भाग मिल्खा भाग!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
7 Aug 2017 - 8:19 am

टेक-१,
वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग "द फ्लाईंग सिख" एखादया बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते.

"मिल्खा लॉस्ट" अशी "भाग मिल्खा भाग" चित्रपटाची रोमांचक सुरुवात सगळ्यांना आठवत असेल. आता त्याचा पुढचा भाग, "हिस्ट्री रिपिट्स इटसेल्फ" सारखी सिच्युएशन,

टेक-२
वर्ष २०१७, तारीख ९ जुलै. "द कोलंबिया ट्रेल मास्टर्स", आशिया खंडातील नामांकित चॅम्पियनशिप स्पर्था. थायलंडमधील AMA नामक स्पोर्ट्स इव्हेंट अरेंज करणाऱ्या अग्रगण्य कंपनीचा हा तेरावा एपिसोड. ऑलिम्पिकमधे झालेल्या बदनामीनंतर मनाने खचलेला मिल्खा देश सोडून थायलंड देशात सेटल्ड झाला होता. "बाजीप्रभू" असं महाराष्ट्रीयन नाव धारण करून गुप्तपणे रहाणारा मिल्खा सिंग या कोलंबिया ट्रेल मास्टर्स स्पर्धेत स्वतःच नशीब अजमावत होता आणि खोयी हुई इज्जत परत मिळवण्याच्या प्रयत्नात होता.

गेट सेट गो!! चा बिगुल वाजला आणि परत एकदा बाजी उर्फ मिल्खा एखाद्या बाणासारखा सुटला. त्याने जो स्पीड पडकला होता तो पहाता तो पहिला येणार हे शेम्बडं पोरही सांगू शकला असता. आता नवीन रेकॉर्ड कितीचा होणार हाच प्रश्न फक्त उरला होता. कमेंटेटरच्या चमूने त्याला आधीच विजयी घोषित करून टाकले होते. फित तोडून विजयी मुद्रेत प्रवेश करणाऱ्या बाजीप्रभुचे भाव टिपण्याकरिता कॅमेरे सरसावले होते मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच शिजत होते.

फिनिशिंग लाईन फक्त अडीच किलोमीटर उरली होती. मिल्खाच्या मागे दुरवरही कुणी दिसत नव्हते.. अगदी चालत गेला असता तरी जिंकला असता अशी एकूण भक्कम धावसंख्या. पण आधीचं सगळं अंतर वायू वेगात पार केल्याने नाही म्हटलं तरी बाजी उर्फ मिल्खाला धाप लागली होती, मात्र झिंग होती ती स्वत:शीच चाललेल्या स्वतःच्या झुंजीची. स्वतःच्याच शरीराला मिळालेल्या निसर्गदत्त देणगीतून स्वत:लाच अधिकाधिक पुश करण्याची. अश्या विचारांतूनच धावत असतांना इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

एका तान्ह्या बाळाच्या आर्त किंकाळीने मिल्खाचं काळीज भर स्पर्धेत पिळवटून निघालं. स्वतःवर प्रचंड विश्वास असणारा, दुर्दम्य आशावाद असलेला बाजी प्रत्यक्ष मनामधून मात्र फारच दुबळा होता. त्याचं शरीर जितकं कणखर(वाचा जड)
आहे तितकंच त्याचं मन नाजूक आहे त्यामुळे बाळाच्या आर्त किंकाळीने तो जागचा थिजला नसता तर नवलच, पण चित्त विचलित होत असतांनाहि त्याने धावणं चालूच ठेवलं.

परत एकदा आलेली बाळाची किंकाळी ऐकून मिल्खाने क्षणभर मागे वळून पाहिलं. दूरवर कुणीच दिसलं नाही. मात्र परत एक दोनदा अगदी कानाजवळून रडणं ऐकू आल्यावर मग मात्र मिल्खाच्या डोक्यात ट्यूब पेटली. आपल्याला नुकताच जवळचा चष्मा लागलेला आहे जो आता आपण घातलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला आजूबाजुचं काहीच दिसत नाहीये. मात्र थायलंडमधे राहून बऱ्याच युक्त्या शिकलेला बाजीप्रभू उर्फ मिल्खाने लगेचच एक शक्कल लढवली. विचार केला कि आपण चष्मा पेटीतून काढून, काचा पुसून, तो घालून कोण बोंबलतंय ते शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण अजून जोरात धावून पुढे जावूयात म्हणजे टाहो फोडणारी ती गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसेल.

