खोटी नाणी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
5 Jul 2017 - 7:27 am

ही मैत्री, प्रीती, ही तर खोटी नाणी
बाजार भरविती गाऊन त्यांची गाणी

मित्रहो, या आहेत रॉय किणीकरांच्या एका कवितेतील दोन ओळी. यांनी माझ्या मनात कायमचे घर केलेले आहे. ते म्हणतात ते अगदी खरे आहे. मैत्री व प्रीती या दोन्ही प्रांतांमध्ये असंख्य खोटी नाणी कायम खुळखुळत असतात. माझ्या काही परिचितांना त्यांच्या आयुष्यात अशा खोट्या नाण्यांचे चांगलेच अनुभव आले. त्यांनी ते मला सांगितले. मला ते भावले. ते आपल्यासमोर सादर करतो.
***
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रसाद नुकताच एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षात गेला होता. वसतीगृहात राहून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याचे शिक्षण चालू होते. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांचे हॉस्पिटल प्रशिक्षण चालू होते. प्रत्यक्ष रुग्णासोबत डॉक्टर जो विद्यार्थ्यांच्या लहान गटाचा तास घेतात, त्याला ‘क्लिनिक’ म्हणतात.
एके दिवशी प्रसादच्या २५ जणांच्या गटाचे क्लिनिक एका हॉस्पिटलमध्ये चालू होते. हे हॉस्पिटल मुलांच्या वसतीगृहापासून दोन कि.मी. अंतरावर होते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी तेथे सायकलने आले होते. उकाड्याचे दिवस होते. खच्चून भरलेल्या हॉस्पिटलमधील एका अरुंद जागेत डॉ. जोशी हे क्लिनिक घेत होते. सर्व विद्यार्थी ते उभ्यानेच ऐकत होते.

अचानक प्रसादला अस्वस्थ वाटू लागले. त्याला किंचित चक्कर आली आणि काही कळायच्या आत तो एकदम बाजूच्या मुलांच्या अंगावर पडला. दोन मिनिटांसाठी त्याची शुद्ध हरपली. याला वैद्यकीय शास्त्रात syncope म्हणतात. हॉस्पिटल प्रशिक्षणाच्या सुरवातीच्या काळात असे प्रकार अधूनमधून होत असतात. आता प्रसाद शुद्धीवर आला. डॉ.जोशींनी त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले व थोडा वेळ झोपवून ठेवले. मग त्यांनी ‘क्लिनिक’मधल्या रुग्णाच्या आजाराची चर्चा थोडावेळ बाजूलां ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांना या ‘सिंकोप’ प्रकाराची माहिती दिली. त्यामध्ये घाबरण्यासारखे काही नसते, असेही सांगितले.

नंतर ते प्रसादला म्हणाले, ‘आता तू होस्टेलवर जाऊन विश्रांती घे.फक्त जाताना एकटा जाऊ नकोस. तुझ्या या वर्गमित्रांपैकी कोणाला एकाला (किंवा एकीला! ) बरोबर घेऊन जा.” प्रसादला आता जरा बरे वाटत होते. पण त्याचे डोके हलके झाल्यासारखे जाणवत होते आणि असा प्रकार आयुष्यात प्रथमच घडल्याने कसेतरीच वाटत होते. आता त्याला वाटले, की आपल्या या गटातील कोणीही एक चटकन पुढे येईल व त्याला सोबत करेल. तो आशेने एखाद्या सोबत्याची वाट पाहू लागला. पण तसे काही घडेना. मग त्याने मुलांच्या घोळक्यात मागे उभे असलेल्या एक-दोघांना हळूच विचारले. पण, त्या दोघांनी जरा नाराजीच दाखवली आणि ते क्लिनिकमध्येच लक्ष देऊ लागले.

