लहानपण देगा देवा!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
24 Jul 2017 - 12:54 pm

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।।

तुकाराम महाराजांच्या या अभांगाच्या पहिल्या दोन ओळी अनेक मोठी माणसे म्हणताना आपण बघतो. विशेषतः जेव्हा जुने मित्र-मैत्रिणी भेटतात त्यावेळी जुने दिवस; लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात; तेव्हा हमखास परत एकदा लहान व्हावं असं आपल्याला वाटतं. किंवा मग कामाचा, भावनांचा खूप भार होतो तेव्हा या जवाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन परत एकदा लहानपणच निरागस आणि जवाबदारी नसणार आयुष्य जगावं असं वाटतं.

पण आपल्याला खरंच आपलं लहानपण हव असत का? की फक्त त्यावेळचा निरागसपणा आणि जवाबदारी नसणं जास्त भावत? आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या निर्णयासाठी कोणावरही अवलंबून नाही आहोत. नकळत आपल्याला या स्वातंत्र्याची सवय झालेली असते. लहानपण म्हंटल की प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर अवलंबून राहाण आल. शाळा आली; अभ्यास आला... नावडते विषय परत एकदा आलेच. गृहपाठ करणं.... निबंध वेळेत लिहून देणं..... शास्त्र विषयाचे व्यवसाय पूर्ण करण आलं. संध्याकाळचा सवंगाड्यांबरोबरचा खेळ रंगात आलेला असताना आईने लवकर बोलावलं म्हणून काही एक न बोलता घरात येऊन अभ्यासाला बसण देखील आलच. कारण नावडती परीक्षा जवळ आलेली असते ना. त्यावेळच खेळता न आल्याचं दुःख हे त्या वयातल असतं.... जसं या वयातल्या जवाबदाऱ्याच्या त्रासाच दुःख होत असत.

त्यामुळे लहानपण मागताना आपण हा विचार नक्की करायला हवा की आपल्याला लहानपण हव आहे की या वयाची जवाबदारी नको आहे. खर तर तुकाराम महाराजांनी एक वेगळाच विचार त्यांच्या अभंगातून मांडला आहे.

लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा!!
ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार!!
जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!
तुका म्हणे बरवे जाण! व्हावे लहानाहून लहान!!
महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!

यात तुकाराम महाराजांनी अस कुठेही म्हंटलेल नाही की आपण परत लहान व्हावं. या अभंगातून त्यांनी लहान मुलांच्या मनाचा लवचिकपणा आपण कायम अंगी बाणवावा अस सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जसजसे मोठे होत जाता तसतशा जवाबदाऱ्या वाढणारच आहेत आणि त्यातून जे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्या चांगल्या/वाईट परिणामांची जवाबदारी देखील तुमचीच असणार आहे.(उदा. जया अंगी मोठेपण! तया यातना कठीण!!) त्यामुळे आपण आपल लहान मुलांप्रमाणे प्रत्येक घटना मोकळेपणी स्वीकारावी असा देखील या अभंगाचा अर्थ होतो. (उदा. महापुरे झाडे जाती! तेथे लव्हाळे वाचती!!)

म्हणूनच परत एकदा लहान व्हावे असं म्हणण्यापेक्षा आपण असे म्हणू की आपल्या मनात एक कोवळ, लवचिक आणि लहानपणाच्या प्रामाणिक मनासारखं मन आपण जपू. वय आणि जावाबदाऱ्या कितीही वाढल्या तरी हेच निरागस मन आपल्याला निभावून जाण्याची शक्ति देईल.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

अमरप्रेम's picture

24 Jul 2017 - 1:49 pm | अमरप्रेम

सहमत
+१