गेट सेट गो!! चा बिगुल स्वतःच वाजवला आणि वॉर्नर ब्रदर्सच्या "रोड रनर" कार्टूनसारखा शून्य मिनिटांत लक्ष विचलित करणाऱ्या त्या गोष्टीपासून १०० मीटर अंतरावर पोहोचला. पहातो तर काय!!... एक थाई स्त्री एका सात महिन्याच्या बाळाला बाबागाडीत घालून रेसमधे धावत होती. महाराष्ट्रीयन नाव धारण केलेल्या मिल्खाने एव्हाना बरेच मराठी शब्द अवगत केले होते. नामांकित चॅम्पियनशिप स्पर्धेत बाबागाडी सकट धावणाऱ्या त्या स्त्रीला पाहून "आयच्या गावात!!" असं मिल्खाच्या तोंडून आपसूक निघालं. त्या निष्ठुर आईला नाही पण बाळाचं रडणं पाहून मिल्खाचा जीव कासावीस झाला. अव्वल धावपटू बाजी उर्फ मिल्खाला हरवण्यासाठी बेभान झालेली ती थाई स्त्री पाहून मिल्खाला आश्चर्य वाटलं. आपलं मुलं जिवाच्या आकांताने रडतंय याचीही तिला तमा नव्हती. नाजूक मनाच्या बाजीला ते पाहवलं नाही.

मिल्खाने त्या थाई स्त्रीला विनंती केली कि ती बाबागाडी मी चालवतो आणि तू तुझ्या पहिल्या नंबरची इच्छा पूर्ण कर. त्या स्त्रीनेही जास्त आढेवेढे न घेता ट्रॉली मिल्खाच्या हातात देऊन क्षणात दिसेनाशी झाली. बाजी मात्र आरामात त्या तान्ह्या बाळाशी गप्पा मारत स्पर्धा पूर्ण करतो. नंबर येतो "पहिला"... (शेवटून)... कारण तीन किलोमीटरच्या स्पर्धेत अडीच किलोमीटर बाकी असतांना सगळेच्या सगळे मिल्खाच्या पुढे गेलेले असतात. बाबागाडीमुळे मागे राहिलेली बाजीच्या ऑफिसमधील "मिस सिरिपॉन" मिल्खाला शेंडी लावून पुढे निघून गेली होती. बाबागाडीत सिरिपॉनचा पोट्ट्या सेकंडलास्ट आणि ती ढकलणारा मागे मिल्खा तांत्रिकदृष्ट्या शेवटचा फिनिशर ठरतो.

७ महिन्याच्या तान्ह्या बाळाने बाजी उर्फ मिल्खाला हरवलं याची ऑफिसमधे बरीच वंदता झाली. मिल्खा म्हातारा झालाय बहुतेक!!. मिल्खाला तो घाव जिव्हारी लागला होता म्हणून काही दिवसांपूर्वीच गुपचूप एका नवीन स्पर्धेत नाव नोंदवलं होतं. मागच्या स्पर्धेत त्या घटनेचा मिल्खाच्या मनावर काहीही कंट्रोल नव्हता, मात्र इथून पुढे तो कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. धावपटूची देहबोली, धावण्याआधी घेण्याचा पवित्रा आणि रेसस्ट्रॅकवर फिरवावी लागणारी नजर. धावतानाचे ब्रीदिंग टेक्निक, बाजीने काही दिवसांत सहजगत्या अवगत केलं.

टेक-३
वर्ष २०१७ तारीख ०६ ऑगस्ट. "क्विन सिरिकीत हॉस्पिटल मॅरेथॉन स्पर्धा". (उथापाव एरपोर्ट परिसर) लक्ष दहा किलोमीटर!!

कोणतीही बाबागाडी मागे किंवा पुढे असणार नाही याची काळजी घेत बाजी उर्फ मिल्खा परत एकदा बाणासारखा सुटला. त्याने जो स्पीड पडकला होता तो पहाता तो पहिला येणार हि काळ्या दगडावरची रेष कमेंटेटरच्या चमूने ओढायला घेतली असतांनाच नियतीने परत एकदा डाव टाकला. "हिस्ट्री रिपिट्स इटसेल्फ" चे फासे परत पडू लागले,