दरम्यान प्रसादाच्या डोक्यातला हलकेपणा अजून टिकून होता. एकीकडे डॉ. जोशींचे शिकवणे चालू होते. साधारण दहा मिनिटे वाट पाहिल्यावर प्रसादच्या लक्षात आले, की कोणीही त्याच्याबरोबर यायला उत्सुक नव्हते. सर्वजण त्या क्लिनिकमध्ये मग्न होते. त्याला मगाशी आलेल्या चक्करेपेक्षा हाच मोठा धक्का होता. हताशपणे तो त्या समूहाकडे पाहत राहिला.

शेवटी तो उठला व एकटाच सायकल मारत होस्टेलला परतला. त्याचे सहकारी वर्गमित्र हे सर्वजण त्या कॉलेजमध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळवून आलेले भावी डॉक्टर्स होते. पण, या प्रसंगी त्यांच्यापैकी एकालाही आपल्या अडचणीत असलेल्या सहकाऱ्याला मदत करावी असे वाटले नाही. प्रसादबरोबर जाण्यापेक्षा त्या तासाचे शिक्षण न बुडणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक महत्वाचे होते! सेवाभाव हा डॉक्टरच्या अंगी असावा लागणारा प्राथमिक गुण त्यांच्यापैकी एकातही नसावा?

प्रसादने ‘सिंकोप’चा धक्का त्या दिवसभरात पचवला. पण, अत्यंत गरजेच्या वेळी त्याला कोणीही सोबत न केल्याची जखम आजही – एक यशस्वी डॉक्टर होऊन अनेक वर्षे झाल्यावरही – तो उरी बाळगून आहे.
……
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या शहरातील हा एक प्रसंग. विनय व संजय हे दोघे तरुण अभियंते. दोघे कॉलेज जीवनातले वर्गमित्र. त्यांनी एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आणि आता आपापल्या व्यवसायात मग्न. एका वर्षी, हे दोघेही सदस्य असलेल्या अभियंत्यांच्या संस्थेने एक अभिनव उपक्रम जाहीर केला होता- तो म्हणजे महाराष्ट्रातील अभियंत्यांचे साहित्यसंमेलन. त्या दोघांनीही त्यासाठी नावनोंदणी केली होती. विनयने आतापर्यंत थोडेफार लेखन केलेले होते. तो संमेलनातल्या कथाकथनात भाग घेणार होता. तर संजयचा संमेलनाला यायचा हेतू म्हणजे जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेणे, हा होता.

संमेलन पूर्ण एक दिवसाचे होते. या दोघांची भेट सकाळच्या चहापानाच्या वेळेत झाली. गपागोष्टी, चेष्टामस्करी इ. झाल्यावर विनयने तो स्वतःची एक कथा कार्यक्रमात सादर करणार असल्याचे संजयला सांगितले. त्यावर संजयने फारसे औत्सुक्य न दाखवता, तो केवळ प्रेक्षक म्हणून संमेलनाला आल्याचे सांगितले. संमेलनाला महाराष्ट्रातील अनेक गावांतून अनेक उत्साही अभियंते आलेले होते. विविध कार्यक्रमांची रूपरेषा ठरलेली होती. त्यामध्ये परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन इ. चा समावेश होता. कथाकथनाचा कार्यक्रम उशीरा रात्री आठ वाजता होता.
कार्यक्रम चालू झाले आणि पुढे सरकत होते. दुपारी दोनला सर्वांचे स्नेहभोजन झाले. तेव्हाच्या गप्पांमध्ये विनय व संजयने जुन्या आठवणींना उजाळा दिला. आताच्या कार्यक्रमांवर चर्चा झाली. बोलण्याच्या ओघात विनयने पुन्हा एकदा त्याचे कथाकथन असल्याचे संजयला सांगितले. तरीही संजय थंडच होता. त्याने त्याबाबत कोणतीही उत्सुकता न दाखवता विषयांतर केले. संजयला विनय लेखन करतो हे माहीत होते. त्याचे काही लेखन संजयने पूर्वी वाचलेही होते. त्यामुळे विनयची एवढीच माफक अपेक्षा होती, की संजय त्याला विचारेल की कोणती कथा त्याने कथनासाठी निवडलीय. परंतु विनयच्या पदरी अपेक्षाभंगच आला.

