तू तेंव्हा तशी...!

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
21 Jul 2017 - 12:13 am

http://misalpav.com/node/40301 या इथून प्रेरणा घेऊन

तुला मी फार मिस्स करतो ..
खरे तर हे तुला मुद्दाम सांगायचे नाही हे मी ठरवलंय . तुलाच काय पण मला स्वतःलाही हे सांगायचं नाहिय्ये. एका वळणावर येवून आपण त्या नंतर कसे हरवलो हे मला कळालेच नाही. मुद्दाम नाही. पण.... ते झाले हे खरे. मी अ‍ॅक्सेप्ट करतो. चार वर्षे झाली. हे वाक्य मी रोज म्हणतो. रोज सकाळी उठवल्यावर "आज तुझी आठवण अज्जीबात काढायची नाही" हे पण ठरवतो. पण.... तुझ्याशिवाय जगायची सवय झाली आहे पण तुझा विचारांशिवाय जगायची सवय अजून लागली नाही.
पण आपण ठरवतो की एखाद्या गोष्टीचा विचारही मनात आणायचा नाही आणि तीच गोष्ट पाऊस न कोसळता नुसतंच आभाळ भरून रहावं तशी मन भरून रहाते तसे काहीसं झालंय. प्रत्येक गोष्टीत तू आठवतेस.
तु तिकडे मी इकडे दूरदेशात. कोणी दिसले की मी त्यात तुझी रुपे शोधत रहातो. परवा रस्त्यातुन जाताना ती शाळेतली लाहान मुले पाहिली . एकदम निरागस. आणि चौकस. गप्पीष्ठ. तुला खूप आवडली असती. एखादे वेळेस त्यातल्या एखाद्या पोरीला थाम्बवून तू तीला शाळेतल्या गम्मती विचारल्या असत्यास.
आठवतय लोणावळ्याच्या ट्रीपला गेलो होतो तेंव्हा तू एकदा अशाच एका चिट्ट्यापिट्ट्यांच्या घोळक्यात हरवून त्यांच्यासोबत चिप्पर फेकत अक्कटदुक्कट खेळत बसली होती. मी रस्त्याच्या कडेला उभा राहून तुझे ते खेळणं एन्जॉय करत होतो. त्या चिमुरड्या पोरींमधे तु देखील त्याम्च्याएवढीच रंगली होती. अगदी त्यांच्यातलीच वाटत होतीस.
तू त्यावेळेस मला बालकवींची फुलराणी वाटली होतीस. मी तुला तसे सांगितले नाही तु हसली असतीस मला तू. मला एखादी टप्पल मरत यडबंबू म्हणाली असतीस.
मी बराच वेळ त्या शाळकरी मुलांकडे पहात बसलो. घड्याळाचे काटे एकाच जागी अडकावे आणि काळ स्तब्ध व्हावा तसे मन जणू अडकून बसले होते.
मग पूर्ण दिवस मला आपण सोबत घालवलेले सगळे क्षण परत परत समोर येत राहिले. एखाद्या शोभादर्शीतल्या काचेच्या तुकड्यांसारखी आठवणींचे पॅटर्न बनवत नक्षीकाम करत राहीले. जरा वर्तमानाचा धक्का पुरेसा व्हायचा तो पॅटर्न मोडून नवा जुळायला. त्या पॅटर्न सारखाच एकदा बनलेली डिझाईन पुन्हा कधीच साधता न येणारा. संध्याकाळ कधी झाली तेही समजली नाही.
आठवणीनी मनात एक कोलाज साकारले. एकातून तू दुसरी दुसरीतून तिसरी ..... आठवणी निघतच गेल्या. इझलवर कागद लावलेलाच होता, रंग पॅनेलवर घेतले. ब्रशने कागदावर काहिबाही रेखाटायला लागलो. रंग इकडून तिकडे पसरायला लागले. तुला आवडणारा मॅजेन्टा, , क्रीमसन, टरकॉईज ब्लू , पोस्ट बॉक्स रेड, यलो ऑकर, लेमन यलो, सी ग्रीन , ऑलीव्ह ग्रीन , अक्वा ब्ल्यू.... आकार बदलत होते. सगळा कागद रंगमय झाला. पावसाळ्यात कुठे ढग कुठे निरभ्र आकाश, कुठे सूर्याचा झळझळीत काळ्या पाम्ढर्‍या धुरकट ढगाना कडेला असणार्‍या झळाळी मुळे ते आरस्पानी हिर्‍याचे तेजस्वी रंग.... कागदावर उतरले होते. हे माझ्या मनाचे प्रतिबींब होते.