क्षितिज रेषेपेक्षाही स्पष्ट दिसणारी फिनिशिंग रेषा दिसत असतांना एक सुबक ठेंगणी मिल्खाच्या समांतर रेषेत धावत येऊन हास्य कमलं फुलवू लागली. प्रेमळ इशारे करू लागली. लाईनमधे येऊन लाईन मारण्याचा हा प्रकार मिल्खाला नवीन होता. तिच्या त्या कृतीचा अर्थ न समजून मेल्बोर्न ऑलिम्पिकमधे हरल्यावर जसं स्वतःच्याच फटाफट कानाखाली मरून घेतल्या होत्या तश्या थापडा मारून पाहिल्या. चष्मा या वेळेस न विसरता घातला होता त्यामुळे ती सुंदरी जे काही कटाक्ष करत होती ते स्पष्ट दिसत होते. वेग वाढवूनहि ती पिच्छा सोडत नव्हती. मात्र तिने लावलेल्या परफ्युमच्या सुगंधाने साधारण दहा फूट बाय दहा फूटचा चालताफिरता परिसर दरवळू लागला होता. लावलेल्या लाल चुटुक लिपस्टिकमुळे तिच्या सौंदर्यात भरपडत होती हे सत्य मिल्खा नाकारत नव्हता. मोहाचे क्षण जवळ येत होते, नाही म्हणायला एक दोन चोरटे कटाक्ष बाजी उर्फ मिल्खाहि टाकत होता. बाजी पलटणार इतक्यात त्याने स्वतःला सावरलं. आपण जर काही भानगड केली तरी तर आपले रस्ते लागणार तेही डांबरी, हे माहित असल्याने मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक न्यायाने मिल्खाने वेग कमी करत तिला म्हटलं, कि अहो बाई मी त्यातला नाहीये. चांगल्या घराण्यातला आहे. छान सुखी संसार आहे माझा. "अशीच आमुची माता असती सुंदर रुपवती । आम्हीही सुंदर झालो असतो" या परंपरेतून मी आलेलो आहे. नपेक्षा तू उद्या भेट.. रक्षा-बंधन देखील आहे. पण त्या आगाऊ बाईने मिल्खाचं बकोटच धरलं आणि म्हणाली तू या परंपरेतला नाहीयेस... मिस्टर यु इन रॉंग ट्रॅकरेस... थीस इज २३ किलो ट्रॅक.. टेक यु टर्न. गो दयाट वे. "आलाय मोठा बहीण बनवायला" असं चक्क मराठीत बोलल्याचं ऐकू आलं.

आयच्या गावात!! वदले मिल्खा सिंग बोधरुप शब्दांनी.

नियती विकट हास्य करत होती,
पहिल्या नंबरचं स्वप्न उराशी बाळगून स्पर्धेत उतरलेला आणि तसं पोटेन्शियल असलेला बाजी उर्फ मिल्खा, १० किलोमीटरच्या रेसमधे १२२७ व्या नंबरवर आला. नंबर मागल्या रेसपेक्षा बरा असला तरी आता परत नव्याने सुरवात, नवी उमेद, नवी मॅरेथॉन. तोपर्यंत या फोटोंवरच समाधान मानावं लागणार आणि इतिहासातल्या चुकांचे दुःख करत राहावं लागणार.

-

-

-

-

-

-

-

विडंबनविनोदप्रकटन

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

7 Aug 2017 - 8:31 am | योगी९००

फार छान...पण प्रत्येक रेस तुम्ही जिंकलातच...तान्ह्या बाळाची रेस तर सगळ्यात मस्त होती जी तुम्ही मोठ्या फरकाने जिंकलात...!!

येणारी पुढची रेस बाजी जिंकणारच...!! शुभेच्छा..!!

राघवेंद्र's picture

7 Aug 2017 - 8:48 am | राघवेंद्र

वा वा बाजीप्रभू !!! मस्त लढवत आहात खिंड !!!
आता डायरेक्ट मॅरेथॉन च !!!!
त्यासाठी शुभेच्छा !!!
लेख खुशखुशीत !!!!!

अर्रर्रर्र. फोटो दिसले नाहीत. नाहीतर मिल्खाप्रभूंच्या दुःखात आम्हीही पावणेतीन आसवे गाळून सहभागी झालो असतो. :-( बॅड लक.

जेम्स वांड's picture

7 Aug 2017 - 11:50 am | जेम्स वांड

.

खेडूत's picture

7 Aug 2017 - 11:58 am | खेडूत

छान अनुभव. लेख आवडला.
आता जोरदार तयारीस लागा - पुढचे विजेते मिल्खाभाय असणार यात शंकाच नाही!

वेल्लाभट's picture

7 Aug 2017 - 2:17 pm | वेल्लाभट

अप्रतिम ! धावत रहा, विजय तुमचाच आहे.

मराठी_माणूस's picture

7 Aug 2017 - 2:34 pm | मराठी_माणूस

हे काय आहे ?

संजय पाटिल's picture

7 Aug 2017 - 4:31 pm | संजय पाटिल

कंपनीत प्रमोशन साठी चालणारी रेस...

सिरुसेरि's picture

7 Aug 2017 - 6:52 pm | सिरुसेरि

मजेशीर लेखन आणी छान फोटो . पुढल्या AMA मॅरेथॉन रेस साठी शुभेच्छा . थाई स्पर्धकांना एकदा अबलख , भीमथडी / चिनाबच्या तट्टाचं पाणी दाखवुन द्या . हारके जीतनेवालेकोही बाजीगर कहते है . हारी बाजीको जीतना हमे आता है .
चिंग चाँग चुंग च्याव ( म्हणजे थाई भाषेत " जनाब ये आपके जिंदगीकी आखरी रेस हो सकती है .") .
मिंग माँग मुंग म्याव ( म्हणजे थाई भाषेत "हां जनाब . आज दौडुंगाभी वैसेही . ") .
असा एक अंदाज .