तो (भाग 3) (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
19 Jul 2017 - 12:33 pm

भाग १: http://www.misalpav.com/node/40321
भाग २: http://www.misalpav.com/node/40328

तो (भाग ३)

काकुंच बोलण ऐकून काका काकूंच्या जवळ आले आणि म्हणाले,"मी त्या अशोककडे जात नाही किंवा अजून कोणाकडे मदतीसाठी जात नाही. मला काहीतरी दुसरं सुचलं आहे. जमल तर ते काम करून येतो. हा गेलो आणि हा आलो. तू माझी काळजी करू नकोस. आणि काहीही झालं तरी त्या घराकडे फिरकू नकोस. अशोक किंवा त्याची बायको कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. मी इथेच झोपाळ्यावर बसलो आहे. त्यामुळे मला त्यांची नजर जाणवते आहे." अस म्हणून काका घरात जायला वळले. त्यांना घरात जाताना बघून मात्र काकू पुरत्या गोंधळून गेल्या. त्यांच्या नकळत त्यांची नजर एकवार अशोकच्या घराकडे गेलीच. त्यांना देखील जाणवलं की खिडकीच्या पडद्याआडून कोणीतरी त्यांच्याकडेच बघत होत. काकू काहीश्या अस्वस्थ झाल्या आणि काकांच्या मागून घरात जात त्यांनी दार लावून घेतल.

घरात येताच मात्र त्यांनी काकांना विचारलं,"अहो, तुम्ही तर म्हणालात की बाहेर जाऊन येता आहात. मग घरात का आलात? विचार बदललात की काय ते लोकं आपल्यावर नजर ठेवून आहे हे बघून?" काकू आता थोड्या घाबरल्या होत्या. काकांनी बाहेर घालायच्या सपाता हातात घेतल्या आणि ते परस दाराकडे निघाले. काकू काही न कळून त्यांच्या मागे जायला लागल्या. काका मागे वळून म्हणाले,"हे बघ. मी मागच्या दारातून बाहेर पडतो आहे. त्या अशोकला कळायला नको म्हणून. तू माझी काळजी अजिबात करू नकोस. येताना कोणालातरी सोबत आणेन मी. एकटा येणार नाही. तू मात्र दार लावून घे आतून. अजून एक काम कर. थोड्या वेळाने स्वयंपाकघर सोडून बाकी सगळीकडचे दिवे मालवून टाक. आपण रोज झोपायला जाताना जसे मालावतो तसे. मघा जे झाल त्यामुळे आपण अस्वस्थ आहोत किंवा काहीतरी करणार आहोत याची त्यांना शंका देखील आली नाही पाहिजे. बर येऊ?" काका हे अस सगळ गूढ का बोलत होते ते काकूंना कळेनास झाल होत. पण त्यांचा काकांवर विश्वास होता. त्यामुळे त्यांनी 'हो' म्हणून मान हलवली आणि काका मागच्या दाराने बाहेर पडताच त्यांनी दार घट्ट लावून घेतले.

जेमतेम पाच मिनिटं झाली नसतील पण काकूंना आता खूपच अस्वस्थ वाटायला लागले होते. त्यांनी देवासमोर उदबत्ती लावली आणि मोठ्याने रामरक्षा म्हणायला सुरवात केली. आपलाच आवाज एकून त्यांना थोडा धीर आला. अजून थोडा वेळ गेला आणि त्यांना आठवले की काकांनी सांगितले होते की घरातले सगळे दिवे मालवून टाक. म्हणून मग त्या उठल्या आणि बाहेरच्या खोलीकडे आल्या. दिवा मालवायच्या अगोदर नकळत त्या दरवाज्याच्या शेजारच्या खिडकीकडे आल्या आणि त्यांनी अशोकच्या घराकडे नजर टाकली. त्यांना वावग अस काही वाटलं नाही. घरात दिवे चालू होते. बाहेरच्या खोलीतला पंखा देखील चालू असलेला त्यांना दिसला. एक सुस्कारा सोडून त्या आत वळणार तेवढ्यात त्यांची नजर त्यांच्या घराच्या फाटकाकडे घेली आणि काकू कमालीच्या दचकल्या. फाटकाला धरून अशोक उभा होता. तो टक लावून काकूंकडेच बघत होता. काकूंची आणि अशोकची नजरा-नजर झाली मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा अशोक दचकला. त्याची नजर क्षणभरासाठी काकूंवरुन ढळली. त्याबरोबर स्वतःला सावरत काकूंनी खिडकी लावून घेतली आणि रामरक्षा मोठ्याने म्हणत दिवा मालवून त्या देवासमोर जाऊन बसल्या. देवासमोर बसून देखील त्या सारख्या बाहेरच्या दाराचा कानोसा घेत होत्या. अशोक येऊन दार वाजवेल की काय ही भिती त्यांच्या मनात सारखी डोकावत होती. बराच वेळ झाला. पण अशोकने दार वाजवले नाही. हळूहळू काकू देखील शांत झाल्या. आता त्या चातकासारखी काकांची वाट बघत होत्या. त्यांना काकांची काळजी वाटत होती.

