आवर्तन

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
29 Jun 2017 - 4:04 pm

पावसाची आवर्तनं चालू असताना प्रत्येक थेंबाला जमिनीवर एक कोंब फुटतो, आणि पाणी वेलीसारखं पसरत जातं. अचानक थबकायला होतं, आणि भीती वाटते की आपल्याला येणारी जगाची अनुभूतीच तर चुकीची नाही ना? मी आणि माझ्या नजरेने ठरवून घेतलेल्या रूपांमध्ये ज्याचं जगणं अल्पायुषी वाटतं, त्या त्या रुपांच्या मर्यादेतून बाहेर काढलं, तर त्या पाण्याला एकच गुणधर्म राहतो-वाहतेपण.

या अचानक झालेल्या जाणीवेने क्षणिक काय, नित्य काय, याच्या सगळ्या संकल्पना वाहत्या होऊन जातात. सरपटत जाणारं पाणी सापडेल तिथल्या भेगेत जुनाट वाड्याच्या भिंतींवरील वेलीप्रमाणेच चोरपावलांनी शिरतं, आणि त्या भेगेइतकंच शहारायला होतं. तेच पाणी मातीत झिरपतं, आणि आपल्या मृण्मय शरीरातलं पाण्याचं अस्तित्व जाणवून देतं. एक वेलींचं जाळं, एक तळं, आणि माझा त्याक्षणी तिथे उभा असणारा देह, यातल्या सीमारेषा धूसर वाटू लागतात.

पण ती चिवट वेल जमिनीत रुजते, मी माझ्या देहात अडकलेली, आणि पाणी मात्र मुक्त वाहतं; हे नक्की कोण ठरवतं?

एका स्वरातून दुसऱ्या स्वरात जाताना स्वरयंत्र पायऱ्यांवरून पाणी वहावं तसं जातं, तर सप्तकांच्या बंधनात राहणं त्याला कसं जमतं? का त्याला त्यापलीकडे जाण्याचं स्वातंत्र्यच नाही?

भाषेचा अभ्यास करताना नाम आणि क्रियापद आपापल्या खोल्या सोडून दुसऱ्याच्या खोलीत शिरकाव करताना दिसतात, ते याच वाहतेपणामुळे का? पण मग तरी त्यांचं अस्तित्व त्यांच्या वेगळेपणातच मला झेपू शकतं, हे कसं?

धुवांधार पावसात दगडी भिंतीही विरघळताना दिसतात, तेव्हा माझे डोळे मला फसवतात, का माझ्या त्यांना निश्चित रूप देणाऱ्या संकल्पना?

आणि क्षणात इतकी जाणीवांची उलथापालथ घडवून गेलेला पाऊस संथ लयीत कोसळतच असतो..

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सानझरी's picture

29 Jun 2017 - 4:57 pm | सानझरी

किती सुंदर लिहीलंयस गं... अप्रतिम!!

पुंबा's picture

29 Jun 2017 - 6:04 pm | पुंबा

मस्त! मस्त!

प्रीत-मोहर's picture

29 Jun 2017 - 6:20 pm | प्रीत-मोहर

सुंदर!!

संदीप-लेले's picture

29 Jun 2017 - 6:40 pm | संदीप-लेले

क्या बात है ! कमाल !

माहितगार's picture

29 Jun 2017 - 7:33 pm | माहितगार

अभिनंदन !, तुमचं आणि तुमच्या लेखातील पावसाचंही !!

गामा पैलवान's picture

29 Jun 2017 - 8:44 pm | गामा पैलवान

पिशी अबोली,

नाव अबोली असूनही बऱ्याच बोलत्या झालात की हो!

तुमचा प्रश्न समर्पक आहे :

भाषेचा अभ्यास करताना नाम आणि क्रियापद आपापल्या खोल्या सोडून दुसऱ्याच्या खोलीत शिरकाव करताना दिसतात, ते याच वाहतेपणामुळे का? पण मग तरी त्यांचं अस्तित्व त्यांच्या वेगळेपणातच मला झेपू शकतं, हे कसं?

काहीतरी वाहतंय म्हणजे दुसरं काहीतरी स्थिर आहे. ते स्थिरतत्त्व तुम्ही स्वत: आहात.

बाकी, क्रियापद धातूवरून निर्माण होतं. ही नामक्रियापदादिंची वाहतेपणाची अनुभूती देणारं तत्त्व धातु आहे. त्यात धात्व म्हणजे धारणशक्ती उपस्थित आहे. हे धात्व इतर खोल्यांत घुसून ओळख पटवतं. ही धारणशक्तीच नाम आणि क्रियापदांची ओळख आहे. हिच्यामुळेच त्यांचं अस्तित्व वेगळं उठून दिसतं.

धारणशक्ती एका दिशेने सरकू लागली की वहनाची अनुभूती येते. याउलट एका जागी एकवटली की स्थाणुत्व (=दृढपण=) उत्पन्न करते.

जाताजाता : धर्म हा शब्द देखील धृ (=धारयति) वरून आलेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

दशानन's picture

29 Jun 2017 - 8:56 pm | दशानन

खूप दिवसाने छानसे स्फुट वाचायला मिळले.

पद्मावति's picture

29 Jun 2017 - 9:17 pm | पद्मावति

फारच सुरेख!

पिशी अबोली's picture

29 Jun 2017 - 10:58 pm | पिशी अबोली

प्रतिसादकांना धन्यवाद. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jun 2017 - 11:17 pm | माम्लेदारचा पन्खा

मन तृप्त झालं !

जेनी...'s picture

29 Jun 2017 - 11:45 pm | जेनी...

खुप खुप सुंदर ... बर्याच दिवसानी छानसं काहितरी ...

पिशी अबोली's picture

30 Jun 2017 - 10:21 am | पिशी अबोली

खूप धन्यवाद!

ज्योति अळवणी's picture

30 Jun 2017 - 7:45 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम!!!

सुंदर. नेहेमी वाचनात येतं त्यापेक्षा वेगळं आणि छान लिहितेस तू पिशीअबोली!!
लिहिती रहा.