं झालं महाराज. कुठबर आसं चालायचं..." बाजूच्या वाफ्यातलं गढूळ पाणी मडक्यात भरत छकुली बोलली.

"संयम हा एकच इलाज आहे बालिके. शिवाय अजून तू जवान आहे. तेव्हा संयम हा महत्त्वाचा.." साधूने गढूळ पाण्याची पिचकारी मारली.

"कायतरी पूजापाठ, मंत्रबिंत्र द्या महाराज.. आता किती सोसायचं..." छकुलीने साधूचे पाय धरले.
"तथास्तु..." पाठीवरून हात फिरवत साधूने आशिर्वाद दिला. "चल.. तुला पूजापाठ सांगतो.."
"कुटं ..?"
"कुटं जाऊया..?"
"तुमी म्हणाल तसं.."
"त्या जांभळीच्या झाडाखाली ...?"

म्हशीला रेडा लागला तसं भिवऱ्यानं पन्नास रुपायाची जुळणी केली. भिकू मांगांनं थाप टाकली तसा रेडा उतरला. उभ्या गावात असा रेडा नाही. म्हैस पार धपापून गेली होती.

बे एके बे. बे दुणे...
"चार..." पोरांनी गलका केला. बे त्रिक सहा. बे चोक..
"आठ.." नदी डोंगी परी..
मास्तराने फळ्यावर नदीचे वळदार चित्र काढले. अन उगाचच त्याला कालचे ते पुस्तक आठवले

भिवऱ्यानं कासरा ओढून म्हैस आवरली. पण हिसडा मारून ती पुन्हा उधळली.

पुन्हा एकदा चूल धडाडून पेटली. पुन्हा एकदा तापून लाकूड लालबुंद झालं. पुन्हा एकदा रात्र रांगडी पसरली. लाकूड बाहेर काढत छकुली म्हणाली "कशी झालीय भाजी?"
"अलक निरंजन.. झकास.." साधूमहाराजांनी भुरका भरला.

डबा खाऊन ऐसपैस झाल्यावर मास्तर खोलीतच लवंडला. गादीखाली दडवलेलं एक रंगीबेरंगी पुस्तक त्यानं बाहेर काढलं. पानेच्या पाने भारावून जाऊन तो बघतच राहिला. 'निरमा शुद्ध नमक.. दाणा दाणा एक समान' मध्येच आलेली ही जाहिरात मात्र त्याला आवडली नाही.

धग कायम होती. चूल उबदार होती. टेंभा पेटवला गेला. वारा लाजून चूर झाला. चमक दाखवून शेवटी लाकूड जेव्हा विझलं तेव्हा निखाऱ्याची पार भुकटी झाली होती.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Nov 2017 - 8:24 am | प्रचेतस

रुपकं जबरदस्त वापरलीयत.

प्राची अश्विनी's picture

6 Nov 2017 - 9:09 am | प्राची अश्विनी

जबरदस्त!

स्पा's picture

6 Nov 2017 - 9:47 am | स्पा

कमाल

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Nov 2017 - 10:44 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली... प्रचंड आवडली... असे काही लिहावे ते तुम्हीच....
पैजारबुवा,

सिरुसेरि's picture

6 Nov 2017 - 3:11 pm | सिरुसेरि

"पिंजरा"ची आठवण झाली .

वकील साहेब's picture

6 Nov 2017 - 3:24 pm | वकील साहेब

जबरदस्त लिखाण. दंडवत घ्या

दुर्गविहारी's picture

6 Nov 2017 - 5:42 pm | दुर्गविहारी

कहर लिहियात. अक्षरशः चित्रदर्शी !

Ranapratap's picture

6 Nov 2017 - 7:27 pm | Ranapratap

खास जव्हेरगंज टच

रेवती's picture

6 Nov 2017 - 7:55 pm | रेवती

जव्हेरजी स्पेशल कथा.

एमी's picture

7 Nov 2017 - 10:50 am | एमी

छान!

किसन शिंदे's picture

8 Nov 2017 - 2:07 pm | किसन शिंदे

एक नंबर लिखाण !!

शिव कन्या's picture

11 Nov 2017 - 2:12 pm | शिव कन्या

कमालीच्या ताकदीने लिहिलेय. मानवी मनाचा गडद सावल्यांचा खेळ सुरेख जमला आहे.

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 8:52 pm | रंगीला रतन

झक्कास.

जव्हेरगंज's picture

8 Dec 2017 - 9:36 am | जव्हेरगंज

धन्यवाद मंडळी!!

बाबा योगिराज's picture

10 Dec 2017 - 4:06 pm | बाबा योगिराज

जव्हेरभाऊ,
हि कथा सुद्धा आवडली. जबरदस्त लिहिता.

आपला पंखा
बाबा योगीराज.

कमाल आहे तुम्हाला हे सर्व सुचण्याची !