असाच काही वेळ गेला आणि मागच्या दाराकडे कोणाचीतरी पावलं वाजल्याच काकूंच्या लक्षात आल. पण देवासामोरून उठून मागच्या दाराकडे जाण्याच धैर्य त्यांना होत नव्हत. पण काही क्षणातच त्याना काकांनी हलक्या आवाजात मारलेली हाक एकू आली. "होय ग! झोपलीस का? मी आलोय. दार उघड बघू मागच." काकांचा आवाज एकताच काकूंच्या अंगात शंभर हत्तींच बळ आल. त्या त्यांच्या वयाला शोबणार नाही अशा चपळतेने उठल्या आणि त्यांनी मागचं दार उघडल. दारात काका आणि भानू शेट उभे होते. काकूंनी दार उघडताच काका भानू शेटना म्हणाले,"या शेटजी. जेवूनच जा आता. आम्ही जेवायला बसणार आहोत." काकांचा आवाज अगदीच सौम्य आणि साधा होता. त्यात अजिबात ताण नव्हता. मात्र ते फारच हळू बोलत होते. काकांचा मोकळा आवाज एकून काकूंना एकदम मोकळ मोकळं वाटलं. काकूंनी शेटजींकडे हसून बघितलं आणि आत येण्याची खूण केली. त्यावर हसत हसत शेटजी तशाच हळू आवाजात म्हणाले,"काका, उद्या येतोच आहे मी. तुम्ही जेवून आराम करा आता. काकू येतो मी. काळजी करू नका. सगळ ठीक होईल." अस म्हणून शेटजी आले तसेच मागच्या दारातूनच निघून गेले.

काका घरात आले आणि हात पाय धुवून जेवायला बसले. काकूंनी त्याचं पान वाढल. मात्र त्यांनी स्वतःच पान घेतलं नव्हत. ते पाहून काकांनी विचरल,"का ग? तुझ पान घे की वाढून." काकू म्हणल्या,"नको. इच्छा नाही मला." त्यावर काकांनी हलकेच त्यांच्या खांद्यावर थोपटलं. त्याबरोबर काकूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काकांनी त्यांना थोडावेळ रडू दिल. भर ओसरल्यावर काकूंनी आपणहून अशोकला फाटकाजवळ बघितलेलं काकांना सांगितल. त्यावर गंभीर होत काका म्हणाले,"बर. मला वाटलच होत तो आपला अंदाज घ्यायला येईल. तू त्याला काही बोलली नाहीस ना?" काकूंनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणल्या,"त्याची नजर ढळताच मला कुठून तरी बळ आल आणि मी मागे फिरले आणि खोलीचा दिवा मालवून देवासमोर येऊन बसले. काकांनी समाधानाने मान हलवली. मग त्यांनी आग्रहपूर्वक काकूंना देखील जेवायला लावले. काका कुठे गेले होते ते काकूंना समजून घ्यायचे होते. पण आता त्यांच्या मनाला अजून ताण सहन झाला नसता; याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे उद्या सकाळी काय ते विचारू असा विचार करून काकूंनी स्वयंपाकघरातली आवरा-आवर केली आणि त्या आडव्या झाल्या.

काकूंना पाहटेच नेहेमीप्रमाणे जाग आली. सवयीने त्या बाहेरच्या खोलीत आल्या आणि मुख्य दरवाजा उघडायला गेल्या. पण बंद असलेली खिडकी बघून त्यांना आदल्या रात्रीच्या सगळ्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि दार न उघडताच त्या तशाच उभ्या राहिल्या. काका देखील उठून काकूंच्या मागोमाग बाहेरच्या खोलीत आले होते. त्यांनी काकूंना दाराजवळच उभं राहिलेलं बघितलं आणि त्यांच्या जवळ जात त्यांनी दार उघडलं. काकूंना कळेना की कालच्या त्या प्रकारानंतर काका इतके निवांत कसे राहू शकतात? काका बाहेर जाऊन झोपाळ्यावर बसले होते. काकू देखील त्यांच्या मागोमाग बाहेर आल्या. आता मात्र इच्छा असूनही त्यांनी अशोकच्या घराकडे बघायचे टाळले. मात्र काकांच्या डोळ्यात थेट बघत त्यांनी काकांना विचारले,"का हो? काल जे काही झालं त्यानंतर देखील तुम्ही इतके निवांत कसे? तुम्हाला वाटत नाही का आपण पोलिसांकडे गेल पाहिजे?" त्यावर काकांनी शांत नजरेने काकूंकडे बघितले आणि ते म्हणाले,"धीर धर. सगळ नित होईल. मात्र आता तू इथे उभं राहू नकोस. नेहेमीप्रमाणे कामाला लाग बघू." काकूंना काही केल्या काकांचे वागणे कळत नव्हते. मात्र त्यांचा त्यांच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे अजून काही न बोलता त्या त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या.

साधारण नऊ-साडे नऊचा सुमार असेल; काका अंघोळ उरकून नेहेमीप्रमाणे देवासमोर बसून पूजा करत होते. काकू त्यांना चंदन उगाळून देत होत्या. अचानक एक गाडी त्यांच्या दारासमोर थांबल्याचा आवाज आला. कधी नव्हे ते काका पूजा अर्धवट टकून बाहेर धावले. काकांच्या मागून काकूदेखील बाहेर आल्या. बाहेर दारात एक जीप उभी होती. त्यातून भानू शेट उतरले. त्यांच्या मागोमाग काकूंच्या वयाचीच एक बाई बाहेर आली. तिच्या सोबत अजूनही एक गृहस्थ होते. त्यांना बघून काका फाटकाकडे गेले. काकूंना हे काय चालू आहे ते कळेना. मात्र थोडसं बोलण झालं आणि ते सगळेजण अशोकच्या घराच्या दिशेने चालायला लागले. मग मात्र न राहून काकू देखील त्यांच्या मागून अशोकच्या घराकडे गेल्या. सर्वात पुढे ते बाहेरून आलेले गृहस्थ होते. त्यांच्या मागे त्या अनोळखी महिला आणि मग शेटजी आणि काका-काकू.

त्या गृहस्थांनी पुढे होऊन अशोकच्या घराची बेल वाजवली. बेलचा आवाज बाहेरपर्यंत ऐकू आला. तो आवाज एकताच काकूंना कमालीचं आश्चर्य वाटलं. कारण आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा त्या आणि काका आले होते आणि त्यांनी बेल वाजवली होती तेव्हा मात्र बेल वाजली नव्हती. काकू काहीतरी बोलणार होत्या. पण तेवढ्यात आतून दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि त्या गप झाल्या. दारात अशोक उभा होता. त्याने क्षणभर त्या पहिल्या गृहस्थांकडे बघितलं आणि त्याची नजर मागे उभ्या असलेल्या त्या स्त्रीकडे गेली. त्यांना पाहताच अशोकच्या कपाळावर असणाऱ्या आठ्यांच जाळ नाहीसं झालं. बाकी सर्वांकडे दुर्लक्ष करत त्याने त्या स्त्रीचा हात हातात घेतला आणि म्हणाला,"आई, तू कधी आलीस? अग, किती जोरात बेल वाजवलीस? संध्या अजून झोपली आहे ग. जाग येईल ना तिला." तो हे बोलतच होता तेवढ्यात त्याची नजर शेटजी आणि त्यांच्या बरोबर उभ्या असलेल्या काका आणि काकूंकडे गेली. त्याबरोबर अशोकला आश्चर्य वाटलेलं दिसलं. तो शेटजीकडे वळून म्हणाला,"भानू शेटजी तुम्ही इकडे कोणीकडे सकाळीच? आणि काका-काकू तुम्ही देखील सकाळीच कसे आलात. बर, ओळख करून देतो ही माझी आई. आई, हे जोशी काका आणि या जोशी काकू. मला आणि संध्याला अगदी घरच्या सारखं वागवतात हो. इतक्या वेळा त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं आहे." एवढ बोलून अशोक थांबला. काकूंना आश्चर्य वाटत होत ते एकाच गोष्टीच की काल संध्याकाळी घडलेल्या प्रसंगाची एकही खूण अशोकच्या चेहेऱ्यावर किंवा वागण्या-बोलण्यात दिसत नव्हती.

