विडंबीत अंडे - भाग 1

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
2 Nov 2017 - 8:38 am

'विडंबीत अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्‍या समस्त गुरुजनांना म्हणजे मला स्वतःलाच कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले ख्याल आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

अंडे १ले - एक कॉल कट करा
फार दिवसांनी परवा अड्ड्यावर जायचा योग आला. सगळे उटाणटवळे भेटले. पण मध्यंतरीच्या काळात आमचे लग्न झाल्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात एक अदॄष्य अशी कम्युनिकेशन गॅप तयार झाली होती. नक्की काय बिनसलंय हे कळत नव्हतं. कालौघात काही गोष्टी बदलल्या होत्या... अण्णाचे चहाचे ग्लास अजून थोडे खरपूर्स आणि कळकट झाले होते, वडे तळायच्या तेलाने आता ग्रीसची तैलता धारण केली होती, पाखरांची एक अख्खीच्या अख्खी नवी बॅच भिरभिरत होती (बऱ्याच दिवसानी मान वर करून बघायला मिळालं.. ते असोच) ... पण बाकी सगळं तसंच होतं... अण्णासकट...

पण लवकरच कारण लक्षात आलं. इतर काही माणसांशी संपर्क वाढल्यामुळे आमचे विषय आणि त्यांचे विषय हे समान राहिले नव्हते. जे होते ते जुने झाले होते. त्यामुळे एकेकाळी ज्यांच्यासोबत आम्ही आयुष्यातले अमूल्य क्षण शून्यप्रकारे सार्थकी लावत होतो तेच मित्र आज अपरिचीत वाटत होते. बंड्याला पूर्वी टक्कल होतं की नव्हतं हे आठवेना (तेव्हा तो पण ब्याचलर होता म्हणा)... भैय्या आमचा ब्रँड विसरला (मला सुद्धा खरं तर आठवत नव्हता, पण त्याच्यावर घातलं झालं, मी स्वतःलाच विसरलोय तिथे इतरांची काय कथा म्हणा) होता...

निघताना सगळ्यांची गळाभेट घेतली आणि किमान आठवड्यातून एक तरी फोन करायचे वचन देऊन त्यांची रजा घेतली. कॉल करेन म्हटलं खरं पण बायकोने पकडलं तर काय असा प्रश्न मनात होताच. थोडं पुढे गेल्यावर मला जाणवलं... जाणवलं नव्हे... साक्षात्कार झाला... अरे हे असंच आपलं स्वतःच्या बाबतीतही घडतं... आणि आपलंच आयुष्य स्वतःलाच अपरिचीत वाटू लागतं.

आठवा बरं, तुम्ही खास स्वत:साठी असा वेळ शेवटचा कधी काढला होता? तुमच्या आवडी, छंद जपण्यासाठी कधी शेवटची सुट्टी घेतली होती? एकटेच... स्वतःसोबत शेवटचे कधी फिरायला गेलात? एखादा विकेंड धुणी-भांडी केर-वारे बाजूला ठेऊन फक्त स्वतःसाठी जगलात? नाही आठवत ना? खरी मेख इथेच आहे. बायकोसाठी जगताना आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. अंतर पडत जातं... हळू हळू वाढत जातं... आपल्या आयुष्याबद्दलच्या कल्पना परक्या वाटू लागतात आणि मग आपण दुसर्‍याच कुणाचं तरी आयुष्य जगतो आहोत ही भावना वारंवार सतावते.

तर मग ज्या प्रकारे बायको सारखी कॉल करून चौकशी करते, खबरबात ठेवते... त्याच प्रकारे तिचा एक कॉल आजच कट करा. मनाशी संवाद साधा. कुठे काय साचलंय ते बघा... मन मोकळे होऊ द्या... आकाश आपोआप निरभ्र होईल.

अर्धवट पिऊन ठेवलेला तो ग्लास अजूनही तुमची वाट बघत आहे. फक्त एक कॉल कट करायचा अवकाश आहे. करताय ना मग एक कॉल कट...?

आपला,
नाव नको सांगायला , ना जाणो बायकोने वाचलं तर?

--- प्रेरणा सांगायला हवी? स्वारी बरका आदीभाऊ

विडंबनप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Nov 2017 - 12:51 pm | कंजूस

अगदी कळकट्ट जमलय.