प्रतीमांची सरमिसळ होऊन तेथे निव्वळ रम्ग उरले होते.
एक क्षण वाटले की तू हवी होतीस ते पहायला. माझ्या मनातले एक एक आठवणींचे रंग तू ओळखले असतेस.
मी बोलत असताना तु मला पहात रहायचीस आणि मी थांबलो की म्हणायची " बोल ना... तु बोलताना कित्ती छान पद्धतीने विचार मांडतो. तुझे विचार तू साम्गण्या अगोदर तुझ्या चेहेर्‍यावर दिसतात." मी एकदा हे कसे होते हे पहाण्यासाठी मुद्दाम आरशा समोर उभा राहून बोललो. तू माझी ही धडपड पहात असावीस. अचानक कुठुनशी आलीस आणि जोरजोरात हसत राहीलीस. तुझ्या त्या हसण्याच्या नादात मी काय बोलत होतो तेच विसरलो.
तुझे असणे माझ्यासाठी एक उत्साहाचे झुळूक घेवून यायचे. नक्की सांगता येणार नाही पण जगाच्या अंतापर्यन्त पळत सुटावे असे वाटायचे.
चहा पिताना तुला फुर्र आवाज करून चहा प्यायची सवय होती. मला आवडायचे नाही तेही तुला माहीत होते. तु फुर्र आवाज करत माझ्या कडे डोळ्यांच्या कोपर्‍यातून पहात चहा प्यायचीस . आणि हसायचीस.
तुला गुडबाय का म्हणालो... याची हजार वेळा मनात पारायणं झाली असतील. प्रत्येक क्षण तसाच स्तब्ध होऊन रुतून राहीलाय माझ्या मनात. एखादा शब्द आपण बोलून जातो. एखाद्या उद्वीग्न क्षणी आपला ताबा सुटलेला असतो. स्वतःवरचाच राग इतर कशावरतरी काढत असतो. रंग चुकला, ब्रशाचा चुकीचा फरकाटा मारला गेला तर व्हाईट वॉश देऊन सावरुन घेता येतं हे माहीत होते. पण मनावर पडलेला ओरखडा कोणत्या व्हाईटवॉशने सावरता येतो हे माहीत नव्हते. तु मला समजून घ्यायचीस. मला कदाचित त्याचीच सवय झाली होती. जरा जास्तच. प्रेम ही मालकीची वस्तु नसते, मी मात्र तसे समजत होतो बहुतेक.
माझ्या वागण्याला मी कितीही कारणांच्या पुस्त्या जोडल्या तरीही मी तसा वागलो हे लपत नाही.
तुला कोणत्या क्षणी गुडबाय म्हणालो.... तुझा चेहेरा , ती भेदरलेली नजर , मला अजून आठवते. खरेतर त्या क्षणी तु माझ्या पाठीवरून हात फिरवावास असे वाटत होते. कुठेतरी दुखावलेला मी , हरलेला मी आधार शोधत होतो. तू माझा हात घट्ट पकडलेला होता. आणि तो झिडकारत मी म्हणालो " तुझा माझा काही एक संबंध नाहिय्ये" त्या वेळेस तुझ्या डोळ्यातली ती हरलेल्याची भावना पाहिली. एक क्षण कुठेतरी आत थोडे विजयाचे समधान वाटले.
तू जाते म्हणालीस. पण तुझ्या ऐवजी मीच तेथून नुघून गेलो. मागे वळूनही पाहिले नाही. तुझ्या नजरेला नजर देण्याचे धाडस नव्हते माझ्यात.
तुला स्वतःहोऊन फोन करण्या ऐवजी पुढचे तीन चार दिवस मी तुझ्या फोनची वाट पाहिली. कदाचित माझा पुरुषी अहंकार मला तसे करायला लावत होता.
तुझा फोन आला नाही. " चुकलो" म्हणायचे तर कोणत्या तोंडाने म्हणु असे वाटत होते. तू मला माफ केले असतेस याची भीति वाटत होती.
तूच येशील असे मनाल समजावत मी वाट पहात राहीलो. तू आली नाहीस मी मात्र एका अपराधाची निमूट शिक्षा भोगत राहीलो.