भोजनोत्तर पुढचे कार्यक्रम झाले. बघताबघता संध्याकाळच्या चहापानाची वेळ झाली. पुन्हा एकदा मित्रमंडळी एकत्र. चहाचा घोट घेताना संजयने विनयला सांगितले, की तो आता बोअर झालाय आणि चहापान उरकताच निघून जाणार आहे. इथपर्यंत ठीक होते. पण, त्याची पुढची प्रतिक्रिया मात्र विनयला चांगलीच खचविणारी ठरली. संजय म्हणाला, “आमच्यासारख्या सामान्य प्रेक्षकाचे बरं असतं बुवा. बोअर झालं की सरळ कटता येतं. तू मात्र कार्यक्रमात भाग घेतलेला असल्याने अडकून पडला आहेस!”

विनयला अजूनही वेडी अशा होती की हा गृहस्थ निदान आपल्या आजच्या कथेचे नाव तरी विचारेल आणि मग निघेल. पण छे! पठ्या जणू त्या गावचाच नव्हता. यावर विनयने त्याला स्वतःहून अधिक सांगणे म्हणजे वेडेपणा ठरला असता. मग संजयने फालतू गप्पाटप्पा करून विनयला अच्छा केले व तो निघून गेला. यथावकाश त्याचा कार्यक्रम झाला. त्याच्या कथनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संमेलनाची सांगता झाली. विनयच्या दृष्टीने संमेलन उत्साहवर्धक ठरले होते. पण, त्याचबरोबर मित्र म्हणवणाऱ्या एका अरसिक सहकाऱ्याच्या अनपेक्षित व अत्यंत थंड्या प्रतिसादामुळे आलेली खिन्नता त्याला छळत राहिली.
..........
आणि आता प्रीतीच्या प्रांतातील एक किस्सा. शरद हा एक वैज्ञानिक. त्याची एकूण करीअरच ‘अ’ दर्जाची. दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत अगदी वरच्या क्रमांकाने झळकलेला. त्यानंतर जाणीवपूर्वक व्यावसायिक शाखांच्या वाटेला न फिरकता विज्ञानाकडे वळलेला. पुढे त्याने या शाखेतील एकेक टप्पे पार करीत पी.एच.डी. लीलया प्राप्त केली. कुशाग्र बुद्धीचा शरद मूलभूत संशोधन करण्याच्या इराद्यानेच विज्ञानाकडे वळला होता. कॉलेजच्या सुरवातीपासूनच त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिले होते.

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना असणाऱ्या करमणुकीच्या अनेक आकर्षणापासून तो कित्येक कोस दूर होता. नाही म्हणायला त्याला अभ्यासापासून विचलित करणारी एक गोष्ट होती. त्यांच्याच वर्गातली नेहा ही त्याच्यावर चक्क ‘मरत’ होती. शरद तिला कटाक्षाने दूर ठेवायला बघे. पण ती पक्की वस्ताद. काही ना काही कारण काढून ती त्याला सतत चिकटायला बघे. तशी ती अभ्यासात यथातथाच. केवळ कॉलेजचे आयुष्य उपभोगायचे म्हणून कॉलेजला येणारी. तेव्हा अशा नेहाने तिथल्या पहिल्याच वर्षी शरदसारखा देखणा व हुशार मुलगा हेरला, यात नवल ते काय?
शरदने हर प्रकारे तिला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेहाचे प्रेमजाल इतके प्रभावी होते की शेवटी शरदमधला पुरुष त्यात अडकलाच. मग काय, या प्रेमप्रकरणाला अपेक्षित गती आली. मग एकमेकाचे जीवनसाथी होण्याच्या आणाभाका झाल्या. भावी वैवाहिक आयुंष्यात शरद संशोधनात स्वतःला झोकून देईल, तर नेहा ही एक उत्तम गृहिणी म्हणून त्याला साथ देईल, असेही ठरले.

