किस्से गोवा ट्रिपचे- भाग २

पी. के.'s picture
पी. के. in जनातलं, मनातलं
7 Jul 2017 - 11:09 am

दुसरा दिवस गोव्यात फिरण्यात गेला. पैसायच्या दुष्काळाची धग वाढत चालली होती. लॉजच्या टेरेसवर झोपण्याची चैन आता आम्हाला परवडण्यासारखी नव्हती म्हणून एका बीच शेजारी आम्ही आमचा संसार मांडला. शिल्लक राहिलेली अंडी, आमटी आणि भात तयार करून जेवायला बसलो. गडबडीत बीच वरची थोडी रेतीपण आमटीत गेली. हा आमचा गबाळेपणा पाहून काही फॉरेनर्स आमच्याकडे पाहून कंमेंट्स करत होते. "This culprits are spoiling the beach " पण culprit आणि spoiling ह्या शब्दांचा अर्थ माहित नसल्यामुळे आम्ही आमच्या अज्ञानात आनंदी होतो.

झोपायची सोय नसल्यामुळं रात्री प्रवास करून मालवणला जायचा प्लॅन फायनल केला. मालवणजवळ समुद्र किनारी एका गावात पोहचुन सकाळ व्हायची वाट बघत गाडीतच बसलो. सकाळ होताच पोटात कळा यायला सुरवात झाली. आम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन ससा मारायला बाहेर पडलो. याच वेळी बरेच गावकारीपण पाणी नं घेता ससा मारायला समुद्रावर चालले होते. बसताना गावकरी समुद्राच्या दिशेला तोंड करून बसायचे, ते आम्हाला कससंच वाटायचं म्हणून आम्ही समुद्राच्या उलट दिशेला तोंड करून बसलो. गावकरी अनुभवी आहेत हे लगेचच आमच्या लक्षात आलं कारण समुद्राला भरती होती. लगेचच समुद्राच पाणी आम्ही बसलेल्या ठिकाणी पोचलं. आणि पुढच्या लाटे बरोबर आम्ही मागे केलेले घाण आमच्या पुढं. पाण्याच्या बाटल्या पण लाटेबरोबर वाहून गेल्या.

फास्ट फॉरवर्ड... सिंधुदुर्ग किल्ला बघून परतीच्या वाटेल लागलो पण परत प्लॅन बदल झाला आणि महाबळेश्वर करून घरी जायचं ठरलं. दुपारच्या जेवणाचे वेळ झाली. स्वच्छ पाण्याचा ओढा बघून आम्ही आमचा स्टोव्ह मांडला. ओढ्यात असलेले छोटे छोटे मासे बघून मासे बनवायचा बेत फायनल झाला. कोणी जेवण करत होतं. कोणी लुंगीची टोक पकडून लुंगीमध्ये मासे पकडत होतं. आमचा खटपट्टया मित्र पी .जे. गुडग्या एवढ्या पाण्यात सूर कसा मारायचा ह्याचं प्रात्यक्षिक दाखवत होता. आशाच एका प्रात्यक्षिका वेळी डोकं एका दगडा वर आपटलं आणि दगड फुटला. डोक्यालाही थोडा मार लागला आणि डोकातून रक्त वाहु लागलं. आजूबाजूला चौकशी केली तर समजलं जवळपास १० किलोमीटरच्या अंतरावर डॉक्टर नाही. १० ते १२ किलोमीटर मागे जाऊन लागलेल्या भागातील केस कडून, टाके घालून आलो.

.

फास्ट फॉरवर्ड... महाबळेश्वर ला पोहोचे पर्यंत अंधार झाला म्हणून प्रतापगडाजवळ थांबायचं ठरलं. बाहेर भरपूर थंडी आसल्यामुळे काचा बंद करून गाडीमध्ये बसल्याबसल्या झोपलो.

रात्री ३.३० च्या दरम्यान....
मधल्या सीट वर झोपलेला दिप्या जोरात ओरडला. आई sssssss , मेलो sssssssss . वाचवा वाचावा... सोड मला ..... मला सोड.
बंद गाडीत ... गाढ झोपेत.. रात्री ३.३०.. असं कोणी आरडल्यावर आमची काय अवस्था झाली असेल.. बसल्या जागी घाम फुटणे.. पोटात गोळा येणे.. डोळ्या समोर तारे चमकणे या सगळ्या मराठी म्हणींचा अनुभव आम्ही आठजण घेत होतो. स्वतःला सावरून आम्ही त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्दीवर आणला. नंतर त्यानं सांगितलं कि "स्वप्नात त्याच्या छातीवर राक्षस बसून त्याचा गळा दाबून जिव घेणार होता". ( म्हणून आरडून हा आमचा जिव घेत होता) पण त्याचं हे एक्सप्लेनेशन ऐकायला जवळ कोणी नव्हतं. सगळे मिळालं ते भांड घेऊन ससा मारायला गेले होते.