काल रेडीओवर गाणे लागले होते.

जगने छीना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा...
सब जीत गये मुझसे , मै हर दम ही हारा.
तुम हार के दील अपना मेरी जीत अमर करदो....

एकदा या गाण्याचा तू मला अर्थ विचारला होतास. तो अर्थ मी आयुष्य म्हणून भोगतोय. एकटाच.... स्वतःच्या चुकांच्या आठवणीत जगत.
आजही तू अचानक समोर येवून उभी रहाशील असे वाटते. तेंंव्हा विचारले होतेस तसेच माझ्या खांद्यावर डोके ठेवत गाण्याचा अर्थ विचारशील आणि मी तो सांगत असताना ओठांचा चंबू करुन ऐकत रहाशील असे वाटतंय. तु तेंंव्हा तशी होतीस तशीच आजही माझ्या मनात आभाळ भरुन रहावं तशी भरुन आहेस.
मी तुला फार मिस्स करतोय....

भाषालेख

प्रतिक्रिया

रुपी's picture

21 Jul 2017 - 12:17 am | रुपी

छान लिहिलंय.. आवडलं.

पैसा's picture

21 Jul 2017 - 3:42 pm | पैसा

छान लिहिलय!

जेनी...'s picture

21 Jul 2017 - 5:56 pm | जेनी...

क्या बात है ! ..... दुसरी बाजु छान मांडलीत ...

तुला कोणत्या क्षणी गुडबाय म्हणालो.... तुझा चेहेरा , ती भेदरलेली नजर , मला अजून आठवते. खरेतर त्या क्षणी तु माझ्या पाठीवरून हात फिरवावास असे वाटत होते. कुठेतरी दुखावलेला मी , हरलेला मी आधार शोधत होतो. तू माझा हात घट्ट पकडलेला होता. आणि तो झिडकारत मी म्हणालो " तुझा माझा काही एक संबंध नाहिय्ये" त्या वेळेस तुझ्या डोळ्यातली ती हरलेल्याची भावना पाहिली. एक क्षण कुठेतरी आत थोडे विजयाचे समधान वाटले.

हे सगळ्यात खास ...

बस अब कोइ इसपे मुझे पर्फेक्ट स्केच बनाके दे ! ;)

नीलमोहर's picture

21 Jul 2017 - 8:43 pm | नीलमोहर

तरल, सुंदर लेखन,
आवडलंच.

ज्योति अळवणी's picture

22 Jul 2017 - 1:32 am | ज्योति अळवणी

अप्रतिम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2017 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है, विजू भौ. लंबर एक हं. सालं तुम्ही एवढ्याच साठी लिहित जा.

तु तेंंव्हा तशी होतीस तशीच आजही माझ्या मनात आभाळ भरुन रहावं तशी भरुन आहेस.
सही रे सही...

-दिलीप बिरुटे

या वेळेस नॉस्टाल्जीक नाही ना केलं?

पद्मावति's picture

22 Jul 2017 - 7:07 pm | पद्मावति

हे पण खुप आवडलं.

प्रीत-मोहर's picture

24 Jul 2017 - 11:50 am | प्रीत-मोहर

मस्त इजाभाउ!!

मुक्त विहारि's picture

22 Sep 2017 - 2:02 am | मुक्त विहारि

छान लिहिलंय.

पिवळा डांबिस's picture

22 Sep 2017 - 11:22 pm | पिवळा डांबिस

छान उतरलंय लिखाण, विजुभाऊ! मुद्दाम लॉग-इन होऊन प्रतिसाद द्यावा असं वाटणारं!
जियो!!

विजुभाऊ's picture

3 Oct 2017 - 10:51 am | विजुभाऊ

_/\_

एकातून तू दुसरी दुसरीतून तिसरी ..... आठवणी निघतच गेल्या. इझलवर कागद लावलेलाच होता, रंग पॅनेलवर घेतले. ब्रशने कागदावर काहिबाही रेखाटायला लागलो. रंग इकडून तिकडे पसरायला लागले. तुला आवडणारा मॅजेन्टा, , क्रीमसन, टरकॉईज ब्लू , पोस्ट बॉक्स रेड, यलो ऑकर, लेमन यलो, सी ग्रीन , ऑलीव्ह ग्रीन , अक्वा ब्ल्यू.... आकार बदलत होते. सगळा कागद रंगमय झाला. पावसाळ्यात कुठे ढग कुठे निरभ्र आकाश, कुठे सूर्याचा झळझळीत काळ्या पाम्ढर्‍या धुरकट ढगाना कडेला असणार्‍या झळाळी मुळे ते आरस्पानी हिर्‍याचे तेजस्वी रंग.... कागदावर उतरले होते. हे माझ्या मनाचे प्रतिबींब होते.
प्रतीमांची सरमिसळ होऊन तेथे निव्वळ रम्ग उरले होते.

व्वा किती सुंदर !