दरम्यान शरदने पीएचडी वर स्वस्थ न बसता परदेशातील पोस्ट- डॉक्ट च्या प्रवेशाची तयारी चालू केली. त्याला त्यासाठी अमेरिकेतून सहज आमंत्रण मिळाले. नेहाला त्याचा अभिमान वाटला. आता दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. नंतर शरद आणि यथावकाश नेहा हे अमेरिकेत दाखल झाले.
तेथील संशोधन प्रयोगशाळा म्हणजे शरदच्या दृष्टीने अक्षरशः कामाचे नंदनवन होत्या. त्यात तो दिवसाचे सोळा तास त्याच्या कामात देहभान हरपून गढून जाई. नेहाला त्याच्या या जीवनशैलीशी जुळवून घेणे भाग होते. त्यांचे सुरवातीचे दिवस तसे सुखात गेले. नंतर मात्र नेहाला घरी एकटेपणा जाणवू लागला. दिवस खायला उठे. नोकरीयोग्य व्हिसा नव्हताच. शेवटी वेळ जायला म्हणून तिने एका जवळच्या क्लबचे सभासदत्व घेतले.

हळूहळू क्लबात तिच्या ओळखी वाढल्या. तिथे रुपेश हा तरुणही नियमित येई. रुपेशचे खानदान अमेरिकेत तीन पिढ्या हॉटेलच्या व्यवसायात स्थिरावले होते. गर्भश्रीमंत असलेल्या रुपेशची जीवनशैली एकूणच मौजमस्तीची होती. अशा माणसाची नेहावर नजर न पडली तरच नवल. त्याने तिच्याशी सलगी केली आणि काही महिन्यांतच तिला आपल्या जाळ्यात व्यवस्थित अडकवले.
सुरवातीस नेहाला मनातून अपराधी वाटे. पण हळूहळू त्या गुलछबू माणसात ती कशी गुंतत गेली हे तिलाच कळले नाही. घरातील एकटेपणा, शरदचे संसारापेक्षा संशोधनात अधिक रमणे आणि रुपेशचे प्रभावी ‘माया’जाल या सगळ्यांमुळे ती अगदी वाहवत गेली. बघताबघता परपुरुषाशी ओळख, मैत्री, प्रेम(?) आणि अखेरीस शरीरसुख असे टप्पे तिने अगदी सहज पार केले.

अमेरिकेतले मुक्त वातावरण, रुपेशच्या संपत्तीचे आकर्षण आणि सुखासीनतेची लागलेली चटक यांच्यापुढे नेहाला आता शरदची सोज्वळ बायको बनून राहणे अवघडच होते. त्यातून रुपेशला ती अगदी लग्नाची बायको म्हणून नसली तरी चालणार होते! लग्नाविना सहजीवनासाठी तो एका पायावर तयार होता. फक्त तिने शरदला पूर्ण सोडून यावे एवढीच त्याची मागणी.
मग काय, अपेक्षेप्रमाणेच या प्रकरणाचा शेवट. शरदला बसलेला मानसिक धक्का, त्यांचा घटस्फोट आणि नव्या जोडीचे निव्वळ सहजीवन सुरू! या सगळ्यात बळी कोणाचा गेला, तर शरदचा. कोणामुळे? तर प्रीतीच्या एका खोट्या नाण्यामुळे. शरदच्या दैदिप्यमान वैज्ञानिक कारकिर्दीला लागलेला हा सांसारिक कलंक तो कधीच विसरू शकणार नव्हता.
*********************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 8:29 am | मुक्त विहारि

३ वाक्ये.....

१. काही माणसे कधीच आपली सहचारी बनू शकत नाहीत. त्यांना दूर ठेवणेच उत्तम. (उदा. नातेवाईक)

२. काही फक्त एका ठराविक कार्यासाठीच एकत्र येतात, तो कार्य्क्रम आपापल्या पद्धतीने साजरा करावा आणि विसरून जावे (उदा. साखरपूडा, शाळेतील स्नेहसम्मेलने)

३. काही मित्र मात्र अतिशय जिवलग होवू शकतात. त्यांना जोडून ठेवणेच उत्तम.