त्या सगळ्यांकडे एक कटाक्ष टाकून अशोक परत एकदा त्याच्या आईकडे वळला आणि म्हणाला,"बर, ते जाऊ दे. तू अशी अचानक कशी काय आलीस ते सांग आई." अशोकच्या आईने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणल्या,"सगळे प्रश्न इथे दारातच विचारणार आहेस का अशोक? मला आत नाही का येऊ देणार?" त्यावर अशोक एकदम अस्वस्थ झाला आणि म्हणाला,"अग, संध्या झोपली आहे आत. तिला रात्रभर झोप नव्हती ग. कालच वर्ष झाल न त्या प्रसंगाला. त्यामुळे तिला स्वस्थ झोप नव्हती. आत्ता पहाटे डोळा लागला आहे तिचा." त्यावर त्याच्या हाताला थोपटत त्याची आई म्हणाली,"बर, मग आपण हळू आवाजात बोलू. पण आत तर जाऊ या." अशोक त्यावर एकदम मागे होत म्हणाला,"तू एकटीच ये. या सगळ्यांना जायला सांग." तशी त्या अशोकच्या खांद्याला थोपटत म्हणल्या,"अशोक कोणीही आवाज करणार नाही याची खात्री मी देते. पण ते सगळेच आत येणार आहेत." त्यांच्या आवाजात खंबीरपणा होता. त्यामुळे अशोक काही न बोलता मागे वळला आणि घरात शिरला. त्याच्या पाठोपाठ अशोकची आई, ते नवीन आलेले गृहस्थ, भानू शेटजी, काका आणि काकू सगळेच आत गेले आणि सोफ्यावर बसले. अशोकची नजर मात्र सारखी आतल्या खोलीकडे वाळत होती.

आत जाताच अशोकला त्याच्या आईने बरोबर आलेल्या गृहस्थांच्या सामोरं करून विचारलं,"अशोक, यांना तू ओळखतोस ना?" त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारख करत अशोक एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला,"मी जरा आत जाऊन संध्या जागी झाली आहे का बघून येतो." त्याने अस म्हणताच काकूंची उत्सुकता ताणली गेली. आता आपण संध्याला बघू शकू या विचाराने त्या सावरून बसल्या. मात्र उभ्या राहिलेल्या अशोकला एका रिकाम्या ख्रुचीत बसवत ते आलेले गृहस्थ म्हणाले,"अशोक, माझ्याकडे बग बघू." अशोक मात्र त्यांच्याकडे बघायला तयार नव्हता. एखाद्या हट्टी मुलाप्रमाणे तो नजर खाली करून बसला होता. त्या गृहस्थांनी अशोकच्या दोन्ही खांद्याला धरले आणि म्हणाले,"अशोक, संध्या आत नाही आहे." त्यांनी अस म्हणताक्षणी मात्र अशोक उफाळून उठला आणि त्यांना ढकलत तो आतल्या खोलीकडे धावला. धावताना तो ओरडत होता,"आई, तू माझी आई आहेस की वैरीण? का आणलस तू यांना इथे? संध्या आहे.... इथे आहे... या खोलीत ती झोपली आहे. जा तुम्ही सगळे जा इथून. मला आणि संध्याला जगू द्या."

अशोकच्या या अशा अचानक ओरडत धावण्यामुळे काका, काकू आणि भानू शेटजी गोंधळून गेले. अशोकची आई मात्र शांत होती. त्यांच्या बरोबर आलेले गृहस्थ चपळतेने पुढे झाले आणि त्यांनी अशोकला चटकन धरून खाली पाडले. कोणालाही कळायच्या अगोदरच त्यांनी अशोकला इंजेक्शन दिले. काही क्षण अशोकने धडपड केली. मग मात्र तो शांत झाला. त्याला झोप लागली होती. त्या गृहस्थांनी शेटजींच्या मदतीने अशोकला आतल्या खोलीत नेऊन झोपवले.

एकूण चाललेला प्रकार काका आणि काकूंच्या आकलनापलीकडचा होता. ते एका बाजूला बसून घडणाऱ्या घटना बघत होते फक्त. अशोक झोपला आहे याची खात्री झाल्यावर मात्र ते गृहस्थ बाहेर येऊन बसले. त्यांनी एक स्मित करून काकांकडे बघितले आणि आल्यापासून पहिल्यांदाच बोलायला सुरवात केली.

"तुम्हीच न जोशी काका आणि काकू? तुमचे आभार मानायला आमच्याकडे शब्दच नाहीत. काल जर तुम्ही प्रसंगावधान राखून अशोकच्या आईला फोन केला नसतात तर आम्ही याच गैरसमजात असतो की अशोक बरा झाला आहे. तुम्ही अशोकच्या आईला फोन केलात आणि लगोलग त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला जे सांगितले त्यावरून माझ्या लगेच लक्षात आले की अशोक अजूनही बरा झालेला नाही. म्हणून मग मी वेळ न दवडता अशोकच्या आईला घेऊन इथे यायला निघालो....."

ते बोलत असताना अचानक त्यांना अडवत काका म्हणाले,"अगोदर आम्हाला हे कळेल का की तुम्ही कोण आहात? मी अशोकच्या आईला फोन केला होता ते हे सांगायला की अशोकपासून संध्याला धोका आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. पण मला वाटत अशोकने अगोदरच संध्याला काहीतरी केले आहे. कारण तुम्ही अशोकला आत झोपवून आला आहात; पण तुमच्या बरोबर संध्या बाहेर आलेली नाही. त्यामुळे तुम्ही इथे कसे पोहोचलात ते समजून घेण्याच्या अगोदर संध्या ठीक आहे की नाही ते बघणे आत्ता जास्त महत्वाचे आहे."

काकांचे बोलणे एकून ते गृहस्थ काहीसे हसले आणि मग गंभीर होत म्हणाले,"काका आणि काकू तुम्हाला हे एकून कदाचित् धक्का बसेल; पण संध्या इथेच काय पण या जगातच नाही आहे."

त्याचं ते बोलण एकून काकूंना खरच मोठ्ठा धक्का बसला होता. त्यांनी काकांचा हात घट्ट धरला. काका देखील अवाक झाले होते. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अशोकच्या आईकडे बघितले. अशोकच्या आईचा चेहेरा दु:खाने पिळवटला होता. त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते. त्यांनी त्या गृहस्थांना हात केला आणि बोलायला सुरवात केली.

"जोशी काका आणि काकू, हे डॉक्टर शेटे. ते सायकॉलॉजिस्ट आहेत. मी तुम्हाला एकूणच सर्वकाही पहिल्यापासून सांगते. . आमचा एक वाडा आहे मुंबईला गिरगावात आणि वाड्यात एक झोपाळा देखील आहे तुमच्या घरात आहे तसाच. अशोक माझा मुलगा. अशोकचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते. त्यामुळे मीच अशोकला वाढवले होते. अशोकची आणि संध्याची कॉलेजमध्ये ओळख झाली. संध्या मोठी गोड मुलगी होती. त्यामुळे मीच त्यांचे लग्न लावून दिले होते चार वर्षांपूर्वी. अशोक चांगली नोकरी करत होता. आमच चांगल चालल होत. दोन वर्षांनी अशोक-संध्याला मुलगी झाली. खूप गोड होती आमची मृदुला. ती तीन एक महिन्यांची होती. एकदा दुपारी संध्या मृदुलाला घेऊन वाड्यातल्या झोपाळ्यावर बसली होती. ती हलकेच झोके घेत होती. कसे कोण जाणे पण अचानक तिच्या हातून मृदुला सटकली आणि खाली पडली. त्या एवढ्याश्या जीवाला ते सहन नाही झाल आणि आमची मृदुला तिथल्या तिथे गेली. संध्याने देखील झोपाळ्यावरून खाली उडी मारली. तिने मृदुलाला हातात घेतली. पण मृदुला हालचाल करत नव्हती. झालेल्या आवाजामुळे मी आतून बाहेर धावत आले. संध्याला मोठा धक्का बसला होता. ती एकदम दगड होऊन बसली होती. मी संध्या आणि मृदुला जवळ गेले. पण काही करता येणार नाही हे माझ्या त्याक्षणीच लक्षात आल. मी संध्याला हलवत होते. पण ती एकदम स्थब्द बसली होती. पार घाबरून घेले होते मी. त्यामुळे अशोकला फोन करायला आत धावले. अशोकला कळवून मी बाहेर आले तर मला संध्या आणि मृदुला दोघीही कुठेच दिसेनात. तशी मी वाड्याच्या दरवाजाकडे धावले. तिथे मला कोणीतरी सांगितले की संध्याला हातात बाळाला घेऊन समुद्राकडे धावत जाताना त्यांनी बघितले.

मी तशीच समुद्राच्या दिशेने धावले. पण खूप उशीर झाला होता. संध्या मृदुलाच्या कलेवराला कवटाळून समुद्रात शिरली होती. मी लगेच पोलिसांना कळवले. तोवर अशोक देखील तिथे पोहोचला होता. आम्ही खूप शोध केला संध्याचा समुद्रात. पण ती हाती लागली नाही. संध्याचे कलेवर दुसऱ्या दिवशी सकाळी किनाऱ्याला लागलेले आम्हाला मिळाले. आमच्या मृदुलाचा तर पत्ताच लागला नाही. पत्नी आणि मुलगी एका दिवसात गेल्याचा धक्का अशोक पचवू शकला नाही. काही दिवस तो एकदम बधीर होता. पण मग त्याने हे स्वीकारले की मृदुला गेली आहे. मात्र संध्या देखील गेली आहे हे मान्य करायला तो तयार होत नव्हता. हळूहळू तो फारच भ्रमिष्टासारख वागायला लागला. त्यामुळे मी त्यांना डॉक्टर शेटे यांच्याकडे घेऊन गेले. अशोकला त्यांची ट्रीटमेंट वर्षभर चालू होती. हळूहळू तो माणसात आला. त्यानंतर तो माझ्याशी निट बोलायचा.

डॉक्टरांनी मला सांगितले होते की अधून मधून मुद्दाम संध्याचा विषय काढून अशोकचे विचार मी समजून घ्यावेत. मात्र संध्याचा विषय काढला तर तो दुखावेल म्हणून मी कधीच तिच्याबाद्द्ल बोलत नव्हते. ही माझी मोठी चूक होती. कारण अशोकने त्याच्या मनात संध्याला जिवंत ठेवले होते. मात्र त्याने याची मला कल्पना देखील येऊ दिली नाही. काही महिन्यांपूर्वी त्याने ही नोकरी धरली. अशोक संध्याचा विषय सोडला तर एकदम नॉर्मल वागायचा-बोलायचा. त्यामुळे कोणालाही काहीही संशय आला नाही. त्या लोकांना देखील एक जवाबदार तरुण अशा छोट्या गावात येऊन सगळी जवाबदारी घेईल असा हवा होता. त्यामुळे त्यांनी देखील बाकी कोणतीही चौकशी केली नाही. मात्र त्याने इथे आल्याक्षाणापासून त्याच्या मनातल्या संध्याला परत जिवंत केले. जणूकाही ती जिवंत आहे आणि त्याच्याबरोबर राहाते आहे अशा प्रकारे तो वागत होता. इथे त्याला कोणीच ओळखत नसल्याने त्याने जे सांगितलं ते तुम्हाला सर्वांनाच खर वाटल. अर्थात हे मला जोशी काकांनी काल फोन केल्यानंतर लक्षात आले. काकांनी मला काल घडलेला प्रसंग सांगितला आणि मला एकटीला अशोकला सांभाळणे अशक्य आहे हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे लगेच मी डॉक्टर शेटेना फोन लावला आणि माझ्या विनंती वरून ते माझ्या बरोबर इथे यायला तयार झाले.

बाकी आम्ही इथे आल्यापासून जे काही घडले आहे ते तुमच्या समोरच आहे. त्यामुळे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल सगळे." अशोकची आई बोलायची थांबली. तिचा गळा दाटून आला होता. जोशी काकुंचे डोळे देखील ओलावले. त्या उठून अशोकच्या आईजवळ गेल्या आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांना थोपटायला लागल्या. अशोकच्या आईने काकूंच्या खांद्यावर दमून डोकं टेकवल आणि आपल्या अश्रुना वाट करून दिली.

काकांचे डोळे देखील पाणावले होते. त्यांनी डोळे कोरडे केले आणि हळव्या आवाजात ते म्हणाले,"अशोकच्या आई, तुमच दु:ख आम्ही समजू शकतो. मात्र मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काल आम्ही जेव्हा इथे आलो आणि ज्या प्रकारे अशोक आमच्याशी वागला त्यावरून आम्हाला संशय आला की बहुतेक अशोकनेच संध्याला अडकवून ठेवले आहे. मी एकदा अशोकला शेटजींच्या दुकानातून फोन करताना बघितले होते. त्यावेळी मी त्यांना विचारले तेव्हा शेटजी म्हणाले होते की अशोक अनेकदा त्यांच्या दुकानात फोन करायला येतो. मला वाटले की अशोक ज्यांना फोन करतो त्यांनाच जर त्याचे हे वागणे कळवले तर कदाचित् संध्यावर होणारा अन्याय थांबवता येईल. मात्र आता जे सत्य पुढे आले आहे ते एकून आम्हाला अशोक बद्दल खूप वाईट वाटते आहे. पण मग आता तुम्ही नक्की काय करणार आहात डॉक्टर?"

डॉक्टर शेटे इतकावेळ काहीच बोलले नव्हते. त्यांनी एकदा अशोकच्या आईकडे बघितले आणि ते म्हणाले,"आता मी अशोकला झोपेचे इंजेक्शन दिले आहे. तो उठल्यानंतर कसा वागेल याची काहीही खात्री देता येत नाही. त्यामुळे अशोकला लवकरात लवकर इथून घेऊन जाणेच योग्य आहे." अशोकच्या आईने देखील मान हलवून मूक संमती दिली. काही वेळातच अशोकची आई आणि डॉक्टर शेटे अशोकला घेऊन निघून गेले.

समाप्त

कथा

प्रतिक्रिया

एस's picture

19 Jul 2017 - 12:54 pm | एस

कथा छान रंगवली आहे.

प्रीत-मोहर's picture

19 Jul 2017 - 2:40 pm | प्रीत-मोहर

प्रेडिक्टेबल पण रंगवली छान आहे..

निशाचर's picture

19 Jul 2017 - 5:07 pm | निशाचर

+१

योगी९००'s picture

19 Jul 2017 - 7:29 pm | योगी९००

एकदम मस्त (खरे म्हणजे कथेला मस्त म्हणवत नाही.. पण तुमच्या लेखनशैली ला मस्त असे म्हणतो).

कथा आवडली.

वाईट असतं राव असलं काहीतरी.
:(

संजय पाटिल's picture

2 Sep 2017 - 4:16 pm | संजय पाटिल

:(

रुपी's picture

19 Jul 2017 - 11:27 pm | रुपी

छान.. मस्त रंगवलीये कथा.
ते काका-काकूंना त्यांच्या घराकडे पडद्याआडून कुणीतरी बघतंय असं जे वाटत असतं त्याचं काय?

ज्योति अळवणी's picture

19 Jul 2017 - 11:56 pm | ज्योति अळवणी

काहीही समजू शकता रूपि जी. अशोक बघत होता किंवा काका काकूंना भास होत होता

दशानन's picture

20 Jul 2017 - 9:31 pm | दशानन

आवडली!!!

जेनी...'s picture

21 Jul 2017 - 12:11 am | जेनी...

छान ...

थोडा घाईत उरकलात तीसरा भाग असं वाटुन गेलं

पण कथा सुंदरच मांडलीत..

प्राची अश्विनी's picture

21 Jul 2017 - 7:07 am | प्राची अश्विनी

आवडली गोष्ट.

रायगड's picture

2 Sep 2017 - 11:29 am | रायगड

प्रेडिक्टेबल झाली असली तरी आवडली.

शित्रेउमेश's picture

6 Sep 2017 - 3:01 pm | शित्रेउमेश

+१