अनवट किल्ले १४: खोल खोल पाणी , वल्लभगड, हरगापुर ( Vallabhgad, Haragapur) आणि गंधर्वगड (Gandharvgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
15 Jul 2017 - 11:54 am

पुणे -बेंगळुरू मार्गावरून बेळगावच्या दिशेने निघालो कि कोल्हापुरनंतर येणारे महत्वाचे गाव म्हणजे संकेश्वर. संकेश्वरच्या आधी तीन कि.मी. वर एक छोटीसी टेकडी दिसते, त्यावरच तटबंदीची शेलापागोटे चढवून त्याला किल्ल्याचे रुप दिले आहे, हा आहे "हरगापुर". पायथ्याशी असलेल्या वल्लभगड गावच्या सानिध्याने त्याला "वल्लभगड"असेही म्हणतात.
वल्लभगडाच्या इतिहासात डोकावून पाहू. वल्लभगड नेमका कोणी बांधला याची निश्चित माहिती नाही मात्र वाचीव माहितीनुसार, कोल्हापूर प्रांतावर असणारा शिलाहारांचा अंमल पाहता हा किल्ला बांधण्याचे श्रेय देखील कोल्हापूर जिल्ह्यातील इतर किल्ल्याप्रमाणे शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. पुढे सन १६६७ मध्ये शिवरायांनी गड स्वराजात आणला. सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठयांकडे आला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. त्यानंतर १४ मे १७५३ रोजी करवीरकर छत्रपती संभाजी राज्यांनी सदाशिवराव भाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड,पारगड व कलानिधीगड हे किल्ले जहागीर दिले. त्यांनतर किल्ला वंटमुरीकर देसाई यांच्या ताब्यात गेला. पुढे मराठ्यांच्या काळात तो सातारकरांकडे आल्यावर सन १७७६ मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या किल्याची पुनर्बांधणी केली. यानंतर पुन्हा तो कोल्हापूरकरांच्या ताब्यात गेला. त्यानंतर पटवर्धनांच्या ताब्यात जाऊन सन १७९६ मध्ये परत कोल्हापूरकरांकडे आला. ज्यावेळी कोल्हापूरचे काही तालुके इंग्रजांच्या ताब्यात आले त्यावेळी सन १८४४ रोजी वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
vlb1
थेट महामार्गाच्या जवळ असल्यामुळे हा किल्ला कधीही जाता येता पहाता येतो. संकेश्वरच्या अलिकडेच महामार्गावर वसलेले वल्लभगड हे पायथ्याचे गाव. ईथे उतरुन चालायला सुरवात करायची. समुद्रसपाटीपासून जरी किल्ल्याची उंची १८५० फुट असली तरी पायथ्यापासून गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचायला अवघी पंधरा ते वीस मिनीटे लागतात. त्यातच स्वताचे वाहन असल्यास काम आणखी सोपे, गाडी थेट गडाच्या अर्ध्या उंचीवर वसलेल्या मरगुबाई मंदिरापर्यंत जाते. रस्ता अर्थातच कच्चा आहे, तेव्हा पावसाळ्यात हि गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गावातील बरीचशी घरे किल्ल्याच्या उतारावरच वसलेली आहेत.
मी हा किल्ला पहाण्यास गेलो, तेव्हा कंडक्टरेने वल्लभगड स्टॉपला गाडी थांबविण्यास नकार दिल्याने संकेश्वर पर्यंत जावे लागले, तिथून एका टेम्पोने वल्लभगड गाव गाठले. ट्रेकमधे काय काय करावे लागेल सांगता येत नाही.
vlb2
समोर प्राथमिक शाळा होती. मराठी बहुल भाग असून सक्तीने कन्नड लादल्याने शाळा कानडी होती.
vlb3
एखाद्या टेकडीएवढीच उंची असलेल्या ह्या किल्ल्यावर मात्र बाभळीच्या झाडांचे जंगल आहे. गडावर पाणी उपलब्ध होईलच असे नाही त्यामुळे गडापायथ्याच्या वल्लभगड गावातुनच पाणी भरुन घेतले.
vlb4
गडाची तट्बंदी जांभ्या दगडात बांधलेली आहे. महाद्वाराचा हा बुरुजाच्या भिंतीला उतार दिला आहे. वास्तविक असे ढाळ दिलेले बुरुज हि बहामनीकालीन शैली आहे, पण ईथे या एकाच बुरुजाला असा शंकु आकार दिलेला आहे.
vlb5
गंमत म्हणजे या बुरुजावर ढाल तलवार योध्यांचे चित्र रंगविलेले आहे, कशासाठी? पता नही.
vlb6
यानंतर महाद्वार येत, पण ते पुर्ण उजव्या हाताला वळल्यानंतरच, म्हणजे गोमुखी बांधणीचे.
vlb7
पण विशेष म्हणजे दोन्ही बुरुज जांभ्या दगडांचे बांधलेले असून दरवाज्याची चौकट मात्र काळ्या पाषाणात, बेसाल्टमधे दिसते, याचा अर्थ कदाचित मुळ दरवाजा एखाद्या युध्दामधे नष्ट झाल्याने पुनर्बांधणी करताना काळ्या दगडात बांधला असावा.
vlb8
दरवाजा बाहेरुन जरी खणखणीत असला तरी आत मात्र थोडीफार पडझड झाली आहे. मी जेव्हा दरवाज्यात पोहचलो तेव्हा गावातील काही मुले पुस्तके घेउन दरवाज्यातच निवांत बसून आभ्यास करत होती. गडावरच्या शांततेमुळे वेगळ्या स्टडीरुमची त्यांना गरज नव्हती.
vlb9
यानंतर वाट उजव्या हाताला वळते, याठिकाणी एका झाडाखाली हे नागशिल्प दिसते. हा बिचारा मात्र डोक्यावर छप्पर नसल्याने उन्हात तळपत पडलाय. बहुधा नागपंचमीच्या दिवसापुरतेच याचे भाग्य उजळत असेल.
vlb10
आत गेल्यानंतर डाव्या हाताला मारुती मंदिर दिसते.
vlb11
आत मारुतीची "पुच्छ् ते मुरुडिले माथा" या आवेशाची मुर्ती पहाण्यास मिळते. वास्तविक अत्यंत दुर्गम किल्ल्यांवरच्या देवताही आजुबाजुच्या गावकर्‍यांनी निगुतीने नीट राखलेल्या दिसतात. प्रसंगी पदरमोड करुन मंदिरांची पुनर्बांधणी केलेली मी पाहिली होती. इथे मात्र हे मारुतीराय बिचारे उन्हा पावसात धुपत होते.
vlb12
अर्थात आता गावकर्‍याना हा मारुती नवसाला पावत असल्याचा साक्षात्कार झाला असल्यामुळे, आता मात्र मंदिराचे नवनिर्माण झाले आहे.
vlb13
यानंतर आपण जातो एका वैशिष्ट्यपुर्ण विहीरीकडे. मुळात या भागातल्या किल्ल्यावरच्या विहीरी हा एक संशोधनाचा विषय आहे. ईथे आपल्याला एक खाली उतरत जाणारा पायर्‍याचा मार्ग दिसतो.
vlb15
मात्र पुढे पायर्‍या झिजलेल्या असल्यामुळे व अंधारी मार्ग, वटवाघळांची दुर्गंधी, तसेच साप व विंचवांचे भय यामुळे पुढे जाउ शकलो नाही.हा मार्ग एका विहीरित उतरतो.
vlb16
यानंतर पुढे निघालो कि एक चौकोनी आकाराची खोल विहीर दिसते. लांबी,रुंदी जेमेतेम असली तरी खोली प्रचंड आहे.
vlb14
यानंतर गडाच्या पुर्व टोकाकडे जाउया. तट्बंदी सलग बांधलेली आहे. मात्र काही ठिकाणी ती ढासळलेली दिसते.
vlb17
तट्बंदीची बांधणी काही ठिकाणी सुबक
vlb18
तर काही ठिकाणी ओबडधोबड आहे.
vlb20
वाटेत काही घरांचे चौथरे दिसतात.हि शिबंदीची घरे असावीत.
vlb22
यानंतर पुर्व टोकाला एक बुरुज दिसतो. विशेष म्हणजे तटबंदीमधेच तो न बांधता, आत सुटा बांधला आहे. याच परिसरातील हुन्नुरगडावर असाच सुटा बुरुज बांधला आहे. अशाच प्रकारचे बुरुज कराडजवळील वसंतगडावर देखील पहाण्यास मिळतात.
vlb51
या बुरुजावर उभारले कि विस्तॄत परिसर दिसतो, दक्षीणेला लांबवर हुन्नुरगड कातळमाथ्यामुळे ओळखून येतो. तर नैऋत्येला झाडीभरला सामानगड दिसतो. शेजारच्या टेकड्यावर पवनचक्क्या उभारलेल्या आहेत. तर पायथ्याशी पुणे-बेंगलोर महामार्गावर वहानांची वर्दळ दिसते.
vlb25
या टोकाच्या खालीच एक नैसर्गिक गुहा असून त्यात सिध्देश्वर मंदिर आहे. वरुण त्याच्यासमोरची दिपमाळ दिसते.
vlb24
यानंतर परत फिरताना या गडाचे मुख्य आकर्षण असलेली हि प्रचंड खोल अशी खोदीव विहीर दिसली. मी पाहिली तेव्हा या विहीरीत पाणी होते. हेच पाणी गडावरच्या ऑफिसला पुरविले जात होते. ह्या विहीरीची खोली आणि गडाची उंची विचारात घेतली तर ह्या विहीरीची खोली निदान गडाच्या निम्म्यापर्यंत तरी असेल.
vlb25
याच बुरुजाच्या परिसरात हे काळ्या पाषाणात बांधलेले शिवमंदिर आहे. एकंदर याची रचना पहाता हे पेशवाई काळात उभारले गेले असावे.
vlb26
आता मात्र हि विहीर कोरडी पडली आहे. इतक्या चिंटुकल्या किल्ल्यावर आणि तुलनेने कमी सैनिक असणार्‍या किल्ल्यावर इतकी प्रचंड विहीर कशासाठी खोदलेली आहे हे मला तरी कोडेच पडले. एक शक्यता अशी कि बहुधा किल्ला बांधत असताना या परिसरात दुष्काळ पडला असावा, त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी अडचण येउ नये यासाठी हि काळजी घेतली असावी.
विहीर पाहून परत निघालो, तर दरवाज्याजवळच एक चौथरा दिसला. महादरवाज्यातून उतरुन खाली आलो आणि गडाला वळसा घालून सिध्देश्वर मंदिर पहाण्यास निघालो.
vlb28
डाव्या हाताला कातळावर उभारलेली तट्बंदी साथ करीत होती.
vlb29
गडाला वळसा घालून मागे आलो तर एका अनगड गुहेत उभारलेले हे मंदिर सामोरे आले.
vlb31
मुळ गुहेमधे बांधकाम करुन कमान तयार केलेली आहे.
vlb33
आतमधे एका सिमेंट्च्या कट्ट्यावर पादुका असून पितळी मुखवटा आहे.
vlb30
एका कोपर्‍यात हे भुयार असून हि वाट संकेश्वर गावात जाती असे मानले जाते. अर्थात त्यात काही तथ्य नाही.
vlb36
गडाच्या अर्ध्या उंचीवर हे मरगुबाईचे मंदिर आहे. आधी हे मंदिर साधेच होते.
vlb39
पण आता त्यालाही अच्छे दिन आलेत.
vlb37
समोर चार हत्तीनी तोलून धरलेले वृंदावन आहे. त्यावर दिपमाळ उभी आहे.
vlb50
वल्लभगडाचा नकाशा.
जाता येता रस्त्यावर दिसणारा हा किल्ला पाहून मी गंधर्वगडावर जाण्यास निघालो.गंधर्वगड हे नाव अतिशय कलात्मक असून किल्ला मात्र तुलनेने दुय्यमच आहे. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. १५ जानेवारी १६६६ मध्ये पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळयावर चाल करुन गेले. २८ जुलै १६८७ च्या पत्रात काकती कर्यातीचा देसाइ व हुकेरी परगण्याचा देसाइ आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठयांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसायांना अजमनगर/बेळगावची व हुकेरी देसायांना चंदगड व आजर्‍याची देशमुखी मनसब व एक हत्ती देण्याचे अमिष दाखविले होते. या किल्ल्याचा ताबा बरीच वर्षे आदिलशाहीशी जवळीक असलेल्या हेरेकर सावंत भोसले यांच्याकडे होता. सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना येथे काही काळ मुक्कामास होते. पुढे १८४४ च्या बंडात इंग्रजांनी या गडाची बरीच नासधूस केली.
gnd2
गंधर्वगड परिसराचा नकाशा
गंधर्वगडावर जायचे म्हणजे दोन मार्ग आहेत.
१) गडहिंग्लज- चंदगड मार्गावर वळकुळी फाटा येतो. इथून डांबरी सडक थेट गडावर गेली आहे. स्वताची गाडी असेल तर हा जास्त चांगला पर्याय आहे. चालत जायचे असेल तर वळकुळी फाट्यापासून साधारण पाउण तास लागेल.
२) बेळगाव- आंबोली रस्त्यावरच्या कोरज या गावातून एक पायवाट थेट गडावर जाते, या वाटेने गडावर पोहचायला अर्धा ते पाउणतास लागतो.
gnd1
चंदगडवरुन गाडी पकडून मी कोरज फाट्याला उतरलो. गावातून थेट रस्ता गडाकडे जात होता. पुढे एक टेकडी लागली, तीला डावीकडून वळसा घालून पुढे गेलो, तो थोडी घरे लागली, त्यानंतर एक छोटे तळे लागले. पुन्हा एक टेकडी लागली. तीला ओलांडल्यानंतर एक काजुची मोठी बाग लागली. या काजुबागेच्या पार्श्वभुमीवर मागे एखाद्या टेकडीइतक्या उंचीचा गंधर्वगड दिसत होता. वर एक मुंडासे बांधून गुर चारणारे मामा अगदी कड्याच्या टोकाशी बसले होते, अगदी खालूनसुध्दा ते स्पष्ट दिसत होते. अवघ्या दहा मिनीटात खडी चढण चढुन मी वर पोहचलो सुध्दा.
मात्र गडमाथा पाहून काहीशी निराशाच झाली. गडाचे नाव जरी अगदी कलात्मक गंधर्वगड असले तरी गडाला ना धड तटबंदीचे संरक्षण, ना कोणत्या एतिहसिक वास्तुचे अवशेष. एकतर थेट गडमाथ्यावर गाव वसलयं. वळकुळी गावातून थेट गडावर सडक येते. या रस्त्यावरच पुर्वी गडाचा महादरवाजा होता. त्याचे थोडेफार अवशेष आज दिसतात.
gnd3
रस्त्याच्या उजव्या बाजुला एका चौथर्‍यावर हनुमानाची मुर्ती दिसते. मात्र ना धड छप्पर ना दिवा बत्ती.
gnd4
इथून पुढे घरांच्या दाटीवाटीमधून चालत साधारण गडाच्या मध्यभागी पोहचल्यावर आपल्याला प्रशस्त असे "चाळोबा"चे मंदिर दिसते. रहिवाश्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला असून, गडावर मुक्काम करायची वेळ आली तर हे मंदिर बेस्ट. या चाळोबाची यात्रा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात असते.
gnd5
मंदिराजवळच गणपती, नागदेवता अश्या काही मुर्त्या व कोरीव दगड मांडून ठेवले आहेत.
gnd6
मंदिराजवळ असणारा हा चौथरा. वास्तविक मंदिरासमोरच्या या पटांगणात पुर्वी हेरेकर सावंताच्या वाड्याचे अवशेष सुस्थितीत होते. पण बहुधा ऑलिंपिकपट्टु घडविण्याच्या नादात गडावरच्या सुजाण पालकांनी ते अवशेष पाडून टाकले. गडावर यासाठी इतरत्र जागा होती, पण या वास्तुचे मोल न समजल्याने असे झाले. आता हळहळून काहीच फायदा नाही.
gnd7
देवळाच्या मागच्या पायवाटेने पुढे गेले कि एक प्राचीन विहीर लागते. गडावरचे रहिवासी याच विहीरीचे पाणी भरतात.
gnd8
यानंतर गडाच्या उत्तर बाजुला गेल्यानंतर अजुनही सुस्थितीत असलेली तटबंदी दिसते.
gnd9
या तटबंदीत तीन चोरदरवाजे आहेत. पण झाडी वाढल्यामुळे खाली उतरता येत नाही.
gnd10
एखादा बुरूजही अजून कसाबसा तग धरून आहे.
gnd12
याशिवाय बुजलेली एक विहीर व घराचे काही चौथरे याशिवाय आता गडपणाचे काहीही अवशेष नाहीत. आपल्याच इतिहासाविषयी आणि एतिहासिक वास्तुविषयी अनास्था असली कि काय होते याचे हे उदाहरण.
गंधर्वगड आणि महिपालगड हे बेळगाव-सावंतवाडी रस्याला संमातर असणार्‍या पुर्व पश्चिम पसरलेल्या डोंगररांगेची दोन टोके. इथून पुर्वेला महिपालगड त्याच्यावरील वस्तीने ओळखता येतो, तर दक्षीणेला दुरसंचारच्या टॉवरमूळे कलानिधीगड लक्ष वेधतो. या अनवट किल्ल्यांच्या मालिके आपण या दोन्ही किल्ल्यांची सैर करणार आहोत.
gnd11
मोठा वळसा घालून डांबरी रस्त्याची फरफट टाळण्यासाठी मी गडावरच्या मुलाना शॉर्ट्कट विचारला, तर त्यांनी तट्बंदीजवळून जाणारी वाट दाखविली. त्या वाटेने वळकुळी गाव गाठून न थांबता फाटा गाठला , तो तिकडून परमप्रिय लाल डब्याची एस.टी. आलीच. त्याने गडहिंग्लज गाठले.
( वॉटरमार्क असलेली प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)
गंधर्वगडाची हि व्हिडीयोमधून सहल
https://www.youtube.com/watch?v=g1H7Qr0Kw4E
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
४ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स

प्रतिक्रिया

ऋतु हिरवा's picture

15 Jul 2017 - 3:47 pm | ऋतु हिरवा

उपयुक्त माहिती आणि फोटो

स्पा's picture

15 Jul 2017 - 3:59 pm | स्पा

जबरदस्तच

दोन्ही किल्ल्यांच्या भटकंतीची वर्णने नेहमीप्रमाणेच छान. ऐतिहासिक अवशेषांबद्दल आपल्याकडे जी अनास्था दिसून येते ते पाहून थक्क व्हायला होतं. असो.

प्रचेतस's picture

17 Jul 2017 - 5:44 pm | प्रचेतस

हाही भाग उत्कृष्ट.
दुर्लक्षित किल्ल्यांची उत्तम सफर तुमच्यासह होत आहे.

सूड's picture

17 Jul 2017 - 10:06 pm | सूड

सुंदर.

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार. या आठवड्यात अनवट किल्ले या लेखमाले एवजी पावसाळी भटकंतीचा धागा टाकेन. तयार रहा "आती क्या खंडाळा"

दुर्गविहारी's picture

1 Sep 2017 - 7:45 pm | दुर्गविहारी

प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद. आपण सध्या पायथ्याच्याच गावात रहाता का? माझ्या आठवणीप्रमाणे किल्ल्याच्या थेट पायथ्याशी वल्लभगड आहे. चुक दुरुस्त करुन घेतो. खुप वर्षापुर्वी हा ट्रेक केला असल्याने तपशीलात चुक झाली.

पैसा's picture

1 Sep 2017 - 11:03 pm | पैसा

नेहमीप्रमाणे छान आणि फोटोही सुरेख!