आमचे बाबा महाराज म्हणतात,"ह्या जगांत कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका.अपेक्षा भंगाचे दू:ख फार मोठे, ते पचवण्यात आपला वेळ आणि पैसा अनावश्यक खर्च होतो.तस्मात कट्टे करा आणि मोकळे व्हा."

मंदार कात्रे's picture

5 Jul 2017 - 8:56 am | मंदार कात्रे

तस्मात कट्टे करा आणि मोकळे व्हा."

+१००
;)

गोग्गोड लेख आहे, एकदम कृत्रिम.

अभिजीत अवलिया's picture

5 Jul 2017 - 9:58 am | अभिजीत अवलिया

+१

कपिलमुनी's picture

5 Jul 2017 - 12:08 pm | कपिलमुनी

ओह आय सी !

Nitin Palkar's picture

5 Jul 2017 - 8:29 pm | Nitin Palkar

खास काही नाही!

कुमार१'s picture

5 Jul 2017 - 9:41 am | कुमार१

मुवि, सहमत.

मराठी_माणूस's picture

5 Jul 2017 - 10:27 am | मराठी_माणूस

पहीली गोष्टः एकही जण हॉस्टेल वर जाण्यासाठी सोबत करत नाही हे पटत नाही. वेळ प्रसंगी अनोळखी माणसे सुध्दा अपेक्षेपेक्षा जास्त मदत करतात.
त्यात त्याचे हे जर दुसरे वर्ष असेल तर आतापर्यंत त्याचे काही मित्र असायला हवे होते. २ की,मी. हे फार मोठे अंतर नव्हे. कोणीतरी त्याला पटकन पोहचवुन परत क्लिनिक मधे सहभागी होउ शकलाअसता. एव्हढेही कोणी करायला तयार नव्हते म्हणजे त्याचे इतरां बरोबर मित्रत्वाचे संबंध नव्हते असा अर्थ निघु शकतो

तेथील संशोधन प्रयोगशाळा म्हणजे शरदच्या दृष्टीने अक्षरशः कामाचे नंदनवन होत्या. त्यात तो दिवसाचे सोळा तास त्याच्या कामात देहभान हरपून गढून जाई. नेहाला त्याच्या या जीवनशैलीशी जुळवून घेणे भाग होते

सोळा तास कुठल्या प्रयोगशाळेत काम करतात? आणि करत असतील तर अशा नवऱ्याने बायकोला समजून घेणे अपेक्षित आहे. बरेच भारतीय लोक उगाचच ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करतात आणि घरी दुर्लक्ष करतात .

ज्योति अळवणी's picture

5 Jul 2017 - 11:18 am | ज्योति अळवणी

तिन्ही कथा पटल्या नाहीत

कुमार१'s picture

5 Jul 2017 - 11:46 am | कुमार१

सर्व प्रतिसादकांचे आभार. सर्वांच्या मतांबद्दल आदर आहे.

सुचिता१'s picture

5 Jul 2017 - 12:01 pm | सुचिता१

शरद हुशार, सालस, साधा... नेहा ने च प्रेम पाशात फसवले .. १६ तास काम करणारा कामसु . अशी एकच बाजू कोणत्या नाण्याला असते हो ?

नेहा ची काही मानसीक / शारीरीक गरज नसायलाच हवी असे ग्रृहीत धरले आहे...

आणि नेहा गेल्या वर ही ८ तासांत शरद बिचारा ( !!) झोपणार की दुख: करणार ..

कपिलमुनी's picture

5 Jul 2017 - 12:14 pm | कपिलमुनी

नेहाचे नाणे ( बाजू) अशी एक कथा पाडता येइल !

मिपावरच पहिल्यांदा प्रकाशित केली तरी चालेल. इथे पहिल्या धारेचे लिखाणही चालते.

फक्त पहिल्या किश्यात तुमच्या नायकाला थोडी फार सहानुभुती द्यावीशी वाटते. दुसर्‍या कतेह्त अपेक्षाच करणे चूक आहे. तिसर्‍या कथेत तर जणू काही शरद सदगुणांचा पुतळा आणि नेहा म्हणजे कपटी, पाताळयंट्री अशी अगम्य मांडणी आहे. लग्नाच्या बायकोला आजीबातच वेळ न देता येऊन सुद्धा त्यिने मात्र चांगली गृहीणी म्हनून रहावे असली अपेक्षा चूक आहे. त्यात ति सारे स्पष्ट सांगून वेगळी होतेय म्हणजे ठीकच आहे की.

सुबोध खरे's picture

5 Jul 2017 - 12:55 pm | सुबोध खरे

हायला
आमच्या वेळेस कुणाला क्लिनिकच्या वेळेस चक्कर वगैरे आली तर त्याला होस्टेलला पोहोचवायला एकच काय चार पाच कार्टी लगेच तयार होत असत.
(मुलगी असेल तर सगळं क्लासच.)
आमच्या प्राध्यापकानी एकदा उलटेच विचारले होते, चार जणांचे काय काम आहे, त्याला "पोचवायचे" आहे का? एक जण बास झाला.
असो

सानझरी's picture

5 Jul 2017 - 1:31 pm | सानझरी

लोल.. =))

एस's picture

5 Jul 2017 - 1:42 pm | एस

हहपुवा! :-D :-D :-D

प्रीत-मोहर's picture

5 Jul 2017 - 3:17 pm | प्रीत-मोहर

लोल =)) =))

Nitin Palkar's picture

5 Jul 2017 - 8:33 pm | Nitin Palkar

हा! हा!! हा!!!

कुमार१'s picture

5 Jul 2017 - 2:49 pm | कुमार१

सुबोध, मस्त प्रतिसाद.

=))
हाय सुबोध, लैच भारी प्रतिसाद हां.

.
(डॉक्टर यायच्या आत पला ;) )

महेश हतोळकर's picture

5 Jul 2017 - 3:51 pm | महेश हतोळकर

प्रसादच्या मित्रांनी त्याच्याकडे लक्ष न देता करीयरला महत्व दिलेतर ते वाईट आणि बायकोच्या बाबतीत तेच करणारा शरद बिच्चारा....

गामा पैलवान's picture

5 Jul 2017 - 5:41 pm | गामा पैलवान

कुमार१,

तुम्ही पहिल्या कथेत सेवाभाव हा शब्द वापरला आहे. डॉक्टरवर सेवाभावाची सक्ती का?

माझं म्हणणं असंय की बाकीच्यांकडून सेवाभावाची अपेक्षा केली जात नाही. डॉक्टरकडून का केली जाते? तीसुद्धा सेवाभावाचं थेट प्रशिक्षण न देता? हा डॉक्टरांवर अन्याय नाही का?

आ.न.,
-गा.पै.

हा एका वेगळ्या ग्रंथाचा विषय आहे...

अत्रन्गि पाउस's picture

6 Jul 2017 - 12:08 pm | अत्रन्गि पाउस

गाणं विस्तारतांना आलापी किंवा तानेच्या जागा असतात तशी इथे हि जागा आहे ...
आणि नेहेमीचे यशस्वी अजून आलेले दिसत नाहीत ...त्यामुळे त्या खास आलापीच्या प्रतीक्षेत ...
लय दिवस झाले त्या कडक बिजली ताना ऐकून

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2017 - 6:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

कामापुरता मामा ! ;) =))

मुक्त विहारि's picture

5 Jul 2017 - 6:34 pm | मुक्त विहारि

वेगळा धागा काढू का?

(पुणे आणि अपुणेकर, डॉक्टर आणि रोगी, डोंबोली आणि जगातील मध्यवर्ती ठिकाण.... हे न संपणारे ग्रंथ आहेत.)

Nitin Palkar's picture

5 Jul 2017 - 8:35 pm | Nitin Palkar

वाट कशाची बघताय?

सुबोध खरे's picture

5 Jul 2017 - 11:07 pm | सुबोध खरे

डॉक्टर कडून सेवेची अपेक्षा केली जाते भाव दिला जात नाही.
हे मानधनाची अपेक्षा असलेल्या कवीला मान भरपूर मिळतो धन मिळत नाही तसेच आहे.(()))

स्वधर्म's picture

6 Jul 2017 - 4:56 pm | स्वधर्म

खरंच? हा तुमचा दृष्टीकोन झाला!
वस्तुस्थिती अशी की डाॅक्टरांना १०० पैकी ९० तरी रूग्ण अत्यंत अादरानं वागवतात. अामच्यासारख्या सामान्यांना नेहमी त्यांचा हेवा वाटतो. असं कुठलं प्रोफेशन अाहे, जिथं तुंम्हाला क्वेश्चन केलं जात नाही? डाॅक्टर्स हॅव अॅबसोल्यूट अॅथाॅरिटी अोव्हर मेजाॅरीटी अाॅफ देअर कस्टमर्स! इतरांसाठी ‘customer is a king’ असतो, तर या धंद्यात ‘customer is at the receiving end most of the times’. अाजारची ट्रीटमेंट असो, वा लावलेले चार्जेस, डाॅक्टर्सना केवळ दुसरा डाॅक्टरच अाव्हान देऊ शकतो, रूग्ण नव्हे!

सुबोध खरे's picture

6 Jul 2017 - 6:50 pm | सुबोध खरे

काय सांगताय?
तुमचं प्रमाण उलटं झालं आहे.
अहो रोजची गोष्ट आहे.
रोज इंटरनेट वर लिहिलेलं वाचून तुम्ही असं का केलंत ते सांगा. तुमचे दर खूपच जास्त आहेत ते अमुक तमुक डॉक्टर इतकेच घेतात. अमुक तमुक डॉक्टर कसे रुग्णाला "पाहिजे तेवढे पैसे द्या" असे सांगणारा व्हॉट्स ऍप चा लेख दाखवतात. वरिष्ठ नागरिकांना तुम्ही सवलत का देत नाही याचा जाब विचारल्यासारखे करणारे सुद्धा भरपूर असतात. फुकट सेकंड ओपिनियनसाठी येणारे तर भरपूर आहेत आणि अमुक तमुक डॉक्टरनी हि चाचणी करायला लावली ती ची गरज होती का पासून या चाचणीचा रिपोर्ट आणला आहे तुला वेळ होईल तेंव्हा "वाचून घे" मग आपण 'डिस्कस" करू. त्या डॉक्टरांनी हि हि औषधे दिली आहेत ती बरोबर आहेत का एकदा खात्री करायची होती पासून पित्त होतंय त्यासाठी आयुर्वेदिक चांगलं कि होमियोपॅथी.
जाऊ द्या हो.
माझी दोन्ही मुलं "वैद्यकशास्त्रा" कडे गेली नाहीत याबद्दल मी देवाचे आभार मानतो एवढंच बस आहे.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
माझं म्हणणं असंय की बाकीच्यांकडून सेवाभावाची अपेक्षा केली जात नाही. डॉक्टरकडून का केली जाते? तीसुद्धा सेवाभावाचं थेट प्रशिक्षण न देता? >>
वैद्यकीय प्रशिक्षणात ' डॉ. ची वागणूक आणि नैतिकता (Code of conduct & ethics) या संबंधीचे प्रशिक्षण जरूर आहे.

अभिजीत अवलिया's picture

5 Jul 2017 - 9:42 pm | अभिजीत अवलिया

या सगळ्यात बळी कोणाचा गेला, तर शरदचा. कोणामुळे? तर प्रीतीच्या एका खोट्या नाण्यामुळे.

--> बळी प्रीतीचा गेलाय शरदमुळे.

मी तर म्हणतो, वाचकांचा बळी गेला.

मराठी शब्द सापडत नाहीए म्हणून .

Pessimistic Bullshit ,

दशानन's picture

8 Jul 2017 - 9:19 pm | दशानन

+१

दुसरी बाजू हा प्रकारचं नाही आहे यात!

अरेच्चा इथले प्रतिसाद भारी आहेत की:D