फास्ट फॉरवर्ड... महाबळेश्वर फिरून झालं. सनसेट बघूंन घरी जायचे ठरलं. सनसेट व्हायला आजून बराचं वेळ बाकी होता म्हणून मोकळी जागा बघून क्रिकेट खेळायचा बेत केला. बाजूला बरीच झाडी होती. आमचा ड्राइवर कॅच घेण्यसाठी बॉल पाटोपाट झाडीत घुसला आणि एका झाडात अडकून दुसऱ्या झाडावर कोसळला. झाडीतुन बाहेर आला तोच ओरडत. आम्हाला वाटलं परत याचा हात निसटला. खरंतर तो पडला ते झाड आगबोन्ड चे होतं. त्याच्या संपूर्ण अंगाला खाज होत होती. खाजवून खाजवून अंग लाल झालं आणि तो लाल माकडा सारखा दिसायला लागला. त्याच्या अंगावर पाणी ओतून आंघोळ घातली तेव्हा कुठं जरा शांत झाला.

शेवटी सनसेट बघून रात्री १० वाजता घरी पोहोंचलो.

टीप:- ह्या ट्रिप मध्ये अजाणतेपणी केलेल्या चुका हा किती महामूर्खपणा होता हे आता जाणवतंय. घरी न सांगता गोव्याला जाणे, पिताना लिमिट क्रॉस करणे, बीचवर कचरा करणे, आपल्या अंगातील गुण कि अवगुण मित्रांना न सांगणे, कुठलंही प्लॅनिंग नसताना निर्णय घेणे अशा एक ना धड भाराभर चुका आम्ही केल्या. खरचं हा खूप मोठा मूर्खपणा होता.

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

अमोल काम्बले's picture

7 Jul 2017 - 11:39 am | अमोल काम्बले

खरचं हा खूप मोठा मूर्खपणा होता.<<<<<<<<<<< यातच तर मजा आहे राव.

अमोल काम्बले's picture

7 Jul 2017 - 11:41 am | अमोल काम्बले

यातच तर मजा आहे राव.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 11:42 am | मुक्त विहारि

पण त्या वयात असा मूर्खपण करणे आणि तो निभावता येणे, हे मह्त्वाचे.

त्या ट्रिपमुळे बिंधास्तपणा नक्कीच वाढला असेल.

एकदम भन्नाट वर्णन आहे. कॉलेजमध्ये असताना अशी एखादी एक उनाड ट्रिप कधी न केल्याचं शल्य नेहमीच मनात राहील. पण समुद्रकिनारी शौचाला बसण्याचा प्रकार नाही आवडला. अनेक पर्यटक तिथे नंतर खेळणार असतात डुंबणार असतात. असे विधी कोण करताना पाहिलं की कसं वाटतं याचा पूर्ण अनुभव आहे मला.
आम्ही एकदा दापोलीजवळ कोळथरेला गेलेलो तेव्हा तिथे बीचवर मस्त खेळण्यात मग्न होतो. काही वेळाने थोड्या अंतरावर बसलेल्या एका माणसाकडे आमचं लक्ष गेलं. पूर्ण न दिसल्याने आम्हाला तो पण खेळत किंवा खेकडे, शिंपले वेचत असेल असंच वाटलं आणि आम्ही दुर्लक्ष केलं.पण काही वेळाने अजून थोडी माणसं एकाच आसनात बसलेली पाहून आम्हाला जरा शंका आली. जरा जवळ गेल्यावर आमची शंका खरी निघाली आणि आम्ही अंगावर पाल पदवी तसे दचकून चक्क पळत सुटलो रूमकडे. घसाघसा अंग घासून अंघोळी केल्या तेव्हा कुठे बरं वाटलं. बीचसमोरच रिझॉर्ट असूनही आम्ही पुढचा अक्खा दिवस बीचकडे फिरकलो नाही.

चायला आम्हीपण अशीच कॉलेजवयात "चलो गोवा" म्हणत अनप्लॅन्ड ट्रिप केली होती. अगदी ट्रकबिक जे वाहन मिळेल ते पकडत रातोरात निघून. अनेक स्मृती जाग्या झाल्या..

ज्योति अळवणी's picture

8 Jul 2017 - 11:22 pm | ज्योति अळवणी